ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

एकदा दर्शन दे घन:श्याम

 एकदा दर्शन दे घन: श्याम

🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

            घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्या " म्हणायचो आणि ते त्याला ही आवडत असावे. त्याची व माझी गट्टी फार अगदी पहीली पासून होती . पहीली ते सातवी मराठी शाळा व नंतर आठवी ते दहावीपर्यंत संजीवन विद्यालयात पाचगणीला एकत्रच शिकायचो , दिवसभर एकत्रच अभ्यास करायचो .

             घन्या हे फार अजब रसायन होते . त्याचे घारे डोळे मांजरीसारखे होते, गोरा वर्ण , स्वच्छ कपडे व संध्याकाळी तो ग्रे  काळपट रंगाचा एक आवडीचा कोट नेहमी घालायचा , तो नेहमी खुषीत असल्याचं दाखवायचा. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूूक होती . त्याचे वडील रमाकांत, टेलरींग व अलटरचे काम करायचे. पाचगणीच्या शिवाजी पुतळ्या जवळ माडीवर त्यांचे छोटे दुकान होते . ते कधीही साफ केलेले मला आठवत नाही ,त्याला कधीही रंग मारल्याचे पहाण्यात आले नाही .अतिशय हुशार व सुट शिवण्यात तरबेज असलेल्या रमांकांत टेलरांनां निराशेने मात्र पूर्णपणे खूप ग्रासले होते . त्याचे कारण त्यांची मनोरुग्ण बायको म्हणजे घन्याची आई.घन्याची आई खूपच वेडी होती, वेड्यासारखीच एकटीच सतत बडबड करत राहायची . दिवसभर तिला  कशाचीच पर्वा नव्हती . संसाराची जबाबदारी, इतर कशाचीच तिला जाणीव नसायची . सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत तिची सततची बडबड कधी थांबायचीच नाही . तोच वारसा त्यांच्या मोठ्या मुलाने पुढे चालवला. घन्याचा मोठा भाऊ मोहन शाळेत असतानाच त्याचे कोणतेतरी गणित बिघडले  चुकले . व नंतर त्याचेही डोक्याचे गणित कायमचेच हुकले . हुशार मोहन आजही सारखी गणिते सोडवत बेवारशाप्रमाणे भररस्त्यात , गटारा शेजारी, घरात , कोठेही बडबडत असतो . त्याचे न सुटणारे गणित तो येणाऱ्या जाणाऱ्यानां समजून सांगण्याचा  किंवा स्वत :लाच विचारत, हातवारे करत बसतो .हे त्याचे जीवनच झाले आहे . घन्याच्या दोन बहिणीपैकी , एकीने शाळा सोडली होती व ती स्वयंपाक पाणी , आवराआवर करायची व आई विहिरीवर कपडे धुवायची बडबड करत .एक छोटी बहिण मात्र शाळेत जायची .

           घरातील या परिस्थितीमूळे रमाकांत टेलर खूप अस्वस्थ, निराश, व मटक्यासारख्या व्यसनात गुफूंन गेले होते . त्यांचे संसाराकडे लक्ष नव्हते कारण बायको सुधारण्याची शक्यता आजीबात नव्हती .

             या सगळ्यांत घन्या खूप हुशार होता . त्याला आपल्या ,परिस्थितीची जाणीव होती .आपली आई वेडी आहे व भाऊही कामातून गेला आहे  याचा त्याच्यावर एक प्रकारचा नकारार्थी  प्रचंड आघात झाला होता व  मानसिक दबाव ही त्याच्यावर नेहमीच असायचा .

              घन्या व मी जिगरी दोस्त होतो , आम्ही एकत्र पोलीस ग्राऊंडच्या मागे सोहराब मोदींच्या बंगल्यातील गार्डनमध्ये , एस टी स्टॅन्डच्या जवळ नबाब बंगल्यामध्ये ,कधी टेबल लॅन्डच्या गुहेत अभ्यास करायचो , खेळायचो, घन्याला नीरव " शांतता " खूप आवडायची.आईच्या दिवसभरच्या बडबडीला तो जाम कंटाळलेला असायचा .आम्ही विद्यार्थी वाचनालयात जावून बसायचो . आम्ही कसलीही वर्गणी दिली नसताना वाचनालयाचा कमरुद्दीनचाचा आम्हाला गोष्टींची छोटी पुस्तके वाचायला दयायचा .घन्या व मी भरपूर वाचायचो व वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करायचो

आमचा तो आवडीचा विरंगुळा होता .

             संजीवनला आल्यानंतर मात्र आठवीत घन्या खूप अस्वस्थ झाला होता . त्याच्या भावकीच्या भांडणामूळे त्याला माडीवरचे घर सोडावे लागले होते . मग माडीच्या मागेच घराबाहेर उघडयावर पत्र्याच्या शेडमध्ये ही सारी मंडळी स्थलांतरीत झाली . त्याला घर कसे म्हणायचे ? एक बारा बाय बाराचे उघडं पटांगण, त्यात दगडी बाजूला लावून  जुन्या पत्र्याचे  दोरीने बांधलेले कुंपण  व डोक्यावर उघडे सताड आभाळ . घरात एक स्टोव्ह, थोडी ॲल्युमिनियमची भांडी, वाकळा , गाद्या, चादरी व असंख्य बांधलेली कपड्यांची गाठोडी, अस्ताव्यस्त पसरलेली . बाजूला सार्वजनिक संडास व कोपऱ्यात बडबड करत, उचकत ,बांधत बसलेली वेडी आई . तर भाऊ न सुटलेली गणितं सोडवत बसलेला .

           तरीही प्रसन्न मनाने तो संजीवनला निघताना एसटी स्टॅन्ड समोरच्या माझ्या घरी यायचा .व आम्ही शाळेला निघायचो . रस्त्यातून जाताना सकाळची कोवळ ऊनं, झाडांच्या , माणसांच्या सावल्या दाखवायचा, धुक्याचं वातावरण टिपायला, इमारतींवर पडलेला प्रकाश बघायला मला सांगायचा . चित्रात हे जिवंतपणा आणण्याची साधनं आहेत असं बोलत राहायचा . त्याला वाचनाची, लिखाणाची, चित्रांची, अध्यात्माची, गाण्याची एकंदर सर्व जीवनच समजून घेण्याची खूप ओढ होती. त्याला खूप खूप शिकून मोठं होण्याची आस लागलेली होती . तो त्या प्रयत्नात नेहमी असायचा .

              त्याच्याकडे शाळेची एकच ग्रे पँट व एकच सफेद शर्ट होता ,तर माझ्याकडे दोन ,त्या अर्थाने मी त्याच्यापेक्षा श्रीमंत होतो. आम्ही रोज शाळेतून आलो की लगेच कपडे काढून गादीखाली  घडी घालून ठेवायचो  . दुसऱ्या दिवशी सकाळी गरम तांब्या फिरवून शाळेच्या ड्रेसला इस्त्री करायचो . आम्ही कधी गेम्सच्या मैदानावर गेलो नाही कारण आमच्याकडे हाऊस टी शर्ट , हाफ पँट व शूज नव्हतेच .आमच्याकडे शाळेचा ब्लेझरही(कोट ) नव्हता . दहावीला राज्यपाल .व्ही.व्ही. गिरी आले होते. पण आमच्याकडे कोट नसल्यामुळे हिंदीच्या सिंगसरांनी आम्हाला वर्गातच बसवून ठेवले होते .

             घन्याला  गाण्यांची व मला चित्रांची  भारी आवड होती . त्यावेळी आमच्या दोघांच्याही घरी टिव्ही नव्हता . मग बाजारात मंडई मध्ये तर कधी कोणाच्या घरच्या खिडकीतुन, किंवा पत्र्याच्या  होल मधून आम्ही चित्रपट ऐकायचो, सफर, आराधना, चितचोर, गाईड, नमकहराम असे किती तरी चित्रपट  आम्ही पाहीले कमी ऐकले जास्त . त्यातली किशोरकुमारची गाणी मला आवडायची, मग मी घन्याकडे पाहायचो , त्याला सांगायचो. घन्या पटकन् तोंडावर बोट ठेवायचा व मला शांत राहायला सांगायचा. डोळे मिटायचा व गाणे संपताच  खिशातून कागदाचा तुकडा काढायचा व संपूर्ण गाणे न चुकता लिहून काढायचा . अशी अफाट व अलौकीक शक्ती मी घन्यातच पाहीली व अनुभवली . त्याची एक छोटी वही मी केली होती व आजही ती मी माझ्याकडे जपून ठेवलेली आहे .

           घन्याचे गाणे लिहून झाले की माझे अनेक प्रश्न सुरू व्हायचे . 

तु डोळे का मिटतोस ? 

तर शांतपणे म्हणायचा अरे, ते गाणे आपल्याला समजून घ्यायचे असले की डोळे मिटावे मग गाण्याचे शब्द , त्याचा स्वर, ताल, त्याची बांधणी, रचना, त्याची रागदारी, त्याच्यातील भावना, विषय, कवीची काव्यांतून सांगण्याची शैली सगळं आपल्याकडे येते . आपल्याला अनुभवता येते,मनात झिरपून जाते . मग शब्द कागदावर येतात .मी अचंबित व्हायचो की एकदाच ऐकलेले गाणे संपूर्ण कसे कागदावर आणता येते ? 

मी बऱ्याच वेळा तसा प्रयत्न केलाय पण मला एकदा ऐकलेले गाणे कागदावर कधी ते संपूर्णपणे न चुकता लिहणे जमले नाही . पण डोळे शांतपणे मिटून आवडलेले गाणे मात्र मी घन्याची फिलोसॉफी म्हणून आजही आठवणीने अमंलात आणतो .

            घन:श्याम व मी पुढे सायन्स शिकायला वाईला गेलो , सायन्स , गणित शिकणे , बेडकाचे पोट फाडून त्याची चिरफाड करुन पचनसंस्थेचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीची रसायने एकमेकांत मिसळणे , लॉग बुकचे मोठे आकडे शोधत रहाणे , सायन्सच्या प्रयोगशाळेत ना आवडीची कामे करत राहणे, हा आमचा  नावडता कार्यक्रम होता. मग आम्ही एसटीतून गाडी थांबवून वाईच्या रस्त्यात घाटातच बऱ्याचदा उतरायचो .मी सगळ्या घाटातील झाडांची चित्रे रेखाटायचो तर घन्या गाणी , कविता, वाचन , लिखाणकाम करायचा . त्याच्या त्या अफाट बुद्धीमत्तेचा मला हेवा वाटायचा . त्याला विचारले तर सहज म्हणायचा 

" मनापासून केले की सगळं येतं " .

 मग संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या जगण्याचं 

"सायन्स " शिकून , समजून घेऊन आपआपल्या घरी जायचो .

            असा हा घन्या बारावीला गणितात नापास झाल्याचा निकाल लागला व तो मनाने कोलमडूनच पडला . माझ्याकडे यायचाच बंद झाला, मी त्याला खूप समजावयाचा  प्रयत्न केला, धीर दिला, चेतना दिली, आधार दिला . पण त्याने कोणाचेच ऐकले नाही . माझ्यावर चिडायचा, टाळायचा, दूर कोठेतरी जावून एकटाच भटकत राहायचा . आपण एका विषयात नापास झालो  हे त्याला, त्याच्या बुध्दीला, पटायचेच नाही . 

तो आत्महत्या करायचा प्रयत्न करायला लागला . मग मी त्याच्यावर रागवायचो, ओरडायचो, पण त्याच्यात काही फरक पडला नाही . इतका निराश वैफल्यग्रस्त घन्या मी कधीच पाहीला नव्हता . आपण नापास झालो या दुःखी भावनेने त्याला निराशेने प्रचंड आतूनच पोखरून काढले होते . सारखा स्वतःच्याच तोंडात तो चापटया मारायला लागला होता .

पश्चातापाच्या ........

            एक दिवस घन्याकडे दुपारी गेलो होतो . घन्याला खूप भूक लागली होती . त्याची वेडी आई तिथेच गाठोडी चिवडत, उचकत, मोठमोठयाने आपल्याच नादात, तंद्रीत बडबड करत बसली होती, तिचं आपल्या उपाशी लेकाकडं , त्याच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं, मोठी बहीण  चांगली कपडे नसल्यामूळे अंगावर चादर लपेटून निस्तेज व भकास चेहऱ्याने झोपली होती . घन्याला भुकेमूळे खूप राग आला होता तो त्याला कंट्रोल होत नव्हता . 

मी देखील त्याला मदत करण्याचे फक्त आश्वासन देत होतो . कारण मी कमवत नव्हतो . घन्याने सगळी भांडी आपटली, फेकून दिली, आईच्या समोर तिने बांधलेल्या गाठोड्यांवर लाथा मारल्या .व माझ्याकडे रागाने पाहून हातवारे करत तो म्हणाला  कशाला असे भिकाऱ्यासारखे जगायचे ? असं फालतू आयुष्य जगून काय उपयोग? असं जगण्यासाठी का आपण जन्म घेतलाय ? याला जगणं म्हणतात का ? 

मी फक्त  डोळ्यात पाणी आणून त्याला माझ्या घरी न्यायचा प्रयत्न करू लागलो . संतापाने त्याने मला ढकलून दिले .भूकेच्या तडाक्यातच शोधा शोधीत त्याला मिरचीचा लाल चटणीचा डबा सापडला . त्याने चटणीच खायला सुरवात केली .बकाबक तो मुठी भरून चटणी तोडांत कोंबत होता . मी डोळे फाडून त्याच्याकडे पहातच बसलो . तो मला अघोरी प्रकार वाटत होता , जवळजवळ अर्धा किलो तरी चटणी त्याने संपवली होती . मला वाटले त्याला आता  जुलाब होणार, किंवा पोटात तरी दुखणार , प्रचंड यातना होणार , हॉस्पीटल मध्ये न्यावे लागणार .पण घन्याला काहीच झाले नाही . सगळे मान , अपमान, दुःख, वेदना, गरीबी पचविण्याची ताकद त्याने  शरीरात  व मनात निर्माण केलेली होती . मग तो एकटाच राहू लागला व शांत राहून स्वतःशीच मुकपणे भांडत राहीला . 

अखेरपर्यंत ................. 

              एक दिवस तो माझ्या घरी आला एका बॉक्समध्ये त्याने १२वीची सर्व पुस्तके भरली होती . त्याच्या मनावर चेहर्‍यावर एक वेगळीच उदासिनतेची छटा मला जाणवत होती . 

माझ्याकडे का देतोस ही पुस्तके ? असे विचारले तर म्हणाला तुझ्याकडे ठेव, तुला उपयोगी पडतील . मी चाललोय आता .......... 

कुठे चाललास ? 

तर म्हणाला खूप लांब , आता कोणालाच परत भेटणार नाही . 

मी घाबरलो व त्याच्या पाठीमागे जावू लागलो तर मागे वळून म्हणाला .

असा किती दिवस पाठलाग करशील तू ? 

थकशील तु .

मी कधीच सापडणार नाही तुला . 

पण तु खूप मोठा हो . शहाणा हो , 

तुला आवडणाऱ्या चित्रकलेत वाहून घे स्वतःला .

जीव ओत चित्रांमध्ये, कधी हारु नकोस माझ्यासारखा, तू झगडत रहा, खूप वाचत रहा. प्रयत्न सोडू नकोस, आणि गाणी ऐकताना मात्र डोळे मिटत जा मग तुला समजतील अनेक गुपिते गाण्यातील व 

जीवन जगण्यातील सुध्दा ...........

            दुसऱ्या दिवशी  सकाळीच गावात गदारोळ उठला . सकाळचे दहा वाजले असावेत . कोणीतरी मला सांगितले घनःश्यामने गाव विहीरीत  उडी मारून जीव दिला. 

जिवाच्या आकांताने मी पळत सुटलो विहीरीकडे .खूप  वेगाने , काय कळतंच नव्हतं मला काय होतयं ते . शरीर,  मन, बुद्धी हातपाय सुन्न झाले होते.  

मी पाहीलेला माझ्या आयुष्यातील पहीला मृतदेह होता घन:श्यामचा, माझ्या सर्वात आवडत्या मित्राचा .पाण्यातून रात्रभर भिजलेला , ओलाचिंब झालेला. ज्याच्या बरोबर माझे सगळं बालपण घालवले तो घन्या आता शांतपणे ,निष्प्राणपणे पडलेला होता . त्याच्या अंगावर तोच कालचा आवडीचा ग्रे रंगाचा कित्येक वर्षाचा कोट होता . तो काहीच बोलत नव्हता ,मी त्याच्याकडे पाहीले त्याचे डोळे मात्र शांतपणे मिटलेले होते . कुठलंतरी आवडलेले गाणे ऐकतोय असे  वाटलं . मग मला वाटले तो आता तोडांवर  बोट ठेवेल  ,मला शांत राहायला सांगेल व कागदाचा

तुकडा काढेल व मला सगळं गाणं पुर्णपणे लिहून देईन . मला सांगेल डोळे मिटत जा गाणे ऐकताना . 

पण असं काही झालं नाही .

घन्या गेला होता माझ्यापासून , आपल्या सगळयांपासूनच खूप  लांबच्या अज्ञात प्रवासासाठी ........... डोळे मिटून .

             घनःश्यामच्या अंतयात्रेला मी गेलो नाही . माझी हिम्मतच झाली नाही .त्या हनुमान गल्लीकडे मी फिरकलोच नाही कितीतरी दिवस .

             पुढे मी कोल्हापूर , पुणे, मुंबई दिल्लीे येथे चित्रकलेच्या कामासाठी, शिक्षणासाठी गेलो. पाचगणीला माझे येणे कमी झाले. पुढे असेही कोणाकडून तरी ऐकले की घनःश्यामची उत्तरपत्रिकेची फेरतपासणी केली तर घन्या फर्स्टक्लास मध्ये पास होता . बोर्डाने काही तरी रिझल्टच्या कागदावर मिसप्रिंट झाल्याचे कारण दिले होते .ती निकालाची प्रत दुरुस्त करूनही दिली . 

पण 

माझा घन्या मात्र माझ्यापासून कायमचा मिस झाला होता . तो कधीही दुरुस्त होणार नव्हता . तो कायमचा  गेला होता . माझ्यासोबत असंख्य आठवणी ठेवून .

             माझ्या  संजीवनच्या वर्गात असलेल्या अनिता  टेंबेचे सुरेल आवाजातील  गाणे सुरु झाले की मी घन्याकडे पाह्यचो . तर घन्याने डोळे मिटून घेतलेले असायचे व मलाही तो डोळे मिटून घ्यायला सांगायचा पण मी झोपलेला दिसेन या भितीने डोळे मिटायचोच नाही , घन्या मात्र तल्लीन झालेला असायचा .

आज तीन तपानंतर ३६ वर्षानंतर आमच्या  संजीवनच्या ग्रुपची व्हॉटस् अपवर भेट झाली . 

अनिता टेबेंची ( आता तिचे नाव अनिता  यादव झाले आहे ) तिच्या आवाजात रात्री  तिने पाठवलेली गाणी ऐकायला सुरुवात केली . आता मात्र मी डोळे मिटून घेतले होते ,तर पहीलेच गाणे सुरु झाले .

मधूवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम, 

एकदा दर्शन दे घनःश्याम  , 

एकदा दर्शन दे घनःश्याम 

हे गाणे ऐकले  व माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी पाझरू लागले . ते थांबतच नव्हतं, इतका मी तर हळवा नाही मग हे पाणी का वाहतंय याचा  शांतपणे मी शोध घेत राहीलो . त्यावेळी जाणवले की अनिताच्या आवाजात आजही तीच अर्तता, स्वरांचा पक्का बाज, ठेका, ताल , शब्दफेक व काव्याची सुस्पष्टता, मंत्रमुग्ध होऊन भावना व्यक्त करण्याची जादूई सुरांची ताकद अजूनही  जिवंत आहे , आवाजाची धार तशीच टिकून आहे . वातावरण बदलून टाकायची त्या गाण्यांमध्ये ताकद आहे . 

घनःश्यामला ही गाणी खूप खूप आवडली असती . लगेच कागदाचा तुकडा काढून मला गाणी लिहून दिली असती व म्हणाला असता याला म्हणतात गाणे . अर्तता अशी असावी, गाणं असावं तर असं, जे हृदयाला भिडतं आणि हेलावून टाकतं संपूर्ण मन ऐकताना .

      तर अशी ही घन्याची आठवण, अशा असंख्य आठवणी घेऊन  आपण सर्वच जण जगत असतो. मी देखील कधी कधी वैतागतो, निराशा येते मलाही पण  मी हारत नाही, धडपड करत राहतो .यश मिळो ना मिळो . चित्रकाराचा काट्याकुट्यातील प्रवास करताना थकत  नाही  . वादविवाद , राजकारण फालतू विषय शक्यतो टाळतोच , कारण मग घन्या रागवेल माझ्यावर . व फालतू पोकळ कारणं घेऊन उगीचच भांडत बसल्यावर निषेध करेल तो माझा .

        पण आता असं वाटतंय घन्या जिवंत असता तर किती मजा आली असती . माझी चित्रे , माझी गाडी , माझं घर पाहील्यानंतर म्हणाला  असता याला म्हणतात चित्रं काढणारा चित्रकार . कारण माझ्याकडे काहीच म्हणजे काहीच नव्हते .एकदम शुन्य , झिरो होतो . आज आठवतयं मग भांडला असता संजीवनशाळेच्या भट्टाचारी सरांशी ज्यांनी मला इंटरमिजिएट परिक्षेला डे स्कॉलर होतो म्हणून रिजेक्ट केले . चित्रकलेच्या ग्रेड परिक्षेला  बसूनच दिलं नाही . आणि म्हणाला असता ग्रेड परिक्षा घेऊन काय चित्रकार होता येते का?

        आपल्या सर्वांना देखील, म्हणाला असता कधी तरी  प्रत्यक्ष भेटता, व्हॉटसअपवर व फेसबुकवर एकमेकाला मेसेज पाठवता आणि कोणत्या तरी विषयावर उगाचच जीवाचा आटापिटा कशाला करता ?

आता विसरू नका एकमेकानां . 

भेटत रहा अधून मधून . 

हारू नका .

जिद्द सोडू नका .

वादविवाद , आपआपला मोठेपणा सोडा .

तुझं माझं सोडा,एकाच लेव्हलवर या सर्वांचा मान आदर ठेवा . 

कारण रागात किंवा भावनेच्या भरात एक चुकीचा शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टीनां एका क्षणात संपवून टाकतो .आयुष्यभर एखादयाला विषासारखा टोचत राहू शकतो . 

म्हणून अधून मधून डोळे मिटत जा  

 आपल्या आवडीची गाणी ऐका , चित्रकारांची चित्रे पहा , मग नीटपणे कळतील .त्या गाण्याचा  चित्रांचा आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा कलांचां सार लक्षात घ्या, प्रत्येक गाणं , प्रत्येक चित्र , संगीत , वाद्य, आनंदासाठी निर्माण केलं आहे,. एकमेकानां मनसोक्त आनंद दया व घ्या . 

जीवनाची अनेक गाणे गाऊन झाल्यावर सगळ्यानां एक गाणे मात्र गावे लागते . शेवटचे अंतिम गाणे ..... 

घन्या आतच बसलाय जाऊन माझ्या हृदयात ,

खूप खोल . 

खूप खोलवर 

डोळे मिटून ... ..... ...... ...... .......

😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌


सुनिल काळे 

9423966486.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...