ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

ग्रंथसखा

बदलापूरचे ग्रंथसखा - पुस्तकप्रेमी श्याम जोशी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚     
       आजकाल सकाळ उजाडली आणि व्हाटसअप व फेसबूकवर सहज एक नजर मारली की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात .आजचा दिवस स्पेशल कशासाठी आहे ? या स्पेशलचे सविस्तर कारण व उत्तर मिळते . तर आज 23 एप्रिल आहे व हा दिवस जागतिक पुस्तकदिन असल्याचे कळाले . पुस्तकांचा विषय निघाला आणि बरेच दिवस एका अवचित भेटलेल्या अवलिया व्यक्तीची प्रचंड आठवण झाली .
        दोन वर्षांपूर्वी आमच्या वाईच्या लोकमान्य वाचनालयाचे सचिव श्री . अनिल जोशी सर यांचा सकाळी १० वाजताच मोबाईलवर फोन आला की बदलापूर येथील एक गृहस्थ तुम्हाला भेटायला निसर्ग आर्ट गॅलरीत येणार आहेत . ते पुस्तकप्रेमी आहेत . पुस्तकांचा अफाट संग्रह आहे त्यांच्याकडे , त्यानां जरूर भेटा.
          पुस्तकांचा संग्रह हा विषय निघाला की मला अचानक पाचगणीचे विद्यार्थी वाचनालय आठवले . मुख्य रस्त्यावरील शिवाजीमहाराज चौकातून वर टेबललॅन्डच्या रस्त्याला निघालो की थोड्या उजव्या बाजूला दवे यांचे लक्ष्मीविलास हॉटेल आहे . या गुजराती हॉटेलात फक्कड मिसळपाव मिळतो व त्याच्यासमोरच उजव्या बाजूला हे विद्यार्थी वाचनालय आहे . मी व माझे मित्र संजय भिलारे, घनःश्याम कारंजकर यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे हे वाचनालय . संध्याकाळी शाळा सुटली की आम्ही तिघेही पेपर व फुकट मिळणारी गोष्टींची पुस्तके वाचनासाठी वाचनालयात जायचो . तेथे कमरुद्दीन सय्यद नावाचे ग्रंथपाल होते . शर्ट पँट व डोळ्यावर जाड भिंगाचा चेहरा व नजर सतत रागावलेली असायची . आम्ही कधी वर्गणीदार नव्हतो . कारण फाटक्या अर्ध्या चड्डया घालणारे आम्ही गरीब होतो . कमरुद्दीनचाचाला याची पक्की जाणीव होती . पण पोरे नियमित रोज वाचायला येतात याचे त्यानां कौतुक होते . त्यांच्या बसण्याच्या टेबलामागेच लहान मुलांच्या गोष्टीं असलेले एक कपाट पुस्तकांनी भरलेले होते . पेपर वाचून झाला की आम्ही चाचा कमरुद्दिनकडे बघायचो . तो नेहमीचाच डॉयलॉग आम्हाला पाठ झाला होता . आले फुकटे वाचक ! मग एखादी शिवी देणार व हळूच छोटे कपाट उघडून देणार . आम्ही तिघेही एक एक पुस्तके घेऊन वाचताना पुस्तकांच्या अनोख्या कथेच्या नयनरम्य विश्वाचा अनुभव घ्यायचो . त्यामुळे वाचनालयाविषयी एक सुंदर कप्पा व आठवणी माझ्या मनात आहेत . पुस्तकांनी भरलेली ती खोली पंधरा वीस कपाटांचीच होती पण ती त्या काळात फारच मोठी व अजबखाना जादूची वाटायची .
            साधारण अकरा वाजता एक पांढऱ्या रंगाची वॅगन गाडी गेटसमोर उभी राहीली त्यामधून बुल्गानीन दाढी असलेले श्याम जोशी व त्यांच्यासोबत चष्मा असलेल्या त्यांची लायब्ररी सांभाळणाऱ्या अर्चना कर्णिक मॅडम , एक ड्रायव्हर एक सहाय्यक उतरले . त्यांनी ओळख करून देताना सांगितले की मी मुंबईच्या जे जे स्कूलमधून शिकलोय . टेक्सटाईल डिझायनचा विद्यार्थी होतो . त्यामुळे चित्रकला या विषयावरची जवळपास सर्वच पुस्तके माझ्याकडे आहेत व इतर सर्व विषयांची साधारण दोन ते तीन लाख पुस्तके माझ्याकडे आहेत . पाचगणीजवळ जे भिलार हे पुस्तकांचे गाव प्रसिद्ध झाले आहे ते माझ्याच मार्गदर्शनाखाली सुरु झाले आहे . माझ्याकडे एक लाख पुस्तके अजून आहेत त्यासाठी आम्ही एक नवी जागा शोधतोय आणि पुस्तकांचे नवे वाचनालय करण्यासाठीच मी तुमच्या जागेला भेट देत आहे . तीन चार लाख पुस्तके असलेला माणूस इतका शांतपणे मला सांगत होता की माझा त्यांच्यांवर विश्वासच बसेना . मग मी अनेक चित्रकला विषयावरील ग्रंथाची नावे घेतली . चिन्ह प्रकाशन सतिश नाईकांचे अंक आहेत का हे विचारले तर सगळेच आहेत म्हणाले . इतिहास , भूगोल , सायन्स, आत्मचरित्रे, कथासंग्रह , कादंबऱ्या , आत्मचरित्रे, दुर्मिळ ग्रंथ कोणतेही नाव सांगा आमच्याकडे ते ग्रंथ आहेतच. मग मी भुईसपाट चाट पडलो . ज्या ज्या ग्रंथाची नावे सांगितली ते सगळे ग्रंथ आहेत म्हणाले . मग माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कदाचित थापा तर मारत नसतील ? एवढे ग्रंथ , एवढी पुस्तके , कशी ठेवत असतील ? कशी जपत असतील ? मग आम्ही जसे चित्रांचे वेडे तसे हे जोशी पुस्तकांचे वेडे असणार याची खात्री पटली . मग मी हळूच म्हणालो या थापा नसल्या तर तुमचे कौतुकच करायला पाहीजे पण माझा स्वभाव जरा शंकेखोर आहे . आता आज याक्षणीच आपण बदलापूरला गेलो तर ही पुस्तके मला दाखवाल का ? ते सहज म्हणाले की चला की मग , वाट कशाला पाहायची ? निघू या !
             खरे सांगायचे तर मी असा अचानक प्रवासाला कधीच निघत नाही पण मनात शंका व माझ्या स्वतःच्या पुस्तकांच्या असंख्य आठवणी असल्यामुळे मी लगेच तयार झालो . कपड्यांची रोजच्या लागणाऱ्या वस्तूंची एक छोटी बॅग आम्ही भरली व कधीही न पाहिलेल्या बदलापूरला निघालो . माझ्या गाडीत शेजारी जोशी सरांना बसवले . स्वाती व अर्चनामॅडम मागच्या सीटवर बसले . थोड्याच वेळात आमचा बदलापूरकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला . माझ्या मनात या जोशीबुवांविषयी प्रश्नच प्रश्न तयार होते जाताना त्यांचा पुर्वइतिहास मी त्यानां विचारत होतो . अनेक प्रश्नांची मनसोक्त उत्तरे जोशी सर देत होते . जुन्या आठवणी त्यानां आठवत होत्या .पुस्तके कशी मिळवली ? पुस्तकांचा छंद कसा लागला ? पुस्तकांनी जग पाहण्याची दृष्टी कशी बदलली ? एखाद्या चित्रकाराची एकेक चित्र बनवताना जशी आठवण असते तशीच एकेक पुस्तक जमा करताना पुस्तकांची आठवण असते . प्रसंगानुरूप किती चांगले वाईट अनुभव येतात याची उजळणी होत होती . 
           अचानक मला कवी संदीप खरे यांची आठवण झाली . ते वसंतव्याख्यानमालेच्या भाषणात म्हणाले होते . पुस्तके जीवनात आली की माणसाला अपार आतून बाहेरून तुम्हाला बदलून टाकतात . तुमचे ठरलेले अनुभवलेले दृढनिश्चय कयास विसरायला लावतात . ज्यांनी पुस्तकांवर खरे जीवापाड प्रेम केले त्यांच्या डोळ्यांत तुम्ही कधी पाहीले आहे का ? ते डोळे अपार प्रेमाने संवेदनशीलतेने भरलेले असतात . त्या पुस्तकप्रेमी माणसाचे हृदय विशाल असते. तेथे छक्केपंजे नसतात . अशी माणसे प्रेमळ असतात, बोलकी असतात त्यांच्या मनात खोट नसते . ते दिलखुलास हसतात व आनंदाने प्रत्येकक्षण जगत असतात . गाडी चालवत असताना मी हळूच जोशी सरांच्या डोळ्यात पाहायचो . खरेच होते संदीप खरे यांचे शब्द . हा माणूस असाच होता आणि कळतनकळत मी त्यांच्या स्वभावाच्या प्रेमात पडलो . कितीतरी दिवसांनी एक छान बोलणारा , छान ऐकणारा , दाद देणारा , मनसोक्त हसणारा , अभिमान नसलेला , आयुष्या विषयी कशाचीही तक्रार न करता आपल्या छंदात मग्न असलेला एक अनोळखी मित्र मिळाला .
            श्याम जोशींच्या सोबत प्रवास करताना बदलापूर कधी आले ते कळालेच नाही . 22 ऑगस्ट 1951 रोजी त्यांचा जन्म झाला , आता पंच्चाहत्तर वर्ष जरी पुर्ण केले असले तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही . श्यामसुंदर देवादास जोशी हे त्यांचे पूर्ण नाव . त्यांचे वडील अंमळनेर येथे साने गुरुजींच्या सहवासात होते त्यावेळी त्यांचा स्वतःचा छोटा ग्रंथसंग्रह होता त्यामुळे वाचनाचा संस्कार लहानपणीच झाला होता . त्यातूनच पुस्तकांची वाचनाची आवड लागली होती . कल्याण येथे कलाशिक्षकाची नोकरी लागली व पहिल्या पगारातून पुलंचे ' बटाट्याची चाळ ' हे पुस्तक खरेदी केले . मग संग्रह करायला सुरुवात केली . बंगला बांधला त्यानंतर त्यातील दोन खोल्यासुद्धा अपुऱ्या पडायला लागल्या . वेगवेगळी पुस्तके , मासिके , स्मरणिका, दिवाळी अंक , विस्मृतीत गेलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा गोळा करायचा नाद लागला . शेवटी पुस्तकांचा संग्रह एवढा वाढला की राहता बंगला पुरेनासा झाला . या छंदापायी मग शाळेलाही राजीनामा दिला . मोठा बंगला विकून टाकला त्या पैशातून राहण्यासाठी बदलापूर स्टेशनला लागूनच छोटा फ्लॅट घेतला . काही उरलेल्या व कर्ज काढलेल्या पैशातून बदलापूर येथे ग्रंथसखा या वाचनालयाची निर्मिती केली . दोन लाख पुस्तके , दहा हजाराच्या वर मासिके अनेक दुर्मिळ दोलामुद्रिते, दोलामुद्रिते म्हणजे 1867 च्या मुद्रणविषयक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची मुद्रिते. दोला म्हणजे पाळणा ही मिळविण्यासाठी अथक भम्रंती त्यांना करावी लागली होती .
            रोजची वर्तमानपत्रे वाचनासाठी वाचकांसाठी खुली केलीच पण त्यापुढे त्याचा विकास करत आज ठाणे जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित ग्रंथालय अभ्यासिका बनवली . सुमारे पन्नासजण एकत्र बसून वाचतील असे वाचनकक्ष निर्माण केले . हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की आता चाळीस ग्रंथसेवक [कर्मचारी] सकाळी नऊ ते रात्री १० पर्यंत ग्रंथालयात काम करतात . चारहजार वाचक सभासद आहेत . शासकीय अनुदान न घेता फक्त वर्गणीवर चालवलेले एकमेव ग्रंथालय असावे . 2010 पासून संशोधन मंडळाची रिसर्च ब्युरोची स्थापना केलेली आहे . ग्रंथसंदर्भ सेवा अविरतपणे सुरु आहे . या संघर्षाची कार्याची दखल अनेका संस्था , शासन व महामंडळांनी घेतलेली असून त्यानां आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत . श्याम जोशींचा जीवनप्रवास ऐकत असताना त्यांच्या धडपडीचे कौतुक वाटत होते .हा प्रवास संपूंच नये असे वाटले . रात्री आठनऊ वाजता आम्ही बदलापूर स्टेशनच्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी पोहचलो . तेथे सौ . रोहिणी जोशी व प्रसिद्ध लेखक रविंद्र गुर्जर यांची भेट झाली जवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले व जोशी सरांच्या फ्लॅटवर आलो .
             बदलापूर स्टेशनला लागूनच एक मोठा हमरस्ता आहे . त्या रस्त्यातून जातानाच एक मोठी कमान लागते त्या कमानीजवळच ही जुनी इमारत आहे . त्या इमारतीच्या सर्वात वर टॉपच्या टेरेसवर त्यांचा छोटासा फ्लॅट आहे . ह्यावन रूम किचन फ्लॅटला छोटे टेरस गार्डन असावे त्यावर पत्रा टाकून त्याचीच पाहुण्यांना राहण्याची सोय केली आहे . त्या रूमध्ये पत्रा असल्याने प्रचंड गरम होत होते . छताची गरम हवा सगळीकडे पसरलेली होती . चार पाच कॉटस टाकलेल्या होत्या . छोटेसे अल्टर केलेल्या बाथरूम वॉशरूमची सुविधा होती . अन भिंतीवर कपाटात व कॉटशेजारच्या मोकळ्या जागेत असंख्य नवीजुनी पुस्तके पहुडलेली होती . त्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही कारण शेजारीच बदलापूरचे मोठे स्टेशन असल्याने अनेक पॅसेंजर गाड्या थांबायच्या . त्यांचे भोंगे मोठ्याने वाजत असायचे . लोकलच्या गाड्यांचा रात्री खडखडाड सतत आवाज यायचा . गर्दी असल्याने वर्दळीचा रहदारीचा सतत आवाज मला सहन होत नव्हता . पुस्तकांच्या प्रेमापोटी या माणसाने चार हजार माणसानां आनंद मिळवून दिला पण स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी केली होती . आयुष्यभर असे राहण्याची त्यांनी सवय करून घेतली होती पण मला मात्र तेथे एकही दिवस राहणे अवघड आहे याची प्रचिती आली होती . सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो त्यावेळी बाहेर गर्दी पाहिली आणि मुंबईच्या उपनगरातही आता जागा उरली नाही याची प्रचिती आली . मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांमुळे लोकलमध्ये उभे राहण्यासाठीही जागा मिळत नव्हती .
              साधारण दहा वाजता आम्ही राहत असलेल्या इमारतीतच संपूर्ण तळघरामध्ये दुर्मिळ पुस्तके , मासिके, संदर्भग्रंथ यांची अतिशय योग्य पद्धतीने नंबरवार लावणी केलेली होती . दहा हजारांवर जुने दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध होते . जोशी सरांनी तेथे धीरुभाई अंबानींच्या जीवनावर प्रकाशित केलेले इटालीच्या भारी कागदावर मुद्रण केलेले अप्रतिम आत्मचरित्र दाखवले . त्याची छपाई व साईज व आकार कल्पनेपलीकडचा होता . तो ग्रंथ मिळाविताना किती भारी अनुभव आला त्याचा एक नमुनेदार किस्सा भारीच वाटला . तेथे चिन्हचे बरेच अंक वाचण्यासाठी उपलब्ध आहेत . त्यानंतर रस्त्यावरच पलीकडच्या बाजूला गाळ्यांमध्ये ग्रंथसखा वाचनालयाची उभारणी केली आहे . प्रत्येक ग्रंथावर नाव नंबर तर होतेच पण ग्रंथही लगेच सापडत होते . अगदी व्यवस्थित व नीटनेटकेपणा तेथे दिसत होता .
          कॅप्टन परांजपे यांच्या जागेत मोठ्या इमारतीमधील वाचनालय तर अप्रतिमच आहे . अनेक विद्यार्थी तेथे अभ्यास करत होते . ग्रंथांचे नियोजन व मांडणी सहज सोपी होती . ग्रंथाची विषयावार मांडणीमुळे ग्रंथ लगेच सापडत होते . कॉम्प्यूटरच्या नंबरीग स्किलमुळे ग्रंथालय सुसज्ज वाटत होते . वाचक व विद्यार्थी यानां त्यामुळे ग्रंथ लगेच हाताशी मिळत होते . जणू परदेशात आल्याचा भास होत होता आणि आम्ही ज्या माणसाने हे सर्व नियोजन केले त्या कुशल कारागिरासोबत होतो . कित्येक माणसे येतात व जातात पण त्याच्या कार्याची दखल मृत्यूनंतर कोणी घेईल याची शाश्वती नसते पण जोशीसरांचे कार्यच इतके अफाट आहे की या पुस्तक संग्रहाचा आवाका पाहताना ते कायम बदलापूरकरांच्या लक्षात राहतील . याच संग्रहालयाच्या वर अजून एक लाख ग्रंथ प्लास्टिक पेपरच्या आवरणात बांधून ठेवलेले होते . ती पुस्तके आता अंबरनाथ येथे दोन मोठ्या ग्रंथालयाची निर्मिती करून तेथे शिफ्ट केलेले जोशीसरांनी नुकत्याच दिलेल्या वाईच्या भेटीदरम्यान सांगितले आहे . अजून मी अंबरनाथ येथील वाचनालये पाहिलेली नाहीत . स्वतःला राहायला चांगले घर नसल्याची त्यानां खंत नव्हती पण त्यांच्या मुलासमान जपलेल्या ग्रंथाना घर मिळवून देण्याची जीवापाड धडपड मी पाहिली आहे , अनुभवली होती . अशा शहाण्या दूरदृष्टिच्या जोशी कुटूंबाला शासनाने सुसज्ज चांगला फ्लॅट शासनातर्फे देणगी म्हणून दिला पाहीजे . कारण ग्रंथसंपदा ही राष्ट्रीय संपती आहे त्याची जपणूक करताना आपले आयुष्य त्यांनी पणाला लावले आहे . श्याम जोशी व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनां कडक सॅल्यूट मारला पाहीजे . मला वाचायला लागणारी पुस्तके श्याम जोशी यांनी उपलब्ध करून दिली . मी मेंबर नसतानाही हा माणूस पुस्तके पाहण्यासाठी आला म्हणून उलट कौतुक केले . नंतरच्या आमच्या चार पाच भेटीत भिलारला जाताना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी वाईला आमच्या निसर्ग आर्ट गॅलरीला भेट दिली . कधी अंतर्नाद , कधी मासिक , कधी एखादे चित्रकारांनी प्रकाशित केलेले पुस्तक आठवणीने भेट दिले .
              पुस्तक दिनाच्या यादिवशी आणखी एक आठवणीतील प्रसंग मला कायम लक्षात राहिला आहे . साधारण 1982 चा काळ असावा . जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेली . मी नुकताच दहावी पास झालो होतो . आवड म्हणून निसर्गचित्रे रेखाटनाचा प्रयत्न करत होतो . मला कोणाचे मार्गदर्शन नव्हते व मला चित्रकलेची चित्रकारांची काहीच माहिती नव्हती . अशा काळात पाचगणीत बाथा स्कूल शेजारी राहणाऱ्या पेसी व डॅफनी वीरजी या पारसी दाम्पत्याची एक गोष्ट आठवतेय . त्याकाळात मी अनेकदा रस्त्याशेजारी बसून चित्रे काढायचो . एकदा या पारशी दाम्पत्याने त्यांच्या मेडस्टोन या बंगल्यात बोलावले . जेवायला घातले व विचारले की मुंबईला या पत्यावर ये तेथे माझ्या बहिणीच्या घरी चित्रकलेची पुस्तके आहेत ती तुला फुकट देतो . त्याकाळात मी साईनबोर्ड करायचो . थोडेफार पैसे होते .वयाने व अनुभवाने झिरो होतो . पहिल्यांदा मुंबईला एकट्यानेच लाल एसटीने प्रवास करून आलो . बॉम्बे सेंट्रलला उतरून बाळाराम स्ट्रीट या ग्रँटरोडच्या पत्यावर गेलो . तेथे सिलू वीरजी या शिल्पकार रहात होत्या . त्यांचे अकस्मात तरुण वयात निधन झाले . त्या जुन्या पारसी फ्लॅटमध्ये ट्रकभर चित्रकलेची पुस्तके होती . चित्रकारांचे रॉयल ॲकडमी कॅटलॉग्ज, बॉम्बे आर्ट सोसायटीचे कॅटलॉग्ज , मार्ग प्रकाशनाची , फोटोग्राफीची व इंग्रजीतील व्हॅन गॉग, टर्नर, पिसारो , पिकासो यांची आत्मचरित्रे , शिल्पकलेची, ॲनाटॉमीची पुस्तके यांचा ढिग पडला होता . पण ती पुस्तके नेणार कशी ? माझ्याकडे पैसेही नव्हते आणि घरभर ठेवण्यासाठी मोठे घरही नव्हते . मग मी तेथेच पडलेले दोन मोठे पुस्तकाचे बॉक्स घेतले मला चित्रमय वाटणारी काही पुस्तके त्यात भरली . वीरजींच्या पाया पडलो . आता पाचगणीला नेणार कशी ? दोन्ही बॉक्स हमालासारखे डोक्यावर घेतले . बाळाराम स्ट्रीट ते बॉम्बे सेंट्रल बसस्टॉप चालत निघालो . टॅक्सीचे पैसे नव्हते . घामाघुम झालो . उपासमार झाली . तडपडत कसातरी घरी आलो तर घरी सगळे काळजीत पडलेले . जुनी भंगार पुस्तके आणली म्हणून सगळ्यांनी नावे ठेवली . पण त्या पुस्तकांनी माझ्यातला चित्रकार सतत पेटता ठेवला . ते दोन बॉक्स मी कोठेही राहायला शिफ्ट झालो की सोबत ठेवतोच त्यातील दहा पुस्तके विजय आचरेकर या मित्राला अभ्यासाला दिली . आचरेकर आता सिनियर चित्रकार झाल्यामुळे नेलेली पुस्तके परत कधी देणार त्याची आजही वाट पहातोय . दोन बॉक्सची आता चार कपाटे पुस्तके झाली पण ही चारशे पुस्तके जपताना मला इतका त्रास होतो . चार लाख पुस्तके जपताना श्याम जोशी कसे सांभाळतात हे त्यानांच माहीत आहे .
          पुस्तके तुमचे डोके ठिकाणावर ठेवतात . माज चढू देत नाहीत . पुस्तके तुमची स्वप्ने सतत पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात . पुस्तकांचे विश्व वेगळेच असते बसल्याजागेवर ते पुस्तक जगाची सफारी करून आणते . तुमच्या कल्पनांना धार करण्याचे काम पुस्तके करतात . दुसऱ्याने लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करताना त्या लेखकाच्या भावनांशी एकरूप करण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते . पुस्तके फार मागे इतिहासाच्या तळाशी घेऊन जातात . त्या वीरांच्या दमदार लढाईशी आपल्याला एकरूप करतात . एखादे पुस्तक हसविते एखादे पुस्तक रडवते . आपल्या भावभावनांशी एकरूप करण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते . पुस्तके प्रत्येकाला प्रेरणा देतात . पुस्तके ज्ञान वाटतात . पुस्तकांमुळे भाषा सुधारते , पुस्तकांमूळे जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते . पुस्तकांची ताकद असामान्य असते एखादे पुस्तक त्या माणसाला पुर्णपणे बदलून टाकते . पुस्तकातील शब्दांची धार तलवारीसारखी असू शकते . पुस्तके माणसाचे जीवन समृद्ध करतात .
            बदलापूरचे श्याम जोशी , रोहिणी जोशी यासारखी माणसे आयुष्यात भेटल्यामुळे एक जिवंत नातेवाईक भेटल्याचा मला सतत भास होतो . आपल्यावर कोणी प्रेम करत नाही हा न्यूनगंड दूर होतो . जोशी दाम्पत्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ते आवडणाऱ्या माणसांवर निस्वार्थ प्रेम करतात . सतत प्रेरणा देतात उमेद देतात . दुसऱ्याचे कौतुक करताना शब्दांची काटकसर करत नाहीत . मनापासून उभारी देतात . खरेतर त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेऊन आर्थिक भरभक्कम रक्कम व पद्मश्रीसारखा पुरस्कार त्यानां दिला पाहिजे .
           पंच्चाहत्तरही न थकता पुस्तकांशी अखंड मैत्री करणाऱ्या जोशी दाम्पत्याला खूप निरोगी दिर्घायुष्य मिळो आणि त्यांचे मनातील अनेक संकल्प पूर्ण होवोत ही पुस्तकदिनी परमशक्तीला मनःपूर्वक प्रार्थना !

चित्रकार - सुनील काळे✍️
निसर्ग आर्ट गॅलरी [ वाई ]
9423966486
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्रंथसखा

बदलापूरचे ग्रंथसखा - पुस्तकप्रेमी श्याम जोशी 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚             आजकाल सकाळ उजाडली आणि व्हाटसअप व फेसबूकवर सहज एक नजर म...