दामू
दामुअण्णा चे खरे नाव अरुण मारुती काळे, पण त्याला दामू का म्हणायचे याचा मला कधीच उलगडा झाला नाही. तो आमचा चुलत भाऊ होता .त्याचे वडील मारुतराव पूर्वी महाबळेश्वर मध्ये राहात असत. हे उत्तम कारागीर तर होतेच पण त्याहीपेक्षा सर्वात उत्तम देवाची हरिभजने म्हणणारे होते, त्यांच्या भजनात हृदयाला हात घालण्याची ताकद होती. पांडूरंगाला , विठ्ठलाला ते इतकी भावपूर्ण साद गाण्यातून मारायचे की ऐकणारा भारावून जायचा त्यात तो स्वताःला विसरून जायचा. खूप सुरेख आवाजात काही स्वनिर्मित तर काही जुन्या गाण्यांच्या तालावर ते मराठी भजने स्वतः करत. मग श्रावणात असो वा कोणाच्या अंतिम विधीला, यांच्या भजनाचा कार्यक्रम हमखास असे. अंत्यविधीच्या अगोदर कोणताही पाषाणहृदयी माणूस असला तरी त्यांचे भजन ऐकले की त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आपोआप सुरू व्हायच्या. त्यामुळे अंत्यविधीचा कार्यक्रम प्रभावी व्हावा आणि दुःखाची निर्मिती व्हावी म्हणून मारुतरावांना भजनासाठी हमखास मागणी असे. त्यांची ,लहान असताना ऐकलेली काही भजनं आजही माझ्या मनात रुंजी घालून आहेत, आठवणीत आहेत .
मारुतरावांना एकूण चार मुले ,त्यातील अरुण हा पहिला मुलगा. पहिला मुलगा पाहून ते आनंदले असतील, पण मुलाच्या जन्मानंतर थोड्याच वेळात त्यांचा आनंद मावळला असेल. कारण अरुण जन्मताच डोक्यावर पडल्यासारखा होता. पुढे दिसायला अतिशय साधारण, बोबडे बोलणारा, असंबद्ध बोलणारा त्याला कोणतीही भाषा नीट समजत नव्हती, केस वाढलेले, गालफड फार दबलेली, दात पुढे आलेले, वर्णही काळसर चालताना तिरका ,आडवातिडवा झोकांड्या देत जाणारा, आपण काय करतो, काय बोलतो, कसं खातो हे त्याला कळतही नव्हतं, आणि वळतही नव्हतं .खाताना सगळी लाळ तोंडातून टपकत असे, पदार्थ तोंडातून बाहेर पडत. झोकांड्या देत जाणारा, मेंदूचा कंट्रोलच नव्हता जणु त्याच्यावर, मेंदूच्या सगळ्या वायरी जणू उलट्या सुलटया चुकल्या सारख्याच जोडलेल्या होत्या. मारुतरावांनी त्याला शाळेत पाठवला. पण दोनचार दिवसातच त्याच्या मास्तरांनी त्याला घरी पाठवला. कारण त्याला शाळेतले काहीच कळत नव्हते . इतकी सुरेल भजने म्हणणारे, देवाची आराधना करणारे मारुतराव त्यामुळे पार बिघडले आणि बिथरले. खूप मारलं, ओरडलं, झोडपलं, गदगदून हलवलं तरी अरुण सुधारलाच नाही. त्यामुळे मारुतराव खूप निराश होऊन खूपच दारूच्या व्यसनाधीन झाले. मग त्यांच्या भजनात दुःखाची अर्तता आता आणखीनच वाढली. खूप करुणापूर्वक अंतःकरणातून त्यांची भजने यावयाची व गावकऱ्यांच्या हृदयाला भिडायची. त्यांचा एक ग्रुपच त्यांनी बनवला होता. व ते भजनी मंडळ खूप प्रसिद्ध ही झाले होते .पण देवाची भजनं म्हणूनही देवाने जो हात आखडता घेतला हे पाहुन ते हळूहळू दारूच्या व्यसनाधीन झाले व पुढे मारुतराव एक दिवस संपले ,मग अरुणचा दामू झाला, पुढे तोपर्यंत अरुणची आई, त्याचा सर्वात धाकटा भाऊ सुभाष, नंतर सुरेश, हेही दारूतच संपले. आणि त्यांची आर्थिक ,स्थितीही ढासळली .
एकदा महाबळेश्वरला मार्केटमध्ये मी मित्रांसोबत फिरत होतो ,त्याने मला लांबूनच बरोबर ओळखले . तो लगबगीने माझ्या मित्रांजवळ सर्वांसमोर आला. अतिशय गचाळ कपडे, कित्येक दिवस न धुतलेले, पायात चप्पल नाही, झोकांड्या जात होत्या म्हणून हातात काठी घेतलेली. त्याच्या तोंडातली लाळ टपकतच होती .हे पाहून व त्याची असंबध बडबड चालू असलेली पाहून मला खूप लाज वाटली, दया देखील आली, पण मित्रांसमोर मी त्याला ओळख दाखवली नाही. तो माझ्या मागोमाग यायला लागला, वेडसर मनोरुग्णासारखा तो वागत होता. त्याला सर्व माणसं मात्र बरोबर समजायची, त्यांना नावानिशी ओळखण्याची स्मरणशक्ती कशी होती हे मात्र आजही मला समजत नाही.
एकदा तर त्याने रस्त्यावरच बूट पॉलिशचेच दुकान मांडले. ओळखीच्या माणसाच्या पायात बूट दिसताच तो त्यांच्या मागोमाग धावायचा व त्या माणसाचीच धावपळ करायचा. एकदा बूट पॉलिश साठी तो माझ्या पाठोपाठ धावायला लागला मी पळालोच. व मग मात्र त्याला मी पूर्णपणे टाळू लागलो . मला त्याची घृणा वाटू लागली होती .
दामू पुढे आमच्या मूळगावी पांडेवाडी येथे भावासोबत राहू ,लागला. आईबाप नसल्याने व पुढे भाऊही गेल्यामूळे त्याच्या दुर्दशेत आणखीनच भर पडली. त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्याची भावजय पुतण्या व त्याचे कुटूंबीय त्याला गावी सांभाळायचे .तो सगळीकडे भटकत रहायचा, हळूहळू त्याचे वय पन्नास पंचावन्नच्या पुढे गेले असावे. गावात फिरताना कोणी त्याला भाकर तुकडा द्यायचा. त्याची वहिनी पुतण्या व इतर जण शक्य तितके त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याचे सर्व करायचे तरीही येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तो अधाशीपणे खायला मागायचाच, तर कधी पैसे मागायचा. तो प्रचंड असमाधानी .. असल्याने , व त्याच्या विचित्र गबाळ्या अवतारामूळे मी मात्र त्याला पूर्णपणे टाळायचो, बोलायचो नाही, आणि ओळखही दाखवायचो नाही.
परमेश्वर किंवा आकाशातील बापाचा मला कधीकधी खूप म्हणजे खूपच राग येतो. त्याने एखाद्याला जन्म देताना इतकी नाराजी का दाखवावी ? चेहरा, रूप, शिक्षण, कला, उदरनिर्वाहाचे साधन नाही, पण निदान सामान्य माणसासारखे जगणेही एखाद्याला देऊ नये म्हणजे काय?शिवाय मारूतराव इतकी सुमधूर भजनं म्हणत असताना अशी उपेक्षा का करावी या विश्व निर्मात्याने , आपणाला बनविलेल्या या अजब कलाकृतीला स्वतः दामूही कंटाळला असावा . आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी बोलत नाही, जवळ करत नाही हे त्याला कळत असावे. मग तो गावच्या देवळाशेजारी पायरीवर काठी टेकून बडबड करीत बसायचा व ओळखीच्या नजरेने, विदीर्ण चेहऱ्याने, विषण्ण मनाने, खोल नजरेने ,एक टक कोणाची तरी वाट पहात पडून रहायचा. सर्वांकडे अपेक्षेने आणि अन्नाच्या आशेने पहायचा. खायला मिळाले नाही तरी त्याहीपेक्षा कोणी ओळखीचा माणूस आला की त्याला प्रचंड उर्जा यायची त्याचे डोळे चमकायचे,उत्स्फूर्ततेने उठून धडपडत उभा रहायचा, त्याच्या मागे मागे धावायचा, बोलायचा प्रयत्न करत राहायचा, लहान मुलांना जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या अवताराकडे पाहून कोणी सुधारलेली मंडळी त्याच्याजवळ मैत्री करण्याचा प्रयत्नही करायची नाही.लांबूनच लोक त्याच्याशी बोलायचे, गावातले ,आळीतील लोकं उरलंसुरलं अन्न, कधी थोडे पैसे द्यायचे, पण तो सगळ्यांना नकोसा झाल्यासारखाच होता. तो प्रेमाचा भुकेला असावा आणि असं प्रेमाने आपल्याला कोणी जवळ करत नाही, कोणी स्वीकारत नाही, परिस्थितीमुळे गबाळेपणामुळे, आपल्याला सर्व जण टाळतात, हे त्याला पूर्णपणे जाणवलं असावं. आपल्याला प्रेमाने जसं आहोत तसं कोणी स्वीकारत नाही हे पाहून तो खूप निराश झाला असावा. आणि आपण कोणालाच नको आहे हेही त्याला कळले होते.
