पाऊस चित्रातला
पाऊस मनातला
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
निसर्ग हा अफलातून कलाकार आहे .त्याने सजवलेल्या विविध रूपांमुळे , अनोख्या जडणघडणीमुळे , अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो . कधीकधी तर त्याचे वर्णन शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही .भारत देशावर तर निसर्गाने इतकी मुक्त उधळण केली आहे की बऱ्याचदा वाटते की काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीव देखील नाही . कारण काही देशामध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात तर भारतामध्ये तीन ऋतू आहेत ते म्हणजे हिवाळा ,उन्हाळा आणि पावसाळा .
मे महिन्याच्या प्रखर तापलेल्या उन्हामध्ये खूप चालावे लागले आणि जवळपास एखादे झाड किंवा पेलाभर पाणी देखील प्यायला मिळाले नाही की उन्हामुळे गरमीमुळे माणूस अस्वस्थ होत जातो .उन्हाच्या या तप्त झळांमुळे जीवाची प्रचंड काहिली व्हायला लागल्यानंतर मग पावसाचे वेध लागू लागतात . जून महिना सुरू होऊन कधी एकदाचा पाऊस सुरू होतो व सगळीकडे गारवा पसरतो असे वाटते . अर्थात काही जणांना पाऊस खूप आवडतो तर काही जणांना जराही आवडत नाही .
पण मला मात्र पाऊस खूप आवडतो माझ्यातील चित्रकाराला पावसामुळे नव्या चित्रांच्या तयारीचे वेध लागतात .
परमेश्वराजवळ माझे न लिहून पाठवलेले असंख्य तक्रारअर्ज आहेत .पण एका गोष्टीची मी कधीही तक्रार केलेली नाही . त्यासाठी मी त्या विश्वनिर्मात्याचा खूप आभारी आहे ,आणि ते म्हणजे त्याने माझे बालपण , तरुणपण पाचगणी , महाबळेश्वर ,वाई या निसर्गाने समृद्ध असलेल्या परिसरात घडवले . आपण ज्या परिसरात वाढतो त्या देशाचा , राज्याचा , जिल्हयाचा , गावाच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आपल्यावर सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव पडतो . माझ्यावर तर या परिसरातील
निसर्गदैवतांचे अनेक उपकार आशीर्वाद आहेत आणि त्यासाठी मी माझ्या चित्रातून नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो .
लहानपणापासून पाचगणीत वाढलो . या गावाला अचंबित करणारे सपाट डोंगराचे टेबललँड नावाचे पठार देवाने उदारपणे बहाल केले आहे . आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून ते प्रसिद्ध आहे . उन्हाळ्यात या पठारावरून फेरफटका मारला की लक्षात येते पूर्वेकडचे मांढरदेवीचा डोंगर ,पांडवगड , कमळगड , नवरा-नवरीच्या डोंगरांच्या रांगा पश्चिमेकडच्या भिलार , तायघाट गावच्या परिसरात व दक्षिणेकडे राजपुरी ,खिंगर परिसरातील डोंगरात लावलेल्या वणव्यांमुळे वनश्री भकास दिसत असते . त्यातील हिरवाई पूर्णपणे नष्ट होऊन काळे कभिन्न झालेले डोंगर पाहताना संवेदनशील पर्यटकही खूप नाराज झालेले असतात . पण पावसाळ्यात मात्र येथे निसर्गाच्या चमत्काराला सुरुवात होते आणि या डोंगर परिसरातील सृष्टीसौंदर्य स्वर्गालाही लाजवणारे ठरते .
पाचगणीत महाबळेश्वरच्या मानाने खूपच कमी पाऊस पडतो . महाबळेश्वरमध्ये हे नीरस उदास व जनजीवन विस्कळीत करणारे वातावरण प्रचंड पावसामूळे सुरु होते असे हवामान मात्र पाचगणीला नसते .महाबळेश्वरला एकदा पावसाने जोर धरला की चार-पाच दिवस संततधार पावसाने खूप कंटाळा येतो . काहीजण घराला प्लास्टिक कापडाचे आवरण लावतात, काहीजणांच्या घराला गवताच्या पेंड्या बांधून केलेले संरक्षण असते तर काही इमारतींना पत्र्याची उभी पाने लावून संरक्षक तटबंदी तयार केलेली असते . त्याशिवाय घर सुरक्षित राहू शकत नाही .कारण पावसामुळे सगळ्या भिंतींना ओल पसरून घरातच थंडीचे एक कुबट वातावरण तयार होते . आता नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे व इंटरनेट , मोबाईल यांच्यामुळे निदान चांगला टाईमपास तरी होतो व थोडी करमणूक होते .पण पूर्वीच्या काळात महाबळेश्वरच्या पावसामुळे अनेकांच्या जीवाचे हाल होत असत व आजारपणामुळे ते तात्पुरते स्थलांतर ही करत असत .पाचगणीचा पाऊस आरोग्यदायी आणि उत्तम प्रकृती ठेवणारा आहे . तिन्ही ऋतूंमध्ये येथील वातावरण आल्हाददायक आहे याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी येथे मुला-मुलींच्या शाळा वसवल्या . त्यापैकी सेंट जोसेफ या शाळेने नुकतेच 126 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे .
मी मराठी शाळेतून संजीवन या मोठ्या शाळेत मराठी माध्यमातच शिकण्यासाठी गेलो .ही शाळा गावापासून जरा थोडी लांब होती .माझे मित्र घनःश्याम कारंजकर ,संजय भिलारे व विलास निंबाळकर व मी आमची एक छान पैकी चौकडी जमली होती . आम्ही सगळेजण एकत्र शाळेत जायचो . पावसाळ्यात आत्ताच्या सारखे त्यावेळी उंच फुटपाथ बांधलेले नव्हते . रस्त्याच्या बाजूला चांगली मोठी खोदलेली गटारे होती . या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही चौघेजण कागदाच्या बोटी करून सोडायचो .या बोटीच्या वेड्यावाकड्या प्रवासातील गंमत न्याहाळत आमचा शाळेमध्ये प्रवेश व्हायचा .आमच्याकडे हॉकी खेळण्यासाठी स्टिक्स नव्हत्या मग पावसाळ्यातील मोठ्या छत्र्यांच्या दांड्याने आम्ही प्लास्टिक पेपरचा गुंडाळा केलेला बॉल भर रस्त्यातच खेळत खेळत शाळेतून घरी यायचो. हॉकीची लाकडाची खरी स्टिक नाही याची आम्हाला कधीही खंत किंवा दुःख झाले नाही .
याच काळामध्ये मला बहुदा चित्रकार व्हायचे वेड लागले मी पावसाची चित्रे काढायचा प्रयत्न करायचो . खूप आटापिटा करायचो पण चित्रात खऱ्या पावसासारखे इफेक्ट यायचे नाहीत . लहान असल्याने व चित्रतत्रांची माहीती नसल्याने पावसाची चित्रे एवढी प्रभावी व्हायची नाहीत .
माझा मित्र घन:श्याम एकदा पूर्ण भिजलेल्या अवस्थेत नखशिखांत
ओलाचिंब होऊनच माझ्या घरी आला . त्याची कपडे पूर्णपणे भिजलेली होती . अस्ताव्यस्त झालेले केस , त्यावरून ओघळणारे पाणी पाहून मी त्याला चांगलेच फैलावर घेतले .कशाला असा पावसात भिजत आलास ? असे विचारले असता तो सहजपणे म्हणाला
" असा भिजलो नसतो तर कविता कशी सुचली असती ? "
मग माझ्याकडून एक कोरा कागद घेऊन त्याने पावसाची एक सुंदर अप्रतिम कविता लगेच लिहून काढली व मला म्हणाला
पावसाची चित्रे ,
पावसाची गाणी ,
पावसावरचे काव्य ,
पावसाचे लेखन असे घरात बसून निवांत करायच्या गोष्टी असतात का ?
" चित्रासाठी एकदा तरी चिंब भिजून खरा पाऊस कधी अनुभवलास का ? एकदा माझ्यासारखा नखशिखांत भिजलास की तुला खरा पाऊस कसा असतो ते कळेल . मग आम्ही दोघेही पावसात भिजलो , व्हॅलीमध्ये भरपावसात भिजत भ्रमंती केली . कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धुक्याच्या साम्राज्यात हरवून जायला शिकलो .
मग पाऊस माझा व मी पावसाचा एकमेकांचे खरे मित्र झालो.
मग भरपूर पावसाची चित्रे काढण्याचा सपाटाच लावला .
पाचगणी गाव ते वाईचा जकात नाका यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच अशी वडाची अनेक झाडे आहेत .त्या झाडांची भिजलेली , हिरवट झालेली मोठी खोडे ,त्याच्या विशाल फांद्या , रस्त्यावर चमकणारे पाणी , त्या झाडांची रस्त्यावर पडलेली प्रतिबिंबे मला आवडू लागली. हळुवार जपून चालणारे सायकलस्वार ,चौकातील लगबगीने छत्री घेऊन चालणारी माणसे , काळ्या पिवळ्या रंगातील वडापच्या जीपगाड्या ,शाळेचा रेनकोट घालून बोट धरून चालणारी छोटी छोटी मुले ,विद्यार्थी व त्यांच्यासोबतचे पालक , कधी नवनवे पर्यटक रंगविताना मजा यायची. टेबललॅन्डचे उंच पसरलेले कडे त्यामधले धुक्याचे थर , एम .आर . ए सेंटरची धुक्यातून चमकणारी इमारत , त्याच्या बाजूला असलेली सिल्वर ओक्स व इतर प्रचंड मोठ्या वृक्षांची झाडी , पावसात चमकणारे कृष्णा नदीचे पात्र ,नगरपालिकेच्या आंबेडकर उद्यानाजवळची झाडे , त्या झाडांच्या रस्त्यातून भर पावसात वेगाने पाणी उडवत जाणारी वाहने ,एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा टेम्पो , बाजारपेठांमधील छत्री घेऊन गडबडीने जाणारी माणसे ,पांगारी , तायघाट गावाजवळची व सिडनेपाईंटच्या परिसरातील कृष्णाव्हॅलीतील घरे .भाताच्या शेतीसाठी तुंबवलेली छोटी छोटी शेततळी , दरीवर ढगांचा तयार झालेला राक्षसासारखा मानवी आकार किंवा वेगवेगळे प्राण्यासारखे दिसणारे भव्य आकार चित्रातून दर्शवताना मजा यायची .आकाशात चाललेले धुके व ढगांच्या वेगवेगळ्या आकाराचा हा नयनरम्य खेळ बराच वेळा जाणीवपूर्वक निरीक्षण करताना मी तहानभूक विसरून जायचो .
महाबळेश्वरला तर धुक्याचेच साम्राज्य सगळीकडे पसरले की चित्रातही ग्रे कलरचे आकाश यायला लागायचे . एकदा मित्रासोबत एलफिस्टन पॉईंटला गेलो होतो पण आकाशात ढगांचे इतके मोठमोठे पुंजके , धुकेच धुके पसरले की जणू पृथ्वीवरच संपूर्ण आकाश उतरले की काय ? असे वाटू लागले . पुढे असणारा रस्ताही दिसेनासा होतो .
ऑर्थरसीट पॉईंटच्या दरीतून निळ्या ,जांभळ्या ढगांच्या कापसासारख्या हळुवार लाटा पाहिल्या की आपण स्वर्गातून खाली दिसणारा अनोखा जादूचा खेळ पाहतो की काय असे वाटते .केटस् पॉइंट ,लॉडविक पॉईंट ,वेण्णा लेक व इतर पाईंटचा परिसरही मला चित्र काढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरतो .
वाईला अधून-मधून जोराचा पाऊस पडतो त्यावेळी गणपती घाट , गंगापुरीचा घाट व धोम धरणाचा परिसर एका वेगळ्याच कलर स्कीममध्ये पावसाळ्यामध्ये चित्रात दाखवता येतो .
कोकणात जाताना ताम्हिणी घाटातील धबधबे , समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा , आकाशातील ढगांचे रौद्ररूप , कोळी व त्यांच्या बोटी , त्या बोटींवरचे वेगळ्या रंगातील झेंडे ,उन्हाने चमकणारे समुद्रकिनारे ,कोळ्यांच्या जाळी फेकण्याच्या ,बोटी ढकलतानाच्या हालचाली मला पावसात चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करतात .
महाबळेश्वरचा लिंगमळ्याचा धबधबा , भिलारचा वॉटरफॉल ,पोलादपूर महामार्गावरचे धबधबे डोंगर कपाऱ्यांवरून पडणारे पाणी पाहिले की मला आपण माणसे निसर्गापुढे किती छोट्या उंचीचे व खुजे व्यक्तिमत्वाचे आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते .
पाऊस मला आवडतो त्यामागे आणखी एक खरे कारण आहे .
ज्यांच्या सोबत मी बालपणी लहानाचा मोठा झालो ते माझे सख्खे तीनही मित्र आता माझ्यासोबत नाहीत .काळाने तिघांच्याही बाबतीत मोठा विचित्र आघात करून तिघांचेही निधन झाले . माझ्यावर नितांत प्रेम करणारी स्वातीची आई या जगातून निघून गेली .माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी एकुलती एक छोटी मुलगी ' दिशा ' आम्हाला दिशाहीन करून कायमची पैलतिरी गेली .
ज्या जवळच्या मित्रांनी फसवले, अगदी जवळच्या नातेवाईकांनी संकटकाळात माझ्याकडे पाठ फिरवली , माणसांच्या वाईट व्यवहारामुळे ,
कृत्यांमुळे कधीकधी मला जीवन नकोसे झाले , माझे मन उदास व सैरभर झाले . माझे आर्थिक ,शारीरिक ,मानसिक ,
नुकसान झाले .त्यांच्या दिलेल्या वेदनांमुळे , दुःखामुळे अनेकदा अचानकपणे डोळ्यात अश्रू येतात .
जी जवळची माणसे मला आता कायमची दूर सोडून गेली त्यांच्या आठवणींनी माझे मन गदगदून , गलबलून ,गहिवरून येते आणि डोळ्यात पुन्हा खूप अश्रू तयार होतात . या सगळ्या दुःखदायक घटना मी दरवर्षी पूर्णपणे विसरून जातो व परत नव्या दमाने , नव्या जोशाने पुन्हा पावसात भिजतो आणि मनातला पाऊस चित्रामध्ये रंगविण्यास सुरवात करतो . तुम्ही देखील तसेच करा सगळ्या वाईट आठवणीनां मनातून हद्दपार करून नव्याने पावसात भिजा नव्याने पुन्हा पाऊस अनुभवा मग परत नव्या आशा ,नवी उमेद व नवीन चित्रे रेखाटण्यास मनाला प्रेरणा मिळेल.
मला पाऊस आवडतो , कारण मी एकटाच पावसात फिरताना वाहणारे डोळ्यातील हे अश्रू कोणालाही दिसत नाहीत .
पावसाच्या पाण्यात डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाच्या पाण्यात डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
* म्हणून मला मनातला पाऊस चित्रात रंगवायला खूप खूप आवडतो .*
सुनील काळे