मंगळवार, १६ जुलै, २०२४

सुभाष दांडेकरांची आठवण

कॅम्लीनच्या सुभाष दांडेकरांची आठवण
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        पाऊस सुरु झाला की पाचगणी महाबळेश्वरच्या डोंगरपठारावरून दिसणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वतरांगा हळूहळू नवी रुपे धारण करू लागतात . पावसामुळे सर्वत्र गवत उगवण्यास सुरुवात होते आणि मग पावसाचा एकदा का जोरदार सपाटा सुरु झाला की धरतीमाता जणू हिरवागार शालू नेसली आहे की काय असेच वाटायला लागतो . 
            मे महिन्याच्या उकाड्यामुळे हैराण झाल्यामुळे प्रत्यक्ष स्पॉटवरचे काम थांबले असायचे मग पावसाळ्यात चित्र काढायला मला जोर यायचा . चित्र काढण्यासाठी त्यावेळी मारुती व्हॅन गाडी मुद्दाम घेतली होती . आठ सीटर गाडीच्या पाठीमागच्या समोरासमोर बसायच्या दोन सीटस काढल्या की ऐसपेस जागा मिळायची व पाठीमागचा दरवाजा ओपन केला की समोर मोठा पत्र्याचा आडोसा तयार व्हायचा आत पाणी यायचे नाही . अशी कितीतरी चित्रे मी भर पावसाळ्यात रंगवलेली आहेत .
          सन २००२ साली माझे व स्वातीचे " निसर्गसंवाद " या शीर्षकातंर्गत जहाँगीर आर्ट गॅलरीच्या डाव्या बाजूच्या मोठ्या ऑडीटोरीयम हॉलमध्ये चित्रप्रदर्शन भरलेले होते . ऑगस्ट महिन्यात प्रदर्शन असल्यामुळे त्या काळात मुंबईतही प्रचंड पाऊस कोसळत होता . सकाळी ११ वाजता उद्‌घाटन झाल्यानंतर काही चित्रे भिंतीवर टांगायची तयारी सुरु होती . अशावेळी लाईट व्हायोलट कलरचा शर्ट व इनशर्ट केलेली कडक पँट घातलेली एक वयस्कर व्यक्ती भिजत  अचानक हॉलमध्ये आली आणि प्रदर्शन पहाता  पहाता तुम्हाला मी काही मदत करू का ? अशी विचारणा करू लागली . मी नकार दिला व ते पुन्हा शांतपणे चित्रे पाहू लागले . 
         एका चित्रासमोर मात्र ते थांबायचे व पुन्हा प्रदर्शनाला चक्कर मारून परत परत त्याच चित्रासमोर पुन्हा उभे राहायचे . काहीतरी विचार केल्यानंतर पुन्हा फेरी मारायचे . अशा सात आठ चकरा मारल्यानंतर ते म्हणाले हे चित्र पाचगणीचे आहे का ? मी होय म्हणालो . नंतर म्हणाले तेथे पारशी पॉईंट आहे आणि त्यानंतर थोडे चालल्यानंतर उतारावर एक छोटे खेडेगाव आहे , या चित्रात हेच गाव आहे का ? हो त्या गावाचे नाव तायघाट आहे मी म्हणालो आणि ग्रहस्थ एकदम खूष झाले . बरोबर हेच ते गाव आणि या गावावरून थोडे पुढे चालत गेलो की उजव्या बाजूला आणखी एका गावाचा रस्ता लागतो तेथून हे गाव फार फार सुंदर दिसते त्या गावाचे नाव तुम्हाला आठवतंय का ? 
अहो ते तर पांगारी गाव . या पांगारी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरूनच मी हे चित्र पावसाळ्यात काढलेले आहे . मग ग्रहस्थ मनापासून एकदम खूप खुषच झाले . मग मला म्हणाले काय सांगू तुम्हाला अहो ,या अशा गडद दाट धुक्यात भर पावसात तीस चाळीस वर्षांपूर्वी मी माझी बायको रजनी लग्नानंतर हनिमूनसाठी पाचगणीला आलो होतो आणि पावसात रस्ता चुकलो . या पांगारी गावच्या रस्त्याने चालत धुक्यातून एकमेकांना खेटून कधी एकमेकाचां हात धरून दोन तास आम्ही भटकत होतो . काय सुंदर वातावरण होते ते . या तुमच्या चित्रात अगदी तसेच वातावरण आहे बघा . दोन्ही बाजूने आकाशातून ढगांचे पुंजके उतरत होते . समोर सिडने पॉईंट व टेबललॅन्डचे पठार व त्याच्या डोंगरउतारावर तायघाट गाव अप्रतिम नजारा होता . आज तुमच्या चित्रामुळे तरुणपणातील सगळ्या गमतीजमती आठवल्या . फार मस्त प्रदर्शन आहे . तुमचे हे चित्र मी विकत घेत आहे . त्यांनी लगेच  नाव विचारून चेकच हातात ठेवला . त्या चेकवरची सही पाहून आता मीच थबकलो कारण त्यावर नाव होते सुभाष दांडेकर . आणि खाली कॅम्लीन कंपनीचे चेअरमन असे स्पष्टपणे प्रिंट केले होते .
      ज्यांचे रंग मी लहानपणापासून वापरायचो पण ती व्यक्ती समोर कधी पाहिली नव्हती . त्यांचा कधी फोटोही पाहिला नव्हता .मग आमच्या गप्पा आणखीन रंगू लागल्या . मग रंगाचा विषय निघाला . त्याची क्वालीटी कशी राखली जाते याविषयी चर्चा झाल्या . त्यांनी चित्र घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी घरी बोलावले अभिप्राय वहीत छोटा अभिप्राय लिहून त्यांच्या घराचा सविस्तर पत्ता लिहिला व निरोप घेतला . गॅलरीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पाच मिनिनंतर परत येऊन त्यांनी हात हातात घेतला व उदया मी रजनीला सरप्राईज देणार आहे . तुम्ही हे चित्र कोणत्या ठिकाणावरून काढले हे लगेच सांगायचे नाही असे सांगून हासत हासत न चुकता उदया भेटण्याची आठवण पुन्हा करून दिली .
              दुसऱ्या दिवशी मी चित्र घेऊन टॅक्सीने त्यांच्या बांद्रयाच्या कोबे रेस्टारंट जवळच्या क्षितिज अपार्टमेंटमध्ये पोहचलो तर खाली एक माणूस माझी वाटच पहात होता . त्याने चित्र हातात घेतले व मला लिफ्टने घरात नेले . तेथे हॉलमध्ये सुभाषजी माझी वाट पहात बसलेलेच होते . त्यांनी बबल सीटचे पॅकिंग स्वतः उघडून समोर एका टेबलावर चित्र ठेवले व लहान मुलासारखे तोंडावर बोट ठेवून मला आता काही बोलायचे नाही अशी सुचना केली . त्यांचा तो उत्साह पाहून मीदेखील हसलो व ठिक आहे मी बोलणार नाही असे सांगितले . मग त्यांनी मोठ्याने किचनकडे तोंड करून हाक मारली रजनी जरा बाहेर ये , हे बघ मी काय आणलेय तु ओळख बघू आता . इतक्यात रजनीताई नॅपकीनने हात पुसत बाहेरच्या हॉलमध्ये आल्या व ते चित्र पाहून चकीत झाल्या . अय्या हे तर पाचगणीचे चित्र , किती सुंदर आहे , सुभाष तुला आठवतेय का? आपण लग्नानंतर हनिमूनला गेलो होतो . त्यावेळी त्या गावच्या रस्त्यावरून हेच दृश्य दिसत होते . धुक्यात हरवलेले ते गाव , डोंगर व टेबललॅन्डचे ते पठार . किती किती मस्त दिवस होते ना ते . त्या मनापासून लाजल्या व म्हणाल्या आज मला या चित्रामुळे सगळं आठवतय . थँक्यू सो मच फॉर लवली मेमरीज ! आपल्या बायकोला हे सगळे दिवस आठवत आहेत हे पाहून दांडेकरसाहेब भलतेच खूष झाले . मग त्यांनी माझी चित्रकार म्हणून ओळख करून दिली . पुन्हा तायघाट व पांगारी या नावाची गावे आठवत आहेत का ? याची आठवण करून दिली व नाटकीय भाषेत म्हणाले चित्रकार सुनील काळे , तुम्ही महान चित्रकार आहात , तुमच्या या चित्रात त्या गावाचा निसर्गाचा आत्मा उतरलेला आहे , यापुढे तुम्हाला कॅम्लीन कंपनीतर्फे 40% डिस्काऊंड मिळेल . तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली की अमाऊंटवर 40% डिस्काऊंडची तुम्ही मागणी करायची ती तुम्हाला मिळेल ही माझी तुम्हाला सप्रेम भेट समजा .
               मग रजनीताईंनी सर्व घर फिरून दाखवले . गोपाळ देऊस्करांनी त्यांचे ऑईलकलर मध्ये केलेले पोट्रेट दाखवले . संग्रहातील इतर मान्यवर प्रसिद्ध चित्रकारांच्या काही कलाकृती दाखवण्याची त्यांची इच्छा होती पण माझे प्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीत सुरु होते त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन मी गॅलरीत आलो . अर्ध्या तासातच कॅम्लीनचे रघुनाथ पोवळे नावाचे मार्केटींग टिमचे मॅनेजर आले व पत्ता घेऊन गेले . यापुढे मला संपर्क करा असे सांगून साहेबांनी तुम्हाला 40% डिस्काऊंट देणार आहे याची पुन्हा आठवण करून दिली .
              अशी चित्रांवर चित्रकलेवर प्रेम करणारी माणसे कायमची लक्षात राहतात . पुढे कॅम्लीनचे कॅनव्हास , रंग , आर्टमटेरियल यावर चाळीस टक्के डिस्काऊंट मिळत राहीला . आजही पोवळेसाहेब संपर्कात असतात . मी ज्या ब्रिटीश स्कूलमध्ये शिकवायला होतो ते बोर्डींग स्कूल होते . तेथे आम्ही प्रत्येक मुलाला आर्ट किट दिले . त्यामध्ये कॅम्लीनचे जलरंग , पेस्टल व पोस्टर कलर्स ,कॅलिग्राफी पेन , स्केल , कंपास बॉक्स व इतर सर्व सामान ठेवण्यासाठी एक खास बॅग तयार केली . त्या बॅगेवर शाळेचा व कंपनीचा लोगो प्रिंट करून दिला होता . मुले खूप खूष झाली होती . त्यावेळी सातारा येथील मंगेश बलशेठवार यांच्या दुकानातून सर्व पुरवठा करण्यात आला होता . पण त्यापाठीमागे खरी प्रेरणा होती सुभाष व रजनी दांडेकर या कलासक्त दाम्पत्याची . मुलांनी चित्रे काढली पाहिजेत, आर्ट कॉलेजच्या मुलांनी परदेशातील चित्रकारांची म्युझियममध्ये जावून प्रत्यक्ष चित्रे पाहीली पाहिजे , प्रेरणा घेतली पाहिजे यासाठी स्पर्धा घेऊन पारितोषकप्राप्त मुलांना कंपनीतर्फे परदेशवारी करण्याचे पुण्यकाम दांडेकर मंडळी कॅम्लीन फौडेंशनच्या माध्यामातून करत असत .
                मराठी माणसांनां उद्योजक म्हणून यशस्वी होता येत नाही हा शाप दांडेकरांनी साफ चुकीचा ठरवला . पेनाची रंगीत शाई पासून सुरुवात करून हळूहळू उच्च गुणवत्तेची उत्पादने देण्याचे त्यांचे ध्येय होते आणि त्यासाठी ते झपाटून काम करत . 1958 मध्ये सुभाष दांडेकरांनी मुंबईतून रसायनशास्त्रात पदवी मिळवली व कंपनीत तांत्रिक संचालक म्हणून रुजू झाले . रंग तंत्रज्ञानाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी ते इंग्लडला गेले . आणि आल्यानंतर त्यांनी कमी बजेटमध्ये पण गुणवत्तेशी तोल साधत अनेक रंग बाजारात उपलब्ध केले . सरतेशेवटी कॅमल हा ब्रॅन्ड प्रतिष्ठित भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार विद्यार्थी आणि छंद बाळगणाऱ्यांपासून ते हौशी व व्यावसायिक कलाकरांच्या परिचयाचा होत गेला कारण त्यामागे सुभाष दांडेकराची अखंड प्रेरणा व परिश्रम होते .
                दिनांक 22 जुलै 2022 रोजी रजनीताई यांचे निधन झाले आणि आज 15 जुलै 2024रोजी श्री.सुभाष दांडेकर यांचे निधन झाले . एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या तसेच अनेक चित्रकार , चित्रकला शिक्षक , कलावंत , आणि विद्यार्थी या मंडळीना प्रोत्साहन देणाऱ्या या दाम्पत्याची आठवण सर्व चित्रकारानां नेहमीच राहील .
मला खात्री आहे की ते स्वर्गात गेल्यानंतर रजनी दांडेकरांचा प्रथम शोध घेतील . आपल्या कॅम्लीन कंपनीचा प्रगतीचा अहवाल सादर करतील आणि आता स्वर्गातील देवांच्या मुलांसाठी , स्वर्गातील चित्रकारांसाठी , कलावंतांसाठी आणखी नवनवी उत्पादने निर्माण करतील आणि पृथ्वीवरील कलाकारांचे जीवन जसे रंगीत कलरफूल केले तसे स्वर्गातील जीवन आणखी सुंदर करतील यामध्ये शंका वाटत नाही .
सुभाष दांडेकर यांनी 15 जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानां भावपूर्ण श्रध्दांजली .🙏

सुनील काळे✍️
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...