गुरुवार, ६ जून, २०२४

माझी कोकणनिसर्गयात्रा


 माझी कोकण निसर्गयात्रा

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

          मी कोल्हापूरला फौडेंशन शिकायला गेलो त्यावेळी अनेक जुन्या चित्रकारांची कामे तेथे पाहता आली.टाऊन हॉलच्या म्युझियममध्ये वडणगेकरांची ,एस .एम काझी, बाबुराव पेंटर, रविन्द्र मेस्त्री, यांची चित्रे पाहायला मिळायची, शिवाजी पुतळ्याजवळ डॉ. काटे यांच्या दवाखान्यात आबालाल रहिमान, आणि जी.डी.पॉलराज यांचे दुपारच्या उन्हांचा इफेक्ट दर्शवणारी एक अप्रतिम कलाकृती होती. पुढे अभिनेता व निसर्गचित्रकार चंद्रकांत मांडरे यांची चित्रे पाहून आपणही निसर्गचित्रकार व्हायचे असे मनातून शिक्कामोर्तब झाले व नंतरच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्यात आलो........
               पुण्यात इलेमेंटरी या वर्गात प्रवेश घेताना कोणीतरी सांगितले जगण्यासाठी कमर्शियल आर्टमध्ये खूप पैसे मिळतात, फाईन आर्टवाल्यांची हालत खूप खराब असते व मी घरातून पळून जाऊन शिक्षण घेत असल्याने मला पैसे आवश्यक होते म्हणून मी कमर्शियल आर्टला जाण्याचा निर्णय घेतला.
            आणि इथेच मोठी चूक झाली. कमर्शियल आर्टमध्ये लोगो ,सिम्बॉल, जाहिरात, इलेस्ट्रेशन , प्रॉडक्ट फोटोग्राफी, कॅलिग्राफी, लेटरींग, इ. विषय कार्पोरेट जगताशी निगडीत असल्याने माझा निर्णय चुकला आहे हे मला लवकरच कळून चुकले. पण आता निर्णय बदलणे शक्य नव्हते. त्यावेळी मी विद्यार्थी साहाय्यक समितीत राहत होतो. माझ्याकडे सायकल नव्हती. समितीतील सकाळची योगासने, अल्पशी न्याहरी झाली की मी चालत निघायचो....1986 च्या काळात पुणे बऱ्यापैकी शांत होते. मी चालत फर्ग्यूसनच्या रस्त्यावरुन लकडी पुलावर यायचो सकाळच्या प्रहरात सात वाजता पुलावरून बालगंधर्वचा पूल, डेक्कनचा परिसर, मुळामुठा नदीचे पात्र दाट धुक्याच्या धुसर वातावरणात प्रसिद्ध चित्रकार मोने व टर्नरच्या चित्रांची आठवण करून द्यायचे व मग भारावलेल्या अवस्थेतच मी टिळक रोडच्या अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट शिकायचो.......... शिकायचो म्हणजे टाईमपास करायचो मनात, डोक्यात मात्र निसर्गचित्रांचाच ध्यास असायचा. सकाळचे वातावरण, पिंगा घालायचे. सुट्टीत पाचगणीला गेल्यावर परिसरात भटकत दिवसभर जलरंगातील निसर्गचित्रे रेखाटत बसायचो...... दोन वर्षात अशी बरीच निसर्गचित्रे मी काढली होती.......
              इंटरमिजिएटच्या दुसऱ्या वर्गात असताना अनेक मित्रांनी मला बालगंधर्वला प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहन दिले........ त्यातल्या संजय कांबळे, सुरेश वरगंटीवार, महेन्द्र ( हनुमंत ) तोडकर, या मित्रांची खूप मदत झाली. त्यावेळी बालगंधर्व मध्ये प्रदर्शन करत असताना भिंती अतिशय खराब होत्या त्यासाठी सकाळ पेपर्समधून पांढरा न्यूज प्रिंट पेपरचा रोल आणावा लागायचा. मग खळ तयार करून तो पेपर प्रथम चिकटवयाचा . मग पांढरी पार्श्वभूमी तयार व्हायची. मग त्यावर चित्र प्रदर्शन करायचे .... 
गॅलरीचे भाडे, फ्रेमिंग, प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका, पत्रिका पोस्टाने पाठवावी लागायची त्याचा खर्च वेगळा, उदघाटनाचा कार्यक्रम, बॅनर्स ... प्रसिध्दी माध्यमे इ.इ प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खर्च म्हणजे एका नव्या लग्नाचाच सोहळा पूर्ण केल्यासारखा खर्चिक प्रकार असतो...........अशातच माझा मित्र, संजय कांबळे माझ्या खूप मागे लागला की तू प्रदर्शन करच मी सर्व गोष्टी करीन, तू फक्त चित्र काढून तयार ठेव.

          आपल्या कामामुळे कधी कधी आपल्या खऱ्या मित्रानां आपल्याविषयी खूप आत्मीयता, प्रेम असेल तर अशक्य त्या गोष्टी शक्य होतात. स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण होतात. असे खूप स्नेही, जिव्हाळ्याचे मित्र, शिक्षक, व हितचिंतक मला वेळोवेळी मिळाले त्यांचा मी नेहमीच आभारी आहे त्यांच्या मदतीमुळेच मी थोडेफार यश मिळवू शकलो.

          शिकत असतानाच इंटरमिजिएटच्या 
सन १९८८ साली माझे पाचगणी परिसरातील निसर्गचित्रांचे  The Echoes of Sahydri या नावाचे प्रदर्शन पार पडले. प्रा.मिलिंद फडके यांनी त्या प्रदर्शनाचे नाव ,आमंत्रण पत्रिकेचा व पेपरचा मसुदा खूप प्रेमाने तयार करून दिला.
मी फक्त पाचगणी, महाबळेश्वर व वाई परिसरातीलच चित्रे रेखाटली होती. प्रत्येक चित्राखाली थोडीफार प्रत्येक स्पॉटची माहीती ही लिहली होती. खूप जणांनां ते प्रदर्शन आवडले होते. 
         प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी एक कोकणातील वयोवृध्द गृहस्थ आले. त्यानां खूप आवडले होते प्रदर्शन पण ते खूप नाराज ही झाले होते. मी कारण विचारल्यावर म्हणाले तुम्ही कोकणातील एकही चित्र काढले नाही, कोकणात समुद्र, नारळाची झाडे, होडया, बोटी, जलदुर्ग,यांचे चित्रण का केले नाही ?
तुम्ही पुढचे प्रदर्शन फक्त कोकणातील चित्रांचेच झाले पाहीजे, तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला शपथ आहे, असे वारंवार म्हणू लागले. मी देखील त्यानां पोकळ आश्वासन दिले .व नंतर विसरूनही गेलो. पण कधीतरी कोकणात जाऊन समुद्राची चित्रे काढण्याचे मनाने नक्की केले होते.
           अॅडव्हान्सच्या चौथ्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत मी कोकणात जायचे नक्की केले. पण अचानकपणे ठरवल्यामूळे जाण्यासाठी पैसे नव्हते. मग एके दिवशी अभिनव कला महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये मधल्या सुट्टीत गेलो. सर्व प्राध्यापक चहा पीत होते, मी सर्वानां नमस्कार केला आणि अवसान आणून मी कोकणात पायी चालत निसर्गचित्रे काढण्यासाठी जाणार आहे , मी मोठ्ठा चित्रकार झाल्यावर तुमचे पैसे परत करीन आता तुम्ही कृपया मदत करा अशी हात जोडून विनंती केली...... क्षणभर थोडे वातावरण गंभीर झाले, पण माझ्या प्रामाणिक आव्हानांमूळे प्राध्यापकांनी त्यांच्या पाकीटाला हात घातला. व सगळ्यांनीच कमी जास्त रुपये माझ्या झोळीत टाकले. एका मिनिटात दोन हजार रुपये टेबलावर तयार झाले. आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या..........
         मी खूप मोठ्ठा चित्रकार म्हणून प्रसिद्ध झालो नाही पण त्या सर्व प्राध्यापकांचे खूप मोठे आशिर्वाद, प्रेम व विश्वास मला आयुष्यात काहीतरी सतत चांगले काम करत राहीले पाहीजे याची सतत प्रेरणा देत राहीले.
पुढे आणखी काही चित्रकार मित्र, व इतर जणांनी आणखी दोन हजार रुपये मिळवून दिले व तीस दिवसांच्या कोकण निसर्गयात्रेची मी तयारी करू लागलो. 
         काही वर्गातल्या मित्रानां विचारले पण दिवाळीचा फराळ खायचा सोडून ही नस्ती बिनकामाची भटंकती कोण करणार म्हणून कोणीही यायला तयार झाले नाही शेवटी मी एकटयानेच जायचे नक्की केले.........

             कोकणात जायचे कसे ? राहायचे कसे ? कोणत्या गावांना भेट दयायची याचा मार्गदर्शन नकाशा, प्रा. प्र .के घाणेकर यांनी करुन दिला. सातारचा हॉस्टेलमध्ये राहणारा इंजिनियरींगच्या कॉलेजचा मित्र दिनेश पवार याने एक छोटा कॅमेरा मिळवून दिला, कोणी ट्रेकिंगची बॅग दिली, कोणी पाण्याचा थर्मास दिला, एका मित्राने स्वतःचा चांगला बुट दिला...... अशी जय्यत तयारी करून मी निघण्यासाठी सज्ज झालो.............

          मित्रांनो ,आपण ज्यावेळी कोणताही प्रामाणिक, चांगला, व आंतरमनाच्या आतून खऱ्या हेतूने एखादा संकल्प करतो त्यावेळी आकाशातील बाप कृतार्थपणे अडचणींचे काटे आपोआप दूर करतो. याचा मला त्यावेळी अनुभव आला. 

सत्य संकल्पाचा दाता नारायण !
पूर्ण करील सर्व मनोरथ !

              भटकंती करणारे लेखक ,प्रा. प्र.के. घाणेकर यांनी मला मार्गक्रम आखून दिला होता. माझी व त्यांची काहीच ओळख नव्हती पण माझ्यापेक्षा त्यानांच माझा उपक्रम खूप आवडला होता. एक चित्रकार विद्यार्थी पायी तीस दिवस जावून कोकणातील चित्रे काढणार याचे त्यानां खूप कौतुक वाटत होते. मला सगळ्या सविस्तर सुचना ते अगदी प्रेमाने ,काळजीने व उत्साहाने करत होते. हाताने नकाशे काढून देत होते. एकत्तीस वर्ष झाली तरी प्र .के घाणेकर सरानां मी विसरलो नाही. अशी उर्जावान माणसे प्रवासात सतत दिपस्तभांसारखी सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात...........

         मी महाराष्ट्राचा नकाशा आणला व त्याप्रमाणे प्रथम दिवस अलिबागचा ठरला होता. एसटीने अलिबागला जायचे आणि कुलाबा किल्ला पाहायचा आणि चित्र काढायचे असे ठरले होते. सकाळची सहाची एसटी पकडून मी अलीबागला पोहचलो. एसटी स्टॅन्डवरच थोडा नाश्ता पाणी करून मी अलिबागच्या किनाऱ्यावर आलो. आणि थक्क झालो........ बापरे.....एवढा मोठ्ठा समुद्र, आणि सगळीकडे पाणीच ........पाणी...... नजर पोहचत होती तेथपर्यंत प्रचंड पाणी. मी खूपच भारावलो होतो. हे दृश्य मला नवे होते . त्यावेळी भरती ओहोटीच्या वेळा नक्की विचारून मी कुलाबा किल्ल्यात प्रवेश केला.
माझ्यासाठी हा खूप भारी वेगळा अनुभव होता. मी उत्साहीत झालो होतो.समुद्राच्या लाटांचा आवाज, नारळाची उंचच झाडे, आणि नजर पोहचेल तेथे पर्यंत पाणी. भारावलेल्या अवस्थेतच मी माझे लँडस्केप पॅड काढले, स्केच केले व जलरंगात या तरल अनुभवाला मी साकारण्यात मी मग्न झालो. मी दुपारचे जेवण करण्याचेही विसरलो व सलग एकानंतर एक अशी चार चित्रे मी वेगवेगळ्या अँगल्सनी पूर्ण केली होती...... हळूहळू अंधार पडू लागला आणि आता भरतीची वेळ होईल असे कोणीतरी सांगितले ...........मी चित्रकाम थांबवले, आणि मागे पाहताच त्या व्यक्तिने स्वतःहून माझे टाळया वाजवून अभिनंदन केले. खूप छान चित्र झाले आहे म्हणून कौतूकही केले. मी कोण ? कोठून आलो ? कोठे जाणार याची चौकशी केली. मी अभिनव कॉलेजचा विद्यार्थी असून दिवाळीत घरी न जाता तीस पस्तीस दिवस पायी कोकणातील चित्रे काढणार आणि मी एसटी स्टॅन्डवर झोपणार, माझी जेवणाची राहण्याची सोय नसताना माझी जिद्द पाहून त्याने मला कडकडून मिठी मारली आणि सोबत येण्याची विनंती केली..........
त्या व्यक्तीचे नाव जयंत धुळप.........
जयंत हा त्यावेळी लोकसत्ताचा पत्रकार होता, व अलिबागचा रहिवासी होता. आता सध्या तो पुढारी पेपरचा रायगड आवृत्ती प्रमुख आहे.
जयंतने मला प्रेमाने त्याच्या धुळप वाडयातील घरी नेले. आई,वडीलांची ओळख करून दिली, माझी चित्रे दाखवली व मी तीस दिवस पायी फिरणार म्हणून खूप कौतुकही केले. त्या सर्वांनीच आज आमच्याकडेच मुक्काम कर असा आग्रहच केला. मग त्यांचा आग्रह पाहून मी ही तयार झालो. त्या रात्री जयंतच्या घरी अलिबागचे माशांचे कालवण, सोलकढी, मच्छी फ्राय खाल्लेली अविस्मरणीय चव आजही लक्षात आहे. जेवणानंतर जयंत व मी खूप उशीरापर्यंत गप्पा मारत होतो. जयंत एक हरहुन्नरी, आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे , सामाजिक कार्याची त्याला आवड आहे .त्याने दुसऱ्या दिवशी त्याचे मित्र राजू सिनकर व शेखर दोंदे यांची ओळख करून दिली, राजू फोटोग्राफी खूप छान करायचा त्यामूळे त्याला खूप चांगले स्पॉटस माहीत होते . खूप पेन्सील स्केचेस केली, त्यादिवशी एकत्रच चहा, नाश्ता, जेवण व खूप कलेविषयी गप्पा मारता मारता आम्ही अनोळखी असताना पक्के मित्र कधी झालो हेच कळले नाही व कोकणी माणसात एक प्रेमळ भाव ,आपुलकी कशी जोपासलेली आहे त्याचाही अनुभव मला आला.
तुम्ही मनाने सच्चे, दिलदार व स्वच्छ असाल, तुमच्या कृती व्यावसायिक लागेबांधे जोपसणाऱ्या नसतील तर ह्या मैत्रीला कधीही बाधा निर्माण होत नाहीत ती चिरंतन टिकते आजही जयंतची मैत्री अशीच टिकून आहे.

          दुसऱ्या दिवशी मी जंजिरा किल्ल्यावर जाणार होतो .जयंतने प्रेमाने निरोप दिला व एसटी स्टॅन्डवर झोपायचे नाही, दोन वेळचे जेवण वेळेवर घ्यायचे, संपर्कात राहायचे इ . इ
अनेक सुचना केल्या. जनू माझी व त्याची वर्षानुवर्षांची ओळख होती. त्याचा निरोप घेताना त्याने सांगितले जंजिऱ्याच्या चित्रकामानंतर त्याचा मित्र विनोद नरवणकरकडे राहण्याची जेवण्याची सोय केली आहे तेथे जाण्याचा नकाशा देखील त्याने काढून दिला.........

              जंजिऱ्याच्या किल्ल्यात जाण्यासाठी मी एक बोट पकडली, त्या बोटवाल्याला मी चित्र काढण्यासाठी आलो आहे व मला नंतर संध्याकाळी न्यायला ये असे सांगितले. जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताच मी विस्मित झालो, अभेद्य खडकावर व चारी बाजूला पाणी , दगडांमध्ये बांधलेला तो किल्ला, आतील तोफा, त्या किल्ल्याच्या आतील इमारताचे जीर्ण, पडलेले अवशेष ,अफाट समुद्र पाहून काय रंगवू ? काय चित्रित करू ? असे होऊन गेले . फार कमी माणसे असल्यामूळे मी निवांतपणे पाच सहा डिटेल,पेन्सील व पेनमध्ये स्केचेस केली. दोन तीन जलरंगातील चित्रे काढली संपूर्ण किल्ला फिरलो आणि एका अविस्मरणीय दिवसाची सांगता झाली. संध्याकाळी बोटीचा माणूस आला, त्याने किनाऱ्यावर पोहचल्यानंतर माझी चित्रे, स्केचेस पाहीली व प्रेमाने मिठी मारली, खूप विनंत्या करूनही त्याने बोटीचे पैसे घेतलेच नाही, उलट मला विनोद नरवणकरच्या घरी पोहचते केले.
विनोद साईन बोर्ड रंगविण्याचे काम करायचा माझी चित्रे पाहून त्याने जेवणाची व राहण्याची उत्तम सोय केली. परत रात्री मासे, चपाती, भाताचे जेवण. रात्री भरपूर गप्पा व उत्तम पाहुणचार केला. 

               त्या तीस दिवसात मी इतके मासे खाल्ले असावेत की शरीरात आजही मला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही.

             ही असते कलेची ताकद, कला माणसाला जिवंत ठेवते, कला कलाकाराला जिवंत ठेवते आणि कलाकाराची कला समाजाला एकत्र जोडून ठेवते, कला कलाकाराचे अनुभवविश्व समृद्ध करुन टाकते आणि जगणे सुखकर करत जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो...... 
कोण ? कुठला ? मी पण या परक्या लोकांबरोबर भरभरून प्रेमळ जीवाभावाची नाती निर्माण होत होती , हातातील कलेशिवाय हे कसे शक्य झाले असते. ? कला माणसाला माणसाशी माणुसकीने जोडते प्रेम वाढवते.
पुढचं गाव होतं दाभोळ............ आणि निघतानाच विनोदचा पाहूणचार घेऊन निरोप घेतानाच त्याने दाभोळच्या अण्णा शिरगांवकरांचे कार्ड हातात ठेवले आणि तेथे आवर्जुन जाण्याची अट घातली. दाभोळला जाताना प्रचंड मोठया बोटीतून सगळी माणसे, मोटारसायकली, मोटारगाडया एवढया मोठया बोटीत टाकल्यानंतर ही बोट बुडेल की काय अशी शंका माझ्या मनात आली आणि मी आचंबित झाल्याचे आठवत आहे . 
              दाभोळच्या मशिदी, समुद्राची चित्रे काढून संध्याकाळी मी अण्णा शिरगांवकरांच्या सागरपुत्र या वसतिगृहात गेलो. त्यांचे साहाय्यक व स्वत: अण्णानीच स्वागत केले. चहापाणी देऊन जेवणाची व राहण्याची सोय केली. अण्णा शिरगावकरानां अॅटींक वस्तूसंग्रह करण्याची आवड होती. दाभोळचे ते आदरणीय , प्रसिध्द व्यक्तिमत्व होते. समाजातील सर्व स्तरामधील मुलानां शिक्षण घेताना राहण्याची सोय अल्पदरात व्हावी म्हणून ते ' सागरपुत्र ' नावाचे वसतिगृह चालवत होते. त्यांना माझे खुपच कौतुक वाटले, त्यांनी त्यांचा सर्व संग्रह दाखवला. आणि त्यांनी त्या रात्री मी दाभोळ वरुन निघाल्या नंतर कोठे कोठे जायचे प्रवासात कोणाकडे जायचे राहायचे याची मोठी लिस्ट दिली. पायी गेलो तर खूप प्रदेश पाहता येणार नाहीत याची जाणीव करून दिली आणि रिक्षा, बैलगाडी, छोटया जीप गाडया यातूनही यापुढे थोडा थोडा प्रवास करावा म्हणजे थकवा येणार नाही, आरोग्य बिघडणार नाही, काळजी घेण्याची तंबीच दिली. खूप प्रेमाने निरोप दिला ( कालांतराने पुढे मी ज्या वसतिगृहात राहत होतो तेथेही ते भेटावयास आले )
मी प्रत्येक दिवसाची हकिकत व कोठे राहीलो , कोणाकडे राहीलो त्या माणसांविषयी आता सांगत बसणार नाही कारण तो मोठा रामायण, महाभारतासारखा मोठा ग्रंथच तयार होईल. पण एका गावात पोहचलो की पुढचा माझा मुक्काम कोठे करायचा याची आपोआप तजवीज व्हायची व मी निवांतपणे इच्छित स्थळी सुखरूप पोहचत असे. मोठा अजब प्रकार वाटत होता सगळा.

            परंपरागत मार्गावरून चालण्यातच मानन्यात अनेकांना समाधान वाटते. थोडी वाट वाकडी करून दुसरीकडे पाहाण्याची तयारी नसते. मी मात्र नेहमीच अशी वाकड्या वाटेवरुन प्रवास करण्याचे धाडस केले. कधी पडलो, कधी सावरलो.

              कोकणात मी एकही दिवस,फलाटावर , रस्त्यावर, वाईट अवस्थेत झोपलो नाही, उपाशी राहीलो नाही, उलट मासे खाऊन चार पाच किलो वजन वाढून सुदृढ झालो. अशा अनोळख्या गावात जाऊन प्रवास करताना फार मोठे वाईट अनुभव आले नाहीत.

          अलिबाग , जंजिरा, दाभोळ, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, सुवर्णदुर्ग, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, राणेवाडी, कोळथरे, देवगड, कुणकेश्वर, मालवण, सिंधुदूर्ग, विजयदूर्ग,सांवतवाडी, पणजी, गोवा, जुने गोवा, गोव्याची मंदीरे या ठिकाणांना भेट देऊन माझे डोळे तृप्त झाले व मनाला समाधानही मिळाले. नवीन चित्रे ,स्केचेस काढली, नव्या लोकांशी ओळखी झाल्या. दिवाळीत एका घरी तर मला अगदी पहाटे उठवून चांगली सुंगधी उटण्याने अंघोळ घातली गेली व प्रेमाने सोबत मोठा फराळाचा डबा दिला तो दहा बारा दिवस पुरला.

अशा प्रकारे कोकणातील सफर मी धम्माल जगलो.

                 सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे चार हजार रुपये होते तसेच राहीले. त्या चार हजार रुपयांच्या जीवावर आमचे स्नेही, वामनराव ननावरे यांच्या बरोबर बडोद्याला गेलो. लक्ष्मी पॅलेस, फत्तेसिंग म्युझियम, राजा रविवर्माची गॅलरी, त्यांचा स्टुडिओ, पावागड, चित्र संग्रहालये, आर्ट कॉलेज, व इतर चित्र संग्रहालयांचा अभ्यास केला.

पाचगणी ,महाबळेश्वरचा परिसर सुंदर आहेच पण कोकणाचे सौंदर्य खूप निराळेच आहे.
 
              एकदा प्रवासात सुवर्णदुर्ग किल्ल्यात जाताना लहान होडीला लाटेमुळे मोठा धक्का बसला व कॅमेराच समुद्रात पडला ,नावडयाने उडी मारून तो शोधून काढला. पण कॅमेरा खारे पाणी गेल्याने नादुरुस्त झाला. मग डोळे व मनाचाच कॅमेरा केला. प्रत्येक दृश्य खूप खोलवर साचवायची सवय झाली.

                   खडकांवर वेगाने आपटणाऱ्या लाटा, बाजूला नारळ व माडांची उंचच उंच झाडे, खडकांचा नितळ कातळपणा, समुद्राचे भन्नाट वारे व नादभरा लाटांचा आवाज, कोळयांच्या होडया, कौलारू, लाल मातीची घरे, छोट्या छोट्या वाडया, आंब्याची झाडे, समुद्रा किनाऱ्यालगत चालताना होणारा मऊ भुसभुसीत स्पर्श,वाळूच्या पाऊलखुणा, खेकडे, कासवांच्या पावलांचे ठसे.तेथील प्रेमळ कोकणी माणसे आणि त्यांचा भरभरून केलेला पाहूणचार. उत्तम माशांचे जेवण व दिलदार स्वभाव मला कोकणात जायला नेहमी प्रेरीत करतो.
                या सर्व अनुभवांचे, चित्रांचे 
" The feelings of Nature " माझी कोकण निसर्गयात्रा "या नावाने १९८९ साली मोठे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाच्या आमत्रणं पत्रिकेचा मसुदा प्रा. मिलींद फडकेसरांनीच करून दिला. त्यांनी प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद दिला व वेळोवेळी मला सहकार्य केले . या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर नेहमीच प्रभाव राहीला.

                या प्रदर्शनालाही खूप चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्या वयोवृद्ध ग्रहस्थाने मला कोकणातील चित्रे काढण्यासाठी प्रेरीत केले होते त्यांनी प्रदर्शन पाहील्यावर घट्ट मिठी मारली व खूप खूप शुभ आशिर्वाद दिले. आणि माझी शपथ सुटली.

               नंतर पुढे २०१० साली परिस्थिती चांगली झाल्यावर मी परत एकदा स्वतःच्या गाडीने स्वातीसह कोकणात प्रवास केला खूप चित्रे काढली. आता माझ्याकडे खूप सुविधा होत्या, जयंत धुळपला अलिबागला आठवणीने भेटलो. आणि आमची मैत्री जागृत ठेवली
            परत घरी आल्यावर ही आणखी भरपूर चित्रे काढली व त्याचे २०११ ला जहाँगीर आर्ट गॅलरीत ऑडीटोरीयम हॉलमध्ये प्रदर्शन केले... या प्रदर्शनालाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि मी अनुभवाने आणि पैशानेही समृध्द झालो.

             माझ्या हृदयात कोकणासाठी एक वेगळा कोपरा आजही मी जपून ठेवला आहे .

केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार . असे एक वाक्य आहे व ते माझ्या या कोकणनिसर्ग यात्रेबाबतीत अतिशय चपखल बसले आहे......

                मला आमच्या एका विजय मांडके नावाच्या अत्यंत जवळच्या स्नेहीमित्राने एक महत्वाचा प्रश्न विचारला. की सुनील काळे , प्रवासात तुम्हालाच अशी आयझॅक, सन्यांशी, अशी माणसे भेटतात इतरानां का भेटत नाहीत. 
माझ्या जवळ या प्रश्नाचे उत्तर नाही मग त्यांनीच एक छोटे विश्लेषण करुन पाठवले. 

        होय वेगवेगळ्या रूपात आयुष्यात संधी , हाक प्रत्येकाला मिळत असते. पण ती संधी स्विकारण्याची, हाक ऐकण्याची फार कमी जणांची तयारी असते. तीनशे साठ अंशामध्ये फिरण्याची, फार कमी जणांची मानसिकता असते. आयुष्य हे सरळमार्गाने, सुरळीत ,सपाट मार्गानेच जावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते, वेडावाकडा ,चढउताराचा प्रवास कोणाला आवडत नाही. फार कमी लोक ही रिस्क घेतात. हा रिस्क फॅक्टर आयुष्याला मोठी कलाटणी देऊ शकतो. रिस्क घेण्याची तुमची तयारी पाहीजे.

 आपण प्रवास करताना वाईटच होईल अशा निगेटिव्ह विचारांनेच माणसे धास्तावतात व अर्धी लढाई मनानेच माघार घेतात.परंपरागत मार्गावरून चालण्यातच , रुढी परंपरा मानन्यात अनेकांना समाधान वाटते. थोडी वाट वाकडी करून दुसरीकडे पाहाण्याची तयारी नसते. मी मात्र नेहमीच अशी वाकड्या वाटेवरुन प्रवास करण्याचे धाडस केले. कधी पडलो, कधी सावरलो. पुन्हा उभा राहीलो.

              आपण सतत नवा ध्यास, नवी स्वप्ने, नवा मार्ग, नवा प्रयोग, नवे विचार, नवा प्रदेश पाहायला गेले पाहीजे, नव्या माणसांना समजून घेतले पाहीजे. हे सर्व करण्यासाठी रिस्क, चॅलेंज, व आव्हान मात्र स्विकारले पाहीजे.

          अशा रिस्क घेणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना, सर्व क्षेत्रातील कलाकारानां त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग सुयश मिळविण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शुभास्ते पंथान: संतू: ..... 
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे
Mob .No 9423966486
Sunilkaleartist@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...