गिर्यारोहक - जितेन्द्र गवारे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारांचा , वेगळ्या शारीरीक , आर्थिक , मानसिक विचारधारेंनी भारावून गेलेला असतो . आपल्याला जी जीवनशैली आवडेल तशीच दुसऱ्यांची असेल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही . समान व्यसन , समान आवडी असलेल्यांची मैत्री त्यामुळेच जुळते जेव्हा विचारांची बैठक सारखी असते .
माझे मूळ गाव वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडववाडी किंवा पांडेवाडी . दरवर्षी गावातून वर डोंगरावर पांडवगडावर पांडवजाईदेवीची पालखी जाते . कित्येक वर्ष फक्त मनातूनच गडावर गेलो. प्रत्यक्ष शरीर घेऊन जाणे आता तर स्वप्नच झाले कारण पायाचे झालेल्या ऑपरेशनमुळे डोंगर चढणे आता जमत नाही . मी पाचगणी महाबळेश्वरमधून जशी चित्रनिर्मिती केली तशी एकटे जाऊन ट्रेकिंग करून गडावर चित्रकलेचे सामान घेऊन जाणे शक्य नसते . ट्रेकिंग करून गड सर करणारे . हिमालयात जाऊन बर्फात , थंडीत अनेक किलोंचे सामान पाठीवर घेऊन कांचनगंगा व इतर गिरिशिखरे चढाई करून सर करण्यासाठी जी अलौकीक जिद्द लागते त्यानां तर मी चक्क साष्टांग नमस्कारच करतो .
आता रिटायर्डमेंटच्या काळात मी पांडवगडाच्या पायथ्याशी राहतोय . माझ्या सर्व खिडक्यांमधून पांडवगडाचे दर्शन होते . त्या उंच डोंगरावर पूर्वी अज्ञातवासात पांडव रहात होते अशी आख्यायिका आहे . त्या गडावर पाचगणीचा एक पारशी शेर वाडीया नावाचा माणूस कित्येक वर्ष रहात होता . पाचगणीच्या संजीवन शाळेच्या समोर जकात नाक्याशेजारी असलेली रोडटच महागडी प्रॉपर्टी विकून हा गडी एकटा पांडवगडावर राहायचा . त्याने तेथे एक छोटे घर बांधले होते . सोबत एकदोन कुत्री घेऊन हा पारशी दिवसभर त्या गडाच्या परिसरात वरून दिसणारे निसर्गसौंदर्य पहात राहायचा . असा कित्येक वर्ष तेथे रहात होता . लाईट नाही , जनरेटर नाही , मोबाईल , टिव्ही नाही , बाजार वस्तू घेण्यासाठी वाईला जायचे तर डोंगर उतरावा लागायचा . नंतर परत प्रवास करून सर्व सामान डोंगरावर चढवायचे . सोबत माणूस नाही असे एकटे राहणाऱ्या शेर वाडीयाविषयी मला खूप खूप उत्सुकता असायची . असे एकट्याने डोंगरमाथ्यावर राहणे साधे सोपे काम नसते . डोक्यावर एक फूट लांबीचे सरळ मोकळे केस , त्या केसांवर वाऱ्याने उडू नयेत,अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून एक काळी पट्टी बांधलेली असायची , खूर्टी बुल्गानीन दाढी , आत बसलेली गालफडे , गोरा रंग व साडे सहा फूट उंच किडकिडीत शरीरयष्टी , नेहमी इनशर्ट करायचा व एक जाड चामड्याचा पट्टा पँटला बांधायचा . त्यात नेलकटर , छोटा चाकू ,किल्ली यासारखी दोनतीन अवजारे असायची . त्याचा खूप उंच असा काळ्या रंगाचा हंटरशूज पाहीला की मला जणू इंग्रजी चित्रपटाचा नायक चालत आहे असे वाटायचे . त्याच्या रेसर सायकलची शीट दीड फूट उंच असायची त्याच्यासारखीच विचित्र दिसायची . वाईत किंवा पाचगणीला तो फिरत असला की सगळे त्याच्याकडे बघत राहायचे . सेंट पीटर्समध्ये शिकला होता तरी मराठी बोलायचा त्यामुळे सगळ्यांशी त्याची ओळख होती . असा हा शेर वाडीया सर्व जगाशी सबंध तोडून पांडवगडावर का रहात होता ? काय जीवनाचे रहस्य शोधत होता ? हे आता विचारायचेच राहीले .
एक दिवस वाईला टिळक लायब्ररीत जितेन्द्र गवारे यांचा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव व स्लाईडशो असा कार्यक्रम आयोजित केला होता . मी त्यांचे अनुभव ऐकून एका वेगळ्याच जगात पोहचलो होतो . हिमालयात गिर्यारोहण करणे हे एक वेडे धाडस आहे . महाराष्ट्रातील वातावरण व हिमालयाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगाचे वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक आहे . त्यासाठी बर्फात राहण्याचे सामान व ऑक्सीजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन हातात काठी , जाड प्लास्टीकचे शरीर पूर्ण झाकणारे कपडे घालून प्रत्यक्ष हिमवर्षावात चढाई करताना बर्फाचे डोंगर , लँडस्लायडींग , वारा , वादळ , अनोळख्या अडचणींच्या विश्वात डोंगर चढत गिरिभ्रमण करणे हे सोपे काम नसते .
प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी जवळपास वीस पंचवीस लाखांची तरदूत करावी लागते . जाण्या येण्यासाठी रेल्वे , विमान कंपनीचे तिकीट बुक करून ठेवावे लागते . श्वास वाढवणे व श्वास रोखून धरण्यासाठी शास्त्रशुद्ध सराव करावा लागतो , त्यासाठी शारीरिक व्यायाम , पळणे ,चालणे, योगाचा अभ्यास व मनाची संतुलीत अवस्था टिकवून ठेवण्याचे तंत्र शिकावे लागते . सततचा सराव करावा लागतो . विपरीत परिस्थिती येणार आहे याची जाणीव ठेऊन शरीरसंपदा चपळ ठेवावी लागते . वजन वाढू नये सतत साथ द्यायला तयार शरीर तंदुरुस्त असावे म्हणून सातत्याने जिममध्ये व्यायाम करावा लागतो . ज्याठिकाणी जायचे आहे त्या गिरिशिखरांचा नकाशा घेऊन भौगोलीक रचना व इतिहास समजून घ्यावा लागतो . निळ्या ट्रॅकसूटमध्ये तंदुरुस्त जितेन्द्र गवारे त्यांचे हिमालयातील फोटोंचा स्लाईड शो वाईमध्ये दाखवत असताना सगळे प्रेक्षक थंडगार झाले होते , अचंबित झाले होते. प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की हे सगळे उपदव्याप करून स्वतःच्या प्रिय कुटुंबापासून एक दोन महिना दूर राहून आर्थिक भूर्दंड सहन करून यानां काय मिळवायचे असते ? कशाला जीव धोक्यात घालून अडचणींचा सामना करत बसायच ?
शेवटी जितेन्द्र गवारे यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावेत असे वाक्य ऐकताच माझा हात पटकन वर गेला .
जिवाची पर्वा न करता , प्राणप्रिय कुटूंबातील सदस्यानां दूर ठेऊन , पंचवीस लाखांची आर्थिक झळ सोसून , एवढा शारीरिक व्यायामाचा त्रास सोसून जेव्हा तुम्ही हिमालयात जाता त्याऐवजी ते पैसे बँकेत मुदतठेव ठेऊन दर महिना व्याज मोजत बसण्या ऐवजी,निवांत सकाळी जरा उशीरा उठून , रिस्क न घेणारे साधे सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगायला तुम्हाला आवडत नाही का ? आणि तुम्ही अशा सफरींसाठी जाता त्यावेळी घरच्यांची अवस्था काय असते ? ते तुम्हाला अडवत नाहीत का ? माझा प्रश्न ऐकताच जितेन्द्र गवारे सहज हसत म्हणाले बसा सांगतो याची उत्तरे . आणि सगळ्यांनी कान टवकारले .
आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविस्मरणीय प्रवास असतो . काहींचे जीवन अगदी रहाटगाडग्यासारखे असते .रोजचा दिवस सारखाच उगवतो . तेच तेच रुटीन जगणे असते . जीवनात काही नवीन उत्साहाने जगण्यासाठी आव्हानच नसते . बेसूर व कंटाळवाणे तेच तेच जीवन का जगावे माणसाने ? मला माणूस म्हणून जगताना चॅलेंजिंग , बाणेदार , शुरवीरासारखे धाडसी जगावे वाटते . आपले शरीर हे आराम करण्यासाठी , खाऊन जाडजूड होऊन निवांत झोपण्यासाठी नसते . शरीराला कार्यमग्न , उर्जावान ठेवण्यासाठी मावळ्यांसारखे चपळ ठेवण्यासाठी योग्य आहार , योग्य दिनचर्या असावी असे मला वाटते . त्यासाठी दरवर्षी कोठे ना कोठे मी गिर्यारोहणाची मोहीम आखत असतो . गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे . या खेळात हिमशिखरे कधी अंगावर पडतील , आपण कधी या पर्वतशिखरांखाली गाडले जाऊ याची शाश्वती नसते . आपला हा श्वास कधी संपेल हे सांगता येत नाही . जर रोजचा दिवस जीवनातील एक साहसी खेळ म्हणून जगलो तर संपूर्ण जीवन एक उर्जेची धारा असल्यासारखे वाटेल .
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . माणूस कितीही श्रीमंत असू द्या तो कधीच समाधानी नसतो . गरीबानां श्रीमंत व्हायचे म्हणून ते धावत असतात व श्रीमंतानां अधिक श्रीमंत व्हायचे असते म्हणून ते अधिक धावपळ करतात . आणि पैसे टिकवून ठेवण्यासाठी कंजूषवृत्तीने जगताना आपल्या इच्छा मारण्यात अर्थ काय ? अधिक पैसे मिळविण्यासाठी सामान्य लोकानां फसवून टोप्या लांडीलबाडी करून दिवसरात्र पैसे कसे वाढतील या विचारांत स्वतःलाच काहीजण फसवत असतात . असे जीवन मला जगायचे नाही .
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे . मी असा आळशी, निवांत बेसूरा जगू नये म्हणून माझी पत्नी , माझे कुटूंबीय स्वतःच अशा मोहीमेमध्ये मला मदत करत असतात . शेवटी जगताना मरण कधी तरी येणारच . मग मरण पुण्यात आले काय किंवा हिमालयाच्या कुशीत आले काय ? मरण्याच्या अगोदर जिवंत जगले पाहीजे असे मला वाटते . मृत्यू त्यामुळे मित्र असल्यासारखा वाटतो. मग मित्रासोबत भिती कशाला वाटायला पाहीजे ?
आणि सर्वात शेवटी हे अगदी मनातलं सांगतो . जी माणसे सर्वसामान्य रुटीन पद्धतीने जगतात ती रुटीन पद्धतीनेच मरतात . जी माणसे असामान्य मोठ्या ध्येयाने पछाडलेली असतात ती असामान्य कर्तृत्व करतात. त्यांच्या कर्तृत्वाची दरवळ हळूहळू सगळीकडे पसरते व समाजही एक दिवस त्यांची दखल घेतोच . गिर्यारोहन क्षेत्रात जे काम मी केले त्यामुळेच तर तुम्ही मला या कार्यक्रमाला का बोलवले ना ?
प्रत्येकाच्या जीवनाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते किंवा ती वेगवेगळी असलीच पाहीजे . जितेन्द्र गवारे त्यांच्या आगळ्यावेगळ्या विचारांमूळे व धाडशी जीवनशैलीमुळे कायम लक्षात राहीले .
जितेन्द्र गवारेंचा आज वाढदिवस आहे . त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे . अनेक मोहीमा ते आयोजित करत असतात . त्याच्यां सर्व गिरिशिखरांच्या मोहीमानां खूप खूप शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
https://www.facebook.com/share/r/Nsc8DB6Par2Xyu95/?s=chYV2B&fs=e&mibextid=6AJuK9
https://www.instagram.com/reel/ChZ5rlJq-dL/?igsh=Z2V3cGRqNDBud21s
सुनील काळे✍️