⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵
काही वर्षांपूर्वी कोकणात चित्रे रेखाटण्यासाठी गेलो होतो . महाबळेश्वर महाड ,पोलादपूर मार्गे आम्ही हर्णे बंदरावर पोहचलो . निसर्गाने प्रत्येक गावाला एक अद्भुत अविस्मरणीय सृष्टीसौंदर्य बहाल केलेले आहे . पाचगणी महाबळेश्वरला उंच डोंगरावरून पाहताना दूरपर्यंत दिसणारी सह्याद्री पर्वतरांगांची शिखरे सिल्वरवृक्षांची झाडे व घनदाट जंगल तर कोकणात पायथ्याशी पसरलेला प्रचंड मोठा समुद्र व किनाऱ्यावर माडांची उंचच उंच झाडे .या दोन्ही ठिकाणची दृश्ये परस्पर विरोधी आहेत .दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही . प्रत्येकाचे आपआपले वैशिष्ठय आहे. महाबळेश्वर पाचगणीतल्या घनदाट जंगलांची ब्रिटिशकालीन बंगल्यांची कृष्णा दरीची चित्रे वेगळी तयार होतात तर कोकणातील अथांग समुद्राच्या लाटा ,त्यावर चालणाऱ्या होड्या ,बोटी ,मासेमारी करणारे कोळी सागरीकिनारे , सततच्या लाटांमूळे झीजलेल्या कातळांची ,जलदुर्गांची , लाटांची चित्रे वेगळीच रुपे धारण करतात .आणि या दोन्ही प्रकारच्या चित्रांना कागदावर सजीव करताना जो आनंद मिळतो त्यामध्ये मी नेहमीच खुष असतो .
कोकणात पूर्वी अरुण दाभोळकर नावाचे चित्रकार वॉटरप्रूफ इंकमध्ये गणपती व कोकणचा परिसर चित्रित करायचे त्यांची ती स्टाईल फार प्रसिद्ध झाली होती .
आज कित्येक दिवसांनी वॉटरप्रूफ इंक सापडली आणि चकचकीत असे युगो आर्ट पेपरचे काही 5"x14" इंचाचे छोटे तुकडे सापडले .
कालच्या जोरदार वाऱ्याच्या दमदार चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झालेले प्रसिद्धी माध्यमांवर पाहिले आणि खूप वाईटही वाटले .
मला हर्णे बंदरावर पाहिलेल्या बोटींची ,किनार्यांवरील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांची व मासे खरेदी करण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांच्या लगबगीची आठवण झाली .
आपल्या मनाची दोन मनांमध्ये विभागणी केलेली आहे . एक अंतरमन व एक बाह्यमन .अंतरमनामध्ये ठसलेली दृश्ये कायमची मनामध्ये रुजून रहातात .
वॉटरप्रूफ इंकमध्ये या आत बसलेल्या दृश्यांना छोट्या आकारात मूर्त स्वरूप लगेच मिळाले .मग मनाच्या कोपऱ्यात बसलेली चित्रे , कोणतेही आरेखन न करता पटापट हाताद्वारे प्रिंटस घेतल्या सारखी निघू लागली आणि आज एकाच बैठकीमध्ये 14 चित्रे एकापाठोपाठ तयार झाली .
तीच ही
कोकणची स्मरणचित्रे .
⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