दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा विश्वास बर्गे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
काल वाईमध्ये वसंतमाला व्याख्यानमालेतील 12 व्या पुष्पाचे व्याखाते होते श्री . समीर नेसरीकर , आणि त्यांचा विषय होता "आजच्या काळातील अर्थभान " .
आपण सगळेच जाणतो की मनुष्य छोटा असो वा मोठा प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . कष्टाने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करायचे असते .कधीकधी आपण जसे जीवन जगायचे ठरवलेले असते , जी स्वप्ने पाहीलेली असतात त्याच्या बरोबर विरुद्ध अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात आणि ठरवलेले सुंदर जगण्याचे स्वप्न बेचिराख होते . काही जण कसेबसे सावरतात तर काही जण जीवनाशी तडजोड करून कायमची माघार स्विकारतात . अयशस्वी होतात .
दहा वर्षांपूर्वी पाचगणीवरून वाईला कायमचे राहायला आलो . वाई पाचगणी अंतर जरी जास्त नसले तरी येथे सांस्कृतिक विषमता खूप आहे त्यामुळे फार जणांशी ओळखी घरोब्याचे सबंध नव्हते . त्यामुळे वाई परिसर व माणसे जरा नव्यानेच समजून घेत होतो .
तयार घर घ्यायचे असे ठरवले होते तर एक भयानक अनुभव माझ्या पदरात पडला मग शेवटी घर बांधायला लागले . आता घर बांधायचे तर दोन वर्षांचा काळ जाणार होता . भाड्याच्या घरात रोख पैसे ठेवणे सोपे व सुरक्षितही नव्हते . कॉन्ट्रॅक्टरचे कामगार , त्यांची रोजची हजेरी व विटा ,वाळू , सिमेंट , यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला रोख द्यावे लागत होते . म्हणून मी काही अमाऊंट पाचगणीच्या बँकेत ठेवण्यापेक्षा दत्तदिगंबर पतसंस्थेच्या वाईच्या मिलिंद खामकर यांच्या जागेत सुरु असलेल्या शाखेत ठेवायला गेलो ,तेथे संस्थेत योगिता चौधरी या मेणवली गावच्या ओळखीच्या बाई काम करत होत्या . त्या म्हणाल्या काही काळजी करू नका . मी तुम्हाला ओळखते व मी येथे वाईतच राहते .
घर बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार होता काही दिवसांचाच तर प्रश्न होता म्हणून तेथे चार लाख रुपयांची मासिक ठेव गुंतवणूक केली . मला दर महिन्याला चार हजार रुपये मिळत होते . इकडे इमारतीच्या बांधकामाचा स्पीडही फास्ट होता . अगदी शेवटच्या थोड्याच दिवसात एक दिवस पतसंस्थेत गेलो तर शटर डाऊन दिसले .
योगिता चौधरी मॅडमला फोन केला तर म्हणाल्या मुख्य बाजारात पहिल्या मजल्यावर मोठे ऑफीस घेतले आहे तेथे फर्निचरचे काम सुरु आहे . मी आता शाखाप्रमुख असणार आहे . फर्निचरचे काम संपले की पतसंस्था पुन्हा सुरु होईल . काळजी करू नका . मग प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नंतर सतत पाहणी करतच राहीलो . कारण फर्निचरचे काम संपतच नव्हते . इकडे घराचे बांधकाम संपून रंगकाम सुरु झाले होते . शिफ्टींगमध्ये खूप व्यस्त झालो होतो . शेवटी कलरकामाचे पैसे द्यायचे म्हणून एक दिवस पतसंस्थेत गेलो तर कळाले शाखा कधीच सुरु होणार नाही .
योगिता चौधरी मॅडम म्हणाल्या मलाच फसवले , माझाच पगार दिला नाही . ज्यांच्या विश्वासावर ठेव ठेवली त्यांनी कळवलेच नाही . शेवटी एकप्रकारे दगा दिला . मग पळापळी सुरु झाली . त्यांनी विलास शिंदे नावाच्या व्यवस्थापकाची भेट करून दिली . त्यांनी सहा महिन्यात पूर्ण रक्कम मिळेल असा पोलीसांसमोर जबाब दिला .
आयुष्यात पहिल्यांदा कोरेगावला गेलो . पो.स्टेशनला तक्रार करायला गेलो तर म्हणाले घटना वाईत घडली मग वाईत जावा . वाई पो .स्टेशनला गेलो तर म्हणाले आर्थिक गुन्हे शाखा सातारा व अंतर्गत दुय्यम सहकारी निबंधकाकडे तक्रार करा . तेथे गेल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अर्ज करा तेथे गेलो तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज करा सगळीकडे नुसती टोलवाटोलवी सुरु झाली . मग वाई , सातारा , कोरेगाव अशा वाऱ्या सुरु झाल्या . अर्जांवर वर अर्ज सुरु झाले व चार लाख बुडवून घेतल्याचे दुःख व
" अर्थभान '' पदरात पडले .
असा संघर्ष सुरु असताना एक दिवस विश्वास बर्गे यांचा फोन आला . तुम्ही सातारा येथे भेटायला या , माझेही पैसे बुडाले आहेत आपण एकत्र प्रयत्न करू म्हणाले . मग पहिल्यांदा त्यानां भेटलो आणि आम्ही दोघेही समदुःखी आहोत याची ओळख पटली .
विश्वास बर्गे मुंबईला माझगावच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत पीटीचे शिक्षक होते . आयुष्यभर कष्ट करून 36 वर्षांची पेन्शन घेऊन आता कोरेगावला मूळ गावी राहून म्हातारपण निवांत जगायचे त्यांचे स्वप्न होते . एकूलती एक मुलगी सांगलीला लग्न झाल्याने दोघे पती पत्नी कोरेगावला एकटेच राहत होते . तेथे दत्त दिगंबर शाखेची मोती चौकात मुख्य शाखा होती . आयुष्यभर कमावलेले अकरा लाखाची ठेव त्यांनी पतसंस्थेत गुंतवली . त्यांनी ठेव ठेवली म्हणून त्यांच्या सर्व भावांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले . एकूण चाळीस लाखापर्यंत ही रक्कम ठेवली गेली होती . आणि अचानक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र हिरालाल गांधी व त्यांचे सर्व संचालक सदस्य एकूण 32 कोटी रुपयांचा अपहार करून फरारी झाले .
विश्वास बर्गे एक वयस्कर गृहस्थ असले तरी मुंबईत राहात होते . अभ्यासू व्यक्तिमत्व होते .धडाडीने त्यांनी सर्व ठिकाणी माझ्यासारखेच असंख्य अर्ज दिले होते . शेवटी कोरेगाव कोर्टात अर्ज करून त्यांनी फरारी सदस्यांचे पितळ उघडे पाडले . आरोपी कोरेगावचे रहिवासी होते पण पोलीसांनी त्यानां अटक केली नाही . कोरेगाव कोर्टाने त्यांनां सर्वांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला . पण लढाई इतकी सोपी नव्हती . आरोपींनी सातारा येथे अटक होऊ नये म्हणून अर्ज केला . तो फेटाळला म्हणुन मुंबई हायकोर्टात अपिल केले . मुंबई हायकोर्टाने अपिल फेटाळले म्हणून दिल्लीला सुप्रीम कोर्टात अपिल केले . या सर्व केसेस एकटे जीवाचे रान करून हाताळण्यामध्ये मुख्य योध्दा होते कोरेगावचे विश्वास बर्गे .
या लढाई दरम्यान सातारचे मनसेचे संदीप मोझर यांनी ही संस्था चालवायला घेतल्याचे कळाले . त्यांनी या संस्थेचे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था असे नामकरण केले .मग त्यांच्या भारदस्त " किल्ला " नावाच्या बंगल्यात भेटायला गेलो . तेथे बरीच बाचाबाची ,भांडाभाडी , उलटेपालटे प्रश्न-उत्तरे झाली शेवटी त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यानां भेटायला शिवाजी पार्क मुंबईला गेलो . तेथे राजगडाचा अजब कारभाराची झलक पाहायला मिळाली . कार्यकर्त्यांनी त्यांना आता भेटता येणार नाही असे चांगल्या मराठी भाषेत सांगितले . एक अर्ज द्यायला सांगितले . त्याचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे . त्यांच्या ऑफीसमध्ये हसणाऱ्या राज साहेबांचे एक सुंदर पेन्सिल स्केच चित्रकार वासुदेव कामत सरांनी केले आहे . ते माझे अर्थभान पाहून मला हसत आहेत असा मला भास झाला . तेथून आल्यावर आणखी फोनाफोनी टोलवाटोलवी झाली . राजसाहेबांची भेट तर झाली नाही पण मुंबईचा प्रवास व जाणेयेणे भारी पडले. मग तेथूनच मोझरानां फोन केला व काही दिवसानंतर त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक दिला . थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .
सुप्रीम कोर्टाने आरोपींना अटक करून सर्वांचे पैसे परत द्यावेत असा आदेश दिला परंतू चतूर पोलीस सांगत होते आरोपी सापडत नाहीत . कोरेगावात बिनधास्तपणे फिरणाऱ्या या मंडळीना सगळेजण बघत होते पण फक्त पोलीसानां ते दिसत नव्हते .
मी कोरेगावला ,सातारला एसपी ऑफीस व वाईत सर्व ठिकाणी अर्ज केले होते त्याची परिणीती म्हणजे एक दिवस मला वाई पो .स्टेशन येथून फोन आला म्हणाले मी यादव पोलीस बोलतोय , तुमचे मुख्य आरोपी राजेन्द्र हिरालाल गांधी येथे आले आहेत . तेथे गेलो तर गांधीसाहेब निवांत गप्पा मारत बसले होते . यादवांना मी म्हणालो यानां ताबडतोब अटक करा हे फरारी आहेत .तर ते हसत म्हणाले मी त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला आहे .तुमचे सगळेच साडेतीन लाख रुपये ते द्यायला तयार आहेत तुम्ही काळजी करू नका . मग वाईचे पो. प्रमुख आनंद खोबरे यांना भेटलो त्यानां मुंबई हायकोर्टाची प्रत दिली व अटक करा असे सांगितले तर ते म्हणाले त्यांना अटक करता येणार नाही कारण तुमचे पैसे ते देत आहेत त्यांनी लेखी जबाबाचे आश्वासन दिले . त्या लेखी आश्वासनाची प्रत घेऊन मी सगळीकडे फिरलो व फिरतच राहीलो . सद रक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे काय ते कळाले .
फॉर्चुनर या मोठ्या अलिशान गाडीत फिरणारे राजेन्द्र गांधी एक लबाड , मवाली माणूस आहेत . त्यांनी वाईच्या मिलिंद खामकरांच्या घरी मला नेले फुकटचे चहापाणी करून मी आता यांनां सर्व रक्कम देणार असल्याचे सांगितले. मिलींद खामकरांनी लगेच साक्षीदार आहे असा होकार दिला .
दुसऱ्यादिवशी सकाळी १० वाजताच कोरेगावला गेलो . तेथे ऑफिसमध्ये राजेन्द्र गांधी आलेच नाहीत . शेवटी परत बाचाबाची , भांडणे मग त्यांच्या घरातून पन्नास हजाराचा चेक आला . चार लाखापैकी एक लाख मिळाले .
उरलेल्या तीन लाखांसाठी आजपर्यंत वाई पो .स्टेशन ,कोरेगाव पो . स्टेशन , मा . मुख्य अधिक्षक मुख्यालय सातारा , आर्थिक गुन्हे शाखा , ग्रामविकास मंत्री , सहकार मंत्री , खासदार उदयनराजे भोसले , आमदार मकरंद पाटील , पो. उपविभागीय अधिकारी वाई , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूल मंत्री , कोल्हापूर परिक्षेत्र पो .प्रमुख , सभापती विधानपरिषद , जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सहकारी संस्था , अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी व अर्ज करून थकलो .
2020 मध्ये माझ्या घराच्या पाण्याच्या टाकीवरून मी पडलो डाव्या पायाचे मुख्य हाड तुटले हॉस्पीटलचा खर्च एक लाख पन्नास हजार रुपये होता . करोनाच्या काळात पुण्यात हॉस्पीटलमध्ये ॲडमिट होतो खर्च दोन लाख होता त्यावेळी राजेन्द्र गांधी यांना अनेक फोन केले , गयावया करून माझ्याच पैशांची मागणी केली तर म्हणाले मी फक्त पाचशे रुपये पाठवतो . तीन लाखाची ठेव व पाचशे रुपये देत असल्याचे दाखवून उपकारकर्त्याची भावना ठेऊन बोलत होते . अशी माणसे वृत्तीने पोहचलेली ,निलाजरी व नालायक असतात .
मी पूर्णवेळ चित्रकार आहे .चित्रकारांना एक तर नियमित दरमहिना उत्पन्न नसते . कित्येक महिने चित्र काढायची व नंतर मुंबईला जाऊन चित्रप्रदर्शन करायचे . त्यातून मिळणाऱ्या मिळकतीत पुढचे चारपाच वर्ष बचत करत जगायचे . अशावेळी तीन लाख ही डोंगराएवढी अमाऊंट असते . अशावेळी ती चित्रे डोळ्यापुढे येतात ज्यातून पैसे निर्माण झाले . सगळी मेहनत वाया गेल्याचे फिलींग जाम त्रासदायक असते . संघर्ष त्रासदायक होतो .
या सगळ्या संघर्षात कोरेगावात त्याच्यांविरुद्ध एक माणूस खूप जिद्दीने लढत होता आणि तो म्हणजे श्री .विश्वास बर्गे .
वयाच्या सत्तरीत असणाऱ्या या माणसाला मधुमेह होता . वजन जास्त असल्याने चालता येत नव्हते . वेदना होत होत्या .पायाची , हाताची इतर अनेक दुखणी अंगावर घेऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले . आरोपीनां रितसर अटक झाली थोड्याच दिवसात न्यायालयात जामीन मिळवून मंडळी परत बिनधास्त झाली . अधूनमधून आम्ही दोघे भेटायचो . आपल्या देशात न्याय कधी मिळणार ? पतसंस्था , स्थानिक सहकारी संस्था , त्यांचे अधिकारी काय करतात ? पतसंस्थावर निर्बंध का नसतात ? मुळात पतसंस्था कशासाठी काढल्या ? त्यानां जबाबदार कोण ? त्याच्यां कारभारावर अंकूश का नाही ? सरकारच्या या अजब कारभाराची नेहमी चर्चा करायचो . आपण हरायचे नाही , शेवटपर्यंत लढत राहायचे , या सर्व प्रतिकूल कठिण परिस्थितीला सामोरे जायचे असे ते सतत म्हणत . सातत्याने कोठेतरी अर्ज करायचे . सगळ्या अधिकाऱ्यानां भेटत राहायचे . त्यांच्या कामकाजात काय प्रगती झाली त्याचे मेसेजेस व फोन करत असायचे .
वाईच्या लो.टिळक ग्रंथालयात माझे व्हॅली आणि फ्लॉवर्स या शीषर्काखाली सुंदर प्रदर्शन सुरु आहे . त्या प्रदर्शनाच्या तयारीत मी पूर्ण मग्न झालो होतो .
माझ्या प्रदर्शनाची व आजचे व्याखाते समीर नेसरीकर यांचे
"आजचे अर्थभान " ह्या व्याखानाची माहिती देण्यासाठी विश्वास बर्गे यांना मी मेसेज पाठवत होतो तर प्रोफाईलवर त्यांचा फोटो होता व त्याखाली मेसेज होता
" भावपूर्ण श्रध्दाजंली "
आजचे व्याखान कायम लक्षात राहील . तुमच्याकडे कमावलेल्या पैशांचे गुंतवणूकीचे अर्थभान नसेल तर आयुष्यात मनमुराद स्वच्छन्दीपणे जगण्याची गोची होती . आता ज्यावेळी मी घरातील दत्तदिंगबर या पतसंस्थेच्या आर्थिक फसवणूकीची फाईल उघडतो , त्यातील असंख्यं अर्ज पाहतो , त्या मुदत ठेवींच्या मूळ छोट्या आकारातील तीन लाखाच्या तीन कागदी पावत्या पाहतो त्यावेळी मी निराश होतो . मला ती रक्कम मिळविण्यासाठी कोणापुढे दाद मागावी हे कळत नाही .
लोकसभेच्या इलेक्शनसाठी मतदान करताना माझे हात थरथरतात . ही काळी शाई लावून आपण जीवनातील आनंदाला डाग लावून घेतल्याचे शिक्कामोर्तब होते . कोणी तरी मेसेज त्या काळात पाठवला होता " डाग अच्छे होते है " .
या देशात हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये मजेत ,निवांत ,आनंदाने जगत असतो . ललीत मोदी परदेशात चैन करत असतो . कित्येक दिवस झाले या महाभागानां अटक होत नाही . कायद्याचा किस काढला जातो . त्याचीच प्रेरणा हे दत्त दिगंबर पतसंस्थेसारख्या काही सहकारी संस्था घेत असतात . त्यानां अनेक अज्ञात हातांचा आधार असतो त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही . सर्वसामान्य भाजीवाले , फळविक्रेते , छोट्या पानपट्टीसारख्या दुकानदारांनी रोज साठवलेली छोटी ठेव या पतसंस्थेत जमा केली होती . पण गरीबांचे , कष्टकऱ्यांचे कष्टाने घाम गाळून जमवलेले पैसे हे संचालक गडप करतात . कित्येक कोटी रुपयांनां चुना लावून मजेत जगत असतात . अलिशान फॉर्चुनरमधून फिरत असतात . सक्षम पोलीस यंत्रणा , मोठमोठे राजकीय नेते , सामाजिक पुढारी , समाजसेवक त्यांच्यापुढे नांगी टाकतात ,त्यावेळी आपली भारताची लोकशाही काळ्या रंगाची चादर लपेटून गुपचूप अंधारात बसलेली आहे असे मला वाटते .
आता चार जून रोजी निवडणूकीचा निकाल लागेल नवीन खासदार निवडून येतील दिल्लीला जातील एकमेकांच्या विरोधकांवर टिकास्त्र करून लोकशाहीचा जयजयकार करतील . सामान्य माणसांच्या परिस्थितीत काय फरक पडेल ? कधी कधी वाटते न्याय मिळविण्याच्या प्रोसेस इतक्या कॉम्प्लीकेटेट ( गुंतागुंतीच्या)केलेल्या आहेत की न्याय मिळेपर्यंत माझ्या फोटोलाही " भावपूर्ण श्रध्दांजली " म्हणत हार घालावा लागेल की काय ?असे वाटते .
अशा लढाईत विश्वास बर्गे सारखा एक खरा सच्चा योध्दा धारातिर्थी पडला हे पाहून आठवणीने डोळे पाणावले . बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे बर्गे सर लढा देत कायमचे गेले .आता त्यांची एकटी अशिक्षित पत्नी हा लढा कसा पुढे चालू ठेवणार ? तिच्या जगण्याचे भवितव्य काय ? कोण तिला सावरणार ? एकंदर पुढे सगळं अवघड आहे . तिच्यापुढे अंधारयात्रेचा मोठा प्रवास आहे . हा अवघड प्रवास सर्वानां कळावा , त्यांनी यातून काही बोध घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच 🙏🙏
आता पैसे बुडविणारे राजेन्द्र गांधी व संचालक मंडळ फटाके फोडून मोठ्याने डिजे वाजवत असतील कारण आता केसेस लढणारा व बाजीप्रभू सारखा लढणारा लढवय्या बर्गे सर गेले . आता त्यांची मजाच मजा . आपल्याला कोणी वाली नाही हेच खरे . 🙏🙏
जय महाराष्ट्र ,🙏 जय भारत , 🙏
जय लोकशाही 🙏व जय आर्थिक अर्थभान !
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे✍️
9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा