ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

सुसंवादाचे महत्व

 *सुसंवादाचे महत्व* 

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

          एखादा दिवस नेहमीप्रमाणेच उजाडतो पण सकाळपासूनच जाणवते की आजचा दिवस जरा भलताच वेगळा आहे. तो चांगला, वाईट की मध्यम स्वरुपाचा असणार हे आपल्याला कळत नाही , पण तो दिवस व त्याचे परिणाम मात्र 

आयुष्यभर लक्षात राहतात . १५ मे २०२० हा दिवस माझ्यासाठी असाच विपरीत घटनेची आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरला . त्यादिवशी सकाळी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी उठलो तर वॉशबेसीन , बाथरूममध्ये पाण्याचा थेंब नाही . मग सगळीकडे शोध सुरु केला .

 किचनचा नळ सुरु राहीला ? किंवा कमोडचा फ्लश सुरु राहीला ? की गार्डनचा नळ सुरु राहीला ? याची शोधाशोध करता करता मी आमच्या " निसर्ग " बंगल्याच्या टाकीवर सहजपणे चढलो . टाकीचे झाकण उघडून पाणी नाही हे दिसले व विचारात खाली उतरत असतानाच लोखंडी शिडी घसरली आणि अनपेक्षितपणे १२ फूटावर पडलो . डाव्या पायाचे हाड तुटले . वाईच्या मिशन हॉस्पीटलमध्ये डॉ. इराणी यांनी ऑपरेशन केले व प्लॅस्टर बांधलेल्या अवस्थेत मी घरी परतलो . घराच्या हॉलमध्येच टिव्ही पहात आता दोनतीन महीने माझा खरा 'लॉकडाऊन ' सुरु झाला .

              अशा या निराश अवस्थेत मी टिव्हीवर सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येची बातमी ऐकली . टिव्हीवरची निवेदिका सुशांतसिंगची माहीती सविस्तरपणे सांगत होती . त्यामध्ये त्याच्याकडे साठ कोटी रुपयांची संपत्ती असून स्वतःचे घर , गाडी , प्रसिद्धी , नातेवाईक , मित्रपरिवार , मैत्रिणींचा गोतावळा, व शिक्षण या इतर अनेक गोष्टींची माहीती सांगत होती . आणि ते ऐकल्यावर मी भारावलेल्या अवस्थेमध्येच माझे कंगाल दिवस आठवू लागलो . व नंतर मी माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाच्या आठवणींचा ' ग्रीन टाय ' हा लेख लिहला .

            हळूहळू वॉटसअप व फेसबूकवर माझा नंबर लिहल्यामूळे हा लेख अनेकांना आवडल्याचे  व खूप प्रेरणा मिळाली असे सांगणारे खूप फोन आले . या फोनवरच्या सततच्या बोलण्यामूळे मी माझ्या पायाचे दुःख , वेदना खरोखर विसरून गेलो . रोज वेगवेगळे फोन यायचे व त्या सांगणाऱ्या माणसांचे प्रोब्लेम सांगून झाल्यावर मी चकीत व्हायचो . खरं तर मानवी जीवन किती गुंतागुंतीचे व अडचणींचे झाले आहे याचा मला नव्याने साक्षात्कार होत होता . काही लोकांनी त्यांचे मार्ग स्वतः शोधून त्यावर मात केली तर काहीजण त्याच त्याच विचारांच्या गुंत्यात इतके अडकलेले दिसले की त्यांची विचारांची गाडी पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीत अडकलेली दिसली . आपण दुसऱ्या अँगलने त्या अवघड अडचणींचा सामना करू शकतो याची त्यानां जाणीवच नव्हती . त्यापैकी आज आठवणीत असलेली ही गोष्ट मुद्दाम सांगतो .

            साधारण दुपारची तीन वाजताची वेळ असावी आणि मोबाईल वर रिंग वाजली .एक अनोळखी नंबर मोबाईलवर दिसत होता . एक दबक्या आवाजात एका वयोवृद्ध आजींचा तो आवाज होता .त्यांनी त्यांचे नाव गाव सांगितले . 

अहो , ती ग्रीन टाय नावाचा लेख तुम्हीच लिहला आहे का ? 

मी हो म्हणालो आणि त्यांनी पहीली शपथ घातली की मी कधीही त्यांचे नाव कोणाला सांगणार नाही . आणि त्या फोनवर मोठ्याने रडू लागल्या . थोड्यावेळाने त्यांनी स्वतःला सावरले व शांतपणे मला सांगितले की ,

"मी आज आत्महत्या करणार आहे. "

मला आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्यायचे आहे , तर लाल रंगाचा स्प्रे आणू की काळ्या रंगाचा ? 

कोणते औषध जास्त पॉवरफूल आहे ? म्हणजे लवकर मरण येईल ?

लवकरात लवकर सांगा ......

हे जणू ते मला अशा अविर्भावाने विचारत होत्या की जणू मला आत्महत्येचा भरपूर अनुभव आहे . आणि मी त्यातला तज्ञ आहे . मी सावध झालो आणि हळूवारपणे विचारले . . . . . 

आज्जी ,खरंच आत्महत्येची गरज आहे का ?

फारच अडचण आहे का ?

रागावणार नसला तर मला खरे कारण जाणून घ्यायची इच्छा आहे . मी नक्की तुमच्या आत्महत्येला मदत करीन . आय प्रॉमिस .

माझे आश्वासक बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली .

          आजीनां एकच अपत्य एकुलता एक मुलगा . मुलगा लहान असतानाच एका अपघातात त्यांच्या पतींचे निधन झाले . अतिशय कष्टाने हालअपेष्ठा भोगून अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी त्यांच्या मुलाला वाढवले खूप चांगले शिक्षण दिले आणि आता त्यांचा मुलगा दुबईत एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो . लॉकडाऊनमुळे तो भारतात येवू शकत नाही . मुलाची बायको शिकलेली उच्चघरातील आहे .दोन नातवंडे आहेत पण सूनबाई सतत शाकाहारी खायला देते . मांसाहारी , मटण , चिकन ,अंडी ,मासे कधीच खायला देत नाही . त्यामूळे तेच तेच शाकाहारी वरण भातासारखे मिळमिळत खाऊन खूप कंटाळा आला आहे . काही खाऊपिऊ वाटत नाही . जीवन भकास वाटते आणि जगण्यात मजा येत नाही . आणि शेवटी त्यांनी मलाच प्रश्न विचारला 

सांगा बरं किती दिवस असं जगायचे ? ?

म्हणून आता मी आता आत्महत्या करणारच आहे. 

व 

सूनबाईची चांगली जिरवणार आहे . 

असे सांगून त्यांनी मला तोच प्रश्न विचारला ... 

काळा डबा आणू की लाल ?

एकंदरीत आत्महत्या करण्यासाठी त्या फारच प्रेरीत , उत्सुक झाल्याचे दिसून येत होते . आणि आत्महत्या करणे फार सोपे आहे असेही त्यानां वाटत असावे .

            हे त्यांचे कारण व उत्साह ऐकून मी मात्र सर्द झालो .

मग मी त्यानां थोडा विचार केल्यासारखे दाखवले व म्हणालो मला काही खास  अनुभव नाही पण तुम्ही लाल औषधच घ्यावे कारण लाल रंग हा डेंजरचे प्रतिक असतो . 

पण आणण्यापूर्वी तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडते तर सूनबाईला सांगायचे त्या करून देतील किंवा सूनबाई करून देत नसेल तर तुम्ही स्वतः स्वयंपाक करायचा व आवडीचे पदार्थ करून खायचे .

हे विचारल्यावर आज्जीबाई चांगल्याच खवळल्या . 

मी तिच्याशी जराही बोलत नाही . व तिलाही माझ्याशी बोलून देत नाही . आम्ही एकाच बंगल्यात राहतो पण तिची खोली व माझी खोली वेगवेगळी आहे . 

आणि मी का म्हणून तिच्याशी बोलायचे ? 

तिला समजायला नको ? 

आणि मी का म्हणून स्वयंपाक करायचा ? 

इतकी वर्ष केला यापुढे मी कधीही स्वयंपाक करणार नाही असं सूनबाईला पहीलेच सांगितले आहे . 

आज्जी बाईनी ठाम निर्धाराने सांगितले .

मग आत्महत्या करून तुम्ही तर मरणार पण सूनबाईला कसे कळणार की तुम्हाला काय त्रास होतो ते ? मी विचारले .

त्यासाठी तुम्ही एकदा तरी तिच्याशी बोला तुझ्यामूळे मी आत्महत्या करत आहे हे तिला सांगा व नंतरच लाल औषध आणा . तिलाही कळला पाहीजे तुमचा त्रास.

मी असे दोनतीन वेळा सांगितल्यामूळे आज्जीबाई मग नाईलाजाने तयार झाल्या व त्यांनी माझे जरा नाआवडीनेच आभार मानले व फोन बंद केला .

          ही कथा माझ्यासाठी संपली व मी विसरूनही गेलो आणि चार पाच दिवसानंतर पुन्हा दुपारच्या तीनच्या सुमारास माझा मोबाईल वाजला . फोन घेतल्यावर त्याच आज्जीबाई पुन्हा बोलू लागल्या . यावेळी मात्र आजींचा बोलण्याचा टोन एकदम आनंदाचा उत्साहाचा होता . 

मी विचारले आणले का लाल औषध ?

जळलं मेलं ते लाल काळं औषध , मी नाही आणणार आता .

अहो ,तुम्ही सांगितले म्हणून मी तिच्याशी बोलले . खूप रागावले तिच्यावर , आणि मग तुझ्यामूळेच मी आत्महत्या करणार आहे असे सांगितल्यावर जाम रडायला लागली . आता तीन चार दिवस झाले . माझ्यासाठी सगळे आवडीचे नॉनव्हेज पदार्थ करते व मी देखील तिला मदत करते . आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो .नातू अजून लहान आहे , शिवाय मुलगा परदेशात अडकलाय , त्याला किती वाईट वाटेल .मी अशी भलतीसलती गोष्ट केली असती तर  सगळ्या कुटूंबाचीच वाट लागली असती . सर्वांनाच खूप वाईट वाटले असते , आणि त्रास मनस्तापही झाला असता . त्यामूळे आता आत्महत्या कॅन्सल.......... 

आणि तुम्हाला म्हणून सांगते तशी माझी सून चांगली गुणाची आहे हो . 

पण तुम्ही सांगितले म्हणून मी बोलले नाहीतर ....... 

आणि त्या आज्जी बाईनीं मनापासून समाधानाने फोन ठेवला. आजही कधीतरी अचानकपणे त्यांचा मला फोन येतो व आम्ही भरपूर गप्पा मारतो.

           काही जणानां ही गोष्ट साधी व 

अतार्किक वाटेल पण अगदी खरी आणि वास्तवात घडलेली आहे . 

मी देखील फार मोठे काम केले आहे असा माझा दावा नाही . 

           पण आज मला शीतल आमटेच्या आत्महत्येनंतर परत एकदा प्रकर्षाने ही गोष्ट आठवली व जाणवले आमच्यातील एकमेकांशी संवाद हरवला आहे. कधी कधी किती साधे ,सोपे प्रश्न असतात  कुटुंबातील एकमेकांशी बसून विचार केला तर सोप्या आणि अवघड प्रश्नांवरही खूप छान तोडगा निघू शकतो. संवादाने जटील प्रश्न मार्गी लागतील आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगावयास उत्साह वाटेल . माणसे आपली दुःखे अडचणी यांचा इतका धसका घेतात . मनात धुमसत राहतात . आणि मग आयुष्य संपवण्याचे निर्णय घेतात . पण स्वतःचे असे आयुष्य अचानक संपवून किती जवळच्या व इतरही समाजातील सर्वच लोकानां यातना होतील याचा विचार करत नाहीत . असा टोकाचा मार्ग निवडण्यापेक्षा एकमेकांशी *सुंसवाद* साधणे महत्वाचे वाटते .

         यावेळी आमचा इगो कधी आडवा येतो , कधी आमची निष्काळजीपणे दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय आडवी येते . पण त्याचे परिणाम मात्र कायम अंतरीच्या जखमा भरून न येणाऱ्या असतात . म्हणून वाद झाला तरी चालेल त्यातून कधी तरी *सुसंवाद* घडेलच अशी अपेक्षा करूया . 

शिक्षणाने माणूस घडतो , सुस्कांरीत होतो , त्याचे व्हीझन मोठे होते . विचार मोठे होतात . पण *सुसंवाद* नसेल तर ते शिक्षण देखील काय कामाचे ?

चला तर मग स्वतःचा स्वतःशी आणि इतर सर्वांशी देखील *सुसंवाद* करण्यास सुरुवात करूया !  

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सुनील काळे

9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...