सोमवार, २८ जून, २०२१

भूक🌟🌟 वाईच्या मेणवली गावाशेजारी ' निसर्ग ' बंगल्यात कायमस्वरूपी राहायला आल्यानंतरही आम्ही आमचे किचन व चित्र काढण्याचा स्टुडिओ हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहे . कारण स्टुडिओ आणि किचन एकत्र असले की किचन मधून येणाऱ्या भांड्यांचा आवाज , कामवाल्या मावशींची बडबड , तेथून येणारे चित्रविचित्र फोडणीचे वास यांच्यामुळे माझी भूक चाळवते , सारखे सारखे किचनमध्ये जावेसे वाटते . सारखी भूकच लागते , म्हणून किचन बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या कॉटेजमध्ये आहे . आणि दुसरी गोष्ट स्टुडिओमध्ये चित्र , लेखन किंवा वाचन करताना मला पूर्ण शांत , निवांत वातावरण लागते आणि त्या शांततेच्या तंद्रीत आपण एकरुप होऊन करत असलेले काम हे चांगले होते असा माझा अनुभव आहे . असाच एके दिवशी लिखाण काम करत होतो आणि त्या लेखन लिहिण्याच्या प्रोसेस मध्ये मी इतका गुंतलो होतो की दुपारचे दोन तीन वाजले तरी मला कळलेच नाही . काम संपत आले होते आणि पोटात भुकेची जोरदार जाणीव झाली . इतक्यात स्वाती तिचे जेवण व इतर सर्व कामे उरकून ती स्टुडिओत परत देखील आली होती . त्यानंतर तिने जेवण टेबलावर मांडलेले आहे असा निरोप दिल्यामुळे मी किचनच्या घरी निघालो .घरात प्रवेश करतानाच गेटच्या दिशेने आमचा टॉमी कुत्रा जोरजोरात भुंकून गोंधळ घालत असल्याचे दिसले आमचे हे गेट बंदिस्त असल्यामुळे बाहेरचे काही दिसत नाही , त्यामुळे एखादा अनोळखी माणूस आलेला असावा म्हणून मी गेट उघडले . गेट उघडल्यानंतर दरवाजातच बसलेली एक वयस्कर व्यक्ती दिसली. डोक्यावर घातलेली तिरकस कळकट गांधी टोपी , अंगावरच्या काळ्या कोटाच्या , सदऱ्याच्या , आखूड पॅंटीच्या चिंध्या झालेल्या दिसत होत्या . खांद्यावर एक फाटलेली झोळी पायात झिजलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपरची जोडी दिसत होती . दाढीचे खुंट वाढल्यामुळे की वयस्कर व्यक्ती एखादा भिकारी दारात असल्यासारखे दिसत होती . पण त्याचे दोन्ही डोळे मात्र भरपूर काही तरी सांगत होते . त्या डोळ्यात असहाय्यता ,करुणा ,दया , निराशा व आलेला हातबलपणा स्पष्टपणे दिसत होता . खपाटीला गेलेल्या पोटाकडे हात करून केविलवाणेपणे त्याने माझ्याकडे पाहिले आणि पटकन अनपेक्षितपणे माझे पायच पकडले . त्याच्या थरथरत्या हातात जणू जीवच नव्हता . निष्प्राण डोळ्यातील भाव , पोटातील भुकेची वेदना त्याला गप्प बसू देत नव्हते . सुकलेल्या ओठाने भूक , भूक लागली, भूक लागली असे दोनच शब्द तो वारंवार उच्चारत होता . त्याची ती दयनीय अवस्था पाहून मी किचनमध्ये गेलो . एका प्लेटमध्ये भाकरी व थोडी भाजी ताटात आणून दिली . ती भाकरी व भाजी पाहून त्याने खूपच वेगाने त्यावर झडप घातली व खायला सुरुवात केली . त्याचा तो धुसमुसळेपणा पाहून मी चक्रावलो . एका मिनिटात त्याने ती भाकरी संपवली व परत पोटाकडे भूक भूक करत माझ्याकडे दयायुक्त नजरेने पाहिले . मग घरातील आणखी एक भाकरी , भाजी आणि थोडा भात त्याला दिला . तोही बाबाजीने झडप घालून लगेच संपवला . परत भूक भूक भूक असे पोटावर हातवारे करणे चालूच ठेवले . बरेच दिवस कोरोनाच्या लॉकडाऊन च्या काळात त्याला भीक किंवा जेवण काहीच मिळाले नसावे असे माझ्या लक्षात आल्यावर दुपारचे माझे घरातील उरलेसुरले सगळे जेवणच मी त्याला दिले. तेव्हा कुठे त्याची खूप दिवसांपासून लागलेली भूक पूर्ण झालेली असावी . मी घरात जाऊन दोन बिस्किटांचे पुडे त्याच्या झोळीत टाकले . हे पाहिल्यानंतर तर त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या त्याने मला वाकून नमस्कार करत असतानाच मी त्याला अडवले . आता तो उभा राहिला व रस्त्याने पाठमोरा होऊन काठी टेकत चालत निघाला . थोडे अंतर गेल्यावर तो मला म्हणाला "मी भिकारी नाही " खरंच "मी भिकारी नाही " .आणि मग हळूहळू तो रस्त्याने चालत दिसेनासा झाला . मी घरात आलो घरातले दुपारचे जेवण पूर्णपणे संपलेले होतेच आता खाण्याचा प्रश्न उरलेला नव्हता . माझी पोटातील भुकेची जाणीवही पूर्णपणे संपलेली होती . आणि अचानक तो प्रसंग आठवून माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा एकसारख्या वाहू लागल्या . मलाही एकदा भूक लागली होती .होय , खरंच सांगतो खूप मोठी भूक लागलेली होती . त्या भुकेची आठवण येऊन माझ्या अंगावर सरकन् काटा आला .मी प्रचंड अस्वस्थ झालो .आज मी तुम्हाला त्या खऱ्या लागलेल्या भुकेचीच गोष्ट सांगणार आहे . 1990 साली मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या घोलेरोड वरील महात्मा फुले संग्रहालयासमोर असलेल्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो . माझी रूम नंबर 28 एका कोपऱ्यामध्ये होती .ते वर्ष कमर्शियल आर्टचे अंतिम वर्ष होते . मी बारावी सायन्स सोडून चित्रकला करतो म्हणून घरची आर्थिक मदत होत नव्हती .त्यावेळी मिळेल ती कामे करून मी जगत होतो . नाना पेठेत जवाहर आर्ट नावाचे साईनबोर्ड पेंटिंगचे दुकान होते . त्या दुकानात मी साईनबोर्ड रंगवायचे काम करत होतो .त्याकाळात डिप्लोमाची अंतिम परीक्षा मुंबईच्या जे .जे .स्कूल ऑफ आर्टमध्ये असायची . मला माझा वार्षिक असायमेंटचा पोर्टफोलिओ पूर्ण करायचा होता .त्या पोर्टफोलिओच्या असायमेंटसची पूर्तता करून नंतर वार्षिक अंतिम परीक्षेसाठी मुंबईला जावून राहावे लागणार होते .त्यासाठी मला किमान आठ ते दहा हजार रुपये तरी लागणार होते . माझे सर्व काम खुंटले होते . त्यामुळे शेवटी नाईलाजाने मी वडिलांसमोर पैशासाठी हात पसरला . त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे नकार दिला दुर्दैवाने त्याच वर्षी आमच्या गावाकडच्या घराला आग लागली होती व ते घर आगीत पूर्णपणे भस्मसात झाले होते . मनात चारी बाजूने अडचणीचा डोंगर उभा होता . माझ्या ओळखीच्या मित्रांची परिस्थितीही थोड्याफार प्रमाणात सारखीच होती . जे श्रीमंत मित्र होते त्यांच्याकडे पैसे मागण्याची हिंमत होत नव्हती . .परीक्षा कशी द्यायची ? हा मोठा प्रश्न पडलेला होता . अशा या विचित्र परिस्थितीच्या काळात अचानक एक सीनियर चित्रकार व ॲड एजन्सी असलेल्या मित्राची ओळख झाली . . त्याला मी माझी अडचण सांगितली त्यानंतर त्याने मला मदत करण्याची इच्छा दर्शविली . आम्ही एक छोटे टेबल कॅलेंडर तयार करण्याचा प्रकल्प ठरवला . त्यामध्ये पाचगणी , वाई महाबळेश्वरची बारा चित्रे निवडून बाजूला महिन्याचे . कॅलेंडर व त्याच्या खाली तेथील शाळा , हॉटेल्स व जाम कंपन्यांच्या जाहिराती मिळवून त्याची नावे स्क्रिनप्रिंट करून द्यायच्या . आणि त्यांना ही टेबल कॅलेंडर विकायची असे ठरवले . ऑर्डर्स मिळवण्यासाठी पाचगणी महाबळेश्वरला मी एकटाच आलो अनेक शाळा , हॉटेल्स जाम कंपनीच्या मालकांना प्रत्यक्ष पायी चालत जाऊन भेटून माझी परिस्थिती सांगून मी जवळपास 2000 कॅलेंडरच्या ऑर्डर्स मिळवल्या . एका कॅलेंडर ची किंमत 15 रुपये होती त्यामुळे तीस हजार रुपये हे आम्हाला मिळणारच होते . आमच्या ॲड एजन्सीवाल्या मित्राने प्रिंटिंगची जबाबदारी घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले . त्याप्रमाणे सर्व काम व्यवस्थित पार पडले . शेवटी पैसे कलेक्शन करत असताना हा प्रिंटींग करणारा मित्र सोबत आला व सर्व पैसे बिले तयार त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले . आपण प्रथम हिशोब करू त्यानंतर तुला तुझे पैसे देतो असे त्याने मला सांगितले . हिशोब केल्यानंतर प्रिंटीगचा खर्च जास्त झालेला आहे , त्यामुळे तूच आता यापुढे माझे पैसे देणे आहे असे तो सांगू लागला आणि कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला प्रॅक्टिकल व्यवहाराची " खरीखुरी " ओळख झाली . फायनल ईयरचे वर्ष संपत आले होते . कॉलेजचा सर्व प्रोजेक्ट व असायमेंटस पूर्ण करण्याची वेळ जवळ आली होती .अशावेळी मित्राचे पैसे देऊ ? की प्रोजेक्ट पूर्ण करू ? असा दुहेरी गोंधळ माझ्या मनात उडत होता . त्यातच माझी सायकल चोरीला गेली आणि चिंतेची आणखीनच भर पडली .कॅलेंडरचे सगळे पैसे मित्रानेच घेतलेले होते . त्यामुळे बिनापैशांमुळे माझी अवस्था जणू भिकाऱ्यासारखे झालेली होती . अशा अवस्थेतही मी कॉलेजला जात होतो . तिकडे फायनल इयरच्या सबमिशनसाठी सरांची सतत मागणी सुरू झाली होती .सगळे मित्र वेगाने तयारीला लागलेले होते मी त्यांच्या धावपळीकडे फक्त बघत होतो . पण माझा प्रोजेक्ट कसा करावा ? पैसे कुठून आणावे ? मुंबईला कसे जावे ? राहणार कोणाकडे? या विचारांमुळे मी सैरभैर झालो , त्यातच सायकल नसल्यामुळे सतत चालत असल्यामुळे प्रकृती चांगलीच ढासळायला सुरुवात झाली होती . कॅलेंडरच्या गडबडीमध्ये जवाहर आर्टचे काम थांबले होते .एकंदर पैसे मिळवण्याचे सगळे मार्ग माझे बंद झालेले होते . घोले रोडवरचे आंबेडकर वसतिगृह ते अभिनव कलामहाविद्यालयाचे अंतर सात-आठ किलोमीटर तरी असावे आणि हे अंतर मला चालत ये-जा करावी लागत होते . येताना व जाताना अनेक खानावळी ,स्टॉल्स , वडापावच्या टपऱ्या , खाद्यपदार्थांच्या गाड्या व मोठमोठी हॉटेल्स दिसायची . त्यांच्यासमोर चालत जाताना त्या वासाने मी कासावीस व्हायचो .पण करणार काय ? खिसा रिकामा होता . खायला पैसे नाहीत आणि इकडे त्या ॲड एजन्सीवाल्या मित्राचे आणखी पैसे पाहिजेत या मागणीची सततची नोटीस येत होती . त्यामुळे मी फार कोलमडून पडलो होतो वडापाव खाण्याचेही शेवटी पैसे माझ्याकडे नव्हते . खिशात असलेली सर्व सुट्टी नाणी संपली व खऱ्या अर्थाने मी पुर्ण ' भिकारी ' झालो . जेवणाचे पैसे न दिल्यामुळे खानावळ बंद झाली आणि मी सर्वार्थाने निराधारही झालो .त्या रात्री पाणी पिऊन उपाशी झोपावे लागले . सकाळी चालत कॉलेजला गेलो आता कोणी मित्र निदान मधल्या सुट्टीत चहा पाण्यासाठी बोलवतील या अपेक्षेने मी पाहत होतो पण सबमिशनच्या अंतिम तयारीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे असल्यामुळे माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते . त्यादिवशी कॉलेज संपले आणि मी खाली लायब्ररी मध्ये बसलो . अचानकपणे त्यादिवशी नेमके माझ्याकडे व्हॅन गॉगचे माधुरी पुरंदरे लिखित पुस्तक वाचनात आले .त्या व्हॅन गॉगच्या पुस्तकावर मी हळूच माझे मस्तक टेकवले आणि मनात म्हणालो " कसा रे बाबा उन्हातान्हात उपाशी हिंडून तू चित्रे काढलीस ? तुझ्या मागे तुझा भाऊ थिओ होता . माझ्या मागे तर कोणीच नाही .तुला चित्रांची भूक लागली होती की स्वतःला व्यक्त करण्याची भूक लागली होती ? पण आता माझ्या पोटात लागलेल्या भुकेचे मी काय करू ? हे पुस्तक वाचून झाल्यानंतर संध्याकाळी मी उपाशी चालत चालत घोलेरोड वरच्या माझ्या वसतिगृहाकडे निघालो .सगळी हॉटेल्स टपऱ्या वडापावची दुकाने मला आवडेनाशी झाली . त्यांच्या बोर्डाकडे मी बघायचं टाळायचो .खिसा रिकामा असला की माणूस सरळ चालतो , मान देखील इकडेतिकडे वळवत नाही . मी स्वतःला सावरत हळू चालत निघालो होतो .बालगंधर्व येथील पुलावरून जाताना मात्र मी आता पडतो की काय ? असा मला सतत भास होत होता . अशक्तपणा आल्यामुळे शरीर साथ देत नव्हते . मी त्या रेलिंगला धरून हळूहळू चालत निघालो . खूप उशिरा मी वसतीगृहात गेलो . भरपूर पाणी प्यायलो आणि शांतपणे अंगावर चादर घेऊन झोपी गेलो .आजचा दुसरा दिवस मी पूर्णपणे उपाशी होतो . सकाळी परत चालत अभिनवला निघालो आता तर पाऊले हळूहळू पडत होते . पोटात भुक व शरीराला अशक्तपणाची सतत जाणीव होत होती .कॉलेजला उशिरा पोहोचलो . प्रेझेंटी होऊन गेली होती . त्यामूळे उशीरा आल्याचे पाहून सरांनी मला बोलवले माझ्याकडे प्रोजेक्टच्या कामाची सबमिशनची माहिती विचारली . माझ्याकडे काहीच तयारी नव्हती . मग सर ही रागवले .त्यांनी बरेच मोठे लेक्चर दिले . मी खाली मान घालून उभा होतो . त्या लेक्चरने मला वाईट वाटण्यापेक्षा आणखी भूकच लागली . गरिबीची जाणीव असल्यामुळे , भीडस्त स्वभाव असल्याने कोणाकडे पैसे मागायची माझी हिम्मत होत नव्हती. कॉलेज संपले आणि होस्टेलकडे चालत जाणे म्हणजे मला मोठी शिक्षाच वाटू लागली . लायब्ररीत उपाशी बसवेना .दुपारी चालत जाताना पाहत होतो सगळेजण जेवत होते . कोणी वडापाव खात होते . खाणारी माणसे आता मला माझी दुश्मन वाटत होती .त्यांच्याकडे बघण्याचा मोह मी टाळत टाळत हळूहळू होस्टेलला पोहोचलो . भूक एक विचित्र प्रक्रिया आहे . पहिल्यांदा भुकेची जाणीव होते . डोळे भिरभिरू लागतात .नाकाची वासकेंद्रे प्रभावी होतात .सगळीकडे खाण्याचे पदार्थ अतिस्पष्ट दिसू लागतात . पदार्थ खाण्यासाठी जीवाची तगमग वाढते व मन चळवळू लागते . तो पदार्थ खाल्ल्यावर कसा लागेल हे आपल्याला न खाताच चवीने कळायला लागते .पोटातून थोडा आवाज येतो . हळूहळू आवाज मोठा होऊ लागतो ,पोटात खड्डा पडल्याची जाणीव होते .बघता बघता हा खड्डा मोठा मोठा होत जातो .काहीतरी आत खडुयात घुसळत आहे अशी जाणीव होते .घुसळण होण्याचा वेग मग वाढत जातो आणि मग लोहाराच्या सतत हालणाऱ्या भात्याप्रमाणे भूक आपला पूर्ण ताबा घेते . डोळे मांजरीसारखे अतिशय तीक्ष्ण होतात . कुठे बिस्किटे कुठे छोटे छोटे सांडलेले चणे फुटाणे सारखा लहान पदार्थही लगेच दिसतात . एखादा छान वास आला की तिकडे इच्छा नसूनही डोळे फाडून फाडून काय आहेत पदार्थ ते बघावेसे वाटतात . मनाची अवस्था त्या पदार्थावर कधीच झडप मारून कधी गिळंकृत करू अशी इच्छा वारंवार होते . आपण पाणी पिल्यावर ती घुसळण अजून लयदार होते . अचानकपणे पोटात बेडका सारखा डराव डराव असा आवाज होऊन आतडी आतल्या आत वळवळू लागतात .आता आपण काही खाल्लं नाही तर कासावीस होऊन मरणार की काय ? अशी संवेदना वेगाने होऊ लागते .पंचप्राण गळ्याशी येतात व अस्वस्थ मन आणखी वेगाने सैरभैर विचार करू लागते . ही अशी अस्वस्थता हळू हळू इतकी वाढते की बस आता संपलो की काय ? असे वाटते . पोटात इतकी आग पडते की घुसळणारे पोट मफलरसारख्या एखाद्या कपड्याने पोट घट्ट बांधावे असे वाटते . पण तो कपडा बांधूनही घुसळन काही थांबतच नाही .डोळ्यात अधाशीपणा व डोक्यात भुकेच्या मुंग्या सारख्या वाढू लागतात . एखाद्या मेलेल्या प्राण्यावर झडप मारावी तशा या मुंग्या मेंदूवर हल्ला करून जीव भणभणाणून सोडतात .भुकेमुळे जीव नकोसा वाटतो .आपण म्हणजे नक्की कोण आहोत हेच कळत नाही . डोके ? मन ? शरीर ? बुद्धी ? आत्मा ? का आतमध्ये वळवळ करणारी आतडी ? कशाचाही काहीच संदर्भच लागत नाही . मग हा असह्य होणारा बांध कधीतरी फुटतोच . उसळी मारून समुद्रातील पाणी जसे खडकावर वेगाने आपटते तशी ही भूक मनातून उसळी मारू लागते . मग भूक पोटापेक्षा डोक्यात वेगवान हालचाली सुरु करते . डोके घट्ट आवळून बांधले तरी विचारांची ही प्रक्रिया थांबतच नाही . अशा ह्या संघर्षमय अस्वस्थ वातावरणात मी रूममध्ये कॉटवर तळमळत पडलो होतो . दुपारचे एक वाजले असावेत होस्टेलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचे डबे घेऊन एक डबेवाला नेहमी यायचा .त्याने त्या प्रत्येक रूमच्या दरवाजा समोर डबे ठेवले , आणि तो निघून गेला . खरी भूक लागली कानही प्रचंड सुक्ष्मपणे काम करू लागतात .माझ्या कानातून मेंदूपर्यंत तो डबे ठेवल्याचा आवाज स्पष्टपणे आला आणि मी चक्क उठून बसलो . बाहेर दरवाजा उघडून अंदाज घेतला डबेवाला गेला होता . कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हते . आजूबाजूला देखील कोणी नाही याची पक्की खात्री करून घेतली आणि शेजारच्या एका रूमबाहेर ठेवलेला जेवणाचा डबा मी पटकन उचलला .मला कोणतेही भान राहिले नव्हते . खरं तर ही एक प्रकारची चोरी होती .पण भुकेमुळे मला काही समजत नव्हते . मी तो डबा उचलून माझ्या रूममध्ये आणला . माझे हात वेगाने हालचाल करू लागले . घाईने तो डबा उघडला त्या भुकेमूळे झटापटीत मला तो डबा कसा उघडायचा हे देखील समजत नव्हते . त्या गडबडीत तो डबा थोडा उपडाच पडला . आणि त्यातील काही अन्नपदार्थ फरशीवर देखील सांडले .पण या सर्वांपेक्षा माझी भूक मोठी होती .मी इतक्या वेगाने खात होतो की माझे मलाच कळत नव्हते .एक घास बत्तीस वेळा चावून खायचा असतो ,जेवण करताना शांतपणे खायचे असते हे थोर तत्त्वज्ञान त्यावेळी मला जराही आठवले नाही . खरी भूक लागल्यानंतर व भरपूर खाल्ल्यानंतर पोटात एक विस्मयकारक चमत्कार होतो .सागरांच्या लाटांवर जशा नौका हळुवारपणे अल्हाददायकपणे विहार करत असतात तशी आनंदाची एक वेगळीच समाधानाची तृप्ती मनात तयार होते . आपल्या सार्‍या चित्तवृत्ती अतिशय प्रफुल्लित होतात .आणि हे जेवण तर मी तीन दिवसानंतर मी खाल्ले होते . पण हे समाधान थोड्याच वेळात संपुष्टात आले .कारण तो खाल्लेला डबा माझा नव्हता . त्यातील अन्न खाण्याच्या अधिकार माझे नव्हते . परंतु परिस्थितीने हे वाईट कृत्य माझ्याकडून करवून घेतले होते .परिस्थिती विपरित असली की माणसाला आपले सगळे धागेदोरे , तत्वे , नियम बाजूला ठेवावे लागतात याची मला चांगलीच प्रचिती आली . थोड्याच वेळात इंजिनिअरिंग कॉलेजची मुले होस्टेलला परत येऊ लागली .अगोदर मी खाल्लेला रिकामा डबा मी बाहेर दरवाजा उघडून शेजारी होता त्या जागेवर ठेवला . रूम मध्ये परत आलो . त्या डब्याचा मालक म्हणजे माझा अतिशय जवळचा एक मित्र होता . त्याला देखील कडकडून भूक लागलेली होती . त्याने आल्याआल्या घाईने तो डबा आत उचलून ठेवला .आणि थोडा फ्रेश झाल्यानंतर तो डबा खायला जाणार तर डबा रिकामा आणि खरकट्या अवस्थेत दिसला . आणि माझ्या मित्राचे टाळकेच सटकले . भुकेने व्याकूळ झालेला हा मित्र हवालदिल झाला होता . पण डबा नक्की कोणी खाल्ला याची त्याला माहिती नव्हती . ते मागासवर्गीय मुलांचे हॉस्टेल होते . समाजातील सर्वात खालच्या स्तरातील मुले येथे उच्चशिक्षणासाठी आलेली होती . त्या मुलांची परिस्थिती देखील अतिशय बिकट गंभीर व खालावलेलीच होती . तो माझा मित्र कधी नव्हे तो भूकेने खूप बिघडला त्याला भूक कंट्रोल होत नव्हती. त्याने शिव्यांची लाखोली द्यायला सुरुवात केली . तो कॉरिडॉरच्या मध्यभागी आला आणि मोठ्याने माझा डबा खाणाऱ्यांच्या आईची xx xx xx माझा डबा खाणाऱ्याच्या आईला xxx xxx माझा डबा खाणाऱ्याच्या बहिणीच्या xx xx मा x x xx x भे xxx . . . . . . . . . जगातल्या सर्व वाईटातल्या वाईट शिव्यांचा त्याच्याकडे अफाट संग्रह असावा . तो मोठ्याने हा संग्रह सगळ्यांसमोर सादर करत होता . इकडे रूममध्ये मला ते शब्द एखाद्या तापवलेली सळई कानात खूपसतात तसे शब्द कानात घुसत होते . हृदयाच्या असंख्य चिंधड्या चिंधड्या उडत होत्या .कोणीतरी तलवारीने किंवा चाकूने आपल्या शरीरावर सपासप वार करत आहेत असे सारखे वाटत होते . मी माझे दोन्ही गुडघे जवळ केले .कानावर मोठे कापड बांधले .दोन्ही हाताची घट्ट झडप कानावर ठेवली .आणि हाय रे देवा ! कानात पडणारे शिव्यांचे आवाज थांबतच नव्हते . उलट त्या शब्दांचा इको तयार होऊन कानावर आणखी मोठे आवाज येऊ लागले . एक वेळच्या जेवणासाठी मी लाचार , दिनदुबळा , मलूल झालो होतो .निराधार झालो होतो . शरीरात खाल्लेल्या अन्नाचे पाणी पाणी झाले होते . सगळी भूक लगेचच खाडकन उतरली होती .मन ,शरीर , आत्मा ,बुद्धी सगळे अवयवच संवेदनाहीन झाले होते . डबा खाल्लेले अन्न जरी शरीरात मिसळून गेले होते तरी मनावर पडलेल्या शब्दांच्या जखमा मात्र कायम व्रण करून गेल्या .त्या दिवशी मी रूममधून बाहेर पडलोच नाही . माझ्या या लाचार परिस्थितीचा मला स्वतःलाच तीटकारा आला . मी कॉलेजला जाणे सोडून दिले . मुंबईला जावून परीक्षा देण्याचे स्वप्न सोडून दिले . माझे सर्व सामान घेऊन मी आंबेडकर हॉस्टेलही सोडून दिले . आणि परत पाचगणीला घरी गेलो .घरी गेल्यानंतर दरवाज्यामध्ये प्रवेश करताच वडील म्हणाले " मला खात्री होती की तू चित्रकलेचे शिक्षण घेऊन " भिकारी " होऊन परत माझ्याच दारामध्ये येशील ! "हे ऐकल्यानंतर घरात गेलोच नाही आणि तसाच माघारी फिरून माझ्या दीपक चिकणे नावाच्या मित्राच्या घरी राहिलो . थोड्या दिवसानंतर स्वस्त जागा मिळते म्हणून पाचगणीच्या जवळ आता पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार गावामध्ये एक छोटी खोली घेऊन राहू लागलो . आता मला एक वेगळी भूक लागली होती .शरीराच्या भुकेपेक्षा झालेला अपमान भरून काढण्याची . परिस्थितीला टक्कर देऊन स्वतःला सिद्ध करण्याची मला खरी भूक लागली . माझ्या हातात असलेल्या चित्रकलेची महती , जादू सिद्ध करण्याची ही भूक होती . माझ्यात आता खरोखरच व्हॅन गॉग पूर्णपणे संचारलेला होता .मग कागद-पेन - पेन्सिल्स - ब्रश हँडमेडचे पॅड जलरंगाचे सामान घेऊन मी भिलार , कासवंड , दानवली , रुईघर , दापवडी ,काटवली ,खिंगर ,राजपुरी ,दांडेघर व टेबललॅन्डच्या विस्तीर्ण पठारांवर दिवसभर व्हॅलीमध्ये रानोमाळ भटकायचो . त्यावेळी चित्रकलेची साहित्याने भरलेली बॅग व मोठी टोपी माझ्या डोक्यावर सतत असायची . सातत्याने चित्रनिर्मिती करायची याचीच मला मोठी भूक लागली होती . कितीतरी चित्रे त्या झपाटलेल्या अवस्थेत माझ्याकडून झाली . जेवणाची आता मला आठवण येत नव्हती . शरीराला तशी सवयच लावली .दिवसभर भटकून आलो की त्या माझ्या दिडशे रुपये भाड्याच्या खोलीत मी परत चित्रच काढत बसायचो . या छोट्या खोलीत रियाज , हेमंत व जयवंत भिलारे व इतर अनेक जवळपासची छोटी छोटी मुले आवडीने यायची . जयवंत भिलारेच्या वडिलांचे सदाशिव भिलारे ( अण्णा ) यांचे विसावा नावाचे छोटे हॉटेल होते . आजही आहे. त्या हॉटेलातील वडा तळलेल्या बेसणाच्या कण्या किंवा चुरा , उरलेल्या तेलकट भज्यांचे तुकडे आणि एखादा कधीतरी मिळणारा फुकटचा पाव खायचो .रोज तेच तेच खाऊन माझ्या तोंडावर असंख्य मुरुमांचे मोठे फोड आलेले होते . शरीर तर पूर्ण अशक्त झाले होते . पण मन मात्र दिवसेंदिवस कणखर होत गेले .आता शरीराला अन्नाची भूक कमी चित्रनिर्मितीची भूक प्रचंड लागलेली होती . पाचगणी मध्ये एम .आर .ए सेंटर नावाची राजमोहन गांधी यांनी बांधलेली एक संस्था मोठी प्रसिद्ध आहे . या संस्थेमध्ये ट्रस्टी मंडळीची एक मिटींग होती .या मीटिंगसाठी मुंबईतील केमोल्ड आर्ट गॅलरीचे मालक व प्रसिद्ध चित्रकलाविक्रेते श्री .केकू गांधी आलेले होते .त्यांना कोणीतरी माझ्याविषयी सांगितले आणि ते त्यांच्या ड्रायव्हर सोबत मला शोधत शोधत भिलारला आले .त्यांनी माझा अवतार व खोलीभर पसरलेली चित्रे पाहिली . आणि कौतुकाने आनंदाने ते भारावून गेले . लिटल व्हॅन गॉग ऑफ इंडिया ! असे म्हणत त्यांनी माझे अभिनंदन केले . या ठिकाणी राहून तुझे काही होणार नाही , तुला मुंबईला माझ्या सोबत यावे लागेल तरच तुझ्या कलेची किंमत होईल आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुला करीन असे त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी त्यांच्यासोबत मुंबईला यायला तयार झालो . केकू गांधी ही एक अजब वल्ली आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक चित्रकारांना मोठे केल्याचे मी ऐकले होते . त्यांच्यासोबत मी लॅन्डसएंड बांद्रा येथे असणाऱ्या केकी मंजिल या अलिशान बंगल्यामध्ये रहायला आलो . ( आता केकी मंजिलच्या शेजारी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा ' मन्नत ' बंगला आहे . ) केकू गांधी यांच्याविषयीची आठवण व प्रवास मी नंतर कधीतरी सविस्तर लिहीन .काही दिवस मुंबईत राहील्या नंतर केकू गांधींनी मला पुढे दिल्लीला पाठवले . पाचगणीची गल्ली ते दिल्ली हा माझा प्रवास फारच आगळावेगळा आणि नाविन्यपूर्ण झाला .त्यांनी मला फ्रान्सला पाठवण्याचे ठरवले होते . पॅरीस येथील सुप्रसिद्ध आर्ट स्कूलमध्ये चित्रांच्या रिस्टोरेशनचा कोर्स पूर्ण करावा यासाठी मला पाठवण्याचे नक्की केले . सर्व कागदपत्रांची पूर्तता करताना अभिनवचे अंतिम डिप्लोमाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट हवे होते . परंतु मी परीक्षा दिली नाही ही सत्य परिस्थिती मी त्यांना सांगितले .मग त्यांनी कॉलेजला प्राचार्यांशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला सहा महिने उपस्थित राहून परीक्षा देता येईल असे सांगितल्यामुळे 1992 साली मी डिप्लोमा कमर्शियल आर्टची डिग्री मिळवण्यासाठी परत पुण्याला आलो . केकू गांधी यांच्यामुळे माझ्याकडे आता पैसे होते .म्हणून मी कॉलेजजवळ असलेल्या शुक्रवार पेठेत गांधीवाड्यात भाड्याने रुम घेतली व बादशाही येथे टिळक रोडला जेवणाची मेस लावली . एकदा रविवारी मी घोले रोडवरच्या आंबेडकर हॉस्टेलवर सहज गेलो . मला रूम नंबर 28 मध्ये जायचे होते .प्रचंड भुकेच्या वेळी ज्याचा डबा खाल्लेला होता त्या मित्राला मला भेटायचे होते .त्या मित्राचे नाव मी मुद्दाम सांगत नाही कारण तो देखील आता मोठा सरकारी अधिकारी असून उत्तम पद्धतीने स्थिरस्थावर झालेला आहे . मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी हा मित्र उदासपणे खुर्चीवर बसलेला होता .वसतिगृहात राहत असताना तो बामसेफ व इतर आंबेडकर चळवळीमधील सक्रिय कार्यकर्ता झाला होता . त्याच्या या भलत्याच कर्मामुळे इंजिनिअरिंग मध्ये सलग दोन वर्षे नापास झालेला होता . त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला पैसे पाठवणे बंद केले होते . आणि त्याची आर्थिक नाकाबंदी चांगलीच झालेली होती .अशा विचित्र परिस्थितीत माझा हा मित्र दोन दिवस झाले जेवलेला नव्हता .आयुष्य कसं विचित्र असतं ना! कधी कोणाची बाजी किवां पारडे कधी पलटले जाईल हे नक्की सांगता येत नाही . मी खूप दिवसांनी त्याला भेटल्यामुळे तो खूप खुश झाला . त्याची कर्मकहाणी ऐकून व असहाय्य अवस्था बघून मी त्याला जेवणासाठी सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये येण्याचे आमंत्रण दिले . त्याला जे आवडेल ते पदार्थ खाण्याची ऑफरही दिली . क्षणभर माझ्या मित्राला आपल्या आयुष्यामध्ये असे काही पदार्थ खायला मिळतील याचा विश्वासच बसत नव्हता .त्या संध्याकाळी माझा मित्र मनसोक्तपणे जेवत होता , अधाशीपणे खात होता , पण मी मात्र तो खाताना त्याच्याकडे पहात समाधानाने कृतार्थ होत होतो . त्याला आवडणाऱ्या नॉनव्हेज पदार्थ खाण्याचे त्याचे स्वप्न कितीतरी दिवसांनी पूर्ण होत होते ,आणि मी त्याला अजून खाण्याचा आग्रह सतत करत होतो .त्याचे पोटभरुन खाणे झाले तो तृप्त झाला .आईस्क्रिम खाल्यानंतर मी त्याला सोडायला घोले रोडच्या आंबेडकर हॉस्टेलला निघालो . मग मी त्याला रस्त्यातच विचारले " दोन वर्षांपूर्वी तुझा एकदा कुणीतरी डब्बा खाल्ला होता तो माणूस सापडला का " ? असे विचारताच त्याने चमकून माझ्याकडे पाहिले व म्हणाला " शेवटपर्यंत त्याचा शोध लागला नाही . " मग मी त्याला तो डबा मीच खाल्ला होता असे सांगितले . हे ऐकताच तो खूप भारावला व हळहळला , दुःखी झाला.भर रस्त्यामध्येच त्याने मला मिठी मारली . त्यावेळी त्याने डबा खाणाऱ्याला खूप शिव्या दिल्या त्याचे आता वाईट वाटत आहे ,असे सांगून यापुढे कधीही कोणाही उपाशी माणसाला परत कधी आयुष्यात शिव्या देणार नाही अशी प्रेमाने कबुलीही दिली व आजच्या भरपेट सुग्रास जेवणाचा आनंद दिला त्याबद्दल आभारही मानले . म्हणाला " मित्रा दोन दिवस उपाशी होतो , आज तर खूप मोठी खरी भूक लागलेली होती .तू अगदी योग्यवेळी देवदूतासारखा आलास . आजचा दिवस माझ्या कायम लक्षात राहील . जीवनात खरी भूक लागल्याशिवाय जेवणाची किंमत कळत नाही हे अगदी खरे आहे . पुढे आयुष्यात ही भूकेची गोष्ट व जाणीव सतत ठेवल्यामुळे माझ्यावर उपाशी राहण्याची व कोणाचा गुपचूप डबा खाण्याची कधी परिस्थिती आली नाही . आजही तोडांवरील पुसून चाललेले मुरमांचे खड्डे पाहीले की मला 'भूक ' आठवत राहते . पण कोरोनाच्या या संकट काळात कितीतरी लोकांच्या नोकर्‍या गेल्या . कितीतरी जणांच्या कंपन्या , दुकाने , कारखाने ,छोटेमोठे उद्योगधंदे , व्यापार , ऑफीसेस बंद पडली. कितीतरी लोकांना घरी बसावे लागले . त्यात कडक लॉकडाऊन मुळे बाहेर पडण्याचीही मुश्कीली झाली . किती तरी छोटी मोठी माणसे मृत्युमुखी पावली . कितीतरी जणांचे मित्र-मैत्रिणी , आप्तमंडळी , जवळचे नातेवाईक यांना मृत्यूला सामोरे जावे लागले . या मृत्यूमुखी पडलेल्या जीवांची तर गणतीच नाही . त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही किंवा सांत्वन , श्रध्दांजलीही नीट वाहता आली नाही . या लॉकडाऊनच्या काळात कितीतरी माणसांना खरंच मोठी भूक लागली होती अशा वेळी त्यांची भूक भागवणारी मंडळी देवदूतासमानच वाटली असतील नाही का?* कोणालातरी ज्ञानप्राप्तीची खरी भूक असते. * कोणाला राजकारणाची भूक असते .* कोणाला वाद-विवाद सतत भांडणाचीच भूक असते* कोणाला सतत चमकत राहायची प्रसिध्दीची हाव ,मोठे व्हायची भूक असते .* कोणाला मोठा कलाकार ,मोठा चित्रकार , मोठा शिल्पकार , मोठा कवी, * मोठा लेखक , मोठा अभिनेता बनण्याची भूक असते .* कोणाला मोठा शास्त्रज्ञ होऊन नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्याची भूक असते . * कोणाला मोठा बिल्डर होऊन आपले शरीर कमवण्याची भूक असते . * कोणाला मोठा बांधकाम व्यावसायिक होऊन मोठ्या इमारती बांधण्याची भूक असते .* कोणाला नामवंत वकील होऊन कायदेपंडित होण्याची भूक असते .* कोणाला मोठा उद्योजक होऊन आणखी मोठ्या उंचच उंच इमारतीत राहण्याची भूक असते .* कोणाला रिसर्च करून पीएचडी मिळवण्याची भूक असते . * कोणाला मोठा माणूस होऊन सरकारी कलेक्टर , एस.पी सारखे क्लासवन अधिकारी बनण्याची भूक असते . * कोणाला मोठा आमदार ,खासदार , पंतप्रधान , राष्ट्रपती बनण्याची भूक असते . * कोणाला मोठे स्मारके ,मंदिरे , मोठे पुतळे बांधण्याची भूक असते * कोणाला सतत जातीपातीतले धार्मिक विसंवाद निर्माण करण्याची भूक असते .* कोणाला गरिबांना आणखी गरीब करून त्यानां आणखी लाचार करण्याची भूक असते .* कोणाला खूप मोठमोठ्या बढया मारायच्या , खोटी आश्वासने द्यायची भूक असते.* कोणाला आपली जात , धर्म , प्रांत, क्षेत्र , उच्च कुळ , स्वतःचे सतत श्रेष्ठत्व करण्याची भूक असते.* कोणाला कोणाचे बरे चालले असेल तर त्यात खोडा घालायचा , त्याच्यासमोर अडचणी निर्माण करायच्या , खोट्या कोर्ट केसेस करून सतत दुसऱ्याला नामोहरम करण्याचीही भूक असते .* आता सगळ्या समाजाला , सगळ्या जातीवर्गाला एक नवी भूक लागू लागली आहे आणि ती आहे आरक्षणाची भूक . सगळ्यांनाच आरक्षण पाहीजे .तर असे हे भुकेचे असंख्य ,अगणित प्रकार आहेत. तर असे हे लोकांच्या भूकेचे वेगवेगळे प्रकार असतात . असमाधानी लोकांची भूक कधीही न संपणारी नसते , ती सतत वाढतच रहाते. आपण या आयुष्यात माणूस म्हणून जन्माला आलो . येताना आपण एकटेच जन्माला आलो , काहीही सोबत घेऊन आलो नाही आणि जाताना आपण एकटेच या पृथ्वीवरून काहीही सोबत न घेता जाणार आहोत . आपण ज्यावेळी मरतो त्यानंतर आपली राख तयार होते . त्या राखेमध्ये आपली हाडे गोळा करून अस्थिकलश तयार करतात व तो अस्थिकलश देखील नदीच्या प्रवाहात किंवा समुद्रात सोडून देतात . मग काय राहीलं आपले अस्तित्व . शुन्य . मोठे शुन्य . हे एकदा समजले की खरी ' माणुसकी ' जपणे सुरु होते . दुसऱ्यांच्या वेदना या आपल्याच वेदना आहेत हे समजून घेऊन माणसाने माणसाशी माणसासारखे माणुसकीनेच वागावे याची अंतरमनातून जाणीव होऊन खरी भूक प्रत्येक माणसाला ज्यावेळी लागेल त्यावेळी या जगात कोणीच उपेक्षित व उपाशी राहणार नाहीत .आणि हीच खरी🌟 " माणूसकी "🌟 जपण्याचीच मोठी ' भूक ' सर्वानां सतत लागली पाहिजे .🍞🥪🍞🥪🍪🧆🍱🥞🥯🍔🍞🥪🍔🍞🍔🥪🧇🥯🥪🌮सुनील काळे✍️9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...