गुरुवार, १७ जून, २०२१

गुलमोहराची मित्रभेट

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
 *गुलमोहराची मित्रभेट* 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

       पाचगणी ज्या ब्रिटीश अधिकाऱ्याने शोधली आणि पहिला बंगला बांधला त्याचे नाव जॉन चेसन. त्यामूळेच रस्त्याला नाव मिळाले चेसन रोड . या चेसन रोडवर प्रिस्टन, मेडस्टोन हे छान बंगले व एस .एम बाथा स्कूल, न्यू इरा स्कूल या छान , प्रसिद्ध मोठ्या शाळा आहेत. 
आठ एकर परिसरातील " मेडस्टोन " हा बंगला ब्रिटीशांनीच बांधलेला होता .पेसी विरजी या पारशी गृहस्थांची मालकी त्या बंगल्याकडे ब्रिटीशानंतर होती . ते स्वतः व त्यांचे कुटुंबीय हे कलाप्रेमी व कलेचा आदर करणारे ,निसर्गप्रेमी कुटूंब होते .बऱ्याच वर्षांपासून माझी पेसी अंकलची ओळख व एक उत्तम नाते तयार झाले होते . त्यानां चित्रकले बद्दल आस्था होती . मी तेथे खूप वेळा जायचो त्यांनी मला कधीही तेथे जाण्यास मज्जाव केला नाही, उलट मी बरेच दिवस तेथे गेलो नाही की पेसी अंकल रागवायचे नाराज व्हायचे .
सकाळी एकदा फिरत असताना छान निसर्ग , झाडे, फोटो काढत काढत मी विरजी बंगल्यावर आलो होतो .. खूपच दिवसांनी , वर्षांनंतर आलो होतो , कारण पेसी अंकल आता या जगात नाहीत . आणि पाहतो तो बंगल्याला गेटवरच कुलूप व आतमधून ग्रीन नेट लावल्याने काहीच दिसत नव्हते . म्हणून मी चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी ही संपूर्ण प्रॉपर्टी बाथा स्कूलने घेतल्याचे कळाले.
बाथा स्कूलच्या गेटवर वॉचमन केबीन होती . वॉचमनने विचारले काय काम आहे ? कोणाला भेटायचंय ? मी म्हणालो माझा एक जुना मित्र आहे ,गुलमोहर , लाल रंगाचा, त्याला सवडीने भेटायचंय .वॉचमनने माझ्याकडे नीट बघितले , 
'अहो असं कुठं आसतयं का ' ? 
झाडाला भेटायचंय म्हणे, काय तरी मनाला पटेल असं बोलावं माणसानं . मी म्हणालो हो खरंच मला झाडालाच भेटायचंय , तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे , त्या झाडाशी माझी खरंच माझी मैत्री आहे, बऱ्याच वर्षांपासून ,पाहीजे तर तुम्ही झाडाला जावून विचारा .
त्याने शाळेच्या प्रशासक मॅडमला फोन लावला . तिने विचारले ' माणूस वेडा, बिडा आहे का ? 
 तो म्हणाला नाही, इंग्रजी पण बोलतुया...... पुढं काय करू ? त्याने रजिस्टर माझ्यापुढे ठेवले .मी नाव , गाव, मोबाईल नंबर लिहला पर्पज " गुलमोहर " मित्राला भेटणे, असं लिहून झोकात सहीही ठोकली .
वॉचमनने मला शाळेच्या ऑफीसमध्ये जाण्यास सांगितले . 
प्रशासक मॅडमने तुमचा नक्की उद्देश काय आहे ? असं स्पष्टपणे विचारले . मीही गुलमोहराचे झाड हा माझा मित्र असून खूप दिवसांनी त्याला भेटणे हाच उद्देश असल्याचे पुन्हा स्पष्टपणे व ठामपणे सांगितले . तिला काय करावे हे सुधारेना . तिने प्राचार्यानां भेटून परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले व बाहेर बसायला लागेल , थोडं थांबायला लागेल असं सांगितले. मग मीही मित्राला भेटूनच जायचेच असं ठरवून निवांत बसलो . शेवटी तासाभराने प्राचार्यांनी मी गेलो नाही हे खिडकीतून  पाहून मला नाईलाजाने  आत बोलावले व अशी झाडाला भेट देणाऱ्याची पहीलीच केस असल्यामूळे इस्टेट मॅनेजरला विचारावे लागेल , डायरेक्ट परवानगी देता येणार नाही असे सांगितले .थोडया वेळाने इस्टेट मॅनेजर आले व तेही मोठयाच विचारात पडले. मग परिस्थितीचा गंभीर विचार वगैरे केल्याचे दाखवून आम्हाला मुंबईला ट्रस्टीनां फोन करुन विचारावे लागेल असं म्हणाले . मग त्यांनी मुंबईला कमिटी मेंबर्सला फोन लावला .
