ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

दामू

*दामू* 
☀️☀️
          दामुअण्णाचे खरे नाव अरुण मारुती  काळे, पण त्याला दामू का म्हणायचे याचा मला कधीच उलगडा झाला नाही. तो आमचा चुलत भाऊ होता .त्याचे वडील मारुतराव  पूर्वी महाबळेश्वर मध्ये राहात असत.  हे उत्तम  कारागीर तर होतेच पण त्याहीपेक्षा सर्वात उत्तम देवाची हरिभजने म्हणणारे होते, त्यांच्या  भजनात हृदयाला हात घालण्याची ताकद होती. पांडूरंगाला , विठ्ठलाला ते इतकी भावपूर्ण साद गाण्यातून मारायचे की ऐकणारा भारावून जायचा त्यात तो स्वतःला  विसरून जायचा. खूप सुरेख आवाजात काही स्वनिर्मित तर काही जुन्या गाण्यांच्या तालावर ते मराठी भजने स्वतः करत.  मग श्रावणात असो वा कोणाच्या अंतिम  विधीला, यांच्या भजनाचा कार्यक्रम हमखास  असे. अंत्यविधीच्या अगोदर कोणताही पाषाणहृदयी माणूस असला तरी त्यांचे भजन ऐकले की त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आपोआप   सुरू व्हायच्या. त्यामुळे अंत्यविधीचा कार्यक्रम प्रभावी व्हावा आणि  दुःखाची निर्मिती व्हावी म्हणून मारुतरावांना भजनासाठी हमखास मागणी असे. त्यांची ,लहान असताना ऐकलेली काही भजनं आजही माझ्या मनात रुंजी  घालून आहेत, आठवणीत आहेत . 
         मारुतरावांना एकूण चार मुले ,त्यातील   अरुण हा पहिला मुलगा.  पहिला   मुलगा पाहून  ते आनंदले असतील, पण मुलाच्या जन्मानंतर थोड्याच वेळात त्यांचा आनंद मावळला असेल. कारण अरुण जन्मताच डोक्यावर पडल्यासारखा होता. पुढे दिसायला अतिशय साधारण,  बोबडे बोलणारा,   असंबद्ध बोलणारा त्याला कोणतीही भाषा नीट समजत नव्हती, केस वाढलेले, गालफड फार दबलेली, दात पुढे आलेले, वर्णही काळसर ,चालताना तिरका ,आडवातिडवा झोकांड्या देत जाणारा, आपण काय करतो, काय बोलतो, कसं खातो हे त्याला कळतही नव्हतं, आणि वळतही नव्हतं .खाताना सगळी लाळ तोंडातून टपकत असे, पदार्थ तोंडातून बाहेर पडत. झोकांड्या देत जाणारा, मेंदूचा कंट्रोलच नव्हता जणु त्याच्यावर, मेंदूच्या सगळ्या वायरी जणू उलट्या सुलटया चुकल्या सारख्याच जोडलेल्या होत्या. मारुतरावांनी त्याला शाळेत पाठवला.  पण दोनचार दिवसातच त्याच्या मास्तरांनी त्याला घरी पाठवला. कारण त्याला शाळेतले काहीच कळत नव्हते . इतकी सुरेल भजने म्हणणारे, देवाची आराधना करणारे मारुतराव त्यामुळे  पार बिघडले आणि  बिथरले. खूप मारलं, ओरडलं, झोडपलं, गदगदून हलवलं तरी  अरुण सुधारलाच नाही. त्यामुळे मारुतराव खूप निराश होऊन खूपच दारूच्या व्यसनाधीन झाले. मग त्यांच्या भजनात दुःखाची अर्तता आता  आणखीनच वाढली.  खूप करुणापूर्वक अंतःकरणातून त्यांची भजने यावयाची व गावकऱ्यांच्या हृदयाला  भिडायची. त्यांचा एक ग्रुपच त्यांनी बनवला होता.  व ते भजनी मंडळ खूप प्रसिद्धही  झाले होते .पण देवाची भजनं म्हणूनही देवाने त्यांच्याबाबतीत जो हात आखडता घेतला हे पाहुन ते हळूहळू खोल दारूच्या नशेत व्यसनाधीन झाले व पुढे  मारुतराव एक दिवस संपले , मग अरुणचा *दामू* झाला, पुढे तोपर्यंत अरुणची आई, त्याचा सर्वात धाकटा भाऊ सुभाष, नंतर सुरेश, हेही दारूतच संपले. आणि त्यांची आर्थिक ,स्थितीही पूर्ण ढासळली .
        एकदा महाबळेश्वरला मार्केटमध्ये मी मित्रांसोबत  फिरत होतो ,त्याने मला लांबूनच बरोबर ओळखले . तो लगबगीने माझ्या मित्रांजवळ  सर्वांसमोर आला. अतिशय गचाळ फाडलेले कपडे, कित्येक दिवस न धुतलेले, पायात चप्पल नाही,  झोकांड्या जात होत्या  म्हणून हातात काठी घेतलेली. कित्येक दिवस अंघोळ न केल्यामूळे केसांच्या जटा वाढलेल्या ,त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती .हे पाहून व त्याची असंबधपणे माझ्या नावाची  बडबड चालू असलेली पाहून  मला खूप लाज वाटली, दया देखील आली, पण मित्रांसमोर मी त्याला ओळख दाखवली नाही. तो माझ्या मागोमाग यायला लागला, वेडसर  मनोरुग्णासारखा तो वागत होता. त्याला सर्व माणसं मात्र बरोबर समजायची, त्यां सर्वानां नावानिशी ओळखण्याची स्मरणशक्ती कशी होती हे कोडे मात्र आजही  मला उलघडत नाही.
         एकदा तर त्याने रस्त्यावरच बूट पॉलिशचेच दुकान मांडले. आपल्या ओळखीच्या माणसाच्या पायात बूट दिसताच तो त्यांच्या मागोमाग धावायचा व पॉलिश करण्यासाठी त्या माणसाचा पाय पकडायचा  धावपळ करून हैराण करायचा. एकदा बूट पॉलिश साठी तो माझ्या पाठोपाठ धावायला लागला मी वेगाने पळालोच. व मग मात्र त्याला  मी पूर्णपणे टाळू लागलो . मला त्याची घृणा वाटू लागली होती .
     दामू पुढे आमच्या मूळगावी पांडेवाडी येथे भावासोबत राहू ,लागला. आईबाप नसल्याने व पुढे भाऊही गेल्यामूळे  त्याच्या दुर्दशेत आणखीनच भर पडली. त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्याची भावजय पुतण्या व त्याचे कुटूंबीय त्याला गावी  सांभाळायचे .तो सगळीकडे भटकत रहायचा, हळूहळू त्याचे वय पन्नास पंचावन्नच्या पुढे गेले असावे. गावात फिरताना कोणी त्याला भाकर तुकडा द्यायचा. त्याची वहिनी पुतण्या व इतर जण शक्य तितके त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याचे सर्व करायचे तरीही  येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तो अधाशीपणे खायला मागायचाच, तर कधी  पैसे मागायचा. तो प्रचंड असमाधानी .. असल्याने , व त्याच्या विचित्र गबाळ्या अवतारामूळे मी मात्र त्याला   पूर्णपणे टाळायचो, बोलायचो नाही, आणि ओळखही दाखवायचो नाही.
        परमेश्वर किंवा आकाशातील बापाचा मला कधीकधी  खूप म्हणजे खूपच राग येतो. त्याने एखाद्याला जन्म देताना  इतकी नाराजी का दाखवावी ? चेहरा, रूप, शिक्षण, कला, उदरनिर्वाहाचे साधन नाही, पण निदान सामान्य माणसासारखे जगणेही एखाद्याला देऊ नये म्हणजे काय?शिवाय मारूतराव इतकी सुमधूर भजनं म्हणत असताना अशी उपेक्षा का करावी  या विश्व निर्मात्याने , आपणाला बनविलेल्या या अजब कलाकृतीला   स्वतः दामूही कंटाळला असावा . आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी बोलत नाही, जवळ करत नाही हे त्याला कळत असावे. मग तो  गावच्या देवळाशेजारी पायरीवर काठी  टेकून बडबड करीत बसायचा व ओळखीच्या नजरेने, विदीर्ण चेहऱ्याने, विषण्ण मनाने,  खोल नजरेने ,एक टक कोणाची तरी  वाट पहात  पडून रहायचा. सर्वांकडे अपेक्षेने आणि अन्नाच्या आशेने पहायचा. खायला मिळाले नाही तरी त्याहीपेक्षा कोणी ओळखीचा माणूस आला की त्याला प्रचंड उर्जा यायची  त्याचे डोळे चमकायचे,उत्स्फूर्ततेने उठून धडपडत उभा रहायचा,  त्याच्या मागे मागे धावायचा, बोलायचा प्रयत्न करत राहायचा, लहान मुलांना जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या अवताराकडे पाहून कोणी सुधारलेली मंडळी त्याच्याजवळ मैत्री करण्याचा प्रयत्नही करायची नाही.लांबूनच लोक त्याच्याशी बोलायचे, गावातले  ,आळीतील लोकं उरलंसुरलं अन्न, कधी थोडे पैसे द्यायचे, पण तो सगळ्यांना नकोसा झाल्यासारखाच होता. तो प्रेमाचा भुकेला असावा आणि असं प्रेमाने आपल्याला कोणी जवळ करत नाही, कोणी स्वीकारत नाही, परिस्थितीमुळे गबाळेपणामुळे, आपल्याला सर्व जण टाळतात, हे त्याला पूर्णपणे  जाणवलं असावं. आपल्याला प्रेमाने जसं आहोत तसं  कोणी स्वीकारत नाही हे पाहून तो खूप निराश झाला असावा. आणि आपण कोणालाच नको आहे हेही त्याला कळले होते. 
