हरवलेले बालपण
🤔🤔🤔🤔🤔
गेली कित्येक वर्ष सकाळी मी फिरायला जातो . कधीतरी त्याच्यामध्ये काही अडचणींमुळे थोड्या काळापुरता खंड पडतो पण नंतर मी पुन्हा न
व्याने सुरुवात करतो . फिरताना मला एकाच रूटमध्ये , एकाच रस्त्याने फिरायला आवडत नाही , कारण मग कंटाळा यायला लागतो . म्हणून मी वेगवेगळ्या दिशेने ,वेगवेगळ्या आडवळणाच्या वाटेवरून चालायला लागतो .आडवळणाच्या वाटेवरून चालताना एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण कोठे जाणार हे माहीत नसते त्यामुळे कुतूहल ,नाविन्यता व उत्सुकता टिकून राहते . आणि चालताना मन ही फ्रेश राहते . नवीन जागा शोधल्याचे थोडे आत्मिक समाधानही मिळते .
आज एका नव्याच वाटेवरुन माझा मॉर्निंग वॉक चालला होता .माझ्यासोबत माझा कुत्रा टॉमी यालादेखील माझ्या इतकेच नव्या वाटेने जायची ओढ असते . कधी चालताना तो नवी दिशा दाखवतो किंवा मी चालत असताना तक्रार न करता तो माझ्या मागोमाग येत असतो . आज आम्ही मेणवली घाटाच्या मागच्या परिसरात कृष्णा नदीच्या तीरावरून काठाकाठाने झाडांच्या घनदाट जंगलातून फिरत होतो . सगळी रानटी व जंगली झाडेच पाण्यामूळे अमाप वाढलेली होती . पानगळीमुळे झाडांचा पाला सगळीकडे इतका पसरला होता की आपल्याच पावलांचा आवाज मला मोठा गमतीशीर व थोडा भीतीदायकही वाटत होता .अशा या घनदाट जंगलात कुठून तरी आलेल्या एका बिजामुळे चिंचेचे एक प्रचंड मोठे झाड अचानक दिसले .कालच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या झाडाभोवती सगळीकडे चिंचाचा थर पडलेला दिसत होता . सगळीकडे ढीगभर पडलेल्या हजारो चिंचेचा थर पाहून मी थबकलोच . मग पायापाशी पडलेली एक चिंच हातात घेतली , तीची टरफले फोडली आतमध्ये डार्क ब्राऊन कलरची ती चिंच पूर्णपणे पिकलेली होती , गाभुळलेली होती .सहज चव घ्यावी म्हणून एक छोटा तुकडा मी तोंडात टाकला आणि ती जीभेवर विरघळली .त्या चिंचेची चव मला चाळीस-पंचेचाळीस वर्ष मागे हरवलेल्या बालपणात घेऊन गेली . एखाद्या लहान मुलासारखे अधाशीपणे पडलेल्या त्या चिंचा मी माझ्या खिशात कोंबल्या . छोट्या लहान मुलासारखा माझा मानसिक उत्साह वाढला . चिंचा गोळा करत बसण्याच्या माझ्या या कृतीने मीच इतका आनंदी झालो की चालताना मजेत गाणे गुणगुणू लागलो . त्या चालण्याच्या तंद्रीतच मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना रस्त्यामध्ये मेणवलीच्या अंकुश चौधरी यांचे एक झाड आंब्याने इतके मस्त लगडलेले होते की मला त्याचा फोटो काढण्याची अनिवार इच्छा झाली . मी फोटो काढत असतानाच चौधरी यांनी घरातून पाहिले . त्यांना काय वाटले माहीत नाही पण त्यांनी एक प्लास्टिकची पिशवी दिली व म्हणाले ह्या हिरव्यागार कैऱ्या तुम्हाला घेऊन जा .आज आंब्याची अचानक न मागता मिळालेली पिशवी आणि खिशातल्या चिंचा मला माझ्या बालपणाच्या आठवणीत घेऊन गेले .
आम्ही पाचगणीत राहायचो . वाईजवळच्या पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडेवाडी हे वडीलांचे गाव . ( पूर्वी या डोंगरावर अज्ञातवासात पांडव राहायचे , म्हणून पांडववाडीचा अपभ्रंश पांडेवाडी ) फेब्रुवारी , मार्च किंवा एप्रिल या उन्हाळ्यांच्या महिन्यांमध्ये गावची जत्रा असायची . जत्रेच्या अगोदरच दोन-तीन दिवस एकत्र कुटुंबाचा मोठ्ठा कुटुंबकबिला घेऊन आम्ही सगळेच गावाला यायचो . जत्रेला निघण्यापूर्वी खूप दिवस अगोदरच आमची तयारी सुरू असायची . कापडाच्या धाग्यामध्ये सर्वात रंगीबेरंगी मोठ्या फुलाफुलांचा एकच तागा निवडून आमच्या सर्व भावा-बहिणींचा ड्रेस कळंबे टेलर्स कडे शिवायला असायचा . मुलांना त्या ताग्यातील कापडाचा शर्ट व रंगीत हाफ पॅन्ट व मुलींना परकर व दंडावर फुगा असलेले पोलके . त्यामुळे जत्रेत आम्ही कोठेही असलो तरी या रंगीत ड्रेसमुळे हा कोणाच्या घरातला मुलगा किंवा मुलगी आहे हे लगेच ओळखून यायचे. आजोबा नव्या धोतर सदरा व काळसर रंगाच्या कोटामुळे तरतरीत दिसायचे .त्यांच्या डोक्याला गुंडाळलेला मोठे पागोटे किंवा फेटा ऐटबाज दिसायचा .आजी हिरव्या रंगाची नववारी लुगडे नेसायची सोन्याच्या बांगड्या व पुतळ्याची माळ घालून लगबगीने इकडून तिकडे सतत कामात असायची . सात सुना व एकुलती एक लेक लोणंद गावात राहणारी मग जावई जत्रेला यायचे .नातवंडे व इतर पाहुणेमंडळी यामुळे घर तुडुंब भरून गेलेले असायचे . नातवंडांच्या गजबजाटामुळे आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता असायची .जत्रेत पहिल्या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य घेऊन सगळ्या सुना व नातवंडांना घेऊन आजी पांडवजाईच्या मंदिरात जायची .
रात्री देवाची पालखी पांडवगडाकडे निघायची त्या पालखीला मशाल धरण्याचा मान आमच्या घराकडे असायचा . वडील त्या मशालीच्या कामात व्यस्त असायचे . रात्रभर जोरात ढोल वाजायचे , लेझीम , छबिना चालायचा .गुरवाच्या तुतारीचा नाद सगळ्या गावभर चैतन्य पसरावयाचा . गावातील मुंबईत राहणारी तरुणमंडळी "अफजल खानाचा वध " म्हणजेच "प्रतापगडाचा रणसंग्राम " अशा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत दरवर्षी एक नवे नाटक करायचे .या नाटकासाठी उत्तम प्रकारची ड्रेपरी मुंबईवरून आणायचे . ह्या नाटकाची तालीम भरपूर वेळा केल्यामुळे लहानपणी नाटक कसे वास्तव , जिवंत व थरारक वाटायचे .
दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज जेवण असायचे पुणे , मुंबई , माथेरान ,महाबळेश्वर व आजूबाजूच्या बावधन , पसरणी , वाई , धोम , यासारख्या खेड्यांमधून अनेक माणसे व दूरची नातेवाईक मंडळी यायची . ही सारी मंडळी आली की भेटीगाठी व्हायच्या . प्रत्येकाला मटणाचे पोटभर जेवण घालायचे ही प्रथा होती . दिवसभर या जेवणाच्या पंगती चालू असायच्या . भाकरीचे ढिग पटापट संपायचे . दुपारी पांडवजाई मंदिरासमोर नामांकित तमाशा व्हायचा . संध्याकाळी कुस्त्यांचा जंगी फड भरायचा , या कुस्त्यांच्या फडामध्ये अनेक गावांमधील लहान नावाजलेले पैलवान यायचे . तालुक्यातील व जिल्ह्यातील नामवंत शरीर कमावलेले मोठे पैलवान मानाचा फेटा व सोनेरी गदा मिळवण्यासाठी ताकतीने झुंजायचे . सर्वांसाठी या कुस्त्या पाहणे व कुस्त्यांमध्ये पदक मिळवणे पैलवानांसाठी एक अलौकिक मानाची घटना असायची .
रात्री उशीरापर्यंत वाड्यामध्ये सुरात एकतारीवर हरीभजने सुरु व्हायची . चुलते मारुती काळे (तात्यांची ) भजने ऐकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने हजेरी लावायचे . पाडुरंगाच्या , हरिनामाच्या गजरात परिसर अगदी दुमदुमुन जायचा . सगळीकडे भावपूर्ण अध्यात्मिक वातावरण तयार व्हायचे . पांडेवाडी नंतर शेजारच्या भोगाव आणि मेणवली या गावच्या जत्रादेखील जल्लोषात संपल्यानंतर तृप्त मनाने जत्रा पार पडल्याचे समाधान मिळायचे .
त्यानंतरच्या दिवसांत वाकळांचा ,चादरीचा मोठ्ठाच्या मोठा ढीग डोक्यावर घेऊन सगळेजण पांडेवाडीच्या कृष्णानदीच्या घाटावर जायचो .या घाटावर जातानाच्या रस्त्यावरच घराजवळ एक मोठे बहरलेल्या , लगडलेल्या असंख्य चिंचा असलेले झाड अजूनही आहे . या झाडावर मी व माझा चुलत भाऊ छोटे दगड मारून मारून चिंचा पाडायचो .आजूबाजूच्या सर्व छोट्या दगडी संपायच्या . सतत दगड
भिरकावल्यामूळे हाताचे बावटे दुखायचे पण चिंचा काढण्याचे वेड संपायचे नाही . दमून जायचो , थकायचो .वेळ तर कसा भरभर जायचा हे समजायचे देखील नाही .मग एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्या चिंचा आम्ही घरी जणू दौलत कमावल्यासारखे घेऊन जायचो . पांडेवाडीच्या घाटावर धोम धरणाचे पाणी भरपूर वहात असायचे . पाण्यावर पातळ चपट्या दगडी मारून एकाच दगडाचे दोन तीन टप्पे पाडायचे हा आमचा आवडता खेळ असायचा . कितीतरी तास दमून जाईपर्यंत पाण्यात पोहायचे , डुंबायचे . धरपकडीचा खेळ खेळत राहायचे .घरी आलो की आंबे खायचे .आजोबांच्या अगोदर पासून एक आंब्याचे झाड कोणीतरी घराजवळच लावलेले होते .त्या झाडाची फळे इतकी रसाळ व गोड होती विचारूच नका .आम्ही तो आंबा नेहमी पोटभर खात राहायचो .गवताचे चगळ टाकून पिकत ठेवलेली एक खोली अगणित आब्यांनी भरून गेलेली असायची .आजी मोठ्या आंब्याचं कैऱ्यांचे लोणचं अगोदरच करून मोठ्या बरण्या भरून उंचावर ठेवायची .त्या लोणच्याची चव आजही सतत आठवते .मनसोक्त आंबे खाऊन पोट व मनही तुडुंब भरलेले असायचे . मग जत्रा व सुट्टी संपल्याची जाणीव व्हायची .
मग सर्वजण परत निघताना आजी सगळ्या नातवंडांच्या तोंडावरून तिचा खरखरीत हात फिरवायची तिचा हात त्यावेळी मदर टेरेसाच्या हातासारखा उबदार प्रेमळ व आश्वासक वाटायचा .आजोबांचे डोळे पाण्याने भरलेले असायचे . त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचे . मग सगळा कुटुंबकबिला परतीच्या प्रवासाला निघायचा . आजोबा शेतापर्यंत सोडायला यायचे मागे फिरून पाहिले तरी त्यांचे निरोप देणारे हालणारे हात थकायचे नाहीत .
पाचगणीला आलो की आम्ही सर्वजण शाळेच्या अंतिम परीक्षांमध्ये मग्न असायचो व गावावरून आणलेल्या चिंचा पुरवून पुरवून खाताना जत्रेचे आठवणी मनात पिंगा घालत असायच्या . अशा कितीतरी जत्रा मनात कायम आठवणीत राहिलेल्या आहेत .
एक दिवस अचानक गावातल्या घराला रात्री आग लागल्याचा निरोप आला .आम्ही सर्वजण मोठ्या उत्सुकतेने तेथे पोहोचलो त्यावेळी पाहीले ,आमच्या वाड्यातील आमचे व आजूबाजूची सर्व जणांची घरे आगीत जळून खाक झाली , भस्मस्तात होऊन राखेचा फक्त ढिग उरला होता . पाचगणीत वयोवृद्ध आजोबा आणि आजी निराशेने मग त्या गावच्या घराच्या आठवणीत सतत अश्रू ढाळायचे .पाचगणीत राहत असून सुद्धा आजीआजोबांचे मन सतत गावच्याघरामध्ये व शेतामध्येच रमलेले असायचे . शेवटी परत एकदा नव्याने घर बांधायचे ठरले पैशांची जमवाजमव सुरू झाली . परंतु सर्वच काकांनी मदत केली नाही . त्यामुळे घर बांधायचे लांबणीवर पडले . त्यातच घराची आठवण काढत काढत ८३ साली आजी देवाघरी गेली . तिच्या आठवणी काढून ८४ साली आजोबाही गेले . त्या नंतर वर्षभरात घर पूर्ण झाले परंतु वयोवृद्ध आजी आजोबा नसल्यामूळे जत्रेला मजाच आली नाही . मग त्यांच्या स्मरणार्थ रस्त्यावरच्या शेतात छोटे देऊळ बांधले , मोठी सत्यनारायणाची पूजा व गावजेवण झाले .घराचे बांधकाम पूर्ण झाले तोपर्यंत आम्ही सर्व भावंडे मोठे होऊन काहीजण शिक्षणासाठी , काही नोकरीसाठी बाहेर पडलेलो होतो .गावच्या जत्रेला बोलावणे आले तरी सर्वजणांनी एकत्रित येणे पुन्हा कधी शक्य झालेच नाही .
1990 साली गावच्या या नव्या बांधलेल्या घरालादेखील परत पुन्हा आग लागली .का आग लावली ? याचे कारण कोणालाच शेवटपर्यंत कळाले नाही .त्यावेळी मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होतो .घरातील आर्थिक परिस्थिती ढासळलेली पाहून माझी मुंबईची परिक्षा अर्धवटच राहीली .घरातील संपूर्ण धान्याने भरलेल्या कणग्या . नव्याने उभा केलेला सर्व संसार पुन्हा एकदा बेचिराख झाला होता . तो दुःखद प्रसंग पाहिला आणि नंतर गावाला जाण्याची , जत्रा साजरा करण्याची सर्व इच्छाच पूर्णपणे संपून गेली .
कधीतरी गावी गेलो , तिथले पडके घर पाहिले की ते बालपण संपल्याची जाणीव तीव्रतेने होते . आंब्याची झाडे आता कुणीतरी मूळासकट काढून टाकलेली होती . त्यामुळे बाजारात डझनावारी विकत घेऊन आंबे खाताना संपूर्ण खोलीभर गवताच्या ढिगात ठेवलेले आजोबांचे आंबे आठवतात . शेतावरचे आजोबा आजीचे देऊळ कित्येक वर्ष देखभालीअभावी निस्तेज पडलेले आहे त्याचे दरवाजानां गंज पकडलेला आहे , त्याच्यावर शेवाळे साचून वीटा दिसू लागलेल्या आहेत . रंगकामाअभावी वेळोवेळी दुरुस्ती न केल्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोलमडून पडेल अशी भीती वाटते . त्याचे मोडकळीस आलेले स्वरुप पाहिले की मन व्याकूळ होते . कायदेशीर वाटण्या झाल्या नसल्यामुळे सरस निरस वाटपासाठी कोर्टामध्ये सात वर्षापासून केस सुरू आहे . तीचा निकाल कधी लागेल हे देवालाच माहीत .त्या केसच्या कामाकडेकडे कोणाचेच लक्ष नाही व कोणाला गरजही आहे असे वाटत नाही . त्यामुळे संपूर्ण जमीन आता पडीक अवस्थेत माळरानासारखी पडलेली आहे . आजोबांच्या सात मुलांपैकी पाच मुले देवाघरी गेलेली आहेत . या सात मुलांची दुसरी पिढी जवळपास पन्नाशीच्या पुढे पोचलेली आहे . सगळ्यांची घरेदारे व संसार उत्तम पद्धतीने सुरु आहे . त्यातील काही जणांना आता नातू देखील झालेले आहेत . ही सगळी मंडळी आता शहरांमध्ये राहतात .आता गावची जत्रा ,गावची शेती , तमाशा , कुस्त्यांचे फड , आंबे ,चिंचा ,शेतात पिकणारे धान्य , पांडेवाडीचा घाट , हरिभजनाची आवड सर्व काही विसरून गेलेले आहेत . आता फक्त कोणीतरी मयत झाले किंवा कोणाच्या मुलामुलींचे लग्न असेल त्यावेळी सगळेजण तात्पुरते उपस्थित राहतात . अन्यथा कित्येक वर्ष एकमेकानां मोबाईलच्या युगातही साधा फोन करून चौकशी करत नाहीत .
मी खिसाभरून आणलेल्या चिंचा व आंबे प्लेट मध्ये काढून ठेवलेले आहेत . पण त्यानां खायची इच्छा पूर्णपणे संपली आहे. या सर्व आठवणीत आता मला सतत जाणवत आहे की आता माझे
बालपण हरवलेले आहे..........
खरच सांगतो माझे
बालपण हरवलेले आहे ..........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुनील काळे
9423 966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा