डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
" पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आहे .कारण पुण्यात फार पूर्वीपासूनच काहीही उणे नव्हते आणि आताही नाही आणि यापुढेही असणार नाही . कारण अनेक अभ्यासू, कार्यप्रवीण , व्यासंगी ,बहुआयामी व चतुरस्त्र , अफाट व्यक्तिमत्वे असलेली मंडळी त्यावेळी पुण्यात होती आतादेखील आहेत आणि यापुढेही असणार आहेत . या पुण्यानंतर नंबर लागतो तो बहुतेक वाईचा . कारण वाईला अशा अद्भूत व्यक्तिमत्वांचा खूप भरणा आहे याचा मला हळूहळू शोध लागतो आहे . आज अशाच एका व्यासंगी , बहुआयामी व्यक्तिमत्वाची महती सांगतो .
१८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश साम्राज्याने भारतावर चांगली पकड बसवली . बऱ्यापैकी स्थिरता आल्यामूळे त्यांनी अनेक हिलस्टेशने नवी शहरे ,गावे विकसित केली . अनेक नव्या प्रशासकीय इमारती , शाळा , कॉलेज निर्माण करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला . पाचगणीची हवा व आरोग्यपूर्ण वातावरण याचा अभ्यास करून 1895 साली सेंट जोसेफ शाळा टेबललँडच्या पायथ्याशी बांधली . ती पाचगणीतील पहिली शाळा . त्यानंतर 1898 साली किमिन्स व 1904 साली सेंट पीटर्स या शाळा सुरु केल्या . धर्मप्रसार व त्यासाठी अनुकूल ख्रिश्चन संस्कृती वातावरण निर्माण करण्यासाठी दोन चर्चेस बांधली आणि मग इंग्रजी शाळेत जाणे एक प्रतिष्ठेची बाब ठरली .
अशा प्रतिकूल वातावरणात कृष्णराव पंडीत व रावसाहेब पंडीत या बंधूनी आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी हिंदू स्कूल निर्माण केले . पुढे त्याचे नाव संजीवन झाले . या संजीवन शाळेचे पूर्वीचे वैशिष्ठ्य म्हणजे ते रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनच्या धर्तीवर आधारीत होते . इंग्रजी माध्यामांबरोबर सातवीनंतर दहावीपर्यंत स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमातून 8 वी ते 10वी पर्यंत वर्ग सुरु केले होते . अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी चाचणी परिक्षा द्यावी लागायची . मी व माझे तीन मित्र त्या परिक्षेत उतीर्ण झालो व शाळेत जाऊ लागलो .
संजीवन शाळेचे लोकेशन व शाळेचे एकंदर वातावरण फार मनमोहक होते . पाचगणी क्लबच्या रस्त्यावरून डावीकडे वळलो की ब्रिटीशांची शाळा लागायची व त्यानंतर त्यांचे हॉस्पीटल व लॉरेन्स व्हिला बंगला या दोघांमधून संजीवनचा रस्ता लागायचा . शाळेच्या या रस्त्यावरून चालत खाली उताराच्या रस्त्याला लागलो की डाव्या बाजूला छोटे छोटे दुपाकी पत्र्याची गावकडची घरे असल्यासारखी शाळेचे वर्ग असायचे . सभोवताली भरपूर हिरवीगार वनश्री व लाल दगडांच्या भिंती व थोड्या पायऱ्या चढून गेले की मराठी माध्यमाचे वर्ग असायचे .
इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी वेगवेगळ्या इमारती असल्या तरी सर्वांच्या प्रार्थना मात्र एकत्र व्हायच्या . त्यावेळी राष्ट्रगीत व वेगवेगळी गाणी एकत्र म्हणायचो त्याची एक छोटी पुस्तिका छापलेली आजही जपून ठेवलेली आहे .