       अशी परकेपणाची, एकाकीपणाची भावना माणसाला पार पोखरून टाकते .मनाला आणि शरीराला उदासीपणे विच्छिन्न करते, अंतःकरणाला .एक प्रकारचा संताप आणते, असं वाटतं जिवंतपणीच आपण आपल्या हृदयाचे तुकडे स्वतःच्या हाताने कापावेत आणि भिरकावून द्यावेत सगळ्यांसमोर, की आपण इतके दुष्ट आणि दुर्लक्षित अपमानित करण्यासारखे नाही. एकटेपण , एकाकी जीवन फार वाईट असतं,आजारपण ,
संकटे आणि वाईट परिस्थिती आली की आपली सख्खी असणारी माणसं सोडून देतात वाऱ्यावर, ओळख दाखवत नाहीत. साधा फोनही करत नाहीत . आपल्या जवळच्या माणसाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, नजरेआड करतात त्याला . जणू त्याचा व आपला कधीच संबंध नाही व नव्हता असं वागू लागतात . तिथं मोठेपणा, स्टेटस, उच्चभ्रूपणा व स्वार्थ महत्त्वाचा असतो. जिव्हाळा ,माणुसकी , आपुलकी व स्नेहभाव संपलेला असतो . त्यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला कटाप केलेले असते . आणि ही नावापुरती सुकी नाती व आपुलकीच्या उणीवा पाहून, एकाकीपणाची ही भावना आयुष्य हळूहळू पूर्णपणे वाळवी सारखी पोखरूण टाकते . दाट काळ्या ढगांची चादर अंगावर घेऊनच मग प्रवास करावा लागतो . आणि ज्याचा त्याचा हा प्रवास  एकाकी एकट्यानेच संपवावा लागतो . फार वाट लागत असते हा प्रवास करताना . तिथं नाईलाजानेच सर्व मनस्तापाला स्विकारत रहावं लागतं.
         दामूने अखेर येथून जाण्याचा अंतिम निर्णय घेतला असावा. हा कंटाळवाणा प्रवास थांबविण्याचा निर्णयच त्याने केला असावा त्याने कोणाशीही बोलणे टाळले. आणि अन्न पाण्याचा त्याग केला . तो सतरा जानेवारीला शांतपणे कोणाशीही न भांडता कायमचा निघून गेला. आकाशातल्या बापाकडे जाब
विचारायला, की का मला धाडले अशी अवस्था करून ? काय मिळवलसं तू तुझ्या कृतीतून ? का अशा अवस्थेत साठ पासष्ट वर्ष मला जगायला भाग पाडलंस ?  पण तिथंही त्याचे कोणी ऐकले की नाही हे मला माहीत नाही. बहुधा ऐकलं नसावंच . अशा लोकांचे हाल ऐकणारे कोणी नसतेच .
        सतरा तारखेला सकाळी बारा वाजता पुतण्या योगेशचा. मला दामू गेल्याचा फोन आला. एक वाजता मी पांडेवाडीत पोचलो. दामूला मी अखेरचे पाहण्याची हिंमतच करू शकलो नाही. वाटलं दामू उठेल व माझ्याकडे दहा रुपये मागेल, आणि माझ्या मागोमाग ओळख दाखवत पाठीमागे येईल ,ओरडत मागे मागे येईल  पण मी मात्र माझ्या स्टेटसमुळे त्याला टाळून पुढे गेलो असतो. असे काही विचार मनात येत होते . आता तो पूर्ण शांत झाला होता .कोणाकडून प्रेमाची  कसलीच अपेक्षा नसल्याने तो खिन्नपणे ,निपचित निष्प्राणपणे पडून होता. निर्विकार  चेहऱ्याने अखेरच्या शेवटच्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झाला होता .
          गावातील थोडीफार लोकं जमली होती. पण त्याच्यासाठी कोणी फार मोठा हंबरडा फोडला नाही. सर्वांना तो सुटला व बरे झाले अशीच भावना मनात येत होती. त्याच्या अंत्यविधीचा प्रवास अवघड दिसत होता. सगळे दुर्लक्ष करून टाळत होते  कोणीच पुढे येत नव्हते. त्याचे अंत्यविधीच्या सामानाचा खर्च कोणी करायला तयार नव्हते . अंत्यविधाची तयारी करायला कोणी पुढे सरसावतच नव्हते . पैशांचा प्रश्न निर्माण झाला होता . मग मात्र मला राहवले नाही.  आळीतील तीन माहीतगार गावकऱ्यांना सोबत गाडीमध्ये घेतले व मी तालुक्याच्या ठिकाणी वाईला सर्व सामान आणण्यासाठी निघालो . वखारीत जाऊन नऊ मण लाकडे घेतली, कुंभारवाड्यात जाऊन मडकी घेतली.हार, पांढरा पायजमा, सदरा , हार , फुले,कापड, कापूर, गुलाल इ. तिरडीचे अंत्यविधीचे सर्वच्या सर्व सामान स्वखर्चाने घेतले.  हे सर्व सामान कोठे विकत मिळते मला माहीत नव्हते त्याची नवीन माहिती मला मिळाली .एक मण  म्हणजे चाळीस किलो लाकडं . जगत असताना माणूस एकही झाड लावत नाही पण जाताना सरणासाठी तीनशे साठ किलो लाकडे घेऊन जातो, या नव्या ज्ञानात भर पडली. हे सर्व सामान घेऊन  परत पांडेवाडीला आलो.
         तोपर्यंत थोडी आणखी नातेवाईक मंडळी , आली होती. पन्नास साठ वर्ष आयुष्यभर ज्याचा प्रवास खडतर झाला, उपेक्षेने,तिरस्काराने, घृणतेने भरुन, झिडकारूनच झाला , त्याचा अंतिम प्रवास तरी सुखाने  व्हावा व त्यास हातभार लागावा हा माझा प्रयत्न मी माझ्या कृतीतून समाधानाने पूर्ण  केला होता .
         कारण मला खात्री आहे की मी इहलोकीचा प्रवास संपून ज्यावेळी वर आकाशात जाईल तेथे कदाचित दामू भेटेलच व माझ्या मागोमाग धावेल, ओळख विचारेल,पण आता म्हणेल, बरं झालं  निदान माझा शेवटचा प्रवास तू जरा सुखकर केलास. त्याचे उदास डोळे कृतार्थपणे माझ्याकडे पाहतील , व तो डोळ्यातूनच सांगेल मला आयुष्यभर काही दिलं नाहीस,पण माझा अंतिम प्रवासाचा शेवट तरी गोड केलास .
अखेर ओळख दाखवलीस भावा, खरंच ओळख दाखवलीस भावा.........
          मी दामूच्या अंतिम प्रवासासाठी  अंत्ययात्रेच्या  पाठीमागून निघालो पण तेथे पूर्णवेळ थांबलो नाही . तोपर्यंत पावणेसहा वाजले होते . माझा येथील रोल संपला होता .सहा वाजता आमचा एक पुर्वनियोजित कार्यक्रम लोकमान्य वाचनालय वाई येथे होता. 
          दामूच्या अंत्यविधीच्या विस्कटलेले आयुष्य कसे जगावे ? या कार्यक्रमानंतर चित्र कसे पहावे ? या माझ्या आवडीच्या कार्यक्रमात मी परत चित्रांच्या दुनियेत रममाण झालो. 
         दामूच्या आयुष्ययात्रेवरील घटनांचा आढावा घेतल्यावर मला आता माझ्याच वाट्याला हे अवघड त्रासदायक जीवन कसं आलं ?मी असले फालतू प्रश्न पडत नाहीत .आता मला शांत झोप लागते .( पूर्वीही शांत झोप लागायचीच पण आता जरा जास्त जाणीवपूर्वक शांतपणाची जाणीव होते )
            आता मला  नवनवीन माझ्या विषयी प्रश्न पडत नाहीत,आणि हो ,मला खूप खूप श्रीमंत ,जहागीरदार , मोठा उद्योगपती किंवा अंबानीपेक्षा ही मोठे, भारी आहोत असंच वाटायला लागले आहे . कारण त्याला बिचाऱ्याला सत्तावीस मजले असलेले घर सांभाळावे लागते . शिवाय एवढा मोठा उद्योग .मी मात्र निवांत झोपू शकतो . माणूस कितीही मोठा असला तरी मरताना सरणावर लाकडं मात्र नऊ मण लागतात . 
म्हणजे चाळीस गुणीले नऊ बरोबर तीनशे साठ किलो . गणित किती सोप्पं आहे आणि ते सगळ्यानां सारखंच लागू आहे याचा शोध मला लागला होता
          आपण किती नाराज असतो स्वतःवर आणि आयुष्यावर , मला हे मिळालं नाही , ते मिळालं नाही. ट्रॅफीकचा त्रास,  आवाजांचा त्रास , वन रुम किचन असेल तर टू रुम किचन नाही म्हणून त्रास, दुचाकी असेल तर चार चाकी नाही म्हणून त्रास , चार चाकी असेल तर मोठ्ठी नवीन मॉडेल  पाहीजे, बंगला असेल तर फार्महाऊस कधी मिळणार याचा शोध, शेजाऱ्यांचा त्रास, इतकेच काय ट्रॅफीक मध्ये एखादयाने जरा ओव्हरटेक केले तरी त्रास. त्याला मिळाले मग मला का नाही ??
 याचाही त्रास . आपण प्रसिध्द नाही, नावारूपाला आलो नाही म्हणून त्रास, सगळीकडे त्रासच त्रास, ईर्षा ,आपण पूर्ण शरीराने ठाकठीक आहोत याकडे आपले कधी लक्षच नसते. इतकंच काय मुलगी असेल तर मुलगा नाही म्हणूनही त्रास करून घेणारी माणसं मी पाहिली आहेत . सतत अस्वस्थ, ही अस्वस्थता कधीही न संपणारी आपण कधी खाली पहातच नाही . आमची नजर सतत वर पाहणारी हव्यासापोठी काहीही करण्याची तयारी असणारी . आम्हाला आमचं ते हवेच पण दुसऱ्याचे जे आहे ते देखील हवे असते . मग कोणत्याही गैरमार्गाने ते मिळवायचं व खूप मोठे काम केले असा आव आणायचा . दुसऱ्याचे कष्टाचे पैसे लुटायचे व आपण समाजसेवा करतो असे दाखवायचे . या सत्य गोष्टीनां कधीही अंत नसतो . या कालचक्राला अंतच नसतो .आपण जसे आहोत तसं स्विकारण्याची आपली कधी तयारीच नसते . 
पण आपल्यात बदल करणे शक्य असतं . 
सुधारणा करणं शक्य असतं .

         आज असाच एक  अनोळखी दामू वाईच्या मिशन हॉस्पीटल  रस्त्यावर दिसला. फार विस्कटलेला दिसत होता बिचारा, उदासपणे निवांत उभा  होता. मग दहा रुपयांचा  पारले बिस्किटाचा एक पुडा घेतला व त्याला दिला. तो माझ्याकडे निर्विकार थोडं हसून व ओळखीच्या चेहऱ्याने पाहून शांतपणे बिस्किट खाऊ लागला.  थोडी तरतरी , किंचिंतसी चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसली. मलाही जरा बरे वाटले .
          आता शक्य होईल तिथे, शक्य होईल तेव्हा , प्रत्येक भेटणाऱ्या दामू साठी एवढंतरी करायचं असं ठरवलं आहे. मग बघा आपण असं दुसऱ्यासाठी एवढंसं छोटे काही काम केलं तरी लई , म्हणजे लईच भारी वाटतं बघा . कधी प्रयत्न तर करून बघा ...................
           मला मग राजेश खन्नाचा   बावर्ची  चित्रपट आठवतो त्यातला रघु म्हणतो . 
अपना काम तो सब लोग करते है | मगर दुसरोंका काम करने मे , उनके चेहरेपे मुस्कान देखनेमें कुछ औरही मजा है | 
आपल्या शक्तीनुसार, अगदी थोडासा हिस्सा , अगदी अल्पशी जमेल तशी, खिशाला फार मोठी  कात्री न  लावता अशा  दामूंसाठी मदत करुया .

