शनिवार, २९ जून, २०२४

नदिष्ट

" नदिष्ट " 
लेखक : मनोज बोरगावकर , नांदेड .

काही दिवसांपूर्वी मी हे पुस्तक वाचले .
मनोज बोरगावकर या लेखकाची भेट  वसंत व्याख्यानमालेत वाईला झाली . 
आमचे चित्रप्रदर्शन त्यांनी पाहिले व ते त्यांना खूप आवडले . 
आमची ओळख झाल्यानंतर लेखकाने आठवणीने घरी गेल्यानंतर  हे पुस्तक पाठवले . त्यांची "नदिष्ट" कांदबरी या "नादिष्ट" चित्रकाराला मिळाली व नंतर मी सावकाश आस्वाद घेत घेत वाचली . 
       वाचताना इतका आत खेचत गेलो की गोदावरी , कृष्णा किंवा कोणत्याही नदीचा जसा तळ व अंत मनापासून शोधणे अवघड आहे तसाच मानवी मनाचा थांगपता लागणे अवघड आहे . वाचता वाचता पूर्णपणे स्वतःलाच खोल खोल शोधायला लागलो . काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरायला शिकू लागलो .  प्रत्यक्ष लेखकाला अभिप्राय लिहिताना तर "निशब्दच" झालो .
          तृतीय पंथीयाचे भोग भोगणारी सगुना , लहानपणापासूनचे मार्गदर्शक दादाराव , सर्पमित्र प्रसाद , आयुष्यभर नदीशेजारीच गुरे चारणारा कालुभैय्या , मालाडी , बामनवाड , भिकाजी ही कांदबरीतील सगळी पात्रे जिवंत होऊन समोरच अवतिभवति दिसायला लागायला लागली . फेर धरून डोळ्यासमोर नाचायला लागली . त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान सोप्या शब्दांमध्ये व्यक्त करू लागली .चित्रकार असल्याने दृश्यपटलावर दृश्यानुभव लगेच दिसायला लागतो . ती गोदावरी नदी , तिथला पुजारी  , तिथला घाट , तिथली भाषा , जगण्याची शैली सगळे कसे डोळ्यापुढे स्पष्ट दिसू लागले . लेखकाने प्रसंग सांगताना जणू एखादा सिनेमा पाहतोय अशी सहजपणे वेगवेगळ्या प्रसंगाची सहज रचना केली आहे .
           चित्रकाराची चित्र काढण्याची एक विशिष्ट शैली असते . ती एका चित्रानंतर दुसरे चित्र पाहताना लगेच जाणवते  तशी या लेखकाची शब्दशैली वेगळीच व एकंदर हिंदी भाषेचा अनोखा वापर ही वेगळा लहेजा आहे . 
          गावाकडेच्याच या अद्भूत हिंदीतून व्यक्त होणारी  निखळता , सहज मनाला भिडणारी  आनंद देणारी व भाषेचा गोडवा जपणारी आहे . अतिशय सहज सोपी आहे . माणसांना जवळीक करणारी आहे .कोणताही शाब्दीक जंजाळाचा गुंतागुंत न करता भाषेचे जडत्व दूर ठेऊन जीवनात मिळालेल्या या नदीच्या मैत्रीतून लेखकाने जीवनविषयक तत्वज्ञान अतिशय सहजपणे सांगितले आहे .
        मी स्वतः लेखक नाही किंवा फार गाजलेली मोठी मोठी पुस्तकेही वाचलेली नाहीत त्यामुळे मी इतर कोणाच्या ग्रंथाची या ग्रंथाशी तुलना करणार नाही . फक्त लेखकाच्याच भाषेत म्हणेन "आपण मोजायच्या तत्वज्ञानात रमलो की जगणेही आपली मापं काढायला लागते ".
        नदीचा तळ लागतो पण तिची खोली सापडणे दुरापास्त असते . तसेच मनोज बोरगावकर सारखे मित्र लगेच मित्र झाले असे वाटते पण त्यांची विचारांची , लेखनाची , समृद्ध अनुभवांची , शब्दांच्या सच्चेपणातील , गोष्ट सांगण्याच्या ओढीची खोली सापडणे दुरापास्त असते . त्यांचे हे पुस्तक वाचणे म्हणजे माणूस वाचण्याचा , माणूस समजून घेण्याचा , जीवन समृद्ध करणारा निरागस जीवनानुभव आहे .

आपण पुस्तकप्रेमी असाल किंवा नसाल तरीही सर्वाना ही कांदबरी नक्की आवडेल . खूप सुंदर विषय आहे .
       वाईत चित्रप्रदर्शनातून आर्थिक लाभ झाला नाही आणि त्याचे दुःख मनाला थोडेशे होत होते . नदिष्ट वाचताना ते दुःख संपूर्ण धूवून निघाले . मनोज बोरगावकर , संदीप खरे , वैभव मांगले , विश्वास पाटील , नृत्यनिपूण सुचेता भिडे चाफेकर व  दिग्गज अशा  एकवीस मंडळीची प्रत्यक्ष भेट झाली , त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती झाली हे काय कमी आहे का ? त्या सर्वांच्याविषयी नंतर सविस्तर लिहीन .
      नदीसारखे वाहत राहा .वाहता वाहता एक दिवस वाचता वाचता हळूहळू
 "नदिष्ट"  होत जा  हा संदेश देत मन पुन्हा सरळ प्रवाहात वाहून प्रसन्न होत गेले .
त्याचवेळी कृष्णातिरावरची मंदिरे , नदीची काढलेली चित्रे , ती चित्रे काढताना भेटलेली माणसे , तेथील अनुभवही पुन्हा पुन्हा आठवत राहीले .
नदिष्ट: मनोज बोरगावकरांचे हे लक्षणीय पुस्तक एकदातरी नक्की वाचावे असेच आहे .

 सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...