मग ट्रस्टीनीं फोनवरच माझे नाव, गाव सर्व माहीती विचारली . मी चित्रकार आहे याची खात्री करून घेतली व दोन , तीन माणसानां सोबत घेऊन झाडाला भेटायची एकदाची परवानगी दिली . त्यामध्ये दोन माणसं सोबत असतील अशी मुख्य अट घातली , आणि मग मी आणि कदाचित झाडाने देखील एकदाचा हुश्श करून हा लाल फितीचा कारभार संपवला .
       मग शाळेचे कलाशिक्षक व इस्टेट मॅनेजर यांच्या सोबत मी मेडस्टोन विरजी बंगल्याकडे निघालो .
बंगल्याचे मूळ मालक पेसी विरजी वयस्कर झाल्याने जग सोडून गेले होते त्यांची तीनही मुले इंग्लडला स्थायिक झाली होती . त्यानां आता प्रॉपटीत कसलाच इंटरेस्ट राहीला नव्हता . बाकीची मंडळी मुलीकडे बंगलोरला कर्नाटकात शिफ्ट झाल्याचे कळाले . बंगला आता निस्तेजपणे शाळेचा बोर्ड लावून उदासपणे पडल्या सारखा दिसत होता .
बंगल्याच्या परिसराचे सगळे चैतन्यच हरवले होते .एके काळी किती तरी वेळा मी या परिसरात स्केचेस व वॉटरकलर मधील चित्रे रेखाटली होती .पेसी अंकल प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलांच्या इंग्लडच्या घरी माझी चित्रे पाठवायचे त्यांच्या जीमी , रॉय व कॅथी या मुलांची, नातवंडाची आठवणीने बोलावून भेट करुन द्यायचे . 
      बंगल्याच्या पुढील सुंदर गार्डन , मागील कृष्णा नदीचे धरणाचे पात्र, कमळगडाच्या पर्वतरांगा, खाली चिखली गावाची शेती व खूप खोल असलेली धुक्याची दरी मी कितीतरी वेळा चित्रित केली होती . तेथील बोगनवेलीची झाडे व गार्डनचा परिसर एक शांत रम्य परिसर होता .मी त्या सर्व आठवणीत रममाण झालो होतो .
        मला पेसी अंकलच्या आठवणी बरोबर गुलमोहराच्या झाडालाही भेटायचे वेध लागले होते . कारण ते झाड साधेसुधे नव्हते . १९४४ साली स्वतः महात्मा गांधी यांनी लावलेले होते . याच झाडाचे व बंगल्याचा परिसर असलेले चित्र महाराष्ट्राचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यानां त्याच्यांच सांगण्यावरून मी करून केले होते . माझ्या पेटींग देण्याच्या कार्यक्रमात याच मेडस्टोन बंगल्यात ते फार भावूक झाले होते . या पेटींगच्या रूपाने महात्मा गांधी यांची आठवण माझ्याकडे कायम राहील अशी त्यांनी मनोकामना व्यक्त केली होती .कारण ते सच्चे गांधी भक्त होते. माझ्या बरोबर हात हातात घेऊन ते गुलमोहराच्या झाडाजवळ आले व नतमस्तक होवून झाडावर हळूवारपणे त्यांनी हात फिरवला होता . मला वाळकेश्वर व महाबळेश्वरच्या राजभवनवर आमंत्रित केले होते . स्वतः राज्यपाल त्यांच्या पत्नी, त्यांचा लवाजमा, गाडया, अनेक  व्यक्तींच्या उपस्थितीमूळे विरजी बंगल्याचा सर्वच माहोल कसा रोमांचित करणारा प्रसन्नमय प्रसंग झाला होता .मी गर्दीतच लपून बसलो होतो हेही मला आठवले व आता हसायला आले . त्यावेळी मात्र माझी हृदयाची धडधड आजही मला आठवत होती .
       अशा आठवणीत मी उत्सुकतेने शोधत गुलमोहराजवळ आलो तर काय ,गुलमोहर निखळून पडला होता , उन्मळून पडला होता, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते . त्याचे डौलदार रुप न दिसता त्याचे फक्त छोटेसे खुरटे बुंधे दिसत होते . गांधीजीची आठवण कायम करणारा गुलमोहर पुर्णपणे संपलेला होता. मला तर मोठा धक्काच बसल्यासारखे झाले .
      कारण बंगल्याचे मालक पेसी विरजी वयोवृद्ध झाले व आजारी पडले . त्यानंतर ते गेले .अखेरपर्यंत मुलांनी त्यानां इंग्लडला खूप वेळा बोलावले पण त्यांनी येथेच शेवटपर्यंत राहायचे ठरविले व अखेरपर्यंत पाचगणी ही त्यांची जन्मभूमी असल्याप्रमाणे  येथेच राहीले .
       आपला मालक सोडून गेल्याचे गुलमोहराला कळले असावे . त्याने जगण्याची आशा सोडून दिली असावी व त्याच्या जिवलग मालकाच्या पाठोपाठच हा विशाल वृक्ष कोलमडून पडला असावा . दु:खवियोगाने त्याने नक्की स्वतः आत्महत्याच केली असावी .पूर्वी जसे पुरुषाच्या निधनानंतर स्त्रीया सती जात होते तसं हे गुलमोहरांच झाड सती गेले असावे .
       आता त्याचीच एक फांदी घेऊन एक दुसरे नवीन झाड पुढे गार्डनच्या मधोमध लावले होते . ते ही बऱ्यापैकी मोठे झाले होते त्या माझ्या गुलमोहर मित्राच्या अखेरचा अंश असलेल्या नव्या गुलमोहरावर हात फिरवून, अखेरचा निरोप घेऊन मी ही निघालो. कारण खरा गुलमोहर आता पेसी अंकल बरोबरच गेला होता.
     जाताना शाळेच्या प्राचार्यानां आमची राज्यपाल भेटीची महती , सुनील काळे या चित्रकाराची पाचगणीतील, जहाँगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाची, व गुलमोहर झाडांविषयीची राज्यपालांची गोष्ट कोणीतरी सांगितली असावी कारण नंतर त्यांचा बोलण्याचा टोन बदलेला होता . त्यांनी खूप आग्रहाने ऑफीसला बोलावले पण मी थांबलो नाही कारण खरा  गुलमोहरच परत भेटणार नव्हता व पेसी अंकल ही परत मला तेथे बोलावणार नव्हते . मी हळूहळू जड पावलांनी परत निघालो . परत कधीही न येण्याचा निर्धार करुनच . आता त्या आठवणीनां मनात साठवणे एवढेच माझ्या हातात होते .
          कुत्रा, मांजर, , पोपट, , हे प्राणीपक्षी जसे माणसाचे मित्र असतात तशी झाडंही माणसांची मित्र असू शकतात . त्यांच्यावर विज्ञानाचे प्रयोग करून तेही संवेदनाक्षम असतात हे सिद्ध झालेले आहे . त्यांच्याबरोबर आपण बोललो त्यानां समजून घेतले तर आपली मनस्थिती त्यानांही कळते, अंतरीच्या भावना समजतात ,पण हे या भावनविरहीत मनांच्या हुकुमाच्या ताबेदारानां कसे कळणार ?
आता मला कळतंय की, मलाही ते झाड बोलावत होतं कारण कित्येक वर्ष मी तिकडे फिरकलोच नव्हतो . त्याची व्यथा त्याला मला सांगायची होती . माझं आणि त्याचं दुःख एकच होतं .पेसी अकंल नसल्याचं आमचं एकत्र दुःख आपआपसात शेअर करायचं होतं . साचलेलं मनही हलकं करायचं होतं .
      काल वाईत अशाच एका वेगळ्या झाडांनी झपाटलेल्या व्यक्तीची अचानकच भेट झाली . आमचे संगीतप्रेमी मित्र खोपटीकर सरांनी फोन करून मला बोलावले .एकलव्य वसतिगृहाचे प्रमुख असलेले 
रिटायर्ड अेसीपी सुभाषचन्द्र डांगे यांची ओळख करून दिली . त्यांनी वाईत वसुंधरा मातेची कल्पना करून मूर्ती बनवलेली आहे . तिची पूर्तता करण्याची धडपड बऱ्याच वर्षापासून सातत्याने लावून धरली आहे . हजारो झाडे लावून सगळीकडे हिरवंगार ,वनश्रीपूर्ण सपंन्नता आणायची  वसुंधरा मातेला सगळीकडे खूष करण्याचा संकल्प केला आहे . अशा संकल्पानांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वानींच हातभार लावला पाहीजे . भरपूर झाडे वाढवण्याच्या कल्पनांनी त्यांनी अगदी  वेडे केले आहे . त्याचं हे वेडेपण आपणही वाटून घेतले पाहीजे . उत्साहाने त्यात सामील झाले पाहिजे . 
     झाडं असतील तरच आपण असणार आहोत.
झाडे नसतील तर कल्पना करा ,सगळं कसं भकभकीत उजाड व माळरान वाटेल, पक्षी, प्राणी राहतील कोठे ?
खातील काय ? झाडांशिवाय " निसर्ग " ही कल्पनाही कशी तरी भकासच वाटते ? 
आपला भारतमातेचा विकास कसा चाललाय ते अशा कल्पनेवरूनच कळेल . 
निसर्ग म्हणजे काय ?
निसर्गाशी मैत्री झाडांशिवाय कशी करता येईल ? झाडं ही आपली संपत्ती, आपला प्राण , आपला श्वास, आपला जीव . झाडांशिवाय निसर्गचित्रे ? कल्पनाच करायला नको . बापरे  !
      माणसं उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी जागा शोधत राहतात, उन्हाच्या धगीने जीव घामाघुम होतो, डोकं आणि मन , शुष्क, तप्त व्हायला लागते .सुर्यदेव सगळीकडे आग ओकू लागतो त्यावेळी झाडांची खूपच गरज लागते . ,सगळीकडे खूप खूप झाडे असावीत असं वाटत राहतं . 
पण .....
        रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या हजारो झाडांची भीषण कत्तल पाहीली की आपण पूर्ण विकासाच्या का पूर्ण भकासाच्या दिशेने निघालोय याची जाणीव व्हायला लागते . तोडलेली झाडं परत लावण्याची , जबाबदारी कोणाकडे असते का ? हल्ली पृथ्वीचं तापमान खूप वाढलयं असा सूर सगळीकडे सुरु होतो . ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेला वेग यायला लागतो . मग सगळं परत थांबते .
        अनेक गावागावात , शहरांमध्ये आता हल्लाबोल, लाखोंचे मोर्चे, उपोषणे, दंगली, मारामारी, हाणामारी, खळखटयाक , दलित ,सवर्णांची आंदोलने वेगाने वाढत आहेत बहुजनांचे, अल्पसंख्याकांचे, खेचाखेचीचे राजकारण वेगळेच चाललेले दिसत आहेत 
      अशी नस्ती उठाठेव करण्यापेक्षा सर्वानीं वेळीच सावध होऊन झाडे लावणे, झाडे जगवणे, काहीनीं झाडांचीच  मोठी शेती करणे असे फायद्यांचे उपक्रम हाती घेतले तर किती क्रांती होईल ना संपूर्ण  देशात? खेडयापाड्यात, गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये,जिल्ह्या जिल्हयांमध्ये, शहरी भागात ,निमशहरी भागात ,ओसाड माळरानांवर जिथे मिळेल तेथे झाडे लावण्याचा व ती जगवण्याचा ध्यास सर्वानी घेतला पाहीजे .झाडे लावून जगवण्याची स्पर्धा घेऊन मोठयात मोठी बक्षिसे दिली पाहीजेत. कारण " झाड हे प्रत्येकाचा जगण्याचा श्वास आहे ". आणि श्वास हा अखेरपर्यंत घ्यावा लागतो . जोपर्यंत श्वास, तोपर्यंतच आस .
       माणसं शेवटी मरतातच मरण कोणालाच चुकले नाही . पण जगत असताना माणूस एकही झाड लावत नाहीत , वाढवतही नाहीत . 
माणूस मरताना मात्र नऊ मण म्हणजे  तीनशे साठ किलो लाकडे ( एक मण =४० किलो ) मात्र घेऊनच मरतो . आणि त्याला अजून तरी सगळीकडे विद्यूतदाहिनीचा पर्याय उपलब्ध झालेला नाही . आपण निदान आपल्यासाठी तरी एका झाडाची तरी सोय करून मरायला पाहीजे याची काळजी प्रत्येकाने केली पाहीजे .मरताना आपलेच प्रेत सरणावर ठेवलेल्या झाडाला म्हणेल की तु का माझ्याबरोबर  जळतोयस ?
         तुच माझा व मीच तुझा खरा मित्र ,अखेरपर्यंत साथ देणारा .
 जे तुझे होणार तेच माझे होणार ......
फक्त राखच . 
मग दोघांचीही राख एकत्र होवू दे .

 तेव्हा ती लाकडंही शोलेमधील गीत गात म्हणतील की.
ये दोस्ती, हम नही तोडेंगे 
तोडेंगे दम मगर, 
तेरा साथ ना छोडेंगे ................

सुनील काळे 
9423966486
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...