ब्लॉग संग्रहण

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

ती वेळ निराळी होती .....

ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे .
🌟🌟🌟🌟🌟🌟
          बरोबर सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझे  "मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट " व " देशमुख फार्म - वाई " नावाचे दोन लेख वाचल्यानंतर ठाण्याचे सुनील सामंत (http://www.esahity.com/ ई साहित्य प्रतिष्ठान , प्रसार व निर्मिती करतात ) ते सपत्नीक मुद्दाम ठरवून खास भेटायला आले होते . त्या दिवशी आमच्या निसर्ग बंगल्यातील चित्रकारांचा पसारा पाहून त्यांनी कौतुक केले आणि मुक्कामासाठी देशमुख फार्मच्या कृषी पर्यटन केंद्रांकडे संजय देशमुख यांच्याकडे गेले . त्याच दुपारी जेवण करून निवांत बसलो तर एक पांढऱ्या रंगाची कार गेटजवळ थांबली . त्यामधून उतरले प्रसिद्ध कवि व ठाण्याचेच रहिवासी असलेले श्री .अरुण म्हात्रे .
          वाईच्या विश्वकोशाचा द्रविड हायस्कूल पटांगणात मोठा कार्यक्रम झाला होता . त्यामध्ये अशोक नायगांवकर , अरुण म्हात्रे यांच्या कवितेचा कार्यक्रम मी पाहीलेला होता . टीव्हीवर त्यानां पाहीले होते .त्यामूळे त्यानां लगेच ओळखले . वाईमध्ये एका तरुण कवीच्या पुस्तकप्रकाशनासाठी ते आले होते . कार्यक्रमानंतर धोमधरण पाहण्यासाठी ते चालले होते . कोणाच्या तरी सांगण्यावरुन ते रस्त्यात लागणाऱ्या निसर्ग बंगल्यात आले . आमची दोघांची चित्रे व स्टुडिओ पाहून ते खूष झाले व टेरेसवर सगळीकडे भातशेती व हिरवागार परिसर पाहून त्यांनी उत्स्फूर्तपणे काही कविता ऐकवण्यास सुरुवात केली . त्या कविता ऐकताना आम्ही अगदी तल्लीन होऊन गेलो . माझ्या मोबाईलमध्ये भरपूर फोटो काढले व मग दुपारी धोम मंदीर व धरणाकडे निघालो .
         धोम मंदीरापूर्वी देशमुख फार्मला सामंताना भेटायला गेलो . दोघेही ठाणेकर व जवळपासच्या परिसरातच राहत होते . मग गरम भजी , चहा व पावसाळी वातावरणात साहित्य क्षेत्रातील गप्पांची मैफीलच रंगली . समान व्यसनेसु सख्यम ! याची लगेच प्रचिती आली .
          एक चित्रकार जोडपे , एक साहित्यिक जोडपे व एक लेखक कवि जोडपे असे सगळे वाईच्या प्रसिद्ध धोमच्या नरसिंह मंदिरात गेलो . त्यानंतर जवळच धोम धरणाच्या जलाशयाजवळ पोहचलो . थंडगार वाहणारे वारे , कडाडणाऱ्या ढगांचा आवाज , सभोवताली प्रचंड समुद्रासारखे जलाशयाचे पाणीच पाणी पाहून सगळे खूष झाले . वातावरणात अनोखी ऊर्जा भरली होती .मग कवींची कविता हृदयापासुन जागृत झाली व निरोप घेण्याआधी भर रस्त्यात हिरव्यागार डोंगराच्या सानिध्यात त्यांनी
ती वेळ निराळी होती , 
ही वेळ निराळी आहे 
अशी मोठी सुंदर कविता सर्वांसाठी सादर केली त्यांच्या बहारदार सादरीकरणामूळे त्या दिवसाचे सोने झाले ,कान तृप्त झाले व खरंच वाटू लागले ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
वो शाम कुछ अजीब थी । 
यह शाम भी कुछ अजीब है । 
हे आम्ही सर्वांनी खरोखरच अनुभवले व एकमेकांचा मनापासून निरोप घेतला . खरं तर प्रत्यक्ष भेटीची ही गोष्ट येथे संपली .
         पुढे आम्ही फेसबुक फ्रेंड झालो , व्हॉटसअपवर एकमेकांशी संवाद साधू लागलो . एकमेकांचे लेख कविता शेअर करू लागलो होतो . पण एक चमत्कार माझ्या मोबाईलमध्ये झाला होता . माझ्या मोबाईलवर असलेले सर्वच्या सर्व व्हीडीओ , फोटो अचानक गायब झाले . माझ्या मनात तर मोठी खंत निर्माण झाली , मनात कायमची हुरहुर निर्माण झाली . कारण सामंत , म्हात्रे यांच्या सोबतचे सर्वच्या सर्व फोटो मोबाईलवरून अदृश्य झाले होते . खूप जंगजंग पछाडले पण फोटो काही शेवटपर्यंत सापडलेच नाहीत .मग मी माझ्या मुंबईच्या चित्रप्रदर्शनाच्या तयारीत त्यानां विसरूनही गेलो . पण कवि अरुण म्हात्रेंचे शब्द मात्र कायम मनात रुंजी घालत होते .
ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
        जानेवारीत नेहरू सेंटरच्या चित्रप्रदर्शनात सामंतसाहेब सर्व कुंटूबियासोबत आले . त्यांनी प्रदर्शनात स्वातीची पाच तैलरंगातील चित्रे विकत घेतली .आमच्या प्रदर्शनात प्रथमच मराठी माणसाने , मराठी चित्रकाराची कोणतीही घासाघीस न करता एकदम पाच चित्र घेणे हा नवा अनुभव कायम लक्षात राहणारा होता . त्यावेळी सामंत व म्हात्रे यांच्या प्रथम भेटीची आठवण झाली . अरुण म्हात्रे यांनी सुद्धा फोटो पाठवण्याची आठवण केली होती पण मी गप्पच राहीलो . कारण फोटो गायब झालेले होते . फक्त मनात एक वाक्य सारखे घोळत होते .
ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .
         आज सहा महिन्यानंतर अचानक अवकाळी गारांचा मोठा पाऊस पडत होता . ढगांचा मोठा कडकडाट होत होता . थंडगार वारे वहात होते . वातावरणात नवी उर्जा निर्माण झाली होती . मग टेरेसवर एकटाच निवांत बसून पुन्हा कविमित्राच्या कवितेची खूप आठवण झाली व नवा मोबाईल सहज चाळत होतो  तर अचानक सगळे फोटो गुगल क्लाऊड अॅपवर सापडले .निरोप घेतानाचा कविता सादर करतानाचा व्हीडीओ देखील सापडला . 15 GB फ्री डाटा फुल्ल झाल्याने गुगलवाल्यांनी सर्व फोटो गायब केले होते . व एक दोन दिवसांपूर्वी 100 GB डाटा विकत घेतल्यामूळे गायब केलेले सर्व फोटो परत मोबाईलवर पाठवले . खूप आनंद झाला . 
कारण अशा काही आवडीच्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेणे , कवींच्या कविता प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून ऐकणे हा अनुभव अविस्मरणीय असतो .तो अनुभव , ते शब्द कधीच विसरता येत नाहीत . ते काळजाच्या आत कप्प्यात खूप खोल रुतून बसतात .
आज पावसात परत एकदा ती कविता पुन्हा पुन्हा ऐकत मनात कायमची साठवली .

ती वेळ निराळी होती ,
ही वेळ निराळी आहे .

सुनील काळे✍️
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...