ब्लॉग संग्रहण

रविवार, १९ मे, २०२४

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
       " पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आहे .कारण पुण्यात फार पूर्वीपासूनच काहीही उणे नव्हते आणि आताही नाही आणि यापुढेही असणार नाही . कारण अनेक अभ्यासू, कार्यप्रवीण , व्यासंगी ,बहुआयामी व चतुरस्त्र , अफाट व्यक्तिमत्वे असलेली मंडळी त्यावेळी पुण्यात होती आतादेखील आहेत आणि यापुढेही असणार आहेत . या पुण्यानंतर नंबर लागतो तो बहुतेक वाईचा . कारण वाईला अशा अद्भूत व्यक्तिमत्वांचा खूप भरणा आहे याचा मला हळूहळू शोध लागतो आहे . आज अशाच एका व्यासंगी , बहुआयामी व्यक्तिमत्वाची महती सांगतो .
         १८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश साम्राज्याने भारतावर चांगली पकड बसवली . बऱ्यापैकी स्थिरता आल्यामूळे त्यांनी अनेक हिलस्टेशने नवी शहरे ,गावे विकसित केली . अनेक नव्या प्रशासकीय इमारती , शाळा , कॉलेज निर्माण करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला . पाचगणीची हवा व आरोग्यपूर्ण वातावरण याचा अभ्यास करून 1895 साली सेंट जोसेफ शाळा टेबललँडच्या पायथ्याशी बांधली . ती पाचगणीतील  पहिली शाळा . त्यानंतर 1898 साली किमिन्स व 1904 साली सेंट पीटर्स या शाळा सुरु केल्या . धर्मप्रसार व त्यासाठी अनुकूल ख्रिश्चन संस्कृती वातावरण निर्माण करण्यासाठी दोन चर्चेस बांधली आणि मग इंग्रजी शाळेत जाणे एक प्रतिष्ठेची बाब ठरली .
         अशा प्रतिकूल वातावरणात कृष्णराव पंडीत व रावसाहेब पंडीत या बंधूनी आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी हिंदू स्कूल निर्माण केले . पुढे त्याचे नाव संजीवन झाले . या संजीवन शाळेचे पूर्वीचे वैशिष्ठ्य म्हणजे ते रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनच्या धर्तीवर आधारीत होते . इंग्रजी माध्यामांबरोबर सातवीनंतर दहावीपर्यंत स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमातून 8 वी ते 10वी पर्यंत वर्ग सुरु केले होते . अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी चाचणी परिक्षा द्यावी लागायची . मी व माझे तीन मित्र त्या परिक्षेत उतीर्ण झालो व शाळेत जाऊ लागलो .
          संजीवन शाळेचे लोकेशन व शाळेचे एकंदर वातावरण फार मनमोहक होते . पाचगणी क्लबच्या रस्त्यावरून डावीकडे वळलो की ब्रिटीशांची शाळा लागायची व त्यानंतर त्यांचे हॉस्पीटल व लॉरेन्स व्हिला बंगला या दोघांमधून संजीवनचा रस्ता लागायचा . शाळेच्या या रस्त्यावरून चालत खाली उताराच्या रस्त्याला लागलो की डाव्या बाजूला छोटे छोटे दुपाकी पत्र्याची गावकडची घरे असल्यासारखी शाळेचे वर्ग असायचे . सभोवताली भरपूर हिरवीगार वनश्री व लाल दगडांच्या भिंती व थोड्या पायऱ्या चढून गेले की मराठी माध्यमाचे वर्ग असायचे .
      इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी वेगवेगळ्या इमारती असल्या तरी सर्वांच्या प्रार्थना मात्र एकत्र व्हायच्या . त्यावेळी राष्ट्रगीत  व वेगवेगळी गाणी एकत्र म्हणायचो त्याची एक छोटी पुस्तिका छापलेली आजही जपून ठेवलेली आहे .
          या शाळेत चित्रकला , संगीत शिक्षक असायचे . शाळेत उत्तम भव्य वाचनालय होते . तेथे जानकीताई पंडीत असायच्या तेथे शांतपणे पुस्तके वाचणे एक सुंदर अनुभव असायचा . तेथे सतत वाचन करणारी विद्यार्थीमंडळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उतुंग पदावर पोहचलेली आहेत ,  कलाक्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात भरारी मारून नाव कमावलेली देश विदेशातील ही मंडळी अजूनही पाचगणीचे शाळेचे दिवस विसरलेली नाहीत . 
           संजीवनशाळेत फक्त पुस्तकी शिक्षणच नाहीतर अनेक कलागुणांचा विकास व्हावा, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या येथील विद्यार्थी परिपूर्ण व्हावीत म्हणून भर दिला जायचा . माझ्या1982 च्या दहावीच्या बॅचमध्ये संगीतकार ललीतराज पंडीत , अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले नीरज हातेकर होते . अशा प्रत्येक बॅचमध्ये अनेक उत्तम विद्यार्थी शाळेने घडवले . 1922 साली शाळेने शताब्दी महोत्सव साजरा केला . अशा शाळेत आमच्या अगोदरच्या बॅचमध्ये शंतनू अभ्यंकर होता . तो मूळचा वाईचा पण 5 वी नंतर मराठी माध्यमातून डायरेक्ट इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी संजीवनला बोर्डिंग शाळेत आला . बोर्डींग स्कूलमध्ये राहणारे विद्यार्थी तेथेच राहत असल्यामुळे शिक्षणाबरोबरच अनेक गोष्टींमध्ये पारंगत होतात . नाटक , कविसंमेलन , वाचन , वक्तृत्व , खेळांचे विविध प्रकार त्यानां अनुभवता येतात .काहीजण त्यांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात व त्याविषयांवर कमांड मिळवतात . अर्थात स्वतःची एक मूलभूत हुशारी अशा मुलांमध्ये असेल तर शाळेत या हिऱ्यानां पैलू पाडले जातात. 
डॉक्टर शंतनू अभ्यंकर त्यापैकी एक चमकणारा हिरा.
           दहा वर्षांपूर्वी मी पाचगणीतून कायमस्वरूपी वाईजवळ राहायला आलो . वाचनाची आवड असल्याने लोकमान्य टिळक वाचनालयाचा सदस्य झालो . तेथे अनिल जोशी सर , भालचंद्र मोने , प्रा .सदाशिव फडणीस , डॉ .राजेन्द्र प्रभूणे , श्री . मधू नेने, लक्ष्मीकांत रांजणे , ॲड .उमेश सणस व इतर अनेक जणाच्यां ओळखी झाल्या . वाचनालयातर्फे भरणाऱ्या वसंत व्याख्यानमाला व इतर अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याचदा जावू लागलो . त्यावेळी या मंडळीचा अगदी जवळून जीवनक्रम पाहता आला आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे , व्यासंगामुळे , बहुआयामी गुणांमुळे व विविध क्षेत्रातील कामाचा झपाटा पाहून मी खूपच प्रभावित झालो .
             यावर्षी डॉ. शंतनू अभ्यंकर हे लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाले आहेत . अध्यक्ष झाल्यानंतर ग्रंथालयात अनेक उपक्रम व सुधारणांचा त्यांनी झपाटा लावला आहे . ग्रंथालयाचे रुपडे नव्या संचालक मंडळीनी बदलून टाकले आहे . नुकतेच पार पाडलेले वाई पंचक्रोशी साहित्य संमेलन योग्य व सुंदर नियोजनाच्या अनेक गोष्टींमुळे सर्वांच्या लक्षात राहीले आहे .
           शिकत असताना मी चित्रकार प्रताप मुळीकांच्या स्टुडीओत अमर चित्रकथेच्या कॉमिक्सचे लेटरींग करायला जायचो . कॉमिक्स मध्ये राम ,लक्ष्मण , कृष्ण , इन्स्पेक्टर विक्रम , अशी पात्रे असायची . त्यासाठी जे मॉडेल असेल ते शंतनू सारखे असावे . प्रसन्न हसरा चेहरा , उंच , गोरा रंग व भुरुभरु वाऱ्याने उडणारे केस डाव्या हाताने सतत सरळ ठेवणारे डॉ .शंतनू मला एखाद्या चित्रपट अभिनेत्यासारखे किंवा कॉमिक्सचे मॉडेल वाटतात . त्यांचा एखादा कार्यक्रम सुरु असेल तर मी पुढे बसायचो व असंख्य फोटो काढायचो . त्यातील काही फोटो त्यांनां पाठवायचो मग ते आवडल्याचा इमोजी हमखास पाठवतातच .
       डॉ. शंतनूचे लेख वाचायला लागलो की माझे डोक्यावरचे केस उभे राहतात व भूवया विस्फरतात . त्यांची लेखनशैली व डॉक्टरी ज्ञानाची सुसंगत अभ्यासपूर्वक मांडणी वाचून वाचक तोडांत बोटे घालतो . डॉक्टर ब्लॉग लिहतात , भाषणे देतात , अनेक वैद्यकीय कॉन्फरसला , अनेक वसंत व्याखानमाला , शारदीय व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावतात . ते उत्तम लिहतात , कविता करतात, उत्स्फूर्तपणे भरपूर भ्रमंती करतात , रसाळ वाणीने श्रोत्यांनां तृप्त करतात . अनेक अवजड न समजणाऱ्या पुस्तकांचे सहज सोप्या शब्दात भाषांतर करतात . ते उत्तम भाषांतरकार तर आहेत पण उत्तम लेखकही आहेत .
मला शास्त्रज्ञ व्हायचयं , पाळी मिळी गुपचिळी ,आरोग्यवती भव , फादर टेरेसा आणि इतर वल्ली, बायकांत पुरुष लांबोडा, रिचर्ड डॉकिन्स जादूई वास्तव , आधुनिक वैद्यकीची शोधगाथा ,इ  दहा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे . लोकमत , महाअनुभव , दिव्यमराठी या मासिकांमधून व वर्तमानपत्रात नियमित लेख लिहत असतात . दिवाळी अंकात तर त्यांचे लेख येतातच . 
         एवढे मोठे लेख वाचताना  ते कधी लिहित असतील या विचारांनीच मी भारावून जातो . शेवटी एकदा मी मुद्दाम त्यांच्या मॉडर्न हॉस्पीटलला  व्हीजीट दिली तर कॉरीडॉरमध्ये पेशंटच्या बाहेर रांगा लागल्या होत्या . तर हे डॉक्टर महाशय दोन पेशंटच्या तपासणी दरम्यान जो थोडासा वेळ मिळतो त्यावेळी दोनचार ओळी टाईप करून परत हसतमुखाने दुसऱ्या पेशंटबरोबर बोलत असतात . या त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा मला आचंबा वाटतो कारण मला शांतता असेल तरच काही लेखन किंवा चित्र निर्माण करता येते . अशा गप्पा मारता मारता लेखाची कंटिन्यूटी ठेवणे मला तर जमणारच नाही त्यामुळे ते प्रकरण लई भारी काम वाटते . इंपॉसिबल वाटते .
      डॉक्टर होमियोपॅथीचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते . त्याचवेळी बी.जे मेडीकलमध्ये MBBS करत होते . नंतर MD झाले . प्रसुतिशास्त्र व स्त्रीआरोग्य शिक्षणसाक्षरता करणे त्यांचा आवडीचा विषय आहे . विज्ञान परिषदेचे पहिले सचीव , राष्ट्रीय स्त्री आरोग्य संघटनेचे ते ॲक्टीव्ह मेंबर आहेत .
          उत्तम भाषांतरकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत . माझ्या प्रदर्शनाच्या ब्रोशरचा लेख  इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभूत्व असल्याने सुंदरित्या करून दिले . ते वाईत राहत असल्याने अनेक वक्त्यांची भाषणे त्यांनी ऐकली असावीत त्यामुळे ते उत्तम वक्ता आहेत . अनेक इंग्रजी शब्दानां त्यांनी मराठीत नवी नावे निर्माण केली आहेत . डॉक्टर उत्तम मुलाखतकार आहेत . कोणत्याही व्यक्तीचा कोणताही विषय असो त्या विषयात ते सहज प्रवेश करतात .अनेकानां बोलते करण्याची कसोटी त्यांच्याकडे आहे .
           राधिकासांत्वनम नावाचा मूळ तेलगू भाषेतील इंग्रजी ग्रंथ स्वतः भाषांतरीत करून त्यांची पत्नी रुपाली अभ्यंकर यांचेबरोबर अभिवाचनाचा त्यांचा कार्यक्रम पाहून ऐकून मी थक्क झालो . त्यावेळी कळते हे दोघे प्रसिद्ध डॉक्टर तर आहेत पण भारी ॲक्टरही आहेत .त्यांचे सादरीकरण ते पुणे , मिरज , नाशिक , मुंबई इ .अनेक शहरांमध्ये करत असतात . त्या कार्यक्रमाला त्यानां रसिकांची खूप पसंति, वाहवा मिळते .
       मध्यंतरी लक्ष्मीकांत रांजणे व त्यांचा एका कथाकथनाचा कार्यक्रम होता . डॉक्टर त्यांची स्वलिखित कथा अशी सहज सांगत होते की माणसाचे लक्ष खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्याच्यांकडे आहे हे जाणवते . संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे त्यांचे शब्दप्रभूत्व असामान्य आहे . ते शंतनू ऊवाच नावाचा ब्लॉग लिहतात पंचाहत्तर हजारांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स आहेत . त्यांचा हा कामाचा आवाका पाहून आपण चित्रकाराचे रिटायर्ड लाईफ फारच आळशीपणाने जगतोय याची मला सतत जाणीव होत राहते . मला अनेक गोष्टींचा कंटाळा तर लगेच येतो पण डॉक्टर मात्र वेगळेच आहेत . 
        विश्वकोश , प्राज्ञपाठशाळा , डॉक्टरांच्या मेडीकल असो. व इतर अनेक संस्थामध्ये ते कार्यरत असतात शिवाय संपूर्ण कुटूंबातील सर्व सदस्यानां संभाळून ते आता आजोबांचीही भुमिका उत्तमपणे सांभाळत असतात .
            मध्यंतरी करोनाच्या काळात मी करोनाग्रस्त झालो व  पायाच्या अपघातातही सापडलो मला कम्पलसरी बेडरेस्ट होती . त्यावेळी कळाले डॉक्टर फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे आजारी आहेत . त्या आजाराच्या गोष्टींचा भलामोठा लेख त्यांनी लिहला होता . तो वाचून मानवी जीवन किती साधारण व अनिश्चित आहे हे लक्षात आले . डोळ्यात पाणी आले व हृदय गलबलून गेले . मग डोळ्यांपुढे डॉक्टरांचा हसरा चेहरा सतत नेहमी दिसू लागला . डॉक्टर पण जिद्दी माणूस . आपल्या आजाराचा बाऊ न करता आपल्या कामात त्यांनी झोकून दिले . त्यांची केमोथेरपी व इतर उपचार यांचा कोणाला थांगपत्ता न लागून देता अनेक लेख , कविता , व्याखाने भाषांतरे यामध्ये ते सतत मग्न राहत असतात . 
         आमच्या येण्याजाण्याच्या मेणवलीच्या रस्त्यावरून वॉकिंग करताना डॉक्टर तीनचारवेळा दिसले व आजारावर त्यांनी नियंत्रण मिळवल्याचे दिसले .
