ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २६ जून, २०२५

इनायत आणि कोल्हापूरच्या आठवणी

इनायत व कोल्हापूरच्या आठवणी
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      वाईजवळ तीन किमी मेणवली गावाजवळ खेडेगावात निसर्ग आर्ट गॅलरी सारखा प्रोजेक्ट सुरु करताना एक जवळचा मित्र म्हणाला अरे , या आडबाजूला पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून इकडे गॅलरीला कोण येणार एकदम फ्लॉप आयडीया आहे . मी सुद्धा त्याचा निराशावादी सुर ऐकून मनातून कचरलो , प्रदर्शनाचा थोडा वेडा व वेगळा प्रयत्न आहे पण 7 मे ते 7जून पर्यंत एक महिना प्रयत्न करूया अन्यथा गॅलरी पुढे सुरु ठेवायची का नाही ते नंतर  ठरवू असे ठरले.
पद्मश्री श्री .अच्युत पालव यांच्या शुभहस्ते उदघाटन केले .
             पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडी गर्दी कमी होती पण नंतर हळूहळू पावसाने मे महिन्यातच उच्छाद मांडला व आणखीनच नैराश्य वाढले . आणि अचानक सकाळी आठ वाजताच मोबाईलवर फोन आला . सुनिलभाई कैसे हो ? तुम्हारी आर्ट गॅलरी देखने के लिए मुंबईसे सोला लोगोंकी मिनी बस लेकर मुंबईसे वाईमें आया हूँ । गुगल मॅप भेजो , मै इनायत पित्तलवाला बोल रहा हूँ।
        थोड्याच वेळात एक मिनी बस आमच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाली आणि त्या गाडीतून बोहरी जमातीच्या ड्रेसमधील काही महिला व पुरुष मंडळीची टिम गॅलरीत दाखल झाली . 
        1985 साली मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर घरच्यांचा विरोध स्विकारून आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर कोल्हापूरला आलो होतो . कसलाही बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता . कोल्हापुरच्या आयटीआय कॉलेजसमोर मला कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता . त्यापूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट व पुण्याच्या अभिनवला प्रवेशासाठी प्रयत्न केला होता . ती दोन्ही गजबजलेली आर्ट स्कूल पहिल्यानंतर दूर आडरानात एकमजली फार भव्य बांधकाम नसलेले कलानिकेतन पाहून मी थोडा निराश झालो होतो .
         प्राचार्य अरविंद मेस्त्रींनी पहिल्याच दिवशी विचारले कोल्हापुरात  कुठे राहणार ? मी म्हणालो माहीत नाही , पहिल्यांदा आलोय येथे , माझ्या ओळखीचेही कोणी नाही व नातेवाईकसुद्धा नाहीत . त्यादिवशी एसटी स्टॅन्ड वर झोपलो . सकाळी झाडूवाल्याने उठवले तेथे तोडांवर पाणी मारले व तीन चार किमी  चालत पुन्हा कॉलेजला दाखल झालो . दुसऱ्या दिवशी परत मेस्त्रीसरांनी विचारले कुठे राहीला रात्री ? मी एसटी स्टॅन्डवर राहीलो हे ऐकताच ते माझ्याकडे आश्चर्याने पाहून त्यांच्या शिपायाला म्हणाले बापू याची जरा सोय कर इतर मुलांबरोबर याला दुपारी जेवायला दे .
           संध्याकाळी बापू केळुस्कर मला बाजुच्याच कॉलेजशेजारी असलेल्या मोरे कॉलनीतील एका बंगल्याच्या तळमजल्यावर घेऊन गेला . तेथे कॉलेजमध्ये शिकणारे संजय देसाई , इनायत पित्तलवाला , गंगाधर गोंधळी व रामदास जगताप ही एलेमेंटरी कमर्शियल व एटीडीला शिकणारी मुले माझ्याच वयाची होती . त्यांनी फौंडेशनला शिकणारा असून मला लगेच त्यांच्या ताफ्यात सामावून घेतले . बापू केळुस्करने आमच्या पाचही जणांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय त्याच्या घरी केली होती . बापू जवळच एका बंगल्याच्या आवारात औट हाऊसमध्ये रहात होता .
          पहिल्या दिवशी मी त्या बंगल्यात गेलो तर चष्मा लावलेला , खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बागेत खूर्ची टाकून पुस्तक वाचत बसलेला होता . बापूने गेटवर ओळख करून दिली व पाया पडायला सांगितले आणि विचारले ओळखलेस का हे कोण आहेत ते ? मी नाही म्हणालो .
हे आहेत भालजी पेंढारकर . चंद्रकांत मांडरे असलेला महाराजांचा चित्रपट पाहीलास का ? यांनीच बनवला तो . मी तो चित्रपट पाहिलेला होता पण भालजींना प्रथमच पहात होतो . मग त्यांनी कोल्हापूरी टोनमध्ये विचारले व्यायाम करतोस का नाय ? मी नाही म्हणालो . मग त्यांनी बापूला सांगितले रोज दहा जोरबैठका मारल्याशिवाय याला खायला देऊ नको . बापू लगेच होय म्हणाला .दिवसा कलानिकेतन व रात्री जयप्रभा स्टुडीओत रात्रीचा वॉचमन म्हणून बापू केळूस्कर काम करायचा .
         या काळात माझी या ग्रुपसोबत घट्ट मैत्री सुरु झाली . इनायत अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचा होता . मुंबईला गोरेगावला राहत होता . त्याचे वडील व काका कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांचा स्टुडीओ होता . त्यावर्षी जेजे स्कूल व बान्द्रा स्कूलमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळेच तो नाईलाजाने कोल्हापूरला आला होता . तो वेगळ्या धर्माचा असूनही कधीही त्याने कोणाशी वादविवाद केला नाही . आम्ही कोल्हापुरात सगळे नवखे व समान अडचणींना सामोरे जात होतो . एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकानां मदत करत होतो .
           सकाळ संध्याकाळी दहा जोरबैठका मारायच्या , गंगावेशीवर जाऊन म्हशीचे धारोष्ण दूध प्यायचे , केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाटकांचे बोर्ड रंगवायचे , कधी जयप्रभा स्टुडीओत छोटे मोठे सेट रंगवायची कामे करायचो . कोल्हापूरकर खूपच हौशी मंडळी त्यावेळी छत्र्यांवर नावे टाकण्याची फॅशन होती. कधी गाड्यांच्या नंबर प्लेटा , साईन बोर्ड रंगवायचो . निसर्गचित्रणाचा नाद आणखी पक्का होण्याचे कारण म्हणजे स्वतः अरविंद मेस्त्री कधी कधी कॉलेजच्या आवारातच लँडस्केप करायचे . चंद्रकांत मांडरेचे संग्रहालय राजारामपूरीत त्यावर्षी तयार होत होते . पन्हाळा , रंकाळा , खाणीचा परिसर , कसबा बावडा , शालीनी पॅलेस , न्यू पॅलेस , भवानी मंडप याठिकाणी स्केचिंग व निसर्गचित्रणासाठी जायचो . त्याकाळात टाऊन हॉल म्युझियम , शिवाजी चौकातील डॉ. काटे यांच्या हॉस्पीटलमध्ये आबालाल रहिमान , अरुल राज , पॉल राज ,चंद्रकांत मांडरे , एस.एम . काझी , बाबुराव पेंटर ,रविंद्र मेस्त्री यांच्या कलाकृती पहायला मिळायच्या . एस.निंबाळकर  यांच्यामूळे अनेक चित्रकारांच्या ओळखी होत होत्या . त्या सर्वांमध्ये कायम लक्षात राहील्या त्या प्रेमा भोसले मॅडम आमच्या सर्वांच्या फौडेंशनच्या कडक शिस्तीच्या आदर्शशिक्षिका . त्यांच्यामुळे चित्रकलेचा पाया खरोखर पक्का झाला . त्या फार जिव्हाळ्याने शिकवायच्या त्यांच्या असाईनमेंट पूर्ण करणे चॅलेंज असायचे .महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दहा स्केचिंग करणे त्याकाळातील सर्वात मोठी टास्क असायची . माझा नवा रूम पार्टनर कागलचा अमृतराव पाटील व मी रोज चालत जात स्केचेस करायचो . चित्रांचा पसारा वाढल्यामुळे मी बाजूच्याच प्रकाश कोठावळे यांच्या बंगल्यात शिफ्ट झालो पण जेवणासाठी आम्ही एकत्रच बापू केळूस्कर यांच्याकडे जायचो .
        कोल्हापूरची माणसे साधी व सतत मदतीचा हात पुढे करणारी मंडळी . भरपूर भांडणार , तांबडा पांढरा हाणणार , एकमेकानां शिव्या घालणार पण माणुसकी जपणार . चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरकर मित्र व मैत्रिणी आजही संपर्कात आहेत काही वर्षांपूर्वी आम्ही छान गेट टू गेदर केले होते . कोल्हापूरला वेळ व संधी मिळाली की जाण्यास मी नेहमी तयार असतो . ते दिवस सोनेरी व कायम लक्षात राहणारे होते .
         चाळीस वर्षांपासूनची ही मैत्री इनायतने व मी आजही टिकवून ठेवलेली आहे . इनायत एक वर्ष पूर्ण करून परत मुंबईला गेला व मी त्याचवर्षी पुण्याला आलो . पुढे बरीच वर्ष आमचा संपर्क नव्हता . तरुणपणातील दोघांचेही त्यावेळेचे काळेभोर केस आता पांढरेशुभ्र झाले आहेत . कोव्हीडच्या काळात त्याची मिसेस गेली . दोन्ही मुलींची लग्ने होऊन एक बँगलोर व एक मुंबईत स्थायिक आहे .इनायत आता एकटा मीरा रोड येथे राहतो .
         निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी व मला भेटण्यासाठी चाळीस वर्षांनंतर उरामध्ये साठवलेल्या अनेक आठवणी घेऊन हा मित्र सर्व नातेवाईकानां घेऊन मुंबईवरून वाईला भेटायला आला . मित्रत्व जपण्याची ओढ असली व एकमेकांविषयी आदरपूर्वक खरे प्रेम असले की माणसे प्रत्यक्ष भेटतात नाहीतर फेसबुक व्हॉटसअपच्या आभासी जगात मित्र नातेवाईक शेजारून चालले तरी ओळख दाखवत नाहीत भेटणे तर फार फार दुरची गोष्ट असते . एक मित्र प्रत्यक्ष भेटणे म्हणजे एक आठवणींचा अध्याय असतो . त्याच्यासोबत घालवल्या क्षणांची मनाच्या करण्यामध्ये उजळणी असते . तो एक ठेवा असतो अविस्मरणीय गोष्टींचा .
         आता वाटते बरे झाले गॅलरी सुरु केली नाहीतर अशा दूर माणसांच्या गर्दीत  मुंबईसारख्या शहरामध्ये हरवलेल्या  मित्राची प्रत्यक्ष भेट कशी झाली असती ? इनायतच्या भेटीमुळे कोल्हापूरातील दिवस आठवले .
त्यामुळे आता निसर्ग आर्ट गॅलरी पुढे सुरु ठेवायचा निश्चय केला आहे . 
तुम्ही देखील या , जमेल तसे वेळ काढून या . 
सर्वांना सप्रेम निमंत्रण आहेच .
सोबत कॉमेंटसमध्ये गूगल मॅपची लिंक दिलेली आहे .
फेसबुकवर इन्स्टाग्रामवर Nisarg Art Gallery या पेजला फॉलो करा. तेथे गॅलरीचे रोजचे अपडेट आहेत .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोडवर नाना फडणीस वाड्यापासून अर्धा किमी मुख्य रस्त्यालगत .
मु.पो भोगाव , ता.वाई ,
जिल्हा . सातारा - 412803
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत .
सर्वांना मुक्त प्रवेश [No Entry fee]
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
चित्रकार सुनील काळे✍️ 9423966486
निसर्ग आर्ट गॅलरी [वाई]

मंगळवार, २४ जून, २०२५

एक दिवस - एक स्केच

एक दिवस - एक स्केच
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
रात्रीचे सव्वाअकरा वाजलेत .
मी गावाबाहेर रहात असलेल्या 
" निसर्ग " बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त स्टुडिओत माझ्या तीस पस्तीस वर्षांच्या कालावधीत केलेल्या दोन तीन हजार रफ स्केचेसचा पसारा घेऊन बसलोय . सगळीकडे घनदाट नीरव शांतता आहे . या नीरव शांततेला भंग करणारा कसलाही आवाज नाही . काही वेळापूर्वी प्रचंड तुफान पाऊस पडल्यामुळे आजूबाजूच्या शेतात  डबकी साचलेली आहेत . त्या डबक्यातून डोके काढून लहानमोठे बेडूक कसलेतरी चित्रविचित्र आवाज काढत आहेत . त्यापेक्षाही दूर आमच्या खेडेगावातील मंदिराच्या गाभाऱ्यात काही गावकरी एकतारी घेऊन तालसुरांच्या नियमानां धुडकावून शांततेचा भंग करत मोठमोठ्याने बेताल सुरांमध्ये लाऊडस्पीकर लावून भजने गात आहेत. खरं तर देवाला लाऊडस्पीकरची काय गरज असते ? त्याला का ऐकू येत नाही ?  पण खरे कारण वेगळेच आहे . आम्ही गावात राहतो , म्हणजे शहरी नियमांशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही ही एक गोष्ट व दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही भजने करतोय म्हणजे आम्ही धार्मिक पुण्यकार्य करतोय त्यामुळे तुम्ही हे सहन केलेच पाहीजे असा सर्वानां समजलाच पाहीजे हा एक छूपा अट्टहास असतो .
         का बरे ही मंडळी भजने गात असावीत ? काय मिळत असेल त्यांना? आत्मिक समाधान ? सत्याचा ? ईश्वराचा शोध ? नुसता टाईमपास ? की स्वतःलाच स्वतः विसरण्याचा प्रयत्न ? का आणखी स्वतःलाच स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न किंवा काही अदृश्य हेतूही असावा का ? असे भराभर मला फारच गंभीर प्रश्न पडतात . त्या भजन मंडळीतील एखादाच खरा निष्णात , तालासुरांची जाणीव असलेला असावा बाकीची त्यांच्या ओबडधोबड आवाजात सुरात सूर मिसळून गाण्याचा विचका करत आहेत पण त्यांची कोणाची एकमेकांशी तक्रार नाही . आपण सगळेच बेसुरे आहोत पण शुद्ध मनाने सुरांचा शोध घेत राहीले पाहिजे अशी त्यांची धारणा असावी .
        मी जी स्केचेस केलीत त्यांची वेगवेगळी माध्यमेही अशी बेसुरी भजनांसारखीच आहेत . काही काळ्या पेनाने , काही चारकोलने , काही ब्रशने , काही रंगीत पेन्सीली वापरून ,काही जलरंगात , तर काही काळी फाऊंटन पेनाची इंक वापरुन केली आहेत . यामध्ये परीपुर्णत्वाचा ध्यास नाही . काही सहज आनंदासाठी , काही टाईमपाससाठी तर काही तो विषय समजून घेण्यासाठी , काही अभ्यासासाठी चित्राच्या पूर्वतयारीसाठी केलेली स्केचेस आहेत . 
      कदाचित त्या गावकऱ्यांची ईश्वराला साद देत देवत्वाचा शोध घेण्याची इच्छा किंवा भजनातून व्यक्त करण्याची कृती असेल . माझा देखील वाई ,पाचगणी , महाबळेश्वराच्या परिसरात रानोमाळ हिंडून शहरातून निसर्गाचे सौंदर्य कागदावर पकडण्याचा प्रयत्न स्केचमधून प्रतिबिंबित होत असेल . 
     निसर्गाचा गुरु कोण ? स्वतः निसर्गदेवच .हा निसर्गदेवच चित्ररूपाने माझ्या पाठीशी उभा राहून समोरच्या दृश्यांची  ज्ञातअज्ञात रुपे  स्केचरूपाने माझ्याकडून करून घेत असावा . निसर्गदेव असा छान सर्वत्र पसरला आहे . त्याचा आपण सर्वजणच जमेल तसे शोध घेण्यात आस्वाद घेण्यात मग्न असतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असते. काहींचे भजन तर काहींचे चित्र .
        दृश्य पेंटिंग्जच्या रुपाने रंगाचा आधार घेत रेखाटणारे चित्रकाराचे हात असोत वा कवीमनाच्या लेखकाने निर्माण केलेल्या काव्यपंक्ती असोत , त्या काव्यपक्तीनां निरागसरुपाने साकार करणारे गायक असोत वा त्यांना सुरबद्ध करणारे संगीतकार असोत . चित्रकार , शिल्पकार , गायक , संगीतकार व समस्त विश्वातील अनेक कलाकारांमुळे ह्या दगदगीच्या भाकड बेसूर जगात आनंद निर्माण झाला आहे . त्यांच्या विविध कला साकार करण्याच्या अलौकीक कलागुणांमुळे या जगात राहायला सर्वानां आवडते मजा वाटते .     
जीवनात कोणतीही कला न आवडणारी कोणतीही कला  जोपासणारी अरसिक मंडळी पाहिली की यांचे जगण्याचे प्रयोजन शून्य आहे याची प्रकर्षाने जाणीव होते . एखादया पशूच्यामध्ये व या अरसिक माणसाच्यामध्ये काहीही फरक नाही याचीही मनाला खात्री पटते .
        तुमचा सूर लागो वा न लागो पण गावकरी जसे भजनांच्या तालांमध्ये तल्लीन होत जातात , दुसरा काय म्हणेल? त्याला काय वाटेल? त्या शेजारच्या माणसाला माझा बेसूर आवाज ऐकून त्रास होईल का ? याचा जराही विचार त्यांच्या मनात येत नाही . ते त्या भजनकलेमध्ये निरागसतेने सामील होत आस्वाद घेत राहतात .
         चित्रकाराने काढलेली ही रफ रेखाचित्रे त्याच निरागस ध्यासाचा एक धागा आहे . भजन व स्केचेस करणे मला आता वेगळा प्रकार वाटत नाही असतो . शेवटी ईश्वराप्रती जाण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळेच असतात .
       माझी ही चित्ररेखाटने पाहून एक मित्र म्हणाला तू तर तुझा परिसर , तो क्षण , ते दृश्य , तो काळ चित्ररूपाने  कागदांवर कायमचा पकडून  ठेवला आहेस . तो काळ तो परिसर आता किती बदलला याचा विचार केला तर जाणवते या सृष्टीतील कितीतरी अनमोल गोष्टी माणसाने विकासाच्या नावाखाली फारच " भकास " केलेल्या आहेत . ही स्केचेस आता एक प्रकारचे जून्या वास्तूंचे डाक्यूमेंटेशन झाले आहे .
         पाचगणी , महाबळेश्वर व वाई परिसरातील वृक्षतोड , मोकळ्या डोंगररांगावर बांधलेल्या नवनव्या इमारती वाहनांची गर्दी नव्या हॉटेल्स , बंगले व नव्या शाळांचा उदय पाहून पन्नास वर्षांत किती मोठा बदल होत आहे याचे " चित्रदर्शन " मला रेखाटनातून जाणवते . ही स्केचेस करताना एक नवा अनुभव , नवा अभ्यास व नवा दृष्टीकोन जाणवत होता . कालपरत्वे आता नवे झालेले बदल स्विकारले गेलेले होते . एक 
चित्ररेखाटन (स्केच)  रेखाटणे म्हणजे जणू एक नवी गोष्ट सांगणे असते .
         आता रोज एका चित्रामागची गोष्ट व ते रेखाटन करतानाचा अनुभव सांगण्याची वेळ आली आहे याची मला जाणीव होत आहे . चित्र रेखाटने करताना त्या दृश्याचा दृश्यअनुभव देणे हा उद्देश आहेच पण ते दृश्य रेखाटण्याची उर्मी का आली ? प्रत्यक्ष फिल्डवर साईटवर चित्र रेखाटताना काय परिस्थिती होती व चित्र रेखाटताना त्या त्या परिसराची थोडी माहिती व स्मरणरंजनाचा ही अनुभव मिळेल याची मला खात्री वाटते .
       कदाचित आणखी काही वर्षांनी ही दृश्यचित्रे एकदम इतिहासकालीन वाटतील असेही मला वाटत आहे .
चला तर मग सुरु करतो एक रफ स्केचेस चित्रमालीका .
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील .

सुनील काळे ✍️
9423 966486

प्रा. रमेशचंद्र बारगजे

प्रा. रमेशचंद्र बारगजे (सर)
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
          भारतातील शिक्षणपद्धती आणि जपानच्या शिक्षणपद्धतीत मोठी तफावत आढळते . जपानमध्ये लहान मुलानां अगदी सुरुवातीपासूनच नेहमीच्या विषयाव्यतिरिक्त हस्तकला , ओरोगामी , चित्रकला , शिल्पकला, वादनकला , गायनकला , बागकाम , प्लबिंग , इलेक्ट्रीक , इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्ती , स्वच्छता व इतर असंख्य अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कला शाळेपासूनच शिकविल्या जातात . त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा एकूण कल पाहून त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक मदत करतात व मग तो विद्यार्थी त्याला आवडणारे कोणतेही एक क्षेत्र निवडून  त्यात पारंगत होतो , खरी मास्टरकी मिळवितो . 
         मध्यंतरी एक पोस्ट तर खूप भावली . जपानमधील दूरच्या खेड्यात एकटी शाळेत जाणारी मुलगी होती ,तिला शाळेत जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन थांबवली जायची . एका मुलासाठी मोठा वळसा घेऊन स्थानिक बस त्या मुलाला घेऊन शाळेत पोहचविण्यासाठी मदत करायची .याऊलट आपण भारतीय शाळांचा आढावा घेतला तर अगदी कमी पट असलेल्या डोंगराळ व वस्तीवरच्या शाळाच बंद करण्याचा घाट मध्यंतरी सरकारने घातला होता . सुविधा देणे तर दूरच पण शाळेच्या इमारतींची अवस्थादेखील डेंजर आहे .
          त्यामुळे हे जाणवते की मानवी जीवन जगताना सगळेच फक्त IT (आयटी ) मध्ये काम करणारे उपयोगाचे नसतात . खेड्यापाड्यात व शहरात रंगकाम करणारे , इलेक्ट्रीकचे काम करणारे , वेल्डींगचे काम करणारे , हुशार प्लंबरसुद्धा मिळत नाहीत . त्यामुळे शिक्षकांनी फक्त पुस्तके पाठांतर करण्यापेक्षा अशा रोजच्या व्यावहारीक गोष्टीसुद्धा शाळेत शिकविल्या पाहिजेत असे वाटते . त्यासाठी शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेऊन नवनवे अभ्यासक्रम सुरु करणे आता गरजेचे आहे . अशा नवनव्या कलागुणांमुळे विद्यार्थ्याची मानसिक घुसमट थांबते व आवडीच्या क्षेत्रात तो प्राविण्य मिळवितो शाळेत येण्याची गोडी वाटते .
             मी 1982 साली दहावी पास झालो आणि परंपरेप्रमाणे बारावी सायन्समध्ये शिक्षणासाठी वाईच्या किसनवीर महाविद्यालयात दाखल झालो. इंग्रजी भाषा जराही समजत नव्हती , थोडक्यात प्रचंड बोंब होती . सर मंडळी काय शिकवितात हे मला अजिबात कळत नव्हते.यातून आली ती प्रचंड मानसिक निराशा .  मग एसटीमधून प्रवास करताना मध्येच पसरणी घाटात उतरून निसर्गचित्रणाचे स्केचेस करण्याचे नवीन वेड मला लागले . या वेडाची परिसिमा इतकी वाढली की चित्रकलेशिवाय दुसरे काय सुचेचना. मग वर्गात पाठीमागे बसून सगळ्या सरांची स्केचेस करायचो. 
          प्राणिशास्त्र  शिकविणारे प्रा.रमेशचंद्र बारगजे नावाचे एक प्रोफेसर मला शिकवायला होते ते मात्र वेगळेच होते . त्यानां चित्रकला , मिमिक्री , गायन, बागकाम  व इतर बऱ्याच गोष्टींची आवड होती . त्यांनी मला चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले माझ्यातला चित्रकलेचा स्पार्क ओळखला. मला बेडूक कापून त्याची पचनसंस्था शिकण्यात अजिबात रस नव्हता पण बेडकाची डिसेक्शन करतानाची चित्रे रेखाटायला मला आवडायची . माझ्या प्रयोगवह्या (जर्नलस) अशा चित्रांची परफेक्ट बुक्स असायची . मग त्यांनी त्यावर्षी या फ्रॉगडिसेक्शनची व शास्त्रज्ञांची छान रेखाचित्रे करून घेतली . मोठे चार्टस करून घेतले व माझ्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन वार्षिक स्नेहसमेलनांत आयोजित करून प्रोत्साहन दिले . त्याचवर्षी मी चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये दिली व मला A ग्रेड मिळाले . त्यामुळे आत्मविश्वास वाढला .पुढे बारावी सायन्स पास झालो व कोल्हापूरला कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयात दाखल झालो . चाळीस वर्ष होऊन गेली पण किसनवीर महाविद्यालयाचे सर्वच सर आजही संपर्कात राहीले ,आठवणीत राहीले कारण त्यानां विद्यार्थी घडवायची ओढ होती .
           आज प्रा.रमेशचंद्र बारगजे सर 1973 सालच्या कोल्हापूर विद्यापीठातील आपल्या मित्रांसोबत सहकटूंब " निसर्ग आर्ट गॅलरीत "
चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी सर्वानां घेऊन आले . दहा बारा गाड्या आर्ट गॅलरीत आल्या व गॅलरीचा परिसर माणसांनी फुलून गेला . चाळीस वर्षापूर्वी लावलेल्या या चित्रकार छोट्या रोपट्याला योग्य खतपाणी घातल्याने आता रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले होते . सरांनी कौतुकाने सर्वांसोबत ओळख करून दिली .घरात एक आजारी पेशंट [पत्नी] असताना उत्साहाने सर्व मित्रानां एकत्रित करून गेट टू गेदर व वाईदर्शनाची ट्रिप आयोजित करणाऱ्या सरांचा उत्साह चाळीस वर्षांपूर्वी होता तसाच आजही ओसांडून वहात आहे असे वाटले .
      असे अनेक असामान्य प्रेरणादायी  ऊर्जास्त्रोत्र असलेले प्राध्यापक , शिक्षक व मार्गदर्शक मला वेळोवेळी वेगवेगळया टप्यांवर भेटले व जीवन जगत असताना मोठी प्रेरणा मिळाली . प्रा . रमेशचंद्र बारगजे व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! व मनःपूर्वक धन्यवाद !
         निसर्ग आर्ट गॅलरीत येण्यापूर्वी फोन करून संपर्क करा . आपल्या परिसरातील निसर्गाची चित्रकाराच्या नजरेतून चित्रे पाहणे हा एक वेगळा आनंद असतो तो घेण्यासाठी एकटे या किंवा अनेकांना घेऊन या . आमच्या या निसर्ग आर्ट गॅलरीतील निसर्गयात्रेत येणाऱ्या सर्वांचे नेहमीच स्वागत असेल .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्गचित्रकार सुनील काळे : 9423966486
निसर्गचित्रकार स्वाती काळे : 9158757626

माझ्या स्वप्नातील घर

माझ्या स्वप्नातील घर
🏠🏠🏠🏠🏠🏠
        1995 साली मी मुंबई कायमची सोडली कारण मला रोज नालासोपारा येथून चर्चगेटला पस्तीस स्टेशन पार करून ऑफीसला ट्रेनमध्ये प्रवास करून जायला लागायचे . माझ्या तीन वर्षाच्या या नोकरीच्या प्रवासात मला एकही दिवस लोकल ट्रेनमध्ये बसायला निवांत जागा मिळाली नाही . बरोबर सकाळी सात वाजून वीस मिनिटाची लोकल चुकली की पुढचे सर्वच गणित चुकायचे आणि परतताना तीच अवस्था . सकाळी इस्त्री करून चकचकीत असणारा मी ट्रेनमध्ये घुसताच विस्कटलेला असायचो . त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे नियमितपणे न चुकता जीवघेणा प्रवास करून नोकरी करणाऱ्यांचे खरोखर कौतुकास्पद कार्य आहे .     
        मला पाचगणी हे गाव लहानपणापासून आवडायचे कारण तीसचाळीस वर्ष तेथे वास्तव्य केले होते . निसर्गचित्रकार असल्याने आपल्या गावात जाऊन एक आर्ट गॅलरी तयार करण्याचे व त्या गॅलरीत आपल्याच चित्रांचे प्रदर्शन करून चित्रमय आयुष्य जगण्याचे भव्य स्वप्न घेऊन मी मुंबईवरून 1995 साली परत आलो होतो . त्यावेळी जकात नाक्यावरून सिडने पॉईंटकडे वळताच रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या परिसरात पॅनोरामा व्हयू नावाचा एक जुनाट झालेला बंगला भाड्याने घेतला व प्रदर्शनात मिळालेले सर्व पैसे खर्च करून त्या बंगल्याला " पांचगणी आर्ट गॅलरी " या नावाने नवसंजीवनी दिली . छान प्रदर्शन सुरु झाले उत्तम प्रतिसाद मिळत होता पण घरमालकाने एक वर्षानंतर पुन्हा भाड्याने देण्यास नकार दिला आणि नंतर आमच्या आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली .
         वाट इतकी लागली की मला त्या बंगल्याच्या जवळच बिलीमोरीया या इंग्रजी माध्यमाच्या बोर्डींग स्कूलमध्ये अल्पपगारावर नोकरी करायला लागली. शाळेने जी जागा दिली होती त्यामध्ये पाणी , बाथरूम , वॉशरूम , किचन , फर्निचर , कशाचीच सोय नव्हती . टॉयलेटसाठी तिसऱ्या मजल्यावर जायला लागायचे . त्यासाठी  " बिलीमोरिया स्कूलच्या आठवणी  " नावाचा नवीन लेख लिहावा लागेल . पैसे नसले की अशा काळात आपले दिवस फिरलेले असतात सर्व नातेवाईकांनी व मित्रांनी पाठ फिरवलेली असते . सुखके सब साथी दुखमें ना कोई याची प्रचिती वारंवार येत असते . या दुष्काळग्रस्त दिवसात आलेला दिवस ढकलणे एवढेच आपल्या हातात असते. मिळणारा पगार इतका अल्प होता की मोठी तर स्वप्ने काय ? आपण आता संपलो हीच भावना वाढत चालली होती मनाला उभारी देणारे ते दिवस नव्हतेच . सगळ्या बाजूने अंधारमय व निराशेचा तो काळ होता .
         आणि अचानक सकाळच्या पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली . पुण्याच्या रोहन बिल्डर्स ग्रुपतर्फे चित्रकारानां एक संधी दिली होती . 
" माझ्या स्वप्नातील घर "
हा विषय दिला होता व पहिल्या तीन चित्रानां  पाच हजार रुपयांचे बक्षीस होते . माझा महिन्याचा पगार साडेतीन हजार रुपये होता त्यामुळे पाच हजार रुपयांचे बक्षिस मोठीच रक्कम होती . स्वाती आणि मी त्यामध्ये भाग घेण्याचे ठरवले . खरं तर चित्रांच्या स्पर्धा हा विषय मला आवडत नाही कारण चित्र ही कवितेसारखीच आतून निर्माण होणारी गोष्ट आहे तिथे फक्त मनसोक्त रंगात खेळून आवडलेली गोष्ट सादर करणे महत्वाचे असते . फक्त पैशासाठी कलानिर्मिती ठरवली की व्यावसायिकीकरण सुरु होते असे वाटायचे . पण माझी आर्थिक घडी खरोखरच बिघडली होती . म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा असे ठरवले .
        त्यानंतर  मग रात्रीची मला खरीखुरी  भारी भारी घरांची , बंगल्याची , भव्यदिव्य राजवाड्याची स्वप्ने पडायला सुरुवात झाली . त्याकाळात मी रोज सिडने पॉईंटच्या व्हॅलीमध्ये फिरायला जायचो . तेथे तळमाळाच्या व्हॅलीमध्ये माझा भव्य बंगला मला दिसू लागला . त्या बंगल्याच्या समोर कमळगड , नवरानवरीचा डोंगर , उजव्या बाजूस मांढरदेवीचा डोंगर त्याच्या जवळपास पांडवगड व खाली धोमधरणाचे अथांग पसरलेले पाणी . त्या पाण्याच्या बाजूला गर्द हिरवीगार भातशेती . त्या भातशेतीच्या बाजूला उंचावरून दिसणारी चिमुकली लाल छपरांची घरे छोटी मोठी झाडे दिसू लागायची . सुर्य उगवला की डोंगरांच्या पुर्वेकडे पिवळसर कोवळी उन्हे व दूर लांबचे डोंगर धुसर धुक्यात हरवलेले दिसू लागले . नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे इंद्रधनुष्य तयार झालेले दिसायचे व ते तेजस्वी इंद्रधनुष्य मी स्वप्नातील घराच्या उंच टेरेसवर बसून मस्त ईझल लावून , डोक्यावर मोठी ब्रिटीश टोपी घालून बाजूला जलरंगाची मोठी पॅलेट घेऊन ते दृश्य रंगवत आहे असे माझेच रुपडे मला दिसायला लागले . या व्हॅलीच्या सभोवताली पाण्याचा एक तलाव दिसू लागला , छान रंगीबेरंगी फुलांची बहरलेली जोपासलेली बाग दिसू लागली . बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये सुसज्ज फर्निचरची बैठक व छान पुस्तकांनी भरलेले कपाट दिसू लागले . आरामखुर्चीवर निवांत पहुडलेला मी पुस्तक वाचत समोरचा निसर्ग पहात पहात मी चहा पिताना दिसत होतो . दहा दिवसात मला दहा हजार दृश्यांची स्वप्न पडलेली होती . आता बंगल्यास लागून पार्कींगची जागा असून तेथे माझ्या चित्र काढण्याची एक मोठी व प्रवासासाठी एक अशा गाडया दिसू लागल्या . घराच्या मेंटेनन्ससाठी माळ्याची वर्कर कॉटेज गरजेची आहे हे जाणवू लागले . दहा दिवस सतत स्वप्नमय जगलो व मग छान छोटी छोटी स्केचेस केली . त्यातून मग सगळया बेडरूम्स मधून कृष्णा व्हॅली कशी दिसेल याची कल्पनाचित्रे रेखाटली आणि शेवटी या सर्वांचे एकत्रिकरण करून फायनल स्केच तयार केले .
         आपले मन म्हणजे स्वप्नकल्पनांचे मोठे माहेरघर असते . आपण सगळेच थोडेफार स्वप्नाळू असतो . आपल्या सर्वानांच या कल्पनाविश्वात मनसोक्त फिरायला भटकंती करायला आवडत असते. त्यात मी तर चित्रकार असल्याने सगळी स्वप्ने रंगीतच पडायची .
मग 22 "x30 " या आकाराच्या माऊंटबोर्डवर " माझे स्वप्नातील घर " दृश्यरूपात साकारले . चित्र प्रत्यक्ष रेखाटत असताना आणखी बारीकसारीक गोष्टींचा विचार स्पष्ट होत होता . आमच्या दहा बाय बाराच्या खोलीत त्या दगडी भितीं असलेल्या शाळेत शेवटी मी व स्वातीने आमची स्वप्ने चित्रात पूर्ण झालेली दाखवली , पण प्रत्यक्षात मात्र वास्तवता वेगळीच होती .निराशमनाने व शरिरानेही आमची साथ सोडलेली होती . शेवटी एकदाची चित्रे स्पर्धेसाठी पाठवली . त्यामध्ये महाराष्ट्रातून चारपाच हजार चित्रे आल्याचे कळले व  खरोखरच त्या धक्याने आणखी निराशेत भर पडली . एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपला निकाल शून्यवत आहे असे ठरवून आम्ही शाळेच्या रुटीनमध्ये व्यस्त झालो . शेवटी स्वप्न ते स्वप्न , ते काय वास्तवात उतरणार ? असे ठरवून रोजच्या कामात मग्न झालो .
         दहा बारा दिवसांनी पोस्टमनने खूप दिवसानंतर आम्हाला शोधून काढले व दोन रजिस्टर पत्रे हातात ठेवली .पत्र उघडताच आनंदाला पारावर उरला नाही . कारण आमच्या दोघांच्याही चित्रानां बक्षिस मिळालेले होते . खूप दिवसांनी आम्ही आनंदीत झालो होतो . पुण्याला मोठ्या समारंभात आम्हाला पाच पाच हजाराचे बक्षिस मिळाल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला . [त्यावेळी त्या चित्राचा फोटो काढून ठेवला असता तर किती बरे झाले असते असे  आता सतत वाटत आहे ] संध्याकाळी पाचगणीला परतलो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रुटीनमध्ये स्वप्नातील घराला पुर्णपणे विसरलो . कारण असे डोगरांच्या कडेला स्वप्नातील सर्वगुणसंपन्न घर प्रत्यक्षात असणेच शक्य नव्हते असे त्यावेळी वाटले .
        बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेली . आयुष्याच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते . 12 एप्रिल 2025 रोजी आम्ही महाबळेश्वरला महापर्यटन महोत्सवाच्या खादी ग्रामोध्योग येथील हॉलमध्ये भरणाऱ्या प्रांत व तहसिलदार मुख्याधिकारी यांनी आयोजित केलेल्या स्थानिक रहिवाशांसोबतच्या मिटींगला गेलो होतो . त्या मिटींगनंतर आमच्या पुस्तकांच्या गावात राहणाऱ्या नितीनभाई भिलारे या मित्राला फोन केला . कारण एक पक्षी त्याच्या खाद्यांवर बसून फिरतानाच व्हीडीओ त्याने सर्वानां पाठवला होता . ते घर किंवा ठिकाण मला पहायचे होते .
         संध्याकाळचे चार पाच वाजले असावेत नितीनने त्याचा मॅनेजर पाठवला त्या मॅनेजरचे नाव तन्मय राजगुरु. महाबळेश्वर रस्त्यावर गुरेघर गावानजिक एका अनोळख्या ठिकाणी तो आम्हाला घेऊन चालला होता . पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य डांबरी रस्ता आता खूप दूर राहीला होता . एका निर्जन निर्मनुष जागेकडे आम्ही गाडीतून चाललो होतो . साधारण एक दोन किमी अंतरावर कृष्णा व्हॅलीच्या समोर आमची गाडी आली पार्किंगमध्ये गाडी लावली आणि समोरच्या बंगल्यासमोरचे दृश्य पाहून मी थक्कच झालो . माझ्या शरीरात एक प्रचंड कंपवात झाला , डोक्यातून मेंदूकडे सणसणत खुप झिणझिण्या निर्माण झाल्यासारखा एक आगळावेगळा विद्युतप्रवाह संचारत गेला . कारण त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ चित्रकाराचे एक मोठे ईझल होते . त्यावर कॅनव्हास लावलेला दिसत होता . पंचवीस वर्षांपूर्वी मी मनाने  रेखाटलेले " माझ्या स्वप्नातील घर " प्रत्यक्ष जिवंत होऊन माझ्यासमोर दिसत होते . तसाच तो मोठा भव्यदिव्य फर्निचरयुक्त हॉल , त्याच्याशेजारी पुस्तकांचे कपाट ,समोर मोठी बाल्कनी , त्या बाल्कनीसमोर कृष्णा व्हॅलीचा नयनरम्य नजारा दिसत होता. समोर कमळगड व नवरानवरीचा डोंगर , मांढरदेवी पाचगणीच्या पर्वतरांगा व धोमधरणाचा प्रचंड जलाशय संध्याकाळच्या प्रकाशात चमचमत होता . सारा परिसर धुक्याने व ढगांनी व्यापून गेला होता . प्रत्येकवेळी मोबाईलमध्ये दृश्य टिपण्यास सरावलेले माझे हात एकदम निष्प्राण झाले होते . माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसत नव्हता .सगळा प्रकार एक मोठी आकल्पित घटना वाटत होती . 
असे कसे घडु शकते ? 
पंचवीस वर्षांपूर्वी मी पाहीलेले स्वप्न माझ्यासमोर  दृश्यरूप कसे घेऊ शकते ? सृष्टीकर्त्याने एक अजब चमत्कारीक विश्व प्रत्यक्ष माझ्यासमोर निर्माण केले होते . चमत्कारांवर माझा जराही विश्वास नाही पण चमत्कार झालेला अनुभव मी प्रत्यक्ष घेत होतो अनुभवत होतो .
          मॅनेजर तन्मयने मग छान वाफाळलेला चहा व बिस्कींटांचा ट्रे आणला .तो ट्रे व टिपॉय मला किती ओळखीचा वाटत होता . जणू त्या घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या परिचयाची होती . मॅनजर तन्मय तन्मयतेने एकेक बेडरूम दाखवत होता व त्या प्रत्येक बेडरूममध्ये मी हरवून जात होतो . उत्तम प्रतिचा बेड , बाथरूमची वेगळी रचना ताब्यांच्या घंघाळाचे वॉशबेसीन , तांब्याचेच कधीही न पाहीलेले वेगळे नळ , प्रत्येक गोष्ट कशी जागची जागेवर , कोठेही कचरा नाही , धुळ नाही , स्वच्छता म्हणजे पुर्ण निरांकर स्वच्छता उलट माझ्याच पायांमुळे फरशी खराब होईल की काय ? अशी मनात शंका येत होती .
         बंगल्याबाहेरच्या व्हॅलीच्या बाजूला बांबूच्या झाडांची बेटे आणखी शोभा वाढवत होती . एक खास कोकणातील दगड वापरून गजिबो तयार केला होता . त्यामध्ये आरामदायी खुर्च्या सोफासेट ठेवलेले दिसत होते . कमानीवर छान झुळझुळीत कपड्याचे पडदे वापरून डेकारेशन केले होते . खाली सुंदर कारपेट टाकलेले होते . तेथून समोरचा निसर्ग आणखी बहारदार दिसत होता . बाजूला माळ्याची कामगारांची सुंदर कॉटेजेस बांधलेली होती . त्याच्याजवळच लाकडी विंडमील जणू एखाद्या इंग्लडमधल्या राजेशाही थाटात राहणाऱ्या एखादया सरदाराचे ते घर असावे असे वाटत होते .
             स्वप्नातील घरे ,स्वप्नातील कल्पना स्वप्नातच विरून जातात असे सगळे म्हणतात पण आता मला स्वप्नातील कल्पना प्रत्यक्ष रुपात साकारणारेही विश्वकर्मा असतात याची खात्री पटली होती . कल्पनेपेक्षा वास्तव्यातील घर आणखी सुंदर होते . जबरदस्त दृश्यरूप घेऊन प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे ठाकले होते . परमेश्वराने जणू आकाशातून तेजोवलय घेऊन माझ्यासमोर उभे राहून विचारले की तू स्वप्नातील घर फक्त तुझ्या कल्पनेने कागदावर द्विमितीय रुपात दाखवलेस पण आज मी तुला प्रत्यक्ष घर त्रिमितीत कसे असते ते दाखवतो . तु स्वप्न विसरून गेलास पण स्वप्न पाहून स्वप्नांचा ध्यास पुर्ण करणारेही या जगात आहेत . आपल्या भगीरथ प्रयत्नांनी निर्जनस्थळी तेजोमहल बांधणारे दिव्यपुरुष देखील तुझ्यापुढे आहेत . उघड डोळे , पापण्या न मिटता हे सर्व काही लक्षात ठेव , स्वप्नांचा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत विसरू नकोस . माझे मन व शरीर त्या वास्तूतून पाय काढणेस तयार नव्हते शेवटी भरल्या डोळ्यांनी व भारावलेल्या मनाने त्या वास्तूला मी नतमस्तक होऊन मातीला हात लावला व कल्पनेपेक्षाही सत्य सुंदर असू शकते अशा त्या निर्माणकर्त्या नितीनभाई भिलारे या विश्वकर्म्यास मनोमन सॅल्यूट ठोकला . कसा वाटला काऊबॉय कॅसल ? त्या . . त्यादिवशी विचारलेल्या प्रश्नाला मी फक्त ' निशब्द ' एवढा एकच शब्द बोलून निरोप घेतला .
        कोण आहेत हे नितीनभाई भिलारे ? एखाद्या माणसाला घडवताना परमेश्वराने इतके सारे काही गुण एकदम कसे टाकले याचा मला आचंबा वाटतो . नितिनभाई व्यावसायाने बांधकाम क्षेत्रात आहे , तो आर्किटेक्ट आहे , तो उत्कृष्ट इंटिरियर डिझायनर आहे , तो संवेदनशील कवि आहे , उत्तम वक्ता आहे , उत्तम लेखक आहे , उत्तम पर्यावरणप्रेमी , निसर्गप्रेमी आहे . सध्याच्या जगात लागणारी आधुनिक विचारांची पुढचे पाहणारी दूरदृष्टी त्याच्याकडे आहे . तो मिलिंद गुणाजीसारखा भटकंती करतो , त्याच्या स्टाईल्स पाहील्या की तो  मला अष्टपैलू अभिनेता दिसतो . त्याच्याकडच्या गाड्यांचा संग्रह पाहीला की मला त्याच्या संग्राहकवृत्तीची नवी ओळख होते . त्याचे व्हीडीओ , रानवाटा , गडकिल्ल्यांचे , नव्या वाटा शोधण्याचे यु ट्युब चॅनेलवरचे व्हिडीओ पाहीले की त्याची कल्पना भरारीची ताकद कळते . नवी झाडे लावण्याचा छंद , प्राणीमात्रांविषयी असलेली ओढ , प्रत्येक गोष्ट , वस्तू निवडतानाची बारीकसारीक गोष्टी टिपण्याची वृत्ती मला भारावून टाकते . पोलीस , एसपी , अनेक राजकीय नेते , अनेक अभिनेते , अनेक कंपन्याचे प्रसिद्ध उद्योगपती ते सामान्य कामगारांचीही ओळख जान पहचान चिरंतन तेवत ठेवण्याची सवय मला नवी दूरदृष्टी देते . अनेक कलागुणांचा ध्यास तर आहेच त्या कलेचा आस्वाद घेण्याची ओढ , पुस्तकांची , गाण्यांची आवड मला सवड काढण्यास प्रवृत्त करते . आपल्या अफाट कामातून व्यापातून आपल्या कुटुंबाशी त्याची घट्ट नाळ आहे तो आपल्या पत्नीचा उत्तम पती व मुलांचा आदर्श पिताही आहे . त्याच्या आईवडीलांशी त्याचे मित्रत्वाचे नाते आहे . अनेक ओळखीच्या व अनोळखी मित्रांशी , सहकाऱ्यांशी असणारे नाते आणखी घट्ट करण्याची त्याची हातोटी अफलातून आहे . तो मैत्री फौंडेशन या सामाजिक संस्थेचा संस्थापक व अध्यक्ष आहे . त्याच्या बुमटाऊन फौंडेशन अंतर्गत तो फूटबॉलच्या , क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत असतो . त्याने विद्यानिकेतन कॉलेजजवळ अत्याधुनिक सर्वसोयीयुक्त जीम तयार केली होती त्याअंतर्गत बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धा , रक्तदान शिबिरे तो आयोजित करतो . पाणी वाचवा , वनवा लावू नये यासाठी धडपडतो , उन्हाळ्यात झाडे वाचविण्यासाठी उपाययोजना करत राहतो . तो अनेक गुणांनी परिपूर्ण आहे पण एक गुण त्याचा सर्वात मोठा आहे तो माणूसकी जपणारा उत्तम माणूस आहे . माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे हे त्याच्या वागण्यातून नेहमी उलघडत राहते . आपले काम सर्वोत्तम गुणवतेचे असेल तर बोलायची काय गरज ? असे त्याचे ब्रीदवाक्य आहे .
        अष्टपैलू व अचाट गुणवत्ता असलेल्या या विश्वकर्म्याने नुकतीच 25 मे रोजी आमच्या वाईजवळच्या खेडेगावातील निसर्ग आर्ट गॅलरीला कवी ज्ञानेश सुर्यवंशी व केसरी ट्रॅव्हल्सचे रोटरीयन जयवंत भिलारे या मित्रांसोबत भेट दिली . मोठा रंगीत फुलांचा पुष्पगुच्छ आणून आमच्या दोघांचा सत्कार केला . स्वप्नातील घरासाठी तीन छोटी चित्रे विकत घेऊन चित्रकलेलाही प्रोत्साहन दिले .
         नितीनभाई भिलारे 25 मे रोजी आले व त्यानंतर बरोबर पाच दिवसांनी या माझ्या स्वप्नातील घरासमोरचे केलेले जलरंगातील एक मोठे निसर्गचित्र मोजार्तो या वेबसाईडवर पन्नास हजार रुपयानां विकत गेले . असे योगायोग जुळून यायला ग्रहताऱ्यांची चांगलीच युती झाली असावी .
         एक गोष्ट तितकीच खरी की नितिनभाई जेथे जातील तेथील वातावरण , तेथील कार्यक्रम भारावून टाकतील ,उजळून टाकतील . कारण स्वप्न पाहणे एक चांगली गोष्ट आहे पण पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्ष हकीकतमध्ये उतरविण्यासाठी जी अविश्रांत परिश्रम करण्याची ध्यासवृत्ती आवश्यक असते ती ध्यासवृत्ती नितीनभाईमध्ये ठासून भरलेली आहे . हे रसायनच काहीतरी अजब आहे , विश्वपित्याने फार सवडीने व हुशारीने हे रसायन सतत जिवंत राहील सतत नाविन्यतेचा ध्यास घेत राहील याची रचना केलेली आहे .
       माझ्या स्वप्नातील घराला प्रत्यक्ष आकार देणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वास मनःपूर्वक सॅल्यूट व पुढील अनेक भव्यदिव्य प्रकल्पांसाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !💐💐💐💐💐
      सात बेडरूमचे हे स्वप्नातील घर राहण्यासाठी बुकींगमध्ये उपलब्ध असते . तुम्हीही महाबळेश्वरला कधी गेला तर जरूर तेथे भेट द्या . ब्रेथ टेकिंग व्हयू , गॉर्जिएस व्हयू , वास्तूकला म्हणजे काय असते याची नक्की नव्याने ओळख होईल .
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
चित्रकार:सुनील काळे✍️9423966486
नितिनभाई भिलारे [मैत्री फौडेंशन ]
9970099100

शुक्रवार, ६ जून, २०२५

चित्रप्रेरणा

चित्रप्रेरणा
🎨🎨🎨
        माणसाच्या आयुष्यातील बालपण कायम लक्षात राहते .शाळेचे दिवस , शाळेचा परिसर , शाळेचे शिक्षक , आपल्यासोबतचे सवंगडी व आपण ज्या गावात लहानाचे हळूहळू मोठे होत गेलो तो परिसर तेथील वातावरण आपल्या अचेतन मनात कायम स्मरणात राहीलेले असते.
         पाचगणी हे सुप्रसिद्ध शैक्षणिक व बोर्डींग स्कूल्ससाठी प्रसिद्ध असले तरी या मोठया स्कूलची फी परवडणे सर्वांनां शक्य नसते . आम्ही वाईजवळच्या पांडेवाडी या खेडेगावातून पाचगणीला राहायला आलो होतो . माझे वडील व काका एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती . ते दोघे व त्यांच्या बायका पूर्णपणे अशिक्षितच होते . त्यामुळे त्यांनी सर्व मुलामुलींनां मराठी माध्यमाच्या जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत पाठवले . सातवीपर्यंत आमच्या शाळेत चित्रकला हा विषयच नव्हता . त्यामुळे खास चित्र काढण्याची अशी कधी प्रेरणाच मिळाली नाही .
           सातवीनंतर मी संजीवन या मोठ्या शाळेत गेलो . शाळेत  प्रवेशपरिक्षा पास झालो आणि आम्ही चौघे गावातील मित्र  या मोठ्या शाळेत जावू लागलो . तेथे शांतीनिकेतनमधून शिकून आलेले भट्टाचारी नावाचे कलाशिक्षक होते . पण माझे दुर्देव असे की आम्ही मराठी माध्यमात शिकल्यामुळे आम्हाला  इंग्रजी जराही समजत नव्हते, त्यामुळे बोलता तर अजिबातच यायचे नाही . त्यामुळे दहावीपर्यंत तीन वर्ष आम्ही त्या सरांशी सलोखा निर्माण करू शकलो नाही . चित्रप्रेरणा तर दूरच राहीली .
            घरी अभ्यासाला जागा नसल्यामुळे आम्ही मित्रमंडळी अभ्यासाची पुस्तके घेऊन कधी पोलीसग्राऊंडच्या पाठीमागे सोहराब मोदींच्या गार्डनमध्ये , कधी नगरपालीकेच्या बागेमध्ये , कधी दूर टेबललॅन्डच्या गुहेमध्ये तर कधी सिडनेपॉईंटच्या निसर्गरम्य परिसरात अभ्यासाला जायचो .
          एकदा संध्याकाळी सिडने पॉईटंच्या रस्त्यावर आताचे रविन हॉटेल आहे त्या रस्त्यावर एक चित्रकार चित्र रंगविताना पाहिला . सडपातळ शरीर , काळ्याभोर मिशा , गौरवर्ण , केसांची साधीच रचना व इनशर्ट केलेले , पायात शूज व एक छोटीशी फोल्डींगची खूर्ची घेऊन हा चित्रकार समोरची कमळगड व मांढरदेवीची दरी , नवरानवरीचा डोंगर व त्या डोंगरावर पडलेल्या एका बाजूच्या संध्याकाळच्या सावल्या व दुसऱ्याबाजूला त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीवर पडलेल्या शेडस ,खाचखळगे , चमकणारे ऊन , डोंगरावर पसरलेले धुके व खाली तळमाळ्यावर जाणारा उतारावरचा रस्ता जलरंगात चित्रित करत होते . चित्रकाराच्या पाठीमागे एक नवीकोरी झक्कास एटलॉस कंपनीची सायकल होती . पुढे हँडलसमोर रात्रीचा प्रकाशझोत पडावा म्हणून डायनामो लावलेला होता . एका बाजूला चित्रकलेचे सामान ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी लावलेली होती . चित्रकार कोणाशीही बोलत नव्हता ,त्याचे काम मन लावून सुरूच होते आजूबाजूला खेडेगावची मंडळी , काही सुशिक्षित पर्यटक , आम्ही शाळेकरी मुले चित्र पाहण्यासाठी कोंडाळे करून जणू जादूचा खेळ पहात होतो . होय , खरंच जादूचा खेळ होता . पांढऱ्याशुभ्र हँडमेड कागदावर जलरंगाचा बिनधास्तपणे मारलेला फटकारा चित्राला हळूहळू जिवंत करत होता . सारा परिसर चैतन्यमय होऊन एका सुरेख फ्रेममध्ये एकवटला होता . ते  दृश्य फोटोकॉपी नव्हते त्या चित्रात एक हालचाल होती . चित्रकाराचे कौशल्य अफाट होते .त्या निर्जीव दृश्याला सजीव केले होते . संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर चित्रकाराने सर्व सामान पिशवीत भरले व जवळच्या बिलिमोरीया स्कूलच्या आवारात चित्रकार दिसेनासा झाला . त्याची पाठमोरी आकृती मला आजही लक्षात आहे .
मला खरी " चित्रप्रेरणा " मिळाली होती .
          मग रोज संध्याकाळी मी बिलिमोरीया स्कूलच्या प्रवेशद्वाराशी दबा धरून बसायचो . चित्रकार कधी गार्डनच्याशेजारी असलेल्या वडाच्या झाडांची , कधी मुख्य बाजारात तर कधी पारशी पॉईटंच्या व्हॅलीची चित्रे काढताना दिसायचा . मग  सायकलवर फिरणाऱ्या त्या चित्रकाराचा मी पाठीमागे पळत पळत पाठलाग करायचो . चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेली कितीतरी चित्रे मी पाठीमागे सलगपणे चारपाच तास उभे राहून पाहायचो . त्या चित्रकाराचे व्यक्तीमत्व मला आवडायला लागले होते . तो चित्रकार कोठेही दिसला की मी मंतरल्यासारखा ,भारावून गेल्यासारखा त्याच्या मागेमागे धावायचो .
          एकदा तर चित्रकाराने कमालच गेली . पाचगणीची ग्रामदेवता घाटजाईची जत्रा फेब्रूवारीमध्ये दरवर्षी भरते . या जत्रेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ढोलवाले , झांजपथके यायची . त्या ढोलवाल्यांची वेगवेगळी हालचाल व जोशपूर्ण प्रत्यक्ष सजीव रेखाटणे काढण्याकरता हा चित्रकार हॉटेल अप्सराच्या उंच पत्र्यावर रेखाटनाचे साहित्य घेऊन बसला . मी पाठलाग करून लगेच चपळाईने पाठीमागे उभा राहीलो . दोन्ही हाताने झांज पकडून आमचे बहिरा माळी म्हणून प्रसिद्ध असलेले एक वयस्कर गावकरी यांचे हावभाव हालचाली चित्रकाराने बरोबर पकडल्या . गुलालाची उधळण करणारे गावकरी , त्यांचा शारिरीक जोशपूर्ण आवेश  , त्यांचा ताल व ठेका चित्रकाराच्या लयबद्ध रेषेतून जिवंत होत होते . मी मात्र डोळे विस्फारून चित्रकाराची हालचाल लक्षात ठेवत होतो . पाचगणीच्या परिसराची चित्रे रेखाटणाऱ्या या कलाकाराचा मी जबरदस्त फॅन झालो होतो पण तरीही कित्येक वर्ष माझी त्यांच्याबरोबर बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.
        या चित्रकाराचे नाव सुभाषचंद्र बोंगाळे सर . पुढे 12वी सायन्सला माझे मन रमेना मग एक दिवस सरांनां प्रत्यक्ष भेटलो . माझी रेखाटलेली  चित्रे त्यांना दाखवली . चित्रकार व्हायचे असेल तर इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते तरच चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळतो याची माहिती त्यांनी दिली . त्यासाठी लागणारे लेटरींग ,भुमिती असे विषय शिकविण्यासाठी सर घरी आले . माझ्यात चित्रकलेचा स्पार्क आहे हे त्यांनी ओळखले . कोणतीही अपेक्षा न ठेवता , कोणताही आडपडदा न ठेवता मुक्तहस्ताने बोंगाळे सरांनी मला मार्गदर्शन केले . पुढे जीवनात अनेक अडचणी आल्या , कठीण प्रसंग आले , निराशेचे क्षण आले त्यावेळी बोंगाळे सर जिवलग मित्रासारखे सोबत राहीले . कलाशिक्षक म्हणून काही वर्ष काम करावे लागले त्यावेळी शाळा सांभाळून चित्रांचा ध्यास , चित्र काढत राहण्याची मशाल सतत तेवत ठेवली पाहिजे , चित्रांचा ध्यास विसरता कामा नये याची शिकवण सरांमुळे मिळाली . आजही बोंगाळे सर मनामनात भिनलेले आहेत . व आज त्यांची आठवण तीव्रतेने आली त्याचे कारणही खास आहे .
        वाईपासून 3 किमी अंतरावर मेणवलीजवळ प्रसिद्ध कवि आर्याकार वामन पंडीत यांचे भोगाव गाव आहे . या गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात रस्त्यालगतच माझा निसर्ग नावाचा बंगला आहे  आणि या बंगल्यातच मी एक महिना " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाने कलादालन सुरु केले आहे . 7मे पासून ते 7जून पर्यंत सुरु झालेल्या या चित्रप्रदर्शनाला खेड्यापाड्यातील अनेक गावकरी , वाई , सातारा , कराड , मुंबई , पुणे , पाचगणीतील अनेक मित्रमंडळी व पर्यटक आवर्जून येत आहेत . सातारा जिल्ह्यात आडबाजूला भोगाव सारख्या छोट्या खेडेगावात आपल्या एका वेडया चित्रकार दाम्पत्याने सुरु केलेल्या या प्रदर्शनाला मुद्दाम भेट देत आहेत व कौतुक करत आहेत .
        पण आज या भोगावच्या खेडेगावातून बालगोपाळ मित्रमैत्रिणींची एक मोठी फौजच प्रदर्शन पाहायला आली होती . यामध्ये एक मुलगा दिव्यांग होता . त्याला 2 किमी व्हीलचेअरवर घेऊन ही मुलांची टोळी चित्रप्रदर्शन पहायला आल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो . मुलांच्या अंगात अंगभूतच खूप चैतन्य , उत्साह , उर्जा असते . त्यानां नाविन्यतेची ओढ असते . विश्वातल्या अगणित प्रश्नांची उकल करण्याची उर्मी असते . त्या सर्व मुलांनी कितीतरी नवनवे प्रश्न विचारले . त्यांची प्रश्नांची सरबती संपतच नव्हती . कारण त्यानां त्यांच्या गावात एक चित्रकार सापडला होता . आताची पिढी खूप चपळ व हुश्शार पिढी आहे . त्यांच्यापैकी एकदोन जणांकडे मोबाईल फोन होता . त्यांच्या अपेक्षाही मोठ्या होत्या . चित्रकाराची बैठक कशी असते ? माध्यमे कशी असतात ? कोणते ब्रश वापरले? पैसे किती मिळतात ? जलरंगात व तैलरंगात काय फरक असतो? किती वेळ लागतो ? गार्डन कधी सांभाळता ? चित्र कधी काढता? कॅनव्हॉस म्हणजे काय ? नाईफ पेंटींग म्हणजे काय? प्रश्न तर संपतच नव्हते .
          अशा जिज्ञासू मुलामुलींना कलादालन कसे असते ? हे माहीतच नव्हते . कलानिर्मिती करताना चित्रकारानां काय वाटते ते त्यानां मनोगत वाचताना कळाले ? त्यांनी तीन चार तास कलादालनात चैतन्य आणले ? त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना मी स्वतःला विसरून गेलो . माणसे वयाने वाढत जातात आणि त्यांचे कुतुहूल , निरागसपण त्यांच्यातले चैतन्यपणही हळूहळू लोप पावत जाते . ती मोठी होतात आणि कोमेजत जातात . एखाद्या उमलणाऱ्या सुंदर फुलणाऱ्या फुलावर विषारी फवारा मारावा व त्यांचे फूलपणच संपवावे तशी पालक मंडळी त्यानां संपवून टाकतात . त्यांच्या कलागुणानां धार पाडण्याऐवजी कलाजोपासना म्हणजे भीकेचे डोहाळे लागलेत का ? असे म्हणून लेखक , गायक,चित्रकार ,नाट्य , वादक , व शिल्पकलेसारख्या असंख्य कलागुणानां कात्री लावतात . मुलानां फक्त दहावी बारावीत वार्षिक अभ्यासात भरपूर मार्क मिळविण्यासाठीच प्रोत्साहीत करत राहतात . त्यानां करिअर करण्याचा धोसरा लावतात . त्यानां पुरते व्यावसायिक वृत्तीचे निर्जिव पुतळे बनवतात .
        पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात कलाकारानां किती मानसन्मान मिळतो याची तेथील लोकानां जाण आलेली आहे . त्यातून ते स्वतःचे करियर शोधतात .पण लांबच्या खेड्यातील कमी पट असलेल्या शाळाच बंद करून त्याच्यां सुविधा बंद करणाऱ्या व शिक्षणाचा दोर कायमचा कापणाऱ्या जाणत्या सरकारनितीपुढे काय बोलावे ?
          निसर्ग आर्ट गॅलरीत चित्र-विक्रीच्या फार मोठ्या उलाढाली होत नाहीत कारण जिल्ह्यात एकही कलादालन नसल्याने कलादृष्टी तरी कशी वाढणार ? चित्रप्रदर्शनेच होत नसतील तर चित्रभान तरी कसे वाढणार? आपण तक्रार तरी कोणाकडे करायची ? 
           मग मला आठवतो आमच्या जिल्ह्यातील मुलखावेगळा राजा . औंधचे राजे बाळासाहेब पंतनिधी . शंभर वर्षांपूर्वी खटाव तालुक्यात यमाईच्या डोंगरावर म्युझियम उभे करणारे राजे . त्यासाठी कलावंताना स्वतः दरबारी तनखा व प्रोत्साहन देऊन चित्रनिर्मिती , शिल्पनिर्मिती करवून कलाप्रसार व्हावा म्हणून अहोरात्र देशपरदेशातून स्वतःच्या पैशातून कलाकृती आणून भवानी संग्रहालय निर्माण करणारे राजे . असे मुलखावेगळे दुरदृष्टी असणारे व स्वतः कलाप्रेमी , कलावंताचे मन जाणणार  राजे आता मिळत नाहीत .
      सातारा जिल्ह्याला दोन दोन राजे आहेत पण चित्रकारानां प्रदर्शनासाठी शासनाचे कायमस्वरूपी एकतरी कलादालन जिल्हयात  कधी निर्माण होईल ?  हे कोणालाच माहीत नाही . स्वातंत्र्य मिळून जिल्हयाने अनेक मुख्यमंत्री दिले पण सातारा जिल्हा कलाकारांसाठी शापितच राहीला . येथील कलाकारानां मुंबई किंवा पुण्यात प्रदर्शन करायला जावे लागते . जिल्ह्यात महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी फक्त तीन दिवसांचे महापर्यटन महोत्सव भरवून हॅलीकॉफ्टर राईड , लेझर शो , टेन्ट हाऊस बांधून , फ्लोटींग बाजारासारखी नाटके करून जनतेचेच कोट्यावधी रुपये वाया घालवून मजा करतात . त्यापेक्षा एखादे छान बालगंधर्वसारखे नाट्यगृह व कलादालन निर्माण केले असते तर जिल्यातील अनेक कलावंतांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळाले असते . अनेक कलावंतानी तेथे सातत्याने प्रदर्शने केली असती . कारण तेथे अनेक नामवंत श्रीमंत उद्योगपतींचे बंगले आहेत . पण खरे प्रश्न सोडवण्यात सरकारी मंडळीना उत्साह नसतो . फक्त आदेशाचे पालन करण्यात अधिकारी धन्यता मानतात . असो .
या पार्श्वभूमीवर निसर्ग आर्ट गॅलरीला भेट देणारे असे अनेक छोटे उत्साही कलावंत पाहिले तर एकतरी मुलगा सुनील काळे व एकतरी मुलगी स्वाती काळे म्हणून भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यानां या प्रदर्शनातून जशी मला सुभाषचंद्र बोंगाळे सरांकडून " चित्रप्रेरणा " मिळाली तशी एकातरी बालकलाकाराला नक्कीच शंभर टक्के  " चित्रप्रेरणा " मिळेल असे मनापासून वाटते . म्हणून छोट्या खेड्यात महिनाभर प्रदर्शन भरविले म्हणून जराही वाईट वाटत नाही .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे (चित्रकार)✍️
9423  966486
स्वाती काळे (चित्रकार)
9158751626

निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोड
मु.पो भोगाव ,
ता.वाई , जि. सातारा ४१२८०३
* प्रदर्शन : दि . 7 मे ते 7 जून
* वेळ : सकाळी१०ते संध्याकाळी ६ .
* प्रवेश मूल्य नाही .

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर

भालचंद्र मोने - एक भन्नाट वाईकर
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         वाई , पाचगणी व महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील  जवळजवळ लागून असलेली महत्वाची ठिकाणे आहेत . पण या तिन्हीही ठिकाणची भौगोलिक रचना , भूप्रदेशाची वैशिष्ठ्ये , वातावरण , हवामान व सर्वात महत्वाचे माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत . वाईमध्ये प्रसिद्ध अशी अनेक मंदिरे , दगडी चिरेबंदी घाट , कृष्णा नदी वाई शहरातून वाहत असल्याने सर्वानां खूप भावते . पाचगणी टेबललॅन्डच्या पठारामूळे व बोर्डींग शाळांमूळे प्रसिद्ध , तिथे अनेक शाळांच्या शिक्षणपद्धतीमूळे कोस्मोपोलीटिशन संस्कृती आहे . महाबळेश्वरला सह्याद्री डोंगरपर्वतांच्या रांगामूळे अनेक पॉईंटस विकसित झाले आहेत व त्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते . विकसित केलेल्या पर्यटन संस्कृतीमुळे एक वेगळा व्यावसायिकपणा येथील माणसांमध्ये मुरला आहे .
           मी ज्यावेळी पाचगणीतून वाईला स्थलांतरीत झालो त्यावेळी नव्या मित्रांच्या शोधात होतो . पण मित्र थोडे असे पटापट मिळतात ? मग वाईची पुस्तके वाचून थोडा अभ्यास करायचा ठरवले . त्यासाठी वाईचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत रांजणे यानां विनंती केली आणि त्यांनी एक अप्रतिम पुस्तक वाचायला दिले त्या पुस्तकाचे नाव होते वाई - कला आणि संस्कृती . त्या पुस्तकावर चित्रकार सुहास बहुलकरांचे चित्र व अप्रतिम प्रस्तावना आहे . त्या पुस्तकाचे लेखक सु .र . देशपांडे यानां भेटलो तर त्यांनी सांगितले तुम्ही आता या पुस्तकाच्या प्रेमात पडलाच आहात पण एका व्यक्तिला लवकरात लवकर भेटलेच पाहीजे आणि त्यांचे नाव आहे भालचंद्र मोने कारण त्याच्यां मदतीमूळेच हे पुस्तक वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे .
             ब्राम्हणशाहीच्या घाटाजवळ उतरताना मोने साहेबांच्या घरी गेलो आणि लोकेशन पाहूनच चकीत झालो . माझे एक स्वप्न होते आपले घर वाईच्या नदीच्या घाटाजवळ असावे मग रोज सकाळी निवांतपणे घाटावर फिरायचे व स्केचिंग करत राहायचे . वाईचे सगळेच घाट किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात . प्रत्येक प्रहारात , प्रत्येक सिझनमध्ये त्याची वेगवेगळी रूपे दिसतात . भालचंद्र मोने यानां प्रत्यक्ष भेटल्यावर खरोखरच त्यांची व घाटाचीही वेगवेगळी रूपे आजमावता आली .
            वाईला स्टेट बँक ऑफ इंडियामधून ते रिटायर्ड झाले . बँकेचा कारभार तसा रुक्ष कर्तव्यदक्षतेचा . सतत आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेला पण भालचंद्र मोने त्रासलेले वाटले नाहीत . कारण त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या होत्या . वाचन , चित्रकला , भटकंती ,संशोधन , अध्यात्म व सर्वात महत्वाचे आपल्या वाई गावाविषयी असलेले नितांत प्रेम . या प्रेमापोटीच त्याच्यां मित्रांनी 'आस्था ' नावाची पर्यावरण मैत्री संस्था स्थापन केली व त्याचे सचिव म्हणून त्यानी स्वतःला कामात झोकून दिले .
            वाईला लक्ष्मणशास्त्री जोशींमूळे विश्वकोष व प्राज्ञपाठशाळा खूप प्रसिद्ध आहेत . त्या संस्थेच्या प्रभावातून अनेक लेखक , कवी , कायकर्ते , संशोधक लेखक निर्माण झालेले आहेत . भालचंद्र मोने त्यापैकी एक . काही दिवसांपूर्वी त्यांनी वाई परिसरातील फोटोग्राफर्स एकत्र करून असंख्य पक्षांची माहीती असलेले सुंदर पुस्तक निर्माण केले होते . त्यासाठी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यानां प्रकाशन सोहळ्याला बोलावले होते . वाईचे कमलाकर भालेकर दुसऱ्या महायुद्धात वॉरंट ऑफीसर होते . त्या महायुद्धात त्यांनी रोजची डायरी लिहीली होती . मोनेंनी ती डायरी मिळवून छान संक्षिप्त पुस्तक लिहीले आहे.
            वसंत व्याख्यानमालेचे अनेक वर्ष श्रोते, कार्यकर्ते ते पदाधिकारी असल्याने भालचंद्र मोने बहुश्रृत व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत . त्यानां अनेक विषयांची व अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधी कंटाळा येत नाही . विश्वकोषाची लायब्ररी , प्राज्ञ पाठशाळा , येथे त्यांचा मुक्त सतत संचार चालू असतो . त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग नेहमी लटकवलेली असते . त्यात एखादे तरी पुस्तक असतेच . मी चित्रकार असल्याने त्यांनी टिळक वाचनालयात चित्रकला विषयाची  कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची तोंडपाठ यादीच दिली कारण त्यांचे आजोबा हरभट मोने चित्रकार होते. त्यानां पारंपारीक कला ते आधुनिक समकालीन कला , मूर्त , अमूर्त कला ,गाजलेले चित्रपट , चित्रकार ,लेखक , जुनी पुस्तके , अध्यात्मातील अनुभव यांचा दांडगा अभ्यास आहे . पण त्याचा वृथा अभिमान नाही . अतिशय साधेपणा व अहंकार विरहीत जीवनशैली यामुळे ते समाधानी असतात . त्यांच्या या स्वभावामुळे मी कधीकधी गप्पा मारायला त्याच्या घरी जातो. एक प्रसंग मात्र कायम लक्षात राहीला आहे तो सांगण्यासारखाच आहे .
            एकदा विजय दिवाण व मी मोनेसाहेबांच्या  घरी मस्त गप्पा मारत होतो . आणि अचानक संध्याकाळ झाल्याने चहाचा विषय निघाला . त्यावेळी स्वतः मोने चहा करायला आत गेले . बाहेर त्यांच्या वयोवृद्ध आई झोपाळ्यावर बसून आमच्याशी बोलत होत्या कारण त्यांचे पाय दुखत होते. मी त्यानां एक सहज प्रश्न विचारला . नागेश मोने व भालचंद्र मोने ही तुमची दोन मुले . एक शाळेचा मुख्याध्यापक व दुसरा बँकेचा अधिकारी आहेत , कर्तृत्ववान आहेत , हुशार आहेत , व्यासंगी आहेत , सर्वानां आवडणारे आहेत पण दोघांनीही लग्न केले नाही . तुम्हाला दोन सुना मिळाल्या असत्या तर तुम्हाला जरा छान विश्रांती मिळाली असती व सुनांवर जरा रुबाबही दाखवता आला असता . तुम्हाला वाईट वाटत नाही का ?
जराही नाही . 
मोनेआजी अगदी ठामपणे म्हणाल्या .
असे कसे ? माझा लगेच प्रतिप्रश्न . जरा सविस्तर सांगा . भारतात जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा आहे . प्रत्येकाला वाटते माझा वंश पुढे चालला पाहीजे , घराण्याचे नाव राहीले पाहीजे . नातू हवा , घर कसे गजबजलेले हवे . लग्न करून मुलानां जन्म देणे हे तर प्रत्येक भारतीयाला आद्य कर्तव्य वाटते मग तुमची विचारसरणी अशी वेगळी कशी ?
         मोने आजीच्यां चेहऱ्यावर मंद स्मितहास्य होते . तुम्ही हा प्रश्न मला विचारणार याची मला खात्री होती . पण खरं सांगू आता दोघेही साठीच्या आसपास आहेत त्यामूळे आता लग्न हा  विषय पूर्णपणे संपला . पण तरुण होते त्यावेळी फार पूर्वी मी त्यांच्या लग्नाचा विषय काढला होता . 
दोघेही विद्यार्थीप्रिय , अभ्यासू , वाचनप्रिय व हुशार आहेत . आनंदी आहेत , छान जगत आहेत , मग माझ्या स्वार्थासाठी त्यांच्या जीवनात मी का खोडा घालू ? हे जीवन प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार , आवडीनुसार , सवडीनुसार , मनसोक्तपणे जगता आले पाहीजे . जीवनातील प्रत्येक दिवस एक मोठा सणाचा दिवस असल्यासारखा उत्सवपूर्ण जगता आला पाहीजे . थोडक्यात स्वमर्जीप्रमाणे  दिवस  जगता आला पाहीजे . कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान न करता , कोणाचाही प्रभाव न पाडून घेता , जीवन स्वच्छपणे जगता आले पाहीजे . माझी दोन्ही मुले आनंदी आहेत . त्यांच्या कार्यामूळे हजारो विद्यार्थी माणसे आनंदी होत आहेत आणि हा आनंद मला रोज मिळतो . मग वाईट कशाला वाटेल ?
मी हे उत्तर ऐकले व छानपणे मस्तक त्यांच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला .
दिव्यत्वाची जेथे प्रचिती ॥
तेथे कर माझी जुळती ॥ त्यादिवशी अशीच माझी भावावस्था झाली .
          लोकमान्य टिळक व वाईचा एक वेगळा ऋणानुबंध होता . अठ्ठावीस वाईकरांनी सांगितलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी , पत्रव्यवहार , टिळकांच्या वाई भेटीचे किस्से , छायाचित्रे यांचा मागोवा भालचंद्र मोने यांनी शोधून अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले आहे . जूना इतिहास पुराव्यांसह शोधून काढणे, हजारो पुस्तकांतून अभ्यास करून त्यांचे वाचन करून निवडक  माहिती संकलन करणे , त्याची वर्गवारी करून पुस्तकासाठी दस्ताऐवज तयार करणे , अनेकांच्या घरी जावून माहिती गोळा करणे , संदर्भ गोळा करणे हे एखाद्या मधमाशीसारखे न कंटाळता अविरत कष्टाचे काम असते आणि नेमके हेच काम भालचंद्र मोने करतात . अशा कामासाठी जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो तरच कार्य सफल होते व इतके सर्व करून मोने प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात . 
           हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तीनचार दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता . ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमंत्रण देण्यासंदर्भात . त्याचदिवशी माझा वर्गमित्र श्री .सुरेश वरगंटीवार याने लोकमान्यांचे व्यक्तीचित्र विविध माध्यमातून साकारून एक वेगळे प्रदर्शन वाईमध्ये भरवायचे ठरवले आहे . त्याचे उद्‌घाटन माझ्या हस्ते करावयाचे त्यांनी नक्की केले होते . मोठ्ठ व्हायचे कॅन्सल केले असले तरी मी मित्रप्रेमामुळे त्यानां नकार देऊ शकलो नाही .
              तर भेटू प्रत्यक्ष येत्या शनीवारी दि .२६ ऑगस्टला सकाळी 10 वाजता चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनाला व संध्याकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभावेळी . अध्यक्ष श्री . अनिल जोशी आहेत . प्रमुख पाहुणे श्री.दिपक टिळक येणार आहेत .
सर्वानां सस्नेह निमंत्रण !🙏🙏

सुनील काळे
9423966486

दत्त दिगंबर पतसंस्थेच्या विरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा - विश्वास बर्गे

दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा विश्वास बर्गे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        काल वाईमध्ये वसंतमाला व्याख्यानमालेतील 12 व्या पुष्पाचे व्याखाते होते श्री . समीर नेसरीकर , आणि त्यांचा विषय होता "आजच्या काळातील अर्थभान " .
       आपण सगळेच जाणतो की मनुष्य छोटा असो वा मोठा प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . कष्टाने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करायचे असते .कधीकधी आपण जसे जीवन जगायचे ठरवलेले असते , जी स्वप्ने पाहीलेली असतात त्याच्या बरोबर विरुद्ध अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात आणि ठरवलेले सुंदर जगण्याचे स्वप्न बेचिराख होते . काही जण कसेबसे सावरतात तर काही जण जीवनाशी तडजोड करून कायमची माघार स्विकारतात . अयशस्वी होतात .
         दहा वर्षांपूर्वी पाचगणीवरून वाईला कायमचे राहायला आलो . वाई पाचगणी अंतर जरी जास्त नसले तरी येथे सांस्कृतिक विषमता खूप आहे त्यामुळे फार जणांशी ओळखी घरोब्याचे सबंध नव्हते . त्यामुळे वाई परिसर व माणसे जरा नव्यानेच समजून घेत होतो .
         तयार घर घ्यायचे असे ठरवले होते तर एक भयानक अनुभव माझ्या पदरात पडला मग शेवटी घर बांधायला लागले . आता घर बांधायचे तर दोन वर्षांचा काळ जाणार होता . भाड्याच्या घरात रोख पैसे ठेवणे सोपे व सुरक्षितही नव्हते . कॉन्ट्रॅक्टरचे कामगार , त्यांची रोजची हजेरी व विटा ,वाळू , सिमेंट , यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला रोख द्यावे लागत होते . म्हणून मी काही अमाऊंट पाचगणीच्या बँकेत ठेवण्यापेक्षा दत्तदिगंबर पतसंस्थेच्या वाईच्या मिलिंद खामकर यांच्या जागेत सुरु असलेल्या शाखेत ठेवायला गेलो ,तेथे संस्थेत योगिता चौधरी या मेणवली गावच्या ओळखीच्या बाई काम करत होत्या . त्या म्हणाल्या काही काळजी करू नका . मी तुम्हाला ओळखते व मी येथे वाईतच राहते .
          घर बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार होता काही दिवसांचाच तर प्रश्न होता म्हणून तेथे चार लाख रुपयांची मासिक ठेव गुंतवणूक केली . मला दर महिन्याला चार हजार रुपये मिळत होते . इकडे इमारतीच्या बांधकामाचा स्पीडही फास्ट होता . अगदी शेवटच्या थोड्याच दिवसात एक दिवस पतसंस्थेत गेलो तर शटर डाऊन दिसले .
           योगिता चौधरी मॅडमला फोन केला तर म्हणाल्या मुख्य बाजारात पहिल्या मजल्यावर मोठे ऑफीस घेतले आहे तेथे फर्निचरचे काम सुरु आहे . मी आता शाखाप्रमुख असणार आहे . फर्निचरचे काम संपले की पतसंस्था पुन्हा सुरु होईल . काळजी करू नका . मग प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नंतर सतत पाहणी करतच राहीलो . कारण फर्निचरचे काम संपतच नव्हते . इकडे घराचे बांधकाम संपून रंगकाम सुरु झाले होते .  शिफ्टींगमध्ये खूप व्यस्त झालो होतो . शेवटी कलरकामाचे पैसे द्यायचे म्हणून एक दिवस पतसंस्थेत गेलो तर कळाले शाखा कधीच सुरु होणार नाही .
          योगिता चौधरी मॅडम म्हणाल्या मलाच फसवले , माझाच पगार दिला नाही . ज्यांच्या विश्वासावर ठेव ठेवली त्यांनी कळवलेच नाही . शेवटी एकप्रकारे दगा दिला . मग पळापळी सुरु झाली . त्यांनी विलास शिंदे नावाच्या व्यवस्थापकाची भेट करून दिली . त्यांनी सहा महिन्यात पूर्ण रक्कम मिळेल असा पोलीसांसमोर जबाब दिला .
        आयुष्यात पहिल्यांदा कोरेगावला गेलो . पो.स्टेशनला तक्रार करायला गेलो तर म्हणाले घटना वाईत घडली मग वाईत जावा . वाई पो .स्टेशनला गेलो तर म्हणाले आर्थिक गुन्हे शाखा सातारा व अंतर्गत दुय्यम सहकारी निबंधकाकडे तक्रार करा . तेथे गेल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अर्ज करा तेथे गेलो तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज करा सगळीकडे नुसती टोलवाटोलवी सुरु झाली . मग वाई , सातारा , कोरेगाव अशा वाऱ्या सुरु झाल्या . अर्जांवर वर अर्ज सुरु झाले व चार लाख बुडवून घेतल्याचे दुःख व 
" अर्थभान '' पदरात पडले .
            असा संघर्ष सुरु असताना एक दिवस विश्वास बर्गे यांचा फोन आला . तुम्ही सातारा येथे भेटायला या , माझेही पैसे बुडाले आहेत आपण एकत्र प्रयत्न करू म्हणाले . मग पहिल्यांदा त्यानां भेटलो आणि आम्ही दोघेही समदुःखी आहोत याची ओळख पटली .
       विश्वास बर्गे मुंबईला माझगावच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत पीटीचे शिक्षक होते . आयुष्यभर कष्ट करून 36 वर्षांची पेन्शन घेऊन आता कोरेगावला मूळ गावी राहून म्हातारपण निवांत जगायचे त्यांचे स्वप्न होते . एकूलती एक मुलगी सांगलीला लग्न झाल्याने दोघे पती पत्नी कोरेगावला एकटेच राहत होते . तेथे दत्त दिगंबर शाखेची मोती चौकात मुख्य शाखा होती . आयुष्यभर कमावलेले अकरा लाखाची ठेव त्यांनी पतसंस्थेत गुंतवली . त्यांनी ठेव ठेवली म्हणून त्यांच्या सर्व भावांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले . एकूण चाळीस लाखापर्यंत ही रक्कम ठेवली गेली होती . आणि अचानक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र हिरालाल गांधी व त्यांचे सर्व संचालक सदस्य एकूण 32 कोटी रुपयांचा अपहार करून फरारी झाले .
        विश्वास बर्गे एक वयस्कर गृहस्थ असले तरी मुंबईत राहात होते . अभ्यासू व्यक्तिमत्व होते .धडाडीने त्यांनी सर्व ठिकाणी माझ्यासारखेच असंख्य अर्ज दिले होते . शेवटी कोरेगाव कोर्टात अर्ज करून त्यांनी फरारी सदस्यांचे पितळ उघडे पाडले . आरोपी कोरेगावचे रहिवासी होते पण पोलीसांनी त्यानां अटक केली नाही . कोरेगाव कोर्टाने त्यांनां सर्वांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला . पण लढाई इतकी सोपी नव्हती . आरोपींनी सातारा येथे अटक होऊ नये म्हणून अर्ज केला . तो फेटाळला म्हणुन मुंबई हायकोर्टात अपिल केले . मुंबई हायकोर्टाने अपिल फेटाळले म्हणून दिल्लीला सुप्रीम कोर्टात अपिल केले . या सर्व केसेस एकटे जीवाचे रान करून हाताळण्यामध्ये मुख्य योध्दा होते कोरेगावचे विश्वास बर्गे .
           या लढाई दरम्यान सातारचे मनसेचे संदीप मोझर यांनी ही संस्था चालवायला घेतल्याचे कळाले . त्यांनी या संस्थेचे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था असे नामकरण केले .मग त्यांच्या भारदस्त " किल्ला " नावाच्या बंगल्यात भेटायला गेलो . तेथे बरीच बाचाबाची ,भांडाभाडी , उलटेपालटे प्रश्न-उत्तरे झाली शेवटी त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यानां भेटायला शिवाजी पार्क मुंबईला गेलो . तेथे राजगडाचा अजब कारभाराची झलक पाहायला मिळाली . कार्यकर्त्यांनी त्यांना आता भेटता येणार नाही असे चांगल्या मराठी भाषेत सांगितले . एक अर्ज द्यायला सांगितले . त्याचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे . त्यांच्या ऑफीसमध्ये हसणाऱ्या राज साहेबांचे एक सुंदर पेन्सिल स्केच चित्रकार वासुदेव कामत सरांनी केले आहे . ते माझे अर्थभान पाहून मला हसत आहेत असा मला भास झाला . तेथून आल्यावर आणखी फोनाफोनी टोलवाटोलवी झाली . राजसाहेबांची भेट तर झाली नाही पण मुंबईचा प्रवास व जाणेयेणे भारी पडले. मग तेथूनच मोझरानां फोन केला व काही दिवसानंतर त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक दिला . थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .
          सुप्रीम कोर्टाने आरोपींना अटक करून सर्वांचे पैसे परत द्यावेत असा आदेश दिला परंतू चतूर पोलीस सांगत होते आरोपी सापडत नाहीत . कोरेगावात बिनधास्तपणे फिरणाऱ्या या मंडळीना सगळेजण बघत होते पण फक्त पोलीसानां ते दिसत नव्हते .
        मी कोरेगावला ,सातारला एसपी ऑफीस व वाईत सर्व ठिकाणी अर्ज केले होते त्याची परिणीती म्हणजे एक दिवस मला वाई पो .स्टेशन येथून फोन आला म्हणाले मी यादव पोलीस बोलतोय , तुमचे मुख्य आरोपी राजेन्द्र हिरालाल गांधी येथे आले आहेत . तेथे गेलो तर गांधीसाहेब निवांत गप्पा मारत बसले होते . यादवांना मी म्हणालो यानां ताबडतोब अटक करा हे फरारी आहेत .तर ते हसत म्हणाले मी त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला आहे .तुमचे सगळेच साडेतीन लाख रुपये  ते द्यायला तयार आहेत तुम्ही काळजी करू नका . मग वाईचे पो. प्रमुख आनंद खोबरे यांना भेटलो त्यानां मुंबई हायकोर्टाची प्रत दिली व अटक करा असे सांगितले तर ते म्हणाले त्यांना अटक करता येणार नाही कारण तुमचे पैसे ते देत आहेत त्यांनी लेखी जबाबाचे आश्वासन दिले . त्या लेखी आश्वासनाची प्रत घेऊन मी सगळीकडे फिरलो व फिरतच राहीलो . सद रक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे काय ते कळाले .
              फॉर्चुनर या मोठ्या अलिशान गाडीत फिरणारे राजेन्द्र गांधी एक लबाड , मवाली माणूस आहेत .  त्यांनी वाईच्या मिलिंद खामकरांच्या घरी मला नेले फुकटचे चहापाणी करून मी आता यांनां सर्व रक्कम देणार असल्याचे सांगितले. मिलींद खामकरांनी लगेच  साक्षीदार आहे असा होकार दिला .
          दुसऱ्यादिवशी सकाळी १० वाजताच कोरेगावला गेलो . तेथे ऑफिसमध्ये राजेन्द्र गांधी आलेच नाहीत . शेवटी परत बाचाबाची , भांडणे मग त्यांच्या घरातून पन्नास हजाराचा चेक आला . चार लाखापैकी एक लाख मिळाले . 
           उरलेल्या तीन लाखांसाठी आजपर्यंत वाई पो .स्टेशन ,कोरेगाव पो . स्टेशन , मा . मुख्य अधिक्षक मुख्यालय सातारा , आर्थिक गुन्हे शाखा , ग्रामविकास मंत्री , सहकार मंत्री , खासदार उदयनराजे भोसले , आमदार मकरंद पाटील , पो. उपविभागीय अधिकारी वाई , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूल मंत्री , कोल्हापूर परिक्षेत्र पो .प्रमुख , सभापती विधानपरिषद , जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सहकारी संस्था , अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी  व अर्ज करून थकलो . 
            2020 मध्ये माझ्या घराच्या पाण्याच्या टाकीवरून मी पडलो डाव्या पायाचे मुख्य हाड तुटले हॉस्पीटलचा खर्च एक लाख पन्नास हजार रुपये होता . करोनाच्या काळात पुण्यात हॉस्पीटलमध्ये ॲडमिट होतो खर्च दोन लाख होता त्यावेळी राजेन्द्र गांधी यांना अनेक फोन केले , गयावया करून माझ्याच पैशांची मागणी केली तर म्हणाले मी फक्त पाचशे रुपये पाठवतो . तीन लाखाची ठेव व पाचशे रुपये देत असल्याचे दाखवून उपकारकर्त्याची भावना ठेऊन बोलत होते . अशी माणसे वृत्तीने पोहचलेली ,निलाजरी व नालायक असतात . 
           मी पूर्णवेळ चित्रकार आहे .चित्रकारांना एक तर नियमित दरमहिना उत्पन्न नसते . कित्येक महिने चित्र काढायची व नंतर मुंबईला जाऊन चित्रप्रदर्शन करायचे . त्यातून मिळणाऱ्या मिळकतीत पुढचे चारपाच वर्ष बचत करत  जगायचे . अशावेळी तीन लाख ही डोंगराएवढी अमाऊंट असते . अशावेळी ती चित्रे डोळ्यापुढे येतात ज्यातून पैसे निर्माण झाले . सगळी मेहनत वाया गेल्याचे फिलींग जाम त्रासदायक असते . संघर्ष त्रासदायक होतो .
        या सगळ्या संघर्षात कोरेगावात त्याच्यांविरुद्ध एक माणूस खूप जिद्दीने लढत होता आणि तो म्हणजे श्री .विश्वास बर्गे .
       वयाच्या सत्तरीत असणाऱ्या या माणसाला मधुमेह होता . वजन जास्त असल्याने चालता येत नव्हते . वेदना होत होत्या .पायाची , हाताची इतर अनेक दुखणी अंगावर घेऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले . आरोपीनां रितसर अटक झाली थोड्याच दिवसात न्यायालयात जामीन मिळवून मंडळी परत बिनधास्त झाली . अधूनमधून आम्ही दोघे भेटायचो . आपल्या देशात न्याय कधी मिळणार ? पतसंस्था , स्थानिक सहकारी संस्था , त्यांचे अधिकारी काय करतात ? पतसंस्थावर निर्बंध का नसतात ? मुळात पतसंस्था कशासाठी काढल्या ? त्यानां जबाबदार कोण ? त्याच्यां कारभारावर अंकूश का नाही ? सरकारच्या या अजब कारभाराची नेहमी चर्चा करायचो . आपण हरायचे नाही , शेवटपर्यंत लढत राहायचे , या सर्व प्रतिकूल कठिण परिस्थितीला सामोरे जायचे असे ते सतत म्हणत . सातत्याने कोठेतरी अर्ज करायचे . सगळ्या अधिकाऱ्यानां भेटत राहायचे . त्यांच्या कामकाजात काय प्रगती झाली त्याचे मेसेजेस व फोन करत असायचे .
        वाईच्या लो.टिळक ग्रंथालयात माझे व्हॅली आणि फ्लॉवर्स या शीषर्काखाली सुंदर प्रदर्शन सुरु आहे . त्या प्रदर्शनाच्या तयारीत मी पूर्ण मग्न झालो होतो .
           माझ्या प्रदर्शनाची व आजचे व्याखाते समीर नेसरीकर यांचे 
"आजचे अर्थभान " ह्या व्याखानाची माहिती देण्यासाठी विश्वास बर्गे यांना मी मेसेज पाठवत होतो तर  प्रोफाईलवर त्यांचा फोटो होता व त्याखाली मेसेज होता 

 " भावपूर्ण श्रध्दाजंली "

          आजचे व्याखान कायम लक्षात राहील . तुमच्याकडे कमावलेल्या पैशांचे गुंतवणूकीचे अर्थभान नसेल तर आयुष्यात मनमुराद स्वच्छन्दीपणे जगण्याची गोची होती . आता ज्यावेळी मी घरातील दत्तदिंगबर या पतसंस्थेच्या आर्थिक फसवणूकीची फाईल उघडतो , त्यातील असंख्यं अर्ज पाहतो , त्या मुदत ठेवींच्या मूळ छोट्या आकारातील तीन लाखाच्या तीन कागदी पावत्या पाहतो त्यावेळी मी निराश होतो . मला ती रक्कम मिळविण्यासाठी कोणापुढे दाद मागावी हे कळत नाही .     
        लोकसभेच्या इलेक्शनसाठी मतदान करताना माझे हात थरथरतात . ही काळी शाई लावून आपण जीवनातील आनंदाला डाग लावून घेतल्याचे शिक्कामोर्तब होते . कोणी तरी मेसेज त्या काळात पाठवला होता " डाग अच्छे होते है " .
       या देशात हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये मजेत ,निवांत ,आनंदाने जगत असतो . ललीत मोदी परदेशात चैन करत असतो . कित्येक दिवस झाले या महाभागानां अटक होत नाही . कायद्याचा किस काढला जातो . त्याचीच प्रेरणा हे दत्त दिगंबर पतसंस्थेसारख्या काही सहकारी संस्था घेत असतात . त्यानां अनेक अज्ञात हातांचा आधार असतो त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही . सर्वसामान्य भाजीवाले , फळविक्रेते , छोट्या पानपट्टीसारख्या दुकानदारांनी रोज साठवलेली छोटी ठेव या पतसंस्थेत जमा केली होती . पण गरीबांचे , कष्टकऱ्यांचे कष्टाने घाम गाळून जमवलेले पैसे हे संचालक गडप करतात . कित्येक कोटी रुपयांनां चुना लावून मजेत जगत असतात . अलिशान फॉर्चुनरमधून फिरत असतात . सक्षम पोलीस यंत्रणा , मोठमोठे राजकीय नेते , सामाजिक पुढारी , समाजसेवक त्यांच्यापुढे नांगी टाकतात ,त्यावेळी आपली भारताची लोकशाही काळ्या रंगाची चादर लपेटून गुपचूप अंधारात बसलेली आहे असे मला वाटते . 
      आता चार जून रोजी निवडणूकीचा निकाल लागेल नवीन खासदार निवडून येतील  दिल्लीला जातील एकमेकांच्या विरोधकांवर टिकास्त्र करून लोकशाहीचा जयजयकार करतील . सामान्य माणसांच्या परिस्थितीत काय फरक पडेल ? कधी कधी वाटते न्याय मिळविण्याच्या प्रोसेस इतक्या कॉम्प्लीकेटेट ( गुंतागुंतीच्या)केलेल्या आहेत की न्याय मिळेपर्यंत माझ्या फोटोलाही " भावपूर्ण श्रध्दांजली " म्हणत हार घालावा लागेल की काय ?असे वाटते .
अशा लढाईत विश्वास बर्गे सारखा एक खरा सच्चा योध्दा धारातिर्थी पडला हे पाहून आठवणीने डोळे पाणावले . बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे बर्गे सर लढा देत  कायमचे गेले .आता त्यांची एकटी अशिक्षित पत्नी हा लढा कसा पुढे चालू ठेवणार ? तिच्या जगण्याचे भवितव्य काय ? कोण तिला सावरणार ? एकंदर पुढे सगळं अवघड आहे . तिच्यापुढे अंधारयात्रेचा मोठा प्रवास आहे . हा अवघड प्रवास सर्वानां कळावा , त्यांनी यातून काही बोध घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच 🙏🙏

आता पैसे बुडविणारे राजेन्द्र गांधी व संचालक मंडळ फटाके फोडून मोठ्याने डिजे वाजवत असतील कारण आता केसेस लढणारा व बाजीप्रभू सारखा लढणारा लढवय्या बर्गे सर गेले . आता त्यांची मजाच मजा . आपल्याला कोणी वाली नाही हेच खरे . 🙏🙏

जय महाराष्ट्र ,🙏 जय भारत , 🙏
जय लोकशाही 🙏व जय आर्थिक अर्थभान !
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे✍️
9423966486

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दूरदेशीची मैत्री = पार्ट 2

 दूरदेशीची मैत्री - पार्ट 2
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
          24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यानां रिटायर्डमेंट घ्यावीच लागते आपणही घ्यावी . त्यादिवशी मी माझी डायरी घेऊन पाचगणीला गेलो रिटायर्डमेंटनंतर काय काय करता येईल हे ठरवायला . आता मस्त आराम करायचा . भरपूर तकतक केली आता निवांत जगायचे सगळी कमर्शियल कामे बंद करायची आपल्या स्वतःसाठी जगायचे असे ठरवून लिहायला सुरुवात केली तर आमचा कल्याणचा मित्र नंदीश सोनगिरे व त्याची डॉक्टर बायको एक छान केक घेऊन वाढदिवशी हजर झाले . त्याच दिवशी पंढरपूरचे अंतर्नाद डिजिटल मासिकाचे संपादक डॉ.अनिल जोशी व त्यांची मिसेस शुंभागी जोशी त्यांचा बदलापूरचा मित्र मोठा पुष्पगुच्छ व काही भेटवस्तू व स्वतः बनवलेले काही खाण्याचे पदार्थ घेऊन पाचगणीला आले . एकंदर तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता . आम्ही सर्वांनी माझ्या आवडत्या पांगारी गावची व्हॅली आणि पुस्तकाच्या गावाला भेट दिली . आपल्या आवडत्या मित्रांसोबत भेट होणे व भरपूर गप्पा मारणे ही अनोखी मेजवानी असते . आपले काही मित्र व नातेवाईकदेखील आपल्याला पूर्णपणे विसरतात .काहीतरी खुस्पट फालतू विचार डोक्यात ठेऊन आपल्याशी वैर घेतात , टाळतात , भांडतात व टिका करत राहतात अशा सर्व त्रासदायक नातेसंबंधानां मी मित्रानां मनातूनच हद्दपार केले आहे . कायमचा नारळ दिला आहे कारण मी आनंदाने जगण्याचे ठरविले आहे व आता खरोखर मजेत जगतो .
            अर्थात मित्र भरपूर असले तरी सगळेच मित्र हे मैत्र प्रामाणिक टिकवतात असे नसते . मित्रांचेही अनेक प्रकार असतात व गरजेप्रमाणे त्यांचे मित्रत्व अधूनमधून जागृत होते याचा मलाही चांगला अनुभव येत असतो . पण सगळे एकसारखे व चांगलेच मित्र भेटावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते . व्यक्ती तितक्या प्रकृति याची जाणीव ठेवावी लागते . मित्र जसे असतात तसे स्विकारत गेले की मग त्रास होत नाही . हे जीवन नानाविध स्वभावाच्या मित्रांनी भरलेले आहे व त्यात खूप व्हरायटी आहे म्हणून मलाही ते फार मजेशीर व रोमांचक वाटते .
              मी पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात 85 ते 90 च्या काळात चार वर्ष शिकायला होतो . त्यावेळी एक वर्ष विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या वसतिगृहात राहत होतो . त्यावेळी  कला महाविद्यालयात जाताना चालत जायचो त्यावेळी काही मित्र सायकलवर जायचे . मला डबलसीट घ्यावे लागेल म्हणून दुसरीकडे बघत वेगाने शेजारून निघून जायचे . आज त्याच रस्त्यावरून चारचाकी गाडीने जाताना त्यांच्या कधीतरी आठवणी येतात . आताही त्यातील काही मित्र  लक्षात आहेत ,पण आपण त्यांच्या वाईट गोष्टी डोक्यात ठेवत बसलो की त्रास होतो त्यामुळे विसरून नव्याने प्रवास करत राहायचे . त्या वसतिगृहात माझ्याच कॉलेजला शिकणारा एक मित्र होता . तो अनेक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे असायचा आजही तो पुढेच आहे . त्याची एक मैत्रिण होती . त्याने हॉस्टेलवर एक ' बिन माणसाचा हात ' नावाचे नाटक बसवले होते त्या नाटकात एक पात्र होते सातारा  जिल्ह्यातील एक गावरान ऊसाचा रस विकणारा गुऱ्हाळ चालवणारा माणूस . आणि ह्या पात्रात मी अप्रतिम अभिनय केला म्हणून बेस्ट ॲक्टरचे प्राईजही मिळाले होते . त्यामुळे तो मित्र कायम लक्षात राहीला होता .
             दोन एक वर्षापूर्वी एकदा कॉलेजच्या जवळ आर्ट मटेरियल घ्यायला गेलो होतो त्यावेळी दुपारी जानकी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो . त्यावेळी तीस वर्षांनंतर अचानक हा आमचा फेसबुकवर सुप्रसिद्ध असणारा मित्र प्रवेश करताना समोरच्याच टेबलावर बसलेला दिसला . आमचा मित्रत्वाचा सातारी बाणा लगेच जागृत झाला . त्याच्याशी हात मिळवला व एकत्र बसुन भरपूर गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसायला गेलो तर या मित्राने हातात त्याचे व्हिजिटींग कार्ड दिले व याठिकाणी मी एका बिझनेस मिटींगमध्ये आहे त्यामुळे अपॉईमेंट घेऊन ऑफीसमध्ये यावे अशी प्रेमळ विनंती केली . मी त्याला लगेच मनापासून सॉरी म्हणालो . नंतर दूर त्याला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन बसलो . थोडा स्वतःचाच रागही आला . कारण मी आपल्या मित्रत्वाच्या धुंदीत असतो पण समोरचा त्याच मित्रत्वाच्या धुंदीत असेल असे नसते , तो खूप वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या विश्वात जगत असू शकतो याची जाणीव ठेवली पाहीजे हे मी नव्याने शिकलो .त्यामुळे मैत्र जपताना मी आता फार काळजी घेतो . त्या मित्राच्या ऑफीसमध्ये परत जाण्याची माझी इच्छा त्याचदिवशी संपली त्या कार्डावरचा पत्ताही मी पाहीला नाही व आता त्या मित्राची तसे वागणूक दिल्याबद्दल तक्रारही नाही . आपण आर्थिक अडचणीत किंवा वाईट अवस्थेत किंवा अप्रसिद्ध असताना जर मित्र टाळत असतील तर ते तुमचे कधीच मित्र नव्हते व यापुढेही असणार नाहीत .

पण काहीजण सर्व परिस्थितीत आपल्याला जपणारी असतात . अशी माणसे खास व्यक्तिमत्वाची असतात .वेगळीच असतात . ती तुमच्या सर्व परिस्थितीत सतत सोबत असतात . सारखीच प्रेमाने वागत असतात अशा मित्रानां मी नेहमीच सॅल्यूट करतो .

               इल्झे विगॅन्ड ही आमची जर्मनीची मैत्रीण मात्र आगळीवेगळीच आहे . ती आता 95 वर्षाची आहे . गेली अठ्ठावीस वर्ष ती संपर्कात आहे . तिने व मी आमचे मैत्रभाव छानपणे जपले आहे . करोनानंतर गेली चारपाच वर्ष ती भारतात आली नव्हती . तीची फार जबरदस्त इच्छा होती की आम्ही एकदा तरी जर्मनीला भेट द्यावी . त्यासाठी श्रीमंत होण्याचा आम्हीही खूप प्रयत्न केला . दोन प्रदर्शने नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत केली . व्हिसा मिळविण्यासाठी सीए कडे गेलो, इन्कमटॅक्स फाईल बनवली , पासपोर्ट काढला , उत्पन्नाचे दाखले मिळवले ,
 ट्रॅव्हलएजंटकडे संपर्क केले पण विमान प्रवासाच्या यंत्रणा फारच कडक आहेत . सतत नव्या गोष्टी मागत असत . मग मेडीकल इन्शुरन्स मागितला . फिटनेस सर्टीफिकेट , उत्पन्नाचे मार्ग विचारले . तेथे किती दिवस राहणार आहे ? कोणाकडे राहणार ? त्यांचे सर्टिफाईड  पत्र आहे का ? रिटर्न तिकीट काढले का ? ज्या कोणाकडे राहणार त्यांचे इन्कमप्रुफ ? तेथे फिरण्याचे पैसे आहेत का ? किती आहेत ? माझ्यासारख्या फ्रिलान्स चित्रकार लोकांना उत्पन्नाचे फिक्स सोर्स कोठून असणार ? मग मी कंटाळलो . नाद सोडून दिला . गडया आपला गाव बरा असे ठरवून जर्मनीचे स्वप्न पहाणे बंद केले . काही स्वप्ने परवडणारी नसतात हे लवकर लक्षात आले  व इल्झेला कळवले आम्हाला जर्मनीला येणे शक्य नाही व विषय संपवला .
              मग इल्सेचा मेसेज आला जर तुम्ही मला भेटायला येत नाही तर मग मी येते . वय वर्ष पंच्च्यान्नव , हातात आता काठी आली आहे . शरीर थकले आहे , एका गुढग्याचे ऑपरेशन झाले आहे . पण उत्साह मात्र तोच आहे . जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा निरागस दृष्टीकोन लहान मुलासारखा ओसांडून वहात आहे . मैत्रीची ओढ तशीच आहे . मी तिला सांगितले आता शरीर थकले आहे एकटे येण्याची रिस्क घेऊ नको सोबत कोणीही नसल्याने कधीही काहीही होऊ शकते . पण इल्झे ऐकणारी थोडी आहे ? तीचे मैत्र आणि तिचे जगणेही आहेच वेगळे.
           एक दिवस कॉल आला . मी महाबळेश्वरला आली आहे . हॉटेल बुकींग करून अर्धा महाबळेश्वर फिरून झाले आहे . तुझ्याकडे उदया सोमवारी येणार आहे . मी एसटी ने प्रवास करते तुझा पत्ता सांग मग भेटायला येते .कधी येऊ ?
           अशा हट्टी मैत्रिणीपुढे काहीच बोलता येत नाही . मग वाई बस स्टॉपवर इल्झे आली . तिने एसटी स्टॅन्डवरच जादूची झप्पी दिली . सगळे प्रवासी बघतच राहीले . मग गेली तीन चार दिवस मेणवली, वाईचा परिसर फिरत राहीलो . प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोलणे , वॉचमन , कातकरी मुले , श्रीमंत , गरीब , जातीभेद न करता सर्वांच्यासोबत फोटो काढणे , घाटावर छोटे स्केच करणे , आवडीचे पदार्थ खात रहाणे , गाणी ऐकणे , आणि तरुणाईला लाजवेल त्या उत्साहाने जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे हे पाहीले की खरोखर हे जीवन सुंदर आहे हे पटते .
       मी तर अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्डमेंट घेतली पण इल्झे मात्र पंच्च्यानवव्या वर्षीही तितकीच ॲक्टीव्ह आहे . 
       जीवनातला हा उत्साह कसा टिकवायचा असे विचारले तर म्हणते तुम्ही भारतीय पुढील भविष्याचा विचार करत बसता मी मात्र फक्त आज आणि आता एवढया दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत . येणारा प्रत्येक क्षण मस्त मजेत जगायचा . पुढे जे काही होईल ते होईल . मृत्यू म्हणजे पण एक अनोळखी मित्रच असणार आहे त्याला काय घाबरायचे ?  त्याच्याशीही मैत्री करायची . मस्त जगायचे व मस्तीतच एक दिवस मरायचे .

सुनील काळे✍️
9423966486

दूरदेशीची मैत्री -पार्ट 1
https://www.facebook.com/share/p/u2XDxctcaz7DjFFR/

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार : एस .निंबाळकर

कोल्हापूरचे निसर्गचित्रकार - एस. निंबाळकर
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
           आपण कोणत्या गावात , कोणत्या जिल्हयात , कोणत्या घरात , कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते . निसर्गाने किंवा सृष्टीकर्त्या विधात्याने तो चॉईस माणसाला दिला नाही . पण समजा तसा चॉईस मला मिळाला असता अशी ज्यावेळी मी मनातल्या मनात कल्पना करतो त्यावेळी एक जिल्हा मला हमखास आवडतो त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर . कोल्हापूर खरं सांगायचे तर सर्वार्थाने कलापूर आहे . अशा या कलापूरात अपघाताने अचानकपणे मी कलाशिक्षण घेण्यासाठी सन 1985 मध्ये एक वर्ष राहीलो . ते एक वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे , जाणीवा विकसित करणारे , जीवनाची जडणघडण करणारे व माणूस म्हणून जगताना माणुसकी शिकवणारे ठरले . म्हणून आजही कोल्हापूरला जायचे काही कारण निघाले की मी लगेच एका पायावर तयार असतो .
            मी 1984 साली बारावी सायन्स शिकलो होतो पण यापुढे आपल्याला चित्रकार म्हणून जगायचे असे माझ्या मनाने फार गंभीरपणे ठरवले . त्यावर्षी तीन ठिकाणी मी प्रवेशअर्ज भरले होते . पुणे ,मुंबई व कोल्हापूराचे कलानिकेतन कॉलेज . इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड व दहावीला फर्स्टक्लास मिळाला होता  त्यामुळे कोणत्याही कलामहाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार याची खात्री होती . पण चित्रकला क्षेत्रात घुसतानाच दुर्दैवाचे फेरे सुरु झाले . त्यावेळी बाबुराव सडवेलकर जेजे स्कूलचे डीन होते . त्यावर्षी त्यांनी एक नवा फतवा काढला की 12वी पास असणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला बी.ए , बीएससी , लॉ , किंवा इतर कोणत्याही शाखेत सहज जाता येईल . त्यामुळे यावर्षी प्रथम दहावीच्याच मुलामुलींना प्रवेश मिळणार , त्यापेक्षा जास्त शिकलेल्या इतरानां कोणालाही प्रवेश मिळणार नाही . त्यामुळे माझी चांगलीच गोची झाली . पाचगणीपासून पुणे जवळ होते त्यामुळे पुण्यात मला प्रवेश हवा होता . मुंबई तर खूपच दूर वाटायची त्यावेळी .
             पुण्यात एक महिना धडपडलो व खूप निराश झालो .फौडेंशन हा बेसिक कोर्स असतो नंतर पुन्हा वेगळ्या कॉलेजमध्ये जाता येते हे समजल्यानंतर मी  निदान कोल्हापूरला तरी प्रयत्न करावा असे ठरवले .
             आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूरला आलो . बाबूराव  पेंटरांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री त्यावेळी प्राचार्य होते . त्यांनी निसर्गचित्रांचा गठ्ठा पाहीला आणि म्हणाले शासनाला काय येड लागलयं समजत नाही . ज्याला कलेची आवड आहे त्यानां प्रवेश द्यायचा सोडून फक्त दहावी पास असलेले घ्या हे चुकीचे आहे . मग सरांनी दोन दिवस थांब आपण प्रयत्न करू असे सांगितले . मग आयुष्यात  पहिल्यांदा बाहेर राहण्याचा प्रश्न पडला . आता काय करावे ? या विचारात कोल्हापूर बसस्थानकावर बसून राहीलो . रात्री तेथेच झोपलो . 
             दुसऱ्या दिवशी चालत कळंबा येथे असणाऱ्या कलानिकेतन कॉलेजला पोहचलो तर अरविंद सर नुकतेच ऑफिसला येत होते . त्यांनी ऑफीसात बोलावले . रात्री कुठे राहीलास ? काय खाल्ले ? ओळखीचे कोणी आहे का याची प्रेमाने विचारपूस केली . मी ज्यावेळी स्टेशनवरच झोपलो हे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले . त्यांनी मला सांगितले जा तुला फौडेंशनच्या वर्गात  प्रवेश मिळाला असे समज . तुझी शिकायची जिद्द , चिकाटी मला आवडली . बघू पुढे काय होते ते , मी सांगतो तसे कर .
            कोल्हापूरच्या कलामहाविद्यालयात मला प्रवेश मिळाला पण जगण्यासाठी अन्न व राहण्यासाठी छप्पर लागते . ते तर माझ्याकडे नव्हते व कोणी ओळखीचेही नव्हते . पण कोल्हापूरची माणसेच भारी . हळूहळू चारपाच कॉटबेसीसवर खोलीत राहणारे काही विद्यार्थी होते त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले . मी साईनबोर्ड करायचो व निसर्गचित्रकार म्हणून मला कलाक्षेत्रात काम करायचे होते . स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करायचे होते . मग मी व माझा मित्र दिपक सातार्डेकर कामासाठी भटकू लागलो . त्यावेळी छत्र्यांवर नाव टाकणे , सायकली डेकोरेट करणे , दुकानांचे बोर्ड रंगविणे , नाटकाची पोस्टर्स करणे , बंगल्याच्या दर्शनी भागावर घरांवर नावाच्या पाट्या लिहीणे अशी कामे मिळत . ती कामे मिळवत असताना ऐके दिवशी खासबाग मैदानाच्या समोरच्या  पहिल्या मजल्यावर एक छोटी पाटी दिसली . पेंटर एस . निंबाळकर आर्ट्स आणि स्टुडीओ . मग उत्सुकतेपोटी नकळत मी पहिल्या मजल्यावर पोहचलो .
            निंबाळकराच्या या स्टुडीओमध्ये एकच मोठी खोली होती . त्या दरवाज्या शेजारी एक लाकडी फोल्डींगचे इझल त्यावर माऊंट बोर्ड लावलेला होता . त्या इझलशेजारी एक मोठे टेबल त्या टेबलावर एका प्लास्टीकच्या ट्रे मध्ये असंख्य पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या . जलरंगाचे असंख्य ब्रशेस , पाण्याची छोटी बादली , पॅलेटस व शेजारच्या लोखंडी रॅकवर व टिपॉयवर चित्रांची पुस्तके रचलेली होती .
पांढरा बिनबाह्यांचा बनियन , बुल्गानीन दाढी , अनेक रंगानी शितोंडे उडून मूळ रंग कोणता हे दिसत नसलेली पँट घालून डाव्या हातात सिगारेटचे झुरके घेत हे चित्रकारमहाशय एक दुकानाचा साईनबोर्ड ऑईलपेंटने रंगवत बसलेले होते .
             मी त्यानां नमस्कार केला माझी ओळख सांगितली व तुमच्याकडे काही काम मिळेल का याची विचारणा केली . अरे वा ! तु पाचगणीचा का? लई बेस्ट स्पॉट ? लई भारी हाय बघ लँडस्केपसाठी . मी गेलो होतो . टेबललॅन्ड नावाचे पठार हाय बघ तेथे . एकदम बेस्ट . सिगारेटचे झुरके मारत साईनबोर्ड रंगविणारे एस. निंबाळकर पुढे कायमचे मित्र झाले . हळूहळू निंबाळकर मला त्यांची जास्तीचे काम द्यायचे . पण त्यांचे खरे प्रेम हे निसर्गचित्रे रेखाटनावर असायचे . पोटासाठी साईनबोर्ड व इतर रंगविण्याची कसलीही कामे करताना त्यांनी कधी लाज , शरम धरली नाही . किंवा मी मोठा चित्रकार आहे , जी डी आर्ट पेंटींग व कमर्शियल आर्ट शिकलो आहे तर अशी कामे का करू ? असा प्रश्नही त्यानां कधी पडला नाही . त्यांचा हा गुण मला जगण्यासाठी खूप उपयुक्त ठरला .
             कोल्हापूरचे अनेक चित्रकार त्यांच्या स्टुडिओला येता जाता सहज भेट देत असायचे त्यांनी कधीच कोणाला रोखले नाही . अपॉईमेंट नावाची भानगडच त्यांनी ठेवली नाही . मुक्त प्रवेश व भरपूर कोल्हापूरी शिव्या घालून ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करायचे . खूप लोकानां भेटायचे . पुण्या मुंबईतील चित्रकार फोन करून या म्हणायचे पण निंबाळकर त्यानां कधी फोन करायचे नाहीत . मी त्यानां एकदा विचारले की समजा तुम्ही त्या चित्रकाराच्या घरी गेला आणि तो तेथे नसला तर ? ते सहज म्हणाले सुनील , तुला सांगतो ही चित्रकारमंडळी म्हणजे लई म्हंजे लई म्हंजे लईच चतुर जात . तुम्ही त्यानां फोन केला की लई नाटकं करणार . खोटे तर लगेच बोलणार , लई बीझी हाय असं म्हणणार त्यापेक्षा डायरेक्ट भिडायचे . रिक्शा प्रवासाचे पैसे वाया गेले तरी हरकत नाय पण आजपर्यंत माझा अंदाज कधी चुकला नाही . ते पुण्यामुंबईत भ्रमण करत असताना अनेकानां भेटायचे व त्यानां मित्र करून टाकायचे . त्यामुळेच मलाही अनेक चित्रकारानां भेटायची गप्पा मारून नव्या गोष्टी समजून घेण्याचे व्यसन लागले .
             त्यांच्याकडे अनेक चित्रांचे रेफरन्स बुक व फोटो कलेक्शन असायचे . कधी एका चित्रातील होडी घ्यायचे तर दुसऱ्या चित्रातील डोंगर घ्यायचे कधी तिसऱ्या रेफरन्समधून मंदीर घ्यायचे . कधी वातावरण निर्मितीसाठी इकडून तिकडून फिगर्स ढापायचे . या सगळ्यांचा परिपाक एक नवीनच स्पॉट किंवा निसर्गदृश्य साकारायचे . ते साकार करताना ते इतके एक्स्पर्ट झाले होते की चार पाच चित्रे एकत्र रंगवूनही कोणाला त्याचा पत्ता लागला नाही . कारण नवे चित्र खरेच वेगळे असायचे .अनेक कलाकारांच्या चांगल्या गोष्टी ते सहजपणे चित्रांत बेमालूमपणे घुसवायचे . कोणी प्रश्न विचारला तर भाबडेपणाने कोठून चित्रात काय घुसवले याची उकल करून सांगायचे .
            एकदा कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार प्रताप मुळीक यांचे प्रदर्शन भरवायचे ठरले . त्यावेळी मी त्यांच्याकडेच कामाला होतो . मग चित्र नेणे , रात्री डिस्प्ले करणे , चित्रांवर नंबर टाकणे , बाहेरचा कापडी बोर्ड , बॅनर , जाहिरातीचा फलक रंगविणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांनी मला सोबत नेले . सर्व कामे संपल्यावर म्हणाले आता मी माझ्या चुलत भावाकडे मुक्कामासाठी जातो . तु काय करणार आता ? आणि ते मला तेथेच सोडून निघून गेले .खरं तर माझे कोणी नातेवाईक नव्हते तेथे जे होते ते निंबाळकरांसारखे मित्र . त्यानां फोन करून बोलावले तर शाहू स्मारकला लगेच आले . म्हणाले काळजी करू नकोस आज माझ्या स्टुडीओत झोप , कोल्हापूरला आला होतास त्या स्टेशनावर झोपू नको . मुळीक कोल्हापूरचेच पण ते आता पुण्यात राहतात . माणसे बदलतात . तु पुण्यात चार वर्ष राहूनही पुणेकरांकडून काहीच शिकला नाहीस . त्यांनी स्टुडिओची चावी दिली व रिक्शाने आम्ही खासबागच्या स्टुडीओत आलो .एस .निंबाळकर असे फटकळ पण बिनधास्त खरे बोलणारे कोल्हापूरकर होते .
            एकदा वडगावचे चित्रकार संपत नायकवडी व एस. निंबाळकर सातआठ दिवसांसाठी चित्र काढायला पाचगणीला आले होते . ते पावसाळ्याचे दिवस होते . आम्ही मस्तपैकी टेबललॅन्डच्या पठारावरच्या गुहेत , डालकेटच्या जुन्या इमारती , पाचगणीचे रस्ते , महाबळेश्वरच्या पॉईंटसवर जाऊन डोंगररांगांची चित्रे काढली . महाबळेश्वरला त्यांचे मित्र बाळू वेल्हाळ नोकरीला होते . त्यांच्याकडे मुक्काम केला व प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटला जाऊन छान वॉटरकलर केले . मग अचानक एस. निंबाळकर म्हणाले आपण ही चित्रे मांडून पॉईंटवर बसू या . कदाचित कोणी कलारसिक आपली चित्रे विकत घेतील . दोन तासानंतर कोणीही चित्र विकत घेत नाहीत हे पाहुन एस .निंबाळकर म्हणाले . आयला आपण महाराष्ट्रात जन्मलो हिच मोठी चुक झाली . त्यात सातारा जिल्ह्यात चित्र विकायचे म्हणजे राजस्थानाच्या वाळूत शेती करायला घेतल्यासारखे आहे . चित्रातून चित्रकार जगवला पाहीजे , चांगले चित्र भिंतीवर लावले पाहीजे याची भारतात जाणीव नाही . मग गरम भुट्टा (कणीस) खात निसर्ग पाहणाऱ्या लोकांकडे पहात ते म्हणाले . निसर्ग पाहायला येतात की भुट्टा खायला तेच कळत नाही .
             चित्र विकण्यासाठी त्यांनी मग त्यांचा अनोखा फंडा सांगितला . एकदा मुंबईला भेटले तर म्हणाले चल तुला स्वस्तात रंग कुठे मिळतात ते दाखवतो . मग अतिशय गर्दी असलेल्या जुन्या बाजाराच्या दोन टाकी परिसरात घेऊन गेले . तेथे इतकी गल्ली बोळे व असंख्य वस्तू विकायला होत्या की फिरताना मी गांगरून गेलो . मग तेथेच एका अरुंद बोळात घुसून एका जुन्या इमारतीच्या गलीच्छ वस्तीत कंपनीचे वाया गेलेले रिजेक्टेट भंगारचे रंगाचे दुकान होते तेथे घेऊन गेले . अर्धवट भरलेल्या , रंग बाहेर पडल्यामुळे रिजेक्ट झालेल्या ट्युब्ज त्यांनी विकत घेतल्या . एका दुकानात बॉक्सबोर्डचे पेपर विकत घेतले . काही ब्रशेस घेतले . दोन तीन हजाराच्या त्या वस्तू मला दाखवून म्हणाले आता बघ याचे सहा महिन्यात दहापट पैसे करतो . सहा महिन्यानंतर ते परत आले व म्हणाले चल आता माझी करामत दाखवतो .
              मुंबईत अनेक फ्रेम्समेकर्स आहेत , सदगुरु , पेटेंडरिदम , इंदू फोटोफ्रेम्स या मोठ्या शो रुम्समध्ये ओरीजनल चित्रे विकणारी मोठी व्यापारी मंडळी आहेत . त्याच्यांकडे एस .निंबाळकर प्लास्टीक फाईल्स किंवा कधी कापडी पिशव्या घेऊन जायचे . त्या पिशव्या दुकानाच्या मालकापुढे ठेवायचे . ते देतील ते पैसे घ्यायचे . घासाघीस नाही , वादविवाद नाहीत अशा चार पाच जणांकडे गेले की त्यांची सहा महिन्याची बेगमी पुर्ण व्हायची . चित्र काढण्यासाठी व जगण्यासाठी पैसे मिळाले यामध्ये ते खूष असायचे . त्यांनी कधीही मोठ्या चित्रकारांसारखे जगात नाव व्हावे , स्टाईलमध्ये जगावे , कोल्हापूरात नाव कमवावे , आपली चित्रे कोट्यावधी रुपयांमध्ये विकली जावीत अशी हाव धरली नाही . पायात साधी चप्पल , साधे शर्ट पँट व अस्ताव्यस्त अवतार त्यांनी कधी सोडला नाही . कोणावर इंप्रेशन मारण्याचे ध्येयच नसल्यामुळे आपल्या कलानिर्मितीत हा माणूस धुदंपणे जगला .
               एकदा सावर्डे येथील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे संजीवन विद्यालयात चित्रकलेचा कॅम्प आयोजित केला होता . प्रत्येक चित्रकाराला राहण्याची सोय व दहा हजार रुपये मिळणार होते . मग मी व स्वाती प्रथमच अशा कॅम्पला गेलो . तेथे एस. निंबाळकर देखील आले होते . मग आम्ही पन्हाळ्यात पायथ्याशी छोट्या गावात चित्र काढायला गेलो . माझ्याकडे खुर्ची , ईझल , बोर्ड सर्व मटेरियल होते . पण निंबाळकर मस्त पायाची मांडी घालून मातीत निवांत बसले होते . पँट खराब होत होती पण त्याची त्यांना जराही पर्वा नव्हती . डाव्या हातात सिगारेट पेटत होती . त्यावेळी मस्तपैकी दोन घरे , त्याच्यां शेणाने सारवलेल्या भिंती , कौले , दोन कोंबड्या , दोन शेळया डोक्यावर लाकडांचा भारा घेऊन जाणारी बाई यांचे मस्तपैकी दोन तासात चित्रण करून निंबाळकर कोल्हापूरला एका दिवसातच परतले . जाताना स्टुडिओत भेटून जा म्हणाले .
             त्यांच्या स्टुडीओचा पत्ता बदलेला होता . आता ते तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट झाले होते . स्टुडीओची जागा बदललेली होती पण निंबाळकर बदलले नव्हते . त्यांच्या रहाणीमानाप्रमाणेच स्टुडीओतील रचना बदललेली नव्हती . त्याच अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू , पुस्तके , भिंतीवरील अनेक टांगलेली चित्रे , तोच ईझल , तोच टेबल , तेच ते जुन्या बाजारातून आणलेल्या पोस्टर कलर्सच्या अर्धवट रंगानी भरलेल्या बाटल्या होत्या सिगारेटची अनेक थेटूक ॲश ट्रे मध्ये पडलेली होती आणि बाल्कनीमध्ये पोत्यात भरलेल्या रिकाम्या बाटल्या बघितल्यानंतर त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत लक्षात आली . तेथेच मित्र उमेश नेरकर यांची भेट झाली .
             कोणाशी शत्रूत्व नाही , कोणाशी वैर नाही , कोणाशी स्पर्धा नाही , कोणाशी तुलना नाही . कोणी मान अपमान केला तरी विचलीत झाला नाही असा हा वेगळाच आत्मा होता .आपल्या स्वतःची एक जीवनशैली निवडून फक्त चित्रांवर जगण्याचा काट्याकुट्यातील मार्गावर सर्वांसोबत हसून जगणारा कोल्हापूरचा हा अवलीया निसर्गचित्रकार आज अनंतात विलीन झाला . आता कोल्हापूरला गेलो की चित्रकार एस.निंबाळकर व त्यांच्या फोटोमुळे असंख्य आठवणी नेहमी आठवत राहतील . . . . . 

चित्रकार : सुनील काळे✍️
9423966486

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

गिर्यारोहक : जितेन्द्र गवारे

गिर्यारोहक - जितेन्द्र गवारे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    
          प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा , वेगवेगळ्या विचारांचा , वेगळ्या शारीरीक , आर्थिक , मानसिक विचारधारेंनी भारावून गेलेला असतो . आपल्याला जी जीवनशैली आवडेल तशीच दुसऱ्यांची असेल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही . समान व्यसन , समान आवडी असलेल्यांची मैत्री त्यामुळेच जुळते जेव्हा विचारांची बैठक सारखी असते .
        माझे मूळ गाव वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पायथ्याशी असलेले पांडववाडी किंवा पांडेवाडी . दरवर्षी गावातून वर डोंगरावर पांडवगडावर पांडवजाईदेवीची पालखी जाते . कित्येक वर्ष फक्त मनातूनच गडावर गेलो. प्रत्यक्ष शरीर घेऊन जाणे आता तर स्वप्नच झाले कारण पायाचे झालेल्या ऑपरेशनमुळे डोंगर चढणे आता जमत नाही . मी पाचगणी महाबळेश्वरमधून जशी चित्रनिर्मिती केली तशी एकटे जाऊन ट्रेकिंग करून गडावर चित्रकलेचे सामान घेऊन जाणे शक्य नसते . ट्रेकिंग करून गड सर करणारे . हिमालयात जाऊन बर्फात , थंडीत अनेक किलोंचे सामान पाठीवर घेऊन कांचनगंगा व इतर गिरिशिखरे चढाई करून सर करण्यासाठी जी अलौकीक जिद्द लागते त्यानां तर मी चक्क साष्टांग नमस्कारच करतो .
           आता रिटायर्डमेंटच्या काळात मी पांडवगडाच्या पायथ्याशी राहतोय . माझ्या सर्व खिडक्यांमधून पांडवगडाचे दर्शन होते . त्या उंच डोंगरावर पूर्वी अज्ञातवासात पांडव रहात होते अशी आख्यायिका आहे . त्या गडावर पाचगणीचा एक पारशी शेर वाडीया नावाचा माणूस कित्येक वर्ष रहात होता . पाचगणीच्या संजीवन शाळेच्या समोर जकात नाक्याशेजारी असलेली रोडटच  महागडी प्रॉपर्टी विकून हा गडी एकटा पांडवगडावर राहायचा . त्याने तेथे एक छोटे घर बांधले होते . सोबत एकदोन कुत्री घेऊन हा पारशी दिवसभर त्या गडाच्या परिसरात वरून दिसणारे निसर्गसौंदर्य पहात राहायचा . असा कित्येक वर्ष तेथे रहात होता . लाईट नाही , जनरेटर नाही , मोबाईल , टिव्ही नाही , बाजार वस्तू घेण्यासाठी वाईला जायचे तर डोंगर उतरावा लागायचा . नंतर परत प्रवास करून सर्व सामान डोंगरावर चढवायचे . सोबत माणूस नाही असे एकटे राहणाऱ्या शेर वाडीयाविषयी मला खूप खूप उत्सुकता असायची . असे एकट्याने डोंगरमाथ्यावर राहणे साधे सोपे काम नसते . डोक्यावर एक फूट लांबीचे सरळ मोकळे केस , त्या केसांवर वाऱ्याने उडू नयेत,अस्ताव्यस्त होऊ नयेत म्हणून एक काळी पट्टी बांधलेली असायची , खूर्टी बुल्गानीन दाढी , आत बसलेली गालफडे , गोरा रंग व साडे सहा फूट उंच किडकिडीत शरीरयष्टी , नेहमी इनशर्ट करायचा व एक जाड चामड्याचा पट्टा पँटला बांधायचा . त्यात नेलकटर , छोटा चाकू ,किल्ली यासारखी दोनतीन अवजारे असायची . त्याचा खूप उंच असा काळ्या रंगाचा हंटरशूज पाहीला की मला जणू इंग्रजी चित्रपटाचा नायक चालत आहे असे वाटायचे . त्याच्या रेसर सायकलची शीट दीड फूट उंच असायची त्याच्यासारखीच विचित्र दिसायची . वाईत किंवा पाचगणीला तो फिरत असला की सगळे त्याच्याकडे बघत राहायचे . सेंट पीटर्समध्ये शिकला होता तरी मराठी बोलायचा त्यामुळे सगळ्यांशी त्याची ओळख होती . असा हा शेर वाडीया सर्व जगाशी सबंध तोडून पांडवगडावर का रहात होता ? काय जीवनाचे रहस्य शोधत होता ? हे आता विचारायचेच राहीले .
       एक दिवस वाईला टिळक लायब्ररीत जितेन्द्र गवारे यांचा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव व स्लाईडशो असा कार्यक्रम आयोजित केला होता . मी त्यांचे अनुभव ऐकून एका वेगळ्याच जगात पोहचलो  होतो . हिमालयात गिर्यारोहण करणे हे एक वेडे धाडस आहे . महाराष्ट्रातील वातावरण व हिमालयाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगाचे वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक आहे . त्यासाठी बर्फात  राहण्याचे सामान व ऑक्सीजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन हातात काठी , जाड प्लास्टीकचे शरीर पूर्ण झाकणारे कपडे घालून प्रत्यक्ष हिमवर्षावात चढाई करताना बर्फाचे डोंगर , लँडस्लायडींग , वारा , वादळ , अनोळख्या अडचणींच्या विश्वात डोंगर चढत गिरिभ्रमण करणे हे सोपे काम नसते .
           प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी जवळपास वीस पंचवीस लाखांची तरदूत करावी लागते . जाण्या येण्यासाठी रेल्वे , विमान कंपनीचे तिकीट बुक करून ठेवावे लागते . श्वास वाढवणे व श्वास रोखून धरण्यासाठी शास्त्रशुद्ध सराव करावा लागतो , त्यासाठी शारीरिक व्यायाम , पळणे ,चालणे, योगाचा अभ्यास व मनाची संतुलीत अवस्था टिकवून ठेवण्याचे तंत्र शिकावे लागते . सततचा सराव करावा लागतो . विपरीत परिस्थिती येणार आहे याची जाणीव ठेऊन शरीरसंपदा चपळ ठेवावी लागते . वजन वाढू नये सतत साथ द्यायला तयार शरीर तंदुरुस्त असावे म्हणून सातत्याने जिममध्ये व्यायाम करावा लागतो . ज्याठिकाणी जायचे आहे त्या गिरिशिखरांचा नकाशा घेऊन भौगोलीक रचना व इतिहास समजून घ्यावा लागतो . निळ्या ट्रॅकसूटमध्ये तंदुरुस्त जितेन्द्र गवारे त्यांचे हिमालयातील फोटोंचा स्लाईड शो वाईमध्ये दाखवत असताना सगळे प्रेक्षक थंडगार झाले होते , अचंबित झाले होते. प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की हे सगळे उपदव्याप करून स्वतःच्या प्रिय कुटुंबापासून एक दोन महिना दूर राहून आर्थिक भूर्दंड सहन करून यानां काय मिळवायचे असते ? कशाला जीव धोक्यात घालून अडचणींचा सामना करत बसायच ?
शेवटी जितेन्द्र गवारे यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावेत असे वाक्य ऐकताच माझा  हात पटकन वर गेला .
          जिवाची पर्वा न करता , प्राणप्रिय कुटूंबातील सदस्यानां दूर ठेऊन , पंचवीस लाखांची आर्थिक झळ सोसून , एवढा शारीरिक व्यायामाचा त्रास सोसून जेव्हा तुम्ही हिमालयात जाता त्याऐवजी ते पैसे बँकेत मुदतठेव ठेऊन दर महिना व्याज मोजत बसण्या ऐवजी,निवांत सकाळी जरा उशीरा उठून , रिस्क न घेणारे साधे सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगायला तुम्हाला आवडत नाही का ? आणि तुम्ही अशा सफरींसाठी जाता त्यावेळी घरच्यांची अवस्था काय असते ? ते तुम्हाला अडवत नाहीत का ? माझा प्रश्न ऐकताच जितेन्द्र गवारे सहज हसत म्हणाले बसा सांगतो याची उत्तरे . आणि सगळ्यांनी कान टवकारले .
           आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविस्मरणीय प्रवास असतो . काहींचे जीवन अगदी रहाटगाडग्यासारखे असते .रोजचा दिवस सारखाच उगवतो . तेच तेच रुटीन जगणे असते . जीवनात काही नवीन उत्साहाने जगण्यासाठी आव्हानच नसते . बेसूर व कंटाळवाणे तेच तेच जीवन का जगावे माणसाने ? मला माणूस म्हणून जगताना चॅलेंजिंग , बाणेदार , शुरवीरासारखे धाडसी जगावे वाटते . आपले शरीर हे आराम करण्यासाठी , खाऊन जाडजूड होऊन निवांत झोपण्यासाठी नसते . शरीराला कार्यमग्न , उर्जावान ठेवण्यासाठी मावळ्यांसारखे चपळ ठेवण्यासाठी योग्य आहार , योग्य दिनचर्या असावी असे मला वाटते . त्यासाठी दरवर्षी कोठे ना कोठे मी गिर्यारोहणाची मोहीम आखत असतो . गिर्यारोहण हा साहसी खेळ आहे . या खेळात हिमशिखरे कधी अंगावर पडतील , आपण कधी या पर्वतशिखरांखाली गाडले जाऊ याची शाश्वती नसते . आपला हा श्वास कधी संपेल हे सांगता येत नाही . जर रोजचा दिवस जीवनातील एक साहसी खेळ म्हणून जगलो तर संपूर्ण जीवन एक उर्जेची धारा असल्यासारखे वाटेल .
              दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . माणूस कितीही श्रीमंत असू द्या तो कधीच समाधानी नसतो . गरीबानां श्रीमंत व्हायचे म्हणून ते धावत असतात व श्रीमंतानां अधिक श्रीमंत व्हायचे असते म्हणून ते अधिक धावपळ करतात . आणि पैसे टिकवून ठेवण्यासाठी कंजूषवृत्तीने जगताना आपल्या इच्छा मारण्यात अर्थ काय ? अधिक पैसे मिळविण्यासाठी सामान्य लोकानां फसवून टोप्या लांडीलबाडी करून दिवसरात्र पैसे कसे वाढतील या विचारांत स्वतःलाच काहीजण फसवत असतात . असे जीवन मला जगायचे नाही .
            तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे . मी असा आळशी, निवांत  बेसूरा जगू नये म्हणून माझी पत्नी , माझे कुटूंबीय स्वतःच अशा मोहीमेमध्ये मला मदत करत असतात . शेवटी जगताना मरण कधी तरी येणारच . मग मरण पुण्यात आले काय किंवा हिमालयाच्या कुशीत आले काय ? मरण्याच्या अगोदर जिवंत जगले पाहीजे असे मला वाटते . मृत्यू त्यामुळे मित्र असल्यासारखा वाटतो. मग मित्रासोबत भिती कशाला वाटायला पाहीजे ?
आणि सर्वात शेवटी हे अगदी मनातलं सांगतो . जी माणसे सर्वसामान्य रुटीन पद्धतीने जगतात ती रुटीन पद्धतीनेच मरतात . जी माणसे असामान्य मोठ्या ध्येयाने पछाडलेली असतात ती असामान्य कर्तृत्व करतात. त्यांच्या कर्तृत्वाची दरवळ हळूहळू सगळीकडे पसरते व समाजही एक दिवस त्यांची दखल घेतोच . गिर्यारोहन क्षेत्रात जे काम मी केले त्यामुळेच तर तुम्ही मला या कार्यक्रमाला का बोलवले ना ?
            प्रत्येकाच्या जीवनाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते किंवा ती वेगवेगळी असलीच पाहीजे . जितेन्द्र गवारे त्यांच्या आगळ्यावेगळ्या विचारांमूळे व धाडशी जीवनशैलीमुळे कायम लक्षात राहीले .
         जितेन्द्र गवारेंचा आज वाढदिवस आहे . त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे . अनेक मोहीमा ते आयोजित करत असतात . त्याच्यां सर्व गिरिशिखरांच्या मोहीमानां खूप खूप शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
 
https://www.facebook.com/share/r/Nsc8DB6Par2Xyu95/?s=chYV2B&fs=e&mibextid=6AJuK9

https://www.instagram.com/reel/ChZ5rlJq-dL/?igsh=Z2V3cGRqNDBud21s

सुनील काळे✍️ 
9423966486

*पाऊस चित्रातला *पाऊस मनातला*

पाऊस चित्रातला पाऊस मनातला 🌧️🌧️🌧️🌧️🌧️            निसर्ग हा अफलातून कलाकार आहे .त्याने सजवलेल्या  विविध रूपांमुळे , अनोख्या ...