ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, २ जुलै, २०२१

कॅलिग्राफीचे दिवस

कॅलिग्राफीचे दिवस
✍️✍️✍️✍️✍️✍️   
          एकदा वाईच्या बँकेमध्ये काही कामासाठी गेलो होतो . माझ्या  घराचे बांधकाम चाललेले होते त्यामुळे अनेक जणांना चेकने पैसे द्यावे लागायचे . अशावेळी एक दिवस बाहेरच्या शिपायाने मला थांबवले व तुम्हाला बँकेचे प्रमुख मॅनेजर यांनी केबिनमध्ये बोलावलेले आहे असे सांगितले . मी आश्चर्यचकित झालो . कदाचित लिहताना दिलेला चेक चुकला असावा किंवा काही वेगळे काम असावे असा अंदाज करत मी आत गेलो . मॅनेजर साहेबांनी मला पाहताच उठून अभिवादन केले आणि मला बरेच दिवसांपासून तुम्हाला भेटायचे होते असे सांगितले . मी त्यांना काय काम आहे ? असे विचारले असता तुमचे सगळे चेक मी काळजीपूर्वक पाहतो . त्या चेकवरचे हस्ताक्षर मला खूप आवडते .म्हणून मी शिपायाला सांगून ठेवले होते की तुम्ही बँकेत कधी आला तर मला जरूर भेट करून द्या . आज खूप दिवसांनी योगायोग आला . तुमच्या चेकवरचे हस्ताक्षर आणि सही पाहून मलाही अशा पद्धतीची वेगळी सही शिकायची आहे तर त्यासाठी काय करावे लागेल ?
         मला या शनीवार ,रविवारी रिकामा वेळ आहे . कॅलिग्राफी या दोन दिवसात  जमेलच ना ? थोडे तुमचे मार्गदर्शन हवे होते
          असे दोन दिवसात कॅलिग्राफी शिकण्याचा उत्साह व आत्मविश्वास पाहून मी अचंबितच झालो. मला असे विचारल्यानंतर काय उत्तर द्यावे ते सुचलेच नाही . त्यांनी केबीनमध्ये मागावलेला चहा पीत असतानाच मला कॅलिग्राफीचे माझे दिवस आठवायला सुरुवात झाली .
          तो  शाळेत असतानाचा काळ आठवला .  मला कॅलिग्राफी हा शब्दही माहीत नव्हता .परंतु आपले अक्षर जास्तीत जास्त चांगले काढण्याचा मी नेहमी प्रयत्न करायचो . पुढे चित्रकलेचा नाद लागला परंतु वडीलांनी कधीही रंगाची पेटी व साहीत्य दिले नाही . मग आपणच आपल्या चित्रांचे साहित्य स्वकमाईतून कमवायचा मला ध्यास लागला . पूर्वी फ्लेक्स नव्हते . सगळेजण ऑईलपेंटने रंगवलेले बोर्ड करायचे मग मी देखील साईन बोर्डाची कामे करायला लागलो .
         पाचगणीत हनुमान गल्ली मध्ये वसंत पेंटर नावाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.  थोडी बुटकी शरीरयष्टी , केसांचा कोंबडा , साधा शर्ट आणि पँट आणि त्यांच्या हातामध्ये सतत एक पिशवी असायचीच . या पिशवीमध्ये रंगाचे सगळे सामान घेऊन ते साईन बोर्ड करायला जायचे . मग मी त्यांच्या पाठोपाठ जायला सुरुवात केली . हळू माझी भीड चेपली व मी त्यांना वसंतमामा म्हणू लागलो . मला साईनबोर्डाचे काम शिकायचे आहे असे सांगितले , त्यांनाही कोणी तरी फुकटचा जोडीदार पाहिजेच होता . त्यांच्याबरोबर LT लार्सन अँड टुब्रो , सेंट पीटर स्कूलच्या असेंब्ली हॉलचे बोर्ड ( नंतर याच शाळेत मी कलाशिक्षक म्हणून चार वर्ष काम केले ) , वाडीलाल साराभाई संघवी आरोग्यभवन ,  प्रोस्पेक्ट हॉटेल , इल पलाझो हॉटेलचे बोर्ड  व इतर गावातील दुकानांचे साधे बोर्ड आम्ही रंगवायचो . म्हणजे मी बोर्ड स्क्रॅपरने घासायचो व ते रंगवायचे .वसंत पेंटर मनाने चांगले असले तरी खूप कंजूष होते . ते मला एकही रुपया  द्यायचे नाहीत मग हळूहळू मी निराश होऊन स्वतःची बोर्ड रंगविण्याची कामे करायला लागलो . सगळ्यात मोठा बोर्ड म्हणजे आमच्या घरावरच्या मजल्यावर राहणाऱ्या लिंगांण्णा पोतघंटे यांचा दोन बाय पंचवीस फुटांचा दीपक ड्रायक्लीनर्स नावाचा इंग्रजी बोर्ड . दोन फूट आकाराचे एकेक डेकोरेटीव्ह लेटरींग करताना माझी चांगली दमछाक झाली . त्यासाठी शिडीवर उभे राहून लेटरिंग करायला लागायचे . फक्त रात्री काम करायचो त्यामूळे पंधरा ते वीस दिवस लागले कारण मला कामाचा स्वतंत्र अनुभव नसतानाही जिद्दीने मी तो बोर्ड पूर्ण केला .  बोर्ड झकास झाला. पुढे तो बोर्ड पाहून मला VXL जाम या रुस्तम दुभाष यांच्या साईनबोर्डांची मोठी ऑर्डर मला मिळाली . (आता केमरॉन दुभाष व्हेलोसीटी एन्टरटेनमेन्टस भोसे  यांचे आजोबा ) ह्या मिळालेल्या पैशातून मी चित्रकलेचे सामान विकत घ्यायचो.
            कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालयात गेल्यानंतर कॅलिग्राफी या विषयाची  असाइनमेंट आम्हाला भोसले मॅडमनी दिली . 
ब्राह्मणे बाळबोध अक्षर ।
घडसुनी करावे सुंदर ॥ 
जे देखताची चतुर ।
समाधान पावती ॥ 
           या वाक्याचे पेन्सिल , बोरू , पेन ,कटनीप यांच्या साह्याने सुलेखन करायचे .आणि त्याला "कॅलिग्राफी " म्हणजे सुंदर हस्ताक्षराची कला असे म्हणतात हे प्रथम कळाले . वाचनीयता हा अक्षर सौंदर्याचा प्राथमिक घटक आहे हे ही कळले. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दीष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभुती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भुमिका असते. त्यामूळे सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो.
           पुढे पुण्याला आल्यानंतर कमर्शियल आर्ट शिकताना प्रा.मिलिंद फडके व प्रा . बाबू उडुपी यांची कॅलिग्राफी पाहून मी खूपच खूप प्रभावित झालो होतो . चिन्हच्या एका मासिकांमध्ये प्रसिद्ध   कॅलिग्राफर अच्युत पालव यांचा एक सुंदर लेख आला होता . तो वाचल्यानंतर मी त्यांना राजकोटवाला चाळ लालबाग येथे भेटायला गेलो . त्यांची कॅलिग्राफी पाहून , त्यांचा ध्यास , तळमळ व कामाचा सपाटा पाहून कॅलिग्राफी नावाचे भूत माझ्यामध्ये वेगाने संचारले . फार पछाडून गेलो होतो कॅलिग्राफीमूळे . नंतर सुलेखनाचा मग सतत सराव करायला सुरुवात केली . 
           पुण्यामध्ये अभिनवला शिकत असताना जवाहर आर्ट या नाना पेठेतील साईन बोर्डच्या दुकानांमध्ये मी जगण्यासाठी पैसे कमवायचो .
         कॅलिग्राफी हा शब्द मूळ ग्रीक Kalligraphia (कॅलिग्राफीया ) ह्या 
" सुंदर अक्षर " या अर्थाच्या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे .फार प्राचीन काळापासून सुलेखनाची दोन गटांमध्ये विभागणी होत आली आहे एक व्यवहारोपयोगी व दुसरी अलंकरणात्मक .
       आपण जे रोजचे वेगाने लिहीत असतो त्याला कॅलिग्राफी म्हणता येणार नाही कारण कॅलिग्राफी करायची म्हणजे प्रत्येक अक्षराला नेत्रदीपक ,सुंदर , सुवाच्चता ,सुस्पष्टपणे सादर करण्याची लिपी होय . नेत्रसुखदता , सौंदर्य, व 
वाचनसुलभता यांचा आदर्श ,परिपुर्ण सुरेख मेळ साधलेला दिसून येतो .
कॅलिग्राफी म्हणजे सुंदर अक्षरांची माळच . यामध्ये प्रत्येक अक्षरांमध्ये एकमेकांचे साधर्म्य शोधायचे व ते साधर्म्य साधत वेगळ्या पद्धतीने  मुक्तपणे वळणदार अक्षरे काढायची . हळूहळू त्या अक्षरांचा सराव करत स्वभाव ओळखायचा ही सगळी अक्षरं एकमेकांमध्ये गुंफली की अक्षरांचा समुह एक वेगळेच स्वरूप धारण करतो आणि त्यातील सुसंबंधता , सुसुत्रता जपली की अक्षरे पाहणाऱ्याला आनंदाने मनाला मोहून टाकतात . अक्षरांची नेमकी व सुबक घडण , वेगवेगळ्या सुट्या अक्षरांची वा घटकांची सुसंघटीत क्रमबद्ध रचना, तसेच प्रमाणबद्ध व सुसंवादी एकात्म मेळातून साधलेले कलात्मक अक्षराकृतिबंध हे कॅलिग्राफीचे स्वरूपवैशिष्ठय म्हणता येईल . त्यामूळे कॅलिग्राफीला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पक्षांच्या पिसांच्या लेखण्या , बोरू , वेगवेगळ्या आकाराचे कुंचले , टाक , पेन , निबांचे टोकदार , गोलाकार , तिरपे , चपटे , यासारखे विविध प्रकार , वेगवेगळ्या रंगीत शाई , जलरंग , तैलरंग
अक्रॅलिक कलर्स इ. अनेक साधने सुलेखन करण्यासाठी वापरली जातात .
         भारतात मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित , पोथ्या , पुराणातील धार्मिक ग्रंथाच्या सजावटीतून , इस्लामी , मोगल संस्कृतीत कुराणाच्या लेखन सामुग्रीत कॅलिग्राफीची कला जोपासली गेली . जैन , बौद्ध हस्तलिखितांमूळे जगाला भारतीय सुलेखनशैलीची ओळख झाली . चीन जपान , तिबेट येथील मठांत व देवळात पारंपारिक पद्धतीचे सुलेखन अद्यापही अत्यंत श्रध्देने केले जाते.
           १९व्या शतकात मुखपृष्ठ सजावटीत व अक्षरांलकरणात विकासात्मक बदल होत गेले . ग्रंथाप्रमाणेच वृत्तपत्रे , नियतकालिके यांची शीर्षक , लेखशीर्षके , मथळे , उपशीर्षके , अशा सर्वच घटकांत कलात्मक ,अलंकरणात्मक कॅलिग्राफी दिसू लागली . नाटक , जाहिराती , पोस्टर्स , वृत्तपत्रीय जाहिराती . अशा अनेक माध्यमात विपुलतेने व वैविध्यपूर्ण रितीने कॅलिग्राफीचा वापर केला जातो .
         कॅलिग्राफीच्या या ध्यासामुळे  माझी कितीतरी चांगल्या लोकांची ओळख झाली . मी जिथे राहत होतो त्या हॉस्टेलजवळ प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक राहायचे .त्यावेळी त्यांची अमर चित्रकथासाठी केलेली कॉमिक्स खूप प्रसिद्ध होती . ह्या कॉमिक्समध्ये चित्रांतील संभाषण लिहिण्याचे , कॅलिग्राफी करण्याचे काम मी मिळवले ,काही दिवस ते मी करत होतो . ही कॅलिग्राफी करत असतानाच मला त्यांचा शरीरशास्त्र व माणसांची चित्रे काढण्याचा  अलौकिक ध्यास पाहून मी खूपच प्रभावित झालो .पण नंतर ते हैद्राबादला काही वर्षांसाठी गेले व माझा कॉमिक्सचा अभ्यास संपला. पण त्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही प्रसिद्ध मालीका सुरु होती . मुळीकांमूळे मीही अभ्यासासाठी त्याची प्रतिकृती पूर्णपणे हस्तलिखित चित्रे काढून पूर्ण केली होती. त्या कॉमिक्सची ओरिजनल डमी आज खूप तेहतीस वर्षांनी अचानक सापडली.  तिथेच माझी मिलिंद मुळीकची भेट झाली व नंतर आम्ही निसर्गचित्रांमध्ये रमलो .
         कॅलिग्राफीमुळे पुण्याचे प्रसिद्ध स्कायलाइन आर्किटेक्टचे मालक 
श्री .रमेशभाई गुजर यांची कामामूळे माझी अचानक भेट झाली . त्यांनी मार्केटयार्ड जवळ नवीन ऑफिस चालू केले होते . आणि त्या ऑफीसच्या स्थलांतराची पत्रिका कॅलिग्राफीमध्ये करायची होती . संपूर्ण पत्रिका प्रिंट झाली आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्या प्रत्येक पत्रिकेवर  चुकून " श्री " शब्द लिहायचे विसरून गेले आहे .म्हणून हा "श्री " शब्द  लिहिण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो .त्यादिवशी रमेशभाईंबरोबर असलेल्या सौ . प्रविणाभाभी व त्यांच्या इतर सर्व कुटूंबियाची ओळख पुढे घट्ट मैत्रीमध्ये रुपांतरीत झाली आणि ती सर्वांबरोबर आजही एकतीस वर्ष टिकून आहे .
          कॅलिग्राफी करताना अक्षरांमध्ये जो जिवंतपणा येतो तो आणताना मन भारावून जाते , आणि किती लिहू याचे भानच राहत नाही . त्यामूळे मी त्या काळात खूप जणानां पत्रे लिहायचो .आजही मला कॅलिग्राफी करायला आवडते . तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी प्रत्यक्ष कॅलिग्राफी करताना जो आनंद मिळतो त्याची तुलना मला शब्दात करता येणार नाही .         
          मला अच्यूत पालव  किंवा इतर कोणीही  प्रत्यक्ष समोर बसवून कॅलिग्राफी कधीही  शिकवली नाही पण त्याच्यां कामातूनच ती शिकवण आपोआप झाली  अच्यूत पालव यांच्या ओळखीमूळे मला संघर्षाच्या काळात सिनेमा होर्डींग करणाऱ्या ' बाळकृष्ण आर्ट '  या दादरच्या पाटीलवाडीतील  कंपनीत सहा महिनेकाम करण्याची मोठी संधी मिळाली . त्या सिनेमा होर्डींगच्या धम्माल अनुभवांबद्दल नंतर कधीतरी सविस्तर लिहावे लागेल .
         आजही मला कॅलिग्राफीचे दिवस आठवले की  प्रा. मिलिंद फडके यांचे स्वच्छ, सुंदर , नीटनेटके  हस्ताक्षर आठवते , प्रा .बाबू उडूपी यांची बिनधास्त झोकदार , वळणदार मुक्तपणे साकारलेली अक्षरे आठवतात व कॅलिग्राफर मास्टर अच्युत पालव यांचे व त्यांच्या कॅलिग्राफी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पुण्याच्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत भरलेले 
" कॅलिफेस्टीवल " या प्रचंड मोठ्या व जबरदस्त , असंख्य कॅलिग्राफी प्रयोगांचे प्रदर्शन आठवते  व मनात आनंदाच्या सुखद लहरी  निर्माण होतात . त्यांचे कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील कौशल्य अफलातून आहे. ते कौशल्य खूप खडतर साधनेतून निष्ठेतून आलेले आहे . त्यांचे सुलेखनातील योगदान ,कार्य ,अतुलनीय व अविस्मरणीय आहे. त्यासाठी आदराने त्यानां मनातून मी नेहमी सॅल्यूट ठोकत असतो .
          या अशा ज्ञात व अज्ञात वेळोवेळी भेटलेल्या सर्व कॅलिग्राफीच्या गुरुनां मी मनातून नेहमी  मनःपूर्वक वारंवार अभिवादन करत असतो . कारण सुलेखनात प्राविण्य मिळविण्यासाठी या कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले आहे . आणि आजही ते सतत त्यांच्या ध्यासात नवनवीन प्रयोग करत मग्न असतात. कला ही गोष्ट  फक्त दाखविण्यासाठी नसून आयुष्य जगताना प्रत्येक क्षण हा कलेचाच एक भाग आहे असे समजणारी ही मंडळी सर्वानांच आदरनीय आहेत म्हणून ते सर्वानांच भावतात .

        आणि बँकेचे मॅनेजरसाहेब सहज विचारत होते दोन दिवसात मला थोड्या सरावाने कॅलिग्राफी सहज जमेलच की ? 
आता यावर काय उत्तर देणार मी ? 
आणि काय बोलणार ? 
      
           या लेखासोबत त्यावेळी शिकत असताना कॅलिग्राफीच्या भरपूर केलेल्या सरावाचे थोडेसे नमूने व  रामायण कॉमिक्सचे संपूर्ण रंगीत हस्तलिखित नुमन्यांचे फोटो व काही जणानां पाठवलेल्या पत्रांचे नमूने जोडले आहेत .

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
सुनील काळे 
9423966486

सोमवार, २८ जून, २०२१

काळ्या कोटातील सदाबहार व्यक्तिमत्व

काळ्या कोटातील एक सदाबहार रंगीत व्यक्तीमत्व ........*ॲड.उमेश सणस * 

            माणसे दोन रंगाच्या कोटांनां खूप घाबरतात, एक पांढऱ्या रंगाच्या व दुसरा काळ्या रंगांच्या . पांढऱ्या रंगाच्या कोटांशी संपर्क आला की माणसे खाटेवर आडवी पडलेली असतात , तिथे गप्पगार पडून औषधपाणी घेत राहायचे असते कारण तेथे प्रश्न विचारले की गाठ प्राणाशी असते . दुसरा पर्याय नसतो आणि  आपल्या शरीराविषयी आपण अज्ञानी असतो त्यामूळे जे समोर येईल त्या उपचारांना स्विकारायचे याला देखील पर्याय नसतो .
               काळ्या कोटातील दुसऱ्या व्यावसायिकांचे नाव म्हणजे वकील . वकील ही जमात अतिशय हुशार, चतुर मंडळीमध्ये मोडते ( त्यानां काही लोक टगे असं म्हणतात, असं मी बाहेरुन ऐकलेले आहे ते माझे व्यक्तीगत मत नाही . ) परमेश्वराने या वकील मंडळीनां घडवताना थोडा असा काही बेमालूम फॉर्म्यूला बनावलेला असतो की 
" शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये " असे का म्हणतात याचा वारंवांर प्रत्यय त्यांना भेटल्यावरच येतो .
पण कधी कधी असे काही प्रसंग इच्छा नसताना चुकून काही जणांच्या वाटयाला येतात की त्यांना कोर्टाची पायरी चढावीच लागते .नाईलाजाने मग काळ्या कोटातील काही टग्यांच्या टगेगिरीला , प्रतापाला सामोरे जावेच लागते .
              आयुष्यातील गेली चाळीस वर्ष माझे चित्रकाराचे चित्रमय आयुष्य अडचणींचे असले तरी कोर्टात जायचा कधीच प्रसंग आला नव्हता . एक दिवस अशीच अचानक माझ्यावर वेळ आली की मला कोर्ट कामासाठी वकील करणे भाग पडले . मी चित्र निर्मितीमध्ये निरनिराळे प्रयोग करण्याची वृत्ती असल्याने मी वेगवेगळ्या काळ्या कोटातील वकील टग्यांना भेटत सुटलो .
             प्रथम गेल्या गेल्या पाचशे रुपये टेबलावर ठेवायचो आणि माझी (रड ) कथा सांगायचो . माझी कथा सांगितली की मोठया आशेने,उत्साहाने त्यांच्या प्रतिसादाची वाट पहायचो .थोडया वेळातच मला समजून यायचे की माझे पाचशे रुपये डुबीत खात्यात जमा झालेत . त्यांच्यातला उसना उत्साह व पुढे कसलीही खात्री, उमेद मिळत नसल्याचे पाहून मी जड अंतःकरणाने निरोप घ्यायचो . 
            अनेक जणांना भेटल्यावर मला हे कळले की या वकीलांना तुमच्या व्यक्तीगत भाव भावनांशी, जाणीवांशी काही घेणेदेणे नसते त्यानां हवा असतो फक्त एक पैशांचा व्यवहार, व समोरची व्यक्ती या व्यवहारांच्या गणितात बसत असेल , त्यांच्यापासून भरपूर आर्थिक लाभ होणार असेल तरच त्यांची गाडी पुढे जाते .
           पण मी आता सांगणार आहे तो माझा वेगळाच अनुभव .
           मी अनुभवलेल्या काळ्या कोटातल्या एका वेगळ्याच माणसाची कथा. या वकीलाचे जीवनातील टगेगिरी सोडून त्याव्यतिरिक्त इतर व्यवहार , जीवनशैली, प्रतिभा पाहून मी आचंबित झालो आणि त्यांचे कौतुकही वाटले . काळ्या कोटाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला . आपण एखाद्या पेशाला सरसकट नकारात्मक नजरेतून पाहत असतो .. ......पण वस्तुस्थिती ,अंतरंग मात्र काही वेगळेच असते . प्रत्येक क्षेत्रात काही अपवाद असतात याची ही मनोमन खात्री पटली .

            अॅड . उमेश सणस "तोरणा " १२१४ , रामडोह आळी, वाई . या पत्यावर मी पोहचलो त्यावेळी आजही पाचशेची नोट वाया जाणार या भुमिकेतूनच मी बोलायला सुरुवात केली . माझे आईवडील कित्येक वर्षे रहात असलेल्या भाड्याच्या घरातुन त्यांच्याच पुतण्याने एक दिवस कुमार्गाने , कपटाने त्यानां निराधार केले . संसार साहीत्य व इतर सर्व सामानाचा कसा कब्जा घेतला याची मी हकीकत त्यानां मी सांगत होतो .
माझी सर्व गोष्ट ऐकल्यानंतर मोबाईल मध्ये पहात असतानाच मला त्यांनी शांतपणे मोठा धक्का दिला . " तुमचा चुलत भाऊ माझ्याकडे एकदा आला होता . त्यामूळे मी तुमची केस घेऊ शकत नाही . " तुमचा चुलत भाऊ नालायक व दूष्ट आहे . माझी सल्ल्याची फी त्याने दिली नाहीच , नंतर साधा कसला संपर्कही केला नाही . एक लक्षात घ्या फक्त वकीलच टगे आणि फसवे नसतात , तर काही पक्षकार देखील चालू  आणि डबल टगे असतात . आता मी तुम्हाला एक सल्ला देतो तुमचे वडील आयुष्यभर भाडयाने राहीले, आणि त्या भाड्याच्या घरासाठी तुम्ही न्याय मागायला निघाला आहे . घर दुसऱ्याचे, सातबारा, आठ अ चा उतारा दुसऱ्याचा आणि त्यासाठी स्वतःला त्रास कशाला करून घ्यायचा ? त्यापेक्षा हिम्मत असेल तर वाईत स्वतः जागा घ्या , स्वतःचा सातबारा करा, त्यात घर बांधा आणि मग तेथे कोणी आडवे आले, बाहेर काढू लागले , त्रास देऊ लागले तर निकराने लढतो बघा तुमच्यासाठी ! 
" सुनिल काळे, तुम्ही चित्रकार आहात तुमचे काम चित्रनिर्मिती करायचे . भरपूर चित्रे काढा , आनंदी रहा . मजेत रहा . "
 "तुमचे पाचशे रुपये नकोत मला .
आणि निघा आता ! ''

            एवढं रोखठोक बोलल्यानंतर , मी सर्दच झालो, क्षणभर काही सुचलेच नाही . मग जाण्यापूर्वी त्यांनी आत मध्ये जावून दोन पुस्तके दिली .
पुस्तकांवर लेखकाचे नाव होते 'उमेश सणस ' .

ती पुस्तके वाचताना मला जाणवत होते ते काळ्या कोटाच्या आड असं दडलेले अदभूत व्यक्तिमत्व .आज माझ्या  'निसर्ग ' बंगल्याची निर्मिती का झाली याचा विचार करतो त्यावेळी मला त्यांची वाक्ये आठवत असतात . स्वतः चा सातबारा तयार करा, जे आपले स्वतःचे , हक्काचे आहे त्यासाठीच भांडावे . तेथे माघार घ्यायची नाही . शेवटपर्यंत लढायचे .
           कायद्यातील अनेक जटील कलमांचा , नियमांचा ऊहापोह न करता समोरच्या गरीब,अडाणी असो वा शिकलेल्या सज्ञान पक्षकाराला त्याच्या त्याच्या भाषेत समजेल असे मार्गदर्शन व तोडगा देऊन जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल, याचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे .

             मराठा क्रांती मोर्चाची भाषणे असो, कोर्टात न्यायाधीशांसमोर डायस वर असो, कोणत्याही छोटया, मोठया कार्यक्रमात माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, हिरिरीने, कौशल्याने, खणखणीत आवाजात आपले विचार सुस्पष्ट मांडणे ही त्यांची खासियत आहे . त्यांच्या मुखातून शिवचरित्राचे व्याख्यान असो वा सभासमारंभ असो उमेश सणसांचे आशयपूर्ण भाषण सुरू झाले की जनसमुदाय मंत्रमुग्ध होत जातो, स्वतःला विसरत जातो हे मी स्वतःही अनुभवले आहे .त्यांच्या भाषणाची एक विशिष्ट ओघवती शैली आहे व त्यांनी ती स्वप्रयत्नाने विकसित केलेली आहे . कोणत्याही विषयावर व्याख्यान देताना आपल्या या शैलीने हजारो हृदयांचा ठाव घेण्याची कला त्यानां आत्मसात झाली आहे .
               उमेश सणस यांचे वडील शासकीय सेवेत होते, आई शिक्षिका व नंतर मुख्याधिपिका, त्यामूळे उत्तम संस्कार व अलौकीक बुध्दीमत्ता यांचा त्यांना वारसा आहेच . आणि तो वारसा त्यांच्या सई व सायुरी या मुलींमध्ये आलेला  दिसून येतो . त्यांची पत्नी रोहिणी या सुशिक्षित असून त्या या सर्व कुटूंबाची जबाबदारी प्रेमाने व यशस्वीपणे पार पाडत आहेत .

            मध्यंतरी त्यांनी "शब्दपूजा " नावाचे साप्ताहीक सुरू केले होते त्याचा लोगो करण्याची त्यांनी मला विनंती केली त्यावेळी मी त्यानां विचारले वकील साहेब  "हा फूकटचा उद्योग कशासाठी सुरू केला आहे ? " त्यावेळी त्यांनी छान उत्तर दिले . "सगळेच उद्योग पैशांसाठी करायचे नसतात . हा शब्दपूजेचा अंक मला परवडत नसला तरी ती माझी आवड आहे, ती माझी हौस मौज आहे . ते माझे चांगले व्यसन आहे .आपल्या परिसरातील माणसांची त्यांच्या कलेची, कार्याची, ओळख, नवी माहिती करून देणे, सुंदर कविता, माहीतीपूर्ण लेख, नवे विचार गडकिल्ल्यांची , पर्यटनस्थळांची ओळख करून देणे , नव्या माणसांची त्यांच्या वेगवेगळ्या कार्याची ओळख करुन देणे हे माझ्या आवडीचे काम आहे " आणि यामध्ये ते आर्थिक अडचणीला सामोरे जात असूनही खूप व्यस्त झाले होते . सर्वात महत्वाचे म्हणजे हा सर्व खटाटोप आपले सर्व कामे सांभाळत  आनंदाने करत होते .त्यांचे इंग्रजी, मराठी साहित्यावर अफाट प्रेम आहे व प्रभुत्व ही आहे . अनेक लेखकांची , कवींची माहीती , त्यांच्या रचना, त्यांच्या साहित्यातील काही कोटेशन्स, इतिहासातील सनावळी, शेरोशायरी त्यानां तोंडपाठ आहेत .असे तोंडपाठ , असणं हे तुमचं पुस्तकावर निस्सिम प्रेम असल्याशिवाय शक्यच नाही .

               काही दिवसांपूर्वी त्यांनी 'सांगावा ' नावाचा त्यांचा चारोळी , कवितांचा संग्रह प्रकाशित केला होता . त्या कार्यक्रमानंतर मी त्यानां गंभीरपणे विचारले की तुमच्यातील साहित्यिकाला , कवीला तुम्ही पुर्णपणे न्याय देत नाही . त्यावेळी त्यांचे दिलेले उत्तर आजही माझ्या लक्षात आहे .
"वकीलांचा व्यावसाय मी करतो तो फक्त आवड किंवा पैसे मिळतात म्हणून करत नाही . तिथं माझा वेगळा स्वार्थ आहे . माणसाचे आयुष्य पूर्वीसारखे सरळ राहिलेले नाही, मानवी स्वभाव, मानवी नात्यांमध्ये प्रचंड गुंतागुंत आहे . अनेक प्रकारच्या केसेस माझ्याकडे रोज येत असतात . मनाच्या असंख्य रुपांची मला रोज पाहणी करता येते . रोजचे भेटणारे पक्षकार माझ्या दृष्टीने हे वेगवेगळे कॅरेक्टर , वेगवेगळी नाटकाची पात्रे असतात . त्यांच्या वेशभूषा, बोलण्याच्या ,चालण्याच्या नानाविध पध्दती, त्यांच्या सांगण्याची ढब ,लकेर,मला रोज नवे विषय सुचवत असतात . त्यांच्या आयुष्यातील घडणारे प्रसंग कधी कधी मला लेखनासाठी प्रेरीत करतात . त्यांच्या दुःखावर मी कायदयाचा अभ्यास करून रिलीफ देण्याचा प्रयत्न करत असतो . " यापेक्षा आणखी समाजसेवा वेगळी असते का ?  कायदयाची रचना स्वरुप व मांडणी खूप वर्षांपासून बदललेली नाही . त्यामूळे न्याय मिळण्यासाठी खूप वेळ लागतो . या सिस्टीमला समजून घेऊन काम करावे लागते . बरेच लोक यावर नाराज होतात . माझ्यावर , इतर वकीलांच्या कामाच्या पद्धतीवर टिका देखील करतात .मी प्रत्येकाला समाधानी करू शकत नाही " . पण एखादी सिस्टीम मी कशी बदलणार ?ती बदलणे माझ्या हातात नाही . असे सांगितल्यानंतर मग माझाही त्यांच्यावरील राग हळूहळू कमी होवू लागला .

        अशा या अवलिया, लेखक, साहित्यिक, मनस्वी कवी, संपादक, उत्तम वक्ता, इतिहासकार , मार्गदर्शक, अभ्यासक, प्रतिभावंत , तल्लख बुध्दी व मनाचा तितकाच मोठेपणा असणारा मित्र मिळणे म्हणजे खूप मोठी भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल .
           देव आपल्याला नातेवाईक देतो, ते बदलता येत नाहीत. पण देवाने मित्र निवडण्याची मुभा दिली आहे .
आपण मित्र निवडले तरी त्यांची मैत्री होईलच अशी खात्री नसते . आपण मित्र निवडायचे नसतात तर खरे मित्र आपोआप मिळतात . उमेश सणस असे आपोआपच मित्र झाले .

          मी तोरणा बंगल्याच्या बाहेर बऱ्याच वेळा जातो ,त्यावेळी बाहेर अनेक पक्षकारांचे चप्पल बुटांचे जोड दारातच दिसतात .मी गर्दीचा अंदाज घेतो व बाहेरूनच माघारी फिरतो कारण आमच्या या मित्राकडे अनेक मित्र जोडण्याची अलौकीक कला आहे त्यामूळे प्रत्येकाला थोडाथोडा तरी हा आमचा मित्र वाटयाला यायला नको का ? ही गर्दी पाहीली की आमचा मित्र किती श्रीमंत आहे याची खात्री पटते .

            न धरील शस्त्र करी मी , पण गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ! असे बोलून गेलेल्या कृष्णाचाच हा आधुनिक अवतार असावा अशी माझी दाट शंका आहे . 

            माझ्याकडे जर गुप्तचर खाते एक दिवसासाठी मिळाले तर मला एक प्रचंड उत्सुकता आहे, की सकाळपासून रात्री दहा... अकरा.... बारा ....वाजेपर्यंत असंख्य पक्षकारांसोबत बोलायला यानां इतकी एनर्जी मिळते कशी ? आणि हे लेखन , कविता,कधी करतात ? याचा शोध घेतलाच पाहीजे .
             मी मागील आठवड्यात , महीन्यापूर्वी भेटलेल्या माणसाला पुर्णपणे विसरून जातो . नाव गाव आठवत नाही पण उमेश सणस यांच्याकडे मात्र पक्षकार कधीही आला की त्याची सर्व केस माहीत असते . हे त्यानां कसं जमतं हे कोडे मला अजून उलघडले नाही . किंवा परमेश्वराने एखादा छूपा कॉम्प्यूटर त्यांच्या शरीरात बसवला असावा असाही मला दाट संशय आहे . अफाट मिळालेली स्मरणशक्ती ही एक त्यानां मिळालेली किंवा त्यांनी मिळवलेली देणगी आहे . आणि त्याचा ते वेळोवेळी पुरेपूर वापर करतात .

            उमेश सणस या मित्राच्या वकीली पेशाच्या कारकिर्दीला सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत . 

           चित्रकार असल्याने मला एक गोष्ट नक्की माहीती आहे . रंगपेटीतील अनेक रंग तुम्ही हळूहळू मिश्रण करु लागलात की ती शेड काळ्या करडया रंगासारखी दिसते . रंग जरी काळा असला तरी त्यामध्ये अनेक रंग असतात . 
वकील जमातीचे कोट जरी काळे असले तरी कोट घातलेल्या शरीरामध्ये खूप काही वेगवेगळे रंग असतात आणि ते रंग बाहेरच्याने  मनाच्या स्वच्छ अंतरंगातून पाहायचे असतात हे देखील मी नव्याने शिकलो  आणि शिकतोय . त्यामूळे वकीलांची आता जराही भिती वाटत नाही .
 
         उमेश सणस यांच्या व्यक्तिमत्वात हे वेगवेगळे रंग किती बेमालूमपणे मिसळलेले आहेत याचा मी अनुभव घेतला आहे . म्हणून मला हा मित्र सदाबहार व मनाने रंगीत वाटतो .

          यापुढेही त्यांच्या कायदयाच्या ज्ञानाचा पक्षकारानां भरपूर लाभ होवो आणि त्यांच्या साहित्यातून, चारोळ्या, कथा, कवितांमधून, भाषणांमधून, रसिकानां उत्तमोत्तम गोष्टींची मेजवानी सातत्याने मिळत राहो, त्यांच्या या अतिशय व्यस्त , व मस्त दिनचर्येतून उत्तम साहीत्यकलाकृतींची सातत्याने निर्मिती होवो, त्यांची प्रकृती उत्तम राहो व त्यानां दिर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

         उमेश सणस यांनी खूप कथा, कविता , चारोळ्या लिहलेल्या आहेत पण त्यांची खाली लिहलेली  एक चारोळी माझी खूप आवडती आहे . ती माझ्या मनाला भिडते .माणसं आयुष्यभर एकमेकांशी भांडतात, आपले तेच खरे म्हणत राहतात . अनेक गोष्टीसाठी आपला हट्ट सोडत नाहीत शेवटी आयुष्याच्या अखेरीस कळते आपण काहीच घेऊन आलो नव्हतो .आलो रिकामेच आणि चाललोही रिकामेच .

यश अपयश मान अपमान 
सगळ्याच्या पलिकडे जायचं आहे .
सोडून जाण्यापूर्वी हे जग 
अधिक देखणं करायचं आहे .

सुनिल काळे
9423966486

शनिवार, १९ जून, २०२१

*पाऊस चित्रातला *पाऊस मनातला*

पाऊस चित्रातला
पाऊस मनातला
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
           निसर्ग हा अफलातून कलाकार आहे .त्याने सजवलेल्या  विविध रूपांमुळे , अनोख्या जडणघडणीमुळे , अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो . कधीकधी तर त्याचे वर्णन  शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही .भारत देशावर तर निसर्गाने इतकी मुक्त उधळण केली आहे की बऱ्याचदा  वाटते की काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीव देखील नाही . कारण काही देशामध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात तर भारतामध्ये तीन ऋतू आहेत ते म्हणजे हिवाळा ,उन्हाळा आणि पावसाळा . 
           मे महिन्याच्या प्रखर तापलेल्या उन्हामध्ये खूप चालावे लागले आणि जवळपास एखादे झाड किंवा पेलाभर पाणी देखील प्यायला मिळाले नाही की उन्हामुळे गरमीमुळे माणूस अस्वस्थ होत जातो .उन्हाच्या या तप्त झळांमुळे जीवाची प्रचंड काहिली व्हायला लागल्यानंतर मग पावसाचे वेध लागू लागतात . जून महिना सुरू होऊन कधी एकदाचा पाऊस सुरू होतो व सगळीकडे गारवा पसरतो असे वाटते . अर्थात काही जणांना पाऊस खूप आवडतो तर काही जणांना जराही आवडत नाही .

       पण मला मात्र पाऊस खूप आवडतो माझ्यातील चित्रकाराला पावसामुळे नव्या चित्रांच्या तयारीचे वेध लागतात .

         परमेश्वराजवळ माझे न लिहून पाठवलेले असंख्य तक्रारअर्ज आहेत .पण एका गोष्टीची मी कधीही तक्रार केलेली नाही . त्यासाठी मी त्या विश्वनिर्मात्याचा खूप आभारी आहे ,आणि ते म्हणजे त्याने माझे बालपण , तरुणपण पाचगणी , महाबळेश्वर ,वाई या निसर्गाने समृद्ध असलेल्या परिसरात घडवले . आपण ज्या परिसरात वाढतो त्या देशाचा , राज्याचा , जिल्हयाचा , गावाच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आपल्यावर सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव पडतो . माझ्यावर तर या परिसरातील 
निसर्गदैवतांचे अनेक उपकार आशीर्वाद आहेत आणि त्यासाठी मी माझ्या चित्रातून नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो .
          लहानपणापासून पाचगणीत वाढलो . या गावाला अचंबित करणारे सपाट डोंगराचे टेबललँड नावाचे पठार देवाने उदारपणे बहाल केले आहे . आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून ते प्रसिद्ध आहे . उन्हाळ्यात या पठारावरून फेरफटका मारला की लक्षात येते पूर्वेकडचे मांढरदेवीचा डोंगर ,पांडवगड , कमळगड , नवरा-नवरीच्या डोंगरांच्या रांगा पश्चिमेकडच्या भिलार , तायघाट गावच्या परिसरात व दक्षिणेकडे राजपुरी ,खिंगर परिसरातील डोंगरात लावलेल्या वणव्यांमुळे वनश्री भकास दिसत असते . त्यातील हिरवाई पूर्णपणे नष्ट होऊन काळे कभिन्न  झालेले डोंगर पाहताना संवेदनशील पर्यटकही खूप नाराज झालेले असतात . पण पावसाळ्यात मात्र येथे निसर्गाच्या चमत्काराला सुरुवात होते आणि या डोंगर परिसरातील सृष्टीसौंदर्य स्वर्गालाही लाजवणारे ठरते .
          पाचगणीत महाबळेश्वरच्या मानाने खूपच कमी पाऊस पडतो . महाबळेश्वरमध्ये हे नीरस  उदास व जनजीवन विस्कळीत करणारे वातावरण प्रचंड पावसामूळे सुरु होते असे हवामान मात्र पाचगणीला नसते .महाबळेश्वरला एकदा पावसाने जोर धरला की चार-पाच दिवस संततधार पावसाने खूप कंटाळा येतो . काहीजण घराला प्लास्टिक कापडाचे आवरण लावतात, काहीजणांच्या घराला गवताच्या पेंड्या बांधून केलेले संरक्षण असते तर काही इमारतींना पत्र्याची उभी पाने लावून संरक्षक तटबंदी तयार केलेली असते . त्याशिवाय घर सुरक्षित राहू शकत नाही .कारण पावसामुळे सगळ्या भिंतींना ओल पसरून घरातच थंडीचे एक कुबट वातावरण तयार होते . आता नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे व इंटरनेट , मोबाईल यांच्यामुळे निदान चांगला टाईमपास तरी होतो व थोडी करमणूक होते .पण पूर्वीच्या काळात महाबळेश्वरच्या पावसामुळे अनेकांच्या जीवाचे हाल होत असत व आजारपणामुळे ते तात्पुरते स्थलांतर ही करत असत .पाचगणीचा पाऊस आरोग्यदायी आणि उत्तम प्रकृती ठेवणारा आहे . तिन्ही ऋतूंमध्ये येथील वातावरण आल्हाददायक आहे याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी येथे मुला-मुलींच्या शाळा वसवल्या . त्यापैकी सेंट जोसेफ या शाळेने नुकतेच 126 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे .
           मी मराठी शाळेतून संजीवन या मोठ्या शाळेत मराठी माध्यमातच शिकण्यासाठी गेलो .ही शाळा गावापासून जरा थोडी लांब होती .माझे मित्र घनःश्याम कारंजकर ,संजय भिलारे  व विलास निंबाळकर व मी आमची एक छान पैकी चौकडी जमली होती . आम्ही सगळेजण एकत्र शाळेत जायचो . पावसाळ्यात आत्ताच्या सारखे त्यावेळी उंच फुटपाथ बांधलेले नव्हते . रस्त्याच्या बाजूला चांगली मोठी खोदलेली गटारे होती . या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही चौघेजण कागदाच्या बोटी करून सोडायचो .या बोटीच्या वेड्यावाकड्या प्रवासातील गंमत न्याहाळत आमचा शाळेमध्ये प्रवेश व्हायचा .आमच्याकडे हॉकी खेळण्यासाठी स्टिक्स नव्हत्या मग पावसाळ्यातील मोठ्या छत्र्यांच्या दांड्याने आम्ही प्लास्टिक पेपरचा गुंडाळा केलेला बॉल भर रस्त्यातच खेळत खेळत  शाळेतून घरी यायचो. हॉकीची लाकडाची खरी  स्टिक नाही याची आम्हाला कधीही खंत किंवा दुःख झाले नाही .
       याच काळामध्ये मला बहुदा चित्रकार व्हायचे वेड लागले मी पावसाची चित्रे काढायचा प्रयत्न करायचो . खूप आटापिटा करायचो पण चित्रात खऱ्या पावसासारखे इफेक्ट यायचे नाहीत . लहान असल्याने व चित्रतत्रांची माहीती नसल्याने पावसाची चित्रे एवढी प्रभावी व्हायची नाहीत .
               माझा मित्र घन:श्‍याम एकदा पूर्ण भिजलेल्या अवस्थेत नखशिखांत
ओलाचिंब होऊनच माझ्या घरी आला . त्याची कपडे पूर्णपणे भिजलेली होती . अस्ताव्यस्त झालेले केस , त्यावरून ओघळणारे पाणी पाहून मी त्याला चांगलेच फैलावर घेतले .कशाला असा पावसात भिजत आलास ? असे विचारले असता तो सहजपणे म्हणाला 
" असा भिजलो नसतो तर कविता कशी सुचली असती ? " 
मग माझ्याकडून एक कोरा कागद घेऊन त्याने पावसाची एक सुंदर अप्रतिम कविता लगेच लिहून काढली व मला म्हणाला 
पावसाची चित्रे , 
पावसाची गाणी , 
पावसावरचे काव्य , 
पावसाचे लेखन असे घरात बसून निवांत करायच्या गोष्टी असतात का ? 
" चित्रासाठी एकदा तरी चिंब भिजून  खरा पाऊस कधी  अनुभवलास का ? एकदा माझ्यासारखा नखशिखांत भिजलास की तुला खरा पाऊस कसा असतो ते कळेल . मग आम्ही दोघेही पावसात भिजलो , व्हॅलीमध्ये भरपावसात भिजत भ्रमंती केली . कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धुक्याच्या साम्राज्यात हरवून जायला शिकलो .

मग पाऊस माझा व मी पावसाचा एकमेकांचे खरे मित्र झालो.

मग भरपूर पावसाची चित्रे काढण्याचा सपाटाच लावला .

          पाचगणी गाव ते वाईचा जकात नाका यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच अशी वडाची अनेक झाडे आहेत .त्या झाडांची भिजलेली , हिरवट झालेली मोठी खोडे ,त्याच्या विशाल फांद्या , रस्त्यावर चमकणारे पाणी , त्या झाडांची रस्त्यावर पडलेली प्रतिबिंबे मला आवडू लागली. हळुवार जपून चालणारे सायकलस्वार ,चौकातील लगबगीने छत्री घेऊन चालणारी माणसे , काळ्या पिवळ्या रंगातील वडापच्या जीपगाड्या ,शाळेचा रेनकोट घालून बोट धरून चालणारी छोटी छोटी मुले ,विद्यार्थी व त्यांच्यासोबतचे पालक , कधी नवनवे पर्यटक रंगविताना मजा यायची. टेबललॅन्डचे उंच पसरलेले कडे त्यामधले धुक्याचे थर , एम .आर . ए सेंटरची धुक्यातून चमकणारी इमारत , त्याच्या बाजूला असलेली सिल्वर ओक्स व इतर प्रचंड मोठ्या वृक्षांची झाडी , पावसात चमकणारे कृष्णा नदीचे पात्र ,नगरपालिकेच्या आंबेडकर उद्यानाजवळची झाडे , त्या झाडांच्या रस्त्यातून भर पावसात वेगाने पाणी उडवत जाणारी वाहने ,एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा टेम्पो , बाजारपेठांमधील छत्री घेऊन गडबडीने जाणारी माणसे ,पांगारी , तायघाट  गावाजवळची व सिडनेपाईंटच्या परिसरातील कृष्णाव्हॅलीतील घरे .भाताच्या शेतीसाठी तुंबवलेली छोटी छोटी शेततळी , दरीवर ढगांचा तयार झालेला राक्षसासारखा मानवी आकार किंवा वेगवेगळे प्राण्यासारखे दिसणारे भव्य आकार चित्रातून दर्शवताना मजा यायची .आकाशात चाललेले  धुके व ढगांच्या वेगवेगळ्या आकाराचा हा नयनरम्य खेळ बराच वेळा जाणीवपूर्वक निरीक्षण करताना मी तहानभूक विसरून जायचो .
         महाबळेश्वरला तर धुक्याचेच साम्राज्य सगळीकडे पसरले की चित्रातही ग्रे कलरचे आकाश यायला लागायचे . एकदा मित्रासोबत एलफिस्टन पॉईंटला गेलो होतो पण आकाशात ढगांचे इतके मोठमोठे पुंजके , धुकेच धुके पसरले की जणू पृथ्वीवरच संपूर्ण आकाश उतरले की काय ? असे वाटू लागले . पुढे असणारा रस्ताही दिसेनासा होतो .
ऑर्थरसीट पॉईंटच्या दरीतून निळ्या ,जांभळ्या ढगांच्या कापसासारख्या हळुवार लाटा पाहिल्या की आपण स्वर्गातून खाली दिसणारा अनोखा जादूचा खेळ पाहतो की काय असे वाटते .केटस् पॉइंट ,लॉडविक पॉईंट ,वेण्णा लेक व इतर पाईंटचा परिसरही मला चित्र काढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरतो .
          वाईला अधून-मधून जोराचा पाऊस पडतो त्यावेळी गणपती घाट , गंगापुरीचा घाट व धोम धरणाचा परिसर एका वेगळ्याच कलर स्कीममध्ये पावसाळ्यामध्ये चित्रात दाखवता येतो .
          कोकणात जाताना ताम्हिणी घाटातील धबधबे , समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा , आकाशातील ढगांचे रौद्ररूप , कोळी व त्यांच्या बोटी , त्या बोटींवरचे वेगळ्या रंगातील झेंडे ,उन्हाने चमकणारे समुद्रकिनारे ,कोळ्यांच्या जाळी फेकण्याच्या ,बोटी ढकलतानाच्या हालचाली मला पावसात चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करतात .
         महाबळेश्वरचा  लिंगमळ्याचा धबधबा , भिलारचा वॉटरफॉल ,पोलादपूर महामार्गावरचे धबधबे डोंगर कपाऱ्यांवरून पडणारे पाणी पाहिले की मला आपण माणसे निसर्गापुढे किती छोट्या उंचीचे व खुजे व्यक्तिमत्वाचे आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते .
           पाऊस मला आवडतो त्यामागे आणखी एक खरे कारण आहे .
ज्यांच्या सोबत मी बालपणी लहानाचा मोठा झालो ते माझे सख्खे तीनही मित्र आता माझ्यासोबत नाहीत .काळाने तिघांच्याही बाबतीत मोठा विचित्र आघात करून तिघांचेही निधन झाले . माझ्यावर नितांत प्रेम करणारी स्वातीची आई या जगातून निघून गेली .माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी एकुलती एक छोटी मुलगी  ' दिशा ' आम्हाला दिशाहीन करून कायमची पैलतिरी गेली .
           ज्या जवळच्या मित्रांनी फसवले, अगदी जवळच्या नातेवाईकांनी संकटकाळात माझ्याकडे पाठ फिरवली , माणसांच्या वाईट व्यवहारामुळे ,
कृत्यांमुळे कधीकधी मला जीवन नकोसे झाले , माझे मन उदास व सैरभर झाले . माझे आर्थिक ,शारीरिक ,मानसिक ,
नुकसान झाले .त्यांच्या दिलेल्या वेदनांमुळे , दुःखामुळे अनेकदा अचानकपणे डोळ्यात अश्रू येतात .
         जी जवळची माणसे मला आता कायमची दूर सोडून गेली त्यांच्या आठवणींनी माझे मन गदगदून , गलबलून ,गहिवरून येते आणि डोळ्यात  पुन्हा खूप अश्रू तयार होतात . या सगळ्या दुःखदायक घटना मी दरवर्षी पूर्णपणे विसरून  जातो व परत नव्या दमाने , नव्या जोशाने पुन्हा पावसात भिजतो आणि मनातला पाऊस चित्रामध्ये रंगविण्यास सुरवात करतो . तुम्ही देखील तसेच करा सगळ्या वाईट आठवणीनां मनातून  हद्दपार करून नव्याने पावसात भिजा नव्याने पुन्हा पाऊस अनुभवा मग परत नव्या आशा ,नवी उमेद व नवीन चित्रे रेखाटण्यास मनाला प्रेरणा मिळेल.

मला पाऊस आवडतो , कारण मी एकटाच पावसात फिरताना  वाहणारे डोळ्यातील हे अश्रू कोणालाही दिसत नाहीत .

पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाच्या पाण्यात  डोळ्यात आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात .
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

* म्हणून मला मनातला  पाऊस चित्रात रंगवायला खूप खूप आवडतो .*

सुनील काळे
9423966486

गुरुवार, १७ जून, २०२१

पॅलेटवरचे रंग : चंद्रकांत मांडरे

 पॅलेटवरचे रंग

🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌

          



कोल्हापूरकरांच्या कलाकारांच्या खूप कथा , गोष्टी व किस्से बऱ्याच वेळा माझ्या वाचनात आलेल्या होत्या .कोल्हापूरला त्यामूळे कलापूर असंही म्हणतात .

         अशा या कोल्हापूरात मी घरदार सोडून बारावी सायन्स नंतर  कलानिकेतन कॉलेजला दाखल झालो . मोठ्ठं शहर, अनोळखी वातावरण, माणसे पण नवी होती . त्यावेळी माझी आर्थिक स्थिती बिकट होती ,पण निसर्गचित्रांची ओढ प्रचंड होती . पण कला महाविद्यालयामध्ये   ' निसर्गचित्र ' हा एकच विषय नव्हता . सगळ्याच विषयांची प्राथमिक तयारी म्हणजे फौडेंशनचा कोर्स . 

         कॉलेजला थोडे  स्थिरस्थावर झालो त्यानंतर चंद्रकांत मांडरे यांचे नाव सतत ऐकायला मिळायचे . त्यांच्या निसर्गचित्रांच्या प्रिंटस व लेख वारंवांर वाचनात यायचे . अशा कलाकाराला गुरु मानून  त्यांची एकदा तरी भेट घ्यावी म्हणून एका रविवारी त्यांच्या घराचा पत्ता मिळविला आणि निघालो .

        कलानिकेतन कॉलेज कंळबा रोड ते राजारामपूरी सातवी गल्ली, निसर्ग बंगला या पत्यावर चालत , माझी चित्रांची फाईल घेऊन पोहचायला मला दोन तास लागले . त्यावेळी मेसचा डबा लावलेला होता. ब्रेकफास्ट हा प्रकार आर्थिक टंचाईमुळे माहीत नव्हता. त्यामूळे उपाशीपोटीच मी चालत निघालो .

        निसर्ग बंगल्याच्या  गेट मधून आत गेल्याबरोबर दरवाजा उघडणारी व्यक्ती स्वतः चंद्रकांत मांडरे आहेत हे मी लगेच ओळखले , डोक्यावर फरची कॅप, पांढरा सदरा ,  त्यावर करडया रंगाचे जॅकेट ,पांढरा पायजमा. त्यामूळे त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच भारदस्त दिसत होते .

         सेफ्टीडोअरवरच्या दरवाजातूनच त्यांनी विचारले

 "काय पाहीजे ?"

"मी कलानिकेतनचा फौंडेशनचा  विद्यार्थी आहे तुमची ओरिजनल चित्रे पहायला आलोय व माझी चित्रे पण दाखवायची आहेत" . मी पटापट बोलून गेलो . 

"ठिक आहे...बसा बाहेर ."

एवढंच बोलून ते वरच्या मजल्यावर निघून गेले.

सकाळचे दहा, अकरा, बारा वाजले,  दुपार झाली. माझ्या पोटात भुकेने प्रचंड आग पडू लागली. वाट पाहून पाहून खूप कंटाळा येवू लागला पण मांडरे काय आत बोलवेनात . बरं आता बाहेर गेलो आणि अचानकपणे मांडरे बाहेर आले तर ? मोठा प्रश्न  पडला आणि मनात वेगवेगळे विचार येऊ लागले . कोणीतरी सांगितल्याचे आठवले , गुरु प्रथम कडक परिक्षा घेतात, शिष्याला खरंच गरज आहे का हे त्याच्या वर्तणूकीतून तपासतात, मगच ज्ञान किंवा दिक्षा देतात. कदाचित आपली पण नक्कीच परिक्षा घेत असावेत, हे मनाशी ठरवून मी देखील जिद्दीने बाहेरच बसून राहीलो .

           संध्याकाळचे पाच वाजले असावेत, दरवाजा उघडल्याचा आवाज आला व सौ . मांडरे बाहेर फिरायला निघाल्या व दारातच मला बसलेला पाहून "काय पाहीजे ?" असे विचारू लागल्या .

          मी सकाळी नऊ वाजल्या पासून मांडरे साहेबांची बाहेर वाट पहात बसल्याचे सांगताच त्या खूप चिडल्या व मला लगेच आत घेऊन पहिल्या मजल्यावर नेले. मांडरे साहेब चहा घेत निवांतपणे पुस्तक वाचत बसले होते . 

मला बघताच त्यांनी  

"अजून तू आहेसच होय ? गेला नाहीस ?" असा प्रतिप्रश्न  केला .

खरं तर मांडरे मला पूर्ण विसरले होते ( की विसरण्याचे नाटक केले होते, की प्रथम वर्षाचा फौंडेशनचा विद्यार्थी होतो म्हणून दुर्लक्ष केले होते .. ते मला  कधीच कळले नाही )

          त्यांनी त्यांची काही चित्रे नुकतीच फ्रेम करून आणली होती . ती सर्व निसर्गचित्रे मला दाखवली . 

त्यांचा '  निसर्ग बंगला ' महाराष्ट्र सरकार कलादालनात रूपांतरीत करणार असल्याने इंटिरिअरचे काम चालू होते . माझी चित्रे पाहील्यावर "निळ्याजांभळ्या (violet) रंगाचा वापर खूप जास्त करतोस तो पूर्णपणे बंद कर" अशी तंबी दिली . पण "तु पहिल्याच वर्षाचा फौडेंशनचा विद्यार्थी असल्याने तुला मी माफ करतो" असं खाद्यांवर हात ठेऊन कौतुकही केले .

             सौ . शशीकला मांडरे पाचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये काही वर्ष  शिकायला होत्या त्याची आठवण त्यांनी करून दिली . संध्याकाळी थोडा चहापाणी व बिस्कीट मिळाल्यावर मलाही थोडी गप्पा मारायला तरतरी आली . 

         मांडरे त्यांच्या चित्रपटाच्या शुटींग  मध्ये जरा वेळ असला की जेथे असतील तेथे जवळचा परिसर जलरंगात चित्रित करत . जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते . जसं दिसतं तसंच चित्र काढण्याची त्यानां भारी आवड होती .

व ती त्यांनी अखेरपर्यंत जोपासली .

पन्हाळा, रंकाळा ,कोल्हापूर परिसर, वाई महाबळेश्वर, काश्मीर, व परदेशातील इतर अनेक ठिकाणे त्यांनी जलरंगात चित्रित केल्याचे त्यांनी सांगितले .

           जाताना त्यांनी मला त्यांच्या छोट्या स्टुडीओत नेले. "चित्रांविषयी काय संदेश देणार आहे? असे विचारले त्यावेळी ते कोल्हापूरी ढंगात जे म्हणाले ते आजही माझ्या कायम लक्षात  आहे .

पोरा , 

कुठं बी रहा,

कसा बी रहा,

काय पण खा,

कसा पण जग,

कितीही अडचणी येऊ दे

पण आपली ही रंगाची पॅलेट असते ना त्याच्यावरील रंग कधी बी सुकले नाय पाहीजेत हे पक्कं ध्यानात ठेवायचं.

माझी जलरंगाची रंगपेटी बऱ्याच वेळा, जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे, आघातामुळे ,

वाईट प्रसंगामुळे, सुकली............... पर्यायच नव्हता मला .

त्या वेळी मग चंद्रकांत मांडरे यांचे शब्द आठवतात........... 

मी दोन दोन थेंब पाणी प्रत्येक जलरंगावर टाकतो........ 

व परत नव्या दमाने, नव्या विचाराने पुन्हा सुरुवात करतो .


कारण.....

चित्रकाराला कितीही अडचणी येवोत, 

पण त्याचे पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................ 

पॅलेटवरचे रंग कधी सुकले नाही पाहीजेत................


🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌🎨🖌


सुनिल काळे

9423966486

फडणीस सर

फडणीस सर

🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
           
           आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प्रत्यक्ष शिकवलेला विद्यार्थी नाही,  त्यांचा माझा  पूर्वीपासून जवळचा सबंधही नव्हता,  खूप वर्षांपासूनचा नियमित संवाद किंवा परिचय नव्हता. 
         सात सप्टेंबरला सकाळी आमचे चित्रकार मित्र होनराव व विश्वास सोनवणे यांचे फोन आले आणि कोरोनामुळे फडणीस सर गेले या बातमीने कोठेतरी काळजात दुःखाची मोठी कळ उमटल्याची जाणीव झाली व मनात खोलवर पोकळी निर्माण झाली . 
        पाच वर्षांपूर्वी मी पाचगणीवरून वाईजवळ कायमस्वरूपी राहायला आलो त्यावेळी वाईत खूप मित्र नव्हते. वाचनाची आवड असल्याने एक दिवस लो.टिळक वाचनालयात आलो, वाचक सदस्य झालो, पैसे भरून वाचनाची पुस्तके व पावती घेऊन निघालो तर वाचनालयाच्या उजव्या कोपऱ्यातील  काचेचा दरवाजा असलेल्या खोलीतून कोणीतरी हातवारे करुन बोलावत असल्याची जाणीव झाली. त्या दरवाज्यातून आत जाताच मोठया टेबलापलीकडे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे एक दाढीधारी व ग्रे कलरची फेल्टहॅट घातलेली , खांदयावर शबनम बॅग लटकवलेली एक व्यक्ती मोठया प्रेमाने मला बोलावत होती.
      " माझे नाव प्रा.सदाशिव फडणीस " त्यांनी हस्तांदोलन करत बसायला सांगितले .
"आज आमचे नेहमीचे मित्र आले नाहीत म्हणून तुम्हाला चहासाठी बोलावले, आणि आज तुम्हीही माझ्यासारखीच फेल्ट हॅट घातली आहे म्हणून हा नवा वाचक सदस्य कोण आहे याची उत्सुकता होती. ".... 
या बसा निवांतपणे.....अशी मनमोकळी सुरुवात करून अगदी सहजपणे कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी चित्रकार आहे हे समजल्यावर तर ते खूपच खूष झाले . 
           त्या पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांचे  सख्खे "खास" मित्र झालो. मग वेगवेगळ्या कला, लेखक,कलाकार,चित्र,  कवी, संगीत नाटक,संवेदना ,प्रदर्शने, साहित्य, पर्यटन, कलाकारांच्या जाणीवा , प्रेरणा अशा गप्पांमध्ये दोन तास कसे 
संपले ते मला कळालेच नाही वाचनालयाची वेळ संपली मग आम्ही बाहेर रस्त्यावरच उभे राहून तासभर गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पानां विषयाचे बंधन नव्हते.
         नंतरच्या अनेक भेटीतून फडणीस सरानां सतत संवाद करत नवनव्या माणसांच्या ओळखी करून घेणे आणि इतरानांही आपली स्वतःची, व आपल्या सर्व मित्रांच्या ओळखी करून देणे यांचा मनापासून नाद, किंवा मोठा छंदच होता. 
            चित्रकला, संगीत, गायक, लेखक, कवी, नाटक यासारख्या इतर सर्व कला व कलाकारांबद्दल त्यानां अपार प्रेम व उत्सुकता होती. आपण कलाकार नाही अशी खंत ते वारंवार व्यक्त करत. संधी मिळवायची आणि त्या माणसांशी त्याच्या क्षेत्रातील घडामोडींविषयी आवडीने बोलत राहायची त्यांना खूप आवड व  सवडही होती.
           आमची ओळख वाढल्यानंतर त्यांनी काही दिवसातच डॉ. प्रभूणे आणि भालचंद्र मोने या त्यांच्या मित्रांसह आमच्या ' निसर्ग ' नावाच्या स्टुडिओला व घराला भेट दिली. तेथील डिस्प्ले केलेली चित्रे पाहून त्यानां आम्हा कलाकार पतीपत्नीच्या चित्रांविषयी खूप कुतुहल आणि प्रेमपूर्ण आदर होता आणि तो इतरानां सांगताना सतत त्यांच्या बोलण्यातून दिसून यायचा .
            चित्रकारांच्या चित्रनिर्मितीविषयी, कवींच्या कवितांविषयी, लेखकांच्या लेखनाविषयी त्यानां हे सुचते कसे ? आणि ते व्यक्त कसे करतात ? त्यांच्या सादरीकरणाच्या प्रोसेसविषयी त्यानां नेहमी उत्सुकता असायची व ती प्रक्रिया समजून घेण्याचा सतत उत्साह असायचा.
          टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यावर ते बराच वेळा  वाचनालयातच असायचे. वेगवेगळ्या विषयांचे प्रसिद्ध वक्ते, व्याखाते, तज्ञमंडळी यानां बोलावून नवनवीन कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असायचा व अशा सर्व कार्यक्रमांचा  मेसेज पाठवायचा व फोन करुन आठवण करून द्यायची त्यानां आवड होती. 
           बऱ्याच वेळा माझा या सगळ्याच कार्यक्रमानां प्रतिसाद नसायचा मग ते नाराज न होता नवा विचार मांडायचे. आपण फक्त आपल्याच चित्रकला क्षेत्राचा विचार न करता इतर विषयांचेही थोडेफार ज्ञान जीवनात आपल्याला आवश्यक आहे असे ते सांगायचे. माणूस बहुआयामी हवा, वाचन चौफेर हवे. माणसाने बहुश्रूत असावे त्यांचा आग्रह असे. त्यामूळे हळूहळू मग आमची उपस्थिती अशा कार्यक्रमांना वाढली.
           एकदा वाचनालयात गेलो असता सगळीकडे पुस्तकांचे ढिग लागलेले दिसले. मग फडणीस सरांनी सांगितले की सगळी पुस्तके विषयवार लावायचे काम सुरु आहे. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीनां त्यांच्या आवडत्या विषयाची पुस्तके लगेच सापडली पाहीजेत म्हणून हजारो पुस्तके व्यवस्थित लावण्याचा त्यांनी ध्यास घेतला व तो पूर्णही केला. सर्व वाचनालय डिजिटल करायचे काम त्यांनी हाती घेतले होते.प्रत्येक वर्षीच्या नव्या किंवा जुन्या दिवाळी अंकात  चित्रकलेसंदर्भात कोणताही  लेख त्यांच्या वाचनात आला की त्याची माहीती ते लगेच फोन करुन सांगायचे, व तो लेख महत्वाचा असून मी वाचलाच पाहीजे असे आग्रहाने सांगत असत विशेष म्हणजे त्यानां सगळेच लेख खूप सुंदरच आहेत असे 
"निरागसपणे " वाटत होते.
           वाईच्या वसंत व्याखानमालेत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. प्रत्येक विषयातील प्रसिद्ध व नावाजलेल्या मंडळीना बोलावयाचे, त्यांचे कौतुक करायचे आणि कार्यक्रम " भन्नाट " करायचा, परिपूर्ण करायचा हे त्यांचे मुख्य ध्येय असायचे.
           १९१८ च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेत त्यांनी  
"आमची निसर्गयात्रा व अनुभव " या स्लाईड शोच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केले व प्रोत्साहन दिले. आणि त्यानंतर मग वाईत आर्ट गॅलरी करावी असा नवा विचार त्यांनी मांडावयास सुरुवात केली. चित्रकारांची चित्रेच रसिकांनी पाहीली नाहीत तर कलाविषयक जाणीवाच समृद्ध होणार नाहीत, लोकांना चित्रे कशी समजणार ? त्यासाठी त्यांनी 
' चित्र कसे पहावे ' हा एक खास  डॉ . प्रभुणे यांचा स्लाईड शो चा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कलांच्या उन्नतीसाठी वाई तालुक्यात एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार झाले पाहीजे असे ते सांगत. मग टिळक वाचनालयाच्या बेसमेंटमध्ये चित्रप्रदर्शन करता येईल का ? अशी सतत विचारणा करत, चित्र लावण्याचे हुक, लाईट व्यवस्था, मांडणी कशी करता येईल , किती खर्च होईल ? याचा अंदाज ते घेत असत. 
               आर्ट गॅलरीसाठी प्रयत्न करताना काही जणांकडून  अडचणी आल्या, नकार आला की ते चिडून जायचे. मग चहा पिताना समाजकारण, राजकारण, मानवी स्वभाव, यावर ते स्वतःच त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करत. मी मात्र  त्यांचा उत्साह पाहून शांत राहत असे मग ते आणखी त्वेषाने बोलत,कलाकारांनी उदासीन न राहता आता क्रांतीचा झेंडा घेऊन जागृती केली पाहीजे , सतत प्रयत्न करत राहायला हवे .  मला त्यांच्या ह्या उत्साहाचे खूप कौतुक वाटायचे.
           फडणीस सरांच्या गप्पानां अंत नसायचा म्हणून खूप वेळा घाईमध्ये असलो की मी पुस्तके बदलण्यासाठी 
लो.टिळक वाचनालयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारातून जायचो. पण फडणीस सर बरोबर पकडायचेच, त्यानां चुकवणे अवघड असायचे . मग परत  आमच्या चर्चा सुरु व्हायच्या,जीवन  मुल्ये,कलानिर्मिती, मूर्त, अमूर्त चित्रे, त्या चर्चा कधी न संपणाऱ्या असायच्या....
            एकदा मी व फडणीस सर रात्री वाचनालयाच्या जवळच्या मातोश्री नावाच्या हॉटेलमध्ये गप्पा मारत होतो. चहा पिताना त्यांनी  गरम होत असल्याने त्यांची फेल्ट हॅट टेबलावर काढून ठेवली होती. मी पाहीले तर त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मी त्यानां सहजपणे विचारले ''सर ऊन असेल तर हॅट घालणे योग्य आहे, पण आता रात्री गरज नसताना तुम्ही हॅट सतत कशाला घालता ? फडणीस सर अचानक एकदमच शांत झाले व गंभीरपणे म्हणाले  " त्याचे काय आहे सुनील काळे, तुम्ही मराल त्यावेळी तुम्ही काढलेली असंख्य चित्रे रसिकांच्या भिंतीवर लटकवलेली असतील तुम्ही कलाकार मंडळी कधी मरत नसता, चित्रकार चित्रांच्यारूपाने जिवंत राहतात , गायक, संगीतकार त्यांच्या गाण्यामधून अमर होतात, लेखक, कवी त्यांच्या साहित्यातून पुस्तक रुपाने कायम स्मरणात राहतात... कलाकार जिवंत असताना कला जगतात व कलेच्या माध्यमातून मेल्यानंतरही रसिक जणानां आनंद देत राहतात. नुसते जिवंत राहणे आणि खरे आयुष्य जगणे यामध्ये खूप फरक आहे. आम्ही सामान्य माणसे. आम्ही नुसते जिवंत आहोत , आम्हाला कोण स्मरणात ठेवणार ? आमचं अस्तित्व नगण्य, आम्ही मेलो की संपलो ..........
म्हणून मी ही हॅट सतत घालतो, ही हॅट म्हणजे माझी ओळख, मी असो वा नसो पण पण फेल्टहॅट घालणारे शबनम बॅग बाळगणारे ते म्हणजे फडणीस सर एवढी आमची ओळख राहीली तरी पुरेसे आहे....................
           आता लो.टिळक वाचनालयात गेल्यावर  उजव्या बाजुच्या ऑफीसमधून हाक मारल्याचा आवाज येणार नाही , नवीन चित्रकलेची पुस्तके व इतर चांगल्या लेखांविषयी वाचण्याचा आग्रह होणार नाही, नवीन चित्रे,कला विषयांवर चर्चा होणार नाहीत , त्यांचा नेहमी सकारात्मक प्रोत्साहन देणारा उत्साही चेहरा आणि त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग यापुढे कधीही दिसणार नाही कारण सात सप्टेंबरला फडणीस सर करोनामूळे अनंतात विलीन झाले.
                 सध्या करोनाच्या महामारीत सर्व देवांची मंदीरे बंद आहेत, सर्व भक्तानां मंदीराचे दरवाजे बंद असल्यामूळे देव तरी काय करणार ? मला वाटते देवही या एकटेपणाला कंटाळला असणार, मग कंटाळल्यामूळे अचानकपणे त्याला फडणीस सरांची आठवण झाली असणार व घाईघाईतच त्याने फडणीस सरांना गप्पा मारायला वर बोलावून घेतले असणार......... आणि मग देवाच्या खूप मोठया वाचनालयात फडणीस सर देवाबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर, नानाविध कला ज्यामध्ये संगीत, चित्रकला, नाटक, कविता, लेखन, साहित्य, अभिनय, वसंत व्याख्यानमाला, व वाईत सांस्कृतिक केन्द्र कसे असणार ? आर्ट गॅलरी कशी असणार ? या ठिकाणी आणखी काय सुधारणा करता येईल ?मूर्त ,अमूर्त चित्रे का समजत नाहीत ? त्यासाठी काय करावे इत्यादी विविध प्रश्नांवर सखोल गंभीरपणे चर्चा करत असणार अशी मला खात्री आहे .
        असे म्हणतात की,जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या आयुष्याची लांबी ही जन्माच्याच वेळी ठरलेली असते, आपल्याला जितके श्वास घ्यायचे ठरलेले असते तितके श्वास घ्यायचे संपले की मृत्यूला सामोरे जावेच लागते. 
         मी खरं तर नास्तिक आहे, मंदीरात जात नाही पण कधी गेलोच तर देवाला नक्की फडणीस सरानां न भेटवता अचानक का नेले ? असा नेल्याचा जाब नक्कीच विचारीन, तक्रार करीन की अजून काही वर्ष का थांबला नाहीस......... असो.
     फडणीस सर असे अचानकपणे सर्वांना चकवा देऊन त्यांच्या धीरगंभीर, मिश्किल स्वभावानुसार सहजपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग व त्यांच्याबरोबरच्या चर्चा मनात कायम लक्षात राहतील .
जन्म निश्चित आहे,
मरण निश्चित आहे,
जर आयुष्यातील कर्म चांगले असतील
तर " स्मरण " निश्चित आहे. 
फडणीस सर ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आले असतील त्या अनेकांच्या "स्मरणात " ते नक्की राहतील, कारण त्यांनी केलेले कार्य चांगलेच होते.......
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

सुनील काळे✍️
9423966486

रिटायर्ड

*_रिटायर्ड_* 

सकाळी वॉटस अॅपवर मेसेजेस पाहत असताना इंद्रनील बर्वे यांचा गुड मॉर्निंगचा मेसेज आला . त्यामध्ये एका तुटलेल्या , टाकून दिलेल्या , गंजलेल्या बोटीचा फोटो होता . आणि त्याखाली लिहले होते  'रिटायर्ड ' . तो फोटो पाहून मी एका जुन्या आठवणीत रममाण झालो .
          २oo४ साली आमचा एक ग्रूप शो मुंबईला नेहरू सेंटरच्या मोठया हॉलमध्ये झाला . प्रदर्शन सुरु झाले संध्याकाळी मला गॅलरीच्या ऑफीसमधून निरोप आला की महाबळेश्वर वरुन तुमच्यासाठी फोन आला आहे .गॅलरीच्या कोपऱ्यातच कॉर्नरला ऑफीस आहे .मी टेलीफोन घेतला .... कोणीतरी वयोवृध्द आवाजात पारशी टोन मध्ये बाई बोलत होत्या. 
" मि . काले मी पेरीन बोलते , मी पण रिटायर हाय ,पण आता महाबलेश्वरमंदी आला हाय , तुझा क्लबमंदी पाठवलेला ब्रोशर मी पाहीला हाय , त्यामंदी एक बोटींचा पेंटींग हाय , " रिटायर्ड " टायटल लिवला हाय त्यो पेंटींग मला हंड्रेड परसेन्ट पाहिजे हाय . त्याला ब्राऊनकलर मंदी फ्रेम कर . मी बॉम्बेला आला की  तवा तुझा पैसा दिल .पक्का प्रॉमिस कर .  माझा नंबर लिव . मी प्रॉमिस करून नंबर लिहून घेतला . आणि फोन बंद झाला .
           प्रदर्शनाची धामधूम संपल्यानंतर निघण्यापूर्वी मी त्या पारशी पेरीन बाईंना फोन केला . त्यांनी सांगितल्या प्रमाणे मंत्रालया शेजारी ' समता ' नावाची पॉश इमारत होती . त्या ठिकाणी पेंटींग व्यवस्थित पॅक करून टॅक्सीने गेलो . नरिमन पॉईंट ,मंत्रालय परिसरात ती इमारत प्रसिद्ध  असल्याने शोधायला जास्त त्रास झाला नाही . इमारत पॉश होती .लिफ्टने पोहचलो आणि घराची बेल वाजविली.
           75 वयाच्या पेरीनबाई टिपीकल स्लीवलेस पारशी फ्रॉक घालून समोरच दरवाजा उघडून उभ्या होत्या .आत गेल्यावर प्रशस्त हॉलमध्ये पारशी सागवानी फर्निचर व सर्व ठिकाणी जाडजूड पुस्तकांची कपाटे . विश्वकोष किंवा वकीलाच्या ऑफिस मध्ये जशी जाडजूड काळ्या रंगाची पुस्तके असतात तशीच  सगळीकडे पुस्तकेच पुस्तके . त्या पुस्तकांच्या भोवती बरोबर मध्यभागी अतिशय व्यवस्थित टाय सुट बुट घातलेले ८० वर्षांचे एक पारशी गृहस्थ बसलेले. अतिशय धारदार नाक , गोरा वर्ण ,उंच , सडपातळ ब्रिटीशां प्रमाणे दिसणारा व शांतपणे शुन्यात नजर लावून बसलेला. मी त्यानां गुडमॉर्निंग  केले , पण काहीच प्रतिक्रिया नाही , हास्य नाही, ओळख नाही, शब्द नाहीत .पेरीनने मला सरळ आत मध्ये येण्यास सांगितले .आतमध्ये सुध्दा सगळीकडेच कपाटांनी भरलेली  पुस्तके व या कपाटांच्या मधोमध एक छोटी जागा मोकळी सोडलेली .व त्याला खिळा सुध्दा मारुन ठेवला होता . ते  'रिटायर्ड 'बोटींचे चित्र तिने तेथे लावायला सांगितले .मी पॅकींग केलेले चित्र काढले व त्या ठिकाणी लावले . ते इतके परफेक्ट बसले की जणू कित्येक वर्ष ती जागा माझ्या  पेंटींगची वाटच पहात होते .
         पैशाचे पाकीट तयारच ठेवले होते . तिने ते माझ्या हातात दिले, डोक्यावर प्रेमाने हात ठेवला . गॉड ब्लेस यू असे म्हटले व शांतपणे बाहेरचा रस्ता दाखवला . बाहेर पडताना मी तिच्याकडे पाहीले तर म्हणाली .........
" माजा हाजबंड हाय ,ते असाच बसते . "
           मी त्या इमारतीतून बाहेर प्रचंड गर्दीत आलो . रस्त्याच्या फूटपाथवरून मी जरी चालत होतो तरी माझ्या मनात असंख्य विचार येत होते . घरात पारशी बाबा टाय बूट घालून का बसत असेल ? असा निर्विकार शांत मनाने तो कसला विचार करत असेल ? त्याला कोणी दुःख दिले असेल का ? काय तरी त्याचे बिनसले असेल किंवा हरविले असेल का ? त्याला कंटाळा येत नसेल का त्या रोजच्या बसण्याचा ? असे दिवसभर एका जागेवर बसून राहायचे म्हणजे अवघड काम ...... माझ्या मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते .
             पुढे मी त्यानां विसरून गेलो . चार पाच वर्षानंतर मी पाचगणीत असताना मला अचानक फोन आला . तोच पारशी टोन, 
" मी पेरीन भरूचा बोलते . मी आता महाबळेश्वर क्लब मंदी हाय  तू भेटायला ये, मला तुला काय  तरी दयायचं हाय तू ये .पक्का प्रॉमिस कर . मीही पक्का प्रॉमिस केला व  ठरलेल्या दिवशी मी महाबळेश्वरला गेलो . संध्याकाळी मी तेथे पोहचलो क्लबच्या ऑफीस मध्ये चौकशी केली . उजव्या बाजूलाच थोडया पायऱ्या असलेली छोटी एकसंघ कॉटेजेस आहेत . त्यातील १ नंबरच्या कॉटेज मध्येच पेरीन उभ्या होत्या. बाहेर व्हरांड्यामध्येच आराम खुर्ची होती व त्यामध्ये पारशी बाबा बसलेले . तिच नजर , तेच निर्विकार आंतरळात पहाणे . मी केलेल्या नमस्काराला प्रत्युतर नाही . बोलणे नाही . मी पेरीन कडे पाहीले . तिने न बोलता एक इंग्रजी पुस्तक माझ्या हातावर ठेवले . महाबळेश्वर क्लब व परिसराची माहीती असलेले . महाबळेश्वर क्लब साठी तिने ते स्वतः लिहले होते . 
वुई एंजॉईंग युवर पेटींग मि . काले , वुई बोथ लाईक दॅट पेंटींग  , 
तुझा " रिटायर्ड " टायटल लई आवडला .
 मी आरामखुर्चीकडे पाहीले तर म्हणाली 
" माजा हजबंड हाय , ते असाच बसते . "
टाय, सुट ,बुट कडक पारशी बाबा .निर्विकार ,शांत शुन्यात नजर लावून बसलेला . त्याला पाहिल्यानंतर मी परत प्रश्नांच्या खाईत ... मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते . काय शोधत असेल हा माणूस ? का शांतपणे न बोलता शुन्यात हरवलेल्या नजरेने बसत असावा ? 
       मला आठवले ते पेंटींग मी तापोळ्याला गेलो होतो त्यावेळी काढले होते . माझा एक शिक्षक मित्र दीपक चिकणे तेथे रुम घेऊन रहात होता .दिवसभर मी तापोळ्याच्या शिवसागर  बोटींग क्लब व बामणोली परिसरात फिरत होतो संध्याकाळी परतताना थोडया अंतरावर ह्या वापरलेल्या ,टाकून दिलेल्या, निरोपयोगी झालेल्या बोटी पडल्या होत्या . मला त्या चकाचक नव्या बोटींपेक्षा या गंजलेल्या बोटींचेच चित्र काढावेसे वाटले . त्याची झिजलेली लाकडे  ,उडालेला रंग पूर्ण गंजलेले लोखंड यांचा इफेक्ट मिळविण्यात मी बराच यशस्वी झालो होतो व त्याला " रिटायर्ड "नाव देऊन मी ते चित्र ब्रोशरमध्ये छापले होते .
           पुढे एकदा आमच्या मुंबईच्याच पारशी मित्राला मी ही कथा सांगितली . त्यांच्याविषयी विचारले तर म्हणाले , 
"तो पारशी तर सॅम भरुचा . "
दिल्लीच्या  सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश , रिटायर्ड जज्ज . तो खूप मोठा माणूस  , ऑप्टीमॅस्टीक अॅन्ड व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मॅन ,अॅन्ड ही वॉज व्हेरी पॉवरफूल मॅन , व्हेरी स्ट्रीक्ट जज्ज .  यु आर लकी दॅट युवर ओन्ली पेंटींग इन हीज हाऊस .
         आणि अचानक मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली . माझे रिटायर्ड नावाचे पेंटीग त्यांनी का घेतले असावे त्याचे कोडेही अचानकपणे सुटले .
          त्या दुर्लक्षित, गंजलेल्या,  लाकुड सडलेल्या निरोपयोगी बोटी पूर्वी किती छान  दिसत असतील ? किती  पर्यटकांनीं या बोटीवर व शिवसागर क्लबमध्ये असताना मस्ती , मजा अनुभवली असेल . रुबाब असेल या बोटींचा त्यावेळी मालक त्यांची मन लावून काळजी घेत असणार . आणि आता गरज संपल्यावर त्या एका कोपऱ्यात टाकून दिलेल्या असाव्यात .दुर लोटलेल्या दुर्लक्षित केलल्या ,अडवळणी  कोनाड्यात लांब ,विषन्नपणे तुटलेल्या अवस्थेत त्या आता पडलेल्या आहेत , कदाचित आता अखेरचा श्वास मोजत पडलेल्या या त्याच बोटी त्यांच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाहीत ..........
            अचानक मला सुपरस्टार राजेश खन्नाचे अखेरच्या दिवसात केलेले एक भाषण आठवले . त्यावेळी त्याने साहीरचा एक शेर म्हटला होता तो शेर असा होता , " इज्जते , शोहरते , उल्फते , चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नही . आज मै हू जहाँ कल कोई और था , ये भी एक दौर है ...... वो भी एक दौर था " .
           जस्टीज सॅम भरुचा देखील कदाचित त्यांचा पूर्वीचा रुबाबदार , उच्चत्तम पदावरचा व्यतित केलेला काळ आठवत असेच खूप गुढपणे शांत बसत असावेत . दूर अंतराळात , निर्विकार चेहऱ्याने ,  आठवणी काढत,  आठवणींचे गाठोडे सोडत बसलेले असावेत,
त्या " रिटायर्ड " बोटीप्रमाणे स्वतःच्याच एका भूतकाळातील  अनोळखी विश्वात..........

सुनिल काळे ( ९४२३९६६४८६ )

आमीरचे लग्न आणि माझे चित्रप्रदर्शन

*आमीरचे लग्न आणि माझे चित्रप्रदर्शन*      🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨

          बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना ! 
असं एक वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण त्याचा जीवनात कधी प्रत्यक्ष अनुभव येईल असे मला कधीच वाटले नाही. पण एक दिवस असा आला की तो माझ्या कायम स्मरणात राहीला. चला तर मग आज खूप दिवसांनी निवांतपणे तुमच्याशी गप्पा मारत हा मजेशीर अनुभवच शेअर करतो.
           28/12/2005 ही तारीख आजही माझ्या चांगलीच लक्षात आहे . ही तारीख आहे पाचगणीत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या लग्नाची. मला या लग्नाचे निमंत्रणही नव्हते, किंवा माझा दुरान्वये त्यांच्यापैकी कोणाचा संबधही नव्हता. पण तरीही हे लग्न माझ्या आयुष्यात एक महत्वाचा प्रसंग म्हणून लक्षात आहे . का ? कसे ? सांगतो तुम्हाला......
                सन 2001 ते 2004 पर्यंत मी पाचगणीच्या सेंट पीटर्स या ब्रिटीशकालीन बोर्डींग स्कूलमध्ये आर्ट टिचर म्हणून काम करत होतो. त्रेपन्न एकराचा सुंदर परिसर, त्यामध्ये खेळाची मोठी मैदाने, सुंदर ब्रिटीश आर्कीटेक्चरच्या इमारती, नीटनेटकी फुलांची गार्डन्स, भरपूर वृक्षराई , शांतता,अशा फ्लोरा हाऊसच्या परिसरात शाळेने मला एक छोटे कॉटेज राहण्यासाठी दिले होते. सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेचे जेवण, लाईट, पाणी, घरभाडे नाही अशा खूप सुखसुविधा दिल्या होत्या.शिवाय रोज सकाळी टाय, बुट,कोट असा कडक ड्रेसकोड घालून दिवसभर शाळेत मिरवायचे असायचे. शिवाय माझ्याकडे चारचाकी गाडी होती. मोठा रुबाब असायचा त्याकाळात. शिवाय मी परमनंट झालो होतो. आयुष्यात रिटायर्ड होईपर्यंत मला चिंता नव्हती. पण अशा सगळ्या सुखसुविधा असूनही मी प्रचंड अस्वस्थ होतो, असमाधानी होतो, अतृप्त होतो. कारण की मी निसर्गचित्रकार होतो. आणि मला चित्र काढायला अजिबात वेळ नव्हता.
               मी खुप संघर्ष करून घरादाराचा त्याग करून चित्रकलेच्या कॉलेजला गेलो होतो. अनेक प्रदर्शने केली होती. खूप पैसे मिळत नसले तरी चित्रकलेच्या रोज संपर्कात होतो. स्केचिंगचा रियाझ करायचो, आनंदी असायचो. सेंट पीटर्सची मात्र रोजची सकाळपासून मिनिट टू मिनिट वर्षभराची आखणी असायची. आठवड्यातून सुट्टी कधीतरीच आणि रविवारीही कधी M.O.D म्हणजे मास्टर ऑन ड्युटी किंवा चर्चची ड्युटी असायची. माझी स्वतःची चित्रकला सोडून शाळेमध्ये सतत रोजचा भरगच्च कार्यक्रम असायचा. मी रोज त्याच त्या मशीनसारख्या रूटीनला प्रचंड कंटाळलो होतो. मला स्वतःची चित्रकला करता येत नसल्याने मी मानसिकरित्या आतल्या आत घुसमटत होतो.आणि एक दिवस मी या सगळ्या चांगल्या रुटिनच्या सुखाच्या जगण्याचा राजीनामा देऊन अंत करायचा असा अंतिम निर्णय घेतला आणि काही दिवसानंतर मी रूटीन शाळेतून कायमचा मुक्त झालो.
            माझे नवे घर झाले आणि मी परत निसर्गाच्या कुशीत भरपूर चित्र काढत सुटलो. एखाद्या डांबून ठेवलेल्या कैद्याला खूप दिवसानंतर जसे स्वतंत्र मिळाल्याचा भरघोस आनंद मिळतो तसेच मला वाटायचे. त्या संपूर्ण वर्षात मी परिसरातील भरपूर निसर्गचित्रे रेखाटली.
               वाईवरून पाचगणीत प्रवेश करताना दांडेघर जकातनाक्या शेजारी (Ravine Hotel) रवाईन हॉटेलचा बोर्ड दिसतो. पाचगणीतील हे सर्वात मोठे व कृष्णा व्हॅलीचा सुंदर देखावा असणारे प्रसिद्ध स्टार हॉटेल आहे.पाचगणीच्या परिसरात ज्यावेळी शुटींग असतात ,त्यावेळी सगळे मोठे स्टार नायक, नायिका, नेते, मोठे उद्योगपती, श्रीमंत पालक येथेच मुक्कामी असतात. अतिशय भव्य व सुंदर लोकेशन, सर्व अत्याधुनिक सुविधा असल्याने तेथे नेहमीच मोठी गर्दी असते. या हॉटेलच्या मालकीणबाई 
सौ.बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम या अतिशय कल्पक, कष्टाळू, आणि कलासक्त मनोवृत्तीच्या आहेत. त्या स्वतः हौशी कॉपी पेटींग करत असतात. त्यांची माझी ओळख होतीच. माझी वॉटरकलरमधील व स्वातीची ऑईल कलरमधील थोडीफार चित्रे त्यांच्याकडे हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवली होती.
              एकदा बिस्मिल्ला मॅडमने सांगितले की प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचे लग्न पाचगणीत आहे. अनेक मोठी नेते मंडळी, अभिनेते, प्रसिद्ध लोक येणार आहेत, त्यांचे सर्व हॉटेल तीन चार दिवसांसाठी आमीरने बुक केले आहे. कदाचित आमीर येथेच मुक्कामी असेल तर तू एका मोठया चित्रप्रदर्शनाचे आयोजन कर म्हणजे त्याची सगळी पाहुणे मंडळी चित्रप्रदर्शन पाहायला येतील. ही खूप चांगली संधी होती. मलाही ही कल्पना खूप आवडली कारण मला हॉलचे भाडे दयायचे नव्हते. शिवाय तळघरातील एक मोठा जीमचा हॉल मला लाईटच्या सुविधेसह उपलब्ध होत होता. आठ दिवसांचा वेळ होता आणि आमच्याकडे चित्रकामही तयार होते.
            माझ्याकडे चित्र डिस्प्ले करण्याचे स्टॅन्ड, आणि ईझल्स होते. त्या लोखंडी स्टॅन्डसला,ईझल्सना मी ऑईलपेंट मारुन चकाचक केले. चित्रानां नवीन फ्रेम्स , माऊंटींग तयार केले , काही आमंत्रण पत्रिका तयार केल्या.मी स्वतः सुंदर कॅलिग्राफी करून आमीरसाठी खास निमंत्रण पत्रिका तयार केली.रवाईन हॉटेलला रोषणाई केली गेली होती. आमीर खानच्या लग्नाची बातमी पाचगणीत पोहचली होती. शिवाय डिसेंबरचा शेवटचा आठवडा असल्याने पाचगणीत सिझन होता, पर्यटकांना उत्साहाने बहर आलेलाच होता. एकंदर प्रदर्शनाची जय्यत तयारी करून आम्ही लग्न दिवसाची वाट पहात होतो.
           आमीर खान, लगानची पूर्ण टीम, अनेक हिरो, हिरॉईन्स, दिग्दर्शक, क्रिकेटर्स, संगीतकार, निर्माते पाचगणीत दाखल होवू लागले. सर्व हॉटेल्स भरली गेली, अनेक टि.व्ही वाहिन्यांच्या मोठया गाडया ,पत्रकार, र्इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी सर्वत्र बातम्यांसाठी फिरताना दिसू लागले. अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांची लगबग दिसू लागली, पाचगणी लोकल माणसांनी, पर्यटकांनी, उत्साहाने व स्टार व्हराडी मंडळीमुळे पूर्णपणे भरून गेली.
           आमीरचे लग्न ' मेहेरभाई हाऊस ' या बंगल्यात होणार होते आणि काही कार्यक्रम इल पलाझो या हॉटेलमध्ये आयोजित केले गेले होते. मला आमीरला भेटून निमंत्रणपत्रिका दयायची होती पण मी त्याला कॉन्टॅक्ट कसा करणार याचे अगोदरपासून काहीच नियोजन नव्हते. लग्नाला आत फक्त एकच दिवसच उरला होता आणि मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्याच वेळी सकाळी मला बिस्मिल्ला मॅडमचा फोन आला की आज संध्याकाळी आमीर रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर लगानच्या सर्व मित्रांसोबत खेळायला येणार आहे. खेळ संपल्यानंतर तू भेट व प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका दे. हे ऐकल्यावर मलाही उत्साह आला आणि मी तेथे जाण्याचे निश्चित केले.
              त्या संध्याकाळी टेनिस कोर्टवर प्रचंड बंदोबस्त होता. अनेक पोलीस व प्रायव्हेट बॉडीगार्डस सगळीकडे दिसत होते. अमीर एका इनोव्हा गाडीतून आल्याचे मी पाहीले. त्याच्या सोबत अनेक प्रसिद्ध मंडळी होती.टेनिसचा खेळ संपल्यानंतर आमीर याच गाडीने परत जाणार आहे याची खात्री मी करून घेतली. 
आणि मी गाडीच्या जवळच थांबण्याचे ठरवले. 
            इकडे स्टार मंडळीचा टेनिस खेळ खूप रंगात आला होता. हॉटलमध्ये राहणारे सर्वजणच त्याच्या खेळात सामील झाले होते. खेळ संपताक्षणीच आमीरभोवती फोटो काढणाऱ्यांची गर्दी वाढू लागली, फोटो काढत सर्वानां हात हालवत, ओळखीच्या सर्वांना नमस्कार करत सहा मजबूत बॉडीगार्डसच्या पहाऱ्यात तो आपल्या गाडीकडे येत होता. आता एक दोन मिनिटात त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला गेला तो गाडीत बसण्यापूर्वीच मी अत्यंत वेगाने गाडीकडे धावलो. मी अचानक पुढे मुसंडी मारल्याने क्षणभर बॉडीगार्डस गांगरले व त्या सर्वांनी मला आडवले. आमीर नुकताच टेनिस खेळून आल्यामूळे कपाळावरील घामाच्या धारा पुसत होता. मी माझ्या हातातले मोठे निमंत्रण पत्रिकेचे पाकीट, माझे चित्रप्रदर्शनाचे जुने कॅटलॉग त्याच्या हातात दिले.आमीरने बॉडीगार्डसनां थांबण्याचा इशारा केला व मला शांतपणे विचारले,
"क्या काम है " ? क्या है इस पॅकटमें ?
मी हातातील पत्रिका पेस्ट केली नव्हतीच, ती पत्रिका त्याने उघडली तोपर्यंत मी बोलायला सुरुवात केली. 
"तुम्हारे शादी के वास्ते हम लोगोने एक पंचगनीके पेटींगका एक बडा एक्झिबिशन रवाईन हॉटेलमें रखा है ! कृपया कल आप आके उसका ओपनिंग करो, ऐसा मै चाहता हूँ . असं एका दमात सगळे सांगितले.
'' कब है ये एक्झिबिशन " ? आमीरने विचारले .
" कल सुबह दस बजे " , मी उत्साहाने सांगितले .
कल तो मेरी शादी है I आमीरने हसतच सांगितले. 
"अच्छा ये बताओ , तुम्हारी शादी हो गयी है " ? आमीरने पुन्हा विचारले .
हाँ , हो गयी है I मी सांगितले .
तो फिर ये बताओ की " तुम मेरी जगह होते तो शादी अॅटेन्ड करोगे की आर्ट एक्झिबिशनके ओपनिंग करोगे " ? आमीरने विचारले.
मै मेरी शादी अॅटेन्ड करुँगा I मी भोळसटपणे खाली मान घालून उत्तर दिले.
त्याबरोबर त्याच्या तोंडावर ते प्रसिध्द स्मितहास्य उमटले. आणि माझा हात हातात घेत शेकहँन्ड करून आमीरची स्वारी इनोव्हामध्ये बसली. 
"कॅन आय टेक धिस इन्व्हीटेशन 
कार्ड विथ मी " ? आमीरने विचारले.
मी Yes म्हणालो.
Thank you ,for your honest Answer.

      बॉडीगार्डसनी लगेच सर्व गर्दी हटवली, व सर्वांना हात हलवत आमीरची गाडी दिसेनाशी झाली.
          आपण किती मुर्ख आहोत, या विचाराने मी खजील झालो. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही याची मलाच लाज वाटली.आपल्या सारख्या एखाद्या साध्या माणसाचे लग्न असेल तरी तो लग्नाच्या दिवशी किती व्यस्त असेल, तो इतर गोष्टींकडे लक्ष न देता लग्न कार्यक्रमात व्यस्त असेल. आणि आमीर खान तर सेलेब्रिटी आहे. अशा अचानक ठरवलेल्या कार्यक्रमास त्याने नकार दिला तर त्याचे काय चुकले. अशी मनाचीच समजूत घालत मी माझ्या लग्नाच्या आठवणीत भूतकाळात रमत घरी गेलो.
              दुसऱ्या दिवशी आमीर खान किंवा कोणीच आपल्या प्रदर्शनाला येणार नाही असे मनाला ठामपणे वाटले, मी हॉटेलमध्ये त्या प्रदर्शनाच्या तळघरातील हॉलमध्ये एकटाच निवांतपणे पुस्तक वाचत बसलो होतो.
साधारणपणे दुपारी एकच्या सुमारास टाय घातलेला, शर्ट इन केलेला हातात एक ब्रीफकेस घेतलेला स्मार्ट तरुण माणूस प्रदर्शनाच्या हॉलमध्ये आला.
"माझे नाव आशिष थरथरे, मी आमीर खानचा पर्सनल मॅनेजर आहे. चित्रकार सुनील काळे आपणच का " ?
मी हो म्हणालो, आणि त्याला बसायला खुर्ची दिली.
आमीर खान यांनी प्रदर्शनाला येऊ शकणार नाही अशी दिलगीरी व्यक्त केली आहे आणि त्यांनी हा निरोप मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगितला आहे.
मी देखील आमीरचे बरोबर आहे..... मीच ह्या प्रदर्शनाचे आयोजन लग्नाच्या दिवशी करण्याची मोठी चुक केली असे त्यानां सांगितले.
नाही ,नाही असे काही नाही उलट तुम्ही खूप छान काम केले आहे. फक्त ते स्वतः येथे येऊ शकत नाही हे त्यांनी दुःखाने सांगितले आहे. त्यांनी तुमची ब्रोशर्स, आमंत्रण पत्रिका पाहीली त्यातील चित्रे त्यानां आवडली आहेत. उलट त्यांनीच एक विनंती केली आहे ती सांगण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुमच्या या प्रदर्शनात खूप गेस्ट येणार आहेत त्यानां चित्रे आवडली तर ते जरूर विकत घेतील, फक्त तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ नका. तुमची जी काही रक्कम होईल ती सर्व टोटल रक्कम आमीर खान यांच्याकडून दिली जाईल. कृपया ही विनंती मान्य करावी...... असे बोलून आशिष प्रदर्शन पाहून निघून गेला.
              आता मात्र मी थक्क होण्याची वेळ माझी होती.एका अनोळख्या गावी ,लग्नाच्या दिवशी, अनोळखी कलाकाराने न सांगता चित्रप्रदर्शन भरवले होते आणि त्याची योग्य ती दखल आमीरने निरोप पाठवून स्वतः घेतली होती त्याच्या मनात आले असते तर त्याने माझे कार्ड फेकूनही दिले असते. उलट हा एका परफेकशनिस्टचा मला खरा अनुभव आला होता.
            सकाळी लग्नाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम संपला होता. प्रसिध्द वऱ्हाडी मंडळीची धावपळ ये जा सुरु होती आणि संध्याकाळी रिकाम्या वेळी माझ्या प्रदर्शनाला अचानक गर्दी उसळली आणि ज्यानां मी पाहीले त्यानां पाहून मी मनाने फार फार भारावून गेलो. आजही हे सर्व लिहताना मी तोच अनुभव पुन्हा घेत आहे.
              खरं सांगायचे तर त्यावेळी मी आमीर खानचा खूप मोठा फॅन नव्हतो, त्याचे सगळे चित्रपटही मी पाहीलेले नव्हते. मी त्याचा फक्त लगान आणि सत्यजित भटकळ यांची " मेकींग ऑफ लगान " ही फिल्म पाहीली होती. आणि आज या प्रदर्शनात ते सर्व देशी, परदेशी , सर्व छोटे,मोठे अभिनेते माझी चित्रे पाहत होते. लगानची क्रिकेट टिम आलेली होतीच पण क्रिकेट जगतात खेळणारी दिग्गज मंडळी मी प्रत्यक्ष पहात होतो. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक , नायक, नायिका, संगीतकार, वादक, चरित्र अभिनेते, विनोदी अभिनेते, खलनायक, गायक, ज्यानां मी फक्त टेलिव्हिजनवरच पहात होतो ती मी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पहात होतो. आणि माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. त्या सर्वांची नावे लिहीत बसलो तर सगळी चित्रपटसृष्टीचीच पुनरावृत्ती होईल. तो एक भारी, संवेदनामय, अविस्मरणीय सुखद लक्षात राहण्यासारखा अनुभव होता.
           त्या गर्दीमध्येच एक बॉबकट केलेली मध्यम उंचीची अनोळखी स्त्री आली. मी आमीरला दिलेली निमंत्रणपत्रिका तिच्या हातात होती. तिने तिचे नाव नुझत खान असे सांगितले. तिच्या सोबत आणखी एक काळा शर्ट घातलेला गृहस्थ होता. त्याने त्याचे नाव मन्सुरअली खान असे सांगितले. अतिशय काळजीपूर्वक , मन:पूर्वक तो प्रत्येक चित्र बघत होता. सर्व प्रदर्शन पाहील्यानंतर काही चित्रे त्यानां आवडली होती ती सिलेक्ट केल्यावर त्याने एक मोठा गमतीशीर प्रश्न विचारला. सर्वात जुनी, कधीही प्रदर्शित केली नाहीत अशी काही चित्रे आहेत का ? मी म्हणालो खूप आहेत चित्रांचा गट्टाच आहे माझ्याकडे. त्याने त्याचे कार्ड दिले व दुसऱ्या दिवशी मला सर्वात जुनी चित्रे घेऊन 
इल पलाझो हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. 
अशा अद्भूत वातावरणातील तो दिवस संपला.
           दुसऱ्या दिवशी माझ्या स्टुडीओतला जुन्या चित्रांचा गट्टा घेऊन मी इल पलाझो हॉटेलवर पोहचलो. इकडे प्रदर्शनाच्या हॉलवर स्वाती थांबली. मन्सुरअली खानने त्याची बायको टिनाची ओळख करून दिली. तेवढ्यात नुझत खान आली व त्यांनी जुन्या चित्रांवर झडपच मारली. दोघेजण फारच भारावून गेले होते. त्यानां जे जुन्या पाचगणीची चित्रे आपेक्षित होती ती त्यानां मिळाली होती. मग त्यांनीच सांगितले की ते प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रपट निर्माते नासीर हुसेन यांची मुले आहेत व आमीर हा ताहीर हुसेन यांचा मुलगा असून त्यांचा सख्खा चुलत भाऊ आहे. नुझतचा मुलगा इम्रानखान हिरो आहे . यादों की बारात, कारवाँ , आणि बरेच चित्रपट पाचगणीत शुटींग करताना ते लहानपणापासून नेहमी येथे येत असत. सर्व खान बंधू पाचगणी परिसराचे खूप चाहते आहेत. माझी बरीच चित्रे त्यांनी घेतली. इकडे दुसऱ्या हॉलमध्ये आमीरच्या लग्नाचा मोठा केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. आणि येथे मी माझी जुनी चित्रे विकण्याच्या कार्यक्रमात मग्न होतो.
            नंतर रवाईन हॉटेलच्या हॉलवर आल्यावर दोन खास कुटुंबाची ओळख झाली, एक होता अमीन हाजी ( लगान टिमचा मुका ढोलके पटटू ) आणि त्याची ब्रिटीश पत्नी शॅलोट. दुसरे शॅलोटचे ब्रिटीश आईवडील श्री .व सौ .कोलस 
( Mr. & Mrs.Coles). त्यांनीही काही चित्रे घेतली. 
          अमीन हाजी आता पाचगणीतच स्थायिक झाला असून तो पाचगणीकरांचा गळ्यातील ताईत झाला आहे. अनेक स्थानिक उपक्रमांमध्ये तो सक्रीय असतो व तो आमचा चांगला मित्र झाला आहे .
            नंतर मला लेखिका शर्मिला फडके यांच्या एका लोकमतच्या लेखातून मन्सुरअली खान हे व्यक्तिमत्व काय आहे हे कळाले.
आमीरचा कयामतसे कयामत तक, जो जिता वही सिकंदर इ. गाजलेल्या चित्रपटांचा तो दिग्दर्शक होता. आणि आता तो उटीजवळ कण्णूर येथे शेती करत आहे .
            आमीरच्या लग्नानंतर सर्व धावपळ संपल्यानंतर मॅनेजर आशिष थरथरे यांनी सर्व घेतलेल्या चित्रांची रक्कम रोख दिली, आभार मानले व मला एक माझ्या आवडीचे चित्र आमीर खानसाठी मागितले. मीही टेबललॅन्ड, एम.आर.ए सेटंर, सिडने पॉईंटचे एकत्रित चित्रण असलेले एक माझ्या आवडत्या स्पॉटचे जलरंगातील चित्र दिले. दुसऱ्या दिवशी आमीरच्या सहीचा 
एकोण चाळीस हजाराचा चेक व त्याची रंगीत झेरॉक्सप्रत आली. चेक बँकेत जमा केला आणि झेरॉक्स आठवण म्हणून आजही माझ्याकडे आहे .
         तर असा हा भन्नाट अनुभव '
         बेगानी शादीमें अब्दूल्ला दिवाना............. 
या म्हणीचे प्रॅक्टीकल प्रत्यंतर देणारा ठरला.
            या अनुभवाचे विश्लेषण ज्यावेळी मी करतो त्यावेळी मला आमीरच्या 
दूरदृष्टीचा , कलावंताची जाण ठेवण्याच्या संवेदनाशील वृत्तीचा प्रॅक्टीकल अनुभव आला . म्हणूनच त्याला परफेक्शनीस्ट का म्हणतात हेही मला उदाहरणासह पटले. २००५ नंतरचे त्याचे सर्व चित्रपट  मंगल पांडे, दंगल, गजनी, 
तारे जमीन पर, सिक्रेट सुपरस्टार , पीके,
 थ्री इडिएटस, धूम ३.   इ. चित्रपट मी मुद्दाम पाहीले व त्याची भूमिका, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची त्याची वृत्ती, त्याचा अभिनय, त्याचे दिग्दर्शन कौशल्य, त्याच्या चित्रपटाचे मार्केटींग, त्याच्या चित्रपटांची गाणी, कथेचे सादरीकरण मला भावते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण करत असलेल्या सर्व कामावर मनापासून प्रेम करणे, त्या कामासाठी दिवस रात्र ध्यास घेऊन ते सर्व अंगाने परिपूर्ण होईल याचा जीवघेणा ध्यास घेणे, आंतरीक, मानसिक, शारिरीक सर्व उर्जा पूर्णपणे झोकून देऊन मनःपूर्वक काम करणे, प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त परफेक्ट करण्यावर त्याचा भर असतो, व ही गोष्ट आपल्या सर्वांना देखील प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक क्षेत्रात खरोखरच प्रेरणादायक आहे . त्याचे मराठी शिकणे, सामाजिक सत्यमेव जयतेसारखे टी व्हीवरचे कार्यक्रम, पाणी फौडेंशन सारखे सामाजिक भान असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत . दंगल सारख्या चित्रपटात बापाच्या भुमिकेसाठी स्वतःचे भरमसाठ वजन वाढवून परत ते शरीर व्यायामाने पूर्ववत आणणे मला तरी खूप आश्चर्यकारक वाटते. 
         आणखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महानपण बाजूला ठेवून  कोणत्याही क्षेत्रातील छोट्या कलावंताचाही त्यानां लक्षात ठेवून मनापासून आदर करणे ,त्यानां मदत करणे त्यांचा सन्मान करणे हा मला मोठा गुण वाटतो. कारण काही कलाकार जरा मोठे झाले, प्रसिध्द झाले की की लहान कलाकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कधीकधी तर ओळखही दाखवत नाहीत
          आणि आता तर तो "मेहरभाई हाऊस " या अप्रतिम ब्रिटीशकालीन बंगल्याचा मालक  व पाचगणीकर झाला आहे. 

या मेहरभाई हाऊसच्या माझ्या व्यक्तिगत खूपच आठवणी आहेत.
त्या लिहीन मी नंतर कधीतरी निवांतपणे...............
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे
9423966486
sunilkaleartist@gmail.com

स्टेशन

स्टेशन

            आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अपघाताने सगळ्यानांच कधी ना कधी जखम होते, छोटया मोठया जखमा तर रोजच्या जगण्यात सतत होत असतात .
पण मित्र, मैत्रीणीनों सगळ्यांच्या जखमा सारख्या नसतात, प्रत्येकाची जखम खूप वेगवेगळी असते. काही जणांच्या जखमा खूप वरवरच्या असतात तर काही जणांच्या जखमा आयुष्यभर खूप खोलवर रुतून त्यानां बेचिराख करून टाकतात,
त्या खोलवर गेलेल्या जखमा कधीही भरून येत नाहीत आणि बऱ्या झाल्यासारख्या दिसल्या तरी त्यांचे व्रण व आघात कायम मनात राहतात कधीही भरून न येण्यासाठी...............

             आज तुम्हा सर्वांना अशीच कधीही भरून न आलेल्या आणि मोठा आघात झालेल्या जखमेविषयीची आठवण सांगणार आहे, त्या घटनेमुळे मी, माझी विचारसरणी, माझी रोजच्या जगण्याची पध्दत, तीनशेसाठ डीग्रीमध्ये फिरली.
 
             ही घटना १९९९ सालातील आहे.
संध्याकाळचे चार वाजत आलेले होते, सीएसटी टर्मिनस मधून निघणारी प्रगति एक्सप्रेस पकडण्यासाठी आम्ही आमच्या बॅगा घेऊन मोठ्या प्रयासाने स्टेशनवर धावपळ करत आलो . आज नेहमीसारखी गर्दी नव्हती कारण कोणत्या तरी जंयतीच्या सुट्टीमूळे पुणे मुंबई अपडाऊन करणारी नेहमीची मंडळी गैरहजर होती.एका बऱ्यापैकी रिकामा असलेल्या डब्यात आम्ही जागा मिळवली आणि स्थिरावलो . मी आणि स्वाती पुण्याच्या प्रवासासाठी निघालो होतो.

             एक महिन्यापूर्वीच पाचगणीतील मॅप्रोगार्डन येथील चित्रांची पावसामूळे धुळधाण झाली होती. पाचगणीत पावसाचे दिवस सुरु झाले होते आणि माझ्याकडे जगण्यासाठीचे सर्व मार्ग संपले होते. थरथरत्या हाताने जीवापाड प्रेमाने काढलेल्या दोनशेपेक्षा जास्त चित्रांना मुठमाती देऊन मी आता कायमचा पाचगणीला रामराम करुन नालासोपारा येथे आलो होतो. तेथे माझे घर होते .

             आणि मनात नव्या स्वप्नांची, नव्या आशेची, प्रगतीची आस घेऊन मुंबई स्वप्ननगरीत दाखल झालो होतो.
 
            एकदा मी, स्वाती व आमची मुलगी दिशा जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन पाहायला गेलो होतो . जहांगीर आर्टच्या प्रमुख मेनन मॅडमने मला पाहताच झापले.... .........मि. सुनील काले, आपको चार लेटर भेजा है I दो दिन के अंदर गॅलरी का पैसा भरो, नही तो गॅलरी बुकींग कॅन्सल हो जाएगा l
            गॅलरीला लागणारे पैसे माझ्या पाचगणीच्या अकाऊंटमध्ये होते त्यामूळे जहाँगीर बुक करणे मला अतिशय महत्वाचे आहे हे माझ्या लक्षात आले. आणि त्याच दिवशी बॉम्बे आर्ट सोसायटीचे पदांचे इलेक्शन असल्याने बरेच पुण्याचे चित्रकार, प्राध्यापक वोटींगसाठी स्वतंत्र बस घेऊन एकत्रितपणे आले होते. माझे अभिनवचे प्रा. मिलिंद फडके यानी सांगितले जर तुला पाचगणीला जायचे असेल तर आमच्याबरोबर पुण्याला चल आणि रात्री कोणाकडे तरी मुक्काम कर दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे काढ आणि लगेच परत ये..... एक दिवसाचा तर प्रश्न होता...... म्हनून मी त्यांच्या बरोबर पुण्याला जायचे नक्की केले, आणि स्वाती व दिशा नालासोपाऱ्याला घरी गेल्या.

           त्या रात्री पुण्यात मी श्रीकांत कदम , सतिश काळे या चित्रकार मित्रांच्या खोलीमध्ये झोपलो.

                 सकाळी लवकरच एसटीने मी पाचगणीत पोहचलो आणि दहा वाजता बँकेत जाण्यापूर्वीच फोन आला ताबडतोब परत निघा ,कारण तुमची मुलगी या जगात नाही ,ती आता मेली आहे........ ती आता मेली आहे ............हा एकच शब्द माझ्या डोक्यात घुमत राहीला

              मी काहीही विचार न करता  तत्काळ परतीचा प्रवास सुरु केला . त्या काळात माझ्याकडे मोबाईल नव्हता.
आयुष्यातील सर्वात बेकार, कठीण आणि अवघड, असहाय्यपणे केलेला तो प्रवास आणि मनाची उलाघाल करणारा तो प्रवास कधी आठवला तरी आजही मी प्रचंड अस्वस्थ होतो.......

          रात्री खूप उशीरा घरी पोहचलो तर दिशाचे इवलेसे पार्थीव पांढऱ्या शुभ्र चादरीत गुंडाळलेले होते आणि दिवसभर प्रचंड आकांत,रुडून आंक्रदून मलूल पडलेली स्वाती............. 
खूप मोठ्याने आरडलो...... मनाचा दुःखाचा बांध कधीच फुटून गेला. फार फार म्हणजे फारच विस्कटलो होतो मी.
  
             11 सप्टें .1999 ची ती काळरात्र माझ्या कायम लक्षात राहीली, आयुष्यभरासाठी मोठी जखम करून गेली .त्याच रात्री साताऱ्यामध्ये उदयन महाराजांचे लेवे प्रकरण झाले आणि त्याचे पडसाद सगळीकडे महाराष्ट्रभर उमटले होते. त्याच दिवशी नालासोपारा येथे इलेक्शन होते. सगळीकडे इलेक्शन मूळे धावपळीचे ,गडबडीचे वातावरण होते. आणि निसर्गही खूपच कोपला होता, प्रचंड वादळी धुवाधार धो धो पाऊस पडत होता,नालासोपारा स्टेशन परिसरात प्रचंड पाणी साठले होते, रेल्वे उशीरा धावत होत्या, एकदंर आकाशातील बापाने माझी सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून नाकाबंदी केली होती.

            दुसऱ्या दिवशी तिचे दफन करायचे होते व त्यासाठी खड्डा काढायचा होता. माझे फार मित्र नालासोपाऱ्यात नव्हते. शेवटी शोधत राहील्यामुळे एक खड्डा खोदणारा म्हातारा माणूस मिळाला पण त्याचा जोडीदार नव्हता म्हणून तो तयारच होत नव्हता मग मी त्याच्या सोबत यायला तयार झालो. 
             रात्री एक वाजता मी    नालासोपाऱ्याच्या स्मशानभुमीत गेलो आणि माझ्या मुलीचा अत्यंविधीचा खड्डा खोदायला सुरुवात केली......... त्या मजूराला अशा कामाची सवय होती पण मी मात्र भावनाविवश होऊन डोळ्यांतील अश्रूच्या धारा वहात असताना कुदळ व फावडे घेऊन हाताला घट्टे पाडत, माती उपसत त्याला मदत करत होतो . तो मला मदत करत होता का मी त्याला मदत करत होतो हेच कळत नव्हते......... त्या रात्री मी जराही झोपलोच नाही............. दुसऱ्या दिवशी काही नातेवाईक आणि . विजय आचरेकर, रवि मंडलीक, 
अनंत निकम या मित्रांसोबत स्मशानभुमीत गेलो. स्वातीची शारिरीक व मानसिक अवस्था बिघडल्यामुळे ती आली नाही.

             स्मशानभूमीत मात्र तो एवढासा जीव, चार वर्ष जीवापाड सांभाळलेला एक गोंडस आत्मा माझ्या पासून कायमचा दूर जाणार होता आणि मी प्रचंड आवेगाने ओरडू लागलो, मला माझे दुःख अनावर झाले. माझे हृदयाचे तुकडे तुकडे झाले, मी बेभान झालो, भावनांचे लोट वारंवांर उसळी मारु लागले .सीतामाईने धरती मातेला जसे पोटात घेतले तसे मी आंक्रदून ,आक्रंदून मला पोटात घेण्याची वारंवांर विनंती करत होतो......... मी मनातल्या मनात मानसिकदृष्टया, शारिरिकदृष्टया पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. मनाच्या छोट्या छोट्या असंख्य ठिकऱ्या उडाल्या होत्या.त्या दिवशी मी शेवटचा खरा रडलो....... त्या दिवशी पोटभर रडलो. माझा मीच मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.............. मी आजही सावरण्याचा प्रयत्न करतो............. पण खरं सांगतो मनातून कधी मी सावरलोच नाही. पण धाय मोकलून रडत ही नाही.

           दिशाला थोडा ताप आहे असे स्वातीला वाटले.आमच्या पार्क व्हयू अपार्टमेंट समोरच डॉ . सदानंद खोपकर यांचा दवाखाना होता आणि आजही आहे. तेथे चालत स्वाती व दिशा गेली. डॉ. खोपकरने तिला तपासले व जवळच असलेल्या भवानी मेडीकल्समधून इंजेक्शन आणायला सांगितले. प्रिस्क्रीपशनप्रमाणे स्वातीने इंजेक्शन आणले. उडया मारत, हसत ,चालत ते दोघे डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याबरोबर दिशाने आई.......... म्हणून जोरात शेवटचीच हाक मारली आणि काळी निळी पडून ती जागेवरच गतप्राण झाली.......... ...........
एका छोटया जीवाचा खेळखंडोबा झाला.
डॉ. खोपकरांनी तीची बॉडी समोरच्या पाटील हॉस्पीटलमध्ये नेली तेथेही तिला अनेक इंजेक्शने दिली....... पण....... दिशा उठली नाही........... ती कायमची गेली होती .त्या सर्वांनी संगनमत, करून पोलीसांना फोन केला. मोठी सेटलमेंट झाली................. आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली.

    .आज एकवीस वर्ष झाली... या दुःखद घटनेचा मी खूप कसोशीने छडा लावण्याचा प्रयत्न केला हुशार पोलीस यंत्रणा, डॉक्टरांची लॉबी ,पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज अखेरपर्यंत त्यांनी दिलाच नाही............
खूप आटापिटा केला, प्रसिद्धी माध्यमांना विनंती केली, पोलीस स्टेशनला हजारो चकरा मारल्या, मंत्र्यासंत्र्यांना भेटलो, नगराध्यक्ष ,नगरसेवकानां भेटलो, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय 
पुढाऱ्यानां भेटलो .सगळ्यानां माझी दर्दभरी कहाणी सांगत सुटलो, पर्याय, न्याय मिळेल, काही उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करत राहीलो पण एका छोटया जीवाचे या जगात काहीच मोल नसते याची जाणीव पूर्णपणे अनुभवली .पत्रकारांची उदासीनता, आणि समाजातील लोकांची दिसलेली  निर्जिवता मनावर खूप मोठा घाव घालून गेली.

            एकदा तर रेल्वेमंत्री राम नाईक रेल्वे काऊंटरचे उदघाटन करताना मी निवेदन देऊन खूप मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर पोलीसांनी मला मुलीच्या मृत्यूमुळे याला वेड लागले आहे असे सांगून खेचत खेचत बाहेर काढले.

        अशा कटू आणि दुर्देवी अनुभवामुळे आम्ही प्रचंडप्रचंड निराशेने मी मुंबई, नालासोपारा वेस्टच्या त्या पार्क व्हयू मधील घराला कायमचा अखेरचा निरोप घेऊन निघालो......... प्रचंड,निराशा व दिशाच्या आठवणींचा मोठ्ठा डोंगर मनात साठवत मोठं मानसिक ओझं घेऊन आम्ही दोघे सीएसटी स्टेशनवरून प्रगती एक्सप्रेसने पुण्याला निघालो होतो.............
यापुढे परत मुंबईला यायचे नाही व पाचगणीतच राहायचे असे ठरवून आम्ही सर्व सारवासारव करून नालासोपाऱ्याचा निरोप घेतला होता. सीएसटीवरुन प्रगति एक्सप्रेस सुटली आणि धिम्या गतीने ती दादर स्टेशनवर थांबली.

            आमच्या समोरच्या बाकावर जागा रिकामी असल्याने एक इस्कॉनचा तरुण तुळतुळीत गोटा केलेला, धारधार नाकाचा, स्मार्ट गोरापान, आणि भगवी वस्त्रे परीधान केलेला व गळ्यामध्ये मोठी झोळी लटकवलेला एक सन्यांसी शांतपणे समोरच्या बाकावर बसला.

             गाडीचा वेग हळूहळू वाढत होता, आणि आमच्या निराश मनात विचारांचा वेगही हळूहळू वाढत चालला होता. जगातील सर्व गोष्टींविरुद्ध निकराने प्रतिकार,लढाई करून हार स्विकारलेल्या सैनिकाप्रमाणे उदासीन होऊन मान लटकवत पडत्या चेहऱ्याने आम्ही बसलेलो होतो. गाडीचा वेग आणखी वाढला तसा समोरचा सन्यांसी प्रसन्न चेहऱ्याने आम्हाला 
' गुड इव्हिनिंग ' म्हणाला.परंतू निराशेमुळे आम्ही त्याच्याकडे लक्षच देखील दिले नाही.

         आमच्या या उदासीन प्रतिक्रियेमुळे तो सन्यांसी माघार घेणार नव्हता........
त्याने हळूच झोळीतून दोन चॉकलेटस काढली व आम्हाला देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला नकार दिला.

             रेल्वेचा वेग वाढला आणि त्याने झोळीतून दोन लाल रंगाची सफरचंद काढली व आमच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा मूडच नसल्याने आम्ही ती त्याला परत केली.

                 थोडयावेळाने कर्जत रेल्वे स्टेशन आले. गाडी थांबली. सन्यांसी तत्परतेने खाली उतरला आणि कर्जतचे प्रसिद्ध गरमागरम दोन दोन वडापाव आमच्यासाठीही घेऊन आला. त्याने जबरदस्त आग्रह केला तरीही आम्ही त्याला नकारच दिला.

                आणखी थोडयावेळाने गरमागरम चहावाला आला, सन्यांशाने आमच्यासाठी दोन कप चहा स्वतःहून घेतले पण तेही आम्ही न पिता सरळ गाडी बाहेर भिरकावून दिले .

               स्वाती उदास , दुःखी चेहऱ्याने डोक्याला स्कार्फ घालून खिडकीवर डोके रेलून बसली होती. मी मान खाली घालून निर्विकार चेहऱ्याने बसलो होतो.

                थोडयावेळाने सन्यांशाने दोन छोटी इस्कॉनची पुस्तके काढली व आम्हाला वाचावयास दिली.आम्ही ती न वाचताच साभार परत केली.

                इतक्यात लोनावळा स्टेशन आले. गाडी थांबताच सन्यांसी महाशय उतरले आणि लोनावळ्याची प्रसिध्द चिक्कीची दोन पाकीटे घेऊन आले व आमच्या दोघांच्या हातात देऊन "फ्रेश चिक्की आहे " तुम्ही जरूर टेस्ट करा असे म्हणू लागले. आम्ही ती चिक्कीची पाकीटे न खाताच त्याला साभार परत केली.

           सन्यांशाने खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही.......

          एकंदर सन्यांशाच्या लक्षात आले की ह्या दांम्पत्याचे काहीतरी भयानक बिनसलेले आहे. कारण आम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत याची त्यालाही कल्पना नव्हती.

          आणि मग तो स्वतःच त्याची माहीती सांगू लागला.मी एक उच्चशिक्षित डॉक्टर आहे परंतू श्रीकृष्णाचे चरित्र वाचल्यामूळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला व त्या बदलाची परिणीती म्हणून मी डॉक्टरी पेशा सोडून पूर्ण काळ इस्कॉनच्या आश्रमात 
सन्यंस्त होऊन कृष्णभक्तीत लीन झालो आहे असे सांगू लागला.
 
              डॉक्टरच्या चुकीच्या औषधापचारांमूळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि परिस्थितीमूळे मी पूर्णपणे नास्तिक झाल्यामूळे मला आता त्याचा राग येऊन खूप तिरस्कार वाटू लागला होता. आमच्या शांत प्रवासात अशा आगंतुक माणसाने ढवळाढवळ करुन व्यत्यय आणलेला मला आवडत नव्हता. पण थोडयाच तासांचा प्रश्न असल्याने नाईलाज होता.

               प्रवास संपत चालला होता, शिवाजीनगर स्टेशन आले आणि सन्यांसी अचानकपणे क्षणार्धात वेगाने उठला. आमची प्रवासाची मोठी बॅग त्याने रॅकवरून काढली व मुख्य दरवाजाकडे झेपावला आणि जोरजोरात ओरडू लागला .
स्टेशन आले.......... 
स्टेशन आले.........
स्टेशन आले,.................

               आता मात्र माझा मनाचा तोल, संयम संपलेलाच होता , मी रागाने उठलो आणि त्याच्या मागे धावत जावून आमची बॅग हातात घेतली. आणि मग त्याला विचारले "काय मुर्खपणा चालला आहे तुमचा ? आम्हाला शिवाजीनगर नाही तर पुणे स्टेशनला उतरायचे आहे. आमचे स्टेशन पुढे आहे, येथे नाही. "

         आणि मग मात्र सन्यांशी प्रसन्नपणे हसला आणि मला म्हणाला अरे वा ! तुम्हाला बोलता येते याचा मला फार आनंद झाला आहे. तुम्हाला खरंच माहीत आहे का ? 
आपले प्रत्येकाचे एक स्टेशन येणार आहे ? आणि त्या स्टेशनवर आपल्याला उत्तरावेच लागणार आहे ?
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे एक अंतिम स्टेशन असते, ते स्टेशन आले की आपला प्रवास संपतो ..............त्या स्टेशनवर बिनबोबाट , न गोंधळ करता शांतपणे जायचे असते.

" लक्षात ठेवा प्रत्येकाचे एक अंतिम स्टेशन येणार आहे, केव्हा ? कधी ?कसे ? हे त्याला कळते हळूहळू माहीत होत जाते. संकेत मिळत जातात.
रेल्वे स्टेशनवर तुम्ही स्वतःच्या बॅगा प्रवासाचे साहित्य घेऊन उतरू शकता, पण त्या अंतिम स्टेशनवर मात्र तुम्हाला काहीही नेता येत नाही. आपण सर्वजण रिकाम्या हाताने आलेलो असतो व जातानाही पूर्णपणे रिकाम्या हातानेच जावे लागते. ते स्टेशन आले की उतरावेच लागते तेथे कोणालाही वशीला लावता येत नाही, तेथे कोणालाही दया, मया लाचलुचपत देणे चालत नाही.

स्टेशन आले की निमूटपणे उतरायचे असते.

स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते.

          तुझ्या मुलीचे वय चार वर्ष होते. तीचे स्टेशन आले आणि ती या अनंतात मस्त, स्वच्छन्दी प्रवास करून अंतराळात विलीन झाली. तिचे पूर्णपणे अस्तित्व संपले, ती पुर्णपणे निर्विकार झाली, अनंतात विरून गेली, तुम्ही दोघे मात्र उगीचच स्वतःला त्रागा, त्रास करुन बैचेन, अस्वस्थ होऊन जगत आहात . तुम्ही आता जो प्रवास माझ्या सोबत केला त्यात प्रवासाचा आनंद तर तुम्ही घेतला नाहीच पण तुमच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्रवाशांचा व व्यक्तिगत माझा प्रवास दुःखद व अतिशय त्रासदायक केला. असा रडका प्रवास करण्यात काहीच अर्थ नाही.......

              मात्र यापुढचा प्रवास मात्र छान करा, मजेशीर करा, सुंदर करा, आनंदी करा, स्वतः आनंदी राहा, व इतरानांही भरभरून आनंदी प्रवास करण्यासाठी मदत करा. कारण येथून काहीच न्यायचे नाही, तुमचा बंगला, तुमची गाडी, घोडे, संपत्ती, सोने, रत्ने, दागिने, हिरे, मोती, मौल्यवान वस्तू, तुमच्या आवडीच्या खास स्पेशल वस्तु, फर्निचर, काहीही नेता येणार नाही सोबत.
इतकेच काय ? तुम्ही जन्म दिलेली ,तुमचा स्वतःचा अंश असणारी मुले, प्राणप्रिय पत्नी, नातवंडे किंवा इतर कोणालाही सोबत नेण्याची सोय नाही. 

हा प्रवास प्रत्येकाचा एकटयाने सुरू होतो आणि एकट्यानेच संपतो. 

तुमचं पुणे रेल्वे स्टेशन आले आहे , निघा आता........

      संन्याशाने भगवतगीतेची एक नवी कोरी प्रत माझ्या हातात ठेवली. व आता तरी हे पुस्तक घ्या. असे म्हणत न सांगताच मला प्रेमाने कडकडून मिठी मारली , दोन्ही हात हातात घट्टपणे धरले व अंतिम निरोप घेतला.

"स्टेशन आले की शांतपणे उतरायचे असते "

         असे पुन्हा एकदा म्हणत थांबलेल्या रेल्वेच्या डब्यातून तो उतरला. त्याच्या पाठोपाठ मी आणि स्वाती बॅगा घेऊन उतरलो. सन्यांशी शांतपणे पुढे पुढे चालत राहीला आणि आम्ही तो दिसेनासा होत पर्यंत, त्याच्या पाठमोऱ्या धुसर, अदृश्य प्रतिमेकडे 
पहातच राहीलो............
पहातच राहीलो............
पहातच राहीलो.............

              आता एकवीस वर्ष पूर्ण होतील या घटनेला, त्या भगवतगीतेची कोरी करकरीत प्रत आजपर्यंत  कधीही मी उघडली नाही.
आज कपाटात अचानक सापडली आणि ही 'स्टेशन ' गोष्ट परत आठवली.

               सुशांतसिंग राजपुतच्या घटनेमूळे सगळा देश दुःखाच्या सागरात बुडाला.मी देखील अस्वस्थ, उदास दुःखी झालो होतो. पण खरं सांगू मित्रांनो आता वाटते त्याचे स्टेशन आले होते. त्याचा आपल्या सर्वांसोबतचा प्रवास इतकाच होता. त्याचे स्टेशन आल्यामूळे तो आता अनंतात, आसंमतात, विलिन झाला............ तो पलीकडच्या जगात गेला....... स्वतःहून.......

           आपण सगळेजण या जीवनाच्या अवघड प्रवासात सुखाचेच क्षण शोधत असतो . आपल्या सगळ्यांच्याच खूप मोठया इच्छा ,आकांक्षा ,मोठी स्वप्ने असतात. आपण सगळेच ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो . काहींची स्वप्ने त्यांच्या सोबतच अर्धवटपणे संपतात. त्यांचे कार्य संपते ते, अनंतात विलिन होतात. कारण त्यांचे ' स्टेशन ' आलेले असते......

आणि स्टेशन आले की उतरावेच लागते............

             मला एका जवळच्या मित्राने विचारले सुनील काळे, या एवढया मोठया भयानक अनुभवातून तू छान निवांतपणे, आनंदाने जगतोस ,पण आम्ही मात्र परत मूळ पदावर येतो. तुझ्या सतत आनंदी राहण्याचे ,एनर्जीचे रहस्य काय आहे ?

           रहस्य काही नाही मित्रांनो,
आज मला समजलेले हे रहस्य तुम्हा सर्वांनाच सांगतो,.......... 
मला रोज सकाळी तीव्रपणे वाटते की माझे स्टेशन उद्या येणार आहे......... मग आजचा शेवटचा दिवस असणार आहे........ हा शेवटचा दिवस मी छानपणे जगावा........ उत्तम वाचावे......... उत्तम ऐकावे.......... उत्तम ते सर्व पहावे........ खूप छान चित्रे काढावीत......... गाणी ऐकावीत...
माझ्या घरासमोरच्या छोटया शेतात काम करावे........ बगीच्याला पाणी घालावे........ सर्व कचरा काढावा........ घर स्वच्छ ठेवावे.......... व्यायाम, योगासने करावीत......... आमचा टॉमी कुत्रा, चिनू मांजर , तिच्या पिल्लांसोबत खूप खेळावे............ प्रसन्नपणे मेणवलीच्या घाटावर रोज सकाळी फिरायला जावे...... वाईच्या घाटांवर,टेबल लॅन्डच्या पठारावर मनसोक्त फिरावे, महाबळेश्वरच्या ऑथर सीट पाँईटच्या व इतर दऱ्याखोऱ्यांमध्ये भरपूर फिरावे, निसर्गाशी समरस होऊन खूप फोटो काढावेत, आमच्या कृष्णा नदीच्या शेजारच्या खूप झाडे असलेल्या ठिकाणी भरपूर फोटो काढावेत, पाय पसरून निवांत त्या ठिकाणची जलरंगातील चित्रे काढावीत, खूप स्केचेस करावीत .
प्रत्येक गोष्ट ' सजगते ' ने करावी.आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा भरभरून आनंद घ्यावा............. कधीही कोणाशी स्पर्धा न करता दुस्वास न करता शांतपणे जगावे.
झाडानां, फुलझाडानां पाणी घालावे..... त्यातून नव नवी फुले जन्मावीत............ आणि स्वातीच्या कॅनव्हासवर दिशाच्या आवडीची अनेक 
कमळफुले, सुर्यफुले, जरबेराची, झेंडूची, 
हॉलीऑक्सची, तीळाची, आणि अनेक रंगाची विविध रानफुले कॅनव्हासवर नव्याने सतत जिवंत व्हावीत. कारण दिशानेच तिच्या जाण्यातून तिला एक नवी जगण्याची ' दिशा ' दिलेली आहे. आणि तिनेही ही आठवण सातत्याने कॅनव्हासवर आणून दिशाची आठवण फुलांच्या चित्रातून सतत ताजी व जिवंत ठेवली आहे . त्यामूळे चित्ररूपाने दिशा कधी गेल्याचे दुःख होत नाही... ती चित्रे देश परदेशातील अनेक रसिकांच्या थकलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात अगदी आमची दिशा खळखळून, निरागसपणे हसायची तसेच

आणि या अज्ञात सन्यांशाची दोघांनाही पुर्णपणे आठवण आहे ..............

स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते..........
स्टेशन आले की शांतपणे उतरावेच लागते.......
👏👏👏👏👏👏👏👏👏
सुनील काळे 9423966486

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]