ब्लॉग संग्रहण

बुधवार, १६ जून, २०२१

महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले

 महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले

🎼🎵🎼🎷🎼🎺🎼🎸🎼🪕

              

          मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे . चोहो बाजूने प्रचंड विस्तारलेले शहर , प्रचंड मोठी धावपळ , गजबज , आणि सतत  धावायला लावणारे शहर आहे . या शहरात कितीतरी प्रकारची नानाविध क्षेत्रातील , वेगवेगळ्या स्वभावाची ,  जाती धर्माची , सर्व पंथाची जगातील व राज्यातील सर्व भागातून असंख्य माणसे त्यांची रंगीबेरंगी स्वप्ने , ध्यास घेऊन पूर्ण करण्यासाठी सतत येत असतात . काहीजण नेटाने अथक प्रयत्नाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अविस्मरणीय यश प्राप्त करतात .त्यांच्या अंगभूत कलेचा सतत रियाझ करून , वेगळ्या वैशिष्ठ्यपूर्ण गुणांमुळे या महानगरीत स्वतःचे एक उत्तम स्थान निर्माण करतात तर काहीजण हरतात , थकतात आणि कधी कधी निराश होऊन परत जात असतात . गावाकडे कायमचे परत प्रयाण करतात.

            1992 साली मला केकू गांधी या केमोल्ड आर्ट गॅलरी व मोठी फ्रेमिंगची कंपनी असलेल्या कलारसिक पारशी माणसामुळे पाचगणीतून मुंबईला येण्याची अचानक ऑफरच मिळाली . चित्रकाराची जी स्वने असतात त्याप्रमाणे माझी  आभाळभर खूप मोठ्ठ होण्याची स्वप्नांची भलीमोठी पोतडी घेऊन या मुंबईनगरीत मी दाखल झालो . मी प्रथमच मुंबईत राहायला आलो होतो आणि तेही 

' केकी मंझील ' या बांद्रयाच्या लँडस एन्ड जवळ अलिशान दगडी हेरिटेज वास्तूमध्ये . राहण्याच्या इतक्या सुखसुविधा असतात हे प्रथमच अनुभवत होतो. मुंबईच्या गगनचुंबी इमारती , बंगले , गाड्या , वस्त्या , आर्ट गॅलरी , चित्रपटगृहे , ट्रेन , बसेसची गर्दी नव्याने अनुभवत होतो . केकू गांधी यांचे चित्रकलाक्षेत्रात मोठं नाव होते , अशा माणसाचा माझ्यावर वरदहस्त होता त्यामूळे मला चित्रकार म्हणून यशाच्या पायऱ्या लवकर चढता येतील अशी माझी समजूत होती . गांधी यांच्या अनेक फ्रेमिंगच्या शाखांपैकी एक शाखा लोअर परेलच्या मोठ्या जागेत नव्याने सुरुवात केली होती . त्याचा प्रमुख म्हणून मला काम करावे लागणार होते . आमच्याकडे नेहरू सेंटर , ताज , ओबेरॉय , लीला हॉटेल व जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित होणाऱ्या प्रसिद्ध चित्रकारांची , फोटोग्राफर्सची सर्व प्रकारची उत्तमोत्तम महागडी चित्रे फ्रेमिंगसाठी यायची . केमोल्ड फ्रेमचे नाव व काम उत्तम असलेने भारतातील मोठी प्रसिद्ध मंडळी व परदेशातील राजदूतांचे तेथे येणेजाणे असायचे . माझे भौतिक विश्व विस्तारत होते पण मी मनाने दिवसेंदिवस खचत चाललो होतो .

             फ्रेमिंगसाठी सर्वांनाच कमीतकमी एक महिन्याची वेटींग लिस्ट असायची . त्यामुळे कामाचा व्याप मोठा होता. आमचे वर्कशॉप सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सतत सुरु ठेवावेच लागायचे अफाट काम होते . मी चित्रकार बनण्याची स्वप्ने घेऊन स्वतःला कलेच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मुंबई शहरात आलो होतो पण ब्रश , रंग , कागद , कॅनव्हास , यानां स्पर्श करायला मला पाच मिनिटही वेळ नव्हता . कारण मी तेथे प्रमुख होतो , जास्तीत जास्त फ्रेम्स करून दिलेली वेळ पूर्ण करायची सतत घाई असायची एक लॉट संपला , जरा उसासा घेत नाही तोपर्यंत दुसरा लॉट यायचा आणि मी पक्का मुंबईकर झालो . खरं सांगायचे तर पूर्णपणे हळूहळू यंत्रवत धावणारा , पोटापाण्यासाठी जगणारा यंत्रमाणूस झालो.

              1993 साली माझे लग्न झाले आणि राहण्यासाठी मला स्वतःची जागा घेणे भाग पडले . नालासोपारा पश्चिमेला मी कंपनीचे पर्मनंट नोकरीचे पत्र घेऊन बँकेचे कर्ज घेऊन फ्लॅट घेतला होता. त्यानंतर माझा रोजचा त्रासदायक विचित्र प्रवास सुरु झाला . नालासोपाऱ्यावरून लोअर परेलला येण्यासाठी दादरला उतरावे लागायचे . मग स्लो ट्रेनने लोअर परेल वर्कशॉप , मग गाडीने प्रिन्सेस स्ट्रीटच्या ऑफीसला , तेथून टॅक्सीने जहाँगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर . सर्व चित्रकारांची प्रदर्शने दोन मिनिटात मी पाहायचो कारण तेथून परत लोअर परेलला वर्कशॉपला जावे लागायचे तर कधी वसईच्या फॅक्टरीलाही जावे लागायचे . 

            जहाँगीरची सतत प्रदर्शने पाहून या गॅलरीत माझी चित्रे कधी लागतील का ? असा प्रश्न मला सतत पडायचा कारण माझा दिवस  सकाळी 7 ते रात्री 11 असा व्यस्ततेतच मावळायचा . चार वर्षात प्रखर इच्छा असूनही चित्रे काढायचेच मी विसरलो होतो ,मी कंटाळलो होतो निराश झालो होतो . 

              पाचगणी महाबळेश्वर परिसरात एखादे कलादालन निर्माण करून भरपुर कलानिर्मिती करायची व सातारा जिल्ह्यात स्वतःची व इतर कलाकारांचीही चित्रे विकायची असा पक्का निर्धार करून मी मुंबईच्या विश्वाला कायमचा रामराम केला , व परत कधीही न येण्याचा ठराव मनाशी ठरवला . एका नव्या स्वप्नाने मी भारावलो होतो .

                पाचगणीत अनेक जागा शोधायला सुरुवात केली . त्यावेळी जकात नाक्याजवळ सिडने पॉईंटच्या पायथ्याशी रस्त्यावर जुना पडीक दुर्लक्षित अवस्थेतील  " पॅनोरामा व्ह्यू " नावाचा बंगला धनावडे यांच्या एकत्रित कुटूंबाच्या मालकांचा असल्याचे कळले . त्यातील दोन भावानां गाठून मी तो बंगला भाड्याने घेतला . जुनाट , पडीक अवस्था असलेल्या बंगल्याला  कमीतकमी खर्चात मला आर्ट गॅलरीत रुपांतरीत करायचा होता. बंगल्यातील मोठ्या सागवानी खिडक्या झाकायच्या होत्या त्या तोडता येणे शक्य नव्हते . चित्र लावण्यासाठी सपाट भिंत तयार करण्याचे मोठे आव्हान होते . मग मला आठवले की अब्दुल रहिमान स्ट्रीटवर पिवळसर गवताच्या चटयांचे मोठी बंडले विकायला असायची . पाच फूट उंचीची व साठ सत्तर फूट लांबीची ही चटई मशिदीत एकत्र नमाज म्हणताना वापर केली जायची . अशी अनेक चटईची बंडले मी खरेदी केली व सागवानी लिपिंग पट्टया मारून या जुनाट खिडक्या झाकल्या . सफेद रंगाच्या भिंतींवर चित्रे पाहण्याची सवय असलेल्या कलारसिकानां या गॅलरीचे गवताच्या चटईचे इंटीरियर खूपच आवडायचे . अशा रितीने आमची  " पांचगणी आर्ट गॅलरी " सुरु झाली . अनेक देशविदेशातील पर्यटक , कलारसिक  व शाळेचे विद्यार्थी यांचा देखील प्रतिसाद उत्तम मिळू लागला .

             एके दिवशी सफेद शर्ट , काळी पँट , फूल शर्टाच्या हाताच्या बाह्या कोपऱ्यांपर्यंत दुमडलेले ,सावळ्या वर्णाचे एक गृहस्थ तोडांतील सिगारेट विझवत प्रदर्शन पाहायला आले . पाचगणीसारख्या छोट्या गावात इतकी छान आर्ट गॅलरी सुरु केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले व कडकडून मिठी मारली . मी मुंबई सोडून कायमचा पाचगणीत राहायला आलो याचे त्यानां खूपच कौतुक वाटत होते . एखादा जुना मित्र अचानक खूप वर्षांनंतर भेटावा आणि त्याच्याशी किती बोलू अशी आमची अवस्था पहील्या भेटीतच झाली होती . पुढे ते अनेक वेळा आर्ट गॅलरीला यायचे त्यांच्या प्रत्येक भेटीत आम्ही मुंबईच्या गर्दीला , ट्रॅफीकला , विरार टू चर्चगेट या लोकल ट्रेनला , मुंबईच्या धावपळीच्या व सतत अस्वस्थ माणसांच्या " मुंबई " मनोवृत्तीला भरपूर शिव्या घालायचो . त्या भेटीत मुंबईतील धावपळीचे जीवन या एका विषयावर आम्ही कित्येक तास एकमेकाला टाळी देत दिलखुलासपणे , एकमताने मुंबईला परत न जाण्याचा निर्धार पक्का करायचो . या गृहस्थाचे नाव त्याने हेमंत भोसले असल्याचे सांगितले .

              हेमंत व्यावसायाने पायलट होते. त्यांचे स्कॉटलंडला एक निवासस्थान होते . मालाज फॅक्टरीच्या समोर भोसे गावात दाऊद इस्टेट नावाची मोठी बंगल्याची श्रीमंत लोकांची सोसायटी आहे . तेथे एक एकराच्या जागेत त्यांनी अप्रतिम बंगला बांधला होता. समोर कृष्णानदी , कमळगडाचे डोंगर व खाली सगळीकडे स्ट्रॉबेरीच्या शेतीचा हिरवागार नयनरम्य परिसर होता. त्या हवेशीर ब्रिटीश टाईप बंगल्यात त्यांनी युरोपियन चित्रकारांच्या प्रिंटस लावल्या होत्या त्या पाहण्यासाठी त्यांनी मला एकदा बंगल्यावर बोलावले होते.

               एका संध्याकाळी मी त्या बंगल्यात पोहचलो . परदेशातील चित्रपटात जसा बंगला दाखवतात तसाच युरोपिअन कलरस्किमचा , उत्तम सजावटीचा तो बंगला नव्यानेच बांधला होता . मला आजही लक्षात आहे की त्या बंगल्याच्या त्रिकोणी उंच कमानीवर एक वाऱ्याची दिशा दर्शवणारा पातळ धातूचा  कोंबडा बसवला होता . 

(Wind Indicator) अगदी साधी जरा जरी वाऱ्याची झुळूक आली तरी कोंबडा लगेच वाऱ्याची दिशा दाखवायचा . जसे जसे वारे वेगाने वाहू लागले की कोंबड्याची गती वेग धरायची . कितीतरी वेळा पाहिली तरी मला ही गंमत भारी वाटायची .

