प्रा. रमेशचंद्र बारगजे (सर)
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
भारतातील शिक्षणपद्धती आणि जपानच्या शिक्षणपद्धतीत मोठी तफावत आढळते . जपानमध्ये लहान मुलानां अगदी सुरुवातीपासूनच नेहमीच्या विषयाव्यतिरिक्त हस्तकला , ओरोगामी , चित्रकला , शिल्पकला, वादनकला , गायनकला , बागकाम , प्लबिंग , इलेक्ट्रीक , इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्ती , स्वच्छता व इतर असंख्य अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कला शाळेपासूनच शिकविल्या जातात . त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा एकूण कल पाहून त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक मदत करतात व मग तो विद्यार्थी त्याला आवडणारे कोणतेही एक क्षेत्र निवडून त्यात पारंगत होतो , खरी मास्टरकी मिळवितो .
मध्यंतरी एक पोस्ट तर खूप भावली . जपानमधील दूरच्या खेड्यात एकटी शाळेत जाणारी मुलगी होती ,तिला शाळेत जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन थांबवली जायची . एका मुलासाठी मोठा वळसा घेऊन स्थानिक बस त्या मुलाला घेऊन शाळेत पोहचविण्यासाठी मदत करायची .याऊलट आपण भारतीय शाळांचा आढावा घेतला तर अगदी कमी पट असलेल्या डोंगराळ व वस्तीवरच्या शाळाच बंद करण्याचा घाट मध्यंतरी सरकारने घातला होता . सुविधा देणे तर दूरच पण शाळेच्या इमारतींची अवस्थादेखील डेंजर आहे .
त्यामुळे हे जाणवते की मानवी जीवन जगताना सगळेच फक्त IT (आयटी ) मध्ये काम करणारे उपयोगाचे नसतात . खेड्यापाड्यात व शहरात रंगकाम करणारे , इलेक्ट्रीकचे काम करणारे , वेल्डींगचे काम करणारे , हुशार प्लंबरसुद्धा मिळत नाहीत . त्यामुळे शिक्षकांनी फक्त पुस्तके पाठांतर करण्यापेक्षा अशा रोजच्या व्यावहारीक गोष्टीसुद्धा शाळेत शिकविल्या पाहिजेत असे वाटते . त्यासाठी शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेऊन नवनवे अभ्यासक्रम सुरु करणे आता गरजेचे आहे . अशा नवनव्या कलागुणांमुळे विद्यार्थ्याची मानसिक घुसमट थांबते व आवडीच्या क्षेत्रात तो प्राविण्य मिळवितो शाळेत येण्याची गोडी वाटते .
मी 1982 साली दहावी पास झालो आणि परंपरेप्रमाणे बारावी सायन्समध्ये शिक्षणासाठी वाईच्या किसनवीर महाविद्यालयात दाखल झालो. इंग्रजी भाषा जराही समजत नव्हती , थोडक्यात प्रचंड बोंब होती . सर मंडळी काय शिकवितात हे मला अजिबात कळत नव्हते.यातून आली ती प्रचंड मानसिक निराशा . मग एसटीमधून प्रवास करताना मध्येच पसरणी घाटात उतरून निसर्गचित्रणाचे स्केचेस करण्याचे नवीन वेड मला लागले . या वेडाची परिसिमा इतकी वाढली की चित्रकलेशिवाय दुसरे काय सुचेचना. मग वर्गात पाठीमागे बसून सगळ्या सरांची स्केचेस करायचो.
प्राणिशास्त्र शिकविणारे प्रा.रमेशचंद्र बारगजे नावाचे एक प्रोफेसर मला शिकवायला होते ते मात्र वेगळेच होते . त्यानां चित्रकला , मिमिक्री , गायन, बागकाम व इतर बऱ्याच गोष्टींची आवड होती . त्यांनी मला चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले माझ्यातला चित्रकलेचा स्पार्क ओळखला. मला बेडूक कापून त्याची पचनसंस्था शिकण्यात अजिबात रस नव्हता पण बेडकाची डिसेक्शन करतानाची चित्रे रेखाटायला मला आवडायची . माझ्या प्रयोगवह्या (जर्नलस) अशा चित्रांची परफेक्ट बुक्स असायची . मग त्यांनी त्यावर्षी या फ्रॉगडिसेक्शनची व शास्त्रज्ञांची छान रेखाचित्रे करून घेतली . मोठे चार्टस करून घेतले व माझ्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन वार्षिक स्नेहसमेलनांत आयोजित करून प्रोत्साहन दिले . त्याचवर्षी मी चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये दिली व मला A ग्रेड मिळाले . त्यामुळे आत्मविश्वास वाढला .पुढे बारावी सायन्स पास झालो व कोल्हापूरला कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयात दाखल झालो . चाळीस वर्ष होऊन गेली पण किसनवीर महाविद्यालयाचे सर्वच सर आजही संपर्कात राहीले ,आठवणीत राहीले कारण त्यानां विद्यार्थी घडवायची ओढ होती .
आज प्रा.रमेशचंद्र बारगजे सर 1973 सालच्या कोल्हापूर विद्यापीठातील आपल्या मित्रांसोबत सहकटूंब " निसर्ग आर्ट गॅलरीत "
चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी सर्वानां घेऊन आले . दहा बारा गाड्या आर्ट गॅलरीत आल्या व गॅलरीचा परिसर माणसांनी फुलून गेला . चाळीस वर्षापूर्वी लावलेल्या या चित्रकार छोट्या रोपट्याला योग्य खतपाणी घातल्याने आता रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले होते . सरांनी कौतुकाने सर्वांसोबत ओळख करून दिली .घरात एक आजारी पेशंट [पत्नी] असताना उत्साहाने सर्व मित्रानां एकत्रित करून गेट टू गेदर व वाईदर्शनाची ट्रिप आयोजित करणाऱ्या सरांचा उत्साह चाळीस वर्षांपूर्वी होता तसाच आजही ओसांडून वहात आहे असे वाटले .
असे अनेक असामान्य प्रेरणादायी ऊर्जास्त्रोत्र असलेले प्राध्यापक , शिक्षक व मार्गदर्शक मला वेळोवेळी वेगवेगळया टप्यांवर भेटले व जीवन जगत असताना मोठी प्रेरणा मिळाली . प्रा . रमेशचंद्र बारगजे व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! व मनःपूर्वक धन्यवाद !
निसर्ग आर्ट गॅलरीत येण्यापूर्वी फोन करून संपर्क करा . आपल्या परिसरातील निसर्गाची चित्रकाराच्या नजरेतून चित्रे पाहणे हा एक वेगळा आनंद असतो तो घेण्यासाठी एकटे या किंवा अनेकांना घेऊन या . आमच्या या निसर्ग आर्ट गॅलरीतील निसर्गयात्रेत येणाऱ्या सर्वांचे नेहमीच स्वागत असेल .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्गचित्रकार सुनील काळे : 9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा