ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

" गच्चीवरील गप्पा " अर्थात ? प्रश्न " चिन्ह " ?

 " गच्चीवरील गप्पा "

        अर्थात

  ? प्रश्न " चिन्ह " ? 

🔥🔥🔥🔥🔥

         सातारा जिल्ह्यातील वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गावाबाहेर मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आमचा "निसर्ग " नावाचा बंगला आहे . या बंगल्याच्या आजूबाजूला वस्ती नाही . बंगल्याला सहा फुटाची भिंत व अपारदर्शक पत्र्याचे मोठे गेट असल्याने कोणाही आगंतुक माणसांचा आत येण्या-जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . कोरोनाच्या वातावरणामुळे व कडक लॉकडाऊनमुळे कोठेही बाहेर जाता येत नाही . टीव्हीच्या बातम्यांमध्ये सततच्या कोरोनाच्याच बातम्या व मृत्यूंच्या आकडेमोडीला मी रामराम केला आहे . अनेक व्हाट्सअपवरील ग्रुपमध्ये कोरोनाच्या काळात ऑक्सिजन लेवल कशी वाढवायची याविषयी भरपूर फुकटची माहिती व सल्ले मिळायला लागल्यामुळे आपली ऑक्सिजन लेवल खरोखरच कमी होत आहे की काय ? असे उगाचच वाटून मी सर्व ग्रुपमधूनच बाहेर पडलो आहे . फक्त चिन्हच्या आर्टिस्ट ग्रुपवर मी आहे कारण तिथला सतिश नाईक नावाचा ॲडमिन डेंजर व खमक्या आहे . येथे फालतू पोस्ट टाकल्या  की त्या मेंबरला लगेचच निरोपाचा नारळ मिळतो . तेथे शिल्पचित्रकले घडामोडींच्या माहीती शिवाय इतर गोष्टीनां थारा नसतो . तर सांगायचा मुख्य उद्देश काय तर आम्ही अशा परिस्थितीत राहतोय की तेथे जगाशी व चित्रकलेच्या फिल्डशी आमचा कसलाही संपर्क नाही . 

तरीही आम्ही आनंदाने जगतोय . 

ते कसे काय ? 

सांगतो सविस्तरपणे .

         आमच्या निसर्ग बंगल्याच्या प्रशस्त गच्चीवर चारीबाजूने डोंगरांच्या रांगा आहेत .पश्चिमेकडे छत्रपती शिवाजीमहाराजांचा स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला दिसतो ,  उत्तरेला भक्कम पांडवगडाचा पसरलेला डोंगर व विस्तीर्ण पायथा दिसतो .दक्षिणेकडे कमळगडाचा चौकोनी डोंगर खूपच  दिसतो  व त्यासोबत पाचगणीच्या टेबललँडचे सपाट पठार , सिडने पॉइंट येथील चिमुकली घरे दिसतात . पूर्वेकडे दूरवर राजपुरी खिंगर गावची टेबललॅन्डची पठारे व पसरणी घाटाची दरी विलोभनीय  दिसते .पूर्वेकडे वैराटगड , मांढरदेवीचा डोंगर ,वाई गाव व एम .आय .डी .सीचा परिसर दिसतो .आजूबाजूला  उसाची भरपूर शेती आहे त्यामूळे चोहीकडे हिरवीगार झाडी व स्वच्छ वातावरण असल्याने ऑक्सिजनची येथे अजिबात कमतरता जाणवत नाही . परंतु असे सगळं छान असले तरी मनात कोरोनाच्यामूळे एक प्रकारची एकटेपणाची उदासी , दडपण  व अनामिक भीती व हुरहूर दाटून आहे . 

            कारण आपण सगळे नुसता सजीव प्राणी नाही तर माणूस आहोत व नुसते माणूस नाही तर किएटिव्ह माईंड असलेले कलावंत आहोत हे विसरता येत नाही . या कल्पकतेला नेहमी प्रेरणादायी उत्साहाचे खतपाणी अधूनमधून घालावे लागते . म्हणजे पिकांना नुसते पाणी घालून त्याची जोमाने वाढ होत नाही तर सकस आरोग्यपूर्वक खतांची जोड दिली तर बागेतील झाडानांही आणखी चांगली फुले फुलतात आणि पिकांना नवी तरतरी येते , नवे धुमारे फुटतात .

           असे धुमारे कलावंतांना दर शनिवारी  "गच्चीवरील गप्पा " सतीश नाईक यांच्या कार्यक्रमामुळे मिळतात . मनातील कितीतरी अचानक पडलेल्या निर्जनवासात बियांप्रमाणे नवनवे अंकुर फुटू लागतात .कितीतरी अज्ञात प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात .दर शनिवारी अशा मला माहीत असलेल्या ज्ञात व अज्ञात कलाकारांचा जीवन प्रवास त्यांच्या आवडीनिवडी , त्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या आयुष्यातील व्यक्तींचा प्रभाव , त्यांनी या क्षेत्रात केलेल्या असंख्य प्रयोगांची माहिती मिळते . त्यांनी भोगलेल्या यातना , अवहेलना व कष्टांचा डोंगर पाहिल्यानंतर आपल्याला अजून किती पल्ला गाठायचा आहे याची देखील नव्यानेच जाणीव होते . यशप्राप्ती प्राप्त करणे ही सोपी गोष्ट नाही याचाही साक्षात्कार होतो .

               देवाच्या मंदिरात देवाच्या पायाशी पडलेल्या फुलांना खूप वाईट वाटत असते . कारण त्यांना देवाच्या गळ्यातील हारातील फुले बनता येत नाहीत . ते त्या फुलांना नेहमी म्हणत असतात की तुम्ही कसे नशीबवान आहात , तुम्ही देवाच्या गळ्यात हाराच्या रूपाने  रहात आहात आणि आम्ही मात्र पडलोय इथे पायथ्याशी . तेव्हा त्यातील फुले म्हणतात खरे आहे मित्रांनो ! आम्ही नशीबवानच आहोत पण इथे पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नसतो त्यासाठी टोकदार सुईने जखमी करणाऱ्या शरीराला व मनाला आरपार वेदना सोसाव्या लागतात .मगच या फुलांचा हार बनतो .

             त्या वेदना ज्या कलाकारांनी सोसल्या त्यांचा नुसता पैसा , मोठेपणा दिसतो .यशाची शिखरे ,मानसन्मान , प्रतिष्ठा , व यशप्राप्ती दिसते पण त्यांचा अनेक अडचणींना सामना देऊन केलेला काटाकुट्यातील धीराने , निष्ठेने केलेला प्रवास दिसत नाही .या प्रवासात त्यांचे रक्तबंबाळ झालेले पाय दिसत नाहीत .   अतिशय टोकाच्या कठीण परिस्थितीशी सामना करताना प्रवास अर्धवट न ठेवता प्रवास पूर्ण करण्याचा ध्यास कौतुकास्पद असतो .

          आणि कलाकारांचा हा सगळा प्रवास "गच्चीवरच्या गप्पा " या कार्यक्रमामुळे सर्वांना समजतो . त्या कलाकाराचे मनोधैर्य व व्यासंग कळतो . अविरत केलेली कलासाधना , ज्ञानसाधना कळते .एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते हे समजते . 

चित्र-शिल्प किंवा या इतर कोणत्याही अवघड कलाप्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी ,निष्णात होण्यासाठी ,किर्ती मिळविण्यासाठी  किती ज्ञानसाधना करावी लागते किती उलाढाल करावी लागते याचे रहस्य उघडते . व हे रहस्य उघडण्याचे , त्या  अबोल कलाकारांनां सहजपणे बोलते करण्याचे अवघड काम सतीश नाईक फार सहजपणे करत असतात .

          चिन्हचे सर्वेसर्वा सतीश नाईकांची व माझी फार जवळीक नाही . त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होऊन आम्ही फार जवळचे मित्र आहोत असेही कधी झालेले नाही . किंवा त्यांची पाठराखण करण्याचाही माझा हेतू नाही . एखाद्या माणसाने केलेले एखाद्या क्षेत्रात केलेले योगदान एकदोन शब्दांमुळे दुर्लक्षित करता येणार नाही . लगेच चारी बाजूला हातात सगळ्यांनी भाले घेऊन टोचण्याचीही गरज नाही .

          १९८८ त्यांनी संपादित केलेला ' चिन्ह ' हा अंक अचानक  माझ्या वाचनात आला .अभिनवला पुण्यात विद्यार्थी म्हणून शिकत असतानाचे ते दिवस नवी स्वप्ने ,नवी क्षितिजे पाहण्याचे कोवळे दिवस होते . त्या अंकात " रंगवला लडाख " नावाचा दत्तात्रय पाडेकर त्यांचा एक फार सुरेख लेख होता . त्या लेखाने मला इतके झपाटून टाकले की खिशात पैसे नसताना तीस दिवस कोकण रंगवण्याची , प्रत्यक्ष पायी प्रवास करण्याची नवा निसर्ग , नवा प्रदेश रंगवून पाहण्याची प्रेरणा मला मिळाली .  शिकत असताना शेवटच्या वर्षी " माझी कोकणनिसर्गयात्रा "अशा नावाचे एक सुंदर प्रदर्शन मी बालगंधर्व कलादालनात मध्ये भरवले होते . त्याचा एक सविस्तर लेखही माझ्या वॉलवर लिहलेला आहे.

        त्याच अंकामध्ये वाचलेल्या " राजकोट वाला चाळ गणेश सिनेमा समोर " या अच्युत पालव यांच्या लेखांमुळे कॅलिग्राफीचे वेड डोक्यात भरले . ते वेड इतके भारी घुसले होते की त्यांच्या लेखाचा शेवट करताना त्यांनी लिहिलं होतं भेटायचं तर या लालबागला केव्हाही गणेश सिनेमा समोर ! मग मी देखील कोणतीही पूर्वसूचना न देता भारावलेल्या अवस्थेमध्ये खरोखरच लालबागला गेलो . पालवांनां भेटलो .कॅलिग्राफी विषयी भरपूर गप्पा मारल्या . त्यादिवशी हा महान कॅलिग्राफर मित्र मी मुंबईमध्ये चुकू नये म्हणून पायी चालत सोडायला करीरोड स्टेशन पर्यंत आला . मला गाडीत बसवले खायला घातले व मगच घरी गेला . एक प्रामाणिक स्वच्छ नितळ मनाचा माणूस कायमचा मित्र झाला . त्याच्यामुळे संघर्षाची लेवल किती उंचापर्यंत असू शकते याची जाणीव झाली .पुढे जीवनात खरोखरचा संघर्ष करत असताना बाळकृष्ण आर्ट ह्या सिनेमा पोस्टर रंगविण्याच्या कंपनीत काम त्यांच्यामूळेच मिळाले .हे काम करताना जे असंख्य अनुभव आले त्यामुळे जीवन समृद्ध झाले .त्यामुळे चिन्हचे आभाळाएवढे उपकार मनात व शरीराच्या रोमारोमांत भरून राहिलेले आहेत .

          काही दिवसांपूर्वी नुकताच एक दिवस असा वाईट उगवला की आजही त्याची आठवण मला नकोशी वाटते .एके दिवशी रात्री प्रचंड वाईट स्वप्न पडले . त्या स्वप्नात चिन्हचे संपादक सतीश नाईक यांना येशुप्रमाणे क्रुसावर दोन्ही हात व पाय बांधून फरफटत ओढत निर्दयपणे घेऊन चाललेले आहेत असे दिसले .हे काही पुण्यात राहणारे संस्कृतीरक्षक व धर्ममार्तंड कलाकार होते . या लोकांनी ज्ञानेश्वरांच्या काळातील मोठ्ठी पुणेरी पगडी घातलेली मला दिसत होती . सतीश नाईक यांनी पुणे शहराविषयी  वापरलेले  दोन शब्द पुणेकर कलाकारांना फारच झोंबले  व त्यामुळे त्यांच्या मनाच्या  आत्मियतेला  व शहराच्या अस्मितेला  प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे , मनाला न भरून येणारी मोठी ठेच पोहोचली आहे असा त्यांचा दावा होता . त्यामुळे त्यांनी सतीश नाईक यांनी  सर्व विद्वान संस्कृतीरक्षक कलाकारांच्या पाया पडून बिनशर्त माफी मागितली पाहिजे . नाहीतर त्यांना पुण्यात येण्याची कायमची बंदी घालून त्यांचे सर्व चिन्हचे अंक , गायतोंडे ग्रंथ व इतर सर्व पुस्तके देहूच्या इंद्रायणी नदीमध्ये डुबवले जातील अशी तंबीच दिली . त्यांना ज्ञानेश्वरांप्रमाणे समाजातून व चित्रकला क्षेत्रातून बहिष्कृत करून वाळत टाकले जाईल , किंवा सावित्रीबाई फुले याच्यां अंगावर मुलींना शिकवण्याचा ध्यास घेतल्यामूळे चालताना अंगावर शेण टाकत त्रास देत असत तसे यांच्या अंगावरही शेण टाकावे असाही संस्कृती रक्षकांनी आदेश दिला होता . त्यांनी लेखी माफीनामा दिला तरच त्यांची मुक्तता केली जाईल नाहीतर खिळे मारून येशुप्रमाणे धिंड काढून क्रुसावर लटकवले जाईल अथवा त्यांना हुसेनप्रमाणे देश सोडावा लागेल असाही निर्णय घेण्यात आला . शिवाय त्यांनी चिन्हच्या गच्चीवरच्या गप्पा बंद केल्या पाहिजेतच नाहीतर पुणेकर कलावंतांचा मोठा अपमान झाला आहे असे ठरावाअंती ठरले . 

          हे सर्व स्वप्न पहात असतानाच मी ओरडतच जागा झालो आणि मोठ्याने म्हणू लागलो थांबा ! थांबा ! असे करू नका .  लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या या चिन्हच्या गच्चीवरच्या गप्पा बंद करू नका .

          शेवटी शब्दात थोडाबदल केल्यानंतर हे वादळ थांबले व गच्चीवरच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या . मग मीही त्या वाईट स्वप्नाला विसरून गेलो. नव्याने ' खरा ' जागा झालो आणि पुन्हा चिन्हच्या गप्पांमध्ये डुबून गेलो .सतीश नाईकांच्या गप्पांमुळे कितीतरी प्रतिभाशाली कर्तृत्ववान कलाकारांचा प्रवास कळाला . नवीन कलाकारांच्या ओळखी झाल्या .या कष्टमय व विचित्र प्रवासातून त्यांनी कशी वाट काढली हे ऐकून अनेक नव्या कलाकारांना ,विद्यार्थ्यांना , नवशिक्या छंदिष्ट मंडळींना कलाप्रेमींना ,रसिकप्रेक्षकांना , सामान्य जनतेला किती आनंद मिळाला असेल याची गणतीच नाही .

       सं .धू . बापट ( S.D. Bapat ] नावाचे माझे एक वयस्कर रिटायर्ड कलाशिक्षक मित्र होते . ते नेहमी म्हणायचे अनेक लोकांच्या संघटना एकत्र येतील . सरकारी क्षेत्रातील संघटना , व्यापारी क्षेत्रातील संघटना , शिक्षण क्षेत्रातील संघटना , डॉक्टरांच्या संघटना , इतकेच काय सफाई कामगारांची देखील संघटना बनते . या अशा कितीतरी संघटनांची नावे घेता येतील व आणखी नव्या संघटना तयार होतील . त्या संघटना यशस्वीही होतील . पण शिल्पकार चित्रकार मंडळी कधीही एकत्र येणार नाहीत . चित्रकार , शिल्पकार व एकंदर कलांवतमंडळींना इगो  फार असतो . त्यांच्या या इगोकारक द्वेषबुद्धीमुळे त्यांना कोणी मदत करत नाहीत व ते स्वतःही एकमेकांनां फारशी मदत करत नाहीत . कधीकधी तर त्यांच्या तील काहीजणांच्या सर्व कल्पना व विचार अतार्किक एकांगी असतात  (अर्थात काही अपवादात्मक चांगली मंडळी एकत्र असतातच ) त्यामुळे सर्वांनी एकत्रपणे ,एकोप्याने व इतरांचे सर्व  गुणदोष लक्षात घेऊन एकमेकांच्या कलागुणांचा आदर ठेवून ,नव्या कल्पनांची देवाणघेवाण करून चित्र-शिल्प ज्ञानाचा चित्रभानाचा , समाजभानांचा नंदादीप सतत तेवत ठेवला पाहिजे .

         काही दिवसांपूर्वीच चिन्हचा ' गायतोंडे ' हा ग्रंथ पाहिला .आणि वाचला देखील . त्यातील गायतोंडे संपूर्णपणे कळाले नाहीत पण त्यांचा ध्यास व चित्रांची चांगली तोंडओळख नक्कीच झाली . ग्रंथाची मांडणी ,बांधणी , त्यातील लेखांची निवड , त्यातील लेआउट , त्यातील नीटनेटकेपणा , टाईपचे सिलेक्शन , चित्रांची प्रिंटिंग क्वालिटी हे सगळं पाहताना संपादकाचे कौशल्य मेहनत तंत्राची जाणीव व पुस्तक परिपूर्ण करण्याचा ध्यास पाहून हा संपादक नुसती चित्रकला जपत नाही  तर एक परिपूर्ण पुस्तक रूपाने कलाकृतीच निर्माण करतोय हे पानोपानी जाणवते . त्यासाठी किती अपरिमित कष्ट केलेले आहेत हे चिन्हचे अंक व इतर पुस्तके पाहिल्याशिवाय कळणार नाहीत .

           निसर्ग बंगल्याच्या गच्चीवर निसर्ग सानिध्यात टॅबवर तर कधी मोबाईलवर या  गरम कॉफीचा कप घेऊन आपल्या कलावंत मित्रांच्या गप्पा ऐकणे ही अवर्णनीय संधी असते . तो अनुभवच निराळा असतो . ते कृपया कोणीही बंद करून त्यात खोडा घालू नये अशी सर्वानां नम्र विनंती आहे .महाराष्ट्रातील तीस कलावंतांच्या गप्पांचे कार्यक्रम झालेत त्यात अजून तीनशेचा टप्पा पार पडू दे !  सतीश नाईक यांना अशा सकारात्मक शुभेच्छा देऊ या .

            शब्द हे तलवारीपेक्षा ही धारदार शस्त्र असते . लेखणीची ताकद शस्त्र म्हणून वापरतात . ते शस्त्र विचार करून कोणालाही दुखावणारे असू नयेत . कोणाच्याही मनाला यातना देणारे नसावेत . कलावंतांच्या व त्यांच्या अफाट कार्याच्या अनोळखी विश्वात फेरफटका मारून कलावंतांच्या भेटीगाठी करून देण्याचे अलौकिक काम सतीश नाईक करत आहेत . त्यांच्या या कृत्याची दखल ते गेल्यानंतर श्रद्धांजली देऊन करण्यापेक्षा जिवंत असतानाच आदरांजली देऊन करूया . कारण हे काम सोपे नाही याची जाणीव ठेवली पाहीजे .

           कलाकार मेल्यानंतर 40 कोटी मिळण्यापेक्षा कलाकार जिवंत असताना त्याच्या चित्रांचे योग्य मूल्यमापन होऊन तो कलाकार आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा बनेल आणि समाजातही चित्रकारांना शिल्पकारानां योग्य ती प्रतिष्ठा कशी मिळेल हे पाहिले पाहिजे . नुसते कला विक्रेते , आर्टगॅलरीवाले ,ऑक्शन करणारे दलाल प्रचंड श्रीमंत होण्यापेक्षा छोट्यातल्या छोटा कलाकार त्याच्या कलाकृती विक्रीमुळे , त्याच्या नवनिर्मितीसाठी आर्थिक हातभार कसा लागेल याचा सर्वांनी विचार केला पाहिजे .

        कृपया हे सर्व लिहिताना कोणालाही दुखावण्याचा व दोष दाखवण्याचा हेतू नाही . हे समजून घ्यावे .

         मागच्या वर्षी मला एक दिवस सतीश नाईक यांचा फोन आला होता. त्यांनी  गच्चीवरच्या गप्पा मध्ये सामील होण्याची विनंती केली त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता . वाई पाचगणी सारख्या छोट्या गावात राहणारे आम्ही कलाक्षेत्रात काहीही भरीव कामगिरी केली आहे असा आमचा दावा नाही , शिवाय आम्ही सांगणार काय ? कारण मी मोठ व्हायचं कॅन्सल केलेले आहे त्याची एक  गोष्ट ही मी त्यांना पाठवली . सतत त्यानंतरही त्यांनी तुम्ही जगले कसे ? जगत असताना , अनेक अडचणी आल्या असताना आत्महत्येचा विचार मनात आलेला असताना एका वेगळ्या क्षेत्रात काही दिवस काम करून तुम्ही पुन्हा चित्रकला क्षेत्रात सक्षमपणे काम कसे करत आहात ? हे मला लोकांना दाखवून द्यायचे आहे . त्यांनी हा सततचा पिच्छा पुरवला त्यामुळे मी तयार झालो .

ही मुलाखत घ्यायच्या वेळी सतीश नाईक यांचे अनेक फोन यायचे . त्यामध्ये प्रत्यक्ष रिहर्सल करून नेटचे कनेक्शन चेक करणे , आवाज चेक करणे , बसण्याची पार्श्वभूमी तपासणी करणे , इ.इ. . एखादा छोटा कार्यक्रम देखील यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत ते करत असतात याचा अनुभव मी घेतलेला आहे . माझी "ग्रीन टाय " नावाची कथा अनेकांना प्रेरणादायी वाटली व अनेकांना आवडली होती .          

           आमचा गच्चीवरच्या गप्पांचा कार्यक्रम ऐकल्यानंतर काही दिवसांनंतर मुंबईवरून डॉ. विजय भावे या  हरहुन्नरी व्यक्तीने अचानक पाचगणीला राहुन नंतर  वाईमध्ये माझी भेट घेतली . तुमची मुलाखत पाहिल्यानंतर ती आवडली , पण एक चांगला चित्रपट त्यावर बनू शकतो म्हणून एक हजार रुपये व ॲग्रीमेंटची कॉपीच हातात दिली . काही दिवसानंतर तुमच्या आयुष्यामध्ये चित्रपटकथेसाठी लागणारा मालमसाला खच्चून भरलाय असे म्हणत  प्रोड्युसर यांचाही फोन आला बरीच चर्चा झाली . पण करोनाच्या सावटामुळे सगळेच लांबणीवर पडले . 

          चिन्हच्या गच्चीवरील गप्पांअगोदर प्रत्यक्ष जगताना धडपडीची कोणी साधी दखलही घेतली नव्हती पण माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला होता त्याची कबुली दिल्यानंतर ही पोस्ट वाचून व गच्चीवरच्या गप्पा ऐकल्यानंतर त्याच्यावर चित्रपट बनवण्याची कोणालातरी कल्पना सुचली हे चिन्हच्या गप्पांचे मोठे यश आहे व त्याचे क्रेडिट सतीश नाईक यांना द्यायलाच हवे . चिन्हाच्या गप्पांमधून अशा प्रकारचा एक जगावेगळा अनुभव माझ्यासारख्या छोट्या  कलावंताला आला . त्यामुळे सतीश नाईक यांनीसुद्धा  यापुढे गप्पा अधिक रंगतदार , बहरदार करून अनेक कलावंतांना अनोखा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा व कसल्याही प्रकारे वाद निर्माण करणारे शब्द शक्यतो टाळावेत असे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही नम्र विनंती . 🙏🙏🙏व खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 

       कारण  खेड्यापाड्यात व छोट्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध ,अप्रसिद्ध ,छोटे , मोठे कलाकार , सामान्य रसिक व कलाप्रेमी  राहत असतात. त्यानां या लॉकडाऊनच्या भीषण निराशेच्या काळात उर्जा व प्रेरणा मिळत असते .कार्यक्रमाच्या मेजवानीला मुकावे लागेल अशी वर्तुणूक कोणाकडूनही न होवो ही प्रार्थना.🙏 

         शिवाय मानवी स्वभावाचे कंगोरे देखील किती विचित्र आहेत. एखाद्याने अनेक सुंदर कामे केली असतील तर त्याचे आम्ही कौतुक करत नाही पण तो थोडा  जरी चुकला की आम्ही टिका करायला लगेच सरसावतो संधीची वाटच पहात असतो . एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या कार्याचे किंवा प्रचंड अशा परंपरासमृद्ध पुरोगामी शहराचे एक दोन शब्दांनी काय इमारतीचे अभेद्य बुरुज ढासळणार आहेत की अस्मिता , संस्कृती लगेच लोप पावणार आहे ? आपण आपला पाहण्याचा दृष्टीकोन विशाल ठेवला पाहीजे . विशेषतः कलाक्षेत्रातील व्यक्तींनी तर सतत सजग राहीले पाहीजे .

         शब्दांनी जखम करणे सोपे असते पण त्याचे घाव भरून यायला खूप काळ जावा लागतो . कधी कधी अशा जखमा भरून येतात पण त्यांचे घाव मात्र मनावर कायमचे आघात करतात व त्याचे व्रण कायमस्वरूपी लक्षात राहतात .  

            परमेश्वराने या पृथ्वीवर फुलांची केवढी सुंदर विविधता निर्माण केली आहे. एक फूल दुसऱ्यासारखे नाही. प्रत्येक फुलाचा आकार , रंग , रुप व सुवासही वेगवेगळा . आणि असे सर्व भिन्न असूनही कोणतीही फुले एकमेकांशी भांडल्याचे ऐकीवात नाही . अशी सर्व वेगवेगळी फुले फुलल्यामूळेच बाग रंगीबेरंगी व छान , सुंदर , प्रसन्न दिसते ना ? 

       कलावतांचेही तसेच असावे असे मनापासून वाटते. प्रत्येक चित्रकार वेगळा , त्याची शैली , प्रभाव ,त्याचे माध्यम , त्याचे प्रेरणास्थान व चित्रनिर्मितीची जडणघडण , चित्रशैली व व्यक्त करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. त्यामूळेच तर चित्रांच्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून नवनव्या कलापद्धती उदयास आल्या त्या सगळ्या स्टाईल्सचा , इझम्सचा कलाप्रकारांचा आदर करून कलारसस्वाद व आनंद घ्यायला शिकले पाहीजे . किबंहुना तशीच प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. अशा सगळ्या पध्दतींचा स्विकार व आस्वाद घेण्याची वृत्ती वाढीस लागली पाहीजे . आपण ज्यावेळी सगळ्या कलाप्रकारांचा व कलाकारांचा आदर करू  तशी आपली चित्रवृत्तीही खऱ्या अर्थाने समृद्ध व विकसित होत जाईल. जसे बागेतील फुल स्वतःचे वेगळे रूप धारण करून फुलते व सर्वानांच आनंदीत करते तसेच चित्रकारांचे आहे. 

प्रत्येकाचे चित्र वेगळे असणारच आहे. किंवा वेगळे असावेच अशी विध्यात्याचीच रचना असावी . 

         अशा सर्व वेगवेगळ्या वृत्तींच्या कलावतांची गप्पांच्या माध्यमातून ओळख करून देणाऱ्या सतीश नाईक यांचा व त्यांच्या भरपूर मेहनत घेणाऱ्या चिन्हच्या सर्व टिमचे मनापासून आभार !

        आज राजाराम होले यांचा " गच्चीवरील गप्पा " या कार्यक्रमाचा आजचा तीसावा एपिसोड होता .यापुढेही असेच अनेक किएटिव्ह कलावंतांना घेऊन तीनशेचा टप्पा त्यांनी सहज पार पाडावा अशी सदिच्छा सर्वांतर्फे व्यक्त करतो . आणि सर्वांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देतो!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


सुनील काळे 

9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...