ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

" गच्चीवरील गप्पा "

 अनिल नाईक व सतीश नाईकांच्या 

" गच्चीवरील गप्पा "  


            लहानपणापासून प्रत्येकालाच चित्रकलेविषयी आकर्षण वाटते , आणि ती व्यक्ती त्याच्या सभोवताली असलेल्या परिस्थितीनुसार चित्र काढायला सुरुवात करते . तशीच सुरुवात माझी झाली पण दुर्देवाने माझ्या घरी चित्रकलेसाठी प्रोत्साहनात्मक वातावरण नव्हते. सातवीपर्यंत आम्हाला चित्रकला विषयच नव्हता . मी ज्यावेळी  शाळेत होतो त्यापासून मला थोडा स्केचिंगचा नाद मात्र लागला . परंतु चांगले स्केचिंग कसं करायचे याचा मला जराही अनुभव नव्हता . 

           कोणीतरी एका शिक्षकाने सांगितलं एखाद्या व्यक्तीचे चित्र काढायचे असेल तर फोटोवर चौकोनी स्केल मारायचे आणि त्या चौकोनामध्ये जेवढा आकार असेल त्याप्रमाणे रंगवत जायचे . हे काम मला फार सोपं वाटायला लागले आणि त्या बालपणीच्या काळामध्ये मी माझे आवडते हिरो अमिताभ बच्चन , राजेश खन्ना , व  वाई कॉलेजमध्ये सायन्सला शिकत असताना यशवंतराव चव्हाण , किसन वीर व इतर नामवंत शास्त्रज्ञांची व्यक्तिचित्रेही प्रयोगशाळेत फ्रेमस करून लावण्यासाठी काढायला लागलो . स्केल मारून चित्र काढणे हळूहळू सरावाचे होत गेले . परंतु प्रत्यक्ष माणूस समोर बसल्यानंतर चित्र काढणे ही एक मोठी कसोटी होती . समोरच्या माणसाचे चित्र काढताना माझी फार भंबेरी उडू लागली कारण एक तर मला अनुभव नव्हता आणि दुसरी गोष्ट समोरच्या माणसाला बसण्याचा पेशन्स नव्हता . तो सारखे उठून माझी चित्र काढण्याची प्रगती कुठपर्यंत आली हे शोधत राहायचा .त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे टेन्शन मनात असायचे . अशावेळी त्या व्यक्तीचा जरा आपला चेहरा  अजून सुंदर दिसू शकतो याचे मार्गदर्शनपर कॉमेंट्रीही सतत चालू असायची . 

             त्यामूळे पुढे असा प्रत्यक्ष मॉडेल बसून चित्र काढणे हे मला भिडस्त स्वभावामुळे जमलेच नाही . माझा  एकलकोंडापणा वाढत गेला आणि मी डोंगराची , झाडांची , व्हॅलींची , घरांची , बंगल्याची , चित्र काढण्यात मग्न झालो . कारण येथे समोरच्या मॉडेलला कंटाळा यायचा किंवा हलायचा प्रश्नच नव्हता . आणि दुसरे म्हणजे निसर्गचित्रात एखादे झाड किंवा डोंगर चुकला तरी त्यांची कसली तक्रार नसायची . मग मी निसर्गचित्रांमध्येच रमलो .

               1990 साली मी अभिनव कलामहाविद्यालयाच्या अंतिम वर्षामध्ये शिकत होतो माझा विषय पब्लिकेशन आणि इलस्ट्रेशन असा होता त्यामुळे वारंवार माणसांची चित्र काढताना माझा घोळ होत होताच . कोणीतरी शिक्षकांनी सांगितले की ॲनाटॉमीचा अभ्यास करायला पाहिजे . म्हणून मी एकदा आप्पा बळवंत चौकात व्हीनस स्टेशनरी या दुकानात गेलो असता बाहेर चित्रकलेची काही पुस्तके डिस्प्ले केलेली होती . त्यामध्ये अनिल नाईक यांचे सेल्फ पोट्रेट नावाची छोटी पुस्तिका नुकतीच चिन्ह प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली होती . पस्तीस रुपयाची ती छोटी पुस्तिका मी विकत घेतली आणि होस्टेलवर आल्यानंतर वाचून काढली .फार भारावून गेलो होतो अनिल नाईकांची छोटी पुस्तिका वाचल्यानंतर .

              आज एकतीस वर्ष जपून ठेवलेले सेल्फ पोट्रेट नावाचे अनिल नाईकांच्या प्रवासाचे पुस्तक आज परत बाहेर काढले आणि पूर्णपणे परत वाचले . त्यातील सीता कुलकर्णी मॅडम, शुभदा भोसले मॅडम , जॉन डग्लस सर , चौगुले , ठाकरे व इतर अनेकजण आज परत आठवले .त्यावेळी जसा त्यांचा कलाप्रवास वाचल्यानंतर मी भारावून गेलो होतो तितकाच आजही आनंद त्या पुस्तकाने दिला .

             त्यावेळी पुस्तक वाचल्यानंतर काही दिवसातच जे .जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना भेटायला गेलो .त्यावेळी  जे .जे स्कूल ऑफ आर्टमध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यानां ते शिकवत होते .मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून तुम्हाला भेटायला आलोय तुमचं पुस्तक वाचले आहे ऐकून त्यांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली . वर्गातले लेक्चर संपल्यानंतर खाली लक्ष्मणच्या कॅन्टीन मध्ये नेले . तेथे माझी सगळी चित्रे स्केचेस त्यांनी पाहिली आणि नियमितपणे माणसांची स्केचेस सतत करत राहीले पाहिजे असा संदेश दिला .

              मग त्यावर्षी रोजच शिवाजीनगर स्टेशनला जाऊन रात्रभर स्केचिंग करायचे आणि अगदी उशिरा पर्यंत वेगवेगळ्या माणसांची शरीररचना व बसण्याची ढब समजून घ्यायची याचे वेड लागले . आजही वेळ मिळाला की मी माणसांची  स्केचेस करत राहण्याचा प्रयत्न करत असतो .अशावेळी समोरच्या माणसाचे चित्र काढताना त्याचा लाईकनेस व व्यक्तिमत्व चित्रात कसे आणायचे याचे कोडे मला आजही उलगडलेले नाही . त्यामूळे पोट्रेट पेंटिंग करणारे कलाकार यांच्याविषयी माझ्या मनात आजही आदराची आणि उदात्तेची भावना भरभरून आहे .

             अनिल नाईक यांची चित्रे केमोल्ड फ्रेम्सला नोकरी करत असताना कधीकधी पाहायला मिळायची . पण पुढे मुंबईचा संपर्क संपला आणि मी पाचगणीला आलो .

त्यानंतर त्यांचा प्रवास कसा झाला ? 

याविषयी आजही मोठी उत्सुकता मनामध्ये आहे . 

चिन्हच्या गच्चीवरील गप्पांमुळे त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क होईल आणि त्यांच्या चित्रांचा कसा प्रवास झाला याचे एकतीस वर्षानंतर कोडे उलघडेल असे नक्की वाटते . 

या कार्यक्रमाला अनिल नाईक आणि सतीश नाईक व त्यांच्या टिमला खूप खूप शुभेच्छा !💐💐💐

           सर्वांनी जरूर पहा साडेपाच वाजता . चिन्हच्या "गच्चीवरील गप्पा ".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...