            मी सातारा जिल्ह्यात प्रदर्शन करतच नाही कारण तेथे प्रदर्शनाचा सुसज्ज हॉलच नसतो . चित्र टांगण्याची , भिंतीचा रंग , प्रकाशयोजना नसतेच . मग चित्र लावणार कशी ? अशा अनेक तक्रारी व कारणे सांगून मी प्रदर्शन टाळतो . 
      एक दिवस लायब्ररीत पुस्तक बदलण्यासाठी गेलो होतो तर महावीर जंयतीची सुट्टी होती . मग ऑफिसमध्ये गेलो तर अमित वाडकर , तनुजा इनामदार , राजेश भोज (सर) व तोंडाला मास्क बांधून अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर हे सगळेजण वक्ता कोण असणार ? प्रस्तावना कोण देणार ? अध्यक्ष कोण होणार ? समारोपाच्या शेवटी आभारप्रदर्शन कोण करणार ? असे एकूण एकवीस दिवसांचे नियोजन व फोनाफोनी करत बसले होते . ते पाहून मला डॉक्टरांचे पुन्हा कौतूक वाटले . त्यांनी मला चित्रप्रदर्शनासाठी पुन्हा विचारले , मग मी नाही म्हणू शकलो नाही . काय सांगावे कदाचित वाईत प्रदर्शन करायचेच राहून जाईल असे वाटले . त्यादिवशी डॉक्टर मला आनंद चित्रपटातील राजेश खन्नासारखे वाटले . जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जिसे न आप बदल सकते है न मै . हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है, जिनकी डोर उपर वाले के उंगलियो में बंधी है । कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता । 
जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नही .
       डॉक्टर असून स्वतः पेशंट असूनही ते वाईच्या लायब्ररीच्या कामासाठी , वसंत व्याख्यानमाला सुंदर व्हावी म्हणून इतकी मेहनत करतात तर आपणही वाईकरांसाठी एक छान प्रदर्शन का करू नये ? हे ठरवून मी लगेच कामाला लागलो . 
        तर अशा या व्यासंगी डॉक्टर शंतनू अभ्यंकर या आमच्या संजीवनच्या तालीमेत तयार झालेल्या शाळेकरी मित्राच्या आग्रहामुळे व अनेक वाईकरांच्या प्रेमळ विनंतीमुळे यावर्षी वाईत प्रदर्शन करणार आहे .
खरं सांगायचे तर अजून पूर्ण डॉक्टर मलाच समजले नाहीत कारण ते व्यक्तिमत्व बहुआयामी व समजण्यापलीकडचे आहे . त्यांच्या या बहुगुण संपन्न व्यक्तीमत्वामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीचा मेळा त्यांच्याकडे नेहमी असतो अशा सर्व मित्रां तर्फे या डॉक्टर मित्राला उत्तम निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच विधात्याकडे मागणी करतो व थांबतो .
थोडक्यात सांगायचे तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे व्यक्तीमत्व सर्व वाईकरांनां आवडणारे असे 
" वाईभूषण " 
बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

सोबत प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका सोबत आहेच . 
यावर्षी १०८ वर्ष पूर्ण करणाऱ्या वसंत व्याखानमालेत अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत त्याचीही कार्यक्रमपत्रिका सोबत पाठवत आहे .
सर्वांनी जरूर या !
सर्वांनां सप्रेम निमंत्रण🙏

चित्रकार सुनील व स्वाती काळे यांचे
" व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स "
पाचगणी , वाई , महाबळेश्वर येथील निसर्गसंपन्न परिसरातील जलरंग व तैलरंगातील निसर्गचित्रांचे चित्रप्रदर्शन .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लोकमान्य टिळक वाचनालय 
वाई .४१२८०३
प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहूणे श्री . विश्वास पाटील , श्री .अनिल जोशी व डॉ. शंतनू अभ्यंकर व संचालक मंडळ टिळक लायब्ररी यांच्या उपस्थितीत १ मे रोजी संध्याकाळी करण्याचे ठरवले आहे . तुम्ही देखील उपस्थितीत राहावे यासाठी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रदर्शनाची वेळ : रोज सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत .
दिनांक : १ ते २१ मे २०२४ पर्यंत
प्रवेशमुल्य नाही . 🙏सर्वांनां मुक्त प्रवेश🙏

✍️सुनील काळे (चित्रकार)
     9423966486

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जगण्याचे " स्टॅन्डर्ड " समजलेला माणूस- प्रा . डॉ . ज्ञानदेव झांबरे सर************************        पाचगणी हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे . ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या लोकांनी स्वधर्मियांसाठी शाळा सुरु केल्या . त्यामुळे येथे त्रेचाळीस शाळांमध्ये अठरापगड जातींचे लोक एकत्रित रहात असल्याने येथे कॉस्मोपोलीटन संस्कृती आहे . पाचगणी शहर छोटे असल्याने बहुभाषिक वेगवेगळ्या प्रांतातील मंडळी छानपैकी एकत्रितपणे राहतात . अशा या गावात माझे बालपण गेले . दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीसाठी कॉलेजचा शोध सुरु झाला . त्याचवर्षी वाईला किसनवीर महाविद्यालयात नव्याने सायन्स कॉलेज सुरु झाल्याचे कळाले . BSc डिग्री मिळण्याची चांगली सोय झाली होती . त्यामुळे घरच्यांनी मला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी फोर्स केला . मी मात्र नाराज झालो होतो कारण माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते व सायन्सचे विषय इंग्रजी माध्यमात शिकवले जाणार होते . इंग्रजीची माझी खूप आबाळ झाली होती कारण सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजीचे शिक्षकच नव्हते . इंग्रजी , गणित , सायन्स या विषयाची तर माझी कुडंली कधी जमलीच नव्हती पण त्याकाळी उलट उत्तर देण्याची प्रथा नव्हती त्यामुळे मी मुकाटपणे वाईला सायन्स कॉलेजला रोज एस.टी बसचा पास काढून येऊ लागलो .       सायन्सच्या या वर्गात शिक्षक मला काय शिकवत होते याचे मला भान नव्हते कारण मला इंग्रजी भाषाच समजत नव्हती . चाळीस पन्नास विद्यार्थी असल्याने मागच्या बेंचवर बसायला लागलो आणि मला एक नविन छंद लागला . मी चित्रे काढायला लागलो . माझ्या मित्रांची , शिक्षकांची , प्राण्यांची , वनस्पतींच्या जर्नलमध्ये आकृत्या काढणे मला आवडू लागले . कधी कधी मी वाईच्या बसमधून पसरणीघाटात उतरायचो . या घाटातील वळणदार रस्ते , दुतर्फा असलेली वडाची झाडे , पांडवगडाच्या पायथ्याच्या सभोवतालची छोटी छोटी चमकणारी भातशेती , ऊन पावसाचा खेळ , संध्याकाळची सुर्यास्ताची रंगउधळण , वाईच्या गणपती मंदिराची , वेगवेगळ्या घाटाची चित्रे मी जलरंगात उतरवू लागलो . थोडक्यात मला चित्रकलेची फारच आवड निर्माण झाली होती . चित्रकार होण्यासाठी लागणारी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा मी बारावी सायन्सला असताना दिली व त्यामध्ये मला 'अ 'श्रेणी प्राप्त झाली होती .       चित्रकलेचे वेड इतके वाढले की मी सकाळी सहा वाजताच थंड हवेत चित्र काढायला जायला लागलो . टेबललॅन्डच्या पठारावर तर कधी सिडनेपाँईटच्या उंच चौथऱ्यावर बसून मी धोमधरणाचे पाणी ,कृष्णा व्हॅलीतील डोंगररांगा , कधी पांगारी तायघाट जवळच्या पारसी पॉईंटची चित्रे रेखाटू लागलो . आणि अचानक माझ्या लक्षात आले मला अतिथंड हवेत सकाळी फिरल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला आहे . ऑक्सिजिन घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद झाल्याने श्वास घेणे मुश्कील झाले आहे . डॉक्टरांनी माझे ऑपरेशन करून नाकातील वाढलेले पॉलीप्स काढावे लागतील यासाठी तातडीने ॲडमिट केले . नाकाला मोठे बँडेज बांधूनच मी 12वी सायन्सची प्रॅक्टीकल परिक्षा दिली होती . त्यानंतर  पुण्याला चित्रकलेच्या अभिनव कॉलेजला मी गेलो . चित्रकार झालो व परत पाचगणी महाबळेश्वरचा निसर्ग रंगवू लागलो होतो . थंड हवेत वेळीअवेळी सतत डोंगररांगावर भटकंती केल्याने माझा नाकाने श्वास घेण्याचा त्रास आणखीनच वेगाने वाढू लागला . डॉ. प्रशांत पोळ यांनी वेगवेगळ्या वर्षी चारपाच वेळा माझे ऑपरेशन केले आहे . एकंदरीत मला थंड हवेची ॲलर्जी झाल्याचे सिद्ध झाले व डॉक्टरांनी 2014 साली मी पाचगणी सोडावी लागेल असे निक्षून सांगितले . मला माझे पाचगणीचे बस्तान सोडून  कायमचे  वाईला यावे असे त्यांनी सांगितले व नाईलाजाने मी काही दिवस वाईला राहण्याचे ठरवले .          वाई कॉलेजचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री .पटकुरे सर यांनी मला सह्याद्रीनगर या परिसरात बोलावले . थोडी चर्चा केली तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या सोसायटीत " प्रज्ञाअमृत " नावाचा एक बंगला आहे . त्याचे मालक श्री .