फडणीस सर
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प्रत्यक्ष शिकवलेला विद्यार्थी नाही, त्यांचा माझा पूर्वीपासून जवळचा सबंधही नव्हता, खूप वर्षांपासूनचा नियमित संवाद किंवा परिचय नव्हता.
सात सप्टेंबरला सकाळी आमचे चित्रकार मित्र होनराव व विश्वास सोनवणे यांचे फोन आले आणि कोरोनामुळे फडणीस सर गेले या बातमीने कोठेतरी काळजात दुःखाची मोठी कळ उमटल्याची जाणीव झाली व मनात खोलवर पोकळी निर्माण झाली .
पाच वर्षांपूर्वी मी पाचगणीवरून वाईजवळ कायमस्वरूपी राहायला आलो त्यावेळी वाईत खूप मित्र नव्हते. वाचनाची आवड असल्याने एक दिवस लो.टिळक वाचनालयात आलो, वाचक सदस्य झालो, पैसे भरून वाचनाची पुस्तके व पावती घेऊन निघालो तर वाचनालयाच्या उजव्या कोपऱ्यातील काचेचा दरवाजा असलेल्या खोलीतून कोणीतरी हातवारे करुन बोलावत असल्याची जाणीव झाली. त्या दरवाज्यातून आत जाताच मोठया टेबलापलीकडे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे एक दाढीधारी व ग्रे कलरची फेल्टहॅट घातलेली , खांदयावर शबनम बॅग लटकवलेली एक व्यक्ती मोठया प्रेमाने मला बोलावत होती.
" माझे नाव प्रा.सदाशिव फडणीस " त्यांनी हस्तांदोलन करत बसायला सांगितले .
"आज आमचे नेहमीचे मित्र आले नाहीत म्हणून तुम्हाला चहासाठी बोलावले, आणि आज तुम्हीही माझ्यासारखीच फेल्ट हॅट घातली आहे म्हणून हा नवा वाचक सदस्य कोण आहे याची उत्सुकता होती. "....
या बसा निवांतपणे.....अशी मनमोकळी सुरुवात करून अगदी सहजपणे कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी चित्रकार आहे हे समजल्यावर तर ते खूपच खूष झाले .
त्या पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांचे सख्खे "खास" मित्र झालो. मग वेगवेगळ्या कला, लेखक,कलाकार,चित्र, कवी, संगीत नाटक,संवेदना ,प्रदर्शने, साहित्य, पर्यटन, कलाकारांच्या जाणीवा , प्रेरणा अशा गप्पांमध्ये दोन तास कसे
संपले ते मला कळालेच नाही वाचनालयाची वेळ संपली मग आम्ही बाहेर रस्त्यावरच उभे राहून तासभर गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पानां विषयाचे बंधन नव्हते.
नंतरच्या अनेक भेटीतून फडणीस सरानां सतत संवाद करत नवनव्या माणसांच्या ओळखी करून घेणे आणि इतरानांही आपली स्वतःची, व आपल्या सर्व मित्रांच्या ओळखी करून देणे यांचा मनापासून नाद, किंवा मोठा छंदच होता.
चित्रकला, संगीत, गायक, लेखक, कवी, नाटक यासारख्या इतर सर्व कला व कलाकारांबद्दल त्यानां अपार प्रेम व उत्सुकता होती. आपण कलाकार नाही अशी खंत ते वारंवार व्यक्त करत. संधी मिळवायची आणि त्या माणसांशी त्याच्या क्षेत्रातील घडामोडींविषयी आवडीने बोलत राहायची त्यांना खूप आवड व सवडही होती.
आमची ओळख वाढल्यानंतर त्यांनी काही दिवसातच डॉ. प्रभूणे आणि भालचंद्र मोने या त्यांच्या मित्रांसह आमच्या ' निसर्ग ' नावाच्या स्टुडिओला व घराला भेट दिली. तेथील डिस्प्ले केलेली चित्रे पाहून त्यानां आम्हा कलाकार पतीपत्नीच्या चित्रांविषयी खूप कुतुहल आणि प्रेमपूर्ण आदर होता आणि तो इतरानां सांगताना सतत त्यांच्या बोलण्यातून दिसून यायचा .
चित्रकारांच्या चित्रनिर्मितीविषयी, कवींच्या कवितांविषयी, लेखकांच्या लेखनाविषयी त्यानां हे सुचते कसे ? आणि ते व्यक्त कसे करतात ? त्यांच्या सादरीकरणाच्या प्रोसेसविषयी त्यानां नेहमी उत्सुकता असायची व ती प्रक्रिया समजून घेण्याचा सतत उत्साह असायचा.
टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यावर ते बराच वेळा वाचनालयातच असायचे. वेगवेगळ्या विषयांचे प्रसिद्ध वक्ते, व्याखाते, तज्ञमंडळी यानां बोलावून नवनवीन कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असायचा व अशा सर्व कार्यक्रमांचा मेसेज पाठवायचा व फोन करुन आठवण करून द्यायची त्यानां आवड होती.
बऱ्याच वेळा माझा या सगळ्याच कार्यक्रमानां प्रतिसाद नसायचा मग ते नाराज न होता नवा विचार मांडायचे. आपण फक्त आपल्याच चित्रकला क्षेत्राचा विचार न करता इतर विषयांचेही थोडेफार ज्ञान जीवनात आपल्याला आवश्यक आहे असे ते सांगायचे. माणूस बहुआयामी हवा, वाचन चौफेर हवे. माणसाने बहुश्रूत असावे त्यांचा आग्रह असे. त्यामूळे हळूहळू मग आमची उपस्थिती अशा कार्यक्रमांना वाढली.
एकदा वाचनालयात गेलो असता सगळीकडे पुस्तकांचे ढिग लागलेले दिसले. मग फडणीस सरांनी सांगितले की सगळी पुस्तके विषयवार लावायचे काम सुरु आहे. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीनां त्यांच्या आवडत्या विषयाची पुस्तके लगेच सापडली पाहीजेत म्हणून हजारो पुस्तके व्यवस्थित लावण्याचा त्यांनी ध्यास घेतला व तो पूर्णही केला. सर्व वाचनालय डिजिटल करायचे काम त्यांनी हाती घेतले होते.प्रत्येक वर्षीच्या नव्या किंवा जुन्या दिवाळी अंकात चित्रकलेसंदर्भात कोणताही लेख त्यांच्या वाचनात आला की त्याची माहीती ते लगेच फोन करुन सांगायचे, व तो लेख महत्वाचा असून मी वाचलाच पाहीजे असे आग्रहाने सांगत असत विशेष म्हणजे त्यानां सगळेच लेख खूप सुंदरच आहेत असे
"निरागसपणे " वाटत होते.
वाईच्या वसंत व्याखानमालेत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. प्रत्येक विषयातील प्रसिद्ध व नावाजलेल्या मंडळीना बोलावयाचे, त्यांचे कौतुक करायचे आणि कार्यक्रम " भन्नाट " करायचा, परिपूर्ण करायचा हे त्यांचे मुख्य ध्येय असायचे.
१९१८ च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेत त्यांनी
"आमची निसर्गयात्रा व अनुभव " या स्लाईड शोच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केले व प्रोत्साहन दिले. आणि त्यानंतर मग वाईत आर्ट गॅलरी करावी असा नवा विचार त्यांनी मांडावयास सुरुवात केली. चित्रकारांची चित्रेच रसिकांनी पाहीली नाहीत तर कलाविषयक जाणीवाच समृद्ध होणार नाहीत, लोकांना चित्रे कशी समजणार ? त्यासाठी त्यांनी
' चित्र कसे पहावे ' हा एक खास डॉ . प्रभुणे यांचा स्लाईड शो चा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कलांच्या उन्नतीसाठी वाई तालुक्यात एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार झाले पाहीजे असे ते सांगत. मग टिळक वाचनालयाच्या बेसमेंटमध्ये चित्रप्रदर्शन करता येईल का ? अशी सतत विचारणा करत, चित्र लावण्याचे हुक, लाईट व्यवस्था, मांडणी कशी करता येईल , किती खर्च होईल ? याचा अंदाज ते घेत असत.
आर्ट गॅलरीसाठी प्रयत्न करताना काही जणांकडून अडचणी आल्या, नकार आला की ते चिडून जायचे. मग चहा पिताना समाजकारण, राजकारण, मानवी स्वभाव, यावर ते स्वतःच त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करत. मी मात्र त्यांचा उत्साह पाहून शांत राहत असे मग ते आणखी त्वेषाने बोलत,कलाकारांनी उदासीन न राहता आता क्रांतीचा झेंडा घेऊन जागृती केली पाहीजे , सतत प्रयत्न करत राहायला हवे . मला त्यांच्या ह्या उत्साहाचे खूप कौतुक वाटायचे.
फडणीस सरांच्या गप्पानां अंत नसायचा म्हणून खूप वेळा घाईमध्ये असलो की मी पुस्तके बदलण्यासाठी
लो.टिळक वाचनालयाच्या डाव्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारातून जायचो. पण फडणीस सर बरोबर पकडायचेच, त्यानां चुकवणे अवघड असायचे . मग परत आमच्या चर्चा सुरु व्हायच्या,जीवन मुल्ये,कलानिर्मिती, मूर्त, अमूर्त चित्रे, त्या चर्चा कधी न संपणाऱ्या असायच्या....
एकदा मी व फडणीस सर रात्री वाचनालयाच्या जवळच्या मातोश्री नावाच्या हॉटेलमध्ये गप्पा मारत होतो. चहा पिताना त्यांनी गरम होत असल्याने त्यांची फेल्ट हॅट टेबलावर काढून ठेवली होती. मी पाहीले तर त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. मी त्यानां सहजपणे विचारले ''सर ऊन असेल तर हॅट घालणे योग्य आहे, पण आता रात्री गरज नसताना तुम्ही हॅट सतत कशाला घालता ? फडणीस सर अचानक एकदमच शांत झाले व गंभीरपणे म्हणाले " त्याचे काय आहे सुनील काळे, तुम्ही मराल त्यावेळी तुम्ही काढलेली असंख्य चित्रे रसिकांच्या भिंतीवर लटकवलेली असतील तुम्ही कलाकार मंडळी कधी मरत नसता, चित्रकार चित्रांच्यारूपाने जिवंत राहतात , गायक, संगीतकार त्यांच्या गाण्यामधून अमर होतात, लेखक, कवी त्यांच्या साहित्यातून पुस्तक रुपाने कायम स्मरणात राहतात... कलाकार जिवंत असताना कला जगतात व कलेच्या माध्यमातून मेल्यानंतरही रसिक जणानां आनंद देत राहतात. नुसते जिवंत राहणे आणि खरे आयुष्य जगणे यामध्ये खूप फरक आहे. आम्ही सामान्य माणसे. आम्ही नुसते जिवंत आहोत , आम्हाला कोण स्मरणात ठेवणार ? आमचं अस्तित्व नगण्य, आम्ही मेलो की संपलो ..........
म्हणून मी ही हॅट सतत घालतो, ही हॅट म्हणजे माझी ओळख, मी असो वा नसो पण पण फेल्टहॅट घालणारे शबनम बॅग बाळगणारे ते म्हणजे फडणीस सर एवढी आमची ओळख राहीली तरी पुरेसे आहे....................
आता लो.टिळक वाचनालयात गेल्यावर उजव्या बाजुच्या ऑफीसमधून हाक मारल्याचा आवाज येणार नाही , नवीन चित्रकलेची पुस्तके व इतर चांगल्या लेखांविषयी वाचण्याचा आग्रह होणार नाही, नवीन चित्रे,कला विषयांवर चर्चा होणार नाहीत , त्यांचा नेहमी सकारात्मक प्रोत्साहन देणारा उत्साही चेहरा आणि त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग यापुढे कधीही दिसणार नाही कारण सात सप्टेंबरला फडणीस सर करोनामूळे अनंतात विलीन झाले.
सध्या करोनाच्या महामारीत सर्व देवांची मंदीरे बंद आहेत, सर्व भक्तानां मंदीराचे दरवाजे बंद असल्यामूळे देव तरी काय करणार ? मला वाटते देवही या एकटेपणाला कंटाळला असणार, मग कंटाळल्यामूळे अचानकपणे त्याला फडणीस सरांची आठवण झाली असणार व घाईघाईतच त्याने फडणीस सरांना गप्पा मारायला वर बोलावून घेतले असणार......... आणि मग देवाच्या खूप मोठया वाचनालयात फडणीस सर देवाबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर, नानाविध कला ज्यामध्ये संगीत, चित्रकला, नाटक, कविता, लेखन, साहित्य, अभिनय, वसंत व्याख्यानमाला, व वाईत सांस्कृतिक केन्द्र कसे असणार ? आर्ट गॅलरी कशी असणार ? या ठिकाणी आणखी काय सुधारणा करता येईल ?मूर्त ,अमूर्त चित्रे का समजत नाहीत ? त्यासाठी काय करावे इत्यादी विविध प्रश्नांवर सखोल गंभीरपणे चर्चा करत असणार अशी मला खात्री आहे .
असे म्हणतात की,जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या आयुष्याची लांबी ही जन्माच्याच वेळी ठरलेली असते, आपल्याला जितके श्वास घ्यायचे ठरलेले असते तितके श्वास घ्यायचे संपले की मृत्यूला सामोरे जावेच लागते.
मी खरं तर नास्तिक आहे, मंदीरात जात नाही पण कधी गेलोच तर देवाला नक्की फडणीस सरानां न भेटवता अचानक का नेले ? असा नेल्याचा जाब नक्कीच विचारीन, तक्रार करीन की अजून काही वर्ष का थांबला नाहीस......... असो.
फडणीस सर असे अचानकपणे सर्वांना चकवा देऊन त्यांच्या धीरगंभीर, मिश्किल स्वभावानुसार सहजपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची फेल्ट हॅट, शबनम बॅग व त्यांच्याबरोबरच्या चर्चा मनात कायम लक्षात राहतील .
जन्म निश्चित आहे,
मरण निश्चित आहे,
जर आयुष्यातील कर्म चांगले असतील
तर " स्मरण " निश्चित आहे.
फडणीस सर ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आले असतील त्या अनेकांच्या "स्मरणात " ते नक्की राहतील, कारण त्यांनी केलेले कार्य चांगलेच होते.......
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
सुनील काळे✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा