सोमवार, २० मे, २०२४

होरमूसजी मामा

  










होरमूसजी मामा 

               पाचगणीला  मराठी मुलींची व छोट्या मुलांची शाळा ज्याठिकाणी होती त्या पोस्टाशेजारच्या शाळेच्या जागेवर आत्ताचे शॉपिंग सेंटर आहे . या शाळेच्या बाजूला लगेचच लागून अतिशय जुन्या पद्धतीची नीटनेटकी सुंदर बगीचा असलेली इमारत आहे , पण त्या इमारतीच्या बाहेर पारशी शिवाय आत प्रवेश करू नये असा बोर्ड लावलेला असायचा . त्यामुळे मी कधीही त्या इमारतीच्या परिसरामध्ये गेलोच नाही .

          ती इमारत पारसी अग्यारी या नावाने ओळखले जाते हे मला माहीत होते .परंतु बाहेरचा बोर्ड पाहिल्यामुळे आतमध्ये जाण्याची कधी हिंमतच झाली नाही .वयाची अगदी तीशी उलटली तरी मी आत कधीच गेलो नव्हतो .                                                  ब्रिटीशकाळातील बंगल्याप्रमाणे उतरत्या पत्र्याचे छत , मध्यभागी त्रिकोणी कमान , त्या कमानीच्या खाली काचांवर सुंदर स्टेनग्लास केलेले पारशी फरोहाचे नक्षीकाम ,दोन्ही बाजूला ब्राऊन कलरचे उभे पट्टे असलेल्या भिंती , भरपूर काचा असलेल्या सागवानी खिडक्या, प्रवेशाद्वाराच्या शेजारी दोन्ही बाजूला गोलाकार रोमन टाईपचे पांढरेशुभ्र स्तंभ, पायऱ्यांशेजारी व्यवस्थित ठेवलेल्या कुंड्या , त्यातील छान फुललेली फुले , आणि सदाबहार बोगनवेलींच्या कमानी , पांढऱ्या शुभ्र पिलर्सला व लोखंडी ग्रील्सला  दरवर्षी स्वच्छ रंगकाम केलेले असते यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांचे  पारसी अग्यारी माणसांचे हमखास लक्ष वेधून घेते .

           पुढे चित्रकार झाल्यानंतर मला पाचगणी येथील जुनी पारशी बंगले , ब्रिटिशकालीन शाळा , डोंगर-दऱ्या रंगवायचा नादच लागला .  पारसी अग्यारीची इमारत चित्र काढण्यासाठी छान वाटायची परंतु तिथे जाण्याची मला संधी मिळत नव्हती व प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती  . 

           पाचगणीला आर्ट गॅलरी काढल्यानंतर एकदा जिमी पंथकी या सधन पारशी माणसाची ओळख झाली . कलाप्रेमी व श्रीमंत असलेल्या या गृहस्थाने माझी काही जलरंगातील चित्रे विकत घेतली आणि घरी बोलावून घेतले . कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट ड्रॉइंग करण्यासाठी मला चित्रांची मोठी ऑर्डर दिली . त्यामध्ये पंचगणी क्लब , पारशी पॉइंट ,सिडने पॉइंट , टेबललॅन्ड , डलविच हाऊस या त्यांच्या पारशी बंगल्याचे व परिसरातील गार्डनचे आणि इतर काही प्रसिद्ध ठिकाणांची चित्र काढण्याची ऑर्डर दिली .त्यामध्ये खास पारसी अग्यारीचे चित्र काढायचे ठरले होते . आणि त्या चित्र काढण्याच्या उद्देशाने मी एके दिवशी सर्व तयारीनिशी प्रथमच पारसी अग्यारीमध्ये प्रवेश केला

          एक ब्लॅक अँड व्हाईट , एक कलर पेन्सील्स व एक वॉटरकलरमध्ये चित्र काढायचे असे ठरवून मी पारसी अग्यारीमध्ये सकाळी लवकरच पोहचलो . प्रवेश करताच गेटजवळच चार्ली चॅप्लीन प्रमाणे तुरूतुरू धावतच एक छोटीशी बुटकी वयस्कर व्यक्ती  माझ्याकडे आली .पांढरीशुभ्र पगडी , पांढरा सदरा व पांढराच पायजमा घातलेला होता.पायात काळे मोजे व सँडल घातलेली ही व्यक्ती मला फार मजेशीर व विनोदी वाटली . आतमध्ये येताच दोन्ही हाताची पाठीमागे घडी ठेऊन त्याने मला पहिला प्रश्न विचारला .

तू काय को अंदर आया ? 

तुम पारशी है क्या ? 

ऐसा किदर भी घुसने का नही बाबा , चल चल पहले बहार निकल . 

यह जगा पारशी लोगोंके लिये है .

तुम्हारा सू काम छे ईधर ? 

एकापाठोपाठ एक असे प्रश्न विचारल्यामुळे मी भांबावूनच गेलो . मी काही बोलायच्या अगोदरच त्यांचे इतके प्रश्न असायचे की मी क्षणभर स्तंभितच झालो . मग मी गप्प झालेले पाहून थोड्या वेळाने तोही बोलायचा थांबला मग मी शांतपणे त्याला डलविच हाऊसचे मालक जिमी पंथकी यांनी मला अग्यारीचे चित्र काढायला पाठवलेले आहे असे सांगितले .

मग तो खुष झाला .

ऐसा पयला बोलने का ना ? 

साल्ला खाली पिल्ली समय बरबाद किया .त्यावेळी त्याने मला सांगितले की त्याचा भाचा बुर्जीन हा येथील मुख्य पुजारी आहे .त्याची तुम्हाला प्रथम परमिशन घ्यायला पाहिजे .मग मी त्याला बुरजीनला बोलवायला पाठवले . मग हा वयस्कर माणूस तुरुतुरु तुरुतुरु पळत उजव्या बाजूस एका छोट्या बंगल्याकडे धावत निघाला . त्या बंगल्याच्या गेटमधून एक उमदा तरुण तशीच पांढरी कपडे व पगडी घातलेला होता तो विशीतला युवक माझ्याकडे आला . मग मी त्याला जिमी पंथकी यांनी चित्र काढायला सांगितले आहे हे सांगितल्यानंतर त्याने मला परवानगी दिली व सोबतच्या व्यक्तीला समजावून पूर्ण मदत करायला सांगितले . त्या व्यक्तीचे नाव होते 

"होरमूसजी " . 

           माझे चित्रकलेचे सामान घेऊन मी आतमध्ये प्रवेश केला . सामान एका ठिकाणी ठेवले व कोणत्या बाजूने चित्र चांगले दिसेल हे पाहण्यासाठी मी प्रथमच इमारतीच्या दोन्ही बाजूला चालत निघालो . त्याच वेळी मी पाहिले की माझ्या पाठीमागेच होरमूसजी मामा देखील पाठीवर हात ठेवून पाठलाग करत माझे निरीक्षण करत आहेत . मी जिकडे जायचो तिकडे पाठीमागे होरमसजी मामा आहेतच . शेवटी एक चांगला चित्र काढण्याचा अँगल निवडून मी माझी छोटी खुर्ची काढून बसलो आणि चित्रकलेचे सामान बाहेर काढायला सुरुवात केली . चित्रकलेचे सामान काढत असताना होरमूसजी मामा लहान मुलाच्या उत्सुकतेने डोळे फाडून एखादा जादूचा खेळ पाहायला आल्यासारखे शेजारी उभे राहून अगदी काटेकोर निरीक्षणच करायला लागले .

हळूहळू मीही थोडासा रिलॅक्स होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो .

तम्हारा नाम सू छे?

तुम रहता किधर है ? 

तुम्हारा गाव कोनसा है ? 

तुम पेंटिंग कभी से करता है ? 

तुम को कितना पैसा मिलनेवाला है ?

तुम यह पेंटिंग आज  पुरा करेगा क्या? एकापाठोपाठ एक प्रश्न विचारताना मामा थकतच नव्हते . त्यांचे प्रश्न ऐकून आज माझे चित्र पूर्ण होईल की नाही याची मला काळजी लागली .मग मी त्यानां एक प्रश्न विचारला तुम्हारा नाम क्या है ? त्यावेळी त्याने मला सांगितले  

" होरमूसजी ". 

होरमूसजीअंकल मला चित्रासाठी पाणी कुठे मिळेल ? असे मी त्यानां विचारले . मी होरमूसजीला अंकल म्हटल्यानंतर तो माझ्यावर बिघडलाच . मी काय तुझा अंकल नाय मी बुर्जीनचा मामा हाय . त्यामुळे तुही मला होरमूसजी मामा असे बोलायचे असे सांगत त्याने मला तंबीच दिली .  पाण्याचा मग घेऊन तुरूतुरू धावत माझा हा नवा होरमूसजी मामा गार्डनच्या नळाजवळ गेला व त्यांनी माझ्यासाठी पाणी आणले . चित्राच्या स्केचिंगचे काम माझ्या कडून सुरू झाले होते आणि त्याच वेळी होरमूसजी मामांचे माझे चित्र बारकाईने पाहण्याचे कडक निरिक्षणकाम सुरू झाले .

          चित्र काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे चित्र काढण्याचे सुचना देत देत मार्गदर्शन करण्याचे काम नव्याने पुन्हा सुरू झाले .

समदा बराबर पिक्चर काढ.

जराभी गलती करू नको .

मी तसा तुला सोडणार नाय . 

मी लय स्ट्रीक्ट माणस आहे . असे सांगत प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे आली पाहिजे , रेषा सरळ आली पाहिजे , इतकेच काय पण वेगवेगळ्या  झाडाची सगळी पाने , ख्रिसमस ट्री , सिल्व्हरची झाडे चित्रात नीट आली पाहिजेत ,सगळी फुले , सर्व पायऱ्या सर्व खिडक्या चित्रांमध्ये बरोबरच आली पाहिजेत असे त्यांनी मला दम देत बजावले .

          हे सगळे ऐकल्यानंतर आज माझं काही खरं नाही , चित्र पूर्ण होईल की नाही याची मला आणखीनच काळजी लागून राहिली . कलर पेन्सिलने चित्र काढत असताना पहारा देणारे  होरमूसजी मामा अचानकपणे माझ्याकडे तुरूतुरू धावत आले आणि उजव्या बाजूची एक छोटी खिडकी व त्यांचा पारशी सिम्बॉल 

' फरोहा ' मी  नीट काढलेला नाही . मी काम बरोबर करत नाही अशी त्यांनी माझ्याकडे प्रेमाने तक्रार नोंदवली .

         हे सगळं चालू असताना दुपार झाली . आणि लंचसाठी होरमुसजी मामा बंगल्यात गेले आणि मग ही संधी साधून वेगाने मी स्केचिंग व जलरंगात चित्र रंगवायला सुरुवात केली . इतक्यात तुरुतुरु धावत होरमूसजी मामा आलाच व पाठीमागून आवाज आला.

अरे बापरे ! 

समदा सत्यानास झाला . 

तु लई फास्ट काम करते . 

साला पाणी किती गंदा वापरते . 

ये भगवानचा टेम्पल हाय . रंगाचा खराब पाणी वापर नको . साला एकदम घाटी माणस छे .

जरा पिक्चर नीट काढनी . 

सारखा सारखा लई पुढे धावते कशाला ? आणि तुझी खुर्ची किती छोटा हाय . तुझा वजन जादा हाय , एकदम अनकम्फरटेबल बॉडी हाय तुझा . 

असा घाई करेल तो पिक्चर चांगला कसा येल?

        मग होरमूसजी मामाने स्वतः धावत जाऊन आणखी दोन  स्वच्छ पाण्याचे मग भरून आणले. एक छोटा पांढरा मजबुत स्टुल बसायला दिला . इतक्यात त्यांच्या लक्षात आले दुपारचे ऊन खूप तापलेय . मग घरात जाऊन गार्डनच्या छत्रीचा स्टॅन्ड आणला .ती मोठी छत्री त्या स्टॅन्डवर ठेवली . छत्री उघडल्यानंतर खरोखर थंडगार वाटले . मी दुपारी जेवायला उठलो नाही हे त्यांच्या लक्षात आले . आणि मग परत तुरुतुरू चार्ली चॅप्लीनच्या स्टाईलने घरी गेले . एक क्रिमरोल व केकचा मोठा तुकडा , थोड़ी बिस्कीटे आणली . मला जबरदस्तीने काम थांबवून खायला घातले . आणि मग मोठ्याने म्हणाले . . . . .

साला काय खाते नाय , 

पोटात खड्डा पडला  तर पेंटीगचा काम भारी कसा व्होईल ? आता बघ तुजा समदा काम कसा बराबर होईल बघ . पेंटींग करायचा म्हंजे भेजाचा काम हाय . भेजा चालला तरच पिक्चरमंधी जान येईल ना ?

           संध्याकाळी पाचसहा वाजेपर्यंत होरमूसजी मामांची बडबड ऐकत ऐकत व माझी कर्मकहानी सांगत सांगत एकदाचे माझे स्केचिंग व पेंटींगचे काम संपले . मी माझे पुर्ण झालेले पेंटींग बाजुला ठेवले व बॅगेतील कॅमेरा घेऊन काही फोटो काढावयास सुरुवात केली . इतक्यात होरमूसजी मामाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली .

        ये पेंटर , तु कॅमेराचा रोल कौनसा वापरते ? 

तु कोडॅकचा रोल वापरनी . 

त्याचा रिझल्ट लई शंभर टक्का भारी असते . हंड्रेड पर्सेंट क्लिअर कापी येते . खरे तर माझा हा कॅमेरा डिजिटल होता. त्यात रोलची आवश्यकता नव्हती पण मामांची समजूत काढायला मी हो हो कोडॅकचाच वापरतो असे उगाचच म्हणालो .

         आयुष्यात प्रथमच इतकी सतत पारशी कॉमेंट्री ऐकत ऐकत माझे चित्र काढून झाले होते व मी कोडॅक कंपनीचा रोल वापरतो हे ऐकून होरमूसजी मामाजी खूप समाधानाने त्यांच्या पारशी फायर टेम्पलमध्ये गेले व आत जाऊन तेथील फायर टेम्पलचे भस्म त्यांनी माझ्या कपाळी लावले. व विचारले "बोल आता तुला काय पाह्यजे ते समदा माग ". मी त्यानां सांगितले मी नास्तिक आहे व अशा चमत्कारांवर , भस्मांवर माझा अजिबात विश्वास नाही . मग त्यांचे लेक्चर पुन्हा सुरु झाले मग कंटाळून तेच म्हणाले ज्या जिमी पंथकीने पारशी फायर टेम्पलचे चित्र तुला काढायला सांगितले त्याच्या शेजारीच तुझे एक दिवस स्वतःचे घर होईल . एक दिवस पारशी टाईप तुझा मोठ्ठा बंगला असेल . तू कालजी करू नको समदा बराबर व्हईल . साला तुजा मंजी काम लई कमी पण टेंशनच लई जादा असते . डोन्ट वरी .

           मी मनापासून त्यांच्या वेडेपणाला व भोळेपणाला हसलो. कारण त्या डलवीच हाऊसच्या जवळपास सर्वच उच्चभ्रू पारशी रहात होते . सुंदर परिसर असलेल्या श्रीमंत कॉलनीत घर मिळवणे हे खूप अवघड काम होते . स्वप्नात देखील मी कल्पना करू शकत नव्हतो . माझ्यासारख्या शिक्षकी पेशातील कमी बजेट असलेल्या कलाकार माणसाने महिना चार हजार रुपये पगार 

असणाऱ्याने परिस्थितीची जाणीव ठेवली होती . अशी मोठी स्वप्ने पहाणे देखील त्यावेळी वेडेपणाच ठरला असता .

         पुढे माझ्या पाचगणी आर्ट गॅलरीची वाट लागली . एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला . जीवन निराशेने ग्रासले . मी नाईलाजाने एक वर्ष बिलिमोरीया स्कूल व नंतर सेंट पीटर्स या ब्रिटीशकालीन इंग्रजी शाळेत अल्पशा कमी पगारात नोकरी करायला लागलो . शाळेच्याच क्वार्टरमध्ये रहात होतो कारण सख्ख्या चुलतभावाने आमच्या घराचा ताबा घेऊन आईवडीलांसह सर्वानां हाकलून लावले होते . कमी पगार  असल्यामूळे घराची सर्व स्वप्ने बघणे सोडून दिले होते . जीवन जगणे बेचिराख झाले होते . 

          पण नंतर नशीब आणि चित्रकलेने खूपच मोठी साथ दिली . मुंबईला ऑबेराय टॉवर्स गॅलरी , नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, जहाँगीर आर्ट गॅलरी , म्युझियम आर्ट गॅलरी याठिकाणी माझी यशस्वी चित्रप्रदर्शने झाली .असा काय चमत्कार झाला की माझी परिस्थिती पूर्णपणे पालटली . माझ्याकडे पैसे आले व  मी सेंट पीटर्सची नोकरी सोडत असतानाच  घराचा शोध घ्यायला सुरुवात केली . पहिलेच घर मिळाले ते पॅरामाऊंट सोसायटीत . जीमी पंथकीच्या डलविच हाऊस या घराजवळच . जेथे माझे  पारशी अग्यारीचे काढलेले स्केच व चित्रे लावलेली होती . ते घर कसे मिळाले त्याचीही एक अजब व मजेशीर कथा आहे पण ती कधीतरी नंतर सविस्तर लिहीन .            आता मी वाईजवळ पारशीटाईप निसर्ग बंगल्यात राहतो . अधूनमधून पाचगणीच्या घरी जात असतो .आजही ते रो हाऊस मला पाचगणीच्या पारशी अग्यारीची व होरमूसजी मामांच्या शब्दांची सतत  आठवण करून देते.

         ज्यावेळी प्रथम घर मिळाल्यावर मी लगेच खूप वेळा  पारशी अग्यारीत गेलो .पण तेथे आता सफेद  पगडी ,सफेद पायजमा ,सफेद फुलहाताचा सदरा घालून तुरुतुरु चार्ली चॅप्लीनसारखे धावणारे , चित्र काढताना अनेक प्रश्न विचारणारे , खराब पाणी लगबगीने बदलून देणारे , डोक्यावर ऊन लागेल म्हणून छत्री आणून देणारे , चित्र काढताना भेजा थंडा ठेव असे प्रेमाने सांगणारे  होरमूसजी मामा दिसले नव्हते . 

            पण त्यावेळी माझ्याकडे काहीही नसताना घराच्या रुपाने तुला डोक्यावर छत्र नक्की मिळेल असा विश्वास देणारे व तुझे एक छोटे दोन खोल्यांचे घर तुझ्या चुलतभावाने फसवून घेतले तरी तुला मोठे पारशाच्या शेजारी नक्की घर मिळेल असे आत्मविश्वासाने सांगणारे व आता दोनदोन पारशीटाईप घरे मिळाल्यावर तर होरमूसजी मामा  मनातून कसे विसरले जातील ना ?

            काही वर्षांपूर्वी एकदा  पारशी अग्यारीच्या जवळून जाताना मला होरमूसजी मामा अचानकपणे दिसले . मी खूप आनंदी झालो .लगबगीने माझी चारचाकी गाडी बाहेर पार्क करून अग्यारीच्या कंपाऊंडमध्ये घुसलो . मला बघताच त्यांनी मला हाताने ठेंगा दाखवला . मग हसत हसत म्हणाले मी तुला कसा उल्लू बनवले . साला मला उल्लू बनवते काय? कोडॅकचा रोल वापरते म्हणून खोट्टा सांगते .

 " आता तुला सांगते  माझा खरा नाव तर होरमूसजी हायेच नाय ". 

मग त्यांच्या पाठोपाठ मी धावत  विचारले मग काय नाव आहे तुमचे ? 

तर तुरुतुरु चार्ली चॅप्लीनप्रमाणे चालत धावत ते आग्यारीत आत घुसले मी देखील त्यांच्यापाठोपाठ आत घुसू लागलो तसे त्यांनी मला थांब थांब असे मोठ्याने ओरडतच थांबवले व हाताने पाटीकडे बोट दाखवले. तेथे लिहले होते.


"पारशीशिवाय आत प्रवेश करण्यास मनाई आहे. " 


त्यादिवशी मी खूप तास बाहेर तेथे थांबलो .

नंतर अनेकवेळा तेथे गेलो .

अनेकदा परत पारसी अग्यारीची चित्रे काढली .

पण होरमूसजी मामा बरीच वर्षे उलटली तरी 

परत कधी बाहेर दिसलेच नाहीत .

परत कधी बाहेर दिसलेच नाहीत .


         त्यानंतर पेंटीग करायला आऊटडोअरला भर उन्हात कार मधून जाताना आता मी मोठी छत्री व स्टॅन्ड घेऊन जातो . बसायला छोटे मजबूत खूर्ची किंवा स्टूल नेतो . पाण्यासाठी दोनतीन प्लास्टीकचे मग नेतो . खायला व्यवस्थित टिफीन घेऊन जातो . बिस्किटांचा पूडा व कॉफीचा थर्मास सोबत नेतो कारण मग होरमूसजी मामांच्या म्हणण्यानुसार "साला खाल्ला नाय तर पोटात खड्डा पडेल मग पेंटिंग भारी कसा होणार ? भेजा काम कसा करेल ? पेंटिग करायचा म्हणजे भेजा लई वापरावा लागतो ना ?

          आजही माझे डोळे भिरभिरत्या , हरवलेल्या नजरेने पाचगणीत अग्यारीच्या परिसरातमध्ये सतत शोध घेत असतात .

आजही मला प्रश्न पडतो . 

खरंच त्यांचे नाव होरमूसजी होते का ? 

नसेल , 

तर मग त्यांचे खरं नाव काय होते ? 

मग मला ते परत का दिसले नाहीत ?  

कोठे गेले असतील ते ?

परत कधी भेटतील का हो?

माझे ,

होरमूसजी मामा ??????? 


सुनील काळे

9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...