                हेमंतला सिगारेट स्मोकींगची प्रचंड आवड होतीच पण त्या संध्याकाळी त्यानां जेवणाची , खाण्याची , व पिण्याचीही आवड होती हे लक्षात आले . त्यांनी माझी भारीच बाडदास्त केली होती . स्कॉटलंडवरुन आणलेल्या महागड्या बाटल्या , नक्षीदार ग्लासेस व काजू ,बदामाच्या बश्या  भरलेल्या होत्या . त्यांनी टेबलावर भारी सिगारेटची पाकिटेही ठेवली होती . पण मी काहीच घेत नाही हे ऐकून त्यानां मोठा धक्काच बसला व मी असा कसला न घेणारा  कलाकार आहे ? याबददल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले . युरोपात आणि मुंबईत मोठे कलाकार यांचे हे रुटीन असते व कधीतरी हे सर्व बदल म्हणून घ्यावे असा त्यांनी खूप आग्रह करून समजवण्याचा खूप प्रयत्न केला . पण मी ठाम होतो , मोठ्या नम्रतेने मी त्यानां नकार दिला व फक्त जेवण करून मी निघालो . हेमंतराव थोडे नाराज झाले पण मग त्यानां माझे कौतुकही वाटू लागले . माझी आई खूप चांगले जेवण बनवते , एक मावशी उत्तम फोटोग्राफर आहे , एक मावशी छान चित्रे काढते ती एम. आर. आचरेकर यांची शिष्या आहे असे त्यांनी सांगितले . तुमची आर्ट गॅलरी पाहायला मी त्यानां घेऊन येईन असे सांगत असताना मी त्यांचा निरोप घेतला .

                पुढे बरेच दिवस मी मद्यपानाला नकार दिल्यामूळे हेमंत भोसले माझ्याकडे आलेच नाहीत . मी माझ्या आर्ट गॅलरीच्या व्यापात , चित्रनिर्मितीत मग्न झालो होतो . कधीतरी बाजारात दिसायचे . अप्सरा हॉटेलच्या जानेमन या वसंत दाभेकरच्या स्टॉलवर हातात सिगारेट घेऊन धुम्रपान करण्यात धूंद असायचे . बाजारात सर्वांशी मनमोकळेपणे मिसळून वागायचे . त्यानां वेळ असला की आर्ट गॅलरीत मित्रानां घेऊन यायचे . त्यानां गाण्याची , तबला , पेटी ,संगीताची , सर्व वाद्यांची , ऐकण्याची आवड आहे असे सांगायचे . सोबत असण्याऱ्या मित्रानां माझी ओळख करून देताना त्यानां विशेष आवडायचे . हा कलाकार दारू पीत नाही , सिगारेट ओढत नाही म्हणून तो डिसक्वालीफाईड आर्टिस्ट आहे असे ते म्हणायचे . 

निषेध व्यक्त करायचे .

पण आम्ही दोघांनीही मुंबई कायमची सोडली आहे आणि आता परत तिकडे जाणार नाही यावर मात्र हसून टाळी द्यायचे व आमचे एकमत व्हायचे . मी मुंबईला परत जाणार नाही याचे वचन घ्यायचे व हळूच मला म्हणायचे म्हणूनच तू कलाकार म्हणून आवडतोस .

               एक दिवस अकरा वाजता अचानक एक मोठी गाडी पाचगणी आर्ट गॅलरीच्या समोर उभी राहीली .  आणि त्यातून कोणतीही पूर्वसूचना न देता हेमंत भोसले व त्याची पाचगणीच्या सेंट जोसेफ शाळेत शिकणारी मुलगी अनिका उतरली व दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती बाहेर आली त्या म्हणजे सुप्रसिध्द पार्श्वगायिका आशाताई भोसले . त्या फेमस सेलिब्रटी पार्श्वगायिका आर्ट गॅलरीत येत असतानाच त्यांना माझी ओळख करून देताना हेमंत म्हणाला ही माझी आई . पुढच्या वेळी उषामावशीला भेटवतो . आता मात्र मी चक्रावलो . इतके दिवस आम्ही भेटत होतो पण कोणताही बडेजाव नाही , अभिमान नाही , गर्व नाही त्याने कधी सांगितले 

देखील नाही .अतिशय साधेपणाने राहणारा हेमंत मला खूप भारी वाटला . आशाताईंनी आल्यावर स्वातीला बोलवा म्हणुन आदेश केला . स्वाती किचनमध्ये होती ती घाईने आली .आर्ट गॅलरी पाहून झाल्यावर आशाताई खुपच प्रसन्न झाल्या . त्यानां चटई लावून केलेले इंटिरिअर फारच आवडले . गॅलरीच्या बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये माझी जलरंगातील निसर्गचित्रे लावलेली होती आणि मधल्या हॉलमध्ये माझा मित्र विजय आचरेकरची तैलरंगातील व्यक्तिचित्रे लावलेली होती . प्रत्येक चित्र त्यांनी आस्थापूर्वक पाहीले , चित्राची माहीती विचारली आणि भरपूर कौतुकही केले . तितक्यात स्वातीने त्यानां आदरातिथ्य करण्याच्या पद्धतीने चहा का कॉफी घेणार ? असे विचारले . कॉफी करण्यासाठी स्वाती किचनमध्ये गेली . आणि आशाताईनीं मला एक रिक्वेस्ट केली . 

त्या शांत हळूवारपणे मला म्हणाल्या

"मी या चटईवर बसू का थोडावेळ ?

आता मात्र मी चक्रावलो . शेजारी खुर्च्या मांडलेल्या असताना ही सुप्रसिद्ध गायिका जमीनीवर बसायचे म्हणते म्हणजे काय ?

मी त्यानां खुर्चीवर बसा असे म्हणालो तर त्यांनी चक्क नकारच दिला . 

शेवटी मी त्यानां खाली बसण्याचे कारण विचारले . 

का जमीनीवर बसत आहात ?

त्या म्हणाल्या खूप वर्षांपूर्वी उमेदीच्या काळात मी एका कार्यक्रमासाठी बंगालमध्ये गेले होते . त्यावेळी एका मोठ्या वयोवृद्ध गायकाच्या घरी गेलो होतो . तो गायक मोठा होता पण परिस्थितीही चांगली होती. सक्षम गायक होता. त्याच्या घरी खुर्ची नव्हतीच अशीच सगळीकडे चटई होती . त्या चटईवर मी बसले होते . त्यावेळी ते म्हणाले होते

" माणूस किती का मोठा कलाकार असेना पण त्याचे जमिनीशी असलेले नाते तुटता कामा नये  " . 

एकदा का हे जमीनीशी नाते तुटले की अहंकाराची हवा डोक्यात जाते . माणूस संपतो . चैतन्य संपते . कला संपते .आज खूप वर्षानंतर सगळीकडे  परत चटई पाहीली आणि हे आठवले . मग त्यांनी त्या चटईवरच बैठक मारली . तोपर्यंत कॉफी  आली . सगळ्यांची कॉफी पिवून झाली . पुन्हा प्रदर्शन पाहीले त्यावेळी जाताना त्यानां अभिप्राय वही दिली त्यावर त्यांनी 

ॐ 

फारच सुंदर 

मी काय बोलणार ? 

असा छोटासा अभिप्राय दिला .एक हाफ इंपिरियल साईजचे बंगल्या समोरचे निसर्गचित्र जलरंगात काढायची असाईनमेंट दिली व त्याचे पैसेही लगेच दिले. निरोप घेऊन निघताना दरवाजात आम्हाला हेमंतने थांबवले . त्याच्या गाडीत जावून स्वतःचा कॅमेरा आणला व आम्हाला पायरीवर थांबवून एकमेव फोटो काढला . ( त्यावेळी मोबाईल नव्हते , असता तर खूप फोटो काढून ठेवले असते )

             मी त्यानंतर प्रत्यक्ष स्पॉटवर जावून हेमंत व आशाताईंच्या बंगल्याच्या समोरचे निसर्गचित्र जलरंगात  पूर्ण केले . त्याला फ्रेम करून दिली . ते चित्र आजही त्यांच्या बंगल्यात लावले आहे. हेमंत अधूनमधून भेटायचा . त्याच्या पत्नीला संगीत शिकवायचा , त्यासाठी त्याला साथीला तब्बलजी पाहीजे होता त्यासाठी मनोहर बगाडे (बापू) नावाचा आमच्या मित्राची ओळख करून दिली तो त्यांच्या घरी नियमित जात असे .पण नंतर  तो पर्यंत माझी आर्ट गॅलरीच्या सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात निरनिराळ्या ठिकाणी वाताहात झाली व मी सेंट पीटर्स या  शाळेत नोकरी करू लागलो . हेमंत नंतर स्कॉटलंडला गेला आणि 28 सप्टें . 2015 ला कर्करोगाच्या दिर्घ आजाराने सहासष्टव्या वर्षी त्याचे निधन झाले . 

            नंतर मला आमच्या (बापू ) तब्बलजी मित्राकडून कळाले हेमंत भोसले याने १९७० ते १९८५ पर्यंत  अनपढ  , दामाद , बॅरिस्टर ,  फिर तेरी याद , टॅक्सी टॅक्सी , तेरी मेरी कहानी या सारख्या 15 हिंदी चित्रपटानां संगीत दिले होते . मराठीतही त्याचे आशा भोसले यांनी गायलेले त्यांचे ' शारद सुंदर चंदेरी राती ' हे गाणे खूप गाजले होते . त्याने काही निवडक मराठी गाण्यानांही त्यांनी संगीत दिले होते . पण मुंबईच्या झगमगाटात तेथील वातावरणात दगदगीत त्यांचा जीव रमला नाही व तो सर्वांनां रामराम करून पाचगणीला शांत जीवन जगण्यासाठी निघून आले . पण आपण कोण आहोत ? कोणाचा मुलगा आहे याचा कधीही त्यांनी गवगवा केला नाही . स्वतः कधीही मी आशा भोसले यांचा मुलगा आहे म्हणून फुशारकी मारली नाही.

              आशाताईंच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या गाण्याविषयी त्यांच्या संघर्षाविषयी मी काय बोलणार ? ते तर सगळ्या जगाला माहीत आहे. गेली कित्येक वर्ष त्या गातच आहेत . 12000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत . त्यांच्या गाण्याचे चाहते जगभर पसरलेले आहेत . व त्यासाठी त्यानां कित्येक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. हिंदी , मराठी , बंगाली , गुजराती , पंजाबी , भोजपुरी , तामीळ , मल्याळम , इंग्रजी व रशियन भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत . त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू गुणांनी भरलेले आहे . त्या सर्व गुण वैशिष्ठ्यांवर अनेक लेख लिहलेले आहेत . 

                 मला आजही सिडने पॉईंटला जाताना उजव्या बाजूला पुन्हा पडीक , ओसाड व निर्जीव झालेला " पॅनोरामा व्ह्यू " बंगला दिसतो . तेथे आशाताई , हेमंत भोसले आलेले आठवतात . 

त्यांच्या वर्षा नावाच्या मुलीने सुसाईड केली , त्यानंतर दोन तीन वर्षानंतर सर्वांत मोठा मुलगा  हेमंत गेला . उरात अनेक दुःखाचे प्रसंग घडलेले असताना गाणी मात्र भावपूर्ण ,हसरी व सुखाची 

गायला लागली . किंबहुना त्यानां तशी गाणी गाण्याशिवाय पर्याय नव्हता , व्यावसायामूळे उडती चालीची गाणी गावी लागली , पण त्यांची मनातली दुःखाची किनार त्या गाण्याच्या आशयाला पोहचू दिली नाही हा त्यांचा मला सर्वात मोठा गुण वाटतो . कारण त्यांनी हे जाणले आहे की 

"आपण आपले जमीनीशी असलेले नाते कधीही विसरायचे नाही " 

आणि  ते नाते त्या विसरल्या नाहीत याचा मी साक्षीदार आहे . त्यानां अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेतच .

             आज त्यानां महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन आणखी एक मानाचा मुजरा केला आहे. 

त्याबद्दल आशाताईंचे

मनःपूर्वक अभिनंदन !💐💐

हेमंत भोसले यांच्याकडून साधेपणा शिकलो तर आशाताईंची अनेक गाणी मी ऐकली आहेत त्यांच्या सारखे गाणे म्हणायला मला जमले नाही पण आपण कितीही मोठे झालो तरी जमीनीशी असलेले नाते , मातीशी असलेला संपर्क कधीच विसरायचा नाही हे मात्र मी जरूर शिकत आलो .

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

             

सुनील काळे

9423966486

sunilkaleartist@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...