*मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
लहानपणासून मला स्वप्नं पडायची , तशी स्वप्ने सगळ्यानांच पडतात पण मला मात्र लई भारी भारी आणि वेगळीच स्वप्ने पडायची . स्वप्नांच्या त्या दुनियेत मी खूप मनापासून गुंतून जायचो मग जागेपणी ती स्वप्ने आठवल्यानंतर प्रत्यक्षात आणायचा खूप प्रयत्न करायचो स्वप्नांच्या त्या दुनियेत मी खूपच मशगूल झालो होतो . पाचगणीत मी ज्या मराठी शाळेत शिकत होतो ती शाळा खूप छोटी होती परंतु त्या शाळेसमोर एक मोठे पटांगण होतं तेथे कबड्डीचे खूप जंगी सामाने व्हायचे अनेक नाटके ,तमाशा व्हायचे व छोट्या पडद्यावर चित्रपटही दाखवायचे हे सगळे आम्हाला अभ्यास करायला जात असल्यामुळे फुकट बघायला मिळायचं त्यावेळी अभिनय करायचा नाटके करायची तमाशात काम करायचे व खूप मोठा अभिनेता बघायचे असं मला वाटायचं पुढे मी तसा प्रयत्नही केला .
सातवीनंतर संजीवन शाळेमध्ये शिकत असताना जनरल नॉलेजचा एक पेपर असायचा त्या पेपरमध्ये प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज माणसे व तो कोणत्या क्षेत्रात काम करतो , किंवा प्रसिद्ध आहे हे ओळखायला लागायचे . सर्व विद्यार्थी त्या त्या क्षेत्रातील दिग्गज माणसांची नावे तोंडपाठ घोकून पाठ करायचो त्यावेळी मला मोठ्ठा शास्त्रज्ञ , मोठ्ठा गणितज्ञ किंवा मोठ्ठा डॉक्टर किंवा मोठ्ठा इंजिनियर होवून असे खूप कार्य करत असल्याची स्वप्ने पडायची . एखादे क्षेत्र निवडून आपणही काहीतरी विशेष काम करावे असे मला वाटायचे तशी मला स्वप्न सतत पडायचीच आणि त्या तंद्रीतच मी जगायचो .पण आमचे गणिताचे देशपांडे सर कान इतका जोरदार पिळायचे मी गणित आणि सायन्स या विषयाचीच धास्ती घेतली व त्या क्षेत्रांकडे वळायचा नादच सोडून दिला.
पाचगणीमध्ये त्यावेळी बहादुर आणि तुलसी नावाचे दोन ताकदवान पैलवान राहायचे .त्यांचे ईराणी मित्र ज्युदो कराटेचे नवनवीन प्रयोग भर रस्त्यातच , कधी भरलेल्या बाजारात सर्वांसमोर करायचे त्यांच्या त्या असामान्य कृती , कोलांट्या उड्या, बलदंड शरीर पाहून पाचगणीकर अचंबित व्हायचे .एकदा मला आठवतंय पाचगणीत मुख्य रस्त्यावरती एक टेम्पो व्हॅन रस्त्यातच बंद पडली होती सगळा रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता बहादुरच्या व त्याच्या एका मित्राने रस्त्यात येऊन चारचाकी गाडी उचलली व बाजूला नेऊन ठेवली त्यांच्या असामान्य ताकदीचा नमुना पाहिल्यानंतर सर्व गावकरी थक्क झाले मग मलाही बहादूर सारखा व्यायाम करून पिळदार शरीर बनवायचे स्वप्न पडू लागली . मग मी माझा मित्र घनःश्याम शाळा सुटल्यानंतर बागेमध्ये व्यायाम करायचो .परंतु पुढे जेवणाखाण्याची व साधा वडापाव मिळवायची बोंबाबोंब आहे हे पाहिल्यानंतर पैलवान होण्याचा नाद मी सोडून दिला .
एकदा मी मात्र खूप भारावलो होतो .शाळेला असताना एकदा रविवारची सुट्टी होती मी आणि माझा मित्र घनश्याम सिडने पॉइंटला विनाकारण फिरत होतो बिलिमोरिया स्कूलच्या जवळ एक सत्तरीतले गोरेपान जाडजूड शरीराचे (गांधी पिक्चर बनवलेले डायरेक्टर रिचर्ड अॅटनबरो सारखे दिसणारे )म्हातारे गृहस्थ रस्त्याच्या बाजूला शांतपणे बसून शेजारी गोल गोल वड्या असलेली भली मोठी रंगांची पेटी घेऊन शांतपणे समोरचे चित्र काढत बसले होते .कोऱ्या कागदावर त्याने भराभर पेन्सिल मध्ये रेखाटन केले व नंतर जलरंगाच्या विविध शेड्स टाकत टाकत समोरच्या कृष्णाव्हॅलीचे अप्रतिम चित्रण केले . मी एखाद्या जादूगाराचा जादूचा खेळ पाहतोय असाच भास मला वारंवार होत होता .दोन मोठ्या वडाच्या झाडांमधून संध्याकाळचा सनसेटचा देखावा व दरी मधून दूरदूर दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा कागदावर जिवंतपणे साकार होत होत्या आणि त्या अविस्मरणीय निर्मितीचा मी एकमेव साक्षीदार होतो माझा मित्र निघून गेला होता पण मी मात्र त्या गोऱ्या आजोबांनी निर्माण केलेल्या कलाकृतीमध्ये स्वतःलाच विसरून गेलो होतो .आपले चित्र पूर्ण झाल्यानंतर आजोबांनी एक मोठी हॅट शांतपणे डोक्यावर ठेवली आणि आणि आपली मोठी त्यांंची सुटकेससारखी दिसणारी बॅग घेऊन ते वाईच्या दिशेने चालायला लागले .मी देखील मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या पाठोपाठ पाठलाग करत चाललो होतो .त्यांनी पाठीमागे पाहिले एक मुलगा आपल्या मागोमाग येत आहे , त्यांनी मला टाटा बाय-बाय केले पण मी मात्र त्यांच्या मागोमागच चालत राहिलो . चित्रकार आजोबा एम . आर .ए .सेंटरच्या दिशेने वळाले आणि मी त्यांच्या पाठोपाठ जात असताना मला तेथील वॉचमनने अडवले . त्याचवेळी चित्रकार आजोबांनी त्याला थांबवले व त्यांच्या मोठ्या बॅगेमध्ये हात घातला . हातामध्ये एक काळ्या रंगाची तळहाताच्या आकाराची एक छोटी रंगाची पेटी काढली व माझ्या हातात ठेवली . ती रंगाची पेटी मला देत असताना छान छान स्मित हास्य केले व डोक्यावर हात ठेवला . ते काहीतरी इंग्रजीत बोलत होते पण त्या बालवयात मला काहीच समजले नाही मी आनंदाने उड्या मारत ती पेटी घेऊन निघालो ती तळहाताएवढी आकाराची रंगाची पेटी विन्सर अॅन्ड न्यूटन कंपनीची होती (जी आजही माझ्याकडे आहे).
खूप वर्षांनंतर मला कळाले ते आजोबा चित्रकारांचे नाव होते आर्किटेक्ट गॉर्डन ब्राऊन .ज्यांनी राजमोहन गांधींसाठी 63 एकर परिसरात अप्रतिम प्रकल्पाचे संपूर्ण प्लॅनिंग केले होते .ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन ही अप्रतिम वास्तु निर्माण केली होती जे आजही पाचगणीचे भूषण आहे . ती छोटी रंगाची पेटी सतत मला चित्र काढण्यासाठी प्रेरणा देऊ लागली .मग पेन्सिलने कधी जलरंगात कधी क्रेयॉन्स कलरने मी सतत चित्रे काढण्याचा प्रयत्न करत राहिलो .पुढे बिलिमोरिया स्कूलचे सुभाषचंद्र बोंगाळे या सरांची चित्रे पाहून मी चित्रकलेकडे पुन्हा ओढला गेलो मग मला मोठ्ठा चित्रकार झाल्याची खूप स्वप्न पडू लागली हे सारख्या पडणाऱ्या स्वप्नामुळे मी चित्रकार व्हायचे हे नक्की केले .
पुढे बारावी सायन्स पास झाल्यानंतर मी कोल्हापूरला गेलो तेथे चित्रकार रवींद्र मेस्त्री ,वडणगेकर , चंद्रकांत मांढरे ,आबालाल रहमान यांची चित्रे पाहिली आणि परत मला मोठे बनायचे याची स्वप्ने जोरजोरात पडू लागली .
फौडेंशन नंतर मी पुण्यात आलो त्यावेळी डेंगळे सर ,नांगरे सर प्रताप मुळीक, फडके सर यांची चित्रे पाहून मी खूप आनंदी व्हायचो . मग परत स्वप्नेच स्वप्न .
