*सीमा स्वामी यांचा फोटोग्राफीचा ध्यास*
📷📸📷📸📷📸📷📸📷📸📷📸📷
आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कसले कसले तरी अनोळखी कॉम्प्लेक्स मनात तयार झालेले असतात. मनाला या कॉम्लेक्सची सतत जाणीवही होत असते . मी कधी फोटो काढायला उभा राहिलो की मला नेहमी असे वाटत राहते की आपली पोझ नेमकी कशी असली पाहिजे ? आपले दोन्ही हात नेमके कसे ठेवावे ? चेहऱ्यावर ते सुंदर सुहास्य कसे आणावे ? सरळ उभे राहावे की जरा स्टाईलमध्ये उभे राहावे ? उजवा पाय पुढे ठेवावा की डावा ? डोळ्याने समोरच्या फोटोग्राफरकडे सहज बघावे की रोखून बघावे ? आपले केस विस्कळीत तर झाले नसतील ना? आपण कपडे जरा ठेवणीतले इस्त्री केलेले घातले पाहीजे होते का? जरा दाढी करून फोटो काढले असते तर अजून भारी आले असते का?
आपला चेहरा फोटो चांगले येण्यासाठी पर्सन्यालीटीत जरा अजून काही सुधारणा करता येईल का ? असे नाना प्रश्न मला पडत असतात .
शेवटी मग हे फोटो काढणेच टाळतो . मग बऱ्याच वेळा मनात एक शल्य राहून जाते की अनेक मित्र मैत्रिणी व प्रसिद्ध मान्यवरांच्यांबरोबर माझे फोटो आठवण म्हणून तरी काढायचेच राहून गेले आहेत .
लॉकडाऊनच्या काळात एकदा केस कापायचे बरेच दिवस राहून गेले . मग संधी मिळताच केशकर्तनालयात गेलो .त्या नेहमीच्या तरुण कारागिराकडे मी केस कसे समुद्राच्या लाटांप्रमाणे कानावर येऊन वाकडेतिकडे पसरतात याची तक्रार करत होतो . त्याने माझी बडबड शांतपणे ऐकली व डोक्यावरची टोपी काढली . सर , तुमच्या डोक्यावर या वयात केस आहेत हेच नशीब समजा ,आमचे बघा . मी पहिल्यांदा त्याला टोपी नसताना पाहत होतो. त्याच्या डोक्यावरचे केस पुर्णपणे विरळ झाले होते . तुमच्याकडे केसाचे डोक्यावर चांगले टोपले उगवत असताना उगाचच तक्रार करत बसता .
त्यानंतर मी कधी त्याच्याकडे व इतरांकडेही कसलीही तक्रार केली नाही. त्याचे दुःख मला चांगलेच समजले होते. माणसाला आपल्याकडे जे नसेल त्याचेच दुःख उगाळत बसायची सवय लागली आहे . त्यामूळे मनुष्यप्राणी सतत तक्रार करत राहतो याचा मला नव्याने चांगलाच शोध लागला . आणि हो ,आपण सगळे जण नेहमी फक्त वरचा क्लास पाहतो आपल्यापेक्षा खाली पाहिले तर कितीतरी जणांकडे आपल्याकडे असणाऱ्या पण त्यांच्याकडे नसणाऱ्या गोष्टींची उणीव समजते . खरं तर या उणीवांची जरा सर्वानीच जाणीव ठेवली पाहीजे असे मला वाटत राहते .
आपण जसे आहोत , जसा आपला बांधा , जसे आपले रंगरूप , जशी आपली उंची , शरीराची व चेहऱ्याची ठेवण आहे त्याचा स्विकार करायला पाहीजे . इतर जणांशी तुलना करत बसलो की पदरी आणखी घोर निराशा येते . त्यामूळे तुलना करणेच सोडून दिले पाहीजे याची वयोपरत्वे जाणीव मला प्रकर्षाने होत गेली. त्यामूळे मी आता बिनधास्तपणे फोटो काढत असतो .
काही दिवसांपूवी कराडला मित्राच्या मुलांच्या लग्नासाठी गेलो होतो . येताना रात्री उशीर झाला म्हणून साताऱ्यात आमच्या नरेन्द्र रोकडे या मित्राकडे मुक्काम झाला . नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा झाल्या व दुसऱ्यादिवशी सकाळी परत निघालो तर पहिल्या मजल्यांवरून सीमा स्वामींचा चहा घेऊन जा ! असा प्रेमळ आदेश आला .
सीमा स्वामींची ओळख करून द्यायची म्हणजे त्या उत्तम फोटोग्राफी करतात . त्यांचा स्वतःचा सर्व साधनसोयीयुक्त स्टुडीओ आहे . त्या स्वतः फोटोग्राफरचे मस्त जॅकेट घालून सातत्याने प्राणी , पक्षी , फुले , किटक अशा निसर्गाच्या विविध घटकांचा अगदी सुक्ष्म मायक्रोलेन्स लावून सतत फोटोग्राफी करत असतात . अतिशय साधे दुर्लक्षित वाटणारे विषय त्यांच्या लेन्समधून असे फक्कड ,अनोळखी , अद्भूत रुप घेऊन सजीव होतात की फोटो बघणारा स्तिमितच होत जातो . एका वेगळ्या विश्वात हरवतो . त्या सामान्य दृश्याला अलौकीक असे असामान्यत्व प्राप्त होते .
आपली फोटोग्राफीची पॅशन आपण स्वत:च कशी डेव्हलप केली त्याची माहीती सांगताना त्याच्यांकडे छान उत्साह असतो. त्यांचे मिस्टर प्रसाद हे सध्या पुण्यात सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत . मुलगी मुक्ता आता अहमदाबादला शिकत आहे. पण सर्व सुविधा असल्यातरी मनात हा विचार येत असे की आपण काहीतरी केले पाहीजे . आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष नोकरी करत किंवा घर सांभाळत राहण्यापेक्षा एखादी वेगळी कला जोपासण्यासाठी ध्यास घेतला पाहीजे . २००९ साली त्यांच्या आयुष्यात त्यानां एका खडतर प्रसंगाला सामोरे जावे लागले . मोठ्या धीराने त्या प्रसंगाला सामोरे गेल्या . स्वतःला व कुटूंबाला सावरले या सावरण्याच्या प्रक्रियेतच त्यानां त्यांच्यातील कलागुणांची जाणीव झाली . स्वतःला सावरत असताना त्यानां फोटोग्राफीची आवड निर्माण झाली . त्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या जीवन सुरळीत सुरु झाले असताना त्यांनी खास फोटोग्राफीचा छोटा कोर्स पूर्ण करुन सखोल एकलव्या प्रमाणे ध्यास घेऊन अभ्यास सुरु केला .
आज त्यांच्याकडे पोट्रेट , स्टील फोटोग्राफीसाठी लागणारी सर्व प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत .उत्तम पद्धतीचे कॅमेरे व स्टुडीओ उपलब्ध आहेत . फोटोग्राफीचे क्लासेस सुरु करून आपले मिळविलेले ज्ञान सर्वांपर्यत पोहचविण्याची त्यांची इच्छा व प्रयत्न आहे .
एखाद्याकडे रंग , ब्रश , पॅलेट , इझल असले म्हणजे ती व्यक्ती चित्रकार होत नाही , एखाद्याकडे उत्तम महागडे पार्करचे पेन असले म्हणजे कोणी लगेच लेखक होत नाही . तसेच हातामध्ये महागडा मोबाईल आला म्हणून कोणी उत्तम फोटोग्राफर होत नाही . कारण या सर्व कलाप्रकारांमध्ये लागतो तो म्हणजे तिसरा डोळा . सतत निरिक्षण व नाविन्याचा शोध घेत राहणारे मन . या मनाला उर्जा निर्माण करणारी अविश्रांत परिश्रमाची जोड लागते . नव्या तंत्रज्ञानासोबत मैत्री करण्याची आवड आणि परिश्रम करण्याची उर्जा त्याच्यांकडे विपूल प्रमाणात आहे .
आपला हा फोटोग्राफीचा छंद जोपासत त्यांनी अनेक देशी विदेशी स्पर्धांमध्ये भाग घेऊन मानाचे अनेक
पुरस्कार मिळवलेले आहेत . अनेक मान्यवरांनी त्यानां सेमिनार्स व वर्कशॉप्स ला मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे . अनेक नव्या फोटोग्राफर तरुण तरुणींचे ते प्रेरणास्थान बनत आहेत .
चहा पानाचे आमंत्रण देत असतानाच त्यांनी त्याचां वजनदार कॅमेरा आणला व स्टुडीओत नेऊन स्वाती व माझे अनपेक्षितपणे एक फोटोसेशनच सुरु केले . कोणतीही मानधनाची अपेक्षा नसतानाही आपल्या हातात कॅमेरा आल्यावर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणखी सुंदर , प्रभावी कसे होईल याचा अंदाज घेत घेत त्यांनी आमचे एकत्रित व स्वतंत्र अनेक फोटो घेतले . आणि आयुष्यात लग्नानंतर प्रथमच आमचे फोटोसेशन सीमा मॅडममूळे पार पडले . मी तर फार भारावून गेलो होतो .
सीमा मॅडम उत्तम कलात्मक फोटोग्राफी करणाऱ्या कलाकार तर आहेतच पण त्यापेक्षा माणुसकी व मित्रत्व जपणाऱ्या आहेत. प्राणीप्रेमी आहेत. घरातली कर्तव्ये पूर्ण करत स्त्रीयांनी आता सर्वच क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे . अनेक जणींनी निवडलेल्या , स्विकारलेल्या ,आवडलेल्या क्षेत्रात मोठी झेप घेऊन स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे . सीमा स्वामी देखील अशीच एकलव्यासारखी मोठी झेप घेऊन त्यांचे कर्तृत्व सिद्ध करतील अशी खात्री वाटते .
त्यानां भविष्यातील फोटोग्राफीतील उज्ज्वल प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा !💐💐त्यांचे फोटो पाहण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत . जरूर पहा . तुम्हाला नक्की आवडतील .
https://www.facebook.com/seema.swami
https://www.seemaswami.com/
https://instagram.com/seema_swami?utm_medium=copy_link
📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸
सुनील काळे