*मॉर्निंग वॉक*
🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊🦜🦅🕊
आज मॉर्निंग वॉकच्या रुटीनप्रमाणे आता या ठिकाणी मी निसर्गाच्या सानिध्यात रममाण झालोय .पक्ष्यांचे वेगवेगळे आवाजातील संगीत चाललंय,समोर कॄष्णा नदीचे पात्र चमकतंय, सभोवताली उंचच उंच झाडे आहेत. आकाशाचे व त्या झाडांच्या वनश्रीचे प्रतिबिंब थरथरत आहेत . त्यांच्याकडे पहात असतानाच मनात वेगवेगळे विचारांचे तरंग निर्माण होत आहेत.माझ्या समोरचे हे विलोभनीय दृश्य आणि माझे मन हे जणू स्वतःशीच एकरूप झाले आहे.
मेणवली गावाजवळ मंदीराच्या मागे शांत अशा कृष्णा नदीच्या काठावर निवांतपणे मी स्वतःलाच पूर्णपणे विसरलो आहे.मागे एक कावळा उगीचच आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम मोठया आवाजात काव काव करत आहे, अशा या निबिड जंगलात मी एकटाच फिरतोय .आकाशाला गवसणी घालणारी ही विशाल वृक्षरायी, प्रचंड विस्तारलेल्या फांद्यानी व्यापलेली .झाडांच्या या अक्राळविक्राळ फांद्यानी एकमेकाला खूप घट्ट विळखा घातलाय , खूप मोठा गुंता करून घेतलाय ,कधीही एकमेकाला न सोडण्याचे आश्वासन देऊन. त्यांच्या या घट्ट मैत्रीपूर्ण वेटोळ्यांमुळे झाडांच्या फाद्यांचे अवकाशात एक मोठं छतच निर्माण झाले आहे .या ठिकाणी कितीतरी छान वेगवेगळ्या पक्षांची सुमधुर गाणी चालली आहेत . मस्त मजेत असंख्य पक्षी ओरडताहेत, कसली गाणी म्हणत आहेत कोणास ठाऊक ? पण आपला आवाज सुरात आहे की बेसूर आहे, याची त्यानां जरासुद्धा कसलीही काळजी नाही फिकीर नाही. त्यांच्या या आवाजात जराही सुसुत्रता देखील नाही तरीदेखील एक विलक्षण मनाला आनंद देणारा गोडवा व एक भारावून टाकणारा नाद आहे . फक्त मनसोक्तपणे विहार करायचे, भरपूर फळं खायची आणि नदीच्या प्रवाहात मनसोक्त अंघोळ करायची व पाणी प्यायचे . त्यांना प्युरीफायरची, शुद्धीकरणाची आवश्यकता नाही किंवा माणसांप्रमाणे शुध्द पाणीच प्यायचे असते हे त्यांना माहीतही नाही . त्यामूळे मस्त शिट्या मारत आपल्याच तालात , धुंदीत नदीच्या परिसरात हे पक्षी डुंबत, धमाल जगत, त्यांची स्वतःची अविस्मरणीय गाणी गात मजेत जगत असतात .
आम्ही माणसे मात्र प्रत्येक गोष्टीत खूप सावध असतो. आम्ही अशी स्वतःसाठी फार कमी गाणी गातो, किंवा बुजरेपणामुळे बहुतेक कधीच गात नाही. आम्हाला प्रत्येक दिवस खूपच बिझी , आणि महत्त्वाचा असतो , जगण्याठी खूप पैसा लागतो . हा पैसा कितीही मिळाला तरी तो आम्हाला कधीही पुरत नसतो तो जास्त मिळाला किंवा कमी मिळाला तरी आम्ही सतत असमाधानीच असतो.
यशस्वी होण्याच्या नादात , स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात खरा आनंद आपण गमावून बसलोय . आम्हाला असे पक्षांप्रमाणे कधीही आनंदाने गाणे गात, मुक्तपणे का फिरता येत नाही हे एक मोठे कोडे आहे .
कारण आम्हाला रोजच्या जगण्यात खूप अपॉईमेंटस असतात , आमचं आम्हीच एक काल्पनिक स्टॅन्डर्ड निर्माण केलेले असते. खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असतात, आम्ही त्या पूर्ण केल्या नाहीत तर आमच्यामूळे या जगाचे, देशाचे, राज्याचे, जिल्हयाचे व आपल्या गावाचे ,परिवाराचे खूप मोठे नुकसान होईल असे आम्हाला सतत ( उगीचच ) वाटते . वस्तूत: तसे काहीच होणार नसतं, कोणालाही काही फरक पडणार नसतो, पण आपल्याला तसे उगीचच वाटत असते. आपण फारच महत्त्वाचे आहोत, माझ्याशिवाय कोणाचे पानही हालत नाही असा आपला (गैर)समज असतो. आम्ही तशा भ्रमातच वावरत असतो.आम्ही सर्वजण एकमेकांची खूप काळजी असल्याचे दाखवतो , हो तसे दाखवावेच लागते कारण ती एक मोठी मजबूरी, व महत्वाची जबाबदारी असते .......
पक्ष्यांच्या या मुक्त जीवनापेक्षा माणसांचे नियम, कायदे, यशाचा, प्रसिध्दीचा ध्यास, यशस्वी होण्याचा ध्यास खूप मोठ्ठा असतो .यामूळे या ध्यासापायी माणूस त्याचे माणूसपणच विसरला की काय ?असे कधी कधी वाटते .पक्षी मात्र त्यांचा मुक्तपणे विहारण्याचा ध्यास जराही विसरले नाहीत हे मात्र नक्की.
आपल्याला सगळ्यानां एक दिवस पैलतीरी, खूप लांब प्रवासाला जायचंच आहे हे आम्ही विसरतोय . कारण ?......
सगळं यश ,पैसा, प्रसिद्धी, प्रॉपर्टी , आपण ज्यानां अगदी खूप जवळचे म्हणतो ती जवळची माणसे कोणीच आपल्या सोबत येणार नसतात . आपला हा प्रवास आपल्यालाच पुर्ण करुन संपवावा लागतो. हा प्रवास संपला की सगळे काही दिवस आठवणीत डुंबतात , हळहळतात, थोडे दुःखी होतात तर काही जण चक्क सुखावतात फक्त तसे प्रत्यक्ष दाखवत नाहीत .नंतर वेगवेगळ्या पध्दतीने रुटीनमध्ये,भानगडीच्या या जगात त्यांच्या त्यांच्या प्रवासात पुन्हा परत हरवून जातात .
त्यांचीही स्वतःची प्रवासयात्रा अशीच एक दिवस संपणार(च) असते.
आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्या, अपॉईटमेंटस् शेवटपर्यंत कधीच संपणार नाहीत पण आपण व आपल्या देहाची अपॉईंटमेंट, एक्सपायरी डेट नक्कीच संपणार आहे याची जाणीव सतत ठेवली पाहीजे.
अगदी अचानकपणे, नकळतपणे असेल पण १०० % जीवन संपणार (च) आहे आपले अस्तित्व कधी ना कधी शून्य होणार आहे याची ज्यावेळी अगदी मनापासून जाणीव होईल त्याच वेळी खरा आयुष्याचा अर्थ समजायला लागेल.
मग आपणही पक्ष्यांप्रमाणे मुक्तपणे राहू . अर्थात तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल . त्यामूळे आता या क्षणापासूनच
ठरवूया प्रत्येकक्षणी प्रामाणिकपणे, जाणीवपूर्वक स्वतः बरोबर आनंदाने जगण्याचा ,स्वच्छन्दी राहण्याचा प्रयत्न करु तेच खरं जीवन असेल . बाकी आयुष्य म्हणजे रोजच्या पाटया टाकण्याचाच उद्योग असतो .
त्यामूळे सावध हो. स्वतःसाठी जग, स्वतःबरोबर जग आपल्या बऱ्याच गोष्टी मागे करायच्या राहील्या ही खंत करू नकोस .जे जे करावंस वाटतं ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न कर ,नाही पूर्ण झालं तरी ठिक आहे . कारण मी प्रयत्न पूर्ण ताकदीनिशी केला याचे समाधान नक्की असणारच आहे . असा आतंरमनाशी संवाद करत मी रोज फिरतोच आहे.
असे शांतपणे फिरता फिरता मग रोज पक्षांची किलबिल समजायला लागते, त्यांची गाणी आवडायला लागतात निसर्गाचा शांत सुसंवाद समजायला लागतो. सारे आसंमत, आपले शरीर, मन, आत्मा आणि बुध्दी देखील एका वेगळ्या भारावलेल्या अवस्थेत प्रवेश करत राहते.
मग मी रोजच्या रुटीनप्रमाणे पक्ष्यांची गाणी ऐकत स्वतःलाच समजून घेत हळूहळू परतीच्या वाटेकडे घराकडे निघायला सुरुवात करतो ...........
🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦅🦜🕊🦜🦅🕊🦜🦅🕊
सुनील काळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा