बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां काही मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा पुण्यामध्ये आर्ट कॉलेजच्या जवळ आर्टशॉपमध्ये मटेरियल घ्यायला गेलो होतो . त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . मला तर खूपच आनंद झाला .  आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . तीस वर्षापासूनचे मित्रप्रेम एकदम उफाळून आले .त्याच्याशी लगेच हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईंटमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी " प्रेमळ " विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी त्यादिवशी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याच दिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राने तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत . शिवाय हॉटेलमध्ये जेवताना काही जणांच्या बिझनेस मिटींग सुरु असतात हे माझ्या अज्ञानी मनाला माहीत नव्हते

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...