अशी परकेपणाची, एकाकीपणाची भावना माणसाला पार पोखरून टाकते .मनाला आणि शरीराला उदासीपणे विच्छिन्न करते, अंतःकरणाला .एक प्रकारचा संताप आणते, असं वाटतं जिवंतपणीच आपण आपल्या हृदयाचे तुकडे स्वतःच्या हाताने कापावेत आणि भिरकावून द्यावेत सगळ्यांसमोर, की आपण इतके दुष्ट आणि दुर्लक्षित करण्यासारखे नाही. एकटेपण फार वाईट असतं, आजारपण ,संकटे आणि वाईट परिस्थिती आली की आपली असणारी माणसं सोडून देतात वाऱ्यावर, ओळख दाखवत नाहीत. आपल्या जवळच्या माणसाकडे दुर्लक्ष करतात, जणू त्यांचा व आपला कधीच संबंध नाही व नव्हता असं वागू लागतात . तिथं मोठेपणा, स्टेटस, उच्चभ्रूपणा व स्वार्थ महत्त्वाचा असतो. जिव्हाळा ,माणुसकी , आपुलकी व स्नेहभाव संपलेला असतो . त्यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला कटाप केलेले असते . आणि ही नावापुरती सुकी नाती व आपुलकीच्या उणीवा पाहून, एकाकीपणाची ही भावना आयुष्य हळूहळू पूर्णपणे वाळवी सारखी पोखरूण टाकते . दाट काळ्या ढगांची चादर घेऊनच मग प्रवास करावा लागतो . आणि ज्याचा त्याचा हा प्रवास एकाकी एकट्यानेच संपवावा लागतो . फार वाट लागत असते हा प्रवास करताना . तिथं नाईलाजानेच सर्व स्विकारत रहावं लागतं.
दामूने अखेर येथून जाण्याचा अंतिम निर्णय घेतला असावा. हा कंटाळवाणा प्रवास थांबविण्याचा निर्णयच त्याने केला असावा त्याने कोणाशीही बोलणे टाळले. आणि अन्न पाण्याचा त्याग केला व तो 17 जानेवारीला शांतपणे कायमचा निघून गेला. आकाशातल्या बापाकडे जाब विचारायला, की का मला धाडले अशी अवस्था करून? काय मिळवलसं तू तुझ्या कृतीतून? का अशा अवस्थेत साठ वर्ष मला जगायला भाग पाडलंस ? पण तिथंही त्याचे कोणी ऐकले की नाही हे मला माहीत नाही. बहुधा ऐकलं नसावंच .
सतरा जानेवारीला सकाळी बारा वाजता पुतण्या योगेशचा. मला दामू गेल्याचा फोन आला. एक वाजता मी पांडेवाडीत पोचलो. दामूला मी अखेरचे पाहण्याची हिंमतच करू शकलो नाही. वाटलं दामू उठेल व माझ्याकडे दहा रुपये मागेल, आणि माझ्या मागोमाग ओळख दाखवत पाठीमागे येईल ,ओरडत मागे मागे येईल पण मी मात्र माझ्या स्टेटस मुळे त्याला टाळून पुढे जाईल. पण आता तो शांत झाला होता,कोणाकडून प्रेमाची कसलीच अपेक्षा नसल्याने तो खिन्नपणे ,निपचित पडून होता. निर्विकार चेहऱ्याने अखेरच्या प्रवासासाठी सज्ज झाला होता .
गावातील थोडीफार लोकं जमली होती. पण त्याच्यासाठी कोणी फार मोठा हंबरडा फोडला नाही. सर्वांना तो सुटला व बरे झाले अशीच भावना मनात येत होती. त्याच्या अंत्यविधीचा प्रवास अवघड दिसत होता. सगळे टाळत होते कोणीच पुढे येत नव्हते.मग मात्र मला राहवले नाही. शंकर, दत्ताभाऊ व नारायण या तीन आळीतील गावकऱ्यांना सोबत गाडीमध्ये घेतले व मी वाईला निघालो . नऊ मण लाकडे घेतली, कुंभारवाड्यात जाऊन मडकी घेतली.हार, फुले,कापड, कापूर, गुलाल इ. अंत्यविधीचे सर्वच्या सर्व सामान स्वखर्चाने घेतले. हे सर्व सामान कोठे मिळते ते मला कळाले .एक मण म्हणजे चाळीस किलो, आणि जाताना माणूस एकही झाड लावत नाही पण जाताना तीनशे साठ किलो लाकडे घेऊन जातो, या नव्या ज्ञानात भर पडली. हे सर्व सामान घेऊन परत पांडेवाडीला आलो.
तोपर्यंत थोडी आणखी नातेवाईक मंडळी , आली होती. पन्नास साठ वर्ष आयुष्यभर ज्याचा प्रवास खडतर झाला, उपेक्षेने,तिरस्काराने, घृणतेने भरुन, झिडकारूनच झाला , त्याचा अंतिम प्रवास तरी सुखाने व्हावा व त्यास हातभार लागावा हा माझा प्रयत्न मी माझ्या कृतीतून समाधानाने पूर्ण केला होता .
कारण मला खात्री आहे की मी ज्यावेळी वर जाईल तेथे कदाचित दामू भेटेलच व माझ्या मागोमाग धावेल, ओळख विचारेल,पण आता म्हणेल, बरं झालं निदान माझा शेवटचा प्रवास तू जरा सुखकर केलास. त्याचे डोळे कृतार्थपणे माझ्याकडे पाहतील , व तो डोळ्यातूनच सांगेल मला आयुष्यभर काही दिलं नाहीस,पण प्रवासाचा शेवट तरी गोड केलास, अखेर ओळख दाखवलीस भावा, खरंच ओळख दाखवलीस भावा.........
मी दामूच्या अंतिम प्रवासासाठी अंत्ययात्रेच्या पाठीमागून निघालो गाडीतूनच निघालो .तोपर्यंत पावणेसहा वाजले होते, सहा वाजता आमचा एक पुर्वनियोजित कार्यक्रम लोकमान्य वाचनालय, वाई येथे होता. दामूच्या अंत्यविधीचा आयुष्य कसे जगावे ,या कार्यक्रमानंतर चित्र कसे पहावे ,या माझ्या आवडीच्या कार्यक्रमात मी परत चित्रांच्या दुनियेत रममाण झालो.
दामूच्या आयुष्य यात्रेवरील घटनांचा आढावा घेतल्यावर मला आता माझ्याच वाट्याला हे अवघड त्रासदायक जीवन कसं आलं ? असले फालतू प्रश्न पडत नाहीत .आता मला शांत झोप लागते .( पूर्वीही शांत झोप लागायचीच पण आता जरा जास्त जाणीवपूर्वक शांतपणाची जाणीव होते )
आता मला नवनवीन माझ्या विषयी प्रश्न पडत नाहीत,आणि हो ,मला खूप खूप श्रीमंत ,जहागीरदार , मोठा उद्योगपती किंवा अंबानीपेक्षा ही मोठे, भारी आहोत असंच वाटायला लागले आहे . कारण त्याला बिचाऱ्याला सत्तावीस मजले असलेले घर सांभाळावे लागते . शिवाय एवढा मोठा उद्योग .मी मात्र निवांत झोपू शकतो . माणूस कितीही मोठा असला तरी लाकडं मात्र नऊ मण. म्हणजे चाळीस गुणीले नऊ बरोबर तीनशे साठ किलो . गणित किती सोप्पं आहे आणि ते सगळ्यानां सारखंच लागू आहे याचा शोध मला लागला होता
आपण किती नाराज असतो स्वतःवरच , मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही. ट्रॅफीकचा त्रास, आवाजांचा त्रास , वन रुम किचन असेल तर टू रुम नाही म्हणून त्रास, दुचाकी असेल तर चार चाकी नाही म्हणून त्रास , चार चाकी असेल तर मोठ्ठी नवीन मॉडेल पाहीजे, बंगला असेल तर फार्म हाऊस कधी मिळणार याचा शोध, शेजाऱ्यांचा त्रास, इतकेच काय ट्रॅफीक मध्ये एखादयाने ओव्हरटेक केले तरी त्रास. त्याला मिळाले मग मला का नाही याचाही त्रास . आपण प्रसिध्द नाही, नावारूपाला आलो नाही म्हणून त्रास, सगळीकडे त्रासच त्रास, ईर्षा ,आपण पूर्ण शरीराने ठाकठीक आहोत याकडे आपले कधी लक्षच नसते. इतकंच काय मुलगी असेल तर मुलगा नाही म्हणूनही त्रास करून घेणारी माणसं मी पाहिली आहेत . सतत अस्वस्थ, ही अस्वस्थता कधीही न संपणारी आपण कधी खाली पहातच नाही . आमची नजर सतत वर पाहणारी हव्यासापोठी काहीही करण्याची तयारी असणारी . आम्हाला आमचं ते हवेच पण दुसऱ्याचे जे आहे ते देखील हवे असते . मग कोणत्याही गैरमार्गाने ते मिळवायचं व खूप मोठे काम केले असा आव आणायचा . दुसऱ्याचे कष्टाचे पैसे लुटायचे व आपण समाजसेवा करतो असे दाखवायचे . या सत्य गोष्टीनां कधीही अंत नसतो . या कालचक्राला अंतच नसतो .आपण जसे आहोत तसं स्विकारण्याची आपली कधी तयारीच नसते . पण आपल्यात बदल करणे शक्य असतं . सुधारणा करणं शक्य असतं .
आज असाच एक “दामू” मिशन हॉस्पीटल वाईच्या रस्त्यावर दिसला. फार विस्कटलेला दिसत होता बिचारा, निवांत उभा होता. मग दहा रुपयांचा पारले बिस्किटाचा एक पुडा घेतला व त्याला दिला. तो माझ्याकडे निर्विकार व अनोळखी चेहऱ्याने पाहून शांतपणे बिस्किट खाऊ लागला. थोडी किंचिंतसी चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसली. मलाही जरा बरे वाटले .
आता शक्य होईल तिथे, शक्य होईल तेव्हा , प्रत्येक भेटणाऱ्या दामू साठी एवढं तरी करायचं असं ठरवलं आहे. मग बघा आपण असं दुसऱ्यासाठी एवढंसं काही केलं तरी लई , म्हणजे लईच भारी वाटतं बघा . कधी प्रयत्न तर करून बघा ...................
मला मग राजेश खन्नाचा बावर्ची चित्रपट आठवतो त्यातला रघु म्हणतो . अपना काम तो सब लोग करते है | मगर दुसरोकां काम करने मे कुछ औरही मजा है | आपल्या शक्तीनुसार, अगदी थोडासा हिस्सा , अगदी अल्पशी मदत, जमेल तशी, खिशाला मोठी चाट न लावता अशा दामूंसाठी करुया . म्हणजे मग नऊ मण लाकडं आणताना त्रास होणार नाही ...................
गणित तर अगदी सोप्प आहे . सर्वानां सारखेच . नऊ गुणिले चाळीस = तीनशेसाठ किलो लाकडं . आपल्याला देखील तितकीच लागणार .
सुनिल काळे 9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा