ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

राज्यपालांची आठवण

राज्यपालांची आठवण

             आज चित्रकलेच्या ग्रूप मध्ये निराश , हताश झालेल्या मित्रांच्या चर्चेमुळे अशीच एक जुनी आठवण आली . १९९५ साली माझे पाचगणी महाबळेश्वर विषयावर जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन झाले होते .सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मला गॅलरी मिळाली होती त्यामूळे भरपूर कामे केली  होती .  पाचगणी महाबळेश्वर परिसरातील जलरंगातील अनेक चित्रे मी प्रत्यक्ष जागेवर जावून तयार केली होती .प्रश्न होता प्रदर्शनाचे फोर कलर ब्रोशर छापण्याचा ,माझ्याकडे फ्रेमिंग व इतर गोष्टींमुळे पैसेच उरले नाहीत . म्हणून मी स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत होतो . काही काळ मी केमोल्ड फ्रेमस या केकू गांधी यांच्या कारखान्यावर फ्रेमिंग सेक्शनचा प्रमुख म्हणून काम करत होतो . त्यामूळे त्यांच्याकडे मी मदत मागितली . त्यांनी  नकार दिला कारण मी त्यांची नोकरी सोडली होती . पण त्यांचा मुलगा आदील गांधी यांनी एक नाव पत्ता दिला व तुझे नशीब चांगले असले तर या माणसाला भेट तो कदाचित तुला मदत करण्याची शक्यता आहे . प्रयत्न कर .  त्यांचे नाव गायो पेडर त्यांनी नुकतीच पेडर टाईल्स नावाची कंपनी सुरु केली होती . मोठया अपेक्षेने मी माझ्या चित्रांचे काही नमुने त्यानां दाखवायला घेऊन गेलो . 
          बान्द्रा येथे एका बंगल्यात त्यांचे अलिशान ऑफीस होते . त्यांच्या सेक्रेटरीला मी प्रथम भेटलो . तिने माझी काही चित्रे आत केबिनमध्ये दाखवायला नेली .नंतर बाहेर आली आणि सांगितले की तुमची चित्रे पाहून त्यानां खूप आनंद झाला . तुमच्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले आहे . शुभेच्छा दिल्या आहेत व आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी तुम्हाला ब्रोशरसाठी पैसहीे देण्याचे ठरविले आहे , तुमचे अभिनंदन ! पण  त्यानां प्रदर्शनासाठी यावयास व मला भेटायलाही वेळ नाही . मी कधीही न भेटलेल्या व आजपर्यंत न पाहिलेल्या अशा या अज्ञात चेहरा असलेल्या माणसाचे कायमचे उपकार मनात घेऊन व मोठया रकमेचा चेक घेऊन  बाहेर पडलो . मला आजही आश्चर्य वाटते की त्याने मला का मदत केली असावी ? ना त्यांची व माझी ओळख ना पाळख, एका मिनिटात निर्णय कसा घेऊ शकतात ही लोकं ? म्हणजेच जगात अशीही माणसे असतात ती मदत करतात व कधीही भेटत नाहीत  कारण त्यानां खरी मदत करायची असते, हे अनुभवून मी त्यानां मनातूनच हात जोडले, आभार मानले. निदान  माझ्या प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उदघाटन करावे ही विनंतीही  त्यांनी नाकारली . कारण ते माझे पाहिले मोठे चित्रप्रदर्शन होते व मी आर्ट फिल्ड मध्ये नवखा उमेदवार होतो . पण त्यांनी त्यासाठी नकार दिला .व माझी प्रसिद्धी करु नये असेही सांगितले . आपल्याला मदत करणाऱ्या माणसानेच नकार दिल्यामूळे मी खूप निराश झालो होतो व मला वाईटही वाटले होते .
        अशा वेळी आमची एक पारशी  ओळखीची मैत्रिण  गीता चोक्सी (पेसी अंकलची भाची ) मला म्हणाली कल्चरल मिनिस्टरला का बोलावत नाही , भेटून तर ये , प्रयत्न तर करुन बघ ,या तिच्या आग्रहास्तव मी सांस्कृतिक मंत्री श्री प्रमोद नवलकर यांच्या ठाकुरद्वारच्या मुंबईच्या घरी  गेलो आणि आश्चर्य म्हणजे माझी कथा ऐकून, धडपड व जिद्द पाहून ते  प्रमुख पाहुणे म्हणून प्रदर्शनासाठी  यावयास तयार झाले . इतकेच नाही तर  मी व स्वाती दोघेच सर्व  काम करतो हे पाहून ते चक्रावले व त्यानंतर त्यांनी आम्हाला मदत करण्याचे ठरविले . त्यांचे सगळे  सांस्कृतिक खातेच त्यांनी कामाला लावले . व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले .त्यांचे प्रमुख श्री . गोविंद स्वरुप , श्री . सुधीर मेश्राम इ . मंडळी व त्यांचा सर्व संपूर्ण  स्टाफ ,प्रसिध्दी माध्यमे ,  प्रदर्शन तयारीच्या गोष्टीमध्ये मदत करू लागला .व एक उत्तम प्रकारे  ( विशेषत: प्रसिद्धीच्या, व आर्थिक दृष्टीने ) माझे यशस्वी प्रदर्शन पार पडले . तेही सांस्कृतिक मंत्र्याच्या व अनेक मान्यवरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत.
          जहांगीरच्या या प्रदर्शनाच्या सहा वर्षाच्या वेटींग प्रकारामुळे मी पाचगणीत सातारा जिल्हयातील पहीली प्रायव्हेट आर्ट गॅलरी करण्याचा निर्णय घेतला . आणि मी  मुंबईहून कायमचा पाचगणीला आलो . 
         त्या १९९६ च्या मे महिन्यात मला  एक दुपारी टेलिफोन आला . आर्टिस्ट सुनिल काळे, " मी  मिस्टर अलेक्झाडंर बोलतोय आणि मी महाबळेश्वर मधून बोलतोय ,मला एक  १५X २२ साईजचे वॉटरकलर   पेंटींग तयार करून हवे तर किती रुपये खर्च येईल .? " मी त्यानां विषय विचारला  तर म्हणाले पेसी विरजी नावाच्या पारश्याच्या बंगल्यासमोर एक गुलमोहराचे झाड महात्मा गांधी पाचगणीत राहत असताना त्यांनी स्वतः लावले आहे त्या झाडाचे व त्या घराचे चित्र मला हवे आहे . ,मी तुमचे चित्राचे पैसे मान्य करतो . मीही त्यानां चित्र करुन देतो म्हणालो . व तुमचे नाव राज्यपाल पी .सी . अलेक्झाडंर याच्यांशी मिळतेजुळते आहे असे सांगितले तर म्हणाले हो , मी स्वतः गव्हर्नरच तुमच्याशी बोलतोय, पी.सी . अलेक्झाडंर ,हे माझेच नाव आहे .मी येथे महाबळेश्वरमध्ये पंधरा दिवस आहे त्या अगोदर चित्र पूर्ण करून द्या .मी त्यानां हो म्हणालो .
        एक दिवस ठरवून मी  ते चित्र त्या प्रत्यक्ष ठिकाणी जावून पूर्ण केले व त्यानां चित्र पूर्ण केल्याचा फोन केला . त्यावेळी त्याच गुलमोहर झाडाच्या ठिकाणी येईल व मी चित्र  बघेन असे ते म्हणाले व आमची भेटीची वेळ निश्चित केली .
        एका छोटया चित्रकारासाठी राज्यपाल साहेबांचा  लवाजमा पाचगणीला आला . भरपूर लाल दिव्याच्या गाड्या  रस्त्यावर बाहेर उभ्या होत्या,माझ्याकडे त्यावेळी जुनी दुचाकी होती .भेटीसाठी मी विरजींच्या मेडस्टोन नावाच्या बंगल्याकडे आलो,बघतो तर बंगल्या बाहेर तोबा गर्दी होती . सर्व पत्रकार , खासदार, आमदार, नगरसेवक, सर्व नगराध्यक्ष  ,  तलाठी, तहसिलदार, पोलीस अधिक्षक , उद्योगपती इतर अधिकारी वर्ग व अनेक मान्यवर  मंडळी त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते . मी सुध्दा घाबरुन स्कूटर पार्क करुन बाहेरच गर्दीत दडून थांबलो . इतक्यात राज्यपालांचे सीओ बाहेर आले ,व म्हणाले "फक्त चित्रकार सुनिल काळे यांनी एकटयानेच फक्त आत यावे बाकीच्यांचे येथे काहीही काम नाही , या लोकांनी इथे  गर्दी कशासाठी केली आहे ? मी बंगल्याच्या पोर्चमधून आत  जायला निघताच सगळ्यांच्या संतापाच्या , रागाच्या नजरा माझ्याकडे  आश्चर्याने वळाल्या . आम्ही इतके मोठे व मान्यवर मंडळी व एका चित्रकार तरुण पोरामूळे , एका फडतूस, प्रसिद्ध नसलेल्या एका अतिसामान्य माणसामुळे आपल्याला परत जावे लागले .एकटयालाच फक्त राज्यपालांची भेट व आम्ही माघारी ?  त्यानां ही घटना फार अपमानास्पद वाटली असावी .
        मी गर्दीतून घाबरतच आत गेलो . मी आत गेल्यावर त्यांनी स्वागत केले ,उठून उभे राहून चित्र हातात घेऊन पाहीले . त्यानां चित्र आवडले व मनापासून अभिनंदनही केले . कौतुकाने त्यांच्या शेजारी बसवले . 
        त्यामूळे अशा छोट्या प्रसंगामूळे  मला चित्रकार,  कलावंताना , अचानक किती महत्व मिळते, हे ही अचानकच  कळाले .व पैसे प्रसिध्दी यापेक्षाही आपण केलेल्या  प्रामाणिक धडपडीमूळे, निराश न होता सातत्याने केलेल्या प्रयत्नामूळे निर्व्याज प्रेमामुळे ,आपल्या सातत्याने केलेल्या कलासाधनेमुळे, कितीतरी मोठी माणसे आपल्या प्रेमात पडतात आपला यथोचित आदरही करतात हे  सर्व शिकावयास मिळाले .
      अर्थात गव्हर्नर साहेब , सांस्कृतिक मंत्री नवलकर साहेब , उदयोगपती गायो पेडर ही मंडळी देखील तितकेच प्रेमळ व सच्चे ,कलेचा  ,कलाकारांचा,आदर करणारे होते ,व नव्या विचारांचे स्वागत करणारे व पाठीराखे होते .एका नविन , प्रथितयश नसलेल्या चित्रकारावर त्यांनी विश्वास दाखवला मदत केली हे त्यांचे मोठेपण मी कधीच विसरू शकणार नाही . ते कायमच माझ्या शेवटपर्यंत लक्षात राहील .
       त्यामूळे मित्रानों निराश होऊ नका ,आपण आपल्या हातात घेतलेल्या कोणत्याही कार्यात मग्न रहा, प्रयत्न सोडू नका,  एक दिवस आपल्या कलेचे मोल होतेच आणि नाही झाले तरी काही हरकत नाही, आपण एक छान , सुंदर, मनस्वी , आयुष्याचे सच्चेपण राखून जीवन जगलो याचे समाधान तर नक्कीच मिळेल ,व येथून जाताना आनंदही भरभरून मिळेल . कारण कधी ना कधी, इच्छा असो वा नसो येथून जावे तर प्रत्येकालाच लागणार . आणि जाताना काय घेऊन जाणार ? रिकामे जाण्यापेक्षा या आठवणी तर सोबत असतीलच की .
       त्यामूळे यश मिळो ना मिळो . आपण प्रामाणिक पणे प्रयत्न करत राहायचे . मग आपली दखल घेणारा एक दिवस अचानक येतोच , उघडतोच .जो तुम्हाला अनपेक्षित असतो . 
फक्त न हारता , 
निराश न होता आपले कार्य करत राहायचे .......... 
आपल्या स्वतःसाठी ..........
निरपेक्ष भावना जागृत ठेवून ........... 
शेवटपर्यंत ................ 
स्वआनंदासाठी ............
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे
9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...