एकदा कॉलेजमध्ये असताना सातारा जवळचे औंधचे अप्रतिम म्युझियम पाहिले याठिकाणी धुरंदर ,बाळासाहेब पंतप्रतिनिधी , गांगल , व इतर अनेक परदेशी चित्रकारांची चित्रे पाहून मी स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेलो . या म्युझियममध्ये मी प्रथमच राजा रविवर्मा यांची ओरिजनल चित्रे पाहिली होती .मराठी शाळेत इतिहासाच्या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मी पाहिले होते त्या चित्राखाली इंग्रजीमध्ये राजा रविवर्मा यांची सही होती . रणजित देसाईंच्या "राजा रविवर्मा " या कादंबरीने मी खूप प्रभावित झालो होतो . पुढे एकदा आमचे स्नेही वामनराव ननावरे यांच्याबरोबर बडोदा पाहायला गेलो . सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास पॅलेस अगदी जवळून पाहिला . त्या पॅलेसमध्ये राजा रविवर्मा यांची अप्रतिम चित्रे होती . बडोद्याच्या म्युझियममध्ये देखील राजा रविवर्माची खूप चित्रे पाहायला मिळाली . एकंदरीत राजा रविवर्मा हा चित्रकलेच्या या क्षेत्रात " राजा " माणूस होता .जिकडेतिकडे हा राजा माझ्या स्वप्नात यायचा . रविवर्मा सारखे नामवंत चित्रकार बनायचे हा माझ्या मनाने ध्यास घेतला होता .मोठा चित्रकार बनायचे आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करून यश मिळवायचेच हे सत्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली .
एखाद्या क्षेत्रात मोठं होणं ,आपला दबदबा निर्माण करणे , आपल्या कर्तृत्वाने , कलाकृतीने रसिक जणांना अंर्तबाह्य भारावून टाकणे , त्या कलाकृतीतून त्यांच्या मनाच्या संवेदना जागृत करणे . त्याला अस्वस्थ करणे , ती कलाकृती सर्वसामान्य माणसाच्या आवडीची करणे हे सोपे काम नसते .त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते ,सतत ध्यास घ्यावा लागतो तो ध्यास घेताना दिवस-रात्र मेहनत करून प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करण्याच्या कळा सहन कराव्या लागतात . अनेक स्पर्धा अडचणींना तोंड द्यावे लागते .
राजा रविवर्मा यांनी त्यांच्या कलाकृती घराघरात पोहोचण्यासाठी त्यांच्या चित्रांच्या रंगीत प्रतिकृती तयार केल्या व सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले .
माझा मोठा भाऊ कार्ला येथे नोकरीस होता ,कार्ल्याच्या बौद्धकालीन गुहा मला पहायच्या होत्या म्हणून मी कार्ल्याला गेलो . त्याच वेळी माझ्या एका पुण्याच्या मित्राचा फोन आला त्याने सांगितले अभिनव कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये अतुल गोरे नावाचा एक मित्र राहत होता अतुल गोरे दुबईमध्ये कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून उत्तम काम करत होता . आता त्याने सर्व कमर्शियल कामे बंद करून तो आणि त्याची पत्नी अनिता या दोघांनीही संन्यास घेतला असून ते कार्ल्याला, मळवली जवळच्या वेदांत अकॅडमी येथे कामात मग्न असतात . तू गेलास तर त्यांनाही जरूर भेट .
मळवली हे गावाचे नाव ऐकताच मला राजा रविवर्मा आठवला . त्याच्यासारखे मोठे होण्याची चांगली पाहिलेली दिवास्वप्ने आठवली . चित्रकार राजा रविवर्मा यांचा मुद्राचित्र छपाईचा कारखाना मळवली स्टेशनच्या बाजूला होता .शिवाय संपूर्ण भारतभर चित्रांची पार्सले पाठवण्यासाठी तेथे स्वतंत्र पोस्ट ऑफिस तयार केले होते . रविवर्मा यांच्या चित्रांसाठी लागणारा कागद व इतर साहित्य पुरवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर खास यंत्रणा तयार केली गेली होती .छपाईच्या कामासाठी तीनशे ते चारशे माणसे काम करत असत व त्यासाठी प्रचंड मोठी इमारती बांधली होती ही सारी माहिती पुस्तकांमध्ये वाचलेली होती . तर अशा ह्या मोठ्या चित्रकाराच्या वास्तूला भेट देऊन तेथील छपाई तंत्र व शिलालेखावर कसे प्रिंटिंग केले जाते त्याची प्रोसेस देखील मला समजून घ्यायची होती यासाठीही योग्य संधी चालून आलेली आहे याचा मला मनोमन आनंद झाला होता . त्या आनंदाच्या भरातच मी अतुल गोरेला फोन लावला .
खूप वर्षानंतर अतुल गोरेला वेदांत अकॅडमी मध्ये मी भेटलो पांढरीशुभ्र लुंगी ,लाईट क्रीम कलरचा सदरा आणि गळ्यात काळ्या मण्यांची माळ असा पेहराव केलेला अतुल मला खूप तेजस्वी व समाधानी वाटत होता . आम्ही खूप वर्षानंतर भेटल्यामुळे खूप गप्पा मारल्या .अतुलने त्याचा वेदांत अकॅडमीतला परिसर फिरून दाखवला सर्व सोयींनी युक्त असा वेदांत ॲकॅडमीचा परिसर पाहिल्यानंतर मी भारावून गेलो . मला वेदांत अकॅडमी यांचे रोजचे रुटीन काय आहे हे समजून घ्यायचे होते .शिवाय मळवली येथील राजा रविवर्मा यांचा प्रेस मला पाहायचा आहे असे मी त्याला सांगितले .त्यामुळे तो दिवस वेदांत अकॅडमी मध्येच राहायचा निर्णय आम्ही घेतला . अतुलने आमची राहण्याची उत्तम सोय केली त्या रात्री जीवनातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींची आम्ही चर्चा करत होतो .
दुसऱ्या दिवशी मळवलीला जाऊन कधी एकदा राजा रविवर्मा यांचा प्रेस पाहतो असे मला झाले होते माझी उत्सुकता पाहिल्यानंतरही अतुल मात्र शांत होता त्याने मला तेथे येथील परिसराची काहीही माहिती सांगितले नाही . सकाळी दहाच्या सुमारास शांतपणे त्याने त्याच्या गाडीतून आम्हाला त्या परिसराकडे नेले . एकदोन किलोमीटरचा प्रवास करून झाल्यानंतर मळवली स्टेशन लागले . स्टेशनच्या पलीकडेच एक डोंगरासारखा खूप झाडे असलेला परिसर दिसत होता त्या डोंगराच्या पायथ्याशीच गाडी जाण्याचा रस्ता तयार दिसला .त्या रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यानंतर एक बंगला आम्हाला दिसला .या बंगल्यामध्ये रविवर्मा याने स्लायसर नावाचा माणूस जर्मनी वरून आणलेला होता . हा स्लायसर तंत्रज्ञ याच बंगल्यात राहायला होता कधी कधी राजा रविवर्मा देखील याठिकाणी राहिलेला होता . आता हा बंगला आणि संपूर्ण प्रॉपर्टी ही कोणी गुजराती व्यापारी माणसांनी विकत घेतलेली आहे असे मला अतुलने मला सांगितले . दरवाजावरती बेल वाजवल्यानंतर एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडला , मी सुनील काळे, पाचगणीचा चित्रकार असून मला रविवर्मा यांचे घर ,प्रेस , ओरीजनल चित्रे व शिलालेखावरील छपाई केलेली अनेक चित्रे मला पाहायचे आहेत असे त्या गुजराती बाईंना विचारत असतानाच रागानेच त्या मला म्हणाल्या
कोण है यह रविवर्मा ? यहाँ कोई रविवर्मा बिर्मा रहता नही !
और ईधर उसका कुछ भी सामान यहॉ नही है ।
जो कुछ कचरा था वह हमने फेक दिया ।
आज हमारे घर में पूजा चलनेवाली है ,तुम लोग अभी के अभी यहाँ
से चले जाव !
असे बोलून तिने रागाने दरवाजा बंद केला .
मी परत बेल वाजवली .
हम लोग प्रेस देख सकते है ? हा प्रश्न विचारत असताना तिने डावीकडे बोट दाखवले . एका माणसाला बोलावून इनको प्रेस की जगा दिखा दो असा आदेश दिला आणि पुन्हा तिने धड़कन दरवाजा बंद केला .
चला आता आलो आहोत तर प्रेस तरी पहायला मिळाली या निमित्ताने मी खुश झालो .
त्या माणसाने आम्हाला बंगल्याच्या डावीकडच्या रस्त्याकडून नेण्यास सुरुवात केली .त्या ठिकाणी जवळच एक दगडात घडवलेली पुष्करणी किंवा कारंजे होते . ही पुष्करणी फार सुबक पद्धतीने घडवलेली होती . त्याच्याजवळच दगडी बांधकाम केलेले दोन छोटे पिलर्स होते .या पिलर्स मधून प्रेसमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या .सात आठ पायऱ्या उतरल्यानंतर छप्पर नसलेल्या चारी बाजूला पडीक भिंती असलेल्या ,उघड्या बोडक्या विटा ढासळलेल्या दिसत होत्या . भयाण अशा माळरान असलेल्या खंडहरात आम्ही कधी प्रवेश केला ते मला कळलेच नाही .
प्रेस किधर है ?
असा प्रश्न विचारताच तो माणूस आमच्याकडेच आश्चर्याने पाहू लागला . आणि सहजपणे म्हणाला "यही तो यह प्रेस की जगा "
आता मात्र सर्वजन चकित झालो . सर्व भिंती पूर्णपणे ढासळलेल्या होत्या , खिडक्यांचे ग्रील ,काचा ,दरवाजे , पत्रे पळवून नेले होते . सागवानी लाकडाच्या फक्त वाळवी लागलेल्या भग्न चौकटी फक्त राहिलेल्या होत्या . सगळीकडे भिंत पडून विटांचे ,दगडांचे अवशेष अस्ताव्यस्तपणे ढिगारे सगळीकडे पसरलेले होते त्यावर गवत माजलेले व झाडे वाढलेली होती . वाढलेल्या व वाळलेल्या गवतामुळे हे बेचिराख उघडेनागडे उध्वस्त साम्राज्य अजूनच भेसूर आणि भयाण दिसत होते .रविवर्माची सुबक दगडांनी बांधलेली विहीर पाहिल्यानंतर त्यामध्ये शेवाळ्याचे थर साचलेले दिसून येत होते . विहिरीच्या शेजारीच दोन मोठी वडाची झाडे उभी होती त्या वडाच्या झाडाच्या पूर्ण पारंब्या खालील विहिरीच्या तळापर्यंत पोहोचलेल्या होत्या . एकंदरीत ती विहीर कित्येक वर्षात अशीच पडून असावी . त्या पारंब्यामुळे विहिरीचे दगड सुटू लागले होते . बाहेर रविवर्माच्या कामगारांची घरे झाडाच्या फांद्या व पानांनी भंगार अवस्थेमध्ये पडलेली दिसत होती .
इतक्यात एक वयस्कर म्हाताऱ्या बाई तेथून जाताना दिसल्या . मी हाक मारून त्यांना थांबवले व प्रेसची माहिती विचारली . कोणीतरी इतक्या प्रेमाने हात मारल्यामुळे त्या बाई थांबल्या व त्यांनी भूतकाळात रमत माहिती सांगायला सुरुवात केली .
"काय बाबा सांगू तुला आता ?
एक काळ असा होता की सगळ्या गावातील घरटी एक तरी माणूस येथे कामाला होता . सतत लगभग व प्रचंड मोठे काम चालायचे . गाड्या भरभरून छापलेल्या चित्रांचे गट्टे सगळ्या भारतभर जायचे उत्तम क्वालिटी प्रिंटिंग व्हायचे .घडीव दगडांवर कोरून ठेवलेल्या शिलालेखांवर वेगवेगळे रंग भरले जायचे .खूप तज्ञ व हुशार कामगार असायचे .ते काम पहायला राजेसाहेब मुंबईवरून मुद्दाम यायचे . काय थाट असायचा त्यांचा त्या काळात ,आता फक्त भिंतीची माती शिल्लक राहिलेली आहे .
मला त्या छपाईच्या दगडी शिला पाहायच्या होत्या त्याबद्दल विचारताच म्हातारी मोठ्याने हसली आणि म्हणाली
"सगळ्या सपाट दगडी शिळा मळवली गावच्या लोकांनी त्यांच्या
न्हाणीघरात बसवले आहेत ,अंघोळीच्या वेळी पायाच्या टाचा घासायला त्या बऱ्या पडतात " माझ्या घरी दोन आहेत तुम्हाला बघायचेच असेल तर दाखवते .
असे म्हणताच माझ्या डोळ्यातून अचानक टचकन् पाणी वाहू लागले , ते कोणाला दिसू नये म्हणून मी टॉयलेटच्या निमित्ताने बाहेर आलो . मला स्वतःला रडू आवरत नव्हते . तसा मी रडणारा माणूस नाही पण मला खूप संताप येत होता . मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होतो . ज्या रविवर्मा यांची भारतीय "चित्रकलेचा जनक " म्हणून गणना केली जात होती त्या महान चित्रकाराच्या सर्व गोष्टी नामशेष झाल्या होत्या . सरकार ,मंत्री , जिल्हाधिकारी ,खासदार ,आमदार ,स्थानिक गावकरी , पुढारी किंवा कलाप्रेमी यांना कसलीही काळजी व देणेघेणे वाईट वाटत नव्हते .
रवि वर्माचे सर्व साम्राज्य उद्ध्वस्त झालेले दिसत होते त्या बेचिराख साम्राज्याचे काही फोटो घेऊन आम्ही निराश मनाने बाहेर पडलो . गाडीतून परत निघताना अतुलने मला विचारले "पाहिला का प्रेस ? मी काहीच उत्तर दिले नाही . अतुल मात्र शांत होता कारण त्याने मोठ्ठ व्हायचं कधीच कॅन्सल केले होते . त्याचा निरोप घेऊन मी उदास मनाने परतीच्या प्रवासाला लागलो .
एकदा वाईला गंगापूरीच्या घाटाजवळ स्केचिंग करत बसलो होतो गंगापूरीच्या घाटातून महागणपती मंदिर आणि त्याचा परिसर फार सुंदर दिसतो . हे स्केच करत असताना मी स्वतःला विसरून गेलो होतो .स्केच संपत असताना मागे पाहिले असता एक दाढीधारी खादीचा कुर्ता पायजमा घातलेले खांद्यावर शबनम घेतलेली एक गृहस्थ उभे होते . त्यानां माझे चित्र आवडले होते . त्यांना मी नाव विचारल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव सांगितले .मी आपण कोठे राहता ? असे विचारले असता त्यांनी सांगितले लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्राज्ञ पाठशाळेच्या वाड्यात .मला बरेच दिवस गंगापूरीच्या शेजारी असलेला आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निवासस्थान असलेल्या प्राज्ञ पाठशाळेत आतमध्ये जायचेच होते .
वाई विश्वकोशाची ,धर्मकोशाची निर्मिती चालवणारा गाव म्हणून प्रसिद्ध आहे .त्या ठिकाणी चालणारे काम प्रचंड होते व त्यासाठी वाई सगळी कडे सुप्रसिद्ध आहे. तर्कतीर्थ यानां राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याची मला माहिती होती . मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण , राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा ,राज्यपाल आणि इतर अनेक प्रसिद्ध असे प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती याठिकाणी आल्याचेही मला माहित होते .अशा या ऋषितुल्य व्यक्तीचे निवास्थान मला पाहायचे होते आलेले ग्रहस्थ तेथेच राहत असल्यामुळे मला तेथे जाण्याचे आयती संधी उपलब्ध झाली होती .
स्केच संपल्यावर त्यांच्यासोबत मी त्या वाड्यात गेलो . वेद ,उपनिषदे , रामायण , महाभारत इत्यादी शास्त्रांवर तर्कतीर्थ अधिकारवाणीने बोलत असत .मराठी विश्वकोशाचे शिल्पकार अशी त्यांची ओळख होती थोर स्वातंत्र्यसैनिक ,साहित्यिक , समाज सुधारक , हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे ते गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती .भारत सरकारने तर्कतीर्थ यांना 1976 साली "पद्मभूषण " आणि 1992 साली " पद्मविभूषण " पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरव केलेला होता . अशा अफाट व्यक्तिमत्वाच्या घरात मी प्रवेश करत होतो .
वाड्यात प्रवेश करताना चौकटीवरच तर्कतीर्थांचे गुरु केवलानंद सरस्वती यांचे पहिले तैलरंगात पोट्रेट लावलेले होते .
दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये मात्र पूर्ण अंधारच होता .शास्त्रीजींच्या टेबलावर धुळीची पुटं चढलेली होती , त्यांच्या ऑफिस चेअर खुर्चीचा पाय तुटल्यामुळे तिरक्या अवस्थेत पडलेली होती . भिंतीवर लावलेल्या
"पद्मभूषण " पुरस्काराची लाकडी फ्रेम कोळ्यांनी केलेल्या जाळ्यांमुळे दिसतच नव्हती .सगळीकडे जाळी जळमटे यांचे साम्राज्य दिसून येत होते . कित्येक वर्ष या घरावरती साफसफाईचा प्रयत्न केलेला दिसूनही येत नव्हता .
खुर्चीवर ठेवलेला शास्त्रीजींचा फोटो खुर्चीच वाकडी झाल्यामुळे उदास झाल्यासारखा लटकत होता . घाणीच्या साम्राज्यामुळे कपाटात ठेवलेली पुस्तके धुळीने माखून खराब झालेली दिसून येत होती . काही पुस्तके तर जमिनीवर पडलेली होती . टेबलावरच्या कार्पेटचा रंग कधीच उडालेला होता .त्या टेबलावरती कित्येक वस्तू तशाच धूळ खात असताना विद्रूप पद्धतीने पडलेल्या दिसून येत होत्या .
आतल्या खोलीत अनेक पुस्तके , जाडजूड ग्रंथ ,पेपरची रद्दी हँडमेड पेपरचे गठ्ठे , प्रिंटिंग केलेली पुस्तके गोडाउनमध्ये फेकून दिलेल्या अवस्थेत पडलेली होती . त्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर मी गेलो तर माझे हात व कपडे धुळीमूळे माखले होते .मोडकळीस आलेल्या दरवाजाच्या चौकटी ,सागवानी पिलर्स कधीही पडतील अशा अवस्थेत पडलेली होती . उघड्या खिडक्यांमधून कबुतरांनी येऊन घरटे बनवलेली होती .त्या कबुतरांच्या विष्टा सगळीकडे पडलेल्या होत्या त्याचा उग्र वास येत होता ,त्यातून मला चालणेही अशक्य झाले होते .वरच्या छताची कितीतरी कौले तुटून पडून पावसाचे पाणी आत येत होते .
शुद्धीसर्वस्वम (1934 ),आनंदमीमांसा (1938 ) , हिंदू धर्माची समीक्षा (1941) , जडवाद (1941) ,ज्योती निबंध (1947 ) ,
वैदिक संस्कृतीचा विकास (1951 ), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (1973) , राजवाडे लेखसंग्रह (1964) ,
लोकमान्य टिळक लेखसंग्रह (1969) ही त्यांची ग्रंथसंपदा आहे .अशा या ज्ञानविज्ञान याचा प्रचंड व्यासंग , स्पष्ट आणि निस्पृह विचारांच्या महात्म्याच्या निवासस्थानाची अवस्था पाहून मी दुःखी आणि व्यथित झालो . मोठ्ठी माणसं त्यांच्या कर्तृत्वाने मोठ्ठी होतात . प्रचंड कष्ट घेत असतात . मोठ्ठी माणसं ही मोठ्ठीच असतात पण ते गेल्यावर सगळे मोठ्ठेपण वाहून जाते. जिवंत असतात त्यावेळी त्यांचा रुबाब वेगळाच असतो परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मी पाहिलेली हे धूळधाण माझ्या मनाला अंत:करण चिरून जाणारी ठरली .
सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या या महाआत्म्यांची दशा पाहून आता माझ्या मनाने ठाम निर्णय घेऊन मोठं व्हायचं कॅन्सल केले आहे . आता मला मोठ्ठ होण्याची स्वप्नेच पडत नाहीत .मोठं होण्याचा आटापिटा तर मी कधीच सोडून दिला आहे .पूर्वी मला अशी मोठे होण्याचे स्वप्न नीट झोपू द्यायची नाहीत , सारखं वाटायचं आपली स्वप्नं पूर्ण करायची आहेत आपला ध्यास पूर्ण करायचा आहे मग मी रात्रभर चित्र काढायचो , दिवसा उशिरा उठायचो जगरहाटी पेक्षा वेगळे जगायचो . खूप भटकायचो .खूप मोठ्या चित्रकारांना भेटायचो आता मी कोणालाही भेटत नाही आता मी शांत असतो .
आता कधी कधी वाटतं राजा रविवर्माचे , तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे खरोखर चुकलेच . त्यांनी आपण गेल्यानंतर आपल्या वास्तुंचे योग्य नीट थडगे बांधले नाही .
शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे हे अरुण दाते यांचं गाणं मला पुन्हा पुन्हा आठवत राहते .
मी मात्र ही चूक करणार नाही मी आणि स्वाती आमची आर्ट गॅलरी स्वतःच बनवणार आहोत
लवकरच दोन पुतळे बनवायचे ऑर्डर द्यायची आहे हे पुतळे झाल्यानंतर गॅलरी पाहिल्यानंतर परत जाताना प्रत्येकाला थांबता आले पाहिजे .
अजुनही चित्रांचे कलादालन तयार करण्याची इच्छा मनात आहेच त्यासाठी केलेले प्रयत्न मला सतत आठवतात . गेली पंचवीस वर्ष मी कोणाकोणाला भेटलो याचीही मला तोंडपाठ माहिती आहे .मुख्यमंत्री मनोहर जोशी , उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे , गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर , सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर , आमदार सदाशिव सपकाळ ,पाचगणी गावचे अनेक आजीमाजी नगराध्यक्ष , साताऱ्याचे आमदार , खासदार हे सर्वांना भेटून झाल्यानंतर हे लक्षात आले की राजकारण्यांकडून अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही त्यांच्याकडून नेहमी उपेक्षा होणार . मग आम्हीच आमची गॅलरी स्वकष्टातून का निर्माण करू नये ? असा विचार करून गेली पंचवीस वर्षापासून माझा थोडा थोडा कणाकणाने प्रयत्न चालूच आहे.
जेव्हा कधी ही निसर्ग आर्ट गॅलरी तयार होईल त्यावेळी तुम्ही देखील जरूर भेट द्या .कदाचित गॅलरी नाही झाली तर तेथे असलेल्या दोन पुतळ्याजवळ सर्व जण जरूर थांबा .
त्यातील डावीकडच्या पुतळ्याजवळ तेथे वाढवलेली ताजी फुले वहा त्या स्वातीच्या पुतळ्याखाली लिहिलेले असेल या चित्रकर्तीने तिने तिच्या मुलीच्या स्मरणार्थ आयुष्यभर फुलांची असंख्य चित्रे काढली . आणि दुसऱ्या पुतळ्याजवळ तेथे पडलेली थोड़ी मूठभर माती टाका . त्यावर लिहिलेले असेल या चित्रकाराने मोठे व्हायचा खूप प्रयत्न केला होता पण नंतर त्याने मोठं व्हायचेच कॅन्सल केले होते . . . . .
तर अशी आहे माझी मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केली त्याची गोष्ट.
SUNIL KALE
9423966486
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
आता मला मोठं व्हायचं नाही तर मोठं होण्यापेक्षा छोटे राहण्यात मला जास्त मजा वाटू लागली आहे कारण मी मनापासून मोठे व्हायचं कॅन्सल केले आहे.
ही गोष्ट आमचे मित्र चिन्हचे संपादक श्री .सतिश नाईक यानां वारंवार सांगितली पण ते चिकट , चिवट, व ताकदीचे अभ्यासू पत्रकार . त्यांनी चित्रकारांच्या साठी ' चिन्ह ' नावाचे दिवाळी अंक काढले होते काही महत्वाची चित्रकारांच्या जीवनावर पुस्तके प्रकाशित केली आहेत .आजही ती अनेकांचे प्रेरणास्थान आहेत . सतिश नाईक या माणसाकडे अफाट पेशन्स व घेतलेले कार्य संपूर्ण गोष्टींनी पूर्ण करायची जिद्द आहे ,ध्यास आहे . त्यांच्या या धडपडीचा मी स्वतः आता अनुभव घेतोय . त्यांच्या कार्याला खरोखर मनापासून सलाम . महाराष्टातील आमच्यासारखे खेड्यापाड्यातील छोट्या ग्रामीण भागातून वर येणाऱ्या चित्रकारांसाठी सतिश नाईक हे नाव कायम स्मरणात आहे व यापुढेही राहील .मला त्यांनी सांगितले तुमच्याकडे अशा जीवनात अनुभवलेल्या गोष्टींचा खूप मोठा खजिना आहे तो कदाचित नवीन उदयोन्मुख चित्रकारानां उपयोगी पडेल . त्यानां प्रेरणा मिळेल , नवा मार्ग मिळेल. तुम्ही नकार देऊ नका..तुम्ही चिन्हच्या ग्रूपवर गप्पा मारायला यायलाच पाहीजे . चिन्हचे आमच्या सारख्या सर्वच छोट्या जणांची जडणघडण होताना सर्वच चित्रकार जमातीवर अनंत उपकार आहेत . त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन मी नकार देऊ शकलो नाही .
आपण सर्वजण गप्पांमध्ये सामील होऊ या!
शनिवार दि. 19 DEC. संध्याकाळी पाच वाजता .
जरूर वेळ काढा व आठवणीने जॉईन व्हा !
सोबत लिंक पाठवतोय .
https://www.facebook.com/chinha.Satishnaik/live/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा