ब्लॉग संग्रहण

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

रमेश गुजर शहा यांची छायाचित्रणाची " रंगयात्रा "

📸📸📸📸📸📸📸📷📷📸📸📸📸📸छायाचित्रकार रमेशभाई शहा गुजर यांची  "रंगयात्रा "
📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸
      रमेशभाई शहा गुजर यांची भेट झाली त्याला आता सदोतीस वर्ष पूर्ण झालीत . पूर्वी हाताने कॅलिग्राफी करून स्क्रीन प्रिंटिंग करून वेगवेगळ्या निमंत्रणपत्रिका , व्हिजीटींग कार्डस ,मेनूकार्डस , लग्नपत्रिका , शुभेच्छापत्रे केली जात असत . त्यामुळे कलाकार , पेंटर यानां भरपूर काम असायचे . साईनबोर्ड , गाड्यांच्या नंबरप्लेटा , छत्र्यांवर नावे टाकणे , निवडणूकीचे बॅनर्स ,शाळेची सुभाषिते , कार्यालयांमधील नावांच्या पाट्या , ग्रामपंचायतीचे सदस्यांची नावे सुद्धा पेंटरच लिहीत . पेंटरानां काम उरकताना थकवा येईपर्यंत कामे असत . पुढे फ्लेक्स, संगणकक्रांती , अे आय मुळे कलाकार पेंटर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .
           श्रीपाद भोसले नावाच्या माझ्या मित्राने एक निमंत्रणपत्रिकेचे काम दिले . स्कायलाईन आर्किटेक्ट या ऑफिसच्या उदघाटनाची ती पत्रिका कॉलिग्राफी करून स्क्रीन प्रिंटींग करून द्यायचे ते काम श्री . रमेशभाई गुजर यांचे होते . 26 जाने 1989 हा तो दिवस त्यावेळी मी अभिनव कॉलेजला शिकत होतो . ग्रे कलरची पत्रिका त्यानां फार आवडली पण त्या पत्रिकेवर वर लाल रंगांत श्री शब्द नव्याने लिहिण्याची त्यांच्या कुटुंबाची इच्छा झाली म्हणून त्यांनी ऑफिसला बोलावले . लाल रंगाने मग सगळ्या पत्रिकेवर श्री लिहावे लागले . आणि तेथेच रमेश गुजर माझे मित्र झाले . त्यांच्या आणि माझ्या वयात वीस वर्षांचे अंतर असूनसुद्धा आम्ही मित्र झालो . मित्र होण्यासाठी वय महत्वाचे नसते तर " मित्रप्रेम " महत्वाचे असते त्यामुळे आजही आमची मैत्री टिकून आहे .
            रमेशभाई मूळचे मुंबईचे पण त्यांची पत्नी पुण्याची असल्याने ते पुणेकर झाली . प्रविणाभाभी , मुलगा कपिल , मुलगी क्षमा या चौकोनी कुटूंबात कधीकधी मी सामील झालो ते कळलेच नाही . आपले सर्व रक्ताची नाती असलेली माणसे ज्यावेळी आपल्याला टांग मारतात तेव्हा देवाला दया येते मग तो असे मित्रत्वाच्या रूपाने नवे नातेवाईक पाठवतो . कॉलेजला कधी सुट्टी असली की ते मला त्यांच्या बांधकामाच्या साईटवर न्यायचे , कधी मुळशीच्या फार्महाऊस चक्कर मारायचे , ओशो रजनीश, थोर लोकांचे विचारमंथन तर कधी गाण्याच्या कॅसेट ऐकवायचे . त्यावेळी एक गोष्ट त्यांच्याकडे नेहमी हातात असायची ती म्हणजे कॅमेरा .
          त्यांचे मामा परेश जोशी स्वतः कलात्मक वृत्तीचे होते त्यामुळे हे दोघे मामाभाचे कधी दुबई , कधी राजस्थान , गुजरात , गोवा, कंबोडिया , कतार , श्रीलंका असे देशपरदेशात सतत फिरत राहायचे . माझ्या प्रत्येक चित्रप्रदर्शनाला ते आवर्जून यायचे . माझ्या प्रदर्शनाचे उदघाटनाची फोटोग्राफी करणे हे काम कित्येकवर्ष त्यांनी मनापासून स्विकारले कारण माझ्याकडे कॅमेराच नव्हता .
          पाचगणी महाबळेश्वर कोकण पुण्याचा सभोवताल व मग पुढे नेपाळ , लेह ,लडाख मग मायक्रो फोटोग्राफी करण्यासाठी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कधी मध्यप्रदेश कधी उत्तरप्रदेश असे करत त्यांनी भारतभर व पुढे इंग्लंडपर्यंत भम्रंती केली आहे .
