ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

सातारा जिल्ह्यातील कलाकार आणि त्यांची उद्यमशीलता

 *सातारा जिल्ह्यातील कलाकार आणि त्यांची उद्यमशीलता* 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨


           सातारा जिल्हयाच्या पदरात निसर्गाने भरभरुन दोन्ही हाताने अखंड दान दिले आहे . समृध्द निसर्ग, विविध जैवविविधता, भरपूर पाणी, दुरवर पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यातून अवचित प्रकटलेली लाव्हा रसातुन तयार झालेली विस्तीर्ण सपाट अग्निजन्य खडकाची टेबललॅन्ड, कासची पठारे, त्यातून दिसणारी धुक्यात हरवलेली वनश्री, कृष्णा नदीचे खोरे,भरपूर झाडांची वनसंपदा ही सातारच्या परिसराची लक्षणे लगेच लक्षात येतात .

साताऱ्या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर सुपरिचित आहे . महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण याबरोबरच प्रसिद्ध गिरिस्थान असलेल्या महाबळेश्वरला पौराणिक काळापासून ओळख आहे. उन्हाळ्यात मुंबईला उष्ण हवामानामूळे कंटाळलेल्या ब्रिटीशांनी महाबळेश्वर येथे क्लब, बंगले बांधून उत्तम सोयी सुविधा केल्या . त्यांच्या राज्यसत्तेचा प्रमुख गव्हर्नर जनरलने उन्हाळी महिन्यात दोन महिने येथे मुक्काम करावयास सुरुवात केली . त्याच्यां मुक्कामामुळे इतरही जणांचा लवाजमा या ठिकाणी मुक्कामी येऊ लागला .कलाप्रेमी व शोधक वृत्तीच्या ब्रिटीशांनी अनेक सौदंर्य ठिकाणे शोधून काढली त्यांचे हौशी व नावाजलेले चित्रकार आणून याठिकाणची चित्रे चित्रित केली , आठवण म्हणून मायदेशी पाठवली . त्या अधिकारी लोकांची नावे आजही त्या पाँईट्सना दिलेली आढळतात. उदा. केटस पॉईंट, लॉडविक पॉईंट ऑर्थरसीट पॉईंट . सह्याद्री पर्वतरांगाचे खोरे किती विस्तीर्ण , अवाढव्य, अचंबित करणारे आहे हे अनुभवायाचे असेल तर सर्वांनीच ऑर्थरसीट पॉईंटला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे .

ब्रिटीश सैनिक ,अधिकारी वर्ग राज्य विस्तारासाठी सतत भटकत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी, निवासी शाळांसाठी त्याच्याच जॉन चेसन या अधिकाऱ्याने पांचगणी हे शाळेसाठी व आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण ठिकाण आहे असा निर्वाळा दिला . इतकेच नाही तर त्या काळात क्लिफ्टन (cliffton) नावाचा बंगला स्वतःसाठी बांधून प्रत्येक वर्षाचे तापमान,फळांचा , वृक्षांचा, अभ्यास करून नवीन सिल्व्हर वृक्षांची , कॉफीची झाडे, बटाटे ,स्ट्रॉबेरी यांची लागवड केली . मुला, मुलींसाठी स्वतंत्र इमारती बांधून स्कूल सुरू केली .आजही तेथे शतक पूर्ती केलेल्या ब्रिटीशकालीन शाळा सुस्थितीत सुरु आहेत .

वाई हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते . कृष्णा नदीच्या तीरावर सरदार रास्ते यांनी वसवलेले अनेक सुबक बांधणीचे घाट, प्रसिध्द गणपतीचे मंदीर व इतर अनेक मंदीरे ,वाईचा मानबिंदू असलेले विश्वकोषाचे कार्यालय, मेणवलीचा घाट , नाना फडणीसांचा वाडा, धोमचे मंदीर, धोम धरणाचा पाणीदार परिसर यामूळे हा भूप्रदेश समृध्दततेने नटलेला आहे .

साताऱ्याचे खरे कलेचे महत्वाचे केन्द्र औधंचे राजे बाळासाहेब पंतनिधी यांचे भवानी संग्रहालय आहे . अंत्यत कलाप्रेमी, उदार, व सर्व कला प्रकारानां प्रोत्साहन देणारा राजा म्हणून त्यांची ओळख आहे . स्वतःच्याच दरबारी अनेक कलावंत यानां राजाश्रय देवून सर्व प्रकारच्या कलानिर्मितीस त्यांनी प्रोत्साहन दिले . त्यांनी यमाई मंदीराजवळ बांधलेल्या या संग्रहास जर भेट दिली तर त्याचे महत्त्व लगेच लक्षात येते . या संग्रहात असणारी शिल्पे , कोरीवकामाचे नमुने, भारतीय शैलीतील मिनिएचर पेंटींग्ज, देश विदेशातील नामवंत चित्रकारांच्या मूळ व तयार करुन घेतलेल्या कलाकृती पाहून मन थक्क होते . व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, अनेक प्रसिध्द भारतीय, विदेशी चित्रकारांची ओरिजनल चित्रे पाहण्यासाठी शाळेच्या सहली सातत्याने तेथे भेट देत असतात व कलानिर्मितीची प्रेरणा घेऊनच बाहेर पडत असतात .

हे भवानी संग्रहालय आता शासनाकडे सुपूर्त केलेले असून तेथे पूर्वीपासूनच कायमस्वरूपी म्युझियम आहे. राजेसाहेबांनी स्वतः, व इतर कलावंतानी निर्माण केलेल्या कलाकृतीबरोबरच परदेशातील नामवंत , गुणवंत, कलाकारांच्या विविध माध्यमातील कलाकृती तेथे लावलेल्या आहेत. त्या सर्वांना पाहण्यासाठीही उपलब्ध आहेत पण नविन सध्याच्या समकालिन चित्रकारानां तेथे आपली कला प्रदर्शित करण्याची सोय नाही . त्यामूळे नंतर चित्रकारच जन्मले नाहीत की काय ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे .

त्यामूळे पुणे , मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी राज्यात साताऱ्यातील चित्रकारानां व्यावसायिक प्रदर्शने करण्यासाठी जावे लागते व मोठा संघर्ष करुन यश मिळवावे लागते .

या जिल्ह्याच्या परिस्थितीचा सर्वकष अंदाज मला आल्यामूळे मी सन १९९५ रोजी मुंबई सोडून आलो . कारण जहांगीर आर्ट गॅलरी चार पाच वर्ष मिळणार नाही हे नक्की झाले होते . मग आपल्याच गावात एखादे कलादालन करावे म्हणून अत्यंत प्रतिकूल

परिस्थितीत पाचगणीच्या सिडने पॉईंट परिसरात एका बंगल्यात सुंदर अशी आर्ट गॅलरी सुरु केली . सातारा जिल्ह्यातील 'पाचगणी आर्ट गॅलरी ' ही पाहिली प्रायव्हेट आर्ट गॅलरी असावी . या गॅलरीला अतिशय उत्तम व भरभरून प्रतिसाद या ठिकाणाच्या स्थानिक व बाहेरून येणाऱ्या पर्यटक कलाप्रेमींनी दिला. या ठिकाणी पर्यटन विभागाच्या, सहलींच्या बसेस थांबू लागल्या .पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरातील सर्व ओरिजनल निसर्गचित्रे, स्केचप्रिंट, ग्रिटिंग कार्डस, प्रिटेटं पोस्टर्स, कॅलेंडर्स, हस्तकलेच्या वस्तु, मिळू लागल्या, त्यानां ह्या परिसराची माहिती व सांस्कृतिक वारसा , इतिहास कळू लागला .तसेच जिल्ह्याबाहेरचे विजय आचरेकर यासारखे कलाकारही आपली कला येथे प्रदर्शित करू लागले . मुंबईबाहेर असे कलादालन पाहून प्रसिद्धी माध्यमांनीही चांगली प्रसिध्दी दिली . अनेक मोठे उद्योगपती, विदेशी ,देशी पर्यटक, शाळांचे माजी विद्यार्थी, प्रसिध्द अभिनेते, अनेक देशांचे राजदूत, जनप्रतिनिधी, एम आर ए सेंटरचे प्रशिक्षणार्थी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक जनतेचाही ह्या नाविन्यपूर्ण कलासंस्कृती जपणाऱ्या ठिकाणाला भेट देताना अभिमान वाटू लागला . त्या काळात राज्यपाल पी.सी. अंलेक्झाडर यांनी महात्मा गांधीच्या हस्ते लावलेल्या झाडाचे चित्र काढून घेतले, आशाताई भोसले ,दिप्ती नवल, अमीर खान व लगान टिम , कलाप्रेमी सायरस गझदर ,रुसी लाला, जीमी पंथकी, फरहाद फोर्बस, टाटा व इतर अनेक कंपन्याचे डायरेक्टर्स, पारशी कलाप्रेमी मंडळी, महाबळेश्वर व पांचगणीचे मोठे बंगलेवाले, निसर्गप्रेमी मंडळी यांनी देखील चित्रे, प्रिंटस आवडीने विकत घेतली . उत्तम अर्थप्राप्ती व कलेला प्रोत्साहनही मिळाले या तिन्ही गावांची संस्कृती, चित्ररूपाने हॉलंड, इंग्लंड, जपान, श्रीलंका, अमेरीका, टोरोन्टो, जर्मनी, कलिफोर्निया , आस्ट्रेलिया या सारख्या अनेक देशात पोहचली . येथील पाहीलेला निसर्ग व त्याची अनेक रुपे आपआपल्या देशात , राज्यात नेताना जणू छोटी आठवण, निसर्गच चित्रप्रतिकृतीच्या माध्यमातून सोबत नेतोय अशी कबुली या सर्वांनी पत्ररूपाने दिली होती . . अनेक जलरंगातील चित्रे आजही तेथे राहणाऱ्या व इथे राहून गेलेल्या परदेशी व्यक्तींकडे विराजमान आहेत .

परंतू एक वर्षातच ही आर्ट गॅलरी आटोपती घ्यावी लागली कारण तोपर्यंत जागामालकाला आणखी मोठया पैशांचा लोभ सुटला व त्याने अवाढव्य रकमेची भाडेवाढीची मागणी सुरु केली केली व मानसिक आस्थिरतेपोटी प्रॉपर्टी संदर्भात भिती वाटून पुढे नकार दिला व जागा खाली करावी

लागली . अशा रितीने त्या जागेला निरोप देऊन दुसऱ्या अनेक जागेत स्थलांतर करावे लागले . पुढे दि पाचगणी क्लब ,बेबी पॉईंट, नंतर मॅप्रो गार्डनची खुली जागा , टेबललॅन्डची दुसरी गुहा, रविन हॉटेल, अशा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणाने जागा सातत्याने बदलतच गेल्या . 

हा सांस्कृतिक कलेचा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी येथील नगरपालिकाना जागेसंदर्भात अनेक विनंती अर्ज , जागा मागणीची निवेदने सादर केली .परंतू स्वतःच्याच विकासाचा ध्यास घेतलेल्या नगरसेवक व नगराध्यक्षानां या अशा कलादालनाचे महत्व कळाले नाही , व त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही . गावाचे रस्ते , कचरा कुंडी ,सफाई, चकचकीतपणा, भव्यदिव्यपणा सुधारणा यामध्येच व गावकीच्या राजकारण करणाऱ्यानां एखादी कलाकेंद्राची, सांस्कृतिक केद्रांची गरज असते ही भूक समजली नाही . अथक प्रयत्न करूनही, स्वतःच्या एकूलत्या एक मुलीचा मृत्यू झाल्याने या कलादालनाचा प्रयत्नाचा रथ थांबला व एका निसर्गचित्रकाराच्या प्रयत्नांचाही शेवट झाला . आणि हा कलाकार मग काही काळ आपल्या कलेला मुठमाती देऊन इंग्रजी शाळेत टाय बूट घालून चारचौघांप्रमाणे नोकरीच्या वाटेवर पोहचला .

परंतू काही स्वप्ने ,आशा, उमेदीच्या धगी खूप खोलवर आतून पेटलेल्या असतात, त्या आगीचे निखाऱ्यात रुपांतर होते व ही धगधग सतत पेटलेली असल्यामुळे मनाच्या आतल्या कप्यांमध्ये उसळी मारत राहते . शेवटी पाचगणीवरून वाईच्या जवळ आम्ही स्थलांतर केले... कलादालन निर्मितीचे निखारे पेटते ठेवत ......

साताऱ्यात पूर्वी राजवाडयाजवळ मराठा आर्ट गॅलरी होती . त्या ठिकाणी चित्रकारांची प्रदर्शने व्हायची परंतू ती खाजगी मालमत्ता असल्याने कायमची बंद करण्यात आली . नविन म्युझियम बांधताना आर्ट गॅलरी साठी जागा देण्यात येणार आहे असे नुसते सांगतात . गेले कित्येक वर्ष म्युझियमची इमारत व सुधारणा कामे मिळणाऱ्या आर्थिक फडांची पूर्तता न झाल्याने काम बंद अवस्थेत पडून आहे . किंवा ते काम पूर्ण करण्याची कोणाला घाई देखील नाही . लालफितीचा कारभार पूर्ण कधी होणार म्हणून कलाकार डोळ्यांत आस धरून वाट पहात बसलेले आहेत .

आज सातारा जिल्हयात अनेक चित्रकार , शिल्पकार, उत्तम पध्दतीने कामे करत आहेत . साताऱ्यात दोन कला महाविद्यालय आहेत . अनेक चांगले गुणी कलावंत त्यातून निर्माण होत आहेत .कलेच्या प्रेमापोठी बिकट परिस्थितीतून वाट काढत कला साधना करत आहेत . अनेकांनां राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र शासनाचे, बॉम्बे आर्ट सोसायटीचे, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ,कॅम्लीन आर्ट फौडेंशन, यांचे पुरस्कार मिळालेले आहेत . काहींची चित्रे इंटर नॅशनल आर्ट मॅगेझीन मध्ये पोहचली आहेत . पोट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका आयोजित आंतरराष्ट्रीय व्यक्तिचित्र संम्मेलनामध्ये सलग तीन वर्ष भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सौभाग्य साताऱ्यातील नुने गावातील प्रमोद कुर्लेकर या तरूण चित्रकाराला मिळाले आहे . अप्रतिम व्यक्तिचित्रे करण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे .कराडचे दादासाहेब सुतार यांचे शिवराज्यभिषकाचे चित्र सातासमुद्रापार पोहचले आहे . नुकतेच नव्या निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीसाठी त्यांनी मोठी चित्रे करण्याचे काम सुरू आहे .

पाचगणी ,वाई येथील स्त्री कलावंत स्वाती काळे यांची फुलांची चित्रे नुकतीच इटलीच्या रोममध्ये दिमाखाने पोहचली आहेत . सातारा येथील तरूण चित्रकार अमित ढाणे याने शंभरापेक्षा जास्त पुरस्कार मिळवून चित्रकला विषयात एक मोठा विक्रमच केला आहे .आपल्या अंगभूत कौशल्य, व तंत्राच्या आधारे अनेक चित्रकार वेगवेगळ्या कॅम्पमध्ये आपली चुणूक दाखवत असतात . सागर बोंद्रे (कराड )

हणमंत लोहार (पाटण ) विनायक जगदाळे ( कोरेगाव, कुमठे) तानाजी अवघडे (कराड )

विशाल कांबळे ( सातारा ) सारंग कदम ( रहिमतपूर ) प्रसिद्ध चित्रकार सागरनाथ गायकवाड गुलमोहर डे चे मुख्यसुत्रधार ,शशिकांत आवळे , निलाक्षी घोणे, सुधिर सुकाळे, आभिजित शिंदे , गणेश ढाणे, विजयकुमार धुमाळ, जयकुमार वाला, पराग घळसासी , संतोष मोरे , विलास शिंदे ,वर्षा व राम खरटमल ,कला प्रोत्साहक व उत्साही कार्यकर्ते पी.बी तारू , शेखर हसबनीस,( सर्व जण सातारा ) उत्तम कार्य करत आहेत 

डॉ . सु .पि .अष्टपुत्रे, श्रीमंत होनराव , संजय यमगर, गजानन वंजारी, कोलार सर, सुनिल काळे ( सर्व जण वाई ) सुभाषचंद्र बोंगाळे पांचगणी यांनी व इतर अनेक कलाकार व स्थानिक कलाशिक्षक यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व कामाच्या शैलीतून आपआपल्या चित्रकामाद्वारे सातारा जिल्हयाचे नाव सर्वदूर पर्यंत पोहचवलेले आहे . 