या शाळेत चित्रकला , संगीत शिक्षक असायचे . शाळेत उत्तम भव्य वाचनालय होते . तेथे जानकीताई पंडीत असायच्या तेथे शांतपणे पुस्तके वाचणे एक सुंदर अनुभव असायचा . तेथे सतत वाचन करणारी विद्यार्थीमंडळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उतुंग पदावर पोहचलेली आहेत , कलाक्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात भरारी मारून नाव कमावलेली देश विदेशातील ही मंडळी अजूनही पाचगणीचे शाळेचे दिवस विसरलेली नाहीत .
संजीवनशाळेत फक्त पुस्तकी शिक्षणच नाहीतर अनेक कलागुणांचा विकास व्हावा, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या येथील विद्यार्थी परिपूर्ण व्हावीत म्हणून भर दिला जायचा . माझ्या1982 च्या दहावीच्या बॅचमध्ये संगीतकार ललीतराज पंडीत , अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले नीरज हातेकर होते . अशा प्रत्येक बॅचमध्ये अनेक उत्तम विद्यार्थी शाळेने घडवले . 1922 साली शाळेने शताब्दी महोत्सव साजरा केला . अशा शाळेत आमच्या अगोदरच्या बॅचमध्ये शंतनू अभ्यंकर होता . तो मूळचा वाईचा पण 5 वी नंतर मराठी माध्यमातून डायरेक्ट इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी संजीवनला बोर्डिंग शाळेत आला . बोर्डींग स्कूलमध्ये राहणारे विद्यार्थी तेथेच राहत असल्यामुळे शिक्षणाबरोबरच अनेक गोष्टींमध्ये पारंगत होतात . नाटक , कविसंमेलन , वाचन , वक्तृत्व , खेळांचे विविध प्रकार त्यानां अनुभवता येतात .काहीजण त्यांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात व त्याविषयांवर कमांड मिळवतात . अर्थात स्वतःची एक मूलभूत हुशारी अशा मुलांमध्ये असेल तर शाळेत या हिऱ्यानां पैलू पाडले जातात.
डॉक्टर शंतनू अभ्यंकर त्यापैकी एक चमकणारा हिरा.
दहा वर्षांपूर्वी मी पाचगणीतून कायमस्वरूपी वाईजवळ राहायला आलो . वाचनाची आवड असल्याने लोकमान्य टिळक वाचनालयाचा सदस्य झालो . तेथे अनिल जोशी सर , भालचंद्र मोने , प्रा .सदाशिव फडणीस , डॉ .राजेन्द्र प्रभूणे , श्री . मधू नेने, लक्ष्मीकांत रांजणे , ॲड .उमेश सणस व इतर अनेक जणाच्यां ओळखी झाल्या . वाचनालयातर्फे भरणाऱ्या वसंत व्याख्यानमाला व इतर अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याचदा जावू लागलो . त्यावेळी या मंडळीचा अगदी जवळून जीवनक्रम पाहता आला आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे , व्यासंगामुळे , बहुआयामी गुणांमुळे व विविध क्षेत्रातील कामाचा झपाटा पाहून मी खूपच प्रभावित झालो .
यावर्षी डॉ. शंतनू अभ्यंकर हे लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाले आहेत . अध्यक्ष झाल्यानंतर ग्रंथालयात अनेक उपक्रम व सुधारणांचा त्यांनी झपाटा लावला आहे . ग्रंथालयाचे रुपडे नव्या संचालक मंडळीनी बदलून टाकले आहे . नुकतेच पार पाडलेले वाई पंचक्रोशी साहित्य संमेलन योग्य व सुंदर नियोजनाच्या अनेक गोष्टींमुळे सर्वांच्या लक्षात राहीले आहे .
शिकत असताना मी चित्रकार प्रताप मुळीकांच्या स्टुडीओत अमर चित्रकथेच्या कॉमिक्सचे लेटरींग करायला जायचो . कॉमिक्स मध्ये राम ,लक्ष्मण , कृष्ण , इन्स्पेक्टर विक्रम , अशी पात्रे असायची . त्यासाठी जे मॉडेल असेल ते शंतनू सारखे असावे . प्रसन्न हसरा चेहरा , उंच , गोरा रंग व भुरुभरु वाऱ्याने उडणारे केस डाव्या हाताने सतत सरळ ठेवणारे डॉ .शंतनू मला एखाद्या चित्रपट अभिनेत्यासारखे किंवा कॉमिक्सचे मॉडेल वाटतात . त्यांचा एखादा कार्यक्रम सुरु असेल तर मी पुढे बसायचो व असंख्य फोटो काढायचो . त्यातील काही फोटो त्यांनां पाठवायचो मग ते आवडल्याचा इमोजी हमखास पाठवतातच .
डॉ. शंतनूचे लेख वाचायला लागलो की माझे डोक्यावरचे केस उभे राहतात व भूवया विस्फरतात . त्यांची लेखनशैली व डॉक्टरी ज्ञानाची सुसंगत अभ्यासपूर्वक मांडणी वाचून वाचक तोडांत बोटे घालतो . डॉक्टर ब्लॉग लिहतात , भाषणे देतात , अनेक वैद्यकीय कॉन्फरसला , अनेक वसंत व्याखानमाला , शारदीय व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावतात . ते उत्तम लिहतात , कविता करतात, उत्स्फूर्तपणे भरपूर भ्रमंती करतात , रसाळ वाणीने श्रोत्यांनां तृप्त करतात . अनेक अवजड न समजणाऱ्या पुस्तकांचे सहज सोप्या शब्दात भाषांतर करतात . ते उत्तम भाषांतरकार तर आहेत पण उत्तम लेखकही आहेत .
मला शास्त्रज्ञ व्हायचयं , पाळी मिळी गुपचिळी ,आरोग्यवती भव , फादर टेरेसा आणि इतर वल्ली, बायकांत पुरुष लांबोडा, रिचर्ड डॉकिन्स जादूई वास्तव , आधुनिक वैद्यकीची शोधगाथा ,इ दहा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे . लोकमत , महाअनुभव , दिव्यमराठी या मासिकांमधून व वर्तमानपत्रात नियमित लेख लिहत असतात . दिवाळी अंकात तर त्यांचे लेख येतातच .
एवढे मोठे लेख वाचताना ते कधी लिहित असतील या विचारांनीच मी भारावून जातो . शेवटी एकदा मी मुद्दाम त्यांच्या मॉडर्न हॉस्पीटलला व्हीजीट दिली तर कॉरीडॉरमध्ये पेशंटच्या बाहेर रांगा लागल्या होत्या . तर हे डॉक्टर महाशय दोन पेशंटच्या तपासणी दरम्यान जो थोडासा वेळ मिळतो त्यावेळी दोनचार ओळी टाईप करून परत हसतमुखाने दुसऱ्या पेशंटबरोबर बोलत असतात . या त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा मला आचंबा वाटतो कारण मला शांतता असेल तरच काही लेखन किंवा चित्र निर्माण करता येते . अशा गप्पा मारता मारता लेखाची कंटिन्यूटी ठेवणे मला तर जमणारच नाही त्यामुळे ते प्रकरण लई भारी काम वाटते . इंपॉसिबल वाटते .
डॉक्टर होमियोपॅथीचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते . त्याचवेळी बी.जे मेडीकलमध्ये MBBS करत होते . नंतर MD झाले . प्रसुतिशास्त्र व स्त्रीआरोग्य शिक्षणसाक्षरता करणे त्यांचा आवडीचा विषय आहे . विज्ञान परिषदेचे पहिले सचीव , राष्ट्रीय स्त्री आरोग्य संघटनेचे ते ॲक्टीव्ह मेंबर आहेत .
उत्तम भाषांतरकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत . माझ्या प्रदर्शनाच्या ब्रोशरचा लेख इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभूत्व असल्याने सुंदरित्या करून दिले . ते वाईत राहत असल्याने अनेक वक्त्यांची भाषणे त्यांनी ऐकली असावीत त्यामुळे ते उत्तम वक्ता आहेत . अनेक इंग्रजी शब्दानां त्यांनी मराठीत नवी नावे निर्माण केली आहेत . डॉक्टर उत्तम मुलाखतकार आहेत . कोणत्याही व्यक्तीचा कोणताही विषय असो त्या विषयात ते सहज प्रवेश करतात .अनेकानां बोलते करण्याची कसोटी त्यांच्याकडे आहे .
राधिकासांत्वनम नावाचा मूळ तेलगू भाषेतील इंग्रजी ग्रंथ स्वतः भाषांतरीत करून त्यांची पत्नी रुपाली अभ्यंकर यांचेबरोबर अभिवाचनाचा त्यांचा कार्यक्रम पाहून ऐकून मी थक्क झालो . त्यावेळी कळते हे दोघे प्रसिद्ध डॉक्टर तर आहेत पण भारी ॲक्टरही आहेत .त्यांचे सादरीकरण ते पुणे , मिरज , नाशिक , मुंबई इ .अनेक शहरांमध्ये करत असतात . त्या कार्यक्रमाला त्यानां रसिकांची खूप पसंति, वाहवा मिळते .
मध्यंतरी लक्ष्मीकांत रांजणे व त्यांचा एका कथाकथनाचा कार्यक्रम होता . डॉक्टर त्यांची स्वलिखित कथा अशी सहज सांगत होते की माणसाचे लक्ष खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्याच्यांकडे आहे हे जाणवते . संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे त्यांचे शब्दप्रभूत्व असामान्य आहे . ते शंतनू ऊवाच नावाचा ब्लॉग लिहतात पंचाहत्तर हजारांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स आहेत . त्यांचा हा कामाचा आवाका पाहून आपण चित्रकाराचे रिटायर्ड लाईफ फारच आळशीपणाने जगतोय याची मला सतत जाणीव होत राहते . मला अनेक गोष्टींचा कंटाळा तर लगेच येतो पण डॉक्टर मात्र वेगळेच आहेत .
विश्वकोश , प्राज्ञपाठशाळा , डॉक्टरांच्या मेडीकल असो. व इतर अनेक संस्थामध्ये ते कार्यरत असतात शिवाय संपूर्ण कुटूंबातील सर्व सदस्यानां संभाळून ते आता आजोबांचीही भुमिका उत्तमपणे सांभाळत असतात .
मध्यंतरी करोनाच्या काळात मी करोनाग्रस्त झालो व पायाच्या अपघातातही सापडलो मला कम्पलसरी बेडरेस्ट होती . त्यावेळी कळाले डॉक्टर फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे आजारी आहेत . त्या आजाराच्या गोष्टींचा भलामोठा लेख त्यांनी लिहला होता . तो वाचून मानवी जीवन किती साधारण व अनिश्चित आहे हे लक्षात आले . डोळ्यात पाणी आले व हृदय गलबलून गेले . मग डोळ्यांपुढे डॉक्टरांचा हसरा चेहरा सतत नेहमी दिसू लागला . डॉक्टर पण जिद्दी माणूस . आपल्या आजाराचा बाऊ न करता आपल्या कामात त्यांनी झोकून दिले . त्यांची केमोथेरपी व इतर उपचार यांचा कोणाला थांगपत्ता न लागून देता अनेक लेख , कविता , व्याखाने भाषांतरे यामध्ये ते सतत मग्न राहत असतात .
आमच्या येण्याजाण्याच्या मेणवलीच्या रस्त्यावरून वॉकिंग करताना डॉक्टर तीनचारवेळा दिसले व आजारावर त्यांनी नियंत्रण मिळवल्याचे दिसले .
मी सातारा जिल्ह्यात प्रदर्शन करतच नाही कारण तेथे प्रदर्शनाचा सुसज्ज हॉलच नसतो . चित्र टांगण्याची , भिंतीचा रंग , प्रकाशयोजना नसतेच . मग चित्र लावणार कशी ? अशा अनेक तक्रारी व कारणे सांगून मी प्रदर्शन टाळतो .
एक दिवस लायब्ररीत पुस्तक बदलण्यासाठी गेलो होतो तर महावीर जंयतीची सुट्टी होती . मग ऑफिसमध्ये गेलो तर अमित वाडकर , तनुजा इनामदार , राजेश भोज (सर) व तोंडाला मास्क बांधून अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर हे सगळेजण वक्ता कोण असणार ? प्रस्तावना कोण देणार ? अध्यक्ष कोण होणार ? समारोपाच्या शेवटी आभारप्रदर्शन कोण करणार ? असे एकूण एकवीस दिवसांचे नियोजन व फोनाफोनी करत बसले होते . ते पाहून मला डॉक्टरांचे पुन्हा कौतूक वाटले . त्यांनी मला चित्रप्रदर्शनासाठी पुन्हा विचारले , मग मी नाही म्हणू शकलो नाही . काय सांगावे कदाचित वाईत प्रदर्शन करायचेच राहून जाईल असे वाटले . त्यादिवशी डॉक्टर मला आनंद चित्रपटातील राजेश खन्नासारखे वाटले . जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जिसे न आप बदल सकते है न मै . हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है, जिनकी डोर उपर वाले के उंगलियो में बंधी है । कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता ।
जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नही .
डॉक्टर असून स्वतः पेशंट असूनही ते वाईच्या लायब्ररीच्या कामासाठी , वसंत व्याख्यानमाला सुंदर व्हावी म्हणून इतकी मेहनत करतात तर आपणही वाईकरांसाठी एक छान प्रदर्शन का करू नये ? हे ठरवून मी लगेच कामाला लागलो .
तर अशा या व्यासंगी डॉक्टर शंतनू अभ्यंकर या आमच्या संजीवनच्या तालीमेत तयार झालेल्या शाळेकरी मित्राच्या आग्रहामुळे व अनेक वाईकरांच्या प्रेमळ विनंतीमुळे यावर्षी वाईत प्रदर्शन करणार आहे .
खरं सांगायचे तर अजून पूर्ण डॉक्टर मलाच समजले नाहीत कारण ते व्यक्तिमत्व बहुआयामी व समजण्यापलीकडचे आहे . त्यांच्या या बहुगुण संपन्न व्यक्तीमत्वामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीचा मेळा त्यांच्याकडे नेहमी असतो अशा सर्व मित्रां तर्फे या डॉक्टर मित्राला उत्तम निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच विधात्याकडे मागणी करतो व थांबतो .
थोडक्यात सांगायचे तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे व्यक्तीमत्व सर्व वाईकरांनां आवडणारे असे
" वाईभूषण "
बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
सोबत प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका सोबत आहेच .
यावर्षी १०८ वर्ष पूर्ण करणाऱ्या वसंत व्याखानमालेत अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत त्याचीही कार्यक्रमपत्रिका सोबत पाठवत आहे .
सर्वांनी जरूर या !
सर्वांनां सप्रेम निमंत्रण🙏
चित्रकार सुनील व स्वाती काळे यांचे
" व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स "
पाचगणी , वाई , महाबळेश्वर येथील निसर्गसंपन्न परिसरातील जलरंग व तैलरंगातील निसर्गचित्रांचे चित्रप्रदर्शन .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लोकमान्य टिळक वाचनालय
वाई .४१२८०३
प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहूणे श्री . विश्वास पाटील , श्री .अनिल जोशी व डॉ. शंतनू अभ्यंकर व संचालक मंडळ टिळक लायब्ररी यांच्या उपस्थितीत १ मे रोजी संध्याकाळी करण्याचे ठरवले आहे . तुम्ही देखील उपस्थितीत राहावे यासाठी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रदर्शनाची वेळ : रोज सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत .
दिनांक : १ ते २१ मे २०२४ पर्यंत
प्रवेशमुल्य नाही . 🙏सर्वांनां मुक्त प्रवेश🙏
✍️सुनील काळे (चित्रकार)