ब्लॉग संग्रहण

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

एकदा दर्शन दे घन:श्याम


एकदा दर्शन दे घन:श्याम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
            घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्या " म्हणायचो आणि ते त्याला ही आवडत असावे. त्याची व माझी गट्टी फार अगदी पहीलीपासून होती . पहीली ते सातवी मराठी शाळा व नंतर आठवी ते दहावीपर्यंत संजीवन विद्यालयात पाचगणीला एकत्रच शिकायचो , दिवसभर एकत्रच अभ्यास करायचो .

             घन्या हे फार अजब रसायन होते . त्याचे घारे डोळे मांजरीसारखे होते, गोरा वर्ण , स्वच्छ कपडे व संध्याकाळी तो ग्रे  काळपट रंगाचा एक आवडीचा कोट नेहमी घालायचा , तो नेहमी खुषीत असल्याचं दाखवायचा. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूूक होती . त्याचे वडील रमाकांत, टेलरींग व अलटरचे काम करायचे. पाचगणीच्या शिवाजी पुतळ्याजवळ माडीवर त्यांचे छोटे दुकान होते . ते कधीही साफ केलेले मला आठवत नाही ,त्याला कधीही रंग मारल्याचे पहाण्यात आले नाही .अतिशय हुशार व सुट शिवण्यात तरबेज असलेल्या रमांकांत टेलरांनां निराशेने मात्र पूर्णपणे खूप ग्रासले होते . त्याचे कारण त्यांची मनोरुग्ण बायको म्हणजे घन्याची आई.घन्याची आई खूपच वेडी होती, वेड्यासारखीच एकटीच सतत बडबड करत राहायची . दिवसभर तिला  कशाचीच पर्वा नव्हती . संसाराची व मुलांची जबाबदार इतर कशाचीच तिला जाणीव नसायची . सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची सततची बडबड कधी थांबायचीच नाही . तोच वारसा त्यांच्या मोठ्या मुलाने पुढे चालवला. घन्याचा मोठा भाऊ मोहन शाळेत असतानाच त्याचे कोणतेतरी गणित बिघडले  चुकले . व नंतर त्याचेही डोक्याचे गणित कायमचेच हुकले . हुशार मोहन आजही सारखी गणिते सोडवत बेवारशाप्रमाणे भररस्त्यात , गटारा शेजारी, घरात , कोठेही बडबडत असतो . त्याचे न सुटणारे गणित तो येणाऱ्या जाणाऱ्यानां समजून सांगण्याचा  किंवा स्वत :लाच विचारत, हातवारे करत बसतो .हे त्याचे जीवनच झाले आहे . [मागच्या वर्षी त्याचे निधन झाले ]घन्याच्या दोन बहिणीपैकी , एकीने शाळा सोडली होती व ती स्वयंपाक पाणी , आवराआवर करायची व आई विहिरीवर कपडे धुवायची सतत मोठ्याने एकटीच बडबड करत असायची .एक छोटी बहिण मात्र शाळेत जायची .

           घरातील या परिस्थितीमूळे रमाकांत टेलर खूप अस्वस्थ, निराश, व मटक्यासारख्या व्यसनात गुफूंन गेले होते . त्यांचे संसाराकडे लक्ष नव्हते कारण बायको सुधारण्याची शक्यता आजीबात नव्हती .

             या सगळ्यांत घन्या खूप हुशार होता . त्याला आपल्या ,परिस्थितीची जाणीव होती .आपली आई वेडी आहे व भाऊही कामातून गेला आहे  याचा त्याच्यावर एक प्रकारचा नकारार्थी  प्रचंड आघात झाला होता व  मानसिक दबाव ही त्याच्यावर नेहमीच असायचा .

              घन्या व मी जिगरी दोस्त होतो , आम्ही एकत्र पोलीस ग्राऊंडच्यामागे सोहराब मोदींच्या बंगल्यातील गार्डनमध्ये , एस टी स्टॅन्डच्याजवळ नबाब बंगल्यामध्ये ,कधी टेबललॅन्डच्या गुहेत अभ्यास करायचो , खेळायचो, घन्याला नीरव " शांतता " खूप आवडायची.आईच्या दिवसभरच्या बडबडीला तो जाम कंटाळलेला असायचा .आम्ही विद्यार्थी वाचनालयात जावून बसायचो . आम्ही कसलीही वर्गणी दिली नसताना वाचनालयाचा कमरुद्दीनचाचा आम्हाला गोष्टींची छोटी पुस्तके वाचायला दयायचा .घन्या व मी भरपूर वाचायचो व वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करायचो

आमचा तो आवडीचा विरंगुळा होता .

             संजीवनला आल्यानंतर मात्र आठवीत घन्या खूप अस्वस्थ झाला होता . त्याच्या भावकीच्या भांडणामूळे त्याला माडीवरचे घर सोडावे लागले होते . मग माडीच्या मागेच घराबाहेर उघडयावर पत्र्याच्या शेडमध्ये ही सारी मंडळी स्थलांतरीत झाली . त्याला घर कसे म्हणायचे ? एक बारा बाय बाराचे उघडे पटांगण, त्यात दगडी बाजूला लावून  जुन्या पत्र्याचे  दोरीने बांधलेले कुंपण  व डोक्यावर उघडे सताड आभाळ . घरात एक स्टोव्ह, थोडी ॲल्युमिनियमची भांडी, वाकळा , गाद्या, चादरी व असंख्य बांधलेली कपड्यांची गाठोडी, अस्ताव्यस्त पसरलेली . बाजूला सार्वजनिक संडास व कोपऱ्यात बडबड करत, उचकत ,बांधत बसलेली वेडी आई . तर एका कोपऱ्यात भाऊ मोहन सुटलेली गणितं सोडवत स्वतःशीच भांडत बसलेला असायचा .

           तरीही प्रसन्न मनाने तो संजीवनला निघताना एसटी स्टॅन्डसमोरच्या माझ्या घरी यायचा .व आम्ही शाळेला निघायचो . रस्त्यातून जाताना सकाळची कोवळ ऊनं, झाडांच्या , माणसांच्या सावल्या दाखवायचा, धुक्याचं वातावरण टिपायला, इमारतींवर पडलेला प्रकाश बघायला मला सांगायचा . चित्रात हे जिवंतपणा आणण्याची साधने आहेत असं बोलत राहायचा . त्याला वाचनाची, लिखाणाची, चित्रांची, अध्यात्माची, गाण्याची एकंदर सर्व जीवनच समजून घेण्याची खूप ओढ होती. त्याला खूप खूप शिकून मोठे होण्याची आस लागलेली होती . तो त्या प्रयत्नात नेहमी असायचा .

              त्याच्याकडे शाळेची एकच ग्रे पँट व एकच सफेद शर्ट होता ,तर माझ्याकडे दोन ,त्या अर्थाने मी त्याच्यापेक्षा श्रीमंत होतो. आम्ही रोज शाळेतून आलो की लगेच कपडे काढून गादीखाली  घडी घालून ठेवायचो  . दुसऱ्या दिवशी सकाळी गरम तांब्या फिरवून शाळेच्या ड्रेसला इस्त्री करायचो . आम्ही कधी गेम्सच्या मैदानावर गेलो नाही कारण आमच्याकडे हाऊस टी शर्ट , हाफ पँट व शूज नव्हतेच .आमच्याकडे शाळेचा ब्लेझरही(कोट ) नव्हता . दहावीला राज्यपाल .व्ही.व्ही. गिरी आले होते. पण आमच्याकडे कोट नसल्यामुळे हिंदीच्या सिंगसरांनी आम्हाला वर्गातच बसवून ठेवले होते .

             घन्याला  गाण्यांची व मला चित्रांची  भारी आवड होती . त्यावेळी आमच्या दोघांच्याही घरी टिव्ही नव्हता . मग बाजारात मंडईमध्ये तर कधी कोणाच्या घरच्या खिडकीतुन, किंवा पत्र्याच्या  होलमधून आम्ही चित्रपट ऐकायचो, सफर, आराधना, चितचोर, गाईड, नमकहराम असे किती तरी चित्रपट  आम्ही पाहीले कमी ऐकले जास्त . त्यातली किशोरकुमारची गाणी मला आवडायची, मग मी घन्याकडे पाहायचो , त्याला सांगायचो. घन्या पटकन् तोंडावर बोट ठेवायचा व मला शांत राहायला सांगायचा. डोळे मिटायचा व गाणे संपताच  खिशातून कागदाचा तुकडा काढायचा व संपूर्ण गाणे न चुकता लिहून काढायचा . अशी अफाट व अलौकीक शक्ती मी घन्यातच पाहीली व अनुभवली . त्याची एक छोटी वही मी केली होती व आजही ती मी माझ्याकडे जपून ठेवलेली आहे .

           घन्याचे गाणे लिहून झाले की माझे अनेक प्रश्न सुरू व्हायचे . 

तु डोळे का मिटतोस ? 

तर शांतपणे म्हणायचा अरे, ते गाणे आपल्याला समजून घ्यायचे असले की डोळे मिटावे मग गाण्याचे शब्द , त्याचा स्वर, ताल, त्याची बांधणी, रचना, त्याची रागदारी, त्याच्यातील भावना, विषय, कवीची काव्यांतून सांगण्याची शैली सगळे आपल्याकडे येते . आपल्याला अनुभवता येते,मनात झिरपून जाते . मग शब्द कागदावर येतात .मी अचंबित व्हायचो की एकदाच ऐकलेले गाणे संपूर्ण कसे कागदावर आणता येते ? 

मी बऱ्याच वेळा तसा प्रयत्न केला आहे पण मला एकदा ऐकलेले गाणे कागदावर कधी ते संपूर्णपणे न चुकता लिहणे  जमले नाही . पण डोळे शांतपणे मिटून आवडलेले गाणे मात्र मी घन्याची फिलोसॉफी म्हणून आजही आठवणीने अमंलात आणतो .

            घन:श्याम व मी पुढे सायन्स शिकायला वाईला गेलो , सायन्स , गणित शिकणे , बेडकाचे पोट फाडून त्याची चिरफाड करुन पचनसंस्थेचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीची रसायने एकमेकांत मिसळणे , लॉगबुकचे मोठे आकडे शोधत रहाणे , सायन्सच्या प्रयोगशाळेत रसायने मिसळत राहाणे ही आमची नावडती कामे होती . इंग्रजीत न समजणारे सायन्स शिकत राहणे, हा आमचा  नावडता कार्यक्रम होता. मग आम्ही एसटीतून गाडी थांबवून वाईच्या रस्त्यात घाटातच बऱ्याचदा उतरायचो .मी सगळ्या घाटातील झाडांची चित्रे रेखाटायचो तर घन्या गाणी , कविता, वाचन , लिखाणकाम करायचा . त्याच्या त्या अफाट बुद्धीमत्तेचा मला हेवा वाटायचा . त्याला विचारले तर सहज म्हणायचा 

" मनापासून केले की सगळं येते " .

 मग संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या जगण्याचं "सायन्स " शिकून , समजून घेऊन आपआपल्या घरी जायचो .
        असा हा घन्या बारावीला गणितात नापास झाल्याचा निकाल लागला व तो मनाने कोलमडूनच पडला . माझ्याकडे यायचाच बंद झाला, मी त्याला खूप समजावयाचा  प्रयत्न केला, धीर दिला, चेतना दिली, आधार दिला . पण त्याने कोणाचेच ऐकले नाही . माझ्यावर चिडायचा, टाळायचा, दूर कोठेतरी जावून एकटाच भटकत राहायचा . आपण एका विषयात नापास झालो  हे त्याला, त्याच्या बुध्दीला, पटायचेच नाही . 

तो आत्महत्या करायचा प्रयत्न करायला लागला . मग मी त्याच्यावर रागवायचो, ओरडायचो, पण त्याच्यात काही फरक पडला नाही . इतका निराश वैफल्यग्रस्त घन्या मी कधीच पाहीला नव्हता . आपण नापास झालो या दुःखी भावनेने त्याला निराशेने प्रचंड आतूनच पोखरून काढले होते . सारखा स्वतःच्याच तोंडात तो चापटया मारायला लागला होता .

पश्चातापाच्या ........

            एक दिवस घन्याकडे दुपारी गेलो होतो . घन्याला खूप भूक लागली होती . त्याची वेडी आई तिथेच गाठोडी चिवडत, उचकत, मोठमोठयाने आपल्याच नादात, तंद्रीत बडबड करत बसली होती, तिचे आपल्या उपाशी लेकाकडं , त्याच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं, मोठी बहीण  चांगली कपडे नसल्यामूळे अंगावर चादर लपेटून निस्तेज व भकास चेहऱ्याने झोपली होती . घन्याला भुकेमूळे खूप राग आला होता तो त्याला कंट्रोल होत नव्हता . 

मी देखील त्याला मदत करण्याचे फक्त आश्वासन देत होतो . कारण मी कमवत नव्हतो . घन्याने सगळी भांडी आपटली, फेकून दिली, आईच्यासमोर तिने बांधलेल्या गाठोड्यांवर लाथा मारल्या .व माझ्याकडे रागाने पाहून हातवारे करत तो म्हणाला  कशाला असे भिकाऱ्यासारखे जगायचे ? असं फालतू आयुष्य जगून काय उपयोग? असं जगण्यासाठी का आपण जन्म घेतलाय ? याला जगणं म्हणतात का ? 

मी फक्त  डोळ्यात पाणी आणून त्याला माझ्या घरी न्यायचा प्रयत्न करू लागलो . संतापाने त्याने मला ढकलून दिले .भूकेच्या तडाक्यातच शोधाशोधीत त्याला मिरचीचा लाल चटणीचा डबा सापडला . त्याने चटणीच खायला सुरवात केली .बकाबक तो मुठी भरून चटणी तोडांत कोंबत होता . मी डोळे फाडून त्याच्याकडे पहातच बसलो . तो मला अघोरी प्रकार वाटत होता , जवळजवळ अर्धा किलो तरी चटणी त्याने संपवली होती . मला वाटले त्याला आता  जुलाब होणार, किंवा पोटात तरी दुखणार , प्रचंड यातना होणार , हॉस्पीटलमध्ये न्यावे लागणार .पण घन्याला काहीच झाले नाही . सगळे मान , अपमान, दुःख, वेदना, गरीबी पचविण्याची ताकद त्याने  शरीरात  व मनात निर्माण केलेली होती . मग तो एकटाच राहू लागला व शांत राहून स्वतःशीच मुकपणे भांडत राहीला . 

अखेरपर्यंत ................. 

              एक दिवस तो माझ्या घरी आला एका बॉक्समध्ये त्याने १२वीची सर्व पुस्तके भरली होती . त्याच्या मनावर चेहर्‍यावर एक वेगळीच उदासिनतेची छटा मला जाणवत होती . 

माझ्याकडे का देतोस ही पुस्तके ? असे विचारले तर म्हणाला तुझ्याकडे ठेव, तुला उपयोगी पडतील . मी चाललोय आता .......... 

कुठे चाललास ? 

तर म्हणाला खूप लांब , आता कोणालाच परत भेटणार नाही . 

मी घाबरलो व त्याच्या पाठीमागे जावू लागलो तर मागे वळून म्हणाला .

असा किती दिवस पाठलाग करशील तू ? 

थकशील तु .

मी कधीच सापडणार नाही तुला . 

पण तु खूप मोठा हो . शहाणा हो , 

तुला आवडणाऱ्या चित्रकलेत वाहून घे स्वतःला .

जीव ओत चित्रांमध्ये, कधी हारु नकोस माझ्यासारखा, तू झगडत रहा, खूप वाचत रहा. प्रयत्न सोडू नकोस, आणि गाणी ऐकताना मात्र डोळे मिटत जा मग तुला समजतील अनेक गुपिते गाण्यातील व जीवन जगण्यातील सुध्दा ...........

            दुसऱ्या दिवशी  सकाळीच गावात गदारोळ उठला . सकाळचे दहा वाजले असावेत . कोणीतरी मला सांगितले घनःश्यामने गाव विहीरीत  उडी मारून जीव दिला. 

जिवाच्या आकांताने मी पळत सुटलो विहीरीकडे .खूप  वेगाने ....काय कळतंच नव्हतं मला काय होतयं ते . शरीर,  मन, बुद्धी हातपाय सुन्न झाले होते.  

मी पाहीलेला माझ्या आयुष्यातील पहीला मृतदेह होता घन:श्यामचा, माझ्या सर्वात आवडत्या मित्राचा .पाण्यातून रात्रभर भिजलेला , ओलाचिंब झालेला. ज्याच्या बरोबर माझे सगळे बालपण घालवले तो घन्या आता शांतपणे ,निष्प्राणपणे पडलेला होता . त्याच्या अंगावर तोच कालचा आवडीचा डार्क ग्रे रंगाचा कित्येक वर्षाचा कोट होता . तो काहीच बोलत नव्हता ,मी त्याच्याकडे पाहीले त्याचे डोळे मात्र शांतपणे मिटलेले होते . कुठलेतरी आवडलेले गाणे ऐकतोय असे  वाटले . मग मला वाटले तो आता तोडांवर  बोट ठेवेल  ,मला शांत राहायला सांगेल व कागदाचा तुकडा काढेल व मला सगळे गाणे पुर्णपणे लिहून देईन . मला सांगेल डोळे मिटत जा गाणे ऐकताना . 

पण असं काही झालं नाही ... . .

घन्या गेला होता माझ्यापासून , आपल्या सगळयांपासूनच खूप  लांबच्या अज्ञात प्रवासासाठी ........... डोळे मिटून .

             घनःश्यामच्या अंतयात्रेला मी गेलो नाही . माझी हिम्मतच झाली नाही .त्या हनुमान गल्लीकडे मी फिरकलोच नाही कितीतरी दिवस .

             पुढे मी कोल्हापूर , पुणे, मुंबई दिल्लीे येथे चित्रकलेच्या कामासाठी, शिक्षणासाठी गेलो. पाचगणीला माझे येणे कमी झाले. पुढे असेही कोणाकडून तरी ऐकले की घनःश्यामची उत्तरपत्रिकेची फेरतपासणी केली तर घन्या फर्स्टक्लास मध्ये पास होता . बोर्डाने काही तरी रिझल्टच्या कागदावर मिसप्रिंट झाल्याचे कारण दिले होते .ती निकालाची प्रत दुरुस्त करूनही दिली . 

पण 

माझा घन्या मात्र माझ्यापासून कायमचा मिस झाला होता . तो कधीही दुरुस्त होणार नव्हता . तो कायमचा  गेला होता . माझ्यासोबत असंख्य आठवणी ठेवून .

             माझ्या  संजीवनच्या वर्गात असलेल्या अनिता  टेंबेचे सुरेल आवाजातील  गाणे सुरु झाले की मी घन्याकडे पाह्यचो . तर घन्याने डोळे मिटून घेतलेले असायचे व मलाही तो डोळे मिटून घ्यायला सांगायचा पण मी झोपलेला दिसेन या भितीने डोळे मिटायचोच नाही , घन्या मात्र तल्लीन झालेला असायचा . तीन तपानंतर ३६ वर्षानंतर आमच्या  संजीवनच्या ग्रुपची व्हॉट्सॲपवर भेट झाली . 

अनिता टेबेंची ( आता तिचे नाव अनिता  यादव झाले आहे ) तिच्या आवाजात रात्री  तिने पाठवलेली गाणी ऐकायला सुरुवात केली . आता मात्र मी डोळे मिटून घेतले होते ,तर पहीलेच गाणे सुरु झाले .

मधूवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम, 

एकदा दर्शन दे घनःश्याम . . . . .

एकदा दर्शन दे घनःश्याम . . . . .

हे गाणे ऐकले  व माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी पाझरू लागले . ते थांबतच नव्हतं, इतका मी तर हळवा नाही मग हे पाणी का वाहतेय याचा  शांतपणे मी शोध घेत राहीलो . त्यावेळी जाणवले की अनिताच्या आवाजात आजही तीच अर्तता, स्वरांचा पक्का बाज, ठेका, ताल , शब्दफेक व काव्याची सुस्पष्टता, मंत्रमुग्ध होऊन भावना व्यक्त करण्याची जादूई सुरांची ताकद अजूनही  जिवंत आहे , आवाजाची धार तशीच टिकून आहे . वातावरण बदलून टाकायची त्या गाण्यांमध्ये ताकद आहे . 

घनःश्यामला ही गाणी खूप खूप आवडली असती . लगेच कागदाचा तुकडा काढून मला गाणी लिहून दिली असती व म्हणाला असता याला म्हणतात गाणे . अर्तता अशी असावी, गाणे गाताना तल्लीनता असावी .  तर खरं गाणे असंच पाहीजे जे हृदयाला भिडते आणि हेलावून टाकते ऐकताना संपूर्ण मनाचा कोपरा . 

      तर अशी ही घन्याची आठवण, अशा असंख्य आठवणी घेऊन  आपण सर्वच जण जगत असतो. मी देखील कधी कधी वैतागतो, निराशा येते मला , पण  मी हारत नाही, धडपड करत राहतो .यश मिळो ना मिळो . चित्रकाराचा काट्याकुट्यातील प्रवास करताना थकत  नाही  . वादविवाद , राजकारण फालतू विषय शक्यतो टाळतोच , कारण मग घन्या रागवेल माझ्यावर . व फालतू पोकळ कारणे घेऊन उगीचच भांडत बसल्यावर निषेध करेल तो माझा .

        पण आता असे वाटतंय घन्या जिवंत असता तर किती मजा आली असती ? माझी चित्रे , माझी गाडी , माझे घर पाहील्यानंतर म्हणाला  असता याला म्हणतात चित्रं काढणारा चित्रकार . कारण माझ्याकडे काहीच म्हणजे काहीच नव्हते .एकदम शुन्य , झिरो होतो . आज आठवतयं मग भांडला असता संजीवनशाळेच्या भट्टाचारी सरांशी ज्यांनी मला इंटरमिजिएट परिक्षेला डे स्कॉलर होतो म्हणून रिजेक्ट केले . चित्रकलेच्या ग्रेड परिक्षेला  बसूनच दिलं नाही . आणि म्हणाला असता ग्रेड परिक्षा घेऊन काय चित्रकार होता येते का? चित्रकार हा असा जन्मावाच लागतो .

        आपल्या सर्वांना देखील म्हणाला असता कधी तरी  प्रत्यक्ष भेटता, व्हॉटसअपवर व फेसबुकवर आभासी जगात एकमेकाला मेसेज पाठवता आणि कोणत्या तरी विषयावर उगाचच जीवाचा आटापिटा काथ्याकूट कशाला करता ?

आता विसरू नका एकमेकानां . 

भेटत रहा अधून मधून . 

हारू नका .

जिद्द सोडू नका .

वादविवाद , आपआपला मोठेपणा सोडा .

तुझे माझं मोठेपण सोडा,एकाच लेव्हलवर या .सर्वांचा मानसन्मान आदर ठेवा . 

कारण रागात किंवा भावनेच्या भरात एक चुकीचा शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो चांगल्या गोष्टीनां एका क्षणात संपवून टाकतो .आयुष्यभर तो शब्द एखादयाला विषासारखा टोचत राहू शकतो . 

म्हणून अधून मधून डोळे मिटत जा . 

आपल्या आवडीची गाणी ऐका ,
चित्रकारांची चित्रे नीट निरखूण पहा , मग नीटपणे कळतील चित्रकाराचे रंग त्याची साधना .गाण्याचा  , चित्रांचा  , कवितांचा आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा कलांचां सार लक्षात घ्या, प्रत्येक गाणे , प्रत्येक चित्र , शिल्प , संगीत , वाद्य, आनंदासाठी निर्माण केलं आहे,. एकमेकानां मनसोक्त आनंद दया व घ्या . स्पर्धा करू नका .

जीवनाची अनेक गाणे गाऊन झाल्यावर आपल्या सगळ्यानां एक गाणे मात्र गावे लागते . शेवटचे अंतिम गाणे ..... 

घन्या आतच बसलाय जाऊन माझ्या हृदयात ,

खूप खोल . 

खूप खोलवर 

डोळे मिटून .................................

😌😌😌😌😌😌😌😌😌

चित्रकार : सुनील काळे✍️ 
9423966486.
निसर्ग आर्ट गॅलरी - वाई

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

Beautiful Panchgani & Mahabaleshwar

Beautiful Mahabaleshwar & Panchgani

Writer - Capt. Prasoon Shrivastava

Story of Maharashtra's Twin Hill Stations
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
            2005 साली मुंबईला जहाँगीर आर्ट गॅलरीच्या शेजारी म्युझियम आर्ट गॅलरी होती ( ती आता कायमची बंद झाली ) तेथे माझे चित्रप्रदर्शन झाले होते . या प्रदर्शनातून उद्योगपती श्री .जगदीश ठाकरसी यांनी माझी काही चित्रे विकत घेतली होती . ती त्यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफीसमध्ये लावली आहेत . त्यांचा महाबळेश्वर येथे 'ठाकरसी हाऊस ' हा ब्रिटीशकालीन बंगला आहे .पूर्वी त्याचे नाव ॲस्पेक्ट हॉल होते . जगदीशभाई कलारसिक आहेत व उत्तम फोटोग्राफर आहेत . त्यांनी या बंगल्याचे प्रत्यक्ष तेथे जावून एक मोठे जलरंगातील चित्र पूर्ण करण्याची संधी मला दिली होती . तो बंगला ब्रिटीश स्थापत्याशास्त्राचा उत्तम नमूना आहे . त्या काळात ब्रिटीशांनी काही चिनी लोकानां कैदी केले होते त्यांच्यासाठी महाबळेश्वर येथे  तुरुंग बांधला होता . या चिनी लोकांनी वेताच्या विणकामाच्या आराम खूर्च्या , फर्निचर व इतर अनेक गृहपयोगी वस्तू तयार केल्या होत्या , स्ट्रॉबेरीची लागवड त्यांनीच प्रथम या परिसरात सुरु केली होती . अनेक  एकरांमध्ये व घनदाट झाडीचा परिसर असल्याने येथे अतिशय शांतता असते .  महाबळेश्वर पाचगणीचे ब्रिटीशांचे बंगले आता अनेक पारशी व प्रसिद्ध व्यक्तिच्यां खाजगी मालकीचे आहेत .
           काही दिवसांपूर्वी एक अनोळखी फोन आला . फोनवर त्यांनी कॅप्टन प्रसून श्रीवास्तव असे नाव सांगितले . मुंबईतून जगदीश ठाकरसी यांच्या केबिनमध्ये ते माझ्या चित्रासमोर उभे राहून बोलतोय असे म्हणाले . त्यानां ते चित्र खूप आवडले होते .
        प्रसूनभाई यांनी नुकतेच पाचगणी महाबळेश्वर या दोन गिरिस्थानांचा प्रचंड अभ्यास करून एक जाडजूड 3000 रुपये किमतीचे इंग्रजी रंगीत चित्रमय कॉफीटेबल बुक प्रकाशित केले आहे . त्यामध्ये पाचगणी महाबळेश्वरचा इतिहास , ब्रिटीशकालीन इतिहास , अनेक रंगीत फोटो व पर्यटनस्थळांचा सविस्तर आलेख मांडला आहे . शाळा , इमारती , माणसे , सध्याची स्थिती व पूर्वीचे जीवन यांचा तुलनात्मक अभ्यास करून नव्या जुन्याचा चांगला मेळ घातला आहे .
कॅप्टन प्रसून श्रीवास्तव मूळचे दिल्लीचे पण त्यांची पत्नी मुंबईची व वारंवार या हिलस्टेशनला व्हिजीटर्स असल्याने येथील निसर्गाच्या प्रेमात पडले . मूळचे वार्ताहर व प्रकाशक असल्याने त्यांचा अभ्यास चांगलाच आहे . त्यांचे "पवई टाईम्स " हे दैनिक प्रसिद्ध आहे . अनेक चित्रे फोटो असल्याने हे पुस्तक वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखे आहे .
      या पुस्तकामध्ये त्यांनी आमच्या दोघांच्या मुलाखती घेऊन छान लेख प्रकाशित केले आहेत . "जेथे पिकते तेथे विकत नाही "ही गोष्ट खरी आहे .चित्रकार म्हणून पाचगणीतील स्थानिकांनी जरी दूर लोटले ,नाकारले मदत केली नाही तरी आपण सातत्याने ज्या क्षेत्रात काम करत राहतो त्याची दखल घेणारा कौतूक करणारा कोणीतरी भेटतोच .
प्रसूनभाईंनी कोणतेही मानधन न मागता स्वतः लेख लिहून प्रसिद्धी दिली . उलट ऑनलाईन 500 रुपये पाठवून " ग्रीन टाय " या लेखाला पवई टाईम्स या त्यांच्या दैनिकात प्रसिध्दी दिली .
कॅप्टन प्रसून श्रीवास्तव यांना या पुस्तक निर्मितीबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏💐💐💐
महाबळेश्वरला बाजाराच्या शेवटी श्री . इराणी यांचे इंपिरियल स्टोअर्स आहे तेथे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे .

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]