गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

ऑर्थरसीट पॉईंट महाबळेश्वर - एक थरारक अनुभव

ऑर्थरसीट पॉईंट : एक थरारक अनुभव
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
                 महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्राची खूप प्रसिद्ध व निसर्गरम्य गिरीस्थाने आहेत. सातारा जिल्हा असलेले पाचगणी हे शैक्षणिक केंद्र आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध आहे .
       मी तर लहानपणापासून पाचगणीमध्येच वाढलो. पाचगणीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर या मराठी शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी खूप पावसाळ्यामूळे , सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना व बोर्डींग स्कूलला सुट्टी असायची . घराबाहेर प्रंचड पाऊस पडायचा त्यामुळे कुठे जाता येत नव्हते. अशावेळी मी सुट्टीत दरवर्षी लहानपणी महाबळेश्वरला जायचो .
           महाबळेश्वरला माझे काका राहत असत त्यांच्या मुलांनाही पावसाळ्यातच सुट्टी असायची. त्याकाळात पाऊसही प्रचंड आणि वेळेवर पडायचा . महाबळेश्वर मध्ये पावसामध्ये सर्वजण थंडीने खूपच गारठून जायचे.
पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे आजही मला आठवते की महाबळेश्वरची सर्व हॉटेल्स , बंगले , दुकाने घराच्या भिंतीचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून गवताच्या पेंड्या बांधलेल्या झावळ्यांनी, किंवा लोखंडी नळीच्या पत्र्याची उभी पाने लावून सर्व इमारती , घरे, शासकीय कार्यालये, श्रीमंतांचे बंगले पूर्णपणे एकच छोटा दरवाजा उघडा ठेवून बाकी पूर्णपणे बंद केलेल्या अवस्थेत असत .
त्या काळामध्ये निळे , पिवळे प्लास्टिक किंवा मोठ्या ताडपत्र्या वापरल्या जात नसत, ती पद्धत आजकाल सुरू झालेली आहे .
         महाबळेश्वरला माझे काका नगरपालिकेमध्ये काम करत होते यांचे नाव गंगाराम काळे त्यांना सर्वजण बापू म्हणत. बापू ,नानी त्यांची राजेश, संजय आणि सुरेखा नावाची मुलगी असा परिवार होता . त्यात पंधरा वीस दिवसांसाठी मी त्यात भर पडायचो . नगरपालिकेच्या पाठीमागे त्यांच्या सरकारी क्वॉटर्स होत्या .
पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस दाट धुके आणि थरकाप उडवणारी थंडी यामुळे बाहेर जास्त फिरता यायचे नाही घरांमध्येच सतत कोळशांची घमेल्यात शेकोटी पेटवून आम्ही पुस्तके वाचणे किंवा पत्ते व इतर बैठे खेळ खेळत असू .ज्यावेळी पाऊस कमी असेल त्यावेळी आम्ही जवळच्या महाबळेश्वर क्लब ,पोलो ग्राउंड ,वेण्णालेकचा परिसर , बाजारपेठ व जवळचे पॉईंट बघत असायचो.
             परंतु 13 किलोमीटर दूर असलेला ऑर्थरसीट पाईंट मात्र मला बघायला मिळत नव्हता, प्रत्येक वर्षी ऑर्थरसीट पाईंट बघणे हे माझे स्वप्न अधुरेच राहिले .
महाबळेश्वर मध्ये प्रत्येक जण बोलताना एकदा तरी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला पाहीजे असे जणू पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन वारकऱ्याने एकदा तरी घेतले पाहीजेच याच भक्तीभावाने बोलत असे , ऑर्थरसीट पॉइंटचे काही फोटोग्राफ , पोस्टकार्डस् मी पाहिली होती परंतू प्रत्यक्ष जावून दर्शन झाले नव्हते.
            कित्येक वर्ष स्वतःचे वाहन नसल्याने किंवा कोणी बाहेरचे नातेवाईक यांनीही आम्हाला ऑर्थरसीट पॉईंटचे दर्शन घडवले नाही . कारण आम्ही लहान होतो .
त्यामुळे ऑर्थरसीट पॉईंट विषयी माझ्या मनात कायमच उत्सुकता राहिली होती . एकदा तर मराठी शाळेची ट्रिप गेली होती परंतु त्यावेळीही ऑर्थरसीट पॉईंट लांब असल्याने पाहताच आला नाही.

            पाचगणीत राहत असूनही कित्येक वर्ष मी ऑर्थरसीट पॉईंट पाहिला नव्हता. पुढे शिक्षणासाठी कोल्हापूर ,पुणे व नंतर मुंबई येथे गेल्यामुळे मी आर्थरसीटच्या दर्शनाचे महत्त्व पूर्णपणे विसरून गेलो .

            1995 साली माझी जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनाची बुकींगची तारीख पक्की झाली होती. मी पाचगणीला सहा महिने केमोल्ड फ्रेम्समधले कंपनीचे काम अर्धवट सोडून आलो होतो. कंपनीचे मालक श्री.केकु गांधी यांनी मला सांगितले की तुझे जहॉंगीर आर्ट गॅलरी मधील प्रदर्शन यशस्वी झाले तर तू चित्रकार म्हणून काम कर पण जर तुला आर्थिक अपयश आले तर तुला परत कंपनीमध्ये नोकरी करावी लागेल . म्हणजे परत आयुष्यभर मुंबईला राहावे लागणार होते. कारण माझ्यावर घराचे बँकेचे कर्ज व मालकांचे कर्ज होते.ती रक्कम दिल्याशिवाय मी कंपनी सोडू शकत नव्हतो .
             मी मुंबईला रेल्वे प्रवासामूळे वैतागलो होतो त्यामुळे मला यश मिळवणे फार फार गरजेचे होते ते एक मोठे चॅलन्जच होते व ते चॅलेन्ज मी सहा महिन्यात पूर्ण करायचे गांभीर्याने स्विकारले होते .
खूप वर्षानंतर आल्यामुळे मी प्रथम पाचगणी येथील चित्रे काढली ,त्यानंतर इतर सर्व पॉईंट, प्रतापगड , तळदेव व तापोळा या ठिकाणी मी चित्रे काढायला गेलो होतो. चार पाच महिने मी वेडयासारखा सतत चित्रे काढत फिरत होतो.
              शेवटच्या टप्प्यात मात्र मला ऑर्थरसीट पॉइंटची जाऊन चित्रे काढायची होती परंतु येथे जाण्यासाठी माझ्याकडे स्पेशल स्वतःचे वाहन नव्हते. एक दिवस पाचगणीवरून सकाळीच चित्रकलेचे सर्व सामान घेऊन मी महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर पोहोचलो त्या ठिकाणी मला ऑर्थरसीटला जाण्यासाठी काही वाहन मिळते का ? याची मी चौकशी करत होतो, त्याचवेळी पाचगणीचे टॅक्सी चालक व शेजारीच राहणारे ओळखीचे जयवंत शिंदे (भाऊ ) नावाचे गृहस्थ भेटले . त्यांची स्वतःची टॅक्सी होती. ते पाचगणी वरून एका नवविवाहीत जोडप्याला घेऊन महाबळेश्वर दर्शनासाठी आले होते .मला सकाळी सकाळीच टॅक्सी स्टँडवर आवारात फिरत असताना त्यांनी पाहिले व मला कारण विचारले .मी त्यांना मला ऑर्थरसीट पॉइंटला जाऊन चित्र काढायचे आहे असे सांगितले . ते देखील तिकडे जाणार होते मग त्यांनी मला ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसवून मला आर्थरसीट पॉइंटपर्यंत पोहोचवले .
ऑर्थरसीट पॉईंटला जायच्या अगोदर आम्ही एलफिन्स्टन पॉइंटला गेलो .जाताना मार्जेरी पॉईंट, सावित्री पॉईंट, मंकी पॉईंट, कॅसल रॉक यांचेही दर्शन घेतले.
               मला मात्र कधी एकदा आर्थरसीट पॉइंटला पोहोचतो त्याची ओढ लागली होती सकाळी दहा वाजता आम्ही ऑर्थरसीट पॉईंटच्या जवळ पार्कींगजवळ पोहोचलो. उतरत असताना मला संध्याकाळी पाचच्या आतमध्ये परत निघण्याची जाणीव शिंदे टॅक्सीवाले यांनी वारंवार करून दिली होती.
माझे चित्रसामान घेऊन ऑर्थरसीट पॉॅईंटच्या दिशेने निघालो त्यावेळी आजच्यासारखी लाल दगडांची सुबक पायऱ्याची बांधणी झालेली नव्हती . सगळीकडे ओबडधोबड परिसरच होता.
तो दिवस सुट्टीचा किंवा वीकएंड नसल्यामुळे ऑर्थरसीट पॉईंटवर तशी फार गर्दीही नव्हती.
           मी निवांतपणे डावीकडच्या पायऱ्या उतरून ऑर्थरसीटच्या दर्शनासाठी निघालो . तेथे हॉन्टींग पॉईंट, एको पॉईंट, व माल्कम पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट असे छोटे छोटे पॉईंट लोखंडाचे सरंक्षक कठडे बांधून तयार केलेले आहेत. तेथून प्रतापगड, रायरेश्वर, कोळेश्वर व चंद्रगड या किल्ल्याचे दर्शन होत होते आणि हा सगळा परिसर खूप मनोहर , नयनरम्य दिसत होता.

            पुढचे दृश्य पाहताच मात्र मी आवाक झालो, आश्चर्यचकीत झालो. आता मी प्रेक्षणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारा ऑर्थरसीट पॉईंट पहात होतो.
आणि काय सांगू तुम्हाला..................... 
त्या रौद्रभीषण सृष्टीला न्याहाळताना नजरेचाच आवाका कमी पडत होता. ऑर्थरसीटचा तो उंच अजस्त्र तुटलेला कडा, पाताळपाणी दाखवणाऱ्या दोन्हीकडच्या खोल दऱ्या , त्या दरीतून उंचावणारे लहान मोठे डोंगराचे सुळके, सुळक्यांवर उन्हाचा प्रकाश पडल्यामुळे निळ्या जांभळ्या, व केसरी रंगात ते डोंगर चमकत होते. मी महाराष्ट्रातील सर्वात मोठया सह्याद्री पर्वताच्या अवाढव्य रांगाच रांगा पहात होतो.या कडयाच्या पाठीमागे ब्रह्मारण्य आहे आणि डोंगराच्या लांबच लांब दूरवर पसरलेल्या अस्पष्ट पर्वतरांगा मला एरिएल परस्पेक्टीव्हची जाणीव करून देत होत्या. डावीकडे सावित्री खोऱ्याची प्रचंड मोठी खोल खोल दरी , व उजवीकडे हिरवेगार जोर व कृष्णेचे खोरे झकास दिसत होते. खाली खोल दरीत पाहीले तर डोळे गरगरा फिरत होते,मनात भीती वाटत होती समोर आर्थरसीट पॉईंट्सचा आयताकृती चौकोनी कडा दिसत होता. त्या चौकोनी आकाराच्या सिमेंटच्या कठड्यावर रेलिंगला धरुन उभ्या राहिलेल्या छोट्या आकाराच्या मानवाकृती खूप लहान पण भारी दिसत होत्या . जणू चित्रातला गोल्डन पॉईंटच वाटत होता, तो चित्रात नव्याने शोधत बसायची गरजच नाही.खाली डोंगराच्या घड्या, कड्यांचे सुळके तयार होऊन डोंगरांच्या कड्यावर नैसर्गिक खांब तयार झालेले दिसत होते. त्यावर पडलेली सूर्याची नारंगी सूर्यकिरणे पाहून कडा वेगळ्या तेजाने चमकत होता. एकसंघ मोठी भिंत तयार होऊन हा भाग सहयाद्रीने मस्तकी घेतल्यासारखे वाटत होता.खाली खोऱ्यांवर आणि डोंगरावर लाल पