ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

ग्रंर्थसखा

बदलापूरचे ग्रंथसखा - पुस्तकप्रेमी श्याम जोशी
      
       आजकाल सकाळ उजाडली आणि व्हाटसअप व फेसबूकवर सहज एक नजर मारली की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात .आजचा दिवसाचे स्पेशल कशासाठी आहे ? याचे सविस्तर कारण व उत्तर मिळते . तर आज 23 एप्रिल आहे व हा दिवस जागतिक पुस्तकदिन असल्याचे कळाले . पुस्तकांचा विषय निघाला आणि बरेच दिवस एका अवचित भेटलेल्या अवलिया व्यक्तीची प्रचंड आठवण झाली .
        दोन वर्षांपूर्वी आमच्या वाईच्या लोकमान्य वाचनालयाचे सचिव श्री . अनिल जोशी सर यांचा सकाळी १० वाजताच मोबाईलवर फोन आला की बदलापूर येथील एक गृहस्थ तुम्हाला भेटायला निसर्ग आर्ट गॅलरीत येणार आहेत . ते पुस्तकप्रेमी आहेत . पुस्तकांचा अफाट संग्रह आहे त्यांच्याकडे त्यानां जरूर भेटा.
          पुस्तकांचा संग्रह हा विषय निघाला की मला अचानक पाचगणीचे विद्यार्थी वाचनालय आठवले . मुख्य रस्त्यावरील शिवाजीमहाराज चौकातून वर टेबललॅन्डच्या रस्त्याला निघालो की थोड्या उजव्या बाजूला दवे यांचे लक्ष्मीविलास हॉटेल आहे . या गुजराती हॉटेलात फक्कड मिसळपाव मिळतो व त्याच्यासमोरच उजव्या बाजूला हे विद्यार्थी वाचनालय आहे . मी व माझे मित्र संजय भिलारे, घनःश्याम कारंजकर यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे हे वाचनालय . संध्याकाळी शाळा सुटली की आम्ही तिघेही पेपर व फुकट मिळणारी गोष्टींची पुस्तके वाचनासाठी वाचनालयात जायचो . तेथे कमरुद्दीन सय्यद नावाचे ग्रंथपाल होते . शर्ट पँट व डोळ्यावर जाड भिंगाचा चेहरा व नजर सतत रागावलेली असायची . आम्ही कधी वर्गणीदार नव्हतो . कारण फाटक्या अर्ध्या चड्डया घालणारे आम्ही गरीब होतो . कमरुद्दीनचाचाला याची पक्की जाणीव होती . पण पोरे नियमित रोज वाचायला येतात याचे त्यानां कौतुक होते . त्यांच्या बसण्याच्या टेबलामागेच लहान मुलांच्या गोष्टीं असलेले  एक कपाट पुस्तकांनी भरलेले होते . पेपर वाचून झाला की आम्ही चाचा कमरुद्दिनकडे बघायचो . तो नेहमीचाच डॉयलॉग आम्हाला पाठ झाला होता . आले फुकटे वाचक ! मग एखादी शिवी व कपाट उघडून देणार आम्ही एक एक पुस्तके घेऊन वाचताना पुस्तकांच्या नयनरम्य विश्वाचा अनुभव घ्यायचो . त्यामुळे वाचनालयाविषयी एक सुंदर कप्पा व आठवणी आहेत . पुस्तकांनी भरलेली ती खोली पंधरा वीस कपाटांचीच होती पण ती त्या काळात फार मोठी व जादूची वाटायची .
            साधारण अकरा वाजता एक पांढऱ्या रंगाची वॅगन गाडी गेटसमोर उभी राहीली त्यामधून  बुल्गानीन दाढी असलेले श्याम जोशी व त्यांच्यासोबत चष्मा असलेल्या व त्यांची लायब्ररी सांभाळणाऱ्या अर्चना कर्णिक मॅडम , एक ड्रायव्हर एक सहाय्यक उतरले . त्यांनी ओळख करून देताना सांगितले की मी मुंबईच्या जे जे स्कूलमधून शिकलोय टेक्सटाईल डिझायनचा विद्यार्थी होतो . त्यामुळे चित्रकला या विषयावरची जवळपास सर्वच पुस्तके माझ्याकडे आहेत व इतर सर्व विषयांची साधारण दोन ते तीन लाख पुस्तके माझ्याकडे आहेत . पाचगणीजवळ जे भिलार हे पुस्तकांचे गाव प्रसिद्ध झाले आहे ते माझ्याच मार्गदर्शनाखाली सुरु झाले आहे . माझ्याकडे एक लाख पुस्तके अजून आहेत त्यासाठी आम्ही एक नवी जागा शोधतोय आणि पुस्तकांचे नवे वाचनालय करण्यासाठीच मी तुमच्या जागेला भेट देत आहे . तीन चार लाख पुस्तके असलेला माणूस इतका शांतपणे मला सांगत होता की माझा त्यांच्यांवर विश्वासच बसेना . मग मी अनेक चित्रकला विषयावरचे ग्रंथाची नावे घेतली . चिन्ह प्रकाशन सतिश नाईकांचे अंक आहेत का हे विचारले तर सगळेच आहेत म्हणाले . इतिहास , भूगोल , सायन्स, आत्मचरित्रे, कथासंग्रह , कादंबऱ्या ,आत्मचरित्रे, दुर्मिळ ग्रंथ कोणतेही नाव सांगा आमच्याकडे ते ग्रंथ आहेतच. मग मी भुईसपाट चाट पडलो . ज्याज्या ग्रंथाची नावे सांगितली ते सगळे ग्रंथ आहेत म्हणाले . मग माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कदाचित थापा तर मारत नसतील ? एवढे ग्रंथ , एवढी पुस्तके , कशी ठेवत असतील ? कशी जपत असतील ? मग आम्ही जसे चित्रांचे वेडे तसे हे जोशी पुस्तकांचे वेडे असणार याची खात्री पटली . मग मी हळूच म्हणालो या थापा नसल्या तर तुमचे कौतुकच करायला पाहीजे पण माझा स्वभाव जरा शंकेखोर आहे . आता आज याक्षणीच आपण बदलापूरला गेलो तर ही पुस्तके मला दाखवाल का ? ते सहज म्हणाले की चला की मग वाट कशाला पाहायची ? निघू या !
             खरे सांगायचे तर मी असा अचानक प्रवासाला कधीच निघत नाही पण मनात शंका व पुस्तकांच्या असंख्य आठवणी असल्यामुळे मी लगेच तयार झालो . कपड्यांची रोजच्या लागणाऱ्या वस्तूंची एक छोटी बॅग आम्ही भरली व कधीही न पाहिलेल्या बदलापूरला निघालो . माझ्या गाडीत शेजारी जोशी सरांना बसवले . स्वाती व अर्चनामॅडम मागच्या सीटवर बसले . थोड्याच वेळात आमचा बदलापूरकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला आणि माझ्या मनात या जोशीबुवांविषयी प्रश्नच प्रश्न तयार होते जाताना त्यांचा पुर्वइतिहास मी त्यानां विचारत होतो . अनेक प्रश्नांची मनसोक्त उत्तरे जोशी सर देत होते . जुन्या आठवणी पुस्तके कशी मिळवली ? पुस्तकांचा छंद कसा लागला ? पुस्तकांनी जग पाहण्याची दृष्टी कशी बदलली ? एखाद्या चित्रकाराची एकेक चित्र बनवताना जशी आठवण असते तशीच एकेक पुस्तक जमा करताना किती चांगले वाईट अनुभव येतात याची उजळणी होत होती . अचानक मला कवी संदीप खरे यांची आठवण झाली . ते वसंतव्याख्यानमालेच्या भाषणात म्हणाले होते . पुस्तके जीवनात अपार आतून बाहेरून तुम्हाला बदलून टाकतात . तुमचे ठरलेले अनुभवलेले कयास विसरायला लावतात . ज्यांनी पुस्तकांवर खरे जीवापाड प्रेम केले त्यांच्या डोळ्यांत तुम्ही कधी पाहीले आहे का ? ते डोळे अपार प्रेमाने संवेदनशीलतेने भरलेले असतात . त्या पुस्तकप्रेमी माणसाचे हृदय विशाल असते. तेथे छक्केपंजे नसतात . अशी माणसे प्रेमळ असतात, बोलकी असतात त्यांच्या मनात खोट नसते . ते दिलखुलास हसतात व आनंदाने प्रत्येकक्षण जगत असतात . गाडी चालवत असताना मी हळूच जोशी सरांच्या डोळ्यात पाहायचो . खरेच होते संदीप खरे यांचे शब्द . हा माणूस असाच होता आणि कळतनकळत मी त्यांच्या स्वभावाच्या प्रेमात पडलो . कितीतरी दिवसांनी एक छान बोलणारा , छान ऐकणारा , कशाचीही तक्रार न करता आपल्या छंदात मग्न असलेला एक अनोखा मित्र मिळाला .
            श्याम जोशींच्या सोबत करताना बदलापूर कधी आले ते कळालेच नाही . 22 ऑगस्ट 1951 रोजी त्यांचा जन्म झाला आता पंच्चाहत्तर जरी पुर्ण केले असले तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही . त्यांचे वडील अंमळनेर येथे साने गुरुजींच्या सहवासात होते त्यामुळे त्यांचा स्वतःचा छोटा ग्रंथसंग्रह होता त्यामुळे वाचनाचा संस्कार लहानपणीच झाला होता त्यातूनच पुस्तकांची आवड लागली . कल्याण येथे कलाशिक्षकाची नोकरी लागली व पहिल्या पगारातून पुलंचे बटाट्याची चाळ हे पुस्तक खरेदी केले . मग संग्रह करायला सुरुवात केली त्यात दोन खोल्यासुद्धा अपुऱ्या पडायला लागल्या . पुस्तके मासिके , स्मरणिका, दिवाळी अंक , विस्मृतीत गेलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा गोळा करायचा नाद लागला . शेवटी पुस्तकांचा संग्रह एवढा वाढला की राहता बंगला पुरेना मग शाळेला राजीनामा दिला . बंगला विकून टाकला त्या पैशातून राहण्यासाठी छोटा फ्लॅट घेतला व ग्रंथसखा या वाचनालयाची निर्मिती केली . दोन लाख पुस्तके , दहा हजाराच्या वर मासिके अनेक दुर्मिळ दोलामुद्रिते, वाचकांसाठी खुली केली . ठाणे जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित ग्रंथालय , अभ्यासिका , सुमारे पन्नासजण एकत्र बसून वाचतील असे वाचनकक्ष निर्माण केले . हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की आता ४० ग्रंथसेवक कर्मचारी व सकाळी नऊ ते रात्री १० पर्यंत ग्रंथालयात काम करतात . चारहजार वाचक सभासद आहेत . शासकीय अनुदान न घेता फक्त वर्गणीवर चालवलेले एकमेव ग्रंथालय असावे . 2010 पासून संशोधन मंडळाची रिसर्च ब्युरोची स्थापना केलेली आहे . ग्रंथसंदर्भ सेवा अविरतपणे सुरु आहे . या संघर्षाची दखल अनेकांनी घेतलेली असून त्यानां आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत .












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्रंथसखा

बदलापूरचे ग्रंथसखा - पुस्तकप्रेमी श्याम जोशी 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚             आजकाल सकाळ उजाडली आणि व्हाटसअप व फेसबूकवर सहज एक नजर म...