ब्लॉग संग्रहण
-
►
2022
(4)
- ► जानेवारी 2022 (2)
- ► एप्रिल 2022 (1)
-
►
2023
(11)
-
►
नोव्हेंबर 2023
(11)
- ► 01 नोव्हें (9)
- ► 02 नोव्हें (2)
-
►
नोव्हेंबर 2023
(11)
-
►
2024
(20)
- ► एप्रिल 2024 (1)
-
►
नोव्हेंबर 2024
(2)
- ► 12 नोव्हें (1)
- ► 22 नोव्हें (1)
-
►
2025
(11)
-
►
नोव्हेंबर 2025
(1)
- ► 28 नोव्हें (1)
-
►
नोव्हेंबर 2025
(1)
बुधवार, १६ जून, २०२१
राज्यपालांची आठवण
सुसंवादाचे महत्व
*सुसंवादाचे महत्व*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
एखादा दिवस नेहमीप्रमाणेच उजाडतो पण सकाळपासूनच जाणवते की आजचा दिवस जरा भलताच वेगळा आहे. तो चांगला, वाईट की मध्यम स्वरुपाचा असणार हे आपल्याला कळत नाही , पण तो दिवस व त्याचे परिणाम मात्र
आयुष्यभर लक्षात राहतात . १५ मे २०२० हा दिवस माझ्यासाठी असाच विपरीत घटनेची आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरला . त्यादिवशी सकाळी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी उठलो तर वॉशबेसीन , बाथरूममध्ये पाण्याचा थेंब नाही . मग सगळीकडे शोध सुरु केला .
किचनचा नळ सुरु राहीला ? किंवा कमोडचा फ्लश सुरु राहीला ? की गार्डनचा नळ सुरु राहीला ? याची शोधाशोध करता करता मी आमच्या " निसर्ग " बंगल्याच्या टाकीवर सहजपणे चढलो . टाकीचे झाकण उघडून पाणी नाही हे दिसले व विचारात खाली उतरत असतानाच लोखंडी शिडी घसरली आणि अनपेक्षितपणे १२ फूटावर पडलो . डाव्या पायाचे हाड तुटले . वाईच्या मिशन हॉस्पीटलमध्ये डॉ. इराणी यांनी ऑपरेशन केले व प्लॅस्टर बांधलेल्या अवस्थेत मी घरी परतलो . घराच्या हॉलमध्येच टिव्ही पहात आता दोनतीन महीने माझा खरा 'लॉकडाऊन ' सुरु झाला .
अशा या निराश अवस्थेत मी टिव्हीवर सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येची बातमी ऐकली . टिव्हीवरची निवेदिका सुशांतसिंगची माहीती सविस्तरपणे सांगत होती . त्यामध्ये त्याच्याकडे साठ कोटी रुपयांची संपत्ती असून स्वतःचे घर , गाडी , प्रसिद्धी , नातेवाईक , मित्रपरिवार , मैत्रिणींचा गोतावळा, व शिक्षण या इतर अनेक गोष्टींची माहीती सांगत होती . आणि ते ऐकल्यावर मी भारावलेल्या अवस्थेमध्येच माझे कंगाल दिवस आठवू लागलो . व नंतर मी माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाच्या आठवणींचा ' ग्रीन टाय ' हा लेख लिहला .
हळूहळू वॉटसअप व फेसबूकवर माझा नंबर लिहल्यामूळे हा लेख अनेकांना आवडल्याचे व खूप प्रेरणा मिळाली असे सांगणारे खूप फोन आले . या फोनवरच्या सततच्या बोलण्यामूळे मी माझ्या पायाचे दुःख , वेदना खरोखर विसरून गेलो . रोज वेगवेगळे फोन यायचे व त्या सांगणाऱ्या माणसांचे प्रोब्लेम सांगून झाल्यावर मी चकीत व्हायचो . खरं तर मानवी जीवन किती गुंतागुंतीचे व अडचणींचे झाले आहे याचा मला नव्याने साक्षात्कार होत होता . काही लोकांनी त्यांचे मार्ग स्वतः शोधून त्यावर मात केली तर काहीजण त्याच त्याच विचारांच्या गुंत्यात इतके अडकलेले दिसले की त्यांची विचारांची गाडी पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीत अडकलेली दिसली . आपण दुसऱ्या अँगलने त्या अवघड अडचणींचा सामना करू शकतो याची त्यानां जाणीवच नव्हती . त्यापैकी आज आठवणीत असलेली ही गोष्ट मुद्दाम सांगतो .
साधारण दुपारची तीन वाजताची वेळ असावी आणि मोबाईल वर रिंग वाजली .एक अनोळखी नंबर मोबाईलवर दिसत होता . एक दबक्या आवाजात एका वयोवृद्ध आजींचा तो आवाज होता .त्यांनी त्यांचे नाव गाव सांगितले .
अहो , ती ग्रीन टाय नावाचा लेख तुम्हीच लिहला आहे का ?
मी हो म्हणालो आणि त्यांनी पहीली शपथ घातली की मी कधीही त्यांचे नाव कोणाला सांगणार नाही . आणि त्या फोनवर मोठ्याने रडू लागल्या . थोड्यावेळाने त्यांनी स्वतःला सावरले व शांतपणे मला सांगितले की ,
"मी आज आत्महत्या करणार आहे. "
मला आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्यायचे आहे , तर लाल रंगाचा स्प्रे आणू की काळ्या रंगाचा ?
कोणते औषध जास्त पॉवरफूल आहे ? म्हणजे लवकर मरण येईल ?
लवकरात लवकर सांगा ......
हे जणू ते मला अशा अविर्भावाने विचारत होत्या की जणू मला आत्महत्येचा भरपूर अनुभव आहे . आणि मी त्यातला तज्ञ आहे . मी सावध झालो आणि हळूवारपणे विचारले . . . . .
आज्जी ,खरंच आत्महत्येची गरज आहे का ?
फारच अडचण आहे का ?
रागावणार नसला तर मला खरे कारण जाणून घ्यायची इच्छा आहे . मी नक्की तुमच्या आत्महत्येला मदत करीन . आय प्रॉमिस .
माझे आश्वासक बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली .
आजीनां एकच अपत्य एकुलता एक मुलगा . मुलगा लहान असतानाच एका अपघातात त्यांच्या पतींचे निधन झाले . अतिशय कष्टाने हालअपेष्ठा भोगून अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी त्यांच्या मुलाला वाढवले खूप चांगले शिक्षण दिले आणि आता त्यांचा मुलगा दुबईत एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो . लॉकडाऊनमुळे तो भारतात येवू शकत नाही . मुलाची बायको शिकलेली उच्चघरातील आहे .दोन नातवंडे आहेत पण सूनबाई सतत शाकाहारी खायला देते . मांसाहारी , मटण , चिकन ,अंडी ,मासे कधीच खायला देत नाही . त्यामूळे तेच तेच शाकाहारी वरण भातासारखे मिळमिळत खाऊन खूप कंटाळा आला आहे . काही खाऊपिऊ वाटत नाही . जीवन भकास वाटते आणि जगण्यात मजा येत नाही . आणि शेवटी त्यांनी मलाच प्रश्न विचारला
सांगा बरं किती दिवस असं जगायचे ? ?
म्हणून आता मी आता आत्महत्या करणारच आहे.
व
सूनबाईची चांगली जिरवणार आहे .
असे सांगून त्यांनी मला तोच प्रश्न विचारला ...
काळा डबा आणू की लाल ?
एकंदरीत आत्महत्या करण्यासाठी त्या फारच प्रेरीत , उत्सुक झाल्याचे दिसून येत होते . आणि आत्महत्या करणे फार सोपे आहे असेही त्यानां वाटत असावे .
हे त्यांचे कारण व उत्साह ऐकून मी मात्र सर्द झालो .
मग मी त्यानां थोडा विचार केल्यासारखे दाखवले व म्हणालो मला काही खास अनुभव नाही पण तुम्ही लाल औषधच घ्यावे कारण लाल रंग हा डेंजरचे प्रतिक असतो .
पण आणण्यापूर्वी तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडते तर सूनबाईला सांगायचे त्या करून देतील किंवा सूनबाई करून देत नसेल तर तुम्ही स्वतः स्वयंपाक करायचा व आवडीचे पदार्थ करून खायचे .
हे विचारल्यावर आज्जीबाई चांगल्याच खवळल्या .
मी तिच्याशी जराही बोलत नाही . व तिलाही माझ्याशी बोलून देत नाही . आम्ही एकाच बंगल्यात राहतो पण तिची खोली व माझी खोली वेगवेगळी आहे .
आणि मी का म्हणून तिच्याशी बोलायचे ?
तिला समजायला नको ?
आणि मी का म्हणून स्वयंपाक करायचा ?
इतकी वर्ष केला यापुढे मी कधीही स्वयंपाक करणार नाही असं सूनबाईला पहीलेच सांगितले आहे .
आज्जी बाईनी ठाम निर्धाराने सांगितले .
मग आत्महत्या करून तुम्ही तर मरणार पण सूनबाईला कसे कळणार की तुम्हाला काय त्रास होतो ते ? मी विचारले .
त्यासाठी तुम्ही एकदा तरी तिच्याशी बोला तुझ्यामूळे मी आत्महत्या करत आहे हे तिला सांगा व नंतरच लाल औषध आणा . तिलाही कळला पाहीजे तुमचा त्रास.
मी असे दोनतीन वेळा सांगितल्यामूळे आज्जीबाई मग नाईलाजाने तयार झाल्या व त्यांनी माझे जरा नाआवडीनेच आभार मानले व फोन बंद केला .
ही कथा माझ्यासाठी संपली व मी विसरूनही गेलो आणि चार पाच दिवसानंतर पुन्हा दुपारच्या तीनच्या सुमारास माझा मोबाईल वाजला . फोन घेतल्यावर त्याच आज्जीबाई पुन्हा बोलू लागल्या . यावेळी मात्र आजींचा बोलण्याचा टोन एकदम आनंदाचा उत्साहाचा होता .
मी विचारले आणले का लाल औषध ?
जळलं मेलं ते लाल काळं औषध , मी नाही आणणार आता .
अहो ,तुम्ही सांगितले म्हणून मी तिच्याशी बोलले . खूप रागावले तिच्यावर , आणि मग तुझ्यामूळेच मी आत्महत्या करणार आहे असे सांगितल्यावर जाम रडायला लागली . आता तीन चार दिवस झाले . माझ्यासाठी सगळे आवडीचे नॉनव्हेज पदार्थ करते व मी देखील तिला मदत करते . आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो .नातू अजून लहान आहे , शिवाय मुलगा परदेशात अडकलाय , त्याला किती वाईट वाटेल .मी अशी भलतीसलती गोष्ट केली असती तर सगळ्या कुटूंबाचीच वाट लागली असती . सर्वांनाच खूप वाईट वाटले असते , आणि त्रास मनस्तापही झाला असता . त्यामूळे आता आत्महत्या कॅन्सल..........
आणि तुम्हाला म्हणून सांगते तशी माझी सून चांगली गुणाची आहे हो .
पण तुम्ही सांगितले म्हणून मी बोलले नाहीतर .......
आणि त्या आज्जी बाईनीं मनापासून समाधानाने फोन ठेवला. आजही कधीतरी अचानकपणे त्यांचा मला फोन येतो व आम्ही भरपूर गप्पा मारतो.
काही जणानां ही गोष्ट साधी व
अतार्किक वाटेल पण अगदी खरी आणि वास्तवात घडलेली आहे .
मी देखील फार मोठे काम केले आहे असा माझा दावा नाही .
पण आज मला शीतल आमटेच्या आत्महत्येनंतर परत एकदा प्रकर्षाने ही गोष्ट आठवली व जाणवले आमच्यातील एकमेकांशी संवाद हरवला आहे. कधी कधी किती साधे ,सोपे प्रश्न असतात कुटुंबातील एकमेकांशी बसून विचार केला तर सोप्या आणि अवघड प्रश्नांवरही खूप छान तोडगा निघू शकतो. संवादाने जटील प्रश्न मार्गी लागतील आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगावयास उत्साह वाटेल . माणसे आपली दुःखे अडचणी यांचा इतका धसका घेतात . मनात धुमसत राहतात . आणि मग आयुष्य संपवण्याचे निर्णय घेतात . पण स्वतःचे असे आयुष्य अचानक संपवून किती जवळच्या व इतरही समाजातील सर्वच लोकानां यातना होतील याचा विचार करत नाहीत . असा टोकाचा मार्ग निवडण्यापेक्षा एकमेकांशी *सुंसवाद* साधणे महत्वाचे वाटते .
यावेळी आमचा इगो कधी आडवा येतो , कधी आमची निष्काळजीपणे दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय आडवी येते . पण त्याचे परिणाम मात्र कायम अंतरीच्या जखमा भरून न येणाऱ्या असतात . म्हणून वाद झाला तरी चालेल त्यातून कधी तरी *सुसंवाद* घडेलच अशी अपेक्षा करूया .
शिक्षणाने माणूस घडतो , सुस्कांरीत होतो , त्याचे व्हीझन मोठे होते . विचार मोठे होतात . पण *सुसंवाद* नसेल तर ते शिक्षण देखील काय कामाचे ?
चला तर मग स्वतःचा स्वतःशी आणि इतर सर्वांशी देखील *सुसंवाद* करण्यास सुरुवात करूया !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुनील काळे
9423966486
मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्याची गोष्ट
चित्रकाराचे भूत
💀चित्रकाराचे भूत 💀
पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती ? दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा . पाण्याची सोय . ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या , विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले . चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा . गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता . लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धोमधरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले . सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते . तेथून पाणी टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीत येई व नंतर शुद्धीकरण होऊन संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई . पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे . कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे . (आता पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)
माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो . तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा , अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा . एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.
गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे . या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते . आणि त्यामध्ये लोखंडी बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते .
त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो . ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे त्यावेळी मला माहीतच नव्हते . मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो . कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड , मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते . त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार , डोंगरांच्या सावल्या , घड्या ,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे . छोटी छोटी घरे , भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे , ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो . हे दृश्य आपण चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले . पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत .
माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली . मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे , त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा , इस्त्रीचा ' दिपक ड्रायक्लिनर्स ' नावाचा व्यावसाय होता . पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे .मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो .
नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले . अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले . माझी आई अशिक्षित व अडाणी होती . ती मनातून खूप घाबरली होती ,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार . ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी चित्र काढत असतो . त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्यावरून भाकरीचा तुकडा ,मीठ , मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो .
पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही . या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली , पांडवगड , कमळगड , नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी , यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले . तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे . एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते , झपाटले होते .
एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली . ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय . पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता , त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो .सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच .बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची , शाळेच्या परिसराची , शाळेची मुख्य इमारत , डायनिंग हॉलची इमारत , प्राचार्यांचे , शाळेच्या मालकांचे निवासस्थान , रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो .
एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते . त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत , झाडे , माणसे खुपच छान दिसत होती .ते चित्र मला मनापासून खूपच आवडले . मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत , हा विषय घेऊन जबरदस्त ' नाईटस्केप ' करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो . त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो .अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे . तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला . रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले .
एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ) , बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची , कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर टोपी . व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोड वर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली . माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? या विचारात मी चित्रकामात गुंग झालो होतो .
पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर , आंब्रळ , खिंगर , भिलार , राजपूरी , तायघाट अशी छोटीमोठी खेडेगाव आहेत . त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात , हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे . आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात .
इकडे माझे ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते . मी पुर्ण स्वतःला देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला .
भूत , भूत ,चित्रकाराचे भूत ......... चित्रकाराचे भूत . . . . . . .असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहीले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी एकदोन जण घाबरून तेही पळू लागले .
त्यानां असे पळताना पाहून मीही घाबरलो . कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने पटापट सामान आवरून मी रस्त्याच्या एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो .दांडेघरची ही माणसे आता राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत म्हणत हळूहळू , दमादमाने सावधपणे येत होती . आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना . त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकुन आत्मविश्वासाने सर्वानां सांगत होता.
म्या इथंच बघितला ते भूत , मोठ्ठी टोपी घातली होती .
दुसरा त्यात भर घालून म्हणाला
इंग्रजाचे होतं ते भूत .
नाय ,अरं ही पारशांची शाळा होती , म्हंजी भूत पारसीच असणार .
अरं पारसी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम , डेंजर असणार . लई कटकटी असत्यात पारशी लोकं , म्हंजी भूत भी कटकटी असलं तर सोडणार नाय आपल्या मागंसुद्धा लई कटकट लागंल . एकाने असा अनुभव सांगितला .
मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत त्यांनी जकात नाका पार केला व मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला . नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही . सगळा मूडच गेला आणि मी शाळेत परतलो .
दुसऱ्या दिवशी त्यातला एक जण शाळेत येऊन इतरानां व मला सांगू लागला , की रात्री रस्त्यावर चित्रकाराचे भूत पाहीले . असा बसला होता न तसा बसला होता यापुढे सावध रहा असा सल्ला देखील त्याने दिला . मी देखील हसत हसत त्याच्याकडे दुर्लक्ष केले . त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच . रात्री चित्र काढायला कधी बाहेर जात नाही . पण एक चांगला विषय चित्रित करायचा राहीला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले .
आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते . त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही . आजही डोंगररांगा , शेताची हिरवळ ,समुद्र , बोटी , झाडे , इमारती , टेबललॅन्डची पठारे , वाईची मंदीरे , घाट, महाबळेश्वरचे सृष्टीसौंदर्य पाहीले की मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते . या चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे , झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या . कितीतरी मोठी माणसे
अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली . आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली . चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले .आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे .
आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा . लेखन , चित्रकला , शिल्पकला , खेळ, गायन, वादन, संगीत , नाट्य , नृत्य ,चित्रपट , शिक्षण , वकील , इंजिनियर्स , डॉक्टर ,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो वा व्यापारी क्षेत्रात असो .आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो , पछाडलो ते काम मनापासून आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो ,त्यातून सर्वानां आनंद द्यायला शिकलो तर सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच . म्हणून कलेतील सर्वानांच त्या त्या विषयातील भूताने पछाडलेच पाहीजे असे मला वाटते .
करोनाच्या या महामारीच्या बिकट संकटातून बाहेर पडून परत नव्याने सर्वानां सुरुवात करता यावी , सुयश मिळावे ही सदीच्छा !
येणारे वर्ष आनंदाचे , भरभराटीचे , वैभवाचे , आरोग्यदायक ,नवनिर्मितीचे, सुखसमृद्धीचे मंगलमय यावे ,
यासाठी सर्व क्षेत्रातील ,सर्व जणानां नववर्षाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सुनील काळे
9423966486
एकलव्य 'कांताराम'
एकलव्य 'कांताराम'
मी जरी लहानपणापासून पाचगणीत राहत होतो तरी काही ना काही कारणाने आमचे येणे वाईला व्हायचेच . वाईत आलो की जुन्या शॉर्टकट ने घाटावर यायचो . घाटावर आले की ढोल्या गणपतीचे देऊळ त्याच्या शेजारचे काशी विश्वेशराचे मंदीर त्यावरील कोरीव काम, घाटाची काळया दगडात केलेली सुबक बांधणी, रचना, कृष्णेचे वाहणारे पाणी व परिसर हा माझ्या आवडीचा भाग कधी झाला हे माझे मलाच कळले नाही . पुढे कॉलेजला सायन्स शिकायला दोन वर्ष वाईला होतो ,त्यावेळेपासूनच घाटाची चित्रे काढायचा छंदच लागला .
जसजशी चित्रात प्रगती होत गेली तशी घाटावर वारंवार येण्याची इच्छा अनावर होवू लागली . चित्र ,रेखाटन, वॉटर कलर करताना खूप गर्दी व्हायची . घाटाच्या आजुबाजूला हळूहळू कातकरी समाजाच्या छोटया छोट्या झोपड्या वाढू लागल्या होत्या . त्या घाट परिसरात खूप घाण दिसतात व कचरा करतात , त्या कातकऱ्यांची उघडी नागडी पोरं पाण्यात व परिसरात बिनधास्त फिरायची आजही फिरतात . त्यांचा पाण्यात डुंबत बसण्याचा ,मासे पकडण्याचा उदयोग सातत्याने चालूच असायचा. ( व आजही चालू आहे )चित्र काढताना ह्या पोरानां हाकलणे हा अधूनमधून मोठा त्रासच व फालतू त्रासदायक प्रकार असायचा. त्यावेळी आठवतेय एक छोटा पोरगा माझ्या मागे हळूच येवून उभा असायचा. व शांतपणे मला चित्र काढताना तो निरखून पहात राहायचा .मी अधून मधून सगळ्यानां काम थांबवून हाकलून द्यायचो . पण हा पोरगा मात्र मी ज्या ज्या वेळी घाटावर जायचो त्यावेळी हमखास भेटायचाच. माझ्या माघावरच असायचा .मी देखील हळूहळू त्याला हाकलणे सोडून दिले . त्याला नाव विचारले तर म्हणाला कांताराम . पुढे हेही कळाले की तो त्या नदी शेजारच्या झोपडीत राहतो व त्याचे आईबाप जाळी घेऊन मासे पकडण्याचा धंदा करतात , व त्याची परिस्थिती देखील खूप खराब होती . कांताराम शाळेत कमी व घाटावरच जास्त असायचा . पुढे मी आर्ट कॉलेजला पुण्याला गेलो . अधूनमधून स्केचिंग करायला गेलो तर कांताराम हजर असायचाच जणू प्रत्येक चित्रकार कधी ना कधी येणार व तो त्याच्यासाठी देवच असल्याप्रमाणे वाट पहात बसायचा . कांतारामने आता शाळा सोडली व तो चित्र काढत घाटावरच असतो हेही कळले होते. मधे बरीच वर्षे गेली व मी मुंबईला गेलो . वाईचा संपर्क तुटला होता .
आज बऱ्याच वर्षांनी वाईच्या गंगापूरी घाटावर छोटया पायवाटेवर एका दगडी पायरीवर बसून मी मंदीराची स्केचेस करत होतो . परत त्या कातकरी पोरांचा त्रास सुरू झाला, गर्दी वाढू लागली व या त्रासदायक प्रकारामूळे मला अचानक कांतारामची आठवण झाली. दहा बारा वर्षाचा गॅप पडला होता . मग त्या येणाऱ्या जाणाऱ्या पाच सहा पोरानां मी कांताराम विषयी विचारले पण त्यानां सांगता आले नाही . मग जरा वेळाने दुसरा जरा मोठा दिसणारा मुलगा आला. त्याला विचारले तर म्हणाला मी कांतारामचा चुलतभाऊ , कांताराम आता पेंटर झालाय . मग त्याने त्याचा मोबाईल नंबर दिला .कांतारामला मी स्केच संपल्यावर फोन लावला तर म्हणाला थांबा जावू नका ,दहा मिनिटात येतो . कांताराम आला व पाया पडू लागला, मी मध्येच त्याला थांबविला तर म्हणाला आज थांबवू नका . आता मी मोठा झालोय, माझा एक पोरगा अकरावीला व एक नववीत शिकतोय . त्यानां शाळा शिकवणार आहे .धाकटयाला शाळेत सोडायला गेलो म्हणून उशीर झाला . तुमच्या सारखंच मला बनायचं होतं . मग मी देखील चित्रे काढू लागलो .आता माझ्याकडे मोटरसायकल आहे , मी आता शाळेत पेंटीग्जची , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकच्या बोटीवर चित्र काढण्याची, साईन बोर्डांची जी मिळेल ती कामे करतो . माझ्याबरोबर माझे अजून दोन मित्र संतोष केळघणे व पंकज सणस हे देखील असतात . आम्ही सर्वजण मिळूनच काम करतो . खूप कामे असतात , तुमची लई आठवण येते . तुम्हाला भेटायला ते दोघेही येत आहेत .पळत निघालेत .थोड्याच वेळात तेही दोघे आले व आल्या आल्या पाया पडायला लागले . मी त्यानां थांबविले तर म्हणाले तुमच्या सारखीच आता चाळीस हजारांची आर्ट विषयी पुस्तके घेतलीत .आमचं आता बर चाललयं . आमची धडपड नेहमी चालू असते .तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती .तुमच्याकडे एकदा येवू .कारण आता आम्हाला महाबळेश्वरला जायचंय. सिझन चालू झालाय, शिवाय स्वच्छता अभियान सुरू असल्याने खूप भिंती रंगवायच्या आहेत . त्यावर आम्ही अॅकलिक किंवा ऑईल पेंटने चित्रे काढतो . साईन बोर्ड रंगवितो, सायकलवर नावे टाकतो .जी कामे मिळतील ती सर्व करतो , पण आता निघतो, कारण जरा आज उशीर झालाय एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन निवांतपणे भेटण्याचे आश्वासन घेेऊन ते निघून गेले .
कांतारामचा व त्याच्या मित्रांचा डिप्लोमा नाही, त्याचे कोणतेही कला शिक्षण नाही . त्याला व त्याच्या मित्रानां आर्ट फिल्ड माहीत नाही . आर्ट फिल्डच्या प्रदर्शनाची , तिथल्या घडामोडींशी , मार्केटशी, चित्रकारांच्या संघर्षाशी , त्यांचा काही संबध नाही . त्याची त्यानां जाणीवच नाही . कारण त्यांचा मार्ग त्यानां सापडला आहे .एकलव्या प्रमाणे त्यांचा त्यांनीच शोधून काढला होता त्यांची कोणाशी स्पर्धा नाही व नव्हती .निर्व्याज मनाने ते त्यांच्या कार्यात मग्न आहेत . आणि अनेक क्षेत्रातील तरुण मंडळी पाच वर्षाचे उच्च शिक्षण घेऊन काय पुढे करायचे ? नोकरी कधी मिळणार ? संधी कधी मिळणार ? यश कधी मिळणार ? पुढे आमचे भविष्य काय होणार या धास्तीने कुथत जीवन जगत असतात . पण कांताराम सारखी मंडळी त्यांची वाट न पहाता जे समोर येईल ते व स्विकारत पुढे जात राहतात .
बीज अंकुरे , अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत .
कसे रुजावे बियाने, माळरानाच्या कुशीत ?
पण हे बीज तर माळरानाच्या कुशीत रुजलेले दिसत होते .व त्याची वाढ ही चांगली चाललेली दिसत होती .
आता मात्र मी कोणालाच दूर लोटत नाही , किंवा चित्र काढताना हाकलून देत नाही . कारण माझ्या चित्र कामाचे साहीत्य आवरुन ज्यावेळी मी माझ्या फोर व्हिलर कारमध्ये निघतो त्यावेळी मला त्याच्यांत उद्याचा एखादा एकलव्य कांताराम दिसत असतो . एखादा सुनिल काळे दिसत असतो . आणि मग मी माझ्या अशा अनेक ज्ञात अज्ञात गुरु जणानां मनातूनच मनःपूर्वक नमस्कार करून पुढे प्रवास करत राहतो . अशा एकलव्यांच्या मार्गात काटे न टाकता अंगठा न मागता फक्त थोडासा दिलासा, धीर, आधार दिला तर त्यांचाही प्रवास थोडा सुखकर होईल याची प्रत्येकाने थोडी जाणीव ठेवली तर किती मजा येईल ना ? आपल्या सगळ्यांचा प्रवासाला .
[कातांराम आता वाई नगरपालिकेत
नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि उत्तम काम करून अनेक नव्या एकलव्यांच्या जडण घडणीत मदतही करत आहे. ]
सुनिल काळे (9423966486 )
दामू
दामू
दामुअण्णा चे खरे नाव अरुण मारुती काळे, पण त्याला दामू का म्हणायचे याचा मला कधीच उलगडा झाला नाही. तो आमचा चुलत भाऊ होता .त्याचे वडील मारुतराव पूर्वी महाबळेश्वर मध्ये राहात असत. हे उत्तम कारागीर तर होतेच पण त्याहीपेक्षा सर्वात उत्तम देवाची हरिभजने म्हणणारे होते, त्यांच्या भजनात हृदयाला हात घालण्याची ताकद होती. पांडूरंगाला , विठ्ठलाला ते इतकी भावपूर्ण साद गाण्यातून मारायचे की ऐकणारा भारावून जायचा त्यात तो स्वताःला विसरून जायचा. खूप सुरेख आवाजात काही स्वनिर्मित तर काही जुन्या गाण्यांच्या तालावर ते मराठी भजने स्वतः करत. मग श्रावणात असो वा कोणाच्या अंतिम विधीला, यांच्या भजनाचा कार्यक्रम हमखास असे. अंत्यविधीच्या अगोदर कोणताही पाषाणहृदयी माणूस असला तरी त्यांचे भजन ऐकले की त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आपोआप सुरू व्हायच्या. त्यामुळे अंत्यविधीचा कार्यक्रम प्रभावी व्हावा आणि दुःखाची निर्मिती व्हावी म्हणून मारुतरावांना भजनासाठी हमखास मागणी असे. त्यांची ,लहान असताना ऐकलेली काही भजनं आजही माझ्या मनात रुंजी घालून आहेत, आठवणीत आहेत .
मारुतरावांना एकूण चार मुले ,त्यातील अरुण हा पहिला मुलगा. पहिला मुलगा पाहून ते आनंदले असतील, पण मुलाच्या जन्मानंतर थोड्याच वेळात त्यांचा आनंद मावळला असेल. कारण अरुण जन्मताच डोक्यावर पडल्यासारखा होता. पुढे दिसायला अतिशय साधारण, बोबडे बोलणारा, असंबद्ध बोलणारा त्याला कोणतीही भाषा नीट समजत नव्हती, केस वाढलेले, गालफड फार दबलेली, दात पुढे आलेले, वर्णही काळसर चालताना तिरका ,आडवातिडवा झोकांड्या देत जाणारा, आपण काय करतो, काय बोलतो, कसं खातो हे त्याला कळतही नव्हतं, आणि वळतही नव्हतं .खाताना सगळी लाळ तोंडातून टपकत असे, पदार्थ तोंडातून बाहेर पडत. झोकांड्या देत जाणारा, मेंदूचा कंट्रोलच नव्हता जणु त्याच्यावर, मेंदूच्या सगळ्या वायरी जणू उलट्या सुलटया चुकल्या सारख्याच जोडलेल्या होत्या. मारुतरावांनी त्याला शाळेत पाठवला. पण दोनचार दिवसातच त्याच्या मास्तरांनी त्याला घरी पाठवला. कारण त्याला शाळेतले काहीच कळत नव्हते . इतकी सुरेल भजने म्हणणारे, देवाची आराधना करणारे मारुतराव त्यामुळे पार बिघडले आणि बिथरले. खूप मारलं, ओरडलं, झोडपलं, गदगदून हलवलं तरी अरुण सुधारलाच नाही. त्यामुळे मारुतराव खूप निराश होऊन खूपच दारूच्या व्यसनाधीन झाले. मग त्यांच्या भजनात दुःखाची अर्तता आता आणखीनच वाढली. खूप करुणापूर्वक अंतःकरणातून त्यांची भजने यावयाची व गावकऱ्यांच्या हृदयाला भिडायची. त्यांचा एक ग्रुपच त्यांनी बनवला होता. व ते भजनी मंडळ खूप प्रसिद्ध ही झाले होते .पण देवाची भजनं म्हणूनही देवाने जो हात आखडता घेतला हे पाहुन ते हळूहळू दारूच्या व्यसनाधीन झाले व पुढे मारुतराव एक दिवस संपले ,मग अरुणचा दामू झाला, पुढे तोपर्यंत अरुणची आई, त्याचा सर्वात धाकटा भाऊ सुभाष, नंतर सुरेश, हेही दारूतच संपले. आणि त्यांची आर्थिक ,स्थितीही ढासळली .
एकदा महाबळेश्वरला मार्केटमध्ये मी मित्रांसोबत फिरत होतो ,त्याने मला लांबूनच बरोबर ओळखले . तो लगबगीने माझ्या मित्रांजवळ सर्वांसमोर आला. अतिशय गचाळ कपडे, कित्येक दिवस न धुतलेले, पायात चप्पल नाही, झोकांड्या जात होत्या म्हणून हातात काठी घेतलेली. त्याच्या तोंडातली लाळ टपकतच होती .हे पाहून व त्याची असंबध बडबड चालू असलेली पाहून मला खूप लाज वाटली, दया देखील आली, पण मित्रांसमोर मी त्याला ओळख दाखवली नाही. तो माझ्या मागोमाग यायला लागला, वेडसर मनोरुग्णासारखा तो वागत होता. त्याला सर्व माणसं मात्र बरोबर समजायची, त्यांना नावानिशी ओळखण्याची स्मरणशक्ती कशी होती हे मात्र आजही मला समजत नाही.
एकदा तर त्याने रस्त्यावरच बूट पॉलिशचेच दुकान मांडले. ओळखीच्या माणसाच्या पायात बूट दिसताच तो त्यांच्या मागोमाग धावायचा व त्या माणसाचीच धावपळ करायचा. एकदा बूट पॉलिश साठी तो माझ्या पाठोपाठ धावायला लागला मी पळालोच. व मग मात्र त्याला मी पूर्णपणे टाळू लागलो . मला त्याची घृणा वाटू लागली होती .
दामू पुढे आमच्या मूळगावी पांडेवाडी येथे भावासोबत राहू ,लागला. आईबाप नसल्याने व पुढे भाऊही गेल्यामूळे त्याच्या दुर्दशेत आणखीनच भर पडली. त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्याची भावजय पुतण्या व त्याचे कुटूंबीय त्याला गावी सांभाळायचे .तो सगळीकडे भटकत रहायचा, हळूहळू त्याचे वय पन्नास पंचावन्नच्या पुढे गेले असावे. गावात फिरताना कोणी त्याला भाकर तुकडा द्यायचा. त्याची वहिनी पुतण्या व इतर जण शक्य तितके त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याचे सर्व करायचे तरीही येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तो अधाशीपणे खायला मागायचाच, तर कधी पैसे मागायचा. तो प्रचंड असमाधानी .. असल्याने , व त्याच्या विचित्र गबाळ्या अवतारामूळे मी मात्र त्याला पूर्णपणे टाळायचो, बोलायचो नाही, आणि ओळखही दाखवायचो नाही.
परमेश्वर किंवा आकाशातील बापाचा मला कधीकधी खूप म्हणजे खूपच राग येतो. त्याने एखाद्याला जन्म देताना इतकी नाराजी का दाखवावी ? चेहरा, रूप, शिक्षण, कला, उदरनिर्वाहाचे साधन नाही, पण निदान सामान्य माणसासारखे जगणेही एखाद्याला देऊ नये म्हणजे काय?शिवाय मारूतराव इतकी सुमधूर भजनं म्हणत असताना अशी उपेक्षा का करावी या विश्व निर्मात्याने , आपणाला बनविलेल्या या अजब कलाकृतीला स्वतः दामूही कंटाळला असावा . आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी बोलत नाही, जवळ करत नाही हे त्याला कळत असावे. मग तो गावच्या देवळाशेजारी पायरीवर काठी टेकून बडबड करीत बसायचा व ओळखीच्या नजरेने, विदीर्ण चेहऱ्याने, विषण्ण मनाने, खोल नजरेने ,एक टक कोणाची तरी वाट पहात पडून रहायचा. सर्वांकडे अपेक्षेने आणि अन्नाच्या आशेने पहायचा. खायला मिळाले नाही तरी त्याहीपेक्षा कोणी ओळखीचा माणूस आला की त्याला प्रचंड उर्जा यायची त्याचे डोळे चमकायचे,उत्स्फूर्ततेने उठून धडपडत उभा रहायचा, त्याच्या मागे मागे धावायचा, बोलायचा प्रयत्न करत राहायचा, लहान मुलांना जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याच्या अवताराकडे पाहून कोणी सुधारलेली मंडळी त्याच्याजवळ मैत्री करण्याचा प्रयत्नही करायची नाही.लांबूनच लोक त्याच्याशी बोलायचे, गावातले ,आळीतील लोकं उरलंसुरलं अन्न, कधी थोडे पैसे द्यायचे, पण तो सगळ्यांना नकोसा झाल्यासारखाच होता. तो प्रेमाचा भुकेला असावा आणि असं प्रेमाने आपल्याला कोणी जवळ करत नाही, कोणी स्वीकारत नाही, परिस्थितीमुळे गबाळेपणामुळे, आपल्याला सर्व जण टाळतात, हे त्याला पूर्णपणे जाणवलं असावं. आपल्याला प्रेमाने जसं आहोत तसं कोणी स्वीकारत नाही हे पाहून तो खूप निराश झाला असावा. आणि आपण कोणालाच नको आहे हेही त्याला कळले होते.
अशी परकेपणाची, एकाकीपणाची भावना माणसाला पार पोखरून टाकते .मनाला आणि शरीराला उदासीपणे विच्छिन्न करते, अंतःकरणाला .एक प्रकारचा संताप आणते, असं वाटतं जिवंतपणीच आपण आपल्या हृदयाचे तुकडे स्वतःच्या हाताने कापावेत आणि भिरकावून द्यावेत सगळ्यांसमोर, की आपण इतके दुष्ट आणि दुर्लक्षित करण्यासारखे नाही. एकटेपण फार वाईट असतं, आजारपण ,संकटे आणि वाईट परिस्थिती आली की आपली असणारी माणसं सोडून देतात वाऱ्यावर, ओळख दाखवत नाहीत. आपल्या जवळच्या माणसाकडे दुर्लक्ष करतात, जणू त्यांचा व आपला कधीच संबंध नाही व नव्हता असं वागू लागतात . तिथं मोठेपणा, स्टेटस, उच्चभ्रूपणा व स्वार्थ महत्त्वाचा असतो. जिव्हाळा ,माणुसकी , आपुलकी व स्नेहभाव संपलेला असतो . त्यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला कटाप केलेले असते . आणि ही नावापुरती सुकी नाती व आपुलकीच्या उणीवा पाहून, एकाकीपणाची ही भावना आयुष्य हळूहळू पूर्णपणे वाळवी सारखी पोखरूण टाकते . दाट काळ्या ढगांची चादर घेऊनच मग प्रवास करावा लागतो . आणि ज्याचा त्याचा हा प्रवास एकाकी एकट्यानेच संपवावा लागतो . फार वाट लागत असते हा प्रवास करताना . तिथं नाईलाजानेच सर्व स्विकारत रहावं लागतं.
दामूने अखेर येथून जाण्याचा अंतिम निर्णय घेतला असावा. हा कंटाळवाणा प्रवास थांबविण्याचा निर्णयच त्याने केला असावा त्याने कोणाशीही बोलणे टाळले. आणि अन्न पाण्याचा त्याग केला व तो 17 जानेवारीला शांतपणे कायमचा निघून गेला. आकाशातल्या बापाकडे जाब विचारायला, की का मला धाडले अशी अवस्था करून? काय मिळवलसं तू तुझ्या कृतीतून? का अशा अवस्थेत साठ वर्ष मला जगायला भाग पाडलंस ? पण तिथंही त्याचे कोणी ऐकले की नाही हे मला माहीत नाही. बहुधा ऐकलं नसावंच .
सतरा जानेवारीला सकाळी बारा वाजता पुतण्या योगेशचा. मला दामू गेल्याचा फोन आला. एक वाजता मी पांडेवाडीत पोचलो. दामूला मी अखेरचे पाहण्याची हिंमतच करू शकलो नाही. वाटलं दामू उठेल व माझ्याकडे दहा रुपये मागेल, आणि माझ्या मागोमाग ओळख दाखवत पाठीमागे येईल ,ओरडत मागे मागे येईल पण मी मात्र माझ्या स्टेटस मुळे त्याला टाळून पुढे जाईल. पण आता तो शांत झाला होता,कोणाकडून प्रेमाची कसलीच अपेक्षा नसल्याने तो खिन्नपणे ,निपचित पडून होता. निर्विकार चेहऱ्याने अखेरच्या प्रवासासाठी सज्ज झाला होता .
गावातील थोडीफार लोकं जमली होती. पण त्याच्यासाठी कोणी फार मोठा हंबरडा फोडला नाही. सर्वांना तो सुटला व बरे झाले अशीच भावना मनात येत होती. त्याच्या अंत्यविधीचा प्रवास अवघड दिसत होता. सगळे टाळत होते कोणीच पुढे येत नव्हते.मग मात्र मला राहवले नाही. शंकर, दत्ताभाऊ व नारायण या तीन आळीतील गावकऱ्यांना सोबत गाडीमध्ये घेतले व मी वाईला निघालो . नऊ मण लाकडे घेतली, कुंभारवाड्यात जाऊन मडकी घेतली.हार, फुले,कापड, कापूर, गुलाल इ. अंत्यविधीचे सर्वच्या सर्व सामान स्वखर्चाने घेतले. हे सर्व सामान कोठे मिळते ते मला कळाले .एक मण म्हणजे चाळीस किलो, आणि जाताना माणूस एकही झाड लावत नाही पण जाताना तीनशे साठ किलो लाकडे घेऊन जातो, या नव्या ज्ञानात भर पडली. हे सर्व सामान घेऊन परत पांडेवाडीला आलो.
तोपर्यंत थोडी आणखी नातेवाईक मंडळी , आली होती. पन्नास साठ वर्ष आयुष्यभर ज्याचा प्रवास खडतर झाला, उपेक्षेने,तिरस्काराने, घृणतेने भरुन, झिडकारूनच झाला , त्याचा अंतिम प्रवास तरी सुखाने व्हावा व त्यास हातभार लागावा हा माझा प्रयत्न मी माझ्या कृतीतून समाधानाने पूर्ण केला होता .
कारण मला खात्री आहे की मी ज्यावेळी वर जाईल तेथे कदाचित दामू भेटेलच व माझ्या मागोमाग धावेल, ओळख विचारेल,पण आता म्हणेल, बरं झालं निदान माझा शेवटचा प्रवास तू जरा सुखकर केलास. त्याचे डोळे कृतार्थपणे माझ्याकडे पाहतील , व तो डोळ्यातूनच सांगेल मला आयुष्यभर काही दिलं नाहीस,पण प्रवासाचा शेवट तरी गोड केलास, अखेर ओळख दाखवलीस भावा, खरंच ओळख दाखवलीस भावा.........
मी दामूच्या अंतिम प्रवासासाठी अंत्ययात्रेच्या पाठीमागून निघालो गाडीतूनच निघालो .तोपर्यंत पावणेसहा वाजले होते, सहा वाजता आमचा एक पुर्वनियोजित कार्यक्रम लोकमान्य वाचनालय, वाई येथे होता. दामूच्या अंत्यविधीचा आयुष्य कसे जगावे ,या कार्यक्रमानंतर चित्र कसे पहावे ,या माझ्या आवडीच्या कार्यक्रमात मी परत चित्रांच्या दुनियेत रममाण झालो.
दामूच्या आयुष्य यात्रेवरील घटनांचा आढावा घेतल्यावर मला आता माझ्याच वाट्याला हे अवघड त्रासदायक जीवन कसं आलं ? असले फालतू प्रश्न पडत नाहीत .आता मला शांत झोप लागते .( पूर्वीही शांत झोप लागायचीच पण आता जरा जास्त जाणीवपूर्वक शांतपणाची जाणीव होते )
आता मला नवनवीन माझ्या विषयी प्रश्न पडत नाहीत,आणि हो ,मला खूप खूप श्रीमंत ,जहागीरदार , मोठा उद्योगपती किंवा अंबानीपेक्षा ही मोठे, भारी आहोत असंच वाटायला लागले आहे . कारण त्याला बिचाऱ्याला सत्तावीस मजले असलेले घर सांभाळावे लागते . शिवाय एवढा मोठा उद्योग .मी मात्र निवांत झोपू शकतो . माणूस कितीही मोठा असला तरी लाकडं मात्र नऊ मण. म्हणजे चाळीस गुणीले नऊ बरोबर तीनशे साठ किलो . गणित किती सोप्पं आहे आणि ते सगळ्यानां सारखंच लागू आहे याचा शोध मला लागला होता
आपण किती नाराज असतो स्वतःवरच , मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही. ट्रॅफीकचा त्रास, आवाजांचा त्रास , वन रुम किचन असेल तर टू रुम नाही म्हणून त्रास, दुचाकी असेल तर चार चाकी नाही म्हणून त्रास , चार चाकी असेल तर मोठ्ठी नवीन मॉडेल पाहीजे, बंगला असेल तर फार्म हाऊस कधी मिळणार याचा शोध, शेजाऱ्यांचा त्रास, इतकेच काय ट्रॅफीक मध्ये एखादयाने ओव्हरटेक केले तरी त्रास. त्याला मिळाले मग मला का नाही याचाही त्रास . आपण प्रसिध्द नाही, नावारूपाला आलो नाही म्हणून त्रास, सगळीकडे त्रासच त्रास, ईर्षा ,आपण पूर्ण शरीराने ठाकठीक आहोत याकडे आपले कधी लक्षच नसते. इतकंच काय मुलगी असेल तर मुलगा नाही म्हणूनही त्रास करून घेणारी माणसं मी पाहिली आहेत . सतत अस्वस्थ, ही अस्वस्थता कधीही न संपणारी आपण कधी खाली पहातच नाही . आमची नजर सतत वर पाहणारी हव्यासापोठी काहीही करण्याची तयारी असणारी . आम्हाला आमचं ते हवेच पण दुसऱ्याचे जे आहे ते देखील हवे असते . मग कोणत्याही गैरमार्गाने ते मिळवायचं व खूप मोठे काम केले असा आव आणायचा . दुसऱ्याचे कष्टाचे पैसे लुटायचे व आपण समाजसेवा करतो असे दाखवायचे . या सत्य गोष्टीनां कधीही अंत नसतो . या कालचक्राला अंतच नसतो .आपण जसे आहोत तसं स्विकारण्याची आपली कधी तयारीच नसते . पण आपल्यात बदल करणे शक्य असतं . सुधारणा करणं शक्य असतं .
आज असाच एक “दामू” मिशन हॉस्पीटल वाईच्या रस्त्यावर दिसला. फार विस्कटलेला दिसत होता बिचारा, निवांत उभा होता. मग दहा रुपयांचा पारले बिस्किटाचा एक पुडा घेतला व त्याला दिला. तो माझ्याकडे निर्विकार व अनोळखी चेहऱ्याने पाहून शांतपणे बिस्किट खाऊ लागला. थोडी किंचिंतसी चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसली. मलाही जरा बरे वाटले .
आता शक्य होईल तिथे, शक्य होईल तेव्हा , प्रत्येक भेटणाऱ्या दामू साठी एवढं तरी करायचं असं ठरवलं आहे. मग बघा आपण असं दुसऱ्यासाठी एवढंसं काही केलं तरी लई , म्हणजे लईच भारी वाटतं बघा . कधी प्रयत्न तर करून बघा ...................
मला मग राजेश खन्नाचा बावर्ची चित्रपट आठवतो त्यातला रघु म्हणतो . अपना काम तो सब लोग करते है | मगर दुसरोकां काम करने मे कुछ औरही मजा है | आपल्या शक्तीनुसार, अगदी थोडासा हिस्सा , अगदी अल्पशी मदत, जमेल तशी, खिशाला मोठी चाट न लावता अशा दामूंसाठी करुया . म्हणजे मग नऊ मण लाकडं आणताना त्रास होणार नाही ...................
गणित तर अगदी सोप्प आहे . सर्वानां सारखेच . नऊ गुणिले चाळीस = तीनशेसाठ किलो लाकडं . आपल्याला देखील तितकीच लागणार .
सुनिल काळे 9423966486
स्केचबुक
*स्केचबुक*
📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒
मी पाचगणीच्या मराठी शाळेत शिकायला होतो . पहिली ते सातवीपर्यंत आमच्या शाळेत " चित्रकला " हा विषय असतो हे आम्हाला माहीतही नव्हते . सातवी नंतर मी संजीवन या मोठ्या शाळेत गेलो त्यावेळी शाळेत चित्रकला विषयाला स्वतंत्र शिक्षक असतो हे समजले . मग हॉबी क्लासमध्ये रंग, रेषा ,आकार , क्राफ्ट यांची ओळख झाली आणि मग त्याचवेळी स्केचिंग करायचा नाद लागला . घरात एकत्र कुटुंबांतील गर्दीमुळे अभ्यासाला जागा नसायची मग ' निसर्ग ' नावाचा नवा गुरू व नवा मित्र मिळाला .
या निसर्गमित्राची अनेक अवर्णनीय रूपे सतत मनाला मोहीत करायची . आजही नव्याने चकीत करत असतात .
मग पेन्सील्स , पेन , शाई , जलरंग या माध्यमातून जागेवर जाऊन असंख्य रेखाटने केली . रेखाटने करायची म्हणजे नेमके काय करायचे हे प्रत्यक्ष जवळ बसवून कोणी शिकवले नाही . मग निसर्गालाच खरा गुरु मानला , एकलव्याप्रमाणेच त्याची अनेक रुपे सतत नवनवीन गोष्टी चित्रित करायला शिकवत होती . आपल्या डोळ्यानां , मनाला जाणवणारा जो सुखद आल्हाददायक दृश्यानुभव कुठेतरी अंतरमनात संवेदना निर्मित करत होता , मनात झिरपत होती ती संवेदना , ती जाणीव , तो आनंद कागदावर दृश्यरूपात प्रकट करताना अमाप आनंद होत होता . कधीकधी खूप वेळा वारंवार तीच ती दृश्ये सातत्याने पहात असल्याने मनातच चित्रे तयार होत होती . त्यानंतर मग रेखाचित्रे अनेक बारकाव्यांसहीत टिपायची सवय लागली. पुढे कलामहाविद्यालयात गेल्यावर रेखाटनांचे महत्व कळाले . मग " स्केचबुक " हे कोठेही बाहेर जाताना महत्वाची गोष्ट ठरली ती आततागायत सवय मोडली नाही .
वाईच्या मंदिरांची , घाटांची , रस्त्याशेजारच्या भव्य वडांच्या झाडांची , महाबळेश्वर परिसरातील दऱ्याखोरांची , पर्वतरांगाची , पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारांची , आजुबाजुच्या खेड्यांमधील उंचावरून दिसणाऱ्या घरांची , भातशेतांची , प्रतापगडाच्या व जावळीच्या घनदाट जंगलाची रेखाटने भूक तहान विसरून करत राहायचा नाद जीवनातील महत्वाचा व रोजच्या जगण्याचाच भाग झाला. आणि अशी एखादी गोष्ट आपण तन मन व धनाने स्विकारली की त्यात फायद्यातोट्याचा हिशोब करत बसायचा नसतो . त्यामधून मिळणारा आनंद पैशांतून मोजायचा नसतो हे कित्येक वर्ष मनात कायमस्वरूपी ठसले .
एकदा लॉकडाऊनच्या काळात ही अनेक छोट्यामोठ्या स्केचबुकातील सगळीकडे विखुरलेली ढिगभर स्केचेस मी एकत्र केली व मी स्तिमितच झालो आणि त्यांची संख्या मोजायचेही विसरून गेलो .
आजही मी नेहमीप्रमाणे सकाळी मेणवली घाटावर फिरायला गेलो होतो . अर्थात खिशात छोट्या आकाराचे स्केचबुक होतेच . मी एक निवांत जागा पकडून स्केच करत होतो . त्याचवेळी मुंबईच्या एका कॉलेजची मुलामुलींची ट्रिप घाटावर स्टाईलमध्ये ' फोटू ' काढण्यात मग्न होती . त्यातला एक "जाणकार " सर्वानां मस्त गमतीशीर माहीती सांगत होता . या मेणवलीच्या वेगवेगळ्या ठिकाणावर सर्वांना नेऊन या ठिकाणी बोलबच्चनची शुटींग झाली , याठिकाणी मृत्यूदंड माधुरी दिक्षितचा शॉट झाला , याठिकाणी काकस्पर्श सिनेमाचा शॉट झाला , गंगाजलचा मारामारीचा शॉट याच ठिकाणी झाला . स्वदेश सिनेमाच्या वेळी शाहरूख खान येथेच बसला होता इ.इ. माहिती अगदी बिनचुकपणे संवांदासह अॅक्शन करून दाखवत होता. या साऱ्या चित्रपटांच्या कथा त्या सर्वानांच तोंडपाठ होत्या .
माझे स्केच संपल्यावर मी त्यांच्या गटात सामील झालो . मग मी त्यानां विचारले हा मेणवलीचा वाडा कोणी बांधला ? हा घाट , ही मंदीरे कोणी निर्माण केली ? किती वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली ? ही नदी कोणती आहे ? तिचे नाव कोणाला माहीत आहे का? असे विचारल्यावर सगळेच संभ्रमात पडले . कोणालाही काहीही माहीती नव्हती . थोडक्यात आपल्या इतिहासाशी वास्तूंविषयी , जागेविषयी त्यानां काही देणेघेणे नाही हे मला जाणवले . आमच्याकडे गडकिल्ले , पुरातन वास्तू व त्यावरील मिनिएचर पेंटींग्ज , स्थापत्यशास्त्र , लेणी , मंदीरे , शिल्पे , त्यांचा इतिहास , त्यांचे महत्व काळाच्या प्रवाहात वेगाने नाश होत चालले आहेत . त्यांचे जतन , डागडुजी , संवर्धन , हे कोणाचेच काम नाही , या विषयांशी आपले घेणेदेणे नाही याची बऱ्यापैकी सर्वानांच आता सवय झाली आहे.
अर्थात इतरानां दोष देत बसण्यापेक्षा मी काय करू शकतो यावर माझा विचारविनिमय सुरु झाला . मग त्यातूनच एक कल्पना सुचली . मी या परिसरातील स्केचेस तर केलेली आहेतच . या रेखाटनांसोबत थोडा नवा , थोडा जुना इतिहास , माहिती आणि माझे प्रत्यक्ष चित्र रेखाटताना आलेले अनुभव यांचे मिश्रण करून एक छान पुस्तक करायचे काम सुरू केले आहे गेल्या संपूर्ण महिन्याभरात मी सार्वजनिक वाचनालये , कॉलेजच्या लायब्ररीज , काही वयस्कर जुनी जाणती माणसे यानां प्रत्यक्ष भेटणे , काही जणांच्या व्यक्तिगत संग्रहातील माहीती पुस्तके मिळवून त्यांचे वाचन करून काही महत्वाच्या नोंदी नमुद करण्याचे काम सुरु केले आहे .त्याचा यापुढे सर्वानाच उपयोग होईल याची मला खात्री आहे.
काही नवीन स्केचेस करणे , जुनी पुस्तके , कात्रणे , जुन्या शाळांचा इमारतींचा , संस्थाचा जुना इतिहास शोधणे , नवी जुनी गाईडबुक्स मिळवणे , ऐतिहासिक पुरातन संदर्भ मिळवणे हे वाटते तितके सोपे काम नाही . व्यक्ति तितक्या प्रकृति या म्हणीप्रमाणे माणसांच्या नानाविध स्वभावांचा , जगण्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती , टाळाटाळ करण्याची वृत्ती , नकारात्मक विचारांचा प्रभाव , आपल्याकडे साहित्य , माहिती साधी झेरॉक्ससाठीही उपलब्ध करून न देण्याची वृत्ती , आपल्या परिसराबद्दल गावाबद्दल असणारी उदासिनता हे देखील मी अनुभवत आहे. अर्थात काही अपवादात्मक मंडळी आदराने आपल्याकडचे सर्व ज्ञान , माहिती , पुस्तकांचे संदर्भ उदार मनाने उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांचे प्रोत्साहन नेहमीच प्रेरणादायी ठरत असते . अशा भेटलेल्या व्यक्ति आणि वल्लींचे एक नवे वाचनीय पुस्तक तयार होईल असे वाटते . पण निराश न होता सकारात्मक वृत्तींची ज्योत न विझून देता प्रयत्नपूर्वक लिखाणाचे काम सुरु आहे .
पाचगणी महाबळेश्वरची जुनी पुस्तके शोधताना एका मैत्रिणीकडे दिडशे दोनशे वर्षांपूर्वीचे फ्रेंच भाषेतील छापलेले एक संदर्भ पुस्तक मिळाले . त्यामध्ये वाई , पाचगणी व महाबळेश्वरच्या पाईंटसचे अप्रतिम ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो व जुन्या माणसांच्या वेशभूषेचे अदभूत नमुने छापलेले आहेत . १९०२ व १९१३ सालच्या महाबळेश्वरच्या पुस्तकात जागेचे रेटस् , ब्रिटिशांनी केलेला वातावरणाचा अभ्यास , त्यांचा पर्यटनस्थळ विकसित करत असतानाच्या प्रवासाच्या अडचणी , त्यावेळेचे वृक्षारोपन , त्यावेळेचे प्रत्येक महिन्याचे वातावरणातील बदल , पाण्याच्या अडचणी त्यावर केलेली उपाययोजना व अथक प्रयत्न पाहून मन थक्क होते . ही माहीती व फोटो आज सव्वाशे वर्षानंतर वाचताना, पाहताना खूप मजा व आश्चर्य देखील वाटते . इरिना चेलशेव्ह या रशियन महिलेने पाचगणीवरचे निसर्ग अनुभवल्या नंतरचे नितांत प्रेम "ब्लू माऊंटन्स ऑफ पंचगणी " या इंग्रजी पुस्तक रुपात अजरामर केले . माझी दोन चित्रे तिने नेहरू सेंटरच्या कलादालनात विकत घेऊन चित्ररुपाने या अजरामर स्मृती तिच्या घरात व पुस्तकरुपाने माझ्या मनात कायमच्या जतन केल्या आहेत. काळाचा महिमा अगाध आहे ,गेल्या पन्नास वर्षांमध्ये या पर्यटनस्थळांमध्ये खूप मोठा बदल , खूप प्रचंड आर्थिक , सामाजिक स्थित्यंतरे झाली आहेत . खूप नवीन शाळांची , नवीन हॉटेल्सची निर्मिती झाली आहे . अनेक प्रसिद्ध महात्म्यांनी प्रसिद्ध व्यक्तींनी येथे भेटी दिल्या आहेत . हे बदल पुस्तकांमुळे जपले गेले , सर्वांनां समजले .
माझी जुनी रेखाटने पहात असताना मला ह्या बदलांची तीव्रतेने जाणीव होते. कदाचित आणखी शंभर वर्षांनंतर ही स्केचेस पाहणाऱ्या त्या पिढीतील लोकानां हे बदल आणखी मजेशीर वाटतील . त्यासाठी अजूनही जुन्या संदर्भ पुस्तकांच्या मी शोधात आहे . आपल्या सर्वानां विनंती की अशी काही जुनी पुस्तके वाई , पांचगणी , महाबळेश्वर , प्रतापगड संदर्भातील असतील तर जरूर कळवा . आपले पुस्तक स्कॅनिंग किंवा झेरॉक्स करून लगेच परत केले जाईल . कारण पुस्तक छापल्यानंतर चुकीचा इतिहास , चुकीची माहीती छापली जावू नये हीच इच्छा आहे. सोबत व्हॉटसअपचा संपर्क नंबर दिलेला आहे .
2022 या पुढील वर्षी आमच्या "संजीवन विद्यालय " या शाळेला १०० वर्षे पुर्ण होत आहेत . त्या शाळेने माझ्यातील चित्रकार बालवयातच जागृत केला ,आणि चित्रांच्या एका नव्या अनोख्या विश्वात मला पाठवले .तेव्हा माझ्या या स्केचबुक पुस्तकाच्या निमित्ताने त्या शतकवर्षी महोत्सवाच्या आनंदात व या पर्यटन स्थळांमध्ये झालेल्या नव्या बदलांची , माहीतीची ओळख सर्वांना होऊन त्यांच्या आनंदात नक्कीच मोलाची भर पडेल अशी आशा करतो .
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
सुनील काळे
9423960486
टोपकर सर
टोपकर सर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
आपल्या स्मृतिपटलांची एक मोठी गंमत आहे , कधीकधी आपण एखादी गोष्ट खूप आठवण्याचा प्रयत्न करतो अगदी बुद्धीला ताण दिला तरी त्या पटलावर कसलीही अस्पष्टशी देखील स्मृतिचित्रे , चिन्हे किंवा तो प्रसंग येतच नाही . आणि कधीकधी आपण नकळतपणे शांत बसलेलो असताना अचानक काहीतरी वाचनात येते, किंवा समान दृश्यानूभव येतो आणि आठवणींचे पदर असे उलघडू लागतात की जणू आपण फ्लॅशबॅकमध्ये जणू संपूर्ण चित्रपटच बघतोय . असंख्य बारीकसारीक गोष्टी मनःपटलावर पटापट झरझरपणे आपल्यासमोर उलघडत जातात . आज अशीच भेट होऊन चाळीसपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेल्या टोपकर सरांची आठवण प्रकर्षाने झाली आणि डोळ्यांत पाणी आले .
सन 1980 च्या सुमारास मी पाचगणीच्या संजीवन विद्यालयात शिकायला होतो . गणित हा विषय आला , तो विषय शिकवणारे एस .डी.देशपांडे सर लांबून येताना जरी दिसले की मला कापरे भरायचे , अचानकपणे घंटानाद झाल्याप्रमाणे भितीने हृदय थरथर कापायचे , हृदयाचे ठोके वाढायचे . काही चुकले की ते कान असा पिळायचे की तीनचार दिवस कानाच्या पाळ्या अगदी लालेलाल गाजरासारख्या दिसायच्या आणि खूप दुखायच्या .एकदा माझा होमवर्क राहीला होता मनात प्रचंड भिती वाटत होती मग मी गणिताच्या तासाला दांडी मारली व शाळेच्या पाठीमागच्या झाडीत लपून बसलो .
थोड्या वेळाने तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी निघालो तर त्या रस्त्यातच एका बाजूला एक वयोवृद्ध , जाड भिंगाचा मोठा चष्मा घातलेले , काळसर वर्णाचे , पायजमा शर्ट ,अंगात ग्रे कलरचा अर्धा स्वेटर व चटईवर बसून समोर प्राचार्यांच्या निवासस्थानाचे बंगल्याच्या परिसराचे चित्र काढणारे एक चित्रकार निवांतपणे रंगकाम करत बसले होते . लँडस्केपच्या हाफ इंपिरियल साईजची ती फ्रेम होती ,त्यावर ताणून बसवलेल्या हँडमेड पेपरवर अतिशय तल्लीनपणे ते चित्र काढण्यात ते रममाण झाले होते . मी ते चित्र बारकाईने पाहण्यात इतका गुंग झालो की पाणी पिण्याचे विसरूनच गेलो आणि अचानक न्यू देशपांडे सरांचा पाठीवर हात पडला त्याचवेळी जागृत अवस्थेत आलो . त्यावेळी चित्रकाराबरोबर बोलायचे मात्र राहून गेले पण त्यांचे रंगकाम व चित्र मात्र कायम मनात घर करून राहीले .
एकदा संजीवनच्या लायब्ररीमध्ये रावसाहेब पंडीत व कृष्णराव पंडीत या फाऊंडर्सची लाईफ साईजची ऑईलकलरमध्ये केलेली दोन मोठी पोट्रेटस लावली गेली त्या दोन्ही चित्रांवर सही होती बी . आर . टोपकर . मी फार भारावून गेलो होतो ती चित्रे पाहून .
एकदा पाचगणीच्या मुख्य रस्त्यावर श्रीकृष्ण मेडीकलच्या अरुंद माडीवर थंडीताप आला म्हणून डॉ. अरुण परब यांच्याकडे गेलो होतो तर दवाखान्यात बाहेरच्या वेटींग रुममधून दोन पोट्रेटस पाहीली . एक चित्र होते डॉ. सावंत आणि दुसरे डॉ. परब यांच्या वडीलांचे . त्या दोन्ही चित्रांवर सही होती बी.आर टोपकर . मग सतत आजारी पडण्याचा बहाणा करून मी ती चित्रे पाहायला जायचो . पुढे मी चित्रकार व्हायचे व एकदा तरी टोपकर सरानां भेटायचेच हे मनात मी ठरवूनच ठेवले होते .
कलाशिक्षणाच्या निमित्ताने मी बाहेर पडलो आणि टोपकर सरांची भेट घ्यायची राहूनच गेली . एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पाचगणीला आलो त्यावेळी कोणीतरी सांगितले टोपकर सर सिझनमध्ये महाबळेश्वरला दर उन्हाळ्यात चित्र काढायला येतात . मग मात्र मी एकदा ठरवून चित्रकार टोपकर यानां भेटायचेच असे ठरवून एसटीने महाबळेश्वरला पोहचलो . मे महिना संपून पावसाळा लागणार होता , महाबळेश्वरमध्ये नेहमीप्रमाणे थंडी होतीच पण नुकताच पडलेल्या पावसामूळे सर्व वातावरणही उदास होते . महाबळेश्वरच्या पेटीट लायब्ररीच्या चौकातच पुनम व नुक्कड नावाची दोन मोठी हॉटेल होती ,त्या दोन्ही हॉटेलांच्यामध्ये साधारपणे सहाफूटाचे एक बोळ होते . त्या बोळामध्ये टोपकर सर राहतात व तेथेच चित्रे काढतात ही माहिती मी मिळवली होती. माझ्या मनात त्यानां खूप वर्षानंतर भेटायची अनावर ओढ , उत्सुकता व प्रचंड उत्साह होता .
एसटी बस मधून उतरून मी घाईने चालत पूनम हॉटेलच्या चौकात पोहचलो माझी नजर टोपकर सरानां अधीरपणे शोधत होती पण टोपकर सर कोठेच दिसत नव्हते . त्या बोळात तीन चार मोठ्या पिशव्या व इतर थोडेफार साहित्य अस्ताव्यस्तपणे पडले होते . फ्रेम केलेली काही निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे पावसाने चिंब भिजून वेडीवाकडी रस्त्यावर पडली होती . चित्रांच्या फाईली व त्यातील जलरंगातील चित्रे पावसाने भिजल्यामूळे रंग ओघळून चिकटून बसली होती . मी त्या उघड्यावर पडलेल्या चित्रांची , चित्रकाराच्या संसाराची झालेली वाताहात पाहून खूप उदास झालो , व्यथित झालो . पण जवळपास चित्रकार कोठेच दिसेना . मग हॉटेलवर चौकशी केली तर एकाने समोर बोट दाखवले . आता ज्या ठिकाणी पार्कींग व टॅक्सीस्टॅन्ड आहे तेथे पूर्वी पटांगण व मराठी शाळा होती व त्या शाळेच्या आवारात चित्रकार बी.आर . टोपकर डोके मानेत खूपसून मोठमोठ्याने , हमसून हमसून , उसासे टाकत , लहान मुलाप्रमाणे रडत भींतीला निराश अवस्थेत टेकून बसले होते .
मी जवळ गेलो ,त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांचे डोळे पुसले . लाल ओल्या मातीने त्यांचा पायजमा शर्ट खराब झाले होते . रडून रडून डोळे सुजलेले होते . मी त्यानां माझी ओळख करून देताना संजीवनचा माजी विद्यार्थी सुनील काळे आहे आणि त्यांच्याच चित्रप्रेरणेने आता कलामहाविद्यालयात शिकत आहे हे ऐकून त्यानां बरे वाटले . आपल्या क्षेत्रातील कोणीतरी विद्यार्थी भेटला हे ऐकून त्यानां तरतरी आली. मी त्यानां जवळच्या हॉटेलमध्ये नेले , चहापाणी ,नाश्ता खायला घातल्या नंतर थोडे मन स्थिर झाल्यावर त्यांनी मग त्यांची हकीकत सांगायला सुरवात केली .
टोपकर सर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात बरीच वर्षे कलाशिक्षक होते. मुलानां चित्रकला शिकवताना ते क्राफ्टही शिकवायचे . सुट्टीमध्ये महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात जावून वेडीवाकडी वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करायच्या . त्या वाळलेल्या फाद्यांमधून वेगवेगळ्या आकाराचे प्राणी , पक्षी , मूर्त , अमूर्त भन्नाट आकार शोधायचे . त्या फाद्यां योग्य त्या साईजमधून कापायच्या त्यानां घासूनपुसून स्वच्छ करायचे , पॉलीश करायचे व सुंदर शोपीसेस बनवायचा त्यानां छंद लागला होता . एकदा जंगलात गेल्यावर कोणत्यातरी विषारी गवताची त्यानां ॲलर्जी झाली . त्या ॲलर्जीची इतकी वाढ झाली की ते सतत शरीर खाजवू लागले . हातपायासोबत संपूर्ण चेहरा व शरीराच्या प्रत्येक भागात ही खाज वाढू लागली . ते एकही मिनिट स्वस्थ बसत नसत , अनेक उपचार करून झाले पण वाढलेली ॲलर्जी व कलेच्या प्रति असलेली निष्ठा व प्रेम ते थांबवू शकले नाहीत . या प्रचंड जीवघेण्या रोगाला सोबत घेऊन ते जगत होते आणि सगळा भार परमेश्वरावर सोपवत आनंदाने कलासक्त मनाने जगत होते. त्या विधात्यावर चिडण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या कलाकार ताकदीवर त्यांची श्रद्धा मोठी होती . शाळेने इतर मुलानां ही अॅलर्जी होऊ नये म्हणून त्यानां रामराम केला पण त्याची त्यांनी कधी तक्रार केली नाही . महाबळेश्वर परिसराची जलरंगात , तैलरंगात निसर्गचित्रे काढायची , काष्ठशिल्पे तयार करायची, कोणत्याही व्यक्तींची ऑर्डरप्रमाणे फोटोवरून तर कधी समोर बसवून चित्रे काढायची आणि न लाजता पूनम व नुक्कडच्या बोळात चित्रे विकायची व तेथेच बैठक मारून कलासाधना करायची हात सतत चालू ठेवत राहायचा त्यानां ध्यास होता. त्यानां चित्रकाढण्याच्या विषयाचे कोणतेही बंधन नव्हते .
कधी कधी महाबळेश्वरला येणारे हौशी पर्यटक राहत असलेल्या हॉटेलवर त्यानां बोलावून घेऊन स्त्रीयांची , मुलांची , स्वतःची एकत्रित चित्रे काढून घ्यायला सांगायचे . एकदा दूरवर असलेल्या हॉटेलमध्ये ते चालत गेले होते . त्यांचे इतर सामान व डिस्पेलीची चित्रे त्यांनी पूनम हॉटेलच्याच बोळामध्ये ठेवलेली होती . ऑर्डरचे चित्र पूर्ण करून ते निघाले आणि अचानक वळवाचा मोठा धुवांधार पाऊस भर दुपारी कोसळू लागला. टोपकर सर वेगाने धावत ओलेचिंब होऊन रस्त्याने पळत सुटले होते. पण चार पाच किलोमीटरचे अंतर ते पार करू शकले नाहीत . दोन्ही हॉटेलमध्ये बोळात ठेवलेली त्यांची अनेक चित्रे , फ्रेम्स , जलरंगातील पोर्टफोलीओ , काष्टशिल्पातील अनेक नमूने ,जगण्याचे सामान , पुस्तके , कपडे व इतर वस्तू वेगाने छपरावरून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्यामूळे बेचिराख झालेले होते.
ज्या टोपकर सरानां पाहण्याची , त्यांची चित्रे बघण्याची ,त्याच्यांशी कलाविषयक गुपिते जाणून घेण्याची जी ओढ होती ती अशा विपरीत परिस्थितीत याच दिवशी पूर्ण होईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती . मी त्यानां शाळेत चित्र काढत असताना मी पहात होतो याची आठवण करून दिली. आणि आता आर्ट कॉलेजला शिकतोय याचा त्यानां भारी आनंद झाला . हाताला तर कधी पायाला सतत खाजवत माझी चित्रे पाहायला येणार असे ते म्हणायचे . यशाशक्ती मी त्यानां थोडी आर्थिक मदत केली व आम्ही पूनम चौकात आलो . मग त्यांचा संसार पुन्हा उभा करायला मदत केली . जलरंगातील सगळी चित्रे एकमेकाला चिकटून थबथबीत भिजलेली होती , ती चित्रे सुटी करताना ते मला त्या प्रत्येक चित्रांची स्टोरी सांगायचे , पण चित्रांचे रंगच ओघळून अस्पष्ट झालेले दृश्य काही दिसायचेच नाही मग ते मला सांगताना भावनाविवश व्हायचे . खूप छान झाले होते हे चित्र , यातला लाईट भारी पकडला होता , या चित्रात डेफ्थ , परस्पेक्टीव्ह छान जमले होते यातले कांपोझिशन झकास झाले होते असे काहीबाही आठवेल तसे ते बोलत सुटले होते हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांत पाण्याच्या धारा सतत वाहत होत्या व हात चिकटून पडलेली चित्रे सोडवण्यात मग्न होता . खरं सांगायचे तर एखाद्या मरण पावलेल्या स्वतःच्याच अपत्याचे शेवटचे मुखदर्शन घ्यावे तसे आपल्याच चित्रांचे अंतिम मुखदर्शन घेत होते . संपूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत मी त्यानां मदत करत होतो . हळूहळू सगळी वाया गेलेली चित्रे आम्ही वेगळी केली , त्याचा ढिगारा तेथून हलवला . काष्ठशिल्पे व इतर चांगल्या अवस्थेतील वस्तू स्वच्छ पुसून घेतल्या व संध्याकाळी परत दुकान सुरु झाले . संध्याकाळी परत जाताना त्यांच्या चेहर्यावर माझ्या मदतीमुळे हसू पसरले . त्यांनी त्यांचा हात माझ्या हातात दिला तो हात खरबरीत होता पण त्यात कृतज्ञता व्यक्त होत होती . मग आठवण म्हणून मी माझ्याकडे असलेल्या चपट्या रोल असलेल्या कॅमेरात आमचा मोकळ्या पटांगणात एकमेव फोटो काढला आणि निरोप घेतला .
कोल्हापूरला बी.आर . टोपकर 'आण्णा टोपकर ' नावाने प्रसिद्ध होते . त्यांचा जन्म कुरुंदवाड ( जि.कोल्हापूर ) येथे ७ मे १९२४ रोजी झालेला होता . १९५१ मध्ये ते जी.डी. आर्ट पेंटीग ही पदविका मिळवलेले कलाकार होते . चित्रकलेवर प्रचंड निष्ठा , श्रमांच्या कोणतीही सीमा ओलांडणारी कुवत , प्रतिभेचा स्पर्श आणि निष्काम कर्मयोग आचरणात आणून विरुद्ध परिस्थितीला सतत सामोरे जात कलेवर असलेली श्रध्दा त्यांनी कधी ढळू दिली नाही . निराश न होता , त्वचेची असह्य व्याधी सोबत असून सांपतिक स्थिती चांगली नसूनही ते हौसेने कलाशिक्षक , आर्ट कॉलेजचे प्राध्यापक , मुक्त चित्रकार ,काष्ठशिल्पकार , म्हणून कलाजीवन जगत राहीले .
त्यांच्यासारखाच प्रसंग माझ्यावर एकदा आला होता . 1999 साली मॅप्रो गार्डनमध्ये माझे प्रदर्शन वळवाच्या पावसाने धूवून गेले असंख्य चित्रे पावसात भिजून वाया गेली कोणीही मदत केली नाही .त्यावेळी बी .आर टोपकर सर आठवले . त्यांची कोणतीही आसक्ती न धरता कलेप्रति पूर्ण श्रध्दापूर्वक जीवन जगण्याची ओढ आठवली . सर्व काही संपले असले तरी हातातली कला संपत नाही हे वाक्य आठवले . उषःकाल होता होता पुन्हा आयुष्याच्या नव्या पेटवा मशाली असा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला होता . तो संदेश घेऊन मी पुन्हा सावरलो. आपण पुन्हा उभे राहून दुःखाच्या यातनांनां निर्भिडपणे नव्याने विपरीत परिस्थितीतून जात चित्रनिर्मितीला सामोरे जाणारे टोपकर सर प्रत्येक अडचणींच्या प्रसंगावेळी मला आठवत राहतात . चित्रकलेसारख्या अनिश्चित क्षेत्रात अनेक अडचणीनां सातत्याने तोंड देऊन जगताना माझे प्रेरणास्थान ठरतात . त्वचेची आग व सतत खाज होताना एकही मिनिट स्वस्थ बसू न देणारी अस्वस्थता मात्र ही अस्वस्थता त्यांच्या कलाकृतीत कोठेही दिसत नाही हे टोपकर सरांच्या चित्रकलेचे वैशिष्ठ्य मला कायम स्मरणात राहीले .
आजही मी महाबळेश्वरला गेलो की पूनम हॉटेलच्या चौकात मुद्दाम जाईन . थांबल्यावर तिथे त्या बोळात मला टोपकर सर दिसतील .
मन लावून चित्र रंगवताना .
आजूबाजूला कितीही गर्दी असली तरी सर्वांबरोबर गप्पा मारत सफाईदारपणे कुंचला चालवत गप्पागोष्टी करत कोल्हापूरी स्टाईलने सांगत राहतील
' हा लई बेस्ट स्पॉट होता ' .
तुम्हीही मुद्दाम महाबळेश्वरला गेला की पूनम चौकात जरूर जा . आता तिथे भव्य असे मोठे अत्याधुनिक पूनम हॉटेल दिसेल . त्याच्या उजव्या बाजूचे छोटेसे बोळ म्हणजे टोपकर सरांची प्रदर्शनाची जागा . त्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताच्या भिंतीवर तुम्हाला दिसेल फूल इंपिरियल साईजमध्ये केलेले जूने पूनम हॉटेलचे चित्र . त्या मालकांनी फ्रेम करून आठवणीने लावले आहे .
आणि त्या चित्राच्या खाली सही असेल . ती जरूर पहा .
तेथे लिहलेले असेल .
बी.आर .टोपकर
मी यापुढे तेथे गेलो की कॉफी पिताना अर्धा कप टोपकरांसाठी जरूर ठेवीन .
त्यांची आठवण म्हणून ,कारण तेथेच आमची कॉफी घेत पहिली भेट झाली होती .
सत्यान्नव वर्षाचा खूप मोठ्या प्रदिर्घ प्रवासात अनेक अडचणींचा सामना करत , त्वचेच्या व्याधीला हरवून ,
अनेक चित्रांच्या आठवणी ठेवून , आता टोपकर सर सर्वांचा निरोप घेऊन खूप खूप लांबच्या प्रवासाला गेले .
पैलतीरी ......
कधीही परत न येण्यासाठी ........
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
सुनील काळे
9423966486
महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले यांची आठवण
अमूर्ततेचा शोध
अमूर्ततेचा शोध...... ✨✨✨✨✨✨ भारतात अनेक जातींची , वेगवेगळ्या धर्मांची ,विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेग...
-
फडणीस सर 🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋 आज मनापासून वाईच्या फडणीस सरांचे स्मरण होत आहे . खरं तर फडणीस सर यांचा मी कॉलेजातला प...
-
दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 आपल्यापैकी प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात वेगवेगळ्या वयाची ,वेगवेगळ्...
-
-
एकदा दर्शन दे घन:श्याम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्...
-
माझी कोकण निसर्गयात्रा 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 मी कोल्हापूरला फौडेंशन शिकायला गेलो त्यावेळी अनेक जुन्या चित्...
-
भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील जवळजवळ लागून असले...
-
* पेसी अंकल * पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वर कडे जाताना रस्त्यात रश्मी चोक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या ...
-
ती वेळ निराळी होती ही वेळ निराळी आहे . 🌟🌟🌟🌟🌟🌟 बरोबर सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझे "मोठ्ठ व्हायचं कॅन्सल केले त्...
-
डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 " पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आ...