ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, ६ जून, २०२५

चित्रप्रेरणा

चित्रप्रेरणा
🎨🎨🎨
        माणसाच्या आयुष्यातील बालपण कायम लक्षात राहते .शाळेचे दिवस , शाळेचा परिसर , शाळेचे शिक्षक , आपल्यासोबतचे सवंगडी व आपण ज्या गावात लहानाचे हळूहळू मोठे होत गेलो तो परिसर तेथील वातावरण आपल्या अचेतन मनात कायम स्मरणात राहीलेले असते.
         पाचगणी हे सुप्रसिद्ध शैक्षणिक व बोर्डींग स्कूल्ससाठी प्रसिद्ध असले तरी या मोठया स्कूलची फी परवडणे सर्वांनां शक्य नसते . आम्ही वाईजवळच्या पांडेवाडी या खेडेगावातून पाचगणीला राहायला आलो होतो . माझे वडील व काका एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती . ते दोघे व त्यांच्या बायका पूर्णपणे अशिक्षितच होते . त्यामुळे त्यांनी सर्व मुलामुलींनां मराठी माध्यमाच्या जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत पाठवले . सातवीपर्यंत आमच्या शाळेत चित्रकला हा विषयच नव्हता . त्यामुळे खास चित्र काढण्याची अशी कधी प्रेरणाच मिळाली नाही .
           सातवीनंतर मी संजीवन या मोठ्या शाळेत गेलो . शाळेत  प्रवेशपरिक्षा पास झालो आणि आम्ही चौघे गावातील मित्र  या मोठ्या शाळेत जावू लागलो . तेथे शांतीनिकेतनमधून शिकून आलेले भट्टाचारी नावाचे कलाशिक्षक होते . पण माझे दुर्देव असे की आम्ही मराठी माध्यमात शिकल्यामुळे आम्हाला  इंग्रजी जराही समजत नव्हते, त्यामुळे बोलता तर अजिबातच यायचे नाही . त्यामुळे दहावीपर्यंत तीन वर्ष आम्ही त्या सरांशी सलोखा निर्माण करू शकलो नाही . चित्रप्रेरणा तर दूरच राहीली .
            घरी अभ्यासाला जागा नसल्यामुळे आम्ही मित्रमंडळी अभ्यासाची पुस्तके घेऊन कधी पोलीसग्राऊंडच्या पाठीमागे सोहराब मोदींच्या गार्डनमध्ये , कधी नगरपालीकेच्या बागेमध्ये , कधी दूर टेबललॅन्डच्या गुहेमध्ये तर कधी सिडनेपॉईंटच्या निसर्गरम्य परिसरात अभ्यासाला जायचो .
          एकदा संध्याकाळी सिडने पॉईटंच्या रस्त्यावर आताचे रविन हॉटेल आहे त्या रस्त्यावर एक चित्रकार चित्र रंगविताना पाहिला . सडपातळ शरीर , काळ्याभोर मिशा , गौरवर्ण , केसांची साधीच रचना व इनशर्ट केलेले , पायात शूज व एक छोटीशी फोल्डींगची खूर्ची घेऊन हा चित्रकार समोरची कमळगड व मांढरदेवीची दरी , नवरानवरीचा डोंगर व त्या डोंगरावर पडलेल्या एका बाजूच्या संध्याकाळच्या सावल्या व दुसऱ्याबाजूला त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीवर पडलेल्या शेडस ,खाचखळगे , चमकणारे ऊन , डोंगरावर पसरलेले धुके व खाली तळमाळ्यावर जाणारा उतारावरचा रस्ता जलरंगात चित्रित करत होते . चित्रकाराच्या पाठीमागे एक नवीकोरी झक्कास एटलॉस कंपनीची सायकल होती . पुढे हँडलसमोर रात्रीचा प्रकाशझोत पडावा म्हणून डायनामो लावलेला होता . एका बाजूला चित्रकलेचे सामान ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी लावलेली होती . चित्रकार कोणाशीही बोलत नव्हता ,त्याचे काम मन लावून सुरूच होते आजूबाजूला खेडेगावची मंडळी , काही सुशिक्षित पर्यटक , आम्ही शाळेकरी मुले चित्र पाहण्यासाठी कोंडाळे करून जणू जादूचा खेळ पहात होतो . होय , खरंच जादूचा खेळ होता . पांढऱ्याशुभ्र हँडमेड कागदावर जलरंगाचा बिनधास्तपणे मारलेला फटकारा चित्राला हळूहळू जिवंत करत होता . सारा परिसर चैतन्यमय होऊन एका सुरेख फ्रेममध्ये एकवटला होता . ते  दृश्य फोटोकॉपी नव्हते त्या चित्रात एक हालचाल होती . चित्रकाराचे कौशल्य अफाट होते .त्या निर्जीव दृश्याला सजीव केले होते . संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर चित्रकाराने सर्व सामान पिशवीत भरले व जवळच्या बिलिमोरीया स्कूलच्या आवारात चित्रकार दिसेनासा झाला . त्याची पाठमोरी आकृती मला आजही लक्षात आहे .
मला खरी " चित्रप्रेरणा " मिळाली होती .
          मग रोज संध्याकाळी मी बिलिमोरीया स्कूलच्या प्रवेशद्वाराशी दबा धरून बसायचो . चित्रकार कधी गार्डनच्याशेजारी असलेल्या वडाच्या झाडांची , कधी मुख्य बाजारात तर कधी पारशी पॉईटंच्या व्हॅलीची चित्रे काढताना दिसायचा . मग  सायकलवर फिरणाऱ्या त्या चित्रकाराचा मी पाठीमागे पळत पळत पाठलाग करायचो . चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेली कितीतरी चित्रे मी पाठीमागे सलगपणे चारपाच तास उभे राहून पाहायचो . त्या चित्रकाराचे व्यक्तीमत्व मला आवडायला लागले होते . तो चित्रकार कोठेही दिसला की मी मंतरल्यासारखा ,भारावून गेल्यासारखा त्याच्या मागेमागे धावायचो .
          एकदा तर चित्रकाराने कमालच गेली . पाचगणीची ग्रामदेवता घाटजाईची जत्रा फेब्रूवारीमध्ये दरवर्षी भरते . या जत्रेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ढोलवाले , झांजपथके यायची . त्या ढोलवाल्यांची वेगवेगळी हालचाल व जोशपूर्ण प्रत्यक्ष सजीव रेखाटणे काढण्याकरता हा चित्रकार हॉटेल अप्सराच्या उंच पत्र्यावर रेखाटनाचे साहित्य घेऊन बसला . मी पाठलाग करून लगेच चपळाईने पाठीमागे उभा राहीलो . दोन्ही हाताने झांज पकडून आमचे बहिरा माळी म्हणून प्रसिद्ध असलेले एक वयस्कर गावकरी यांचे हावभाव हालचाली चित्रकाराने बरोबर पकडल्या . गुलालाची उधळण करणारे गावकरी , त्यांचा शारिरीक जोशपूर्ण आवेश  , त्यांचा ताल व ठेका चित्रकाराच्या लयबद्ध रेषेतून जिवंत होत होते . मी मात्र डोळे विस्फारून चित्रकाराची हालचाल लक्षात ठेवत होतो . पाचगणीच्या परिसराची चित्रे रेखाटणाऱ्या या कलाकाराचा मी जबरदस्त फॅन झालो होतो पण तरीही कित्येक वर्ष माझी त्यांच्याबरोबर बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.
        या चित्रकाराचे नाव सुभाषचंद्र बोंगाळे सर . पुढे 12वी सायन्सला माझे मन रमेना मग एक दिवस सरांनां प्रत्यक्ष भेटलो . माझी रेखाटलेली  चित्रे त्यांना दाखवली . चित्रकार व्हायचे असेल तर इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते तरच चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळतो याची माहिती त्यांनी दिली . त्यासाठी लागणारे लेटरींग ,भुमिती असे विषय शिकविण्यासाठी सर घरी आले . माझ्यात चित्रकलेचा स्पार्क आहे हे त्यांनी ओळखले . कोणतीही अपेक्षा न ठेवता , कोणताही आडपडदा न ठेवता मुक्तहस्ताने बोंगाळे सरांनी मला मार्गदर्शन केले . पुढे जीवनात अनेक अडचणी आल्या , कठीण प्रसंग आले , निराशेचे क्षण आले त्यावेळी बोंगाळे सर जिवलग मित्रासारखे सोबत राहीले . कलाशिक्षक म्हणून काही वर्ष काम करावे लागले त्यावेळी शाळा सांभाळून चित्रांचा ध्यास , चित्र काढत राहण्याची मशाल सतत तेवत ठेवली पाहिजे , चित्रांचा ध्यास विसरता कामा नये याची शिकवण सरांमुळे मिळाली . आजही बोंगाळे सर मनामनात भिनलेले आहेत . व आज त्यांची आठवण तीव्रतेने आली त्याचे कारणही खास आहे .
        वाईपासून 3 किमी अंतरावर मेणवलीजवळ प्रसिद्ध कवि आर्याकार वामन पंडीत यांचे भोगाव गाव आहे . या गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात रस्त्यालगतच माझा निसर्ग नावाचा बंगला आहे  आणि या बंगल्यातच मी एक महिना " निसर्ग आर्ट गॅलरी " या नावाने कलादालन सुरु केले आहे . 7मे पासून ते 7जून पर्यंत सुरु झालेल्या या चित्रप्रदर्शनाला खेड्यापाड्यातील अनेक गावकरी , वाई , सातारा , कराड , मुंबई , पुणे , पाचगणीतील अनेक मित्रमंडळी व पर्यटक आवर्जून येत आहेत . सातारा जिल्ह्यात आडबाजूला भोगाव सारख्या छोट्या खेडेगावात आपल्या एका वेडया चित्रकार दाम्पत्याने सुरु केलेल्या या प्रदर्शनाला मुद्दाम भेट देत आहेत व कौतुक करत आहेत .
        पण आज या भोगावच्या खेडेगावातून बालगोपाळ मित्रमैत्रिणींची एक मोठी फौजच प्रदर्शन पाहायला आली होती . यामध्ये एक मुलगा दिव्यांग होता . त्याला 2 किमी व्हीलचेअरवर घेऊन ही मुलांची टोळी चित्रप्रदर्शन पहायला आल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो . मुलांच्या अंगात अंगभूतच खूप चैतन्य , उत्साह , उर्जा असते . त्यानां नाविन्यतेची ओढ असते . विश्वातल्या अगणित प्रश्नांची उकल करण्याची उर्मी असते . त्या सर्व मुलांनी कितीतरी नवनवे प्रश्न विचारले . त्यांची प्रश्नांची सरबती संपतच नव्हती . कारण त्यानां त्यांच्या गावात एक चित्रकार सापडला होता . आताची पिढी खूप चपळ व हुश्शार पिढी आहे . त्यांच्यापैकी एकदोन जणांकडे मोबाईल फोन होता . त्यांच्या अपेक्षाही मोठ्या होत्या . चित्रकाराची बैठक कशी असते ? माध्यमे कशी असतात ? कोणते ब्रश वापरले? पैसे किती मिळतात ? जलरंगात व तैलरंगात काय फरक असतो? किती वेळ लागतो ? गार्डन कधी सांभाळता ? चित्र कधी काढता? कॅनव्हॉस म्हणजे काय ? नाईफ पेंटींग म्हणजे काय? प्रश्न तर संपतच नव्हते .
          अशा जिज्ञासू मुलामुलींना कलादालन कसे असते ? हे माहीतच नव्हते . कलानिर्मिती करताना चित्रकारानां काय वाटते ते त्यानां मनोगत वाचताना कळाले ? त्यांनी तीन चार तास कलादालनात चैतन्य आणले ? त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना मी स्वतःला विसरून गेलो . माणसे वयाने वाढत जातात आणि त्यांचे कुतुहूल , निरागसपण त्यांच्यातले चैतन्यपणही हळूहळू लोप पावत जाते . ती मोठी होतात आणि कोमेजत जातात . एखाद्या उमलणाऱ्या सुंदर फुलणाऱ्या फुलावर विषारी फवारा मारावा व त्यांचे फूलपणच संपवावे तशी पालक मंडळी त्यानां संपवून टाकतात . त्यांच्या कलागुणानां धार पाडण्याऐवजी कलाजोपासना म्हणजे भीकेचे डोहाळे लागलेत का ? असे म्हणून लेखक , गायक,चित्रकार ,नाट्य , वादक , व शिल्पकलेसारख्या असंख्य कलागुणानां कात्री लावतात . मुलानां फक्त दहावी बारावीत वार्षिक अभ्यासात भरपूर मार्क मिळविण्यासाठीच प्रोत्साहीत करत राहतात . त्यानां करिअर करण्याचा धोसरा लावतात . त्यानां पुरते व्यावसायिक वृत्तीचे निर्जिव पुतळे बनवतात .
        पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात कलाकारानां किती मानसन्मान मिळतो याची तेथील लोकानां जाण आलेली आहे . त्यातून ते स्वतःचे करियर शोधतात .पण लांबच्या खेड्यातील कमी पट असलेल्या शाळाच बंद करून त्याच्यां सुविधा बंद करणाऱ्या व शिक्षणाचा दोर कायमचा कापणाऱ्या जाणत्या सरकारनितीपुढे काय बोलावे ?
          निसर्ग आर्ट गॅलरीत चित्र-विक्रीच्या फार मोठ्या उलाढाली होत नाहीत कारण जिल्ह्यात एकही कलादालन नसल्याने कलादृष्टी तरी कशी वाढणार ? चित्रप्रदर्शनेच होत नसतील तर चित्रभान तरी कसे वाढणार? आपण तक्रार तरी कोणाकडे करायची ? 
           मग मला आठवतो आमच्या जिल्ह्यातील मुलखावेगळा राजा . औंधचे राजे बाळासाहेब पंतनिधी . शंभर वर्षांपूर्वी खटाव तालुक्यात यमाईच्या डोंगरावर म्युझियम उभे करणारे राजे . त्यासाठी कलावंताना स्वतः दरबारी तनखा व प्रोत्साहन देऊन चित्रनिर्मिती , शिल्पनिर्मिती करवून कलाप्रसार व्हावा म्हणून अहोरात्र देशपरदेशातून स्वतःच्या पैशातून कलाकृती आणून भवानी संग्रहालय निर्माण करणारे राजे . असे मुलखावेगळे दुरदृष्टी असणारे व स्वतः कलाप्रेमी , कलावंताचे मन जाणणार  राजे आता मिळत नाहीत .
      सातारा जिल्ह्याला दोन दोन राजे आहेत पण चित्रकारानां प्रदर्शनासाठी शासनाचे कायमस्वरूपी एकतरी कलादालन जिल्हयात  कधी निर्माण होईल ?  हे कोणालाच माहीत नाही . स्वातंत्र्य मिळून जिल्हयाने अनेक मुख्यमंत्री दिले पण सातारा जिल्हा कलाकारांसाठी शापितच राहीला . येथील कलाकारानां मुंबई किंवा पुण्यात प्रदर्शन करायला जावे लागते . जिल्ह्यात महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी फक्त तीन दिवसांचे महापर्यटन महोत्सव भरवून हॅलीकॉफ्टर राईड , लेझर शो , टेन्ट हाऊस बांधून , फ्लोटींग बाजारासारखी नाटके करून जनतेचेच कोट्यावधी रुपये वाया घालवून मजा करतात . त्यापेक्षा एखादे छान बालगंधर्वसारखे नाट्यगृह व कलादालन निर्माण केले असते तर जिल्यातील अनेक कलावंतांना एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळाले असते . अनेक कलावंतानी तेथे सातत्याने प्रदर्शने केली असती . कारण तेथे अनेक नामवंत श्रीमंत उद्योगपतींचे बंगले आहेत . पण खरे प्रश्न सोडवण्यात सरकारी मंडळीना उत्साह नसतो . फक्त आदेशाचे पालन करण्यात अधिकारी धन्यता मानतात . असो .
या पार्श्वभूमीवर निसर्ग आर्ट गॅलरीला भेट देणारे असे अनेक छोटे उत्साही कलावंत पाहिले तर एकतरी मुलगा सुनील काळे व एकतरी मुलगी स्वाती काळे म्हणून भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यानां या प्रदर्शनातून जशी मला सुभाषचंद्र बोंगाळे सरांकडून " चित्रप्रेरणा " मिळाली तशी एकातरी बालकलाकाराला नक्कीच शंभर टक्के  " चित्रप्रेरणा " मिळेल असे मनापासून वाटते . म्हणून छोट्या खेड्यात महिनाभर प्रदर्शन भरविले म्हणून जराही वाईट वाटत नाही .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे (चित्रकार)✍️
9423  966486
स्वाती काळे (चित्रकार)
9158751626

निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोड
मु.पो भोगाव ,
ता.वाई , जि. सातारा ४१२८०३
* प्रदर्शन : दि . 7 मे ते 7 जून
* वेळ : सकाळी१०ते संध्याकाळी ६ .
* प्रवेश मूल्य नाही .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

एकदा दर्शन दे घन:श्याम

एकदा दर्शन दे घन:श्याम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏             घनःश्याम रमाकांत कारंजकर हे माझ्या मित्राचं नाव , पण मी त्याला फक्त " घन्...