          1990 साली मी माझ्या चित्रांचे प्रदर्शन दुसरे प्रदर्शन बालगंधर्वला भरवले होते . त्यावेळी बालगंधर्वचे तीन दिवसाचे भाडे पाचशे रुपये होते . [आता पंधरा हजार रुपये आहे ] त्यावेळी मी त्यानां माझी पाच छोट्या आकारातील जलरंगातील चित्रे दिली . त्यामुळे धडपडणारा कलाकार म्हणून त्यांनी नेहमीच कौतुक केले . आमची ही मैत्री टिकून राहिली कारण आम्ही कधीही आर्थिक व्यवहार केलेच नाहीत
            तीनचार दिवसांपूर्वी अचानक त्यांची आमंत्रणपत्रिका आली . रंगयात्रा या शीर्षकाखाली दि. 26 , 27 व 28 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्वला भरणार आहे . प्रसिद्ध फोटोग्राफर श्री . विश्वास सोरटे यांनी त्या प्रदर्शनाचे उदघाटन केले . मला या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहायचे होते पण रविवारची पर्यटकांची गर्दी वाई ते सुरुरचे उखडलेले रस्ते पुणे येथील रस्त्यांचा नवनवा विकास ट्रॅफिकजाम यात अडकलो व उशीरा पोहचलो .
              बालगंधर्वला आता पार्कींगही 14 रुपये प्रति तास असते ही नवीन माहिती मिळाली . सहा तासांचे 84 रुपये झाले . निवांतपणे प्रदर्शन पाहिले . रमेशभाई आता एकोणऐंशी वर्षांचे आहेत . त्यांचे हे एकलप्रदर्शन प्रथमच भरवले आहे . माणसाला छंद हवेत मग म्हातारपणही कंटाळवाणे रहात नाही याची प्रचिती आली . या प्रदर्शनात अनेक उत्तमोत्तम फोटो आहेत . हजारो शब्दांत जे सांगता येणार नाही ते एका चित्रातून व्यक्त होते . अनेक पुणेकर , त्यांची मित्रमंडळी , नातेवाईक याच्यांमुळे प्रदर्शनाला तुफान प्रतिसाद मिळत आहे हे मला दिसून येत होते . रमेशभाई सर्वांना व्यक्तिगत भेटून शंकानिरसन करताना पाहून छंद , कला माणसाला नवनव्या मित्रमंडळींच्या ओळखी होतात . रसिकांनां असे सौजन्यशील कलाकार नेहमीच आवडतात .
            तेथे एक पुणेकर मॉडर्न मुलगी रमेशभाईनां विचारत होती तुम्ही कोणता कॅमेरा वापरता ? म्हणजे मला तसाच कॅमेरा घ्यायचा आहे . मग टेबलाखाली ठेवलेला त्यांचा कॅमेरा त्यांनी दाखवला . त्या कॅमेराचा त्या मुलीने फोटो काढला . मी हे सर्व दुरून पहात होतो . मनात म्हणालो . असे कॅमेरा हजारो जण विकत घेतात पण त्या कॅमेऱ्याच्या मागे एक दिव्यचक्षू असलेल्या रमेशभाईंची दृष्टी कशी घेणार ? आपल्याला वाटते महागडे रंगब्रश , कागद कॅनव्हास घेतला , मोठा कॅमेरा विकत घेतला , महागडा पेन घेतला , की आपण चित्रकार होणार , उत्तम फोटोग्राफर होणार , महान लेखक होणार पण असे होत नसते . त्यासाठी बऱ्याच वर्षांचा ध्यास लागतो , अभ्यास लागतो . निरंतर चांगला फोटो टिपण्यासाठी सतत हात डोळे व हृदय तत्पर तयार ठेवावे लागते . रमेशभाई यांच्या चित्रातून तो ध्यास दिसतो . गेली तीसचाळीस वर्ष पुणे फोटोग्राफर असो या संस्थेच्याबरोबर ते सक्रीय आहेत . त्यांचा हा ध्यास उत्तमोत्तम क्लिक घेण्यासाठी सतत धडपडत असतो . 
        पुणेकरांनो जर वेळ मिळाला तर आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्या ! कलाकार होण्यासाठी कलापदवी आवश्यक असते असे नक्कीच नाही. एका एकोणऐंशी वयाच्या तरुण छायाचित्रकाराचे हे प्रदर्शन नक्की आवडेल . उद्या 28 शेवटचा दिवस आहे .
चित्रकार -सुनील काळे✍️
942396486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई ]

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

टायगर सर - संजीवनचे न्यू देशपांडे सर

टायगर उर्फ संजीवनचे न्यू देशपांडे सर 
🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅

मित्र मैत्रिणींनो ,सप्रेम नमस्कार 💐🙏
      मी जिथे रहातो त्या गावातील गावकऱ्यांचा एक  ग्रूप आहे .  त्या ग्रूपमध्ये गावातील व आजूबाजूच्या परिसरातील छोट्या मोठया स्थानिक घटना ,कार्यक्रम कळविण्याची पध्दत आहे . त्यामुळे गावात काहीही कार्यक्रम असले की सर्वांना लगेच आमच्या गावकट्टयावर लिहिण्याची  सगळ्यानां खूपच घाई असते .
       आज मेणवली वेशीजवळ गंगापूरी नावाच्या भागात शेतात बिबटयाचा वावर आढळल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे . सगळेच गावकरी चिंतेत पडले आहेत . विशेषता ज्यांची घरे शेतात व गावाबाहेर आहेत त्यांना सावध व सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्यामुळे आम्ही गेट बंद करून भीतीने शांत गुपचूप राहण्याचा निर्णय घेतला .
       संध्याकाळी चारपाच वाजले असावेत अचानक गेटजवळ खूप मोठी हालचाल झाली . आणि एक पांढरी गाडी उभी राहीली . माझ्या जाधव नावाच्या मित्राने मला तातडीने फोन केला , ताबडतोब या ,लवकर या ,पळत या .मला वाटले आता आपले काही खरं नाही . मनात शंका आली की बिबट्या (टायगर ) आपल्या निसर्ग बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसरात आला की काय ? मग काय लगेच पळत धावत गेटजवळ गेलो .
      आणि जी शंका मनात होती तसेच झाले . समोर खरोखरच टायगर उभा होता. मी घाबरलो , तंतरलो , कासावीस झालो , क्षणभर माझा घसा कोरडा पडला . कारण प्रसंगच मोठा बाका होता .
पण करणार काय ?
आजूबाजूला पळून जाण्याची जराही सोयच नव्हती . शेवटी गेलो धावत आणि टायगरसरां समोर सरळ शरणागतीच पत्करली आणि पायाला स्पर्श करून मनःपूर्वक साष्टांग नमस्कार घातला .
       समोर अचानक सरप्राईज व्हिजिट देणारा टायगर हा साधासुधा नव्हता . ते माझे आठवी नववी व दहावीचे गणिताचे शिक्षक होते . गणित विषयात मी खूपच कच्चे मडके होतो . अंक बीजगणित नंबर्स दिसले की माझी तारे जमीन पर या चित्रपटातील ईशान सारखी अवस्था व्हायची . काही सुधारायचेच नाही . मनात सगळा गोंधळ व आत्मविश्वास शून्य व्हायचा . त्यात देशपांडे सर म्हणजे त्या काळातील चंगेझखान किंवा व्हिलन वाटायचे . त्यांचा तास आला की माझे हृदयाचे ठोके ठक ठक ठक वाढत जायचे व स्वतःला स्पष्टपणे ऐकू यायचे . लहानपणापासून आजही मला साधी साधी गणिते सोडवता येत नाहीत . आणि असे त्या काळात कर्दनकाळ वाटणारे सर मला भेटायला माझ्याच घरी आले होते . त्यानां पाहूनच क्षणार्धात प्रचंड घाबरगुंडी उडाली . मन आणि शरीर तात्काळ कंपित झाले . त्रेचाळीस वर्षांपूर्वीचे संजीवन शाळेतील सगळे प्रसंग आठवले . ती प्रसिद्ध कानपिळी आठवली . हदयाचे ठोके छातीत कंप पावून लंबकाप्रमाणे मोठमोठ्याने धकधक करू लागले . आता काय करू ? आणि काय नको ? अशी गंभीर परिस्थिती समोर उभी . मी पूर्ण बावचळून गेलो . कारण टायगर जिंदा था ! वह भी मेरे सामने .
      पांढऱ्या शूभ्र मिशा , तीच केशरचना , तेच दमदार हास्य , तीच करडी नजर . डोळ्यातील चमक धारधार पण त्या नजरेत आता कौतूक होते . प्रेम होते . आदर होता .
     टायगरने मला प्रेमाने मिठी मारली . मी क्षणभर थरारलो . वाघाने हात हातात घेतला . आणि माझी आर्ट गॅलरी , घराचा बागेतील परिसर , निसर्गरम्य टेरेस , घरातील सर्व चित्रे , स्केचेस डायऱ्या व स्टुडिओतील भिंतीवरची चित्रे पुन्हा पुन्हा पाहीली . त्या टायगरला आपला हा चेला आता खूप आवडू लागला होता . भले गणितात मी खूप मागे होतो पण कलेच्या क्षेत्रातील प्रगती खूप समाधान देणारी आहे असे टायगर सरांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकाने सांगितले .
टायगरसरांनी नंतर कौतुकाने स्वातीची दोन व माझी दोन चित्रे विकत घेतली . डाईनिंग टेबलवर छान 'टायगर' चहाचा आस्वाद घेतला . खूप जुन्या आठवणी निघाल्या .
        संध्याकाळी टायगरसर म्हणाले निघतो आता , उशीर झाला . पुण्याला कोथरूड येथे पोहचायचे आहे . पण तुला भेटून खूप खूप समाधान वाटले . पुण्याला आलास की नक्की ये ! आम्ही शाळेतील , शिक्षणक्षेत्रातील प्रसंगाची पुन्हा देवाण घेवाण केली . जुन्या पाचगणीच्या आठवणींमध्ये रमलो .
      टायगरसरांच्या या भेटीमुळे संजीवनचे सगळे दिवस पुन्हा आठवले . आमच्या शाळेतील अनेक सर्व मित्रमैत्रिणींची आठवण झाली . 
       शाळेत असताना टायगरसरांची जी भिती होती ती आता पूर्ण संपली . टायगर खूपच 'प्रेमळ' झाला होता . इतक्या विपरीत परिस्थितीतही मी जी थोडीफार प्रगती केली त्याचे कौतूक टायगरसरांच्या डोळ्यात दिसले . भरपूर मनसोक्त गप्पा झाल्या व छान निरोप समारंभ झाला . फोटोसेशन झाले . टायगरच्या सोबत त्यांची पत्नी व मुलगा राहूल होता .
    एकमेकांचा हात सोबत घेऊन गाडीत बसेपर्यंत टायगर कृतात नजरेने माझ्याकडे पहात होता .
     आता मला बिबट्याची किंवा टायगरची भिती वाटत नाही .
मी आता म्हणतो हा जिंदादिल टायगर आता "दोस्त माझा मस्त " आहे .
       आपण संजीवन शाळेतील आपण मित्रमंडळी सर्वजण नक्की टायगरला भेटू या !
कारण आपण सगळे साठीत पोहचलो आपला टायगर जरी आता म्हातारा झाला पण तंदुरुस्त आहे . खूप वर्षानंतर पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटले . शाळेतील दिवस विसरता येत नाहीत . आपल्या स्मृतीपटलावर मेंदूच्या एका कोपऱ्यात या आठवणी कायमच्या एखादी लेण्या कोरल्यासारख्या जाग्या असतात .
       असे शिक्षक ,मार्गदर्शक आपले खरे हितचिंतक असतात . त्याच्यांमध्ये प्रेम जिव्हाळा माया ओसंडून वहात असते . त्यांनी आपल्या जीवनात माणूसकीचे रंग भरलेले असतात . जीवन समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान असते ते कधीच विसरता येत नाही .
अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वबळावर झेप घेण्यासाठी उतुंग भरारी मारण्यासाठी पंखात ताकद निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झिजलेल्या टायगर उर्फ एस .डी . देशपांडे सरांना खूप मोठे निरोगी दिर्घायुष्य मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना !
     आता आम्ही पुन्हा नक्की भेटायला येऊ शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी सोबत .

        एक जबरदस्त सरप्राईज व्हिजीट दिल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद सर ! 🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐
आपण पूर्वी व आता यापुढेही कायम सर्वांचे प्रेरणास्त्रोत्र राहणार आहात .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चित्रकार -सुनील काळे
1982 मराठी बॅच 
संजीवन विद्यालय पाचगणी .
[निसर्ग आर्ट गॅलरी -वाई ]

ऑर्थरसीट पॉईंट महाबळेश्वर - एक थरारक अनुभव

ऑर्थरसीट पॉईंट : एक थरारक अनुभव 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟                  महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्राची खूप प्रसिद्ध व नि...