ब्लॉग संग्रहण
-
▼
2021
(29)
-
▼
जून 2021
(26)
-
▼
16 जून
(16)
- " गच्चीवरील गप्पा "
- सातारा जिल्ह्यातील कलाकार आणि त्यांची उद्यमशीलता
- " गच्चीवरील गप्पा " अर्थात ? प्रश्न " चिन्ह " ?
- हरवलेले बालपण
- महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले
- टोपकर सर
- स्केचबुक
- दामू
- एकलव्य 'कांताराम'
- चित्रकाराचे भूत
- पेसी अंकल
- मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट
- सुसंवादाचे महत्व
- एकदा दर्शन दे घन:श्याम
- राज्यपालांची आठवण
- मॉर्निंग वॉक
-
▼
16 जून
(16)
-
▼
जून 2021
(26)
-
►
2022
(4)
- ► जानेवारी 2022 (2)
- ► एप्रिल 2022 (1)
-
►
2023
(14)
-
►
नोव्हेंबर 2023
(14)
- ► 01 नोव्हें (10)
- ► 02 नोव्हें (4)
-
►
नोव्हेंबर 2023
(14)
बुधवार, १६ जून, २०२१
मॉर्निंग वॉक
राज्यपालांची आठवण
एकदा दर्शन दे घन:श्याम
एकदा दर्शन दे घन: श्याम
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्या " म्हणायचो आणि ते त्याला ही आवडत असावे. त्याची व माझी गट्टी फार अगदी पहीली पासून होती . पहीली ते सातवी मराठी शाळा व नंतर आठवी ते दहावीपर्यंत संजीवन विद्यालयात पाचगणीला एकत्रच शिकायचो , दिवसभर एकत्रच अभ्यास करायचो .
घन्या हे फार अजब रसायन होते . त्याचे घारे डोळे मांजरीसारखे होते, गोरा वर्ण , स्वच्छ कपडे व संध्याकाळी तो ग्रे काळपट रंगाचा एक आवडीचा कोट नेहमी घालायचा , तो नेहमी खुषीत असल्याचं दाखवायचा. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूूक होती . त्याचे वडील रमाकांत, टेलरींग व अलटरचे काम करायचे. पाचगणीच्या शिवाजी पुतळ्या जवळ माडीवर त्यांचे छोटे दुकान होते . ते कधीही साफ केलेले मला आठवत नाही ,त्याला कधीही रंग मारल्याचे पहाण्यात आले नाही .अतिशय हुशार व सुट शिवण्यात तरबेज असलेल्या रमांकांत टेलरांनां निराशेने मात्र पूर्णपणे खूप ग्रासले होते . त्याचे कारण त्यांची मनोरुग्ण बायको म्हणजे घन्याची आई.घन्याची आई खूपच वेडी होती, वेड्यासारखीच एकटीच सतत बडबड करत राहायची . दिवसभर तिला कशाचीच पर्वा नव्हती . संसाराची जबाबदारी, इतर कशाचीच तिला जाणीव नसायची . सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत तिची सततची बडबड कधी थांबायचीच नाही . तोच वारसा त्यांच्या मोठ्या मुलाने पुढे चालवला. घन्याचा मोठा भाऊ मोहन शाळेत असतानाच त्याचे कोणतेतरी गणित बिघडले चुकले . व नंतर त्याचेही डोक्याचे गणित कायमचेच हुकले . हुशार मोहन आजही सारखी गणिते सोडवत बेवारशाप्रमाणे भररस्त्यात , गटारा शेजारी, घरात , कोठेही बडबडत असतो . त्याचे न सुटणारे गणित तो येणाऱ्या जाणाऱ्यानां समजून सांगण्याचा किंवा स्वत :लाच विचारत, हातवारे करत बसतो .हे त्याचे जीवनच झाले आहे . घन्याच्या दोन बहिणीपैकी , एकीने शाळा सोडली होती व ती स्वयंपाक पाणी , आवराआवर करायची व आई विहिरीवर कपडे धुवायची बडबड करत .एक छोटी बहिण मात्र शाळेत जायची .
घरातील या परिस्थितीमूळे रमाकांत टेलर खूप अस्वस्थ, निराश, व मटक्यासारख्या व्यसनात गुफूंन गेले होते . त्यांचे संसाराकडे लक्ष नव्हते कारण बायको सुधारण्याची शक्यता आजीबात नव्हती .
या सगळ्यांत घन्या खूप हुशार होता . त्याला आपल्या ,परिस्थितीची जाणीव होती .आपली आई वेडी आहे व भाऊही कामातून गेला आहे याचा त्याच्यावर एक प्रकारचा नकारार्थी प्रचंड आघात झाला होता व मानसिक दबाव ही त्याच्यावर नेहमीच असायचा .
घन्या व मी जिगरी दोस्त होतो , आम्ही एकत्र पोलीस ग्राऊंडच्या मागे सोहराब मोदींच्या बंगल्यातील गार्डनमध्ये , एस टी स्टॅन्डच्या जवळ नबाब बंगल्यामध्ये ,कधी टेबल लॅन्डच्या गुहेत अभ्यास करायचो , खेळायचो, घन्याला नीरव " शांतता " खूप आवडायची.आईच्या दिवसभरच्या बडबडीला तो जाम कंटाळलेला असायचा .आम्ही विद्यार्थी वाचनालयात जावून बसायचो . आम्ही कसलीही वर्गणी दिली नसताना वाचनालयाचा कमरुद्दीनचाचा आम्हाला गोष्टींची छोटी पुस्तके वाचायला दयायचा .घन्या व मी भरपूर वाचायचो व वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करायचो
आमचा तो आवडीचा विरंगुळा होता .
संजीवनला आल्यानंतर मात्र आठवीत घन्या खूप अस्वस्थ झाला होता . त्याच्या भावकीच्या भांडणामूळे त्याला माडीवरचे घर सोडावे लागले होते . मग माडीच्या मागेच घराबाहेर उघडयावर पत्र्याच्या शेडमध्ये ही सारी मंडळी स्थलांतरीत झाली . त्याला घर कसे म्हणायचे ? एक बारा बाय बाराचे उघडं पटांगण, त्यात दगडी बाजूला लावून जुन्या पत्र्याचे दोरीने बांधलेले कुंपण व डोक्यावर उघडे सताड आभाळ . घरात एक स्टोव्ह, थोडी ॲल्युमिनियमची भांडी, वाकळा , गाद्या, चादरी व असंख्य बांधलेली कपड्यांची गाठोडी, अस्ताव्यस्त पसरलेली . बाजूला सार्वजनिक संडास व कोपऱ्यात बडबड करत, उचकत ,बांधत बसलेली वेडी आई . तर भाऊ न सुटलेली गणितं सोडवत बसलेला .
तरीही प्रसन्न मनाने तो संजीवनला निघताना एसटी स्टॅन्ड समोरच्या माझ्या घरी यायचा .व आम्ही शाळेला निघायचो . रस्त्यातून जाताना सकाळची कोवळ ऊनं, झाडांच्या , माणसांच्या सावल्या दाखवायचा, धुक्याचं वातावरण टिपायला, इमारतींवर पडलेला प्रकाश बघायला मला सांगायचा . चित्रात हे जिवंतपणा आणण्याची साधनं आहेत असं बोलत राहायचा . त्याला वाचनाची, लिखाणाची, चित्रांची, अध्यात्माची, गाण्याची एकंदर सर्व जीवनच समजून घेण्याची खूप ओढ होती. त्याला खूप खूप शिकून मोठं होण्याची आस लागलेली होती . तो त्या प्रयत्नात नेहमी असायचा .
त्याच्याकडे शाळेची एकच ग्रे पँट व एकच सफेद शर्ट होता ,तर माझ्याकडे दोन ,त्या अर्थाने मी त्याच्यापेक्षा श्रीमंत होतो. आम्ही रोज शाळेतून आलो की लगेच कपडे काढून गादीखाली घडी घालून ठेवायचो . दुसऱ्या दिवशी सकाळी गरम तांब्या फिरवून शाळेच्या ड्रेसला इस्त्री करायचो . आम्ही कधी गेम्सच्या मैदानावर गेलो नाही कारण आमच्याकडे हाऊस टी शर्ट , हाफ पँट व शूज नव्हतेच .आमच्याकडे शाळेचा ब्लेझरही(कोट ) नव्हता . दहावीला राज्यपाल .व्ही.व्ही. गिरी आले होते. पण आमच्याकडे कोट नसल्यामुळे हिंदीच्या सिंगसरांनी आम्हाला वर्गातच बसवून ठेवले होते .
घन्याला गाण्यांची व मला चित्रांची भारी आवड होती . त्यावेळी आमच्या दोघांच्याही घरी टिव्ही नव्हता . मग बाजारात मंडई मध्ये तर कधी कोणाच्या घरच्या खिडकीतुन, किंवा पत्र्याच्या होल मधून आम्ही चित्रपट ऐकायचो, सफर, आराधना, चितचोर, गाईड, नमकहराम असे किती तरी चित्रपट आम्ही पाहीले कमी ऐकले जास्त . त्यातली किशोरकुमारची गाणी मला आवडायची, मग मी घन्याकडे पाहायचो , त्याला सांगायचो. घन्या पटकन् तोंडावर बोट ठेवायचा व मला शांत राहायला सांगायचा. डोळे मिटायचा व गाणे संपताच खिशातून कागदाचा तुकडा काढायचा व संपूर्ण गाणे न चुकता लिहून काढायचा . अशी अफाट व अलौकीक शक्ती मी घन्यातच पाहीली व अनुभवली . त्याची एक छोटी वही मी केली होती व आजही ती मी माझ्याकडे जपून ठेवलेली आहे .
घन्याचे गाणे लिहून झाले की माझे अनेक प्रश्न सुरू व्हायचे .
तु डोळे का मिटतोस ?
तर शांतपणे म्हणायचा अरे, ते गाणे आपल्याला समजून घ्यायचे असले की डोळे मिटावे मग गाण्याचे शब्द , त्याचा स्वर, ताल, त्याची बांधणी, रचना, त्याची रागदारी, त्याच्यातील भावना, विषय, कवीची काव्यांतून सांगण्याची शैली सगळं आपल्याकडे येते . आपल्याला अनुभवता येते,मनात झिरपून जाते . मग शब्द कागदावर येतात .मी अचंबित व्हायचो की एकदाच ऐकलेले गाणे संपूर्ण कसे कागदावर आणता येते ?
मी बऱ्याच वेळा तसा प्रयत्न केलाय पण मला एकदा ऐकलेले गाणे कागदावर कधी ते संपूर्णपणे न चुकता लिहणे जमले नाही . पण डोळे शांतपणे मिटून आवडलेले गाणे मात्र मी घन्याची फिलोसॉफी म्हणून आजही आठवणीने अमंलात आणतो .
घन:श्याम व मी पुढे सायन्स शिकायला वाईला गेलो , सायन्स , गणित शिकणे , बेडकाचे पोट फाडून त्याची चिरफाड करुन पचनसंस्थेचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीची रसायने एकमेकांत मिसळणे , लॉग बुकचे मोठे आकडे शोधत रहाणे , सायन्सच्या प्रयोगशाळेत ना आवडीची कामे करत राहणे, हा आमचा नावडता कार्यक्रम होता. मग आम्ही एसटीतून गाडी थांबवून वाईच्या रस्त्यात घाटातच बऱ्याचदा उतरायचो .मी सगळ्या घाटातील झाडांची चित्रे रेखाटायचो तर घन्या गाणी , कविता, वाचन , लिखाणकाम करायचा . त्याच्या त्या अफाट बुद्धीमत्तेचा मला हेवा वाटायचा . त्याला विचारले तर सहज म्हणायचा
" मनापासून केले की सगळं येतं " .
मग संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या जगण्याचं
"सायन्स " शिकून , समजून घेऊन आपआपल्या घरी जायचो .
असा हा घन्या बारावीला गणितात नापास झाल्याचा निकाल लागला व तो मनाने कोलमडूनच पडला . माझ्याकडे यायचाच बंद झाला, मी त्याला खूप समजावयाचा प्रयत्न केला, धीर दिला, चेतना दिली, आधार दिला . पण त्याने कोणाचेच ऐकले नाही . माझ्यावर चिडायचा, टाळायचा, दूर कोठेतरी जावून एकटाच भटकत राहायचा . आपण एका विषयात नापास झालो हे त्याला, त्याच्या बुध्दीला, पटायचेच नाही .
तो आत्महत्या करायचा प्रयत्न करायला लागला . मग मी त्याच्यावर रागवायचो, ओरडायचो, पण त्याच्यात काही फरक पडला नाही . इतका निराश वैफल्यग्रस्त घन्या मी कधीच पाहीला नव्हता . आपण नापास झालो या दुःखी भावनेने त्याला निराशेने प्रचंड आतूनच पोखरून काढले होते . सारखा स्वतःच्याच तोंडात तो चापटया मारायला लागला होता .
पश्चातापाच्या ........
एक दिवस घन्याकडे दुपारी गेलो होतो . घन्याला खूप भूक लागली होती . त्याची वेडी आई तिथेच गाठोडी चिवडत, उचकत, मोठमोठयाने आपल्याच नादात, तंद्रीत बडबड करत बसली होती, तिचं आपल्या उपाशी लेकाकडं , त्याच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं, मोठी बहीण चांगली कपडे नसल्यामूळे अंगावर चादर लपेटून निस्तेज व भकास चेहऱ्याने झोपली होती . घन्याला भुकेमूळे खूप राग आला होता तो त्याला कंट्रोल होत नव्हता .
मी देखील त्याला मदत करण्याचे फक्त आश्वासन देत होतो . कारण मी कमवत नव्हतो . घन्याने सगळी भांडी आपटली, फेकून दिली, आईच्या समोर तिने बांधलेल्या गाठोड्यांवर लाथा मारल्या .व माझ्याकडे रागाने पाहून हातवारे करत तो म्हणाला कशाला असे भिकाऱ्यासारखे जगायचे ? असं फालतू आयुष्य जगून काय उपयोग? असं जगण्यासाठी का आपण जन्म घेतलाय ? याला जगणं म्हणतात का ?
मी फक्त डोळ्यात पाणी आणून त्याला माझ्या घरी न्यायचा प्रयत्न करू लागलो . संतापाने त्याने मला ढकलून दिले .भूकेच्या तडाक्यातच शोधा शोधीत त्याला मिरचीचा लाल चटणीचा डबा सापडला . त्याने चटणीच खायला सुरवात केली .बकाबक तो मुठी भरून चटणी तोडांत कोंबत होता . मी डोळे फाडून त्याच्याकडे पहातच बसलो . तो मला अघोरी प्रकार वाटत होता , जवळजवळ अर्धा किलो तरी चटणी त्याने संपवली होती . मला वाटले त्याला आता जुलाब होणार, किंवा पोटात तरी दुखणार , प्रचंड यातना होणार , हॉस्पीटल मध्ये न्यावे लागणार .पण घन्याला काहीच झाले नाही . सगळे मान , अपमान, दुःख, वेदना, गरीबी पचविण्याची ताकद त्याने शरीरात व मनात निर्माण केलेली होती . मग तो एकटाच राहू लागला व शांत राहून स्वतःशीच मुकपणे भांडत राहीला .
अखेरपर्यंत .................
एक दिवस तो माझ्या घरी आला एका बॉक्समध्ये त्याने १२वीची सर्व पुस्तके भरली होती . त्याच्या मनावर चेहर्यावर एक वेगळीच उदासिनतेची छटा मला जाणवत होती .
माझ्याकडे का देतोस ही पुस्तके ? असे विचारले तर म्हणाला तुझ्याकडे ठेव, तुला उपयोगी पडतील . मी चाललोय आता ..........
कुठे चाललास ?
तर म्हणाला खूप लांब , आता कोणालाच परत भेटणार नाही .
मी घाबरलो व त्याच्या पाठीमागे जावू लागलो तर मागे वळून म्हणाला .
असा किती दिवस पाठलाग करशील तू ?
थकशील तु .
मी कधीच सापडणार नाही तुला .
पण तु खूप मोठा हो . शहाणा हो ,
तुला आवडणाऱ्या चित्रकलेत वाहून घे स्वतःला .
जीव ओत चित्रांमध्ये, कधी हारु नकोस माझ्यासारखा, तू झगडत रहा, खूप वाचत रहा. प्रयत्न सोडू नकोस, आणि गाणी ऐकताना मात्र डोळे मिटत जा मग तुला समजतील अनेक गुपिते गाण्यातील व
जीवन जगण्यातील सुध्दा ...........
दुसऱ्या दिवशी सकाळीच गावात गदारोळ उठला . सकाळचे दहा वाजले असावेत . कोणीतरी मला सांगितले घनःश्यामने गाव विहीरीत उडी मारून जीव दिला.
जिवाच्या आकांताने मी पळत सुटलो विहीरीकडे .खूप वेगाने , काय कळतंच नव्हतं मला काय होतयं ते . शरीर, मन, बुद्धी हातपाय सुन्न झाले होते.
मी पाहीलेला माझ्या आयुष्यातील पहीला मृतदेह होता घन:श्यामचा, माझ्या सर्वात आवडत्या मित्राचा .पाण्यातून रात्रभर भिजलेला , ओलाचिंब झालेला. ज्याच्या बरोबर माझे सगळं बालपण घालवले तो घन्या आता शांतपणे ,निष्प्राणपणे पडलेला होता . त्याच्या अंगावर तोच कालचा आवडीचा ग्रे रंगाचा कित्येक वर्षाचा कोट होता . तो काहीच बोलत नव्हता ,मी त्याच्याकडे पाहीले त्याचे डोळे मात्र शांतपणे मिटलेले होते . कुठलंतरी आवडलेले गाणे ऐकतोय असे वाटलं . मग मला वाटले तो आता तोडांवर बोट ठेवेल ,मला शांत राहायला सांगेल व कागदाचा
तुकडा काढेल व मला सगळं गाणं पुर्णपणे लिहून देईन . मला सांगेल डोळे मिटत जा गाणे ऐकताना .
पण असं काही झालं नाही .
घन्या गेला होता माझ्यापासून , आपल्या सगळयांपासूनच खूप लांबच्या अज्ञात प्रवासासाठी ........... डोळे मिटून .
घनःश्यामच्या अंतयात्रेला मी गेलो नाही . माझी हिम्मतच झाली नाही .त्या हनुमान गल्लीकडे मी फिरकलोच नाही कितीतरी दिवस .
पुढे मी कोल्हापूर , पुणे, मुंबई दिल्लीे येथे चित्रकलेच्या कामासाठी, शिक्षणासाठी गेलो. पाचगणीला माझे येणे कमी झाले. पुढे असेही कोणाकडून तरी ऐकले की घनःश्यामची उत्तरपत्रिकेची फेरतपासणी केली तर घन्या फर्स्टक्लास मध्ये पास होता . बोर्डाने काही तरी रिझल्टच्या कागदावर मिसप्रिंट झाल्याचे कारण दिले होते .ती निकालाची प्रत दुरुस्त करूनही दिली .
पण
माझा घन्या मात्र माझ्यापासून कायमचा मिस झाला होता . तो कधीही दुरुस्त होणार नव्हता . तो कायमचा गेला होता . माझ्यासोबत असंख्य आठवणी ठेवून .
माझ्या संजीवनच्या वर्गात असलेल्या अनिता टेंबेचे सुरेल आवाजातील गाणे सुरु झाले की मी घन्याकडे पाह्यचो . तर घन्याने डोळे मिटून घेतलेले असायचे व मलाही तो डोळे मिटून घ्यायला सांगायचा पण मी झोपलेला दिसेन या भितीने डोळे मिटायचोच नाही , घन्या मात्र तल्लीन झालेला असायचा .
आज तीन तपानंतर ३६ वर्षानंतर आमच्या संजीवनच्या ग्रुपची व्हॉटस् अपवर भेट झाली .
अनिता टेबेंची ( आता तिचे नाव अनिता यादव झाले आहे ) तिच्या आवाजात रात्री तिने पाठवलेली गाणी ऐकायला सुरुवात केली . आता मात्र मी डोळे मिटून घेतले होते ,तर पहीलेच गाणे सुरु झाले .
मधूवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम,
एकदा दर्शन दे घनःश्याम ,
एकदा दर्शन दे घनःश्याम
हे गाणे ऐकले व माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी पाझरू लागले . ते थांबतच नव्हतं, इतका मी तर हळवा नाही मग हे पाणी का वाहतंय याचा शांतपणे मी शोध घेत राहीलो . त्यावेळी जाणवले की अनिताच्या आवाजात आजही तीच अर्तता, स्वरांचा पक्का बाज, ठेका, ताल , शब्दफेक व काव्याची सुस्पष्टता, मंत्रमुग्ध होऊन भावना व्यक्त करण्याची जादूई सुरांची ताकद अजूनही जिवंत आहे , आवाजाची धार तशीच टिकून आहे . वातावरण बदलून टाकायची त्या गाण्यांमध्ये ताकद आहे .
घनःश्यामला ही गाणी खूप खूप आवडली असती . लगेच कागदाचा तुकडा काढून मला गाणी लिहून दिली असती व म्हणाला असता याला म्हणतात गाणे . अर्तता अशी असावी, गाणं असावं तर असं, जे हृदयाला भिडतं आणि हेलावून टाकतं संपूर्ण मन ऐकताना .
तर अशी ही घन्याची आठवण, अशा असंख्य आठवणी घेऊन आपण सर्वच जण जगत असतो. मी देखील कधी कधी वैतागतो, निराशा येते मलाही पण मी हारत नाही, धडपड करत राहतो .यश मिळो ना मिळो . चित्रकाराचा काट्याकुट्यातील प्रवास करताना थकत नाही . वादविवाद , राजकारण फालतू विषय शक्यतो टाळतोच , कारण मग घन्या रागवेल माझ्यावर . व फालतू पोकळ कारणं घेऊन उगीचच भांडत बसल्यावर निषेध करेल तो माझा .
पण आता असं वाटतंय घन्या जिवंत असता तर किती मजा आली असती . माझी चित्रे , माझी गाडी , माझं घर पाहील्यानंतर म्हणाला असता याला म्हणतात चित्रं काढणारा चित्रकार . कारण माझ्याकडे काहीच म्हणजे काहीच नव्हते .एकदम शुन्य , झिरो होतो . आज आठवतयं मग भांडला असता संजीवनशाळेच्या भट्टाचारी सरांशी ज्यांनी मला इंटरमिजिएट परिक्षेला डे स्कॉलर होतो म्हणून रिजेक्ट केले . चित्रकलेच्या ग्रेड परिक्षेला बसूनच दिलं नाही . आणि म्हणाला असता ग्रेड परिक्षा घेऊन काय चित्रकार होता येते का?
आपल्या सर्वांना देखील, म्हणाला असता कधी तरी प्रत्यक्ष भेटता, व्हॉटसअपवर व फेसबुकवर एकमेकाला मेसेज पाठवता आणि कोणत्या तरी विषयावर उगाचच जीवाचा आटापिटा कशाला करता ?
आता विसरू नका एकमेकानां .
भेटत रहा अधून मधून .
हारू नका .
जिद्द सोडू नका .
वादविवाद , आपआपला मोठेपणा सोडा .
तुझं माझं सोडा,एकाच लेव्हलवर या सर्वांचा मान आदर ठेवा .
कारण रागात किंवा भावनेच्या भरात एक चुकीचा शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टीनां एका क्षणात संपवून टाकतो .आयुष्यभर एखादयाला विषासारखा टोचत राहू शकतो .
म्हणून अधून मधून डोळे मिटत जा
आपल्या आवडीची गाणी ऐका , चित्रकारांची चित्रे पहा , मग नीटपणे कळतील .त्या गाण्याचा चित्रांचा आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा कलांचां सार लक्षात घ्या, प्रत्येक गाणं , प्रत्येक चित्र , संगीत , वाद्य, आनंदासाठी निर्माण केलं आहे,. एकमेकानां मनसोक्त आनंद दया व घ्या .
जीवनाची अनेक गाणे गाऊन झाल्यावर सगळ्यानां एक गाणे मात्र गावे लागते . शेवटचे अंतिम गाणे .....
घन्या आतच बसलाय जाऊन माझ्या हृदयात ,
खूप खोल .
खूप खोलवर
डोळे मिटून ... ..... ...... ...... .......
😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌
सुनिल काळे
9423966486.
सुसंवादाचे महत्व
*सुसंवादाचे महत्व*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
एखादा दिवस नेहमीप्रमाणेच उजाडतो पण सकाळपासूनच जाणवते की आजचा दिवस जरा भलताच वेगळा आहे. तो चांगला, वाईट की मध्यम स्वरुपाचा असणार हे आपल्याला कळत नाही , पण तो दिवस व त्याचे परिणाम मात्र
आयुष्यभर लक्षात राहतात . १५ मे २०२० हा दिवस माझ्यासाठी असाच विपरीत घटनेची आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरला . त्यादिवशी सकाळी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी उठलो तर वॉशबेसीन , बाथरूममध्ये पाण्याचा थेंब नाही . मग सगळीकडे शोध सुरु केला .
किचनचा नळ सुरु राहीला ? किंवा कमोडचा फ्लश सुरु राहीला ? की गार्डनचा नळ सुरु राहीला ? याची शोधाशोध करता करता मी आमच्या " निसर्ग " बंगल्याच्या टाकीवर सहजपणे चढलो . टाकीचे झाकण उघडून पाणी नाही हे दिसले व विचारात खाली उतरत असतानाच लोखंडी शिडी घसरली आणि अनपेक्षितपणे १२ फूटावर पडलो . डाव्या पायाचे हाड तुटले . वाईच्या मिशन हॉस्पीटलमध्ये डॉ. इराणी यांनी ऑपरेशन केले व प्लॅस्टर बांधलेल्या अवस्थेत मी घरी परतलो . घराच्या हॉलमध्येच टिव्ही पहात आता दोनतीन महीने माझा खरा 'लॉकडाऊन ' सुरु झाला .
अशा या निराश अवस्थेत मी टिव्हीवर सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येची बातमी ऐकली . टिव्हीवरची निवेदिका सुशांतसिंगची माहीती सविस्तरपणे सांगत होती . त्यामध्ये त्याच्याकडे साठ कोटी रुपयांची संपत्ती असून स्वतःचे घर , गाडी , प्रसिद्धी , नातेवाईक , मित्रपरिवार , मैत्रिणींचा गोतावळा, व शिक्षण या इतर अनेक गोष्टींची माहीती सांगत होती . आणि ते ऐकल्यावर मी भारावलेल्या अवस्थेमध्येच माझे कंगाल दिवस आठवू लागलो . व नंतर मी माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाच्या आठवणींचा ' ग्रीन टाय ' हा लेख लिहला .
हळूहळू वॉटसअप व फेसबूकवर माझा नंबर लिहल्यामूळे हा लेख अनेकांना आवडल्याचे व खूप प्रेरणा मिळाली असे सांगणारे खूप फोन आले . या फोनवरच्या सततच्या बोलण्यामूळे मी माझ्या पायाचे दुःख , वेदना खरोखर विसरून गेलो . रोज वेगवेगळे फोन यायचे व त्या सांगणाऱ्या माणसांचे प्रोब्लेम सांगून झाल्यावर मी चकीत व्हायचो . खरं तर मानवी जीवन किती गुंतागुंतीचे व अडचणींचे झाले आहे याचा मला नव्याने साक्षात्कार होत होता . काही लोकांनी त्यांचे मार्ग स्वतः शोधून त्यावर मात केली तर काहीजण त्याच त्याच विचारांच्या गुंत्यात इतके अडकलेले दिसले की त्यांची विचारांची गाडी पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीत अडकलेली दिसली . आपण दुसऱ्या अँगलने त्या अवघड अडचणींचा सामना करू शकतो याची त्यानां जाणीवच नव्हती . त्यापैकी आज आठवणीत असलेली ही गोष्ट मुद्दाम सांगतो .
साधारण दुपारची तीन वाजताची वेळ असावी आणि मोबाईल वर रिंग वाजली .एक अनोळखी नंबर मोबाईलवर दिसत होता . एक दबक्या आवाजात एका वयोवृद्ध आजींचा तो आवाज होता .त्यांनी त्यांचे नाव गाव सांगितले .
अहो , ती ग्रीन टाय नावाचा लेख तुम्हीच लिहला आहे का ?
मी हो म्हणालो आणि त्यांनी पहीली शपथ घातली की मी कधीही त्यांचे नाव कोणाला सांगणार नाही . आणि त्या फोनवर मोठ्याने रडू लागल्या . थोड्यावेळाने त्यांनी स्वतःला सावरले व शांतपणे मला सांगितले की ,
"मी आज आत्महत्या करणार आहे. "
मला आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्यायचे आहे , तर लाल रंगाचा स्प्रे आणू की काळ्या रंगाचा ?
कोणते औषध जास्त पॉवरफूल आहे ? म्हणजे लवकर मरण येईल ?
लवकरात लवकर सांगा ......
हे जणू ते मला अशा अविर्भावाने विचारत होत्या की जणू मला आत्महत्येचा भरपूर अनुभव आहे . आणि मी त्यातला तज्ञ आहे . मी सावध झालो आणि हळूवारपणे विचारले . . . . .
आज्जी ,खरंच आत्महत्येची गरज आहे का ?
फारच अडचण आहे का ?
रागावणार नसला तर मला खरे कारण जाणून घ्यायची इच्छा आहे . मी नक्की तुमच्या आत्महत्येला मदत करीन . आय प्रॉमिस .
माझे आश्वासक बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली .
आजीनां एकच अपत्य एकुलता एक मुलगा . मुलगा लहान असतानाच एका अपघातात त्यांच्या पतींचे निधन झाले . अतिशय कष्टाने हालअपेष्ठा भोगून अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी त्यांच्या मुलाला वाढवले खूप चांगले शिक्षण दिले आणि आता त्यांचा मुलगा दुबईत एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो . लॉकडाऊनमुळे तो भारतात येवू शकत नाही . मुलाची बायको शिकलेली उच्चघरातील आहे .दोन नातवंडे आहेत पण सूनबाई सतत शाकाहारी खायला देते . मांसाहारी , मटण , चिकन ,अंडी ,मासे कधीच खायला देत नाही . त्यामूळे तेच तेच शाकाहारी वरण भातासारखे मिळमिळत खाऊन खूप कंटाळा आला आहे . काही खाऊपिऊ वाटत नाही . जीवन भकास वाटते आणि जगण्यात मजा येत नाही . आणि शेवटी त्यांनी मलाच प्रश्न विचारला
सांगा बरं किती दिवस असं जगायचे ? ?
म्हणून आता मी आता आत्महत्या करणारच आहे.
व
सूनबाईची चांगली जिरवणार आहे .
असे सांगून त्यांनी मला तोच प्रश्न विचारला ...
काळा डबा आणू की लाल ?
एकंदरीत आत्महत्या करण्यासाठी त्या फारच प्रेरीत , उत्सुक झाल्याचे दिसून येत होते . आणि आत्महत्या करणे फार सोपे आहे असेही त्यानां वाटत असावे .
हे त्यांचे कारण व उत्साह ऐकून मी मात्र सर्द झालो .
मग मी त्यानां थोडा विचार केल्यासारखे दाखवले व म्हणालो मला काही खास अनुभव नाही पण तुम्ही लाल औषधच घ्यावे कारण लाल रंग हा डेंजरचे प्रतिक असतो .
पण आणण्यापूर्वी तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडते तर सूनबाईला सांगायचे त्या करून देतील किंवा सूनबाई करून देत नसेल तर तुम्ही स्वतः स्वयंपाक करायचा व आवडीचे पदार्थ करून खायचे .
हे विचारल्यावर आज्जीबाई चांगल्याच खवळल्या .
मी तिच्याशी जराही बोलत नाही . व तिलाही माझ्याशी बोलून देत नाही . आम्ही एकाच बंगल्यात राहतो पण तिची खोली व माझी खोली वेगवेगळी आहे .
आणि मी का म्हणून तिच्याशी बोलायचे ?
तिला समजायला नको ?
आणि मी का म्हणून स्वयंपाक करायचा ?
इतकी वर्ष केला यापुढे मी कधीही स्वयंपाक करणार नाही असं सूनबाईला पहीलेच सांगितले आहे .
आज्जी बाईनी ठाम निर्धाराने सांगितले .
मग आत्महत्या करून तुम्ही तर मरणार पण सूनबाईला कसे कळणार की तुम्हाला काय त्रास होतो ते ? मी विचारले .
त्यासाठी तुम्ही एकदा तरी तिच्याशी बोला तुझ्यामूळे मी आत्महत्या करत आहे हे तिला सांगा व नंतरच लाल औषध आणा . तिलाही कळला पाहीजे तुमचा त्रास.
मी असे दोनतीन वेळा सांगितल्यामूळे आज्जीबाई मग नाईलाजाने तयार झाल्या व त्यांनी माझे जरा नाआवडीनेच आभार मानले व फोन बंद केला .
ही कथा माझ्यासाठी संपली व मी विसरूनही गेलो आणि चार पाच दिवसानंतर पुन्हा दुपारच्या तीनच्या सुमारास माझा मोबाईल वाजला . फोन घेतल्यावर त्याच आज्जीबाई पुन्हा बोलू लागल्या . यावेळी मात्र आजींचा बोलण्याचा टोन एकदम आनंदाचा उत्साहाचा होता .
मी विचारले आणले का लाल औषध ?
जळलं मेलं ते लाल काळं औषध , मी नाही आणणार आता .
अहो ,तुम्ही सांगितले म्हणून मी तिच्याशी बोलले . खूप रागावले तिच्यावर , आणि मग तुझ्यामूळेच मी आत्महत्या करणार आहे असे सांगितल्यावर जाम रडायला लागली . आता तीन चार दिवस झाले . माझ्यासाठी सगळे आवडीचे नॉनव्हेज पदार्थ करते व मी देखील तिला मदत करते . आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो .नातू अजून लहान आहे , शिवाय मुलगा परदेशात अडकलाय , त्याला किती वाईट वाटेल .मी अशी भलतीसलती गोष्ट केली असती तर सगळ्या कुटूंबाचीच वाट लागली असती . सर्वांनाच खूप वाईट वाटले असते , आणि त्रास मनस्तापही झाला असता . त्यामूळे आता आत्महत्या कॅन्सल..........
आणि तुम्हाला म्हणून सांगते तशी माझी सून चांगली गुणाची आहे हो .
पण तुम्ही सांगितले म्हणून मी बोलले नाहीतर .......
आणि त्या आज्जी बाईनीं मनापासून समाधानाने फोन ठेवला. आजही कधीतरी अचानकपणे त्यांचा मला फोन येतो व आम्ही भरपूर गप्पा मारतो.
काही जणानां ही गोष्ट साधी व
अतार्किक वाटेल पण अगदी खरी आणि वास्तवात घडलेली आहे .
मी देखील फार मोठे काम केले आहे असा माझा दावा नाही .
पण आज मला शीतल आमटेच्या आत्महत्येनंतर परत एकदा प्रकर्षाने ही गोष्ट आठवली व जाणवले आमच्यातील एकमेकांशी संवाद हरवला आहे. कधी कधी किती साधे ,सोपे प्रश्न असतात कुटुंबातील एकमेकांशी बसून विचार केला तर सोप्या आणि अवघड प्रश्नांवरही खूप छान तोडगा निघू शकतो. संवादाने जटील प्रश्न मार्गी लागतील आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगावयास उत्साह वाटेल . माणसे आपली दुःखे अडचणी यांचा इतका धसका घेतात . मनात धुमसत राहतात . आणि मग आयुष्य संपवण्याचे निर्णय घेतात . पण स्वतःचे असे आयुष्य अचानक संपवून किती जवळच्या व इतरही समाजातील सर्वच लोकानां यातना होतील याचा विचार करत नाहीत . असा टोकाचा मार्ग निवडण्यापेक्षा एकमेकांशी *सुंसवाद* साधणे महत्वाचे वाटते .
यावेळी आमचा इगो कधी आडवा येतो , कधी आमची निष्काळजीपणे दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय आडवी येते . पण त्याचे परिणाम मात्र कायम अंतरीच्या जखमा भरून न येणाऱ्या असतात . म्हणून वाद झाला तरी चालेल त्यातून कधी तरी *सुसंवाद* घडेलच अशी अपेक्षा करूया .
शिक्षणाने माणूस घडतो , सुस्कांरीत होतो , त्याचे व्हीझन मोठे होते . विचार मोठे होतात . पण *सुसंवाद* नसेल तर ते शिक्षण देखील काय कामाचे ?
चला तर मग स्वतःचा स्वतःशी आणि इतर सर्वांशी देखील *सुसंवाद* करण्यास सुरुवात करूया !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुनील काळे
9423966486
मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट
*मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
लहानपणासून मला स्वप्नं पडायची , तशी स्वप्ने सगळ्यानांच पडतात पण मला मात्र लई भारी भारी आणि वेगळीच स्वप्ने पडायची . स्वप्नांच्या त्या दुनियेत मी खूप मनापासून गुंतून जायचो मग जागेपणी ती स्वप्ने आठवल्यानंतर प्रत्यक्षात आणायचा खूप प्रयत्न करायचो स्वप्नांच्या त्या दुनियेत मी खूपच मशगूल झालो होतो . पाचगणीत मी ज्या मराठी शाळेत शिकत होतो ती शाळा खूप छोटी होती परंतु त्या शाळेसमोर एक मोठे पटांगण होतं तेथे कबड्डीचे खूप जंगी सामाने व्हायचे अनेक नाटके ,तमाशा व्हायचे व छोट्या पडद्यावर चित्रपटही दाखवायचे हे सगळे आम्हाला अभ्यास करायला जात असल्यामुळे फुकट बघायला मिळायचं त्यावेळी अभिनय करायचा नाटके करायची तमाशात काम करायचे व खूप मोठा अभिनेता बघायचे असं मला वाटायचं पुढे मी तसा प्रयत्नही केला .
सातवीनंतर संजीवन शाळेमध्ये शिकत असताना जनरल नॉलेजचा एक पेपर असायचा त्या पेपरमध्ये प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज माणसे व तो कोणत्या क्षेत्रात काम करतो , किंवा प्रसिद्ध आहे हे ओळखायला लागायचे . सर्व विद्यार्थी त्या त्या क्षेत्रातील दिग्गज माणसांची नावे तोंडपाठ घोकून पाठ करायचो त्यावेळी मला मोठ्ठा शास्त्रज्ञ , मोठ्ठा गणितज्ञ किंवा मोठ्ठा डॉक्टर किंवा मोठ्ठा इंजिनियर होवून असे खूप कार्य करत असल्याची स्वप्ने पडायची . एखादे क्षेत्र निवडून आपणही काहीतरी विशेष काम करावे असे मला वाटायचे तशी मला स्वप्न सतत पडायचीच आणि त्या तंद्रीतच मी जगायचो .पण आमचे गणिताचे देशपांडे सर कान इतका जोरदार पिळायचे मी गणित आणि सायन्स या विषयाचीच धास्ती घेतली व त्या क्षेत्रांकडे वळायचा नादच सोडून दिला.
पाचगणीमध्ये त्यावेळी बहादुर आणि तुलसी नावाचे दोन ताकदवान पैलवान राहायचे .त्यांचे ईराणी मित्र ज्युदो कराटेचे नवनवीन प्रयोग भर रस्त्यातच , कधी भरलेल्या बाजारात सर्वांसमोर करायचे त्यांच्या त्या असामान्य कृती , कोलांट्या उड्या, बलदंड शरीर पाहून पाचगणीकर अचंबित व्हायचे .एकदा मला आठवतंय पाचगणीत मुख्य रस्त्यावरती एक टेम्पो व्हॅन रस्त्यातच बंद पडली होती सगळा रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता बहादुरच्या व त्याच्या एका मित्राने रस्त्यात येऊन चारचाकी गाडी उचलली व बाजूला नेऊन ठेवली त्यांच्या असामान्य ताकदीचा नमुना पाहिल्यानंतर सर्व गावकरी थक्क झाले मग मलाही बहादूर सारखा व्यायाम करून पिळदार शरीर बनवायचे स्वप्न पडू लागली . मग मी माझा मित्र घनःश्याम शाळा सुटल्यानंतर बागेमध्ये व्यायाम करायचो .परंतु पुढे जेवणाखाण्याची व साधा वडापाव मिळवायची बोंबाबोंब आहे हे पाहिल्यानंतर पैलवान होण्याचा नाद मी सोडून दिला .
एकदा मी मात्र खूप भारावलो होतो .शाळेला असताना एकदा रविवारची सुट्टी होती मी आणि माझा मित्र घनश्याम सिडने पॉइंटला विनाकारण फिरत होतो बिलिमोरिया स्कूलच्या जवळ एक सत्तरीतले गोरेपान जाडजूड शरीराचे (गांधी पिक्चर बनवलेले डायरेक्टर रिचर्ड अॅटनबरो सारखे दिसणारे )म्हातारे गृहस्थ रस्त्याच्या बाजूला शांतपणे बसून शेजारी गोल गोल वड्या असलेली भली मोठी रंगांची पेटी घेऊन शांतपणे समोरचे चित्र काढत बसले होते .कोऱ्या कागदावर त्याने भराभर पेन्सिल मध्ये रेखाटन केले व नंतर जलरंगाच्या विविध शेड्स टाकत टाकत समोरच्या कृष्णाव्हॅलीचे अप्रतिम चित्रण केले . मी एखाद्या जादूगाराचा जादूचा खेळ पाहतोय असाच भास मला वारंवार होत होता .दोन मोठ्या वडाच्या झाडांमधून संध्याकाळचा सनसेटचा देखावा व दरी मधून दूरदूर दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा कागदावर जिवंतपणे साकार होत होत्या आणि त्या अविस्मरणीय निर्मितीचा मी एकमेव साक्षीदार होतो माझा मित्र निघून गेला होता पण मी मात्र त्या गोऱ्या आजोबांनी निर्माण केलेल्या कलाकृतीमध्ये स्वतःलाच विसरून गेलो होतो .आपले चित्र पूर्ण झाल्यानंतर आजोबांनी एक मोठी हॅट शांतपणे डोक्यावर ठेवली आणि आणि आपली मोठी त्यांंची सुटकेससारखी दिसणारी बॅग घेऊन ते वाईच्या दिशेने चालायला लागले .मी देखील मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या पाठोपाठ पाठलाग करत चाललो होतो .त्यांनी पाठीमागे पाहिले एक मुलगा आपल्या मागोमाग येत आहे , त्यांनी मला टाटा बाय-बाय केले पण मी मात्र त्यांच्या मागोमागच चालत राहिलो . चित्रकार आजोबा एम . आर .ए .सेंटरच्या दिशेने वळाले आणि मी त्यांच्या पाठोपाठ जात असताना मला तेथील वॉचमनने अडवले . त्याचवेळी चित्रकार आजोबांनी त्याला थांबवले व त्यांच्या मोठ्या बॅगेमध्ये हात घातला . हातामध्ये एक काळ्या रंगाची तळहाताच्या आकाराची एक छोटी रंगाची पेटी काढली व माझ्या हातात ठेवली . ती रंगाची पेटी मला देत असताना छान छान स्मित हास्य केले व डोक्यावर हात ठेवला . ते काहीतरी इंग्रजीत बोलत होते पण त्या बालवयात मला काहीच समजले नाही मी आनंदाने उड्या मारत ती पेटी घेऊन निघालो ती तळहाताएवढी आकाराची रंगाची पेटी विन्सर अॅन्ड न्यूटन कंपनीची होती (जी आजही माझ्याकडे आहे).
खूप वर्षांनंतर मला कळाले ते आजोबा चित्रकारांचे नाव होते आर्किटेक्ट गॉर्डन ब्राऊन .ज्यांनी राजमोहन गांधींसाठी 63 एकर परिसरात अप्रतिम प्रकल्पाचे संपूर्ण प्लॅनिंग केले होते .ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन ही अप्रतिम वास्तु निर्माण केली होती जे आजही पाचगणीचे भूषण आहे . ती छोटी रंगाची पेटी सतत मला चित्र काढण्यासाठी प्रेरणा देऊ लागली .मग पेन्सिलने कधी जलरंगात कधी क्रेयॉन्स कलरने मी सतत चित्रे काढण्याचा प्रयत्न करत राहिलो .पुढे बिलिमोरिया स्कूलचे सुभाषचंद्र बोंगाळे या सरांची चित्रे पाहून मी चित्रकलेकडे पुन्हा ओढला गेलो मग मला मोठ्ठा चित्रकार झाल्याची खूप स्वप्न पडू लागली हे सारख्या पडणाऱ्या स्वप्नामुळे मी चित्रकार व्हायचे हे नक्की केले .
पुढे बारावी सायन्स पास झाल्यानंतर मी कोल्हापूरला गेलो तेथे चित्रकार रवींद्र मेस्त्री ,वडणगेकर , चंद्रकांत मांढरे ,आबालाल रहमान यांची चित्रे पाहिली आणि परत मला मोठे बनायचे याची स्वप्ने जोरजोरात पडू लागली .
फौडेंशन नंतर मी पुण्यात आलो त्यावेळी डेंगळे सर ,नांगरे सर प्रताप मुळीक, फडके सर यांची चित्रे पाहून मी खूप आनंदी व्हायचो . मग परत स्वप्नेच स्वप्न .
एकदा कॉलेजमध्ये असताना सातारा जवळचे औंधचे अप्रतिम म्युझियम पाहिले याठिकाणी धुरंदर ,बाळासाहेब पंतप्रतिनिधी , गांगल , व इतर अनेक परदेशी चित्रकारांची चित्रे पाहून मी स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेलो . या म्युझियममध्ये मी प्रथमच राजा रविवर्मा यांची ओरिजनल चित्रे पाहिली होती .मराठी शाळेत इतिहासाच्या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मी पाहिले होते त्या चित्राखाली इंग्रजीमध्ये राजा रविवर्मा यांची सही होती . रणजित देसाईंच्या "राजा रविवर्मा " या कादंबरीने मी खूप प्रभावित झालो होतो . पुढे एकदा आमचे स्नेही वामनराव ननावरे यांच्याबरोबर बडोदा पाहायला गेलो . सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास पॅलेस अगदी जवळून पाहिला . त्या पॅलेसमध्ये राजा रविवर्मा यांची अप्रतिम चित्रे होती . बडोद्याच्या म्युझियममध्ये देखील राजा रविवर्माची खूप चित्रे पाहायला मिळाली . एकंदरीत राजा रविवर्मा हा चित्रकलेच्या या क्षेत्रात " राजा " माणूस होता .जिकडेतिकडे हा राजा माझ्या स्वप्नात यायचा . रविवर्मा सारखे नामवंत चित्रकार बनायचे हा माझ्या मनाने ध्यास घेतला होता .मोठा चित्रकार बनायचे आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून यश मिळवायचेच हे सत्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली .
एखाद्या क्षेत्रात मोठं होणं ,आपला दबदबा निर्माण करणे , आपल्या कर्तृत्वाने , कलाकृतीने रसिक जणांना अंर्तबाह्य भारावून टाकणे , त्या कलाकृतीतून त्यांच्या मनाच्या संवेदना जागृत करणे . त्याला अस्वस्थ करणे , ती कलाकृती सर्वसामान्य माणसाच्या आवडीची करणे हे सोपे काम नसते .त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते ,सतत ध्यास घ्यावा लागतो तो ध्यास घेताना दिवस-रात्र मेहनत करून प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करण्याच्या कळा सहन कराव्या लागतात . अनेक स्पर्धा अडचणींना तोंड द्यावे लागते .
राजा रविवर्मा यांनी त्यांच्या कलाकृती घराघरात पोहोचण्यासाठी त्यांच्या चित्रांच्या रंगीत प्रतिकृती तयार केल्या व सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले .
माझा मोठा भाऊ कार्ला येथे नोकरीस होता ,कार्ल्याच्या बौद्धकालीन गुहा मला पहायच्या होत्या म्हणून मी कार्ल्याला गेलो . त्याच वेळी माझ्या एका पुण्याच्या मित्राचा फोन आला त्याने सांगितले अभिनव कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये अतुल गोरे नावाचा एक मित्र राहत होता अतुल गोरे दुबईमध्ये कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून उत्तम काम करत होता . आता त्याने सर्व कमर्शियल कामे बंद करून तो आणि त्याची पत्नी अनिता या दोघांनीही संन्यास घेतला असून ते कार्ल्याला, मळवली जवळच्या वेदांत अकॅडमी येथे कामात मग्न असतात . तू गेलास तर त्यांनाही जरूर भेट .
मळवली हे गावाचे नाव ऐकताच मला राजा रविवर्मा आठवला . त्याच्यासारखे मोठे होण्याची चांगली पाहिलेली दिवास्वप्ने आठवली . चित्रकार राजा रविवर्मा यांचा मुद्राचित्र छपाईचा कारखाना मळवली स्टेशनच्या बाजूला होता .शिवाय संपूर्ण भारतभर चित्रांची पार्सले पाठवण्यासाठी तेथे स्वतंत्र पोस्ट ऑफिस तयार केले होते . रविवर्मा यांच्या चित्रांसाठी लागणारा कागद व इतर साहित्य पुरवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर खास यंत्रणा तयार केली गेली होती .छपाईच्या कामासाठी तीनशे ते चारशे माणसे काम करत असत व त्यासाठी प्रचंड मोठी इमारती बांधली होती ही सारी माहिती पुस्तकांमध्ये वाचलेली होती . तर अशा ह्या मोठ्या चित्रकाराच्या वास्तूला भेट देऊन तेथील छपाई तंत्र व शिलालेखावर कसे प्रिंटिंग केले जाते त्याची प्रोसेस देखील मला समजून घ्यायची होती यासाठीही योग्य संधी चालून आलेली आहे याचा मला मनोमन आनंद झाला होता . त्या आनंदाच्या भरातच मी अतुल गोरेला फोन लावला .
खूप वर्षानंतर अतुल गोरेला वेदांत अकॅडमी मध्ये मी भेटलो पांढरीशुभ्र लुंगी ,लाईट क्रीम कलरचा सदरा आणि गळ्यात काळ्या मण्यांची माळ असा पेहराव केलेला अतुल मला खूप तेजस्वी व समाधानी वाटत होता . आम्ही खूप वर्षानंतर भेटल्यामुळे खूप गप्पा मारल्या .अतुलने त्याचा वेदांत अकॅडमीतला परिसर फिरून दाखवला सर्व सोयींनी युक्त असा वेदांत ॲकॅडमीचा परिसर पाहिल्यानंतर मी भारावून गेलो . मला वेदांत अकॅडमी यांचे रोजचे रुटीन काय आहे हे समजून घ्यायचे होते .शिवाय मळवली येथील राजा रविवर्मा यांचा प्रेस मला पाहायचा आहे असे मी त्याला सांगितले .त्यामुळे तो दिवस वेदांत अकॅडमी मध्येच राहायचा निर्णय आम्ही घेतला . अतुलने आमची राहण्याची उत्तम सोय केली त्या रात्री जीवनातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींची आम्ही चर्चा करत होतो .
दुसऱ्या दिवशी मळवलीला जाऊन कधी एकदा राजा रविवर्मा यांचा प्रेस पाहतो असे मला झाले होते माझी उत्सुकता पाहिल्यानंतरही अतुल मात्र शांत होता त्याने मला तेथे येथील परिसराची काहीही माहिती सांगितले नाही . सकाळी दहाच्या सुमारास शांतपणे त्याने त्याच्या गाडीतून आम्हाला त्या परिसराकडे नेले . एकदोन किलोमीटरचा प्रवास करून झाल्यानंतर मळवली स्टेशन लागले . स्टेशनच्या पलीकडेच एक डोंगरासारखा खूप झाडे असलेला परिसर दिसत होता त्या डोंगराच्या पायथ्याशीच गाडी जाण्याचा रस्ता तयार दिसला .त्या रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यानंतर एक बंगला आम्हाला दिसला .या बंगल्यामध्ये रविवर्मा याने स्लायसर नावाचा माणूस जर्मनी वरून आणलेला होता . हा स्लायसर तंत्रज्ञ याच बंगल्यात राहायला होता कधी कधी राजा रविवर्मा देखील याठिकाणी राहिलेला होता . आता हा बंगला आणि संपूर्ण प्रॉपर्टी ही कोणी गुजराती व्यापारी माणसांनी विकत घेतलेली आहे असे मला अतुलने मला सांगितले . दरवाजावरती बेल वाजवल्यानंतर एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडला , मी सुनील काळे, पाचगणीचा चित्रकार असून मला रविवर्मा यांचे घर ,प्रेस , ओरीजनल चित्रे व शिलालेखावरील छपाई केलेली अनेक चित्रे मला पाहायचे आहेत असे त्या गुजराती बाईंना विचारत असतानाच रागानेच त्या मला म्हणाल्या
कोण है यह रविवर्मा ? यहाँ कोई रविवर्मा बिर्मा रहता नही !
और ईधर उसका कुछ भी सामान यहॉ नही है ।
जो कुछ कचरा था वह हमने फेक दिया ।
आज हमारे घर में पूजा चलनेवाली है ,तुम लोग अभी के अभी यहाँ
से चले जाव !
असे बोलून तिने रागाने दरवाजा बंद केला .
मी परत बेल वाजवली .
हम लोग प्रेस देख सकते है ? हा प्रश्न विचारत असताना तिने डावीकडे बोट दाखवले . एका माणसाला बोलावून इनको प्रेस की जगा दिखा दो असा आदेश दिला आणि पुन्हा तिने धड़कन दरवाजा बंद केला .
चला आता आलो आहोत तर प्रेस तरी पहायला मिळाली या निमित्ताने मी खुश झालो .
त्या माणसाने आम्हाला बंगल्याच्या डावीकडच्या रस्त्याकडून नेण्यास सुरुवात केली .त्या ठिकाणी जवळच एक दगडात घडवलेली पुष्करणी किंवा कारंजे होते . ही पुष्करणी फार सुबक पद्धतीने घडवलेली होती . त्याच्याजवळच दगडी बांधकाम केलेले दोन छोटे पिलर्स होते .या पिलर्स मधून प्रेसमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या .सात आठ पायऱ्या उतरल्यानंतर छप्पर नसलेल्या चारी बाजूला पडीक भिंती असलेल्या ,उघड्या बोडक्या विटा ढासळलेल्या दिसत होत्या . भयाण अशा माळरान असलेल्या खंडहरात आम्ही कधी प्रवेश केला ते मला कळलेच नाही .
प्रेस किधर है ?
असा प्रश्न विचारताच तो माणूस आमच्याकडेच आश्चर्याने पाहू लागला . आणि सहजपणे म्हणाला "यही तो यह प्रेस की जगा "
आता मात्र सर्वजन चकित झालो . सर्व भिंती पूर्णपणे ढासळलेल्या होत्या , खिडक्यांचे ग्रील ,काचा ,दरवाजे , पत्रे पळवून नेले होते . सागवानी लाकडाच्या फक्त वाळवी लागलेल्या भग्न चौकटी फक्त राहिलेल्या होत्या . सगळीकडे भिंत पडून विटांचे ,दगडांचे अवशेष अस्ताव्यस्तपणे ढिगारे सगळीकडे पसरलेले होते त्यावर गवत माजलेले व झाडे वाढलेली होती . वाढलेल्या व वाळलेल्या गवतामुळे हे बेचिराख उघडेनागडे उध्वस्त साम्राज्य अजूनच भेसूर आणि भयाण दिसत होते .रविवर्माची सुबक दगडांनी बांधलेली विहीर पाहिल्यानंतर त्यामध्ये शेवाळ्याचे थर साचलेले दिसून येत होते . विहिरीच्या शेजारीच दोन मोठी वडाची झाडे उभी होती त्या वडाच्या झाडाच्या पूर्ण पारंब्या खालील विहिरीच्या तळापर्यंत पोहोचलेल्या होत्या . एकंदरीत ती विहीर कित्येक वर्षात अशीच पडून असावी . त्या पारंब्यामुळे विहिरीचे दगड सुटू लागले होते . बाहेर रविवर्माच्या कामगारांची घरे झाडाच्या फांद्या व पानांनी भंगार अवस्थेमध्ये पडलेली दिसत होती .
इतक्यात एक वयस्कर म्हाताऱ्या बाई तेथून जाताना दिसल्या . मी हाक मारून त्यांना थांबवले व प्रेसची माहिती विचारली . कोणीतरी इतक्या प्रेमाने हात मारल्यामुळे त्या बाई थांबल्या व त्यांनी भूतकाळात रमत माहिती सांगायला सुरुवात केली .
"काय बाबा सांगू तुला आता ?
एक काळ असा होता की सगळ्या गावातील घरटी एक तरी माणूस येथे कामाला होता . सतत लगभग व प्रचंड मोठे काम चालायचे . गाड्या भरभरून छापलेल्या चित्रांचे गट्टे सगळ्या भारतभर जायचे उत्तम क्वालिटी प्रिंटिंग व्हायचे .घडीव दगडांवर कोरून ठेवलेल्या शिलालेखांवर वेगवेगळे रंग भरले जायचे .खूप तज्ञ व हुशार कामगार असायचे .ते काम पहायला राजेसाहेब मुंबईवरून मुद्दाम यायचे . काय थाट असायचा त्यांचा त्या काळात ,आता फक्त भिंतीची माती शिल्लक राहिलेली आहे .
मला त्या छपाईच्या दगडी शिला पाहायच्या होत्या त्याबद्दल विचारताच म्हातारी मोठ्याने हसली आणि म्हणाली
"सगळ्या सपाट दगडी शिळा मळवली गावच्या लोकांनी त्यांच्या
न्हाणीघरात बसवले आहेत ,अंघोळीच्या वेळी पायाच्या टाचा घासायला त्या बऱ्या पडतात " माझ्या घरी दोन आहेत तुम्हाला बघायचेच असेल तर दाखवते .
असे म्हणताच माझ्या डोळ्यातून अचानक टचकन् पाणी वाहू लागले , ते कोणाला दिसू नये म्हणून मी टॉयलेटच्या निमित्ताने बाहेर आलो . मला स्वतःला रडू आवरत नव्हते . तसा मी रडणारा माणूस नाही पण मला खूप संताप येत होता . मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होतो . ज्या रविवर्मा यांची भारतीय "चित्रकलेचा जनक " म्हणून गणना केली जात होती त्या महान चित्रकाराच्या सर्व गोष्टी नामशेष झाल्या होत्या . सरकार ,मंत्री , जिल्हाधिकारी ,खासदार ,आमदार ,स्थानिक गावकरी , पुढारी किंवा कलाप्रेमी यांना कसलीही काळजी व देणेघेणे वाईट वाटत नव्हते .
रवि वर्माचे सर्व साम्राज्य उद्ध्वस्त झालेले दिसत होते त्या बेचिराख साम्राज्याचे काही फोटो घेऊन आम्ही निराश मनाने बाहेर पडलो . गाडीतून परत निघताना अतुलने मला विचारले "पाहिला का प्रेस ? मी काहीच उत्तर दिले नाही . अतुल मात्र शांत होता कारण त्याने मोठ्ठ व्हायचं कधीच कॅन्सल केले होते . त्याचा निरोप घेऊन मी उदास मनाने परतीच्या प्रवासाला लागलो .
एकदा वाईला गंगापूरीच्या घाटाजवळ स्केचिंग करत बसलो होतो गंगापूरीच्या घाटातून महागणपती मंदिर आणि त्याचा परिसर फार सुंदर दिसतो . हे स्केच करत असताना मी स्वतःला विसरून गेलो होतो .स्केच संपत असताना मागे पाहिले असता एक दाढीधारी खादीचा कुर्ता पायजमा घातलेले खांद्यावर शबनम घेतलेली एक गृहस्थ उभे होते . त्यानां माझे चित्र आवडले होते . त्यांना मी नाव विचारल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव सांगितले .मी आपण कोठे राहता ? असे विचारले असता त्यांनी सांगितले लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्राज्ञ पाठशाळेच्या वाड्यात .मला बरेच दिवस गंगापूरीच्या शेजारी असलेला आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निवासस्थान असलेल्या प्राज्ञ पाठशाळेत आतमध्ये जायचेच होते .
वाई विश्वकोशाची ,धर्मकोशाची निर्मिती चालवणारा गाव म्हणून प्रसिद्ध आहे .त्या ठिकाणी चालणारे काम प्रचंड होते व त्यासाठी वाई सगळी कडे सुप्रसिद्ध आहे. तर्कतीर्थ यानां राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याची मला माहिती होती . मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण , राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा ,राज्यपाल आणि इतर अनेक प्रसिद्ध असे प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती याठिकाणी आल्याचेही मला माहित होते .अशा या ऋषितुल्य व्यक्तीचे निवास्थान मला पाहायचे होते आलेले ग्रहस्थ तेथेच राहत असल्यामुळे मला तेथे जाण्याचे आयती संधी उपलब्ध झाली होती .
स्केच संपल्यावर त्यांच्यासोबत मी त्या वाड्यात गेलो . वेद ,उपनिषदे , रामायण , महाभारत इत्यादी शास्त्रांवर तर्कतीर्थ अधिकारवाणीने बोलत असत .मराठी विश्वकोशाचे शिल्पकार अशी त्यांची ओळख होती थोर स्वातंत्र्यसैनिक ,साहित्यिक , समाज सुधारक , हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे ते गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती .भारत सरकारने तर्कतीर्थ यांना 1976 साली "पद्मभूषण " आणि 1992 साली " पद्मविभूषण " पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरव केलेला होता . अशा अफाट व्यक्तिमत्वाच्या घरात मी प्रवेश करत होतो .
वाड्यात प्रवेश करताना चौकटीवरच तर्कतीर्थांचे गुरु केवलानंद सरस्वती यांचे पहिले तैलरंगात पोट्रेट लावलेले होते .
दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये मात्र पूर्ण अंधारच होता .शास्त्रीजींच्या टेबलावर धुळीची पुटं चढलेली होती , त्यांच्या ऑफिस चेअर खुर्चीचा पाय तुटल्यामुळे तिरक्या अवस्थेत पडलेली होती . भिंतीवर लावलेल्या
"पद्मभूषण " पुरस्काराची लाकडी फ्रेम कोळ्यांनी केलेल्या जाळ्यांमुळे दिसतच नव्हती .सगळीकडे जाळी जळमटे यांचे साम्राज्य दिसून येत होते . कित्येक वर्ष या घरावरती साफसफाईचा प्रयत्न केलेला दिसूनही येत नव्हता .
खुर्चीवर ठेवलेला शास्त्रीजींचा फोटो खुर्चीच वाकडी झाल्यामुळे उदास झाल्यासारखा लटकत होता . घाणीच्या साम्राज्यामुळे कपाटात ठेवलेली पुस्तके धुळीने माखून खराब झालेली दिसून येत होती . काही पुस्तके तर जमिनीवर पडलेली होती . टेबलावरच्या कार्पेटचा रंग कधीच उडालेला होता .त्या टेबलावरती कित्येक वस्तू तशाच धूळ खात असताना विद्रूप पद्धतीने पडलेल्या दिसून येत होत्या .
आतल्या खोलीत अनेक पुस्तके , जाडजूड ग्रंथ ,पेपरची रद्दी हँडमेड पेपरचे गठ्ठे , प्रिंटिंग केलेली पुस्तके गोडाउनमध्ये फेकून दिलेल्या अवस्थेत पडलेली होती . त्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर मी गेलो तर माझे हात व कपडे धुळीमूळे माखले होते .मोडकळीस आलेल्या दरवाजाच्या चौकटी ,सागवानी पिलर्स कधीही पडतील अशा अवस्थेत पडलेली होती . उघड्या खिडक्यांमधून कबुतरांनी येऊन घरटे बनवलेली होती .त्या कबुतरांच्या विष्टा सगळीकडे पडलेल्या होत्या त्याचा उग्र वास येत होता ,त्यातून मला चालणेही अशक्य झाले होते .वरच्या छताची कितीतरी कौले तुटून पडून पावसाचे पाणी आत येत होते .
शुद्धीसर्वस्वम (1934 ),आनंदमीमांसा (1938 ) , हिंदू धर्माची समीक्षा (1941) , जडवाद (1941) ,ज्योती निबंध (1947 ) ,
वैदिक संस्कृतीचा विकास (1951 ), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (1973) , राजवाडे लेखसंग्रह (1964) ,
लोकमान्य टिळक लेखसंग्रह (1969) ही त्यांची ग्रंथसंपदा आहे .अशा या ज्ञानविज्ञान याचा प्रचंड व्यासंग , स्पष्ट आणि निस्पृह विचारांच्या महात्म्याच्या निवासस्थानाची अवस्था पाहून मी दुःखी आणि व्यथित झालो . मोठ्ठी माणसं त्यांच्या कर्तृत्वाने मोठ्ठी होतात . प्रचंड कष्ट घेत असतात . मोठ्ठी माणसं ही मोठ्ठीच असतात पण ते गेल्यावर सगळे मोठ्ठेपण वाहून जाते. जिवंत असतात त्यावेळी त्यांचा रुबाब वेगळाच असतो परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मी पाहिलेली हे धूळधाण माझ्या मनाला अंत:करण चिरून जाणारी ठरली .
सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या या महाआत्म्यांची दशा पाहून आता माझ्या मनाने ठाम निर्णय घेऊन मोठं व्हायचं कॅन्सल केले आहे . आता मला मोठ्ठ होण्याची स्वप्नेच पडत नाहीत .मोठं होण्याचा आटापिटा तर मी कधीच सोडून दिला आहे .पूर्वी मला अशी मोठे होण्याचे स्वप्न नीट झोपू द्यायची नाहीत , सारखं वाटायचं आपली स्वप्नं पूर्ण करायची आहेत आपला ध्यास पूर्ण करायचा आहे मग मी रात्रभर चित्र काढायचो , दिवसा उशिरा उठायचो जगरहाटी पेक्षा वेगळे जगायचो . खूप भटकायचो .खूप मोठ्या चित्रकारांना भेटायचो आता मी कोणालाही भेटत नाही आता मी शांत असतो .
आता कधी कधी वाटतं राजा रविवर्माचे , तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे खरोखर चुकलेच . त्यांनी आपण गेल्यानंतर आपल्या वास्तुंचे योग्य नीट थडगे बांधले नाही .
शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे हे अरुण दाते यांचं गाणं मला पुन्हा पुन्हा आठवत राहते .
मी मात्र ही चूक करणार नाही मी आणि स्वाती आमची आर्ट गॅलरी स्वतःच बनवणार आहोत
लवकरच दोन पुतळे बनवायचे ऑर्डर द्यायची आहे हे पुतळे झाल्यानंतर गॅलरी पाहिल्यानंतर परत जाताना प्रत्येकाला थांबता आले पाहिजे .
अजुनही चित्रांचे कलादालन तयार करण्याची इच्छा मनात आहेच त्यासाठी केलेले प्रयत्न मला सतत आठवतात . गेली पंचवीस वर्ष मी कोणाकोणाला भेटलो याचीही मला तोंडपाठ माहिती आहे .मुख्यमंत्री मनोहर जोशी , उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे , गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर , सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर , आमदार सदाशिव सपकाळ ,पाचगणी गावचे अनेक आजीमाजी नगराध्यक्ष , साताऱ्याचे आमदार , खासदार हे सर्वांना भेटून झाल्यानंतर हे लक्षात आले की राजकारण्यांकडून अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही त्यांच्याकडून नेहमी उपेक्षा होणार . मग आम्हीच आमची गॅलरी स्वकष्टातून का निर्माण करू नये ? असा विचार करून गेली पंचवीस वर्षापासून माझा थोडा थोडा कणाकणाने प्रयत्न चालूच आहे.
जेव्हा कधी ही निसर्ग आर्ट गॅलरी तयार होईल त्यावेळी तुम्ही देखील जरूर भेट द्या .कदाचित गॅलरी नाही झाली तर तेथे असलेल्या दोन पुतळ्याजवळ सर्व जण जरूर थांबा .
त्यातील डावीकडच्या पुतळ्याजवळ तेथे वाढवलेली ताजी फुले वहा त्या स्वातीच्या पुतळ्याखाली लिहिलेले असेल या चित्रकर्तीने तिने तिच्या मुलीच्या स्मरणार्थ आयुष्यभर फुलांची असंख्य चित्रे काढली . आणि दुसऱ्या पुतळ्याजवळ तेथे पडलेली थोड़ी मूठभर माती टाका . त्यावर लिहिलेले असेल या चित्रकाराने मोठे व्हायचा खूप प्रयत्न केला होता पण नंतर त्याने मोठं व्हायचेच कॅन्सल केले होते . . . . .
तर अशी आहे माझी मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केली त्याची गोष्ट.
SUNIL KALE
9423966486
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
आता मला मोठं व्हायचं नाही तर मोठं होण्यापेक्षा छोटे राहण्यात मला जास्त मजा वाटू लागली आहे कारण मी मनापासून मोठे व्हायचं कॅन्सल केले आहे.
ही गोष्ट आमचे मित्र चिन्हचे संपादक श्री .सतिश नाईक यानां वारंवार सांगितली पण ते चिकट , चिवट, व ताकदीचे अभ्यासू पत्रकार . त्यांनी चित्रकारांच्या साठी ' चिन्ह ' नावाचे दिवाळी अंक काढले होते काही महत्वाची चित्रकारांच्या जीवनावर पुस्तके प्रकाशित केली आहेत .आजही ती अनेकांचे प्रेरणास्थान आहेत . सतिश नाईक या माणसाकडे अफाट पेशन्स व घेतलेले कार्य संपूर्ण गोष्टींनी पूर्ण करायची जिद्द आहे ,ध्यास आहे . त्यांच्या या धडपडीचा मी स्वतः आता अनुभव घेतोय . त्यांच्या कार्याला खरोखर मनापासून सलाम . महाराष्टातील आमच्यासारखे खेड्यापाड्यातील छोट्या ग्रामीण भागातून वर येणाऱ्या चित्रकारांसाठी सतिश नाईक हे नाव कायम स्मरणात आहे व यापुढेही राहील .मला त्यांनी सांगितले तुमच्याकडे अशा जीवनात अनुभवलेल्या गोष्टींचा खूप मोठा खजिना आहे तो कदाचित नवीन उदयोन्मुख चित्रकारानां उपयोगी पडेल . त्यानां प्रेरणा मिळेल , नवा मार्ग मिळेल. तुम्ही नकार देऊ नका..तुम्ही चिन्हच्या ग्रूपवर गप्पा मारायला यायलाच पाहीजे . चिन्हचे आमच्या सारख्या सर्वच छोट्या जणांची जडणघडण होताना सर्वच चित्रकार जमातीवर अनंत उपकार आहेत . त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन मी नकार देऊ शकलो नाही .
आपण सर्वजण गप्पांमध्ये सामील होऊ या!
शनिवार दि. 19 DEC. संध्याकाळी पाच वाजता .
जरूर वेळ काढा व आठवणीने जॉईन व्हा !
सोबत लिंक पाठवतोय .
https://www.facebook.com/chinha.Satishnaik/live/
पेसी अंकल
चित्रकाराचे भूत
💀चित्रकाराचे भूत 💀
पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती ? दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा . पाण्याची सोय . ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या , विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले . चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा . गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता . लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धोमधरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले . सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते . तेथून पाणी टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीत येई व नंतर शुद्धीकरण होऊन संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई . पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे . कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे . (आता पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)
माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो . तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा , अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा . एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.
गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे . या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते . आणि त्यामध्ये लोखंडी बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते .
त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो . ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे त्यावेळी मला माहीतच नव्हते . मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो . कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड , मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते . त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार , डोंगरांच्या सावल्या , घड्या ,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे . छोटी छोटी घरे , भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे , ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो . हे दृश्य आपण चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले . पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत .
माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली . मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे , त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा , इस्त्रीचा ' दिपक ड्रायक्लिनर्स ' नावाचा व्यावसाय होता . पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे .मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो .
नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले . अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले . माझी आई अशिक्षित व अडाणी होती . ती मनातून खूप घाबरली होती ,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार . ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी चित्र काढत असतो . त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्यावरून भाकरीचा तुकडा ,मीठ , मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो .
पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही . या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली , पांडवगड , कमळगड , नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी , यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले . तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे . एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते , झपाटले होते .
एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली . ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय . पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता , त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो .सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच .बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची , शाळेच्या परिसराची , शाळेची मुख्य इमारत , डायनिंग हॉलची इमारत , प्राचार्यांचे , शाळेच्या मालकांचे निवासस्थान , रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो .
एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते . त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत , झाडे , माणसे खुपच छान दिसत होती .ते चित्र मला मनापासून खूपच आवडले . मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत , हा विषय घेऊन जबरदस्त ' नाईटस्केप ' करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो . त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो .अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे . तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला . रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले .
एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ) , बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची , कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर टोपी . व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोड वर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली . माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? या विचारात मी चित्रकामात गुंग झालो होतो .
पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर , आंब्रळ , खिंगर , भिलार , राजपूरी , तायघाट अशी छोटीमोठी खेडेगाव आहेत . त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात , हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे . आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात .
इकडे माझे ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते . मी पुर्ण स्वतःला देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला .
भूत , भूत ,चित्रकाराचे भूत ......... चित्रकाराचे भूत . . . . . . .असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहीले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी एकदोन जण घाबरून तेही पळू लागले .
त्यानां असे पळताना पाहून मीही घाबरलो . कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने पटापट सामान आवरून मी रस्त्याच्या एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो .दांडेघरची ही माणसे आता राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत म्हणत हळूहळू , दमादमाने सावधपणे येत होती . आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना . त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकुन आत्मविश्वासाने सर्वानां सांगत होता.
म्या इथंच बघितला ते भूत , मोठ्ठी टोपी घातली होती .
दुसरा त्यात भर घालून म्हणाला
इंग्रजाचे होतं ते भूत .
नाय ,अरं ही पारशांची शाळा होती , म्हंजी भूत पारसीच असणार .
अरं पारसी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम , डेंजर असणार . लई कटकटी असत्यात पारशी लोकं , म्हंजी भूत भी कटकटी असलं तर सोडणार नाय आपल्या मागंसुद्धा लई कटकट लागंल . एकाने असा अनुभव सांगितला .
मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत त्यांनी जकात नाका पार केला व मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला . नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही . सगळा मूडच गेला आणि मी शाळेत परतलो .
दुसऱ्या दिवशी त्यातला एक जण शाळेत येऊन इतरानां व मला सांगू लागला , की रात्री रस्त्यावर चित्रकाराचे भूत पाहीले . असा बसला होता न तसा बसला होता यापुढे सावध रहा असा सल्ला देखील त्याने दिला . मी देखील हसत हसत त्याच्याकडे दुर्लक्ष केले . त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच . रात्री चित्र काढायला कधी बाहेर जात नाही . पण एक चांगला विषय चित्रित करायचा राहीला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले .
आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते . त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही . आजही डोंगररांगा , शेताची हिरवळ ,समुद्र , बोटी , झाडे , इमारती , टेबललॅन्डची पठारे , वाईची मंदीरे , घाट, महाबळेश्वरचे सृष्टीसौंदर्य पाहीले की मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते . या चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे , झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या . कितीतरी मोठी माणसे
अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली . आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली . चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले .आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे .
आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा . लेखन , चित्रकला , शिल्पकला , खेळ, गायन, वादन, संगीत , नाट्य , नृत्य ,चित्रपट , शिक्षण , वकील , इंजिनियर्स , डॉक्टर ,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो वा व्यापारी क्षेत्रात असो .आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो , पछाडलो ते काम मनापासून आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो ,त्यातून सर्वानां आनंद द्यायला शिकलो तर सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच . म्हणून कलेतील सर्वानांच त्या त्या विषयातील भूताने पछाडलेच पाहीजे असे मला वाटते .
करोनाच्या या महामारीच्या बिकट संकटातून बाहेर पडून परत नव्याने सर्वानां सुरुवात करता यावी , सुयश मिळावे ही सदीच्छा !
येणारे वर्ष आनंदाचे , भरभराटीचे , वैभवाचे , आरोग्यदायक ,नवनिर्मितीचे, सुखसमृद्धीचे मंगलमय यावे ,
यासाठी सर्व क्षेत्रातील ,सर्व जणानां नववर्षाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सुनील काळे
9423966486
एकलव्य 'कांताराम'
एकलव्य 'कांताराम'
मी जरी लहानपणापासून पाचगणीत राहत होतो तरी काही ना काही कारणाने आमचे येणे वाईला व्हायचेच . वाईत आलो की जुन्या शॉर्टकट ने घाटावर यायचो . घाटावर आले की ढोल्या गणपतीचे देऊळ त्याच्या शेजारचे काशी विश्वेशराचे मंदीर त्यावरील कोरीव काम, घाटाची काळया दगडात केलेली सुबक बांधणी, रचना, कृष्णेचे वाहणारे पाणी व परिसर हा माझ्या आवडीचा भाग कधी झाला हे माझे मलाच कळले नाही . पुढे कॉलेजला सायन्स शिकायला दोन वर्ष वाईला होतो ,त्यावेळेपासूनच घाटाची चित्रे काढायचा छंदच लागला .
जसजशी चित्रात प्रगती होत गेली तशी घाटावर वारंवार येण्याची इच्छा अनावर होवू लागली . चित्र ,रेखाटन, वॉटर कलर करताना खूप गर्दी व्हायची . घाटाच्या आजुबाजूला हळूहळू कातकरी समाजाच्या छोटया छोट्या झोपड्या वाढू लागल्या होत्या . त्या घाट परिसरात खूप घाण दिसतात व कचरा करतात , त्या कातकऱ्यांची उघडी नागडी पोरं पाण्यात व परिसरात बिनधास्त फिरायची आजही फिरतात . त्यांचा पाण्यात डुंबत बसण्याचा ,मासे पकडण्याचा उदयोग सातत्याने चालूच असायचा. ( व आजही चालू आहे )चित्र काढताना ह्या पोरानां हाकलणे हा अधूनमधून मोठा त्रासच व फालतू त्रासदायक प्रकार असायचा. त्यावेळी आठवतेय एक छोटा पोरगा माझ्या मागे हळूच येवून उभा असायचा. व शांतपणे मला चित्र काढताना तो निरखून पहात राहायचा .मी अधून मधून सगळ्यानां काम थांबवून हाकलून द्यायचो . पण हा पोरगा मात्र मी ज्या ज्या वेळी घाटावर जायचो त्यावेळी हमखास भेटायचाच. माझ्या माघावरच असायचा .मी देखील हळूहळू त्याला हाकलणे सोडून दिले . त्याला नाव विचारले तर म्हणाला कांताराम . पुढे हेही कळाले की तो त्या नदी शेजारच्या झोपडीत राहतो व त्याचे आईबाप जाळी घेऊन मासे पकडण्याचा धंदा करतात , व त्याची परिस्थिती देखील खूप खराब होती . कांताराम शाळेत कमी व घाटावरच जास्त असायचा . पुढे मी आर्ट कॉलेजला पुण्याला गेलो . अधूनमधून स्केचिंग करायला गेलो तर कांताराम हजर असायचाच जणू प्रत्येक चित्रकार कधी ना कधी येणार व तो त्याच्यासाठी देवच असल्याप्रमाणे वाट पहात बसायचा . कांतारामने आता शाळा सोडली व तो चित्र काढत घाटावरच असतो हेही कळले होते. मधे बरीच वर्षे गेली व मी मुंबईला गेलो . वाईचा संपर्क तुटला होता .
आज बऱ्याच वर्षांनी वाईच्या गंगापूरी घाटावर छोटया पायवाटेवर एका दगडी पायरीवर बसून मी मंदीराची स्केचेस करत होतो . परत त्या कातकरी पोरांचा त्रास सुरू झाला, गर्दी वाढू लागली व या त्रासदायक प्रकारामूळे मला अचानक कांतारामची आठवण झाली. दहा बारा वर्षाचा गॅप पडला होता . मग त्या येणाऱ्या जाणाऱ्या पाच सहा पोरानां मी कांताराम विषयी विचारले पण त्यानां सांगता आले नाही . मग जरा वेळाने दुसरा जरा मोठा दिसणारा मुलगा आला. त्याला विचारले तर म्हणाला मी कांतारामचा चुलतभाऊ , कांताराम आता पेंटर झालाय . मग त्याने त्याचा मोबाईल नंबर दिला .कांतारामला मी स्केच संपल्यावर फोन लावला तर म्हणाला थांबा जावू नका ,दहा मिनिटात येतो . कांताराम आला व पाया पडू लागला, मी मध्येच त्याला थांबविला तर म्हणाला आज थांबवू नका . आता मी मोठा झालोय, माझा एक पोरगा अकरावीला व एक नववीत शिकतोय . त्यानां शाळा शिकवणार आहे .धाकटयाला शाळेत सोडायला गेलो म्हणून उशीर झाला . तुमच्या सारखंच मला बनायचं होतं . मग मी देखील चित्रे काढू लागलो .आता माझ्याकडे मोटरसायकल आहे , मी आता शाळेत पेंटीग्जची , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकच्या बोटीवर चित्र काढण्याची, साईन बोर्डांची जी मिळेल ती कामे करतो . माझ्याबरोबर माझे अजून दोन मित्र संतोष केळघणे व पंकज सणस हे देखील असतात . आम्ही सर्वजण मिळूनच काम करतो . खूप कामे असतात , तुमची लई आठवण येते . तुम्हाला भेटायला ते दोघेही येत आहेत .पळत निघालेत .थोड्याच वेळात तेही दोघे आले व आल्या आल्या पाया पडायला लागले . मी त्यानां थांबविले तर म्हणाले तुमच्या सारखीच आता चाळीस हजारांची आर्ट विषयी पुस्तके घेतलीत .आमचं आता बर चाललयं . आमची धडपड नेहमी चालू असते .तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती .तुमच्याकडे एकदा येवू .कारण आता आम्हाला महाबळेश्वरला जायचंय. सिझन चालू झालाय, शिवाय स्वच्छता अभियान सुरू असल्याने खूप भिंती रंगवायच्या आहेत . त्यावर आम्ही अॅकलिक किंवा ऑईल पेंटने चित्रे काढतो . साईन बोर्ड रंगवितो, सायकलवर नावे टाकतो .जी कामे मिळतील ती सर्व करतो , पण आता निघतो, कारण जरा आज उशीर झालाय एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन निवांतपणे भेटण्याचे आश्वासन घेेऊन ते निघून गेले .
कांतारामचा व त्याच्या मित्रांचा डिप्लोमा नाही, त्याचे कोणतेही कला शिक्षण नाही . त्याला व त्याच्या मित्रानां आर्ट फिल्ड माहीत नाही . आर्ट फिल्डच्या प्रदर्शनाची , तिथल्या घडामोडींशी , मार्केटशी, चित्रकारांच्या संघर्षाशी , त्यांचा काही संबध नाही . त्याची त्यानां जाणीवच नाही . कारण त्यांचा मार्ग त्यानां सापडला आहे .एकलव्या प्रमाणे त्यांचा त्यांनीच शोधून काढला होता त्यांची कोणाशी स्पर्धा नाही व नव्हती .निर्व्याज मनाने ते त्यांच्या कार्यात मग्न आहेत . आणि अनेक क्षेत्रातील तरुण मंडळी पाच वर्षाचे उच्च शिक्षण घेऊन काय पुढे करायचे ? नोकरी कधी मिळणार ? संधी कधी मिळणार ? यश कधी मिळणार ? पुढे आमचे भविष्य काय होणार या धास्तीने कुथत जीवन जगत असतात . पण कांताराम सारखी मंडळी त्यांची वाट न पहाता जे समोर येईल ते व स्विकारत पुढे जात राहतात .
बीज अंकुरे , अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत .
कसे रुजावे बियाने, माळरानाच्या कुशीत ?
पण हे बीज तर माळरानाच्या कुशीत रुजलेले दिसत होते .व त्याची वाढ ही चांगली चाललेली दिसत होती .
आता मात्र मी कोणालाच दूर लोटत नाही , किंवा चित्र काढताना हाकलून देत नाही . कारण माझ्या चित्र कामाचे साहीत्य आवरुन ज्यावेळी मी माझ्या फोर व्हिलर कारमध्ये निघतो त्यावेळी मला त्याच्यांत उद्याचा एखादा एकलव्य कांताराम दिसत असतो . एखादा सुनिल काळे दिसत असतो . आणि मग मी माझ्या अशा अनेक ज्ञात अज्ञात गुरु जणानां मनातूनच मनःपूर्वक नमस्कार करून पुढे प्रवास करत राहतो . अशा एकलव्यांच्या मार्गात काटे न टाकता अंगठा न मागता फक्त थोडासा दिलासा, धीर, आधार दिला तर त्यांचाही प्रवास थोडा सुखकर होईल याची प्रत्येकाने थोडी जाणीव ठेवली तर किती मजा येईल ना ? आपल्या सगळ्यांचा प्रवासाला .
[कातांराम आता वाई नगरपालिकेत
नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि उत्तम काम करून अनेक नव्या एकलव्यांच्या जडण घडणीत मदतही करत आहे. ]
सुनिल काळे (9423966486 )
दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2
दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...
-
फडणीस सर 🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋 आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प...
-
-
दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्...
-
माझी कोकण निसर्गयात्रा 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 मी कोल्हापूरला फौडेंशन शिकायला गेलो त्यावेळी अनेक जुन्या चित्...
-
डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 " पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आ...
-
होरमूसजी मामा पाचगणीला मराठी मुलींची व छोट्या मुलांची शाळा ज्याठिकाणी होती त्या पोस्टाशेजारच्या शाळेच्या जागेवर आत्ताचे ...
-
ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे . 🌟🌟🌟🌟🌟🌟 बरोबर सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझे "मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्...
-
भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील जवळजवळ लागून असले...
-
मूर्त का अमूर्त ? आपल्या या छोट्याशा आयुष्यात कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात . काही जण मित्र म्हणून येतात तर काहीज...