म्हणजे नऊ मण लाकडं आणताना शेवटच्या प्रवासात त्रास होणार नाही ............

गणित तर अगदी खूप सोप्प आहे . 
सर्वानां सारखेच . 
नऊ गुणिले चाळीस = तीनशेसाठ किलो लाकडं . 

आपल्याला देखील तितकीच लागणार .
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सुनिल काळे✍️  
9423966486

ग्रीन टाय

*ग्रीन टाय* 
🌟🌟🌟🌟
        आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित,नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात.... आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते.... एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.
        अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्ततेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात.............. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे...... माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते .
          1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्याकाळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात......
            मला वाई  पाचगणी ,महाबळेश्वर चा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणी मध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरी चे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायिक रित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. 
त्यानंतर उतरती कळा लागली ...........
            मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला पुढे पाचगणी क्लब, टेबल लँड वरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले .मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत , त्यामुळे जवळपास सर्व प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातील निसर्ग चित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली........... आणि पूर्ण देखील केली.......आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .
       अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला .राहायला घर नाही , जगण्यासाठी पैसे नाहीत , घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.
           आणि मग जगण्यात राम नाही ,मजा नाही सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ?कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.
           पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे.
पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. 
माहीत नाही का? पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते . 
दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवतांच्या व काट्याकुट्यां मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती . मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो मला कशाचेही भान राहिले नव्हते कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो आणि .................. 
अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली ,डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला . आयझॅकने मला कडकडून मिठी मारली माझे डोळे पुसले माझे सांत्वन केले आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली. 
          आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा .
मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा.
फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा चालताना देखील धावत धावत चालायचा.... आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता .
मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले .................
आणि मला म्हणाला इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस ,पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार............ 
तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव , तेथे कोणीही कलाशिक्षक नाही त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर कायमची मरणार आहे............ 
जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्च मधला येशु तुला कधीही माफ करणार नाही .
फक्त एक महिना तु या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर .तुला मी अडवणार नाही ..........
पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही ...  मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही, अशी मी विनंती त्याला केली.
आयझॅक जिद्दी होता त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला 
" मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर.. "..... 
तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत सकाळचा नाष्टा ,दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व पर्मनंट जॉब ,
तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तु का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तु जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .
थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे .............
असे मी ठरवले.
          दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .
प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले.
वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता ती सगळी मुले आणि मुली माझ्या भोवती जमा झाली त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या ,क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो ,जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता....... शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल , ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोली भोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी .चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर , नॅथलीन मिस, सुनील जोशी सर ,असे नवीन मित्रही या बिलीमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना ,तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही..... एक शाळेचे नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो ...... हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती... आयझॅकने दिलेली  ..... * ग्रीन टाय.*
           अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली .
         सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते मुलं देखील नव नवीन गोष्टी शिकत होती त्याच बरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्ग चित्रे नव्याने रेखाटू लागलो . त्याकाळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर , नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .
माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले नवा स्टुडिओ बांधला .
सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी 80 टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत .
पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे .
ती म्हणजे आयझॅक सरांची  
*ग्रीन टाय.*
 
            मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तते मध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे  *ग्रीन  टाय .* 
           कारण ती टाय मला स्वतःलाच कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात .काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात ,काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात त्यानां मार्ग सापडत नसतो अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात............. ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची *ग्रीन टाय* सतत मला आठवण करून देते.
            जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.
           सुदैवाने असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. 
          असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक *ग्रीन टाय* मिळावी किंवा.......... तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दुर व्हावा..............
म्हणून खूप 
खूप शुभेच्छा !💐                 
तर अशी  आहे माझी *ग्रीन टाय* ची आठवण..... 
मला व इतरांनाही सतत प्रेरणा देणारी......
🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुनील काळे✍️
9423966486 .

अमूर्ततेचा शोध

अमूर्ततेचा शोध...... ✨✨✨✨✨✨          भारतात अनेक जातींची , वेगवेगळ्या धर्मांची ,विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेग...