रियाज
🌟🌟🌟
वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरु होतो . या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो . मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यात या घाटाने . १२वी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा . रोज पाचगणी -वाई एसटी ने प्रवास करायला लागायचा . हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड ,मांढरदेवीचा डोंगर दिसू लागतो . आणि मग पसरणी , एकसर , कुसगाव , अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी केलेली भातशेती दिसायची . त्या भातशेतीत तुंबवलेले पाणी सुर्यप्रकाशामुळे चमकायचे व एक वेगळीच चित्रांची दृश्यमालीका दिसायला लागायची .आजही हा प्रवास करताना मला सृष्टीमध्ये हिरवागार नवचैतन्याचा बहर नेहमी फुललेला दिसून येतो .
चित्रकला महाविद्यालयात जाण्याचे ठरले होते आणि त्यासाठी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते अशी माहीती मिळाली . त्या परिक्षेत A ग्रेड मिळाले तर कला महाविद्यालयात लगेच प्रवेश मिळतो असेही समजले . त्यामुळे मी वाईला केंद्र असलेल्या द्रविड हायस्कूलमध्ये प्रथमच आलो . प्रवेश करताना एका शाळेच्या शिपाईमामाने अष्टपुत्रेसरानां भेटायला सांगितले . इमारतीच्या शेवटच्या टोकाला एक जीना होता त्या जीन्यातुन गेलो की उजव्या बाजूला भलामोठा चित्रकला वर्ग होता .
अष्टपुत्रेसरांची काही निसर्गचित्रे त्या वर्गात लावलेली होती . वाईच्या घाटात जशी वडाची झाडे होती तशाच प्रकारे जलरंगातील ती चित्रे पाहून मी भारावलेल्या अवस्थेत अष्टपुत्रेसरांच्या पाया पडलो आणि त्यानां माझा कलामहाविद्यालयात जाण्याचा विचार सांगितला . अष्टपुत्रेसर मनापासून हसले आणि अगोदर ग्रेड परिक्षा द्या मग चित्रकार होण्याची स्वप्ने नंतर बघा अशी तंबी देऊन म्हणाले रियाज करा , रियाज करण्यावाचून गत्यंतर नाही . रियाज करा . रियाज करा .
मग मी रियाजाच्या मागे लागलो . रियाज करायचा म्हणजे काय हे माहीत नव्हते .पण सतत चित्रे काढायची म्हणजे रियाज करायचा एवढे ठरवून ग्रेड परिक्षा दिली आणि खरोखर A ग्रेड मिळाले . मग पुन्हा अष्टपुत्रेसरांच्या घरी जाऊन मार्गदर्शनासाठी पाया पडलो व निसर्गचित्रे कशी काढायची ते शिकवा अशी विनंती केली . मग अष्टपुत्रेसर पुन्हा हसले . शांतपणे म्हणाले ही माझी डायरी आहे आजची तारीख मी यामध्ये लिहून ठेवतो . आजपासून बरोबर एक वर्षाने म्हणजे 365 दिवसांनी तू मला भेट . रोज एक चित्रे काढायचं , त्या चित्राच्यापाठीमागे तारीख टाकायची अशी एक वर्षाची 365 चित्रे झाली की मला चित्रांचा गट्टा घेऊन भेटायला ये मग मी तुला निसर्गचित्रे कशी काढायची याचे मार्गदर्शन करतो . रियाज करा , रियाज करा, रियाजाशिवाय गत्यंतर नाही . खूप खूप शुभेच्छा ! असे सांगून त्यांनी बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवला .
पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात आलो त्यावेळी विद्यार्थी सहाय्यक समिती या वसतिगृहात राहायचो . कमवा शिका योजना व अनेक अडचणीनां तोंड द्यावे लागायचे . पण रोज एक चित्र काढायचोच . त्यापाठीमागे तारीख लिहून ठेवायचो रोज डायरीत चित्र काढतानाचा अनुभव लिहून ठेवायचो . एक वर्ष झाल्यानंतर अष्टपुत्रेसरानां भेटायची ओढ लागली होती . कारण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 365 चित्रे पूर्ण केली होती त्यानंतर ते मला निसर्गचित्रे काढायला शिकवणार होते .
विद्यार्थी सहाय्यक समिती या हॉस्टेलवर रहात असताना माझे पर्यवेक्षक तांबोळीसरांबरोबर काही गोष्टींमूळे मतभेद झाले व मी एकवर्षानंतर कायमस्वरूपी या वसतिगृहातून बाहेर पडलो . कॉलेजला मे महिन्याची सुट्टी लागली होती . वसतिगृह बंद झाले व मला पाचगणीला सर्व सामानाशिवाय परत जाणे एवढाच पर्याय शिल्लक राहीला. माझे सर्व सामान बांधून मी परत निघालो .
रिक्षाने स्वारगेट स्टेशनला आलो . त्याकाळी एसटीशिवाय पर्याय नव्हता . टॅक्सीने जाण्याची ऐपत नव्हती . स्वारगेट स्टेशनला प्लॅटफार्मवर आलो तर तोबा गर्दी . मे महिन्यात उन्हाळी सिझन सुरु झाल्याने सर्व गाड्या पुणे स्टेशनवरूनच भरून यायच्या त्यामूळे तीन चार गाड्या सोडल्या . शेवटी संध्याकाळची शेवटची गाडी आली . तोपर्यंत एका हमालाला सांगून चित्राच्या फाईली व माझ्या सर्व बॅगा टपावर नीट व्यवस्थित बांधण्यासाठी पैसे ठरवले . त्यासाठी त्याची हमाली अगोदरच दिली .एसटी आल्यानंतर घाईने गर्दीत घुसलो पण बसायला काय उभे राहण्यासाठीसुद्धा जागा नव्हती . हळूहळू प्रवास करत एसटी वाई स्टेशनला आली आणि मग बसायला जागा मिळाली .
वाई ते पाचगणी घाटातून जाताना मी प्रवासात खूप खूष झालो होतो . बसायला खिडकीशेजारी जागा मिळाली होती . घाटातील वनश्री , झाडे , छोट्या छोट्या तुकड्यांची शेती , पांडवगड व थंडगार भन्नाट वेगाने वाहणारा वारा मनाला सुखावत होता . वाऱ्याच्या उलट्या दिशेने एसटी वेगाने चालली होती , बुवासाहेबाचे मंदीर पार करून आता नागेवाडीच्या १६ नंबर स्टॉपवर एसटी थांबणार होती .
पण या स्टॉपवर बस थांबायच्या अगोदरच एसटी अचानक थांबवली होती . एसटीचा ड्रायव्हर गाडी थांबवून खाली उतरून आकाशाच्या दिशेने पहात होता . आकाशात हजारो कागद पक्षांप्रमाणे हळुवारपणे तरंगत तरंगत पसरणीच्या खोल दरीत उडत चालले होते व ते एसटीच्या टपावरून उडत होते . क्षणार्धात माझी तंद्री भंग पावली व सगळा प्रकार माझ्या लक्षात आला . भराभर धावत वेगाने खाली उतरून मी एसटीच्या टपावर चढलो . माझ्या सामानाच्या बॅगा वजनदार असल्याने तशाच होत्या पण चित्रांच्या पोर्टपोलीओच्या फाईली बांधायला काही नसल्याने हमालाने त्या फाईलीच्या दोऱ्या एसटीच्या ग्रिलला बांधल्या होत्या . वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे दोऱ्या तुटल्या होत्या व फाईलींमध्ये हवा भरून सर्व चित्रे फडफडत वेगाने घाटाच्या खोल खोल दरीमध्ये उंचउंच उडत होती . दरीमध्ये उतरून चित्र गोळा करणे शक्य नव्हते . शिवाय एसटीमध्ये बसलेली माणसे उशीर होत असल्याने वैतागली होती . आरडाओरड करू लागली होती . मी खाली उतरून एसटीत आल्यानंतर आतमध्ये प्रत्येकजण विचारत होता काय झाले ? काय झाले ?
काय सांगू त्यांना ? माझा रियाज , 365 दिवसांची दिवसरात्र जागून केलेली मेहनत व हजारो स्केचेस , निसर्गचित्रे , असाईनमेंटस क्षणार्धात माझ्याच डोळ्यांसमोर पसरणीघाटाच्या दरीत दिसेनासी झाली होती . रियाज करा , रियाज करा रियाजाशिवाय गत्यंतर नाही असे सांगणारे अष्टपुत्रेसर पाणवलेल्या डोळ्यांसमोर धुसर दिसू लागले . आता काय सांगणार त्यानां ? कोणता रियाज दाखवणार आता ? आता एसटीचा उरलेला प्रवास आवडेनासा झाला . खूप खूप राग आला स्वतःचा , नियतीचा , हतबल परिस्थितीचा . त्यानंतर खरोखरच खूप रियाज केला . त्यानंतर चार वर्ष अष्टपुत्रेसरानां भेटलोच नाही .अथक परिश्रमाने आर्थिक परिस्थिती बदलली . त्यानंतर 1996 साली स्वत:ची चारचाकी गाडी घेतली . एसटीने प्रवास करून आता सत्तावीस वर्षे झाली असावीत .
परवा वाईवरून स्वतःच्याच गाडीने पाचगणीला जात होतो . स्वच्छ हवा होती , डोंगरदऱ्या , पांडवगड , पसरणी , कुसगाव , एकसर गावातली शेती हिरवीगार दिसत होती . पाणी साठल्याने चमकत होती , मस्त थंडगार बेभान वारा सुटला होता . त्या एसटीच्या स्पॉटवरच , त्याच जागेवरच मुद्दाम थोडावेळ थांबलो होतो . वर आकाशात असंख्य पक्षी दरीच्या दिशेने वेगाने उडत चालले होते . ते उडत चाललेले पक्षी जणू मला माझ्या दरीत झेपावलेल्या चित्रांसारखे वाटत होते .
माझा रियाज वाया गेला नव्हता .
रियाज कधीच वाया जात नाही .
प्रत्येक रियाज नव्याने काहीतरी शिकवत असतो .
निसर्ग हाच खरा सर्वश्रेष्ठ कलाकार त्याच्याकडची अदभूत रंगांची पॅलेट , नयनरम्य विविधता , क्षणात दृश्य व वातावरण बदलण्याची तत्परता आपल्याकडे कशी असणार ? म्हणून त्याने माझी असंख्य चित्रे मला रियाजाचा गर्व होऊ नये म्हणून स्वतःकडे पसरणी घाटाच्या दरीत ओढून घेतली व मला मुक्त केला . एक नवा विचार दिला . रियाज हा फक्त प्रत्यक्ष कृतीने करण्याची गोष्ट नसते रियाज सतत मनन , चिंतन करूनही करता येतो . आपण आपल्या कलेचा रियाज खूप केला असा कधीही कलाकाराने गर्व करू नये . कोणतीही कला ही तात्पुरती स्वरूपाची नसून आयुष्यभर सतत करण्याची साधना असते त्यासाठी सतत रियाज करत राहणे हाच उपाय असतो . आपली पॅशनेट वृत्ती सतत जागृत सावध ठेवली पाहिजे . मनातून कधीही विसरली न जाणारी नवी जाणीव निसर्गाने मला दिली . त्या समृद्ध निसर्गगुरुपुढे मी मनापासून नतमस्तक झालो आणि .....
अचानक दरीमधून मला मोठ्याने अष्टपुत्रेसरांचा इकोसारखा घुमणारा आवाज ऐकू येऊ लागला . मित्रांनो क्षेत्र कोणतेही असू द्या .
रियाज करा ,
रियाज करा ,
सतत रियाजाशिवाय गत्यंतर नाही .
🎨🎨🎨🎨
सुनील काळे