परंतु असे असंख्य गुणी कलावंत सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात , तालुक्यात, शहरांमध्ये असूनही संपूर्ण सातारा शहरामध्ये सुध्दा किंवा तालुक्यात सुसज्ज, सर्व सोयींयुक्त एकाही कलादालनाची (आर्ट गॅलरीची ) चित्र लावण्याची सोय नाही . ही मोठी लाजीरवाणी , व दुर्देवाची गोष्ट आहे . खरं तर कलेच्या बाबतीत किती दुर्लक्ष आहे याचा हा सबळ पुरावाच आहे .

आमचे साताऱ्यातील आजी माजी खासदार , आमदार , लोकप्रतिनिधी उच्चशिक्षित व पाचगणीसारख्या शाळेतून इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत , त्यानां कलेची, कलाकारांची जाणीव असावी .( अशी अपेक्षा आहे )पण आमचे कलावंत, गप्प गुमान खाली मान घालून आहे ती परिस्थिती स्विकारत असल्यामूळे ते सर्वजण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात . तसेच पुरोगामी विचारांचे राजकीय नेते, मंत्री , सर्व तालुक्यांचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, 'सु'शिक्षित आहेत . त्यानां फक्त त्यांच्या कार्यक्रमाच्या , वेळी कलावंताची व त्यांच्या कलेची खूपच आठवण येते .प्रसिध्दी माध्यमेही या क्षेत्रात काही नवीन , भव्यदिव्य असे घडत नसल्यामूळे या विषयाबाबत उदासिन भुमिका घेऊन बसलेले आहेत . थोडक्यात एक मोठं औदासिन्य कलाक्षेत्रावर पडलेले आहे .पण आता जागृती व्हायलाच हवी .

एकीकडे औंधच्या भवानी संग्रलयाचा सगळीकडे उदो उदो होत असतानाच दुसरीकडे जिल्हयातील कलाकारानां चित्र प्रदर्शनासाठी भणंग अवस्था प्राप्त झाली असून मोठया शहरांमध्ये गॅलरी मिळविण्यासाठी सात सात वर्ष हाजी हाजी करावी लागत आहे . तिथलं राजकारण ही त्यानां समजत नाही . दरवर्षी फार्म भरणे एवढेच त्यांच्या हातात असते . आणि गुणवत्ता असूनही तेथेही त्यानां डावलले जात आहे . उत्तम प्रतिचे बीज असावे, कष्ट करण्याचे धाडस व जिद्द ही असावी पण कसदार जमीनच त्यानां मिळत नसल्यामूळे अनेक कलाकार निर्मितीसाठी व कला विकण्यासाठी,पोटापाण्यासाठी अनेक मोठया शहरांत प्रदर्शनासाठी , जगण्यासाठी नाईलाजास्तव स्थलांतर करत आहेत व केविलवाणा जीवनक्रम जगत आहेत. व तेथे गेल्यावरही त्यांना गॅलरी मिळत नसल्याने पदरीउपेक्षाच येत आहे . इंटरनेटच्या माध्यमातून चित्रविक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत . पण त्या माध्यमाची व्याप्ती अजून सगळीकडे पूर्णपणे रुजलेली नाही .

मग हा प्रश्न उपस्थित होतो की सातारा जिल्ह्यातील कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींचे

प्रदर्शन करायचेच नाही का ? या तयार झालेल्या कलाकृती रसिक वर्गांपुढे मांडायच्या कधी ? कोठे मांडायच्या ?कशा सादर करायच्या ? ह्याचे उत्तर कोठेच नाही कोणा जवळच नाही. मग जर चित्रकारांची चित्रे, शिल्पे कोणी जागेअभावी पाहणारच नसतील, येणाऱ्या नव्या पिढीची सौंदर्य दृष्टी, कलात्मक अभिरुची विकसित कशी होणार ? त्यांच्यापुढे हा नवा आदर्श नव्या कलाकृती , प्रयोग पोहचणार कसे ? आणि कलाकार त्यांच्या चित्रकृती विकणार कसे ?कला पाहीलीच जात नसेल तर कला अभिरुची वाढणार कशी . ?

एकीकडे शासन चित्रकलेचे विषयच बंद करण्याच्या मार्गावर असेल, त्यांचे तास कमी करणार असेल तर अशा उद्योगातून नवे कलाकार घडणार तरी कसे ? का आयुष्यभर साताऱ्यातील सर्वांनी फक्त जुन्या पिढीतील संग्रालयाच्याच कलाकृती पाहून समाधान मानायचे ? सातारा परिसरातील आर्थिक संपन्नता बंगल्या बाहेर लावलेल्या महागडया गाडयांवरून लक्षात येते . पण चित्रातही पैसे गुंतवावे , घरात चित्रे लावावीत अशी येथे संस्कृती रुजली नाही, कित्येक वर्ष संस्कारच केले गेले नाहीत, कारण कलाकारासाठी व्यासपीठच उपलब्धच केले गेले नाही . मग कलाकारानां तरी अच्छे दिन येणार तरी कसे ? तरी पण सातारी कलाकार प्रयत्नांची पाराकाष्ठा करुन कलेच्या निर्मिती प्रक्रीयेत मग्न असतात हे विशेषच म्हणावे लागेल .

१मे रोजी साताऱ्यात गुलमोहर डे चा सुंदर कार्यक्रम पार पडला . त्याचे कौतुकही झाले . साताऱ्यातील व परिसरातील सर्व कवि , लेखक, पत्रकार, सुलेखनकार, चित्रकार, शिल्पकार,सर्व स्तरांतील चित्रप्रेमी रसिक मंडळीनी उपस्थिती दाखवली . त्या सर्व छोटया मोठया चित्रकारांच्या कलाकृती, फोटोग्राफ, छोटया स्टेॅन्डवर उघडयावर, तर काही 

जमीनीवरच डिस्प्ले केलेल्या होत्या. पण दुपारी सोसाटयाचा वारा अचानक सुरू झाला . वाऱ्याच्या वेगाच्या मारामूळे सर्व स्टॅन्ड उलटेपालटे

झाले .जमीनीवरील सुंदर मेहनत घेऊन केलेली सुलेखनाची कागदे वाऱ्याबरोबर धूळ खात सैरभर पसरली , उडून दूरवर जावून पडली. बिचारे तरूण चित्रकार त्यांच्या कलाकृती वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत धावत जावून कलाकृती पकडण्याचा प्रयत्न करीत होती . स्टेॅन्डवर लावलेली चित्रे स्टॅन्डसह फरफटत चाललेली होती . क्राफ्टवर्क तर दूर लांब गिरक्या , उडया मारत पडली होती . सगळीकडे बेचिराख सुनामीचे वातावरण झाले होते . आणि मनात निराशेचे दाट सावट व डोळे पाण्याने भरून आले होते , कलाकारांच्या कलाकृतींची दारुण , भयानक व दाणादाण अवस्था पाहून ......

नटसम्राटच्या नाना पाटेकरांचीच एकदम आठवण आली . त्यांच्या स्टाईलमध्येच असे दुर्देवाने म्हणावे लागते की, साताऱ्यात कोणी जागा देता का ? जागा . ? या कलाकारानां, छोट्याशा तुफानांना थोडी कला दाखविण्यासाठी जागा देता का ? जागा . एखादं कलादालन दया 

त्यानां, ही तुफाने आता थकलीत, मनाने आणि शरीराने देखील. कोणी वालीच राहीला नाही हो आम्हाला ! कोणी मदत करील का या धडपडणाऱ्या तुफान कलाकारानां ! द्या त्यानां थोडासा कलादालनाचा मंच, मग बघा त्यांच्या कल्पनांनां , विचाराना, कशी नवी पालवी फुटेल, धुमारे फुटतील , व प्रेक्षक, रसिकानां ते आपल्या कलाकृतीतून स्वतःला विसरायला लावतील, आनंद देतील. सगळा माहोल उजळून टाकतील .

सातारा शहरात दोन कला महाविद्यालय झाली आहेत . त्यातून आता अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडू लागलेत . अनेकांच्या यशाच्या सकारात्मक गोष्टी पाहून त्यानां प्रेरणा, प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे . नव्या कल्पनांनी त्यांच्या मनाने उभारी घेणे गरजेचे आहे . अन्यथा परत एकदा त्यानांही पुण्या, मुंबईकडे जावे लागेल त्या मोठया समुद्रात संघर्षासाठी जीवघेण्या वातावरणात किंवा कला महाविद्यालयात पाच वर्षाचे शिक्षण घेतल्याचे पश्चातापयुक्त मनाने घेतलेले जड ओझे आयुष्यभर सांभाळावे लागेल ........ उदासपणे, निराशपणे , धडपडत, भरकटत त्या मोठया शहरांमध्ये अंग आकसून जगावे लागेल, दुःखी मनाने .... त्यांचा सातारा परिसर सोडून पिचत पडावे लागेल, छोटया जागेत घुसमट होईल अवहेलना होईल त्यांची....... आयुष्यभर ........कला निर्मितीची बीजे व संधी शोधत शोधत .....

त्यामूळे सातारा जिल्हयातील कलाकारांनी एक एकटयाचे प्रयत्न थांबवून सामुहिक रित्या एकत्र येवून, आपल्या व्यक्तिगत मानपान, अहंकाराला बाजूला ठेवून एकत्र आले पाहीजे . मुंबईसारखीच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या धर्तीवर एकत्र येथून सातारा आर्ट सोसायटी स्थापन करून शासनाला एक उत्तम पध्दतीची आर्ट गॅलरीचे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहीजे , भाग पाडले पाहीजे .आपला इगो,हेवेदावे बाजूला ठेवले पाहीजेत . आणि आपण मुंबई पुण्याला जावून प्रदर्शन करण्यापेक्षा तेथील आर्ट विषयक अॅक्टीव्हीटीज देखील छोटया मोठया प्रमाणात 

निसर्गरम्य साताऱ्यात झाल्या पाहीजेत . आता

पाहीजेत फक्त संवेदनाशील, व निधड्या छातीची आत्मविश्वासाने भरलेली सकारात्मक मने आणि काम पूर्ण करण्याची तळमळ , आणि ती तर सातारकरानां दैवी देणगी आहे . आणि आमचे प्रसिद्ध राज्यकर्ते,लोकप्रतिनिधीही त्यासाठी मदत करतील, पुढाकार घेतील अशी अपेक्षा का करू नये ? किंवा त्यांच्या मनात आले तर ते काम लगेच करतात अशी त्यांची ख्याती आहे . मग दिल्लीतही सातारा येथील कलाकारांची तुतारी वाजेल, सर्वानां दखल घेण्यास भाग पडेल याची खात्री आहे . 

आणि एक तरी कलादालन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने साताऱ्यात कलेच्या क्षेत्रात पडणारा फरक पाहून संपूर्ण महाराष्ट्रात साताऱ्याचे नाव कलाकारांची नगरी म्हणून प्रसिध्द होईल व येथील याक्षेत्रातील अर्थक्रांती ही वाढेल, थोडे कलाकार देखील 'अर्थ 'पूर्ण होत जातील यात शंका नाही . पाहीजे फक्त समर्थ 'राजां 'सारखी दिलदार समर्थ साथ ..... थोडा थोडा सगळ्यांचाच ' राजा 'श्रय हवा

आहे हे नक्की .............


सुनिल काळे (9423966486) , 


प्रस्तुत लेखक स्वतः गेली २५ /३० वर्षांपासून निसर्गचित्रकार म्हणून

कार्यरत असून कलादालनाच्या प्रयत्नात सातत्याने प्रयत्नशील आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...