ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

पेसी अंकल

* पेसी अंकल * 

              पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वर कडे जाताना रस्त्यात रश्मी चोक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरच थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर डाव्या बाजूच्या पिलरवर इंग्रजीमध्ये "मेडस्टोन '' व उजव्या बाजूच्या पिलरवर वीरजी लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.
               आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डन मध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.
गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा............
            बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लबींगचे सामान, रंगाचे सामान , ब्रशेस , स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोटया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार .पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.

              पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे,त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपुर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉल मध्ये त्यांच्या आईचे चित्रकार
एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबल वर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची.त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा. 
                त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच...डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली......... ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी... डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ....ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला
' डॉल ' म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच 
' पेस्तन ' म्हणे............

            हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.

              माझी आणि त्यांची ओळखही ही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप
हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली 
' वेल डन माय बॉय' !

              मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची.......पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत.....टिपिकल पारसी टोन.........

              पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाट मध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो.डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले. 

             पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा.

               पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा  " दुर्मिळ " मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना 
अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , 
ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. तू चांगला ट्राय करते......असाच होते ,पन तुला जमेल.........
मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली " Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?" मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .
 ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच
टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .
मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे,
रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .

                    मला चित्रात पाचगणीची थंड हवा धुके, वारे चित्रात दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य.........."असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहीजे.......फॉग एकदम पिक्चर मंधी घुसला पाहीजे....... सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.

          मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . "तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला " त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. 
              एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहीली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.

             1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो . कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्ग चित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे .......
              त्यांनी मला एक कल्पना सांगितली मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतू चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.
          पेसी अंकल हे पाचगणी येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले ,त्यांचा प्रचंड मोठा आठ एकर परिसरातील मेडस्टोन हा वंशपरंपरागत पारंपारिक बंगला असला तरी स्वभावाने मात्र ते अतिशय कंजूष होते .
त्यांच्याकडे खूप आर्थिक संपन्नता असली तरीही कित्येक वर्ष जुनी असलेली फियाट गाडी ते वापरत असत. त्यांना आलेली एकही पत्र ते कधीही फेकून देत नसत उलट या पत्र आलेल्या पाकिटाचा भाग असेल तो पूर्णपणे उघडून त्याच्या पाठीमागे ते पत्र लिहित आणि त्याचा उपयोग करत. (आजही त्यातील काही पत्र माझ्याकडे आहेत. ) त्यांच्याकडे येणारे सर्व कामगार अतिशय कमी पगारामध्ये काम करत असत त्यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से हे कामगार मला सांगत असत .
        पेसी अंकल यांना एकूण तीन मुले व एक मुलगी होती.त्यांची तिन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. त्यांचे दहा-बारा एकरामध्ये प्रचंड मोठे आलिशान राजवाड्या सारखी घरे होती. पेसी अंकल पावसाळ्यामध्ये कधीकधी तीन-चार महिन्यांसाठी इंग्लंडला जात असत. तेथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन युरो (2x80=160 रुपये ) लागतात म्हणून ते वर्तमानपत्र अजिबात वाचत नसत .तिकडची एकही वस्तू घेत नसत. तिकडचे राहणीमान हे भारतापेक्षा खूप महाग आहे हे त्यांच्या मनाने खूप गांभीर्याने घेतलं होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मुलाबरोबर पटत नसत. शेवटी मी आपला पाचगणीतच बरा आहे आणि शेवटी मी पाचगणीतच मी मरेन असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सर्व मुलांना, नातवंडाना दिला होता आणि तो इशारा त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केला .

             पेसी अंकलने मला पाचगणी आर्ट गॅलरी व पांचगणी क्लब याठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत केली ,त्याचप्रमाणे वेळोवेळी माझी चित्रकला विकत घेऊन माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांची काही चित्रकलेची पुस्तके मला दिली. इंग्लडचे विन्सर अॅन्ड न्यूटनचे महागडे रंग चित्रांच्या बदल्यात मला दिले. एकदा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर महात्मा गांधी यांनी लावलेले गुलमोहराच्या झाडाचे मी काढलेले चित्र घेण्यासाठी विरजींच्या बंगल्यावर आले त्यावेळी पेसी अंकलचा आनंद गगनात मावत नव्हता.

           एकदा मात्र माझे शिक्षण पूर्ण झाले त्यावेळी मी पाचगणीला कायमचा राहण्यासाठी आलो होतो. असाच एके दिवशी मला पेसी अंकल चा निरोप आला. त्यांच्याकडे कोणीतरी जर्मनी मधून खास पर्यटक आलेले होते आणि त्यांना मेड स्टोन बंगल्याच्या पाठीमागचे कृष्णा व्हॅलीचे एक जलरंगातील चित्र हवे होते .
मी माझे सर्व चित्रकलेचे साहित्य घेऊन बंगल्याच्या पाठीमागे छानपैकी चित्र रंगवत बसलो होतो चित्र रंगवत असतानाच माझा छान मूड लागल्यामुळे मी आणखी काही चित्र रंगविण्यास सुरुवात केली .पेसी विरजींच्या मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागे एक खूप मोठी स्टोअर रूम होती . ती नेहमी उघडीच असे.दुपारच्या वेळी मला एक खुर्ची , व छोटे टेबल चित्र ठेवण्यासाठी पाहिजे होते म्हणून मी त्या स्टोअर रूम मध्ये गेलो .तेथे सहजपणे माझी नजर एक चित्रकलेची फाईल कोपऱ्यात होती तेथे गेली. मी ती फाईल सहज उघडली तर त्यामध्ये माझी शिकत असताना काढलेली निसर्ग चित्रे होती , ही सर्व चित्रे वेगवेगळ्या पर्यटकांना विकलेली आहेत असे मला पेसी अंकल यांनी सांगितले सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मात्र ही चित्रे पेसी अंकल यांनीच विकत घेतलेली आहेत हे मला समजत होते. व वेळोवेळी त्यांनी त्याचे पैसेही दिले होते. म्हणून पुढच्या क्षणी रागानेच मी ती फाईल घेऊन पेसी अंकल यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 
अंकल त्यावेळी निवांतपणे पेपर वाचत होते .मी त्यांना विचारले की तुम्ही तर माझी चित्रे पर्यटकांना विकली आहेत असे सांगितले, पण चित्रे तर मात्र इथेच आहेत पण तुम्ही पैसे तर मात्र मला सगळे दिले. जर चित्रे विकली नव्हती तर तसं सांगायचे होते मला. असे का केले तुम्ही ? 
त्यावेळी पेसी अंकल त्यांच्या खुर्चीतून उठले आणि मला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि म्हणाले ..........
सॉरी दिकरा ,तू त्या वेळेस शिकायला आर्ट कॉलेजमंदी पुण्यात होता .......आणि तुला पैशांची गरज होती, मी तुला मदत म्हणून मी पैसे दिले असते तर ते तू घेतले नसते याची मला पुर्ण खात्री होती. पण तुला मदत करणे फार गरजेचं होते म्हणून मी ही सगळी चित्रे वेळोवेळी पर्यटकांनी विकत घेतलेली आहेत असे मुद्दाम खोटेच सांगितले. 
आय ॲम रियली सॉरी फॉर दॅट.......... 
पण चांगल्या कामासाठी खोटा बोलले तर चालते, हे मला माहित आहे.

             पेसीअंकल यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले . कोण ? कुठला मी ? पण माझे शिक्षण पूर्ण व्हावे मला पैशांची कमतरता जाणवू नये म्हणून स्वतः पैसे पाठवून गेली चार वर्ष ते मला मदत करत होते. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ते आणि इतर नातलग म्हणवणाऱ्या मंडळीनी माझी कधीही साधी विचारपूसही केली नाही . नात्यातला हा विरोधाभास कायम लक्षात राहीला.

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की पूर्ण चित्रकलेवर तुमचं जीवन कसं जगलं जातं ? कसं भागलं जाते ?
आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते ही कला जिवंत ठेवण्यासाठी अशी पेसी अंकल सारखी माणसे आहेत ,ज्यांना कला आणि कलाकार यांच्याविषयी आस्था, आपुलकी, प्रेम व मनापासून मदत करण्याची इच्छाशक्ती आहे म्हणूनच कलाकार व त्याची कला जिवंत राहू शकते.

             1995 साली माझे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी उदघाटनासाठी सांस्कृतिक मंत्री येणार याचा माझ्यापेक्षा पेसी अंकल यानांच फार आनंद झाला होता. त्या प्रदर्शनासाठी अंकल आपली तब्येत बरोबर नसतानाही मोठ्या उत्साहाने जहांगीर आर्ट गॅलरीला आले होते. त्या प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक यश मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला दिसत होता. आपल्या गावाकडचा एक मुलगा 
जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो याचे त्यांना फार कौतुक वाटत होते आणि ते सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवत होते .पाचगणीत कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करावी अशी त्यांची फार इच्छा होती. आणि मी सुरु ही केली पण कायमस्वरूपी टिकवू शकलो नाही याची खंतही कायम माझ्या मनात राहीली.

             पुढे म्हातारपण आल्यामुळे पेसी अंकल पूर्णपणे थकले होते हळूहळू डायबेटिस व इतर रोगांनी त्यांना पूर्णपणे घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आणि संपत्ती त्यांच्या बहिणीची मुलगी गीता चोक्सी हिने ताब्यात घेतली आणि हळूहळू त्यांचे सर्व सामान , फर्निचर, सर्व वस्तू विकून टाकल्या व अंतिमतः ती जागा शेजारच्या बाथा स्कूलला मोठया किमतीमध्ये विकून टाकली....... आणि माझा, पेसी अंकल व मेडस्टोन बंगल्याबरोबरचा कायमचा संबंध संपवला............

         मी मात्र पेसी अंकलची इच्छा माझ्या 'निसर्ग ' स्टुडीओ व बंगल्याची निर्मिती करून पुर्ण केली आहे...... आजही कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणून जातं की हा तर पारशी माणसाचा बंगला वाटतो त्यावेळी नकळतपणे माझे डोळे पाणवतात व वाटते पेसी अंकलला हे माझे घर नक्की आवडले असते व मोठयाने टाळ्या वाजवून ते परत परत म्हणाले असते 
 " वेल डन माय बॉय, 
 '' वेल डन माय बॉय " 
ॲटलास्ट यु डीड इट..............

        आजही मी ज्यावेळी शांतपणे विचार करतो त्यावेळी मला जाणवते की अशी पेसी अंकल सारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर हा माझा चित्रकलेचा 
काटया -कुट्यातला सदैव अडचणीतला प्रवास फार पूर्वीच संपुष्टात आला असता.

              एखादे चांगलं चित्र झाले आणि मी शांतपणे ते चित्र पहात बसलो की आजही मला टाळ्यांचा आवाज येतो............... आणि मोठ्या प्रेमाने कौतुकाचे शब्द ऐकू येतात 
'' वेल डन माय बॉय, 
" वेल डन माय बॉय " 
आणि मी मनातच नतमस्तक होऊन पेसी अंकलच्या आठवणीत आजही रमून जातो.....................................................................................................................

सुनील काळे
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...