व सौ झांबरे दोघेही शिक्षक आहेत . त्यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे घर भाड्याने मिळते . तेथे काही दिवस राहून वाईच्या परिसरातील चित्रे काढावीत . हवा बदलाने तब्बेतीवर काय परिणाम होईल हेही कळेल व एखादी जागा आवडली तर घर बांधण्यासाठी वाईत एन ए प्लॉट घ्यावा या उद्देशाने मी त्यांच्या घरी आलो .         सहयाद्रीनगरात असलेला " प्रज्ञाअमृत " अतिशय मेंटेन केलेला ,फुलझाडे असलेला सुंदर बगीचा व पार्किंगची सोय असलेला बंगला बघताक्षणीच मला आवडला . बंगल्याच्या पाठीमागे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र जीना होता . आतमध्ये सर्व नीटनेटकेपणा होता . खिडक्या दरवाजानां पडदे लावलेले होते . आम्ही दोघेही चित्रकार असल्याने चित्रकाम करण्यासाठी व राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती . झांबरेसर , झांबरेमॅडम व त्यांची मुलगी मृणाल हे तीनच माणसे खाली रहात होते . त्यांचा मोठा मुलगा प्रणव शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता . पहिल्या भेटीतच आमची छान ओळख झाली व लगेच प्राथमिक बोलणी करून मी एका आठवड्यात पाचगणीवरून वाईला शिफ्ट झालो . सर व मॅडम दोघेही स्वच्छताप्रेमी होते . त्यामुळे मी रोज मॉर्निंगवॉकला वाकेश्वरला जाताना पाहायचो झांबरे सर स्वतः साफसफाई करायचे , कुंड्यांना पाणी घालणे , झाडांची निगा राखणे ,खतपाणी देणे . पूर्ण आवार पाण्याने स्वच्छ धूवून काढायची त्यांनां आवड होती . आम्ही कधीतरी समोरासमोर भेटलो की अनेक विषयांवर गप्पा मारायचो . वाईत राहण्याचे फायदेतोटे तपासून पहायचो . येथील परिसराचा माणसांचा स्वभाव व आचरणांवर चर्चा करायचो . नवनव्या जागा शोधायची आता सवय लागली होती . त्याचा आढावा घेताना झांबरे सर मनापासून प्रतिक्रिया द्यायचे .       " प्रज्ञाअमृत " या बंगल्यामध्ये रहात असताना एक घडलेला प्रसंग मला आजही लक्षात आहे व आयुष्यभर पुढेही कायम लक्षात राहील . एकदा रविवारी सुट्टीचा दिवस होता . साधारण नऊ दहा वाजताची वेळ असेल . आमची घरकाम कारणारी बाई आज येणार नव्हती त्यामुळे दोघेही निवांत पेपर वाचत बसलो होतो . आणि शेवटच्या दूरच्या खोलीतील अचानक कोपऱ्यातील किचनसिंकचा का वॉशबेसीनजवळचा नळ अलगद तुटून पडला होता . पाईपलाईन उघडी झाली आणि वेगाने पाणी रूममध्ये पसरु लागले होते . आम्ही विरुद्धदिशेच्या बाजूला असल्याने काही आवाजच आला नाही . हळूहळू पडणाऱ्या पाण्याने ती रुम भरून गेली होती आणि अचानक खालून झांबरे मॅडम व सर दोघेही वरच्या मजल्यावर आले .त्यांनी घराची बेल वाजवली आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की शेवटच्या खोलीतून पाणी जवळपास चारपाच इंच भरून दुसऱ्या रूममध्ये पाणी पसरू लागले होते . झांबरे सरांनी लगेच प्लंबरला फोन लावला येताना नवीन नळ घेऊन यायला सांगितले . पटकन टेरेसवर जावून मुख्य पाईपलाईन बंद केली . इतक्यात झांबरे मॅडम पटकन खाली गेल्या , येताना त्यांनी फरशी पुसण्याचा रबरमॉप व चारपाच फरशी पुसण्याचे जाड कपडे घेऊन एक बादली आणली . त्यांची मुलगी मृणाल देखील मदतीला आली . इकडे बनियन व लुंगी घालून निवांत बसलेले झांबरे सर गुडघ्यापर्यंत लूंगी गुंडाळून पटकन फरशीवरील पाणी बादलीत भरू लागले . झांबरे मॅडम यांनी लगेच साडीचा पदर खोचून मॉपने पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली . मग आम्ही दोघेही त्यांच्यामध्ये सामील झालो व सर्व जणांनी रुममध्ये साचलेले पाणी काढून तासाभरात सगळा बंगला चकाचक केला . नंतर प्लंबर आला त्याने नवीन नळ बसवला .आता तुम्ही म्हणाल यात आश्चर्याची गोष्ट काय ? तर आम्ही झांबरे सरांचे भाडेकरू होतो . पाण्याचा नळ दुरुस्त करून रुम साफसफाई करण्याची जबाबदारी आमची होती . ते घरमालक होते . उच्चशिक्षित पी एच डी झालेले कॉलेजचे प्राध्यापक होते . मॅडम एम एस सी व जॉय स्कूलच्या उपप्राचार्या होत्या . एकदा घर भाड्याने दिले की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी भाडेकरूचीच असते . त्यादिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि तो प्रसंग एन्जॉय केला . कोणीही कसलीही तक्रार झाली नाही . दोन चार महिन्यातच आम्ही " प्रज्ञाअमृत " बंगला सोडला . नवीन जागा घेतली तेथे मोठे अपयश आले . नंतर मग आमचा मेणवली गावाजवळ " निसर्ग " नावाचा बंगला तयार केला . मागच्या वर्षी तेथे " निसर्ग आर्ट गॅलरी " नावाने चित्रप्रदर्शनही भरवले होते . अनेक वेगवेगळ्या जिल्हयातील , तालुक्यातील पर्यटक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती . एकदा किसनवीर कॉलेजचे प्रा. श्री रमेशचंद्र बारगजे सरांनी फोन केला की त्यांच्या कोल्हापूरच्या 1973 सालच्या एम .एस .सी बॅचचे क्लासमेटस यांचे वाई येथे गेटटुगेदर आयोजित केले आहे त्यावेळी तुमची निसर्ग आर्ट गॅलरी पाहायला सर्वजण येणार आहेत . धोमचे मंदिर पाहून सर्व गाड्या निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी गेटपर्यंत आल्या . त्यानां पार्कींगची जागा दाखवत होतो त्यावेळी एक गाडी मात्र गेटपासून दूर थोड्या अंतरावर उभी राहीलेली पाहीली . बारगजे सरानां ती गाडी बाहेर का थांबली म्हणून विचारले तर सरांनी कपाळावर हात मारून घेतला . मला म्हणाले काय बोलू आता ? ती गाडी तुझ्या सख्या चुलत व मावसभाऊ असलेल्या हनुमंत काळे यांची आहे . तो आमच्या बॅचचा सर्वात अतिशय हुशार विद्यार्थी होता . युनिव्हरसिटीत प्रथम आला होता . त्याला आम्ही सांगितले चित्रकार सुनील काळे तुझा भाऊ आहे . त्याने वाई ,पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील असंख्य अप्रतिम चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत , त्याची मिसेस चित्रकार स्वाती काळे हिने असंख्य फुलांची तैलरंगात चित्रे काढलेली आहेत . उत्तम चित्रप्रदर्शन आहे . तुमची तीस वर्ष झाली भेट झालेली नाही तर तुम्ही आता जरूर भेटा व प्रदर्शनही पहा . पण तुझा भाऊ गाडीतून उतरायला तयार नाही त्याचे कुटुंबीय गाडीतच बसून आहेत .ते म्हणतात आम्ही भावकीत जात नाही कारण आमचे " स्टॅन्डर्ड " मोठे आहे . मी मोठ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होतो . तो साधा चित्रकार आहे त्याची माझी तुलना होऊ शकत नाही . तुम्ही सगळे प्रदर्शन पाहायला जा आम्ही बाहेर रस्त्यावर गाडीत बसून राहू . तो एक तास बाहेर थांबला पण घरात आलाच नाही . खरे तर हा हनुमंतदादा आता हेमंत नाव लावतो . कारण आईबापाने ठेवलेले हनुमंत हे नाव त्याला आवडले नाही . अतिशय गरिबीतून त्याला शिक्षण दिले होते .स्वतःच्या कर्तबगारीने तो उच्चपदावर पोहचला त्याचे उच्चशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले पण लग्नानंतर व अगोदर नोकरी करत असतानाही या दादाने कधीच कोणत्याही भांवडाला जवळ केले नाही . कोणत्याही नातेवाईकांकडे ते फिरकले नाहीत . कोणाशी कसलाही संबंध ठेवला नाही ,कोणालाही मदत केली नाही . संपूर्ण कुटुंबाला दूर ठेऊन दादा मोठा स्टॅन्डर्डवाला झाला . आमचा दादा कसा दिसतो हे मला पाहण्याची उत्सुकता होती . कारण तो माझ्यापेक्षा पंधरावीस वर्षांनी मोठा होता . पण " स्टॅन्डर्ड "आडवे आले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात . शिक्षणामुळे माणूस विचारवंत होतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा उचांवतात . त्याचे जीवन सुखकर व समृद्ध होतेच पण त्याच्यां विशाल छायेत अनेकानां संजीवनी मिळते . उच्चशिक्षित भावाने मात्र आमच्या सर्वांसाठी त्याचे दरवाजे मात्र कायमचे बंद केले होते . उच्चशिक्षणाचा मला तेथे काहीच उपयोग झालेला दिसला नाही . इथे मला पीचडी झालेले उपप्राचार्य झांबरे सर आठवतात . उपप्राचार्या झांबरे मॅडम आठवतात . स्वतःच्या भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाशी प्रेमाने सुखदुःखाची विचारपूस करत असत . ते दोघेही स्वतःचे " स्टॅन्डर्ड "कधी गोंजारत बसले नाहीत .  सामान्य माणसासारखे राहून दोघेही असामान्य कामे करत राहीली . जॉय स्कूल व किसनवीर विद्यालयातील विद्यार्थी घडवताना आपल्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांला घडवण्याचे . " स्टॅन्डर्ड " काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याचा गर्वही कधी केला नाही . जीवन जगण्याचे खरे " स्टॅन्डर्ड " त्यांनां कळले आहे म्हणून माझ्या त्या अतिउच्चशिक्षित एम एस सी फर्स्टक्लास झालेल्या अडाणी भावापेक्षा झांबरे पती पत्नींविषयी मला आदर वाटत आहे .     महिन्यापूर्वी एकदा झांबरे मॅडमचा मला फोन आला . त्यांनी विचारपूस केली व त्या जॉय स्कूलची नोकरी सोडून पुण्यात नातवाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात रहात असल्याचे सांगितले . मुलगा सिव्हील इंजिनियर व सुनबाई पेशाने सरकारी वकील असल्याने दोघेही कामात व्यस्त झाले मग मुलाकडे लक्ष कोण देणार ? म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला . आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . माझी आर्ट गॅलरी होती . ती सांभाळताना माझी तीन वर्षाची मुलगी सांभाळण्यासाठी मी आईवडीलानां विनंती केली तर त्यांनी नकार दिला . गावाकडे शेतीची कामे असतात त्यामुळे तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा असे उत्तर आईने दिले . शेवटी आमच्या संघर्षाच्या लढाईत मुलगी देवाघरी गेली . ती वारली त्यावेळी मी माझ्या मेव्हण्याला सत्यजितला फोन केला . तो म्हणाला मी अत्यंविधीला येऊ शकणार नाही . तो देखील Phd झालेला आहे . अतिउच्चशिक्षित आहे . त्याला भाचीच्या अत्यंविधीला जाण्याची गरज वाटली नाही . बहिणीला कठीण स्थितीत आधार देण्याची आवश्यकता वाटली नाही आणि पुढे आता सत्तावीस वर्ष झाली तरी त्याला आमची कधीच आठवणही झाली नाही . काय उपयोग त्या डॉक्टरेटचा ? जिथे माणूस माणसाला ओळखत नाही .मोबाईल ,फोन , लॅपटॉप आले तंत्रज्ञान वाढले तरी मनाची आढी मात्र कायम राहीली .कधी त्याच्या कुटूंबाने संपर्कच केला नाही कारण "स्टॅन्डर्ड " आडवे आले .त्यावेळी खऱ्या अर्थाने एकटे जगायला शिकलो . अशावेळी झांबरे मॅडमचा त्याग मला प्रेरणा देणारा वाटतो . मुलांविषयची माया त्यांच्या कृतीतून दिसते .इकडे सरांनां रिटायर्ड होण्यापूर्वी खानावळीत जेवण करावे लागले . काही महिने एकटेपणा स्विकारावा लागला . पण त्यांनी कधीही त्याची तक्रार केली नाही . कॉलेजमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले . त्यांच्या कॉलेजच्या कारकीर्दीची मला जास्त माहिती नाही पण त्यापेक्षा माणुसकी जपणारे , कुटुंबाला जपणारे , अभिमान नसणारे , मोठेपणाचा त्याग केलेले गार्डनमध्ये स्वच्छता करणारे डॉ झांबरे सर मनाला फार भावले . त्यांच्या मुलाचे लग्न ठरले त्यावेळी प्रणवच्या लग्नाला आम्ही दोघेही गेलो होतो . लग्नकार्यालय पूर्णपणे भरून गेले होते प्रचंड गर्दी होती तरीही झांबरेसरांनी आम्हाला बरोबर पकडलेच . शाल श्रीफळ देऊन योग्य मानसन्मान केला त्यावेळी मला या झांबरे कुटूबांचेखरे " स्टॅन्डर्ड " कळाले . वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य नामवंत लहानमोठ्या माणसांनी संपूर्ण हॉल भरून गेला होता . काय असते स्टॅन्डर्ड ?? तुम्ही जगत असता त्यावेळी त्या तुमच्या जगतानाच्या काळात असंख्य माणसे भेटतात . त्यातील काही माणसे चांगली वागलेली असतात काही वाईट वागलेली असतात . पण शेवट काय असतो ? तुमच्या जगण्याला कधीतरी मर्यादा येतेच . कधीतरी शरीर थकते व तुम्हाला अंतिम श्वास घ्यावा लागतो . त्यानंतर कोणत्यातरी स्मशानघाटाजवळ तुमची राख होते ती राख पाण्यात मिसळते तुमचे अस्तित्व संपते . जग काही दिवस तुमची आठवण काढते नंतर तुमची कोणी आठवणही काढत नाही . तुमचे " स्टॅन्डर्ड " काही असो शेवटी तुमची राखच होते . हे ज्यानां समजते त्यांचे भावविश्व वेगळे असते . ते कायम हसतमुख असतात . ते त्यांच्या कृतीतून त्यांचे वेगळेपण जोपासत असतात .अनेकानां त्यांचे जगणे प्रेरणा ठरत असते .असे जीवनाचे खरे " स्टॅन्डर्ड " कळालेले झांबरे सर मला आवडतात . काही महिन्यांपूर्वी अचानक आमच्याकडे घरकाम करणाऱ्या बाई व माळीकाम करणारा त्यांचा मुलगा या दोघांनी आमचे काम सोडले. काही दिवस आम्ही वेगवेगळी माणसे शोधली पण त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असल्याने जुळले नाही . मग झांबरे सर पुन्हा आठवले . Phd झालेला माणूस स्वतः झाडलोट करतो , बागेची निगा राखतो तर आपण का लाजायचे ? त्यांच्यापासून प्रेरणा घेतली . आता मी बागकामात तरबेज झालोय बागेत शेतात काम केल्यामुळे आरोग्यही चांगले राहते याचा शोध लागला . आपण कोणावर विसंबून राहायचे नाही काम करत राहायचे हेच खरे " स्टॅन्डर्ड " झांबरे सरांकडून मी शिकलो . खरी डॉक्टरेट तीच आहे . मे महिन्यात ते आता रिटायर्ड होतील . अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सरानां व झांबरेमॅडम या दोघांनाही उर्वरीत रिटायर्ड आयुष्य सुखसमृद्धीचे आनंदाचे जावे त्यांच्या मनासारखे जगताना उत्तम आरोग्य प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !चित्रकार - सुनील काळे✍️9423966486निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]