ब्लॉग संग्रहण

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

अनंत सामतांची भेट

"एम टी आयवा मारु " या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक श्री .अनंत सामंत यांनी आज निसर्ग आर्ट गॅलरीला सहकुटूंब भेट दिली . ते बरीच वर्ष 1980 सालापासून मेटगुताड या महाबळेश्वरजवळच्या खेड्यात राहत होते . अनेक अनुभव व बऱ्याच लोकांची आठवण निघाली .
भन्नाट व्यक्तिमत्व .

श्री . अनंत सामंत यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबईजवळच्या अर्नाळा इथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण परळच्या आर.एम.भट्ट हायस्कुल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कच्या इन्स्टिटयूट ऑफ कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन मध्ये प्रवेश घेतला व डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पूर्ण केला. या क्षेत्रात काही वर्षे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नोकरी केली. MTDC मध्ये टुर मॅनेजर म्हणून देखील काम केले. त्यानंतर त्यांचा जहाजावरील प्रवास सुरू झाला. हॉटेल मॅनेजमेन्ट च्या जोरावर ते चीफ स्टुवर्ड म्हणून जहाजावर गेले व नंतर क्षेत्र बदलून नेव्हिगेटिंग ऑफिसर झाले. काही वर्षातच नोकरी सोडली आणि इंटेरियर डेकोरेशन, कन्स्ट्रक्शन वगैरे क्षेत्रात मुसाफिरी करत राहिले. लेखक होणं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु जहाजावरील भ्रमंतीने आलेले अनुभव आणि भेटलेली माणसे यांच्यामुळे लेखनाला सुरुवात झाली. "एम टी आयवा मारू" च लिहून ठेवलेलं बाड बरीच वर्षे तसेच पडून होतं. मित्राच्या आग्रहावरून १९८९ साली ते प्रसिद्ध केलं आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरूच झाला तो एकदम हिट कलाकृतीने. सागरी जीवनावरील या कादंबरीने तरुणांना वेड लावलं. आज ३० पेक्षा जास्त वर्षे होऊन देखील तिची लोकप्रियता कमी झाली नाही आणि नवीन आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. इतकेच नाही तर जागतिक स्तरावरील वाचकांसाठी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद श्री. प्रशांत पेठे यांनी केला आणि तो २०१५ साली पेंग्विन (UK )नि प्रकाशित केला.

आतापर्यन्त त्यांची २० च्या आसपास पुस्तके प्रकाशित झाली असून काहींवर आधारित चित्रपट आणि नाटके देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

अनंत सामंत यांनी लिहिलेली पुस्तके :
अविरत - १९९३ (आवृत्ती संपली )
अश्वत्थ (कादंबरी) (अविरतची सुधारित आवृत्ती )
एक ड्रीम..., मायला ! (कथासंग्रह)
एम टी आयवा मारू (कादंबरी) -१९८९[७]
ऑक्टोबर एंड (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
Aiwa Maru (मूळ मराठी कादंबरी - एम टी आयवा मारू; इंग्रजी अनुवादक - प्रशांत पेठे) - २०१५
ओश्तोरीज (कादंबरी) - ऑगस्ट २०००
एका शहराचं शूटिंग (कथासंग्रह)
किबुत्झमधला डॅनी इथे आला होता (कथासंग्रह) - फेब्रुवारी २००३
के फाईव्ह (कादंबरी) - ऑगस्ट १९९९
त्रिमाकासी मादाम! (कादंबरी) - १९९५
दार  चौकट आणि बोटं (कथासंग्रह)
दृष्टी (कादंबरी)
बायपासचे दिवस (आरोग्यविषयक)
बेलिन्दा (कथासंग्रह) - मार्च २००१
मितवा (कादंबरी) - नोव्हेंबर २००४
लांडगा (कादंबरी) - सप्टेंबर १९९९
लिलियनची बखर (ऐतिहासिक)
सॅलिटेअर
माईन फ्रॉइण्ड - मे २००८
फ्रंट लाईन स्टोरी - जून २००१
अनंत सामंत यांना मिळालेले काही पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे "दि.बा.मोकाशी " पुरस्कार
"वा.म.जोशी" पुरस्कार -१९८९
"महाराष्ट्र राज्य पुरस्कार" १९८९-९०, ९८-९९, ९९-२०००, २००९-१०
"ना.सी.फडके" पुरस्कार -१९९६
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "आनंदीबाई शिर्के" पुरस्कार -१९९८
यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) यांचा "बाबुराव बागूल" गौरव पुरस्कार -१९९९
एकूण कथावाङ्मयासाठीचा "अ.वा. वर्टी" पुरस्कार -२००१
"पु.ना.पंडित" पुरस्कार -२००१
"पु.भा.भावे" महाराष्ट्र राज्य पुरस्कार -२००१
मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट कादंबरीसाठी "चंद्रकांत भोगटे" पुरस्कार -२००२
"बापूरावजी देशमुख स्मृती कथासंग्रह पुरस्कार" वर्धा -२००२
संस्कृती कलादर्पण पुरस्कार -२००९ (चित्रपट -वावटळ)

एका राजगीरा लाडूची गोष्ट

एका राजगीरा लाडूची गोष्ट
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
          चित्रकला , गायन, वादन, शिल्पकला , लेखन , अभिनय , नाट्यकला अशा अनेक विविध अभिजात कलाक्षेत्रात आपल्या कलागुणांमुळे ठसा उमटविणारे अनेक  कलावंत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत . नेहमीच्या पोटापाण्याच्या नोकऱ्या न करता अखंड ध्यास घेणाऱ्या कलाकारांची तर महाराष्ट्रात वाणवा नाही . प्रसिद्धी मिळो वा ना मिळो पण आपण एखादे कार्य हाती घेतले तर ही मंडळी तडीस नेण्यासाठी अखेरपर्यंत तयार असतात .
      सातारा जिल्ह्यात कलादालन नाही याची एक बोचरी , दुखरी खंत मनात कायम सलत असते . मोठ्या शहरात कलादालने असल्याने तेथील नागरीक व शाळेकरी मुले तेथे होणाऱ्या कलाप्रदर्शनांना हजेरी लावतात बारकाईने चित्रे पाहतात . त्यानां चित्रकारांची नावे माहीत झाली आहेत त्या कलाकाराचे माध्यम व त्या माध्यमांची वैशिष्ठ्ये त्यानां समजून घेण्यात ते तयार होत आहेत . पण साताऱ्यातील छोट्या तालुक्यांमध्ये एकही आर्ट गॅलरी नाही त्यामुळे मुलांना ' कला ' या विषयात तितकासा रस निर्माण होत नाही .
          वाईतील मेणवलीजवळील भोगाव गावच्या सीमेवर रस्त्यालगत ज्यावेळी " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाचा बोर्ड पाहिल्यानंतर अनेक जवळपासच्या खेड्यात चर्चा सुरु झाली . काय असते आर्ट गॅलरीमध्ये ? तेथे काय मिळते ? हे पाहण्यासाठी अनेकजण कुतुहूल म्हणून फेरी मारतात व येथे हरवून जातात  व जाताना मला म्हणतात तुमची चित्रे जर येथे विकली जात नाहीत तर हा प्रकल्प कशासाठी सुरु ठेवला आहे ?
             मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे  आवड असेल तर सवड मिळते .  एके दिवशी दुपारी बाराच्या सुमारास भोगाव गावातील प्राथमिक शाळेतील तीन शिक्षक मुलांची सहल घेऊन आर्ट गॅलरी पाहायला आले . सौ .ससाणे मॅडम , सौ . फरांदे मॅडम व श्री . ठाकरे सर मुलानां कलादालन प्रथमच दाखवत होते . पाचगणी , वाई महाबळेश्वर परिसरातील चित्रित केलेला निसर्गवैभव पाहून मुले भारावून गेली , चर्चा करू लागली, जलरंग माध्यम , तैलरंग माध्यम त्यानां नवीन होते . खडूचे रंग (ऑईलपेस्टल ) त्यानां माहीत होते पण आता त्यानां नवी चित्रांची दृष्टी मिळत होती . तासभर नीट चित्रे पाहिल्यानंतर भरपूर फोटो काढून झाले . बागेत फिरून झाले व दुपारच्या जेवणाची वेळ झाली . मग शिक्षक मंडळीनी राजगिरा लाडू असलेली पिशवी उघडली व प्रत्येकाला एक एक लाडू दिला . आता शाळेत जावून मावशीने तयार केलेला खाऊ खायचा आहे तर पटापट चालत निघूया म्हणून मुलांची रांग तयार केली व निसर्ग आर्ट गॅलरीच्या बाहेर सर्व मुले एका लाईनीत परत निघाली . अचानक पाठीमागे राहीलेली एक मुलगी धावतपळत पुन्हा माघारी आली व हसत हसत तिने माझ्या हातात राजगिऱ्याचा लाडू कोंबला व निरागसतेने म्हणाली . . . . .
 ' मला तुमच्या दोघांचीही चित्रे खूप खूप आवडली म्हणून माझा लाडू तुमच्यासाठी ठेवलाय ' आणि लगेच क्षणार्धात पळतपळत ग्रुपमध्ये लाईनीत सामील होऊन निघूनही गेली .
          राजगीऱ्याचा तो लाडू व त्या मुलीची निरागस भावना माझ्या मनाला नवा उत्साह देऊन गेली .
         कलादालन पाहून उद्याची भावी चित्रकार मला चित्र रंगविताना त्या मुलीमध्ये दिसते . आणि ही प्रेरणा देण्याचे काम व प्रेरणा टिकवून ठेवण्याची स्फूर्ती गॅलरीतून मिळत राहते .
     आता कोणी विचारले की आर्ट गॅलरी सुरु ठेऊन काय मिळते ? तर मी सांगतो काही नाही मिळाले तरी चालेल पण एक राजगीऱ्याचा लाडू नक्की मिळतो .

वेडी माणसे

वेडी माणसे
🎭🎭🎭🎭
          चित्रकार ज्यावेळी एखादे ऑन द स्पॉट स्केच करत असतो त्यावेळी कितीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतात . त्या प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना कधी मनाला खूप आनंदी करून जातात तर एकादी घटना मनाच्या आतपर्यंत खूप खोलवर जखम करणारी यातना देणारी असते . अशा वेगवेगळ्या घटनांचा चित्रनिर्मिती करताना नक्कीच प्रभाव ठरत असतो  चित्रकाराच्या मनात ती घटना आयुष्यभर लक्षात राहणारी ठरते .
          कृष्णानदीच्या किनारी वसलेल्या वाई गावाजवळ आमचे पांडेवाडी गाव आहे . पाचगणीला खूप वर्ष स्थायिक झालेलो असलो तरी या गावाला जत्रेनिमित्त , उन्हाळी सुट्टीत किंवा काही घरगूती कार्यक्रमानिमित्त आम्ही सतत येतजात असायचो . वाईच्या स्टॅन्डवर उतरलो की समोरचा रस्ता क्रॉस करायचा तेथे राजपूतांची सॉ मिल आहे त्या मिलसमोरच पुढे छान वळणावळणाचा पायवाटेचा रस्ता न्यायाधीशांच्या घरांपर्यंत चालत जायचो व लगेच शेखमिरा क्लबसमोर भव्य गणपती मंदीर दिसायचे . आजूबाजूला भरपूर झाडी होती . सिध्देश्वराच्या मंदीराजवळून जाताना डाव्याबाजूला गंगापूरीचा घाट व उजव्या बाजूला ढोल्या गणपतीचे मंदीर . त्या छोट्या पुलावरून दर्शन घेऊन गावी पायी जायचो . किती स्वच्छ आणि प्रसन्न वाटायचे . आपण वाईकर असल्याचा अभिमान वाटायचा .
           गेली दहा वर्ष मी आता वाईजवळ स्थायिक झालो . बालपणाच्या या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून मी एक दिवस या रस्त्याने चालत निघालो . आता राजपूतांच्या मिलचा रस्ता आवडेनासा झाला आहे . आजूबाजूला दाट घरांची वस्ती , पुढे कातकरी व निर्वासित मंडळीनी उभारलेल्या झोपड्या त्या अस्वच्छ दुर्गंधीयुक्त झोपड्यांना सामोरे जात चालत राहीलो तर पुढे रस्ताच दिसेना . सगळीकडे घाणीचे व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे . पूर्वीच्या वेदसंपन्न वाईच्या मंदिराच्या गावाला माणसांच्या मूर्खपणामुळे एक बकालपणाचा मोठा अजगरी विळखा पडलेला आहे . त्या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थित्यंतरानंतर या शॉर्टकटने मी कधीही जात नाही .
             मी गणपती घाट व आजूबाजूच्या परिसरातील जी रेखाटने केली त्याची संख्या कमी आहे . मला आवडणारा मधलीआळी घाटाची मी खूप वेळा जाऊन स्केचेस केलेली आहेत पण जलरंगात चित्र काढलेले नव्हते . एके दिवशी मस्तपैकी सकाळी सात वाजता माझे चित्रकलेचे सर्व सामान , छोटे ईझल , बसायची खुर्ची व गार्डनची ऊन आल्यानंतर लागणारी खुर्ची घेऊन मी कृष्णोत्सव मंगल कार्यालयाच्या पायऱ्या उतरल्या . समोरच पोहणारी मुले व पूर्वदिशेच्या सुर्योदयामुळे घाटाच्या पायऱ्यांवर छान कोवळे ऊन पडलेले होते . विश्वकोशाचा निर्माता असलेल्या लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वाड्याजवळून जाणारी छोटी पायवाट नानी घाटाकडे येते त्याचे सुंदर प्रतिबिंब हालत्या पाण्यात फारच सुबक दिसत होते . नेहमी आडवा असणारा पेपर मी आज उभा घेतला कारण प्रतिबिंब चित्रित करायचे ठरवले होते .
          प्राथमिक रेखाटन झाले व जलरंगाच्या ब्रशच्या साहाय्याने मी चित्र रंगविण्यात मग्न झालो होतो इतक्यात मोठा बाका प्रसंग माझ्यासमोर आला . कातकऱ्यांचे एक काळेसावळे दहाबारा वर्षांचे एक पोर माझ्यासमोरच पाण्याचा डब्बा घेऊन शौचकर्माला बसायच्या तयारीत दिसले . मी त्याच्यावर ओरडणार होतो इतक्यात आणखी दोन तीन मुले डब्बा घेऊन त्याच्याशेजारी बसली . आता चित्र काढण्याची माझी इच्छा संपली त्यांच्यावर ओरडून काहीही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आले कारण ती नेहमीची जागा त्यांच्या शौचालयाची जागा झालेली होती . चित्रकार किंवा चालणाऱ्या भक्तांसाठी आता तिचा वापर होणारा नव्हता . त्यानंतर मी वाईच्या घाटांवर प्रत्यक्ष जागेवर जावून चित्र काढण्याची उर्मी संपवून टाकली . कधीतरी एखादे छोटे स्केच करत असतो .
            एकदा रविवारी काही चित्रकार पाहुणे आले म्हणून घाटावर गेलो तर दहाबारा जण हातात फावडे , विळा , खुरपी , घमेले , काटेरी दाताळे घेऊन नदीघाटाचा परिसर स्वच्छ करत होती . हळूहळू ही संख्या वाढू लागली व दर रविवारी नदी सेवा कार्य समितीची ही माणसे त्यामध्ये काही स्त्रीया देखील आहेत , नियमितपणे घाटाचा वेगवेगळा कोपरा ठरवून दोन चार तास घरचे कार्य असल्याप्रमाणे घाटपरिसराची व नदीची घाण उपसत असतात . साफसफाई करत असतात . कधी स्वखर्चाने जेसीबी आणतात , कधी पाण्याचा टँकर , कधी मोटरपंप आणून प्रेशरने घाट स्वच्छ करतात . पाण्यात बांधकामाचे अवजड दगड निसटून पडलेले असतात हे सर्वजण ताकद लावून दगड शेजारी शेजारी लावण्याचे काम करत असतात . नदीपात्रात शुटींगवाल्यांच्या कृपेने सगळीकडे जलपर्णीमुळे हिरवळ पसरून नदीचा श्वास गुदमरत असतो . ही मंडळी  पाण्यात उतरून ती जलपर्णी काढत असतात . शेवाळलेल्या दगडी पायऱ्या व त्यावर अकारण वाढलेले कठीण गवत काढताना हाताला भेगा पडायची , जखमा होण्याची वेळ येते तरी माघार न घेता ही मंडळी जिद्दीने तो भाग स्वच्छ करत असतात . रविवारी कोणाचा वाढदिवस असला तर ही मंडळी थोडे थांबून तेथेच साजरा करतात . कधी श्रध्दांजली देण्याची वेळ आली असेल तर तेथेच देतात . ही मंडळी सामान्य नाहीत . यातील काहीजण राजकीय क्षेत्रात , काहीजण शिक्षणक्षेत्रात , काहीजण व्यापारी व नोकरीच्या क्षेत्रात तर काहीजण वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले वाईकर आहेत . कसलाही भेदभाव न करता एकजुटीने हे वेडात दौडले वीर सात या खाक्याने दर रविवारी आराम करण्याच्या दिवशी एकत्र येऊन मोठी स्वच्छतामोहीम राबवत असतात . दहा वर्ष निरंतर योगदान .
        वाई शहराची शहाणी माणसे महापूजा झाली की त्या देवपूजेचे निर्माल्य ,हार ,फुले व इतर न लागणारी सर्व साहित्ये ,जेवणाच्या पत्रावळी नदीत टाकत राहतात . 
वाई गावाचे सर्व नागरीक  नगरपालीका ड्रेनेज व जवळपासच्या हॉस्पीटल व घरातील घाण काही प्रमाणात या नदीत सोडत असतात .
         ही वेडी माणसे वेड्यासारखा ध्यास घेऊन आपला गाव , आपला परिसर , आपली मंदीरे , आपली संस्कृती कणाकणाने जोपासत ही घाण दर रविवारी साफ करत असतात .त्यांना कोणता पगार मिळत नाही , मदत मिळत नाही , अनुदान मिळत नाही . याउलट वेळ पैसा व स्वतःची महत्वाची कामे बाजूला ठेऊन आपण सुशिक्षित , उच्चशिक्षित ,मान्यवरतेचा कोणताही बुरखा न पांघरता नदीपात्रात खोल उतरून स्वच्छतेचे काम करत असतात . आपल्या घरच्या कार्यासारखे कार्य करत असतात . खरंच ही माणसे वेडी असतात .
           गावातील नदीघाट व त्याशेजारी बांधलेली मंदीरे ही आपल्या बापजाद्याच्या खाजगी मालमत्ता असून तेथे इतरांचा काहीही संबंध नाही असे म्हणणारी शहाणी माणसे पार्कींगचे पैसे गोळा करणे , मंदिरातील दानपेटी ही आपल्या  हक्काची असल्याने त्यातील रुपये गोळा करणे , मंदिराच्या आजूबाजूला छोटेमोठे असंख्य दुकानगाळे निर्माण करून दरमहिना हक्काने भाडेपट्टा वसूल करून आपला चरितार्थ चालवित वसूली करत असतात . ही शहाण्या माणसांची लक्षणे आहेत . ही माणसे इतकी माया गोळा करतात पण मंदिर परिसराची स्वच्छता राखणे हे आपले काम नाही हे त्यांनां पक्के माहीत असते . खरे तर आपण ज्या जागेतून पैसे कमावतो ती जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीदेखील त्यांचीच आहे पण ते जाणीवपूर्वक जबाबदारी टाळतात .
           आपल्याकडे देवभोळ्या भक्तांचा तुटवडा नाही . त्यानां भावनिक साद घालून मंदिराचे रंगकाम करून घेणे त्यांना जमते . हे भक्त स्वखर्चाने सढळहाताने देवाच्या कामासाठी पैसे देत राहतात . मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे जोडे ठेवण्यासाठीही आता शुल्क सुरु आहे .शहाणी माणसे असा भरपूर व्यापार करून अपार धन कमवतात त्याचा कधी हिशोब देत नाहीत . स्थानिक असो वा बाहेरचा पार्कींगची रक्कम सर्वांनां द्यावीच लागते . तेथे ओळखपाळख चालत नाही . विशेष म्हणजे मंदिराच्या पश्चिमेकडे असलेली कातकरी वस्तीची जागा त्यांची नाही असे म्हणतात . त्यांनी केलेल्या अस्वच्छ घाणीची जबाबदारी शहाण्या माणसांची नसते . मंदिराच्या दक्षिणेकडे काळ्या दगडाचा घाट बांधून नगरपालीकेने नाना नानी पार्क बनवले आहे . तेथे आता जीपगाड्या पार्क करतात .
         एकंदर वाईची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे . मंदिराच्या सर्व बाजूने विळा खुरपी विकणारे , फळविक्रेते , छत्री व चप्पल दुरुस्त करणारे , छोटे मोठे भटके दुकानदार व असंख्य वाहनांच्या जंजाळात फसलेली आहे . पोटापाण्यासाठी येणाऱ्या  अनेक भटक्या विमुक्तांमुळे सोमवारी बाजारात गाडी घेऊन जाणे एक मोठे संकटकार्य निर्माण झाले आहे .
         एकदा रविवारी कोणत्यातरी कामासाठी गेलो होतो . तेथे माझा मित्र अतूल वाईकर भेटला म्हणाला ये कार्यक्रमासाठी . राजेन्द्रसिंग नावाचे एक महावेडे नदीकार्य , स्वच्छता अभियानासाठी झटत असतात त्यांची सभा होती . ते त्यांच्या वीस पंचवीस कार्यकर्त्यांसोबत आंध्रप्रदेश ते महाबळेश्वरला कृष्णेच्या उगमस्थानापर्यंत स्वच्छतेचे महाअभियान राबवणार आहेत . सर्वांच्या अडचणी व पर्याय व उपाय शोधत आहेत . नदी स्वच्छतेचा त्यानां ध्यास लागला आहे .
आता मला शहाणी माणसे आवडत नाहीत मग वेड्या माणसाच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहीलो तेथे अनेक गोष्टींचा उलघडा झाला .
         देशात , गावात , शहरात , खेड्यात आता शहाणी माणसे जास्त झाली आहेत . ती माणसे फक्त जोरजोरात बोलतात , भाषणे ठोकतात , प्रचंड न समजणारी आश्वासने देत राहतात . ओढयाकाठी गावातला कचरा रस्त्यालगत टाकत राहतात . मोठ्या सुधारणा करण्याच्या नावाखाली हळूच आपली पोळी भाजून घेत असतात . झाडे वाचविण्याचे आश्वासन देऊन विकासाच्या मुद्द्यावर अनेक रस्त्यांवरची झाडे झोपावतात, मोठी कत्तल करणारी ही कातील काळजाची मंडळी आहेत . मग त्यांच्याविरुद्ध वेडी माणसे आंदोलन छेडतात . त्यांच्या गुप्त उद्देशाची पोलखोल उघड करतात . मग शहाणी माणसे माघार घेतल्याचे नाटक करतात . वेडया माणसांचा जयजयकार करतात . परत कुटील कारस्थाने सुरुच राहतात .
            वाई असो किंवा नदीकिनारी असलेल्या अनेक गावांची शहराची हीच व्यथा आहे . आमच्याकडे वेडी माणसे कमी आहेत . पूर्ण वाई शहरात वीस पंचवीस वेडे आहेत व सगळे वाईकर शहाणे आहेत . घाण उचलणारे तीस चाळीस हात व घाण करणारे लाखो करोडो हात . याचा ताळमेळ कसा बसणार ? गाव शहरे स्वच्छ कशी होणार ? सुधारणांचा मेळ कसा साधणार ? हा एक मोठा जठील प्रश्न निर्माण झाला आहे .
          एक गोष्ट नक्की आहे . कधीतरी वेडया माणसांची संख्या वाढेल व शहाण्या माणसांना लाज वाटेल असे वाटते . आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातत्र्यंसैनिकांचा इतिहास पाहिला तर हेच लक्षात येते की वेडया माणसांमुळेच स्वातंत्र्य मिळाले . शहाणी माणसे त्यांची चाकरी करायचे . वेड्या माणसांमुळे इतिहास बदलतो . या वाईच्या दर रविवारी नदी सेवा कार्यकर्त्यांना सर्व वेड्यानां मनापासून मानाचा मुजरा , सॅल्यूट . आदरपूर्वक सप्रेम नमस्कार !
          एक दिवस आपल्या सर्वानां वेडयाचा झटका येऊन सर्व वाईकर वेडे झाले तर नदी किनाऱ्याचा मंदिर परिसराचा कायापालट होण्यास फार काळ लागणार नाही . त्यासाठी हवी गावाची सुधारणा व्हावी अशी मनाची ओढ , आस्था , प्रेम व जिव्हाळा.

         वेडे होण्यासाठी सर्वानां शुभेच्छा !💐💐💐

      वाईतील दर रविवारी नियमितपणे जाणाऱ्या या नदी सेवा कार्य समितीतील वेडया माणसांची लिस्ट जोडत आहे . अजूनही अनेकजण असतील . त्या सर्वानां खूप खूप शुभेच्छा ! व पुन्हा एकदा मानाचा मुजरा व सॅल्यूट ! कारण काही माणसे स्वतःच्या घराचीही जिथे नीट स्वच्छता करत नाहीत तेथे आपल्या गावाच्या परिसराची विनामूल्य सेवा करायला कोण जाईल ? तुम्ही सगळे जाता म्हणून एक दिवस वाईच्या इतिहासात याची नक्की नोंद होईल हे नक्की व वाईकर म्हणतील ज्याना ज्याना आम्ही वेडी माणसे म्हणायचो तीच खरी शहाणी माणसे होती .

श्री .काशिनाथ शेलार
डॉ .नितीन कदम
श्री .भारतदादा खामकर
श्री .सुधीर क्षीरसागर
श्री .अतुल वाईकर
श्री .भवरलाल ओसवाल
श्री .विवेक चिंचकर
श्री .कुमार पवार
श्री .अमित सोहनी
श्री .सचिन गायकवाड
श्री .चरण गायकवाड
वनारसे काका
श्री .मलटणे सर ( पी .आर . सायकलवाले)
श्री .गिरीष जाधव
श्री .अमोल मुळीक
श्री .केशव हादगे
डॉ .अमित जमदाडे
सौ .उर्मिला जाधव
श्रीमती .सारीका गवते
सौ . अपर्णा वाईकर
चिमा खामकर
गणेश जाधव
कु . हिंदवी भाटे
सौ . सुनंदा कट्टे
तुषार घाडगे
गौरव सुर्वे
सुधीर शिंदे
. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
💐💐💐💐💐💐💐💐💐
चित्रकार : सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी - वाई

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]