शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री = पार्ट 2

 दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां मी मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा कॉलेजच्या जवळ आर्ट मटेरियल घ्यायला गेलो होतो त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . त्याच्याशी हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी प्रेमळ विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याचदिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राची तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत .

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

 दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

       आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात  वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्या स्वभावाची ,अठरापगड जातीधर्माची , अतिशय वेगवेगळ्या विचारांचा पगडा असलेली , धार्मिक , राजकीय एकमत नसलेली  तर अगदी विरुद्ध विचारधारा व विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेली अनेक माणसे जीवनप्रवासात भेटत असतात . काहीजण भेटल्यानंतर लगेच विस्मृतीत जातात,काही थोडेच दिवस लक्षात राहतात व नंतर विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात . कधीकधी तर ही कायम लक्षात राहिलेली माणसे आपल्या जीवन प्रवासाचा एक अविभाज्य भागच झालेली असतात . त्यांचे हे अचानक निर्माण झालेले अनोखे मैत्रीचे नाते मनात कायम टिकून राहते .

            आज मी अशाच एका दूरदेशीच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे. जी माझ्या जातीची नाही , धर्माची नाही , माझ्या वर्णाची नाही , जी माझ्या देशाची नाही , इतकेच काय ती मला समवयस्कर देखील नाही . आमचे राहणीमान , आर्थिक परिस्थिती , भौगोलिक वातावरण , आवडीनिवडी वेगवेगळ्याच आहेत .तरी देखील आम्ही कितीतरी वर्षे एकमेकांचे अगदी पक्के घनिष्ट मित्र आहोत आणि ह्या मैत्रीच्या मनाचे गुंफलेले धागे दिवसेंदिवस अजूनच घट्ट बनत चालले आहेत.

           1996 साली माझे एक चित्रप्रदर्शन पाचगणीत सुरु होते . त्या ओपन प्लाझाटाईप आर्टगॅलरीमध्ये अनेक पर्यटक येत होते . प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता.  एके दिवशी अशाच या प्रदर्शनाच्या धामधूमीत माझे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर पंच्चाहत्तरीच्या वयाची , पांढरेशुभ्र केस , युरोपीयन गोऱ्या वर्णाची , चेहर्‍यावर सुरकुत्या पण तजेलदार चेहरा असलेली , काळा गॉगल व लालभडक शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेली , पाठीमागे छोटी हॅवरसॅक लटकवलेली एक म्हातारी आज्जीबाई अगदी अचानकपणे माझ्यासमोर चालत आली व काही कळायच्या आतच तिने गळ्याभोवती प्रेमाने हात टाकत मनसोक्त गळाभेट घेतली . या अचानक झालेल्या जादूच्या झप्पीमुळे मी क्षणभर गांगरलो , बावरुन गेलो आणि थोडा आश्चर्यचकीतही झालो .

युवर पेंटीग्ज आर वंडरफूल ! 

युअर डिस्पले ॲन्ड स्टाईल इज अलसो व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग .

कॅन वुई टेक कप ऑफ कॉफी टुगेदर ? तिने तिच्या मनातील भावना व ओळख थोडक्यात  शेकहँड करत अशा प्रेमळ पद्धतीने व्यक्त केल्यामूळे मी नकार देऊ शकलो नाही . मी , स्वाती , तिचा मित्र व ती असे चौघे कॉफी घेत हॉटेलमध्ये बसलो .

माय नेम इज इल्झे , 

आय एल एस ई .

व्हेरी सिंपल नेम .शेकहँन्ड करत तीने स्वतःची ओळख करून दिली . 

आय एम फ्रॉम जर्मनी , माय सिटी नेम इज बॉन . बी ओ एन एन . 

आय एम रिटायर्ड आर्ट टिचर ,बट नाऊ  टोटली फ्रि . 

आय लाईक एन्जॉईंग माय रिटायर्ड लाईफ स्केचिंग इंडिया . इंडिया अँन्ड इंडियन पीपल आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग . आय लाईक युवर्स पेन्टींग अँन्ड स्केचेस .

           माझी चित्रे तिला आवडली होती , त्याविषयी ती भरभरून बोलत होती . तिला कौतुक करताना किती बोलावे याचे जणू भानच राहीले नव्हते . मग तिच्या लक्षात आले व तिच्यासोबत आलेल्या लालबुंद चेहरा असलेल्या , हाफ शर्टावर फोटोग्राफरचे जॅकेट परिधान केलेल्या वयोवृद्ध मित्राची ओळख करून दिली . त्याचे नाव ग्वीन्टर जॉन . त्या भेटीमध्ये तीने माझा पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी ती ग्वीन्टर सोबत माझ्या पाचगणीच्या त्या छोट्या घरात आली . तिचं जर्मनमिश्रित इंग्रजी आणि माझे मराठी गावरान इंग्रजी एकमेकाला मात्र थोडे थोड़े समजत होते .

            इल्झे आणि तिचा मित्र ग्वीन्टर दोघेही जर्मनीत बॉन नावाच्या शहरात राहत होते . तिथे तिचे 125 वर्ष जुने अनेक खोल्यांचे घर आहे . आणि तेथे ती एकटीच राहत असते . जर्मनीत डिसेंबरच्या सहा महिन्याच्या काळात अतिशय थंडी व बर्फ कोसळत असल्याने मायनस दहा डिग्रीच्या कडाक्याच्या थंडीमुळे घरात इलेक्ट्रीक हिटर बसवावा लागतो . त्या हिटरचे इलेक्ट्रीकचे इतके बिल येते की त्या बिलाच्या रकमेमध्ये सहा महिने भारतात राहायला परवडते . त्यामूळे अनेक वर्षांपासुन ते भारतात स्केचिंग करत भटकत असतात.

           ग्वीन्टर 85 वर्षांचा असुन तो पूर्वी जर्मन राजदूतांच्या सरकारी कार्यालयात नोकरी करायचा . जर्मनीत ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात , पण दोघांना चित्रांची व स्केचिंगची आवड असल्याने ते भारतात एकत्र फिरतात .

या वयात असे मैत्रीपूर्ण संबध ठेवून एकत्र राहत , एकत्र भटकंती करत असताना तुमच्या दोघांचे कुटुंबिय काही तक्रार करतात का? मी आपला भारतीय , मराठमोळा प्रश्न विचारल्यानंतर इल्झे मनसोक्तपणे हसली .मग तिने तिच्या कुटूंबाविषयी माहिती दिली . इल्सेला दोन मुली व एक मुलगा सगळे वयाच्या पन्नासच्या पुढे . इल्सेचा नवरा कॅसिनो व गॅम्बलींगमध्ये बरबाद झाला. घटस्फोटानंतर इल्सेने सर्व जबाबदारी स्विकारली आर्ट टिचरची नोकरी केली आणि आपल्या सर्व मुलानां उत्तम शिक्षण दिले . जावई , सुना , नातवंडे सगळा भरपूर मोठा परिवार आहे. प्रत्येकजण सेटल आहे. प्रत्येकाची मोठी घरे आहेत व सर्वजण वेगवेगळे राहतात. त्यांच्या संसारात मग्न आहेत . पण आपण कोणालाही ओझे वाटता कामा नये यासाठी ती वेगळे राहणे पसंद करते . तिला चित्रे काढायला , स्केचिंग करायला भटकायला आवडते . योगायोगाने ग्वींटर तिच्याच शहरात राहणारा तोही समवयस्कर . त्याची पत्नी अजारपणात गेली . मुले सेटल आहेत .पण दोघांनीही नात्याच्या गुंत्यात स्वतःला गुरफटून घेतले नाही . मग या दोघांची निरागस मैत्री सुरु झाली व स्वच्छन्दी भटकंती देखील .

               वयाच्या साठीनंतर तिला स्केचिंग , चित्रकला करत मनसोक्त भटकायचे होते त्याप्रमाणे कधी एकटी किंवा एकत्रपणे ती भारतात प्रत्येकवर्षी सहा महिने भटकत असते . वाराणसी , इंदोर , औरंगाबाद , राजस्थानमधील जोधपूर ,उदयपूर , जैसलमेर , मद्रास , पचमढी , भोपाळ , मांडू , अजिंठा , वेरुळ ' पाँडेचरी , हम्पी , कर्नाटक , गोवा , सातारा , वाई, पाचगणी , महाबळेश्वर , म्यानमार , बाली , जावा , जकार्ता , मलेशिया , थायलंड , इंडोनिशिया बँकॉक अशा सर्व ठिकाणी तिची मुशाफिरी सुरु असते . गेली पंचवीस वर्षे तिचा हा मुक्तप्रवास मजेशीरपणे चालू आहे.

             दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती पाचगणीला येते . ती भारतात आली की तिचा अचानक फोन येतो . प्रत्येक वेळी आठवणीने ती अपॉईंटमेंट घेतल्याप्रमाणे टायमिंग विचारते आणि ते कधीही आजपर्यंत चुकलेले नाही . तिला लाल एस.टी बसने प्रवास करायला आवडतो . त्याचे कारण म्हणजे एसटी स्वस्त आहेच पण त्यात बसणारी साधी माणसे प्रेमळ असतात व सुरक्षितपणे प्रवास करता येतो असे तिचे व्यक्तिगत मत आहे . आपली छोटी सॅक पाठीवर घेऊन ती सगळा भारत चित्रित करत बसमधूनच फिरत असते .

             एकदा तिने मला स्केचिंग करण्यासाठी माझ्या आवडत्या स्पॉटवर सोबत येण्याची विनंती केली. मग तिला इम्प्रेस करण्यासाठी मी माझे चित्रकलेचे सामान , ईझल (चित्रकलेचे स्टॅन्ड ), भरपूर पेन , ब्रशेस , वॉटरकलर्स ,पेन्सीली , बसायची खुर्ची , उन्हाची आऊटडोअरची मोठी छत्री , त्याचे लोखंडी स्टॅन्ड , व इतर अनेक सटरफटर वस्तू घेऊन पांगारी गावच्या व्हॅलीचे चित्र काढायला माझ्या मारुती व्हॅन गाडीतून निघालो . आमच्या दोघांनाही एकमेकानां स्पॉटवर चित्रे काढताना पाहण्याची इच्छा व उत्सुकता होती .

              पंजाबी ड्रेसमध्ये बसलेल्या इल्झेने मस्तपैकी जमीनीवरच बैठक मांडली . तिच्या जवळचे पाच बाय सात इंच आकाराचे छोटे स्केचबुक उघडले . त्यात एक बॉर्डर मार्किंग करायची चौकट होती . ती चौकट पेन्सिलीने आऊटलाईन करून तिची अतिशय छोट्या आकाराची जलरंगाच्या वड्या असलेली पेटी उघडली . तिच्याकडे एकच ब्रश होता तो दोन भागात विखुरलेला आट्या असलेला ब्रश तिने जोडला . युरीन टेस्ट करताना वापरतात तशी पाण्याची छोटी बाटली उघडली . अतिशय तत्परतेने तीने चित्र काढावयास सुरुवात केली . थोडे अमूर्त , थोडे मूर्त , इंप्रशेनिस्ट पद्धतीचे चित्र 15 मिनिटात संपले देखील . मग पाठीमागच्या बाजूला तिने मला स्पॉटविषयी माहिती विचारली . त्या दृश्याचे नाव ,गाव , वेळ लिहली मग माझ्याकडे हसत पहात म्हणाली माय वर्क इज फिनिश्ड . नाऊ यु स्टार्ट युवर वर्क .

             मी मात्र माझे सामान लावण्यातच अर्धा तास घालवला आणि मग दोन तीन तास माझे डिटेल स्केचिंग काम सुरु झाले . तोपर्यंत इल्झे सगळीकडे मनसोक्तपणे भटकून आली . तिचा स्केचिंगचा विचार , चित्राकडे , दृश्याकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी होती . तिच्या चित्रानां कोणतीही अशी स्टाईल नव्हती . तिचे स्केचबुक म्हणजे एक छान प्रवासवर्णन होते . प्रत्येक चित्रामागे सारांशरुपाने लिहलेली माहिती ,वेळ ,दिनांक व्यवस्थितपणे लिहलेले होते . त्या प्रत्येक स्केचमध्ये मला कधी व्हॅनगॉग , पॉल क्ली, पिकासो , मोनेट , कधी कोलते , अवचट , चंद्रमोहन अशी वेगवेगळी चित्रकारांच्या पद्धतीने रेखाटलेली चित्रे दिसायची . कोणतेही एक चित्र दुसऱ्यासारखे नाही . मी तिला याविषयी विचारले तर म्हणाली चित्र काढताना मला त्यादिवशी ,त्यावेळेला ,त्याक्षणाला जे जाणवले ,भावले ते मी रेखाटले . 

नो डिस्कशन . 

विषय संपला .

              मी मात्र माझी पारंपारीक पठडी , डिटेल्स स्केच करायची सवय सोडलेली नसायची पण त्यावर तिने कधीही टिकाटिप्पणी केली नाही किंवा मला ती स्टाईल सोडण्यासाठी । सांगितले नाही उलट ती कौतुकाने म्हणायची एक्सलंट जॉब , एक्सलंट पेशन्स . इल्झेने  चित्रकलेतील कोणत्याही ईझम्सचा निषेध केला नव्हता . तिला सगळे ईझम्स सारखेच प्रिय होते , सगळ्यानांच तिने स्विकारले होते . आनंदाने ..........

            पुढे प्रत्येकवर्षांच्या भेटीमध्ये ती आणि मी वाईच्या गणपती घाटावर , मधल्या आळीतील घाट , मेणवलीचा फडणीसवाडा , पाचगणी व महाबळेश्वरच्या परिसरातील  शेरबाग , आर्थरसीट , राजभवन , लॉडवीक पॉईंटला भटकत स्केचिंग करायचो खूप फिरायचो . तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसायचे . डोंगर , दरी , रस्ता , झाडे , इमारत , बंगले काहीही विषय असो ती सगळे अगदी प्रेमाने चित्रित करायची . तिच्या स्वतःच्या स्टाईलने . तिचा ऐशींव्या वर्षाचा सातत्याने स्केचिंग करण्याचा उत्साह पाहून मी चकीत व्हायचो . बिनधास्तपणे अनोळखी गावांमध्ये फिरण्याची सवय , परका देश , परकी माणसे याविषयी तिची कसलीही तक्रार नसायची . तिची चित्रांची छोटी सॅक पाठीवर घेऊन कोणी सोबत असो वा नसो ती आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगते .

           मग मला माझी आपल्याकडची काही म्हातारी माणसे आठवतात . सांधेदुखी , गुडघेदुखी , हातपाय सुजलेले दाखवत राहतात . अनेक आजारांनी मानसिक व शारिरीक दृष्टीने खंगलेली एकाच जागेवर पडून राहीलेली असतात . प्रवासाचे नाव जरी काढले तरी अनेक अडचणी सांगत टाळाटाळ करत राहतात . काहीजण जुन्या घडलेल्या वाईट गोष्टींवर राजकारण , सरकार , व नातेवाईकांविषयी सतत टिकात्मक बोलून टिव्ही पहात स्वतः व इतरानाही अस्वस्थ करणारी मंडळी आठवत राहतात . अर्थात काही अपवाद असतात , सगळीच वयस्कर माणसं त्रासदायक नसतात .

              इल्झेचे व्यक्तिमत्व मात्र या सर्वांपेक्षा वेगळेच आहे . स्वतः नकाशा घ्यायचा , त्या गावाची शहराची माहीती काढायची , तिथल्या कोणत्या स्पॉटवर चित्रे काढता येतील याचा अभ्यास करायचा . हॉटेल बुक करायचे ,एसटीचे वेळापत्रक घ्यायचे . कोणतीही एसटी वेळेवर आली नाही म्हणून ती कधीही वैतागलेली दिसली नाही .एसटी मध्ये फाटलेल्या सीटाबद्दल , असुविधांबद्दल तिची कोणतीही तक्रार नाही. जे नानाविध प्रकारचे चांगले वाईट जेवण मिळेल ते आनंदाने खायचे , कोणत्याही अनोळख्या स्त्रीया , माणसांबरोबर मैत्री करायची त्यांच्या मुलानां खाऊ द्यायचा . त्यांच्याबरोबर मोबाईलने असंख्य फोटो काढायचे . बुरखा घातलेली एखादी मुस्लिम स्त्री दिसली की तीचा बुरखा उघडायचा व त्या बाईबरोबर हातात हात घालून एक हसतमुख फोटो काढण्यासाठी  त्याच बाईच्या सोबत असलेला तिच्याच नवर्‍याला सांगायचे ही तिची हॉबी ती पुरेपूर एन्जॉय करते . आपल्या या सहा महीन्यांच्या प्रवासात भरपूर स्केचबुके घेऊन ती समाधानाने जर्मनीला जाते . तेथे गेल्यावर सर्व ओळखीच्यानां आवर्जून पत्रे लिहते . स्वतः ई मेल करते व तिच्या अनुभवाबद्दल केलल्या मदतीबद्दल भरभरून लिहते . 

            गेली पंचवीस वर्ष मी आणि स्वाती करत असलेल्या आर्ट गॅलरीच्या संघर्षाची ती साक्षीदार आहे . येताना ती मुद्दाम जर्मनीची ब्रशपेन्स तर कधी छोटी स्केचबुके आणते त्याबदल्यात मी तिला कधी खास मदत करावी अशी तिची कधीही अपेक्षा नसते .आम्ही राहत होतो त्या सर्व चित्रविचित्र परिस्थितीचा तिने कधी तिरस्कार केला नाही . माझ्या अपयशावर टिकास्त्र सोडले नाही . उपदेशाचे डोस पाजले नाहीत .यावर्षी करोनाच्या महामारीमुळे डिसेंबर महिन्यामध्ये इल्झे भारतात आली नाही . यावर्षी मायनस वीस डिग्री सेल्सियस तापमानात बर्फामूळे पसरलेला ग्रे रंगाचा उदासिनपणा तिला भारताची आठवण करून देतो. युवर कंट्री इज कलरफूल , यु ऑल इंडियन्स आर वंडरफूल पीपल  असे सांगत इल्झे आता वॉटसअपवर कधी स्काईपवर व्हिडीओ कॉल करत खूप बोलत असते . तिने केलेली नवीन चित्रे दाखवत राहते .तिने माझी सगळी घरे पाहिलीत आता माझे नवीन घर पाहण्याची व परत त्या परिसरातील स्केचिंग करण्याची तीची ओढ आजही नव्वदाव्या वर्षी कायम आहे. 

ती फक्त करोना संपण्याची वाट पाहतेय ..........

            एकदा भारतातील प्रवास संपवून ती परत जर्मनीला जाण्यासाठी निघाली होती . कारण ग्वीन्टर ख्रिस्तवासी झाल्यामूळे ती आता एकटीच प्रवास करत होती . मी आणि स्वाती तिला शेवटचे भेटण्यासाठी महाबळेश्वरला हॉटेलवर गेलो होतो . तिच्या हातामध्ये छोटी चाके असलेली सुटकेस व पाठीमागे तिची फेव्हरेट छोटी चित्रांची सॅक होतीच . बाकी काही सामान नाही . मग मी तिला विचारले , असे परक्या देशात भटक्या विमुक्त जमातीसारखे फिरताना तुला भिती नाही का वाटत ?

त्यावेळी तिने दिलेले उत्तर आजही माझ्या कायम लक्षात आहे .

मित्रा , प्रवास खूप लांबचा आहे , 

मजेशीर आहे, 

आनंदाचा आहे , 

पण आपल्या प्रत्येकाचा प्रवास अचानकपणे कधीही संपू शकतो याची सतत जाणीव ठेवली पाहीजे . 

आपल्या या जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येणार आहेत , अनेक कडू गोड अनुभव पाठीशी मिळणार आहेत. पण प्रवासात खूप मोठ्या अपेक्षा बाळगून, खूप नात्यांची गुंतागुंत वाढवण्यापेक्षा कमीत कमी सामान घेऊन मनाची आणि शरीरावरचीही जड ओझी टाळली पाहीजेत .


" शेवटच्या प्रवासात सामान खूप  कमी असले पाहीजे ". 


शेवटी आपले दोन्ही हात व मनही पक्षांप्रमाणे मोकळे असायला हवे मग झटपट कोठेही जाण्यासाठी आपण सदैव तयार असू .

जीवन प्रवासासाठी कसलीही जटील बंधने असू नयेत . 


" शेवटच्या प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे ". 


माझ्या वाई -पाचगणीच्या साध्या दोन दिवसाच्या प्रवासात गाडीतील डिकीत व पाठीमागच्या सीटवरील खच्चून भरलेल्या सामानाकडे सहज नजर टाकली की  मला या 

दुरदेशीच्या मैत्रीणीची आठवण येते व कानात शब्दही ऐकू येतात .


" प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे "

"प्रवासात सामान खूप कमी असले पाहीजे " 

🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳🧳


सुनील काळे✍️

9423966486

sunilkaleartist@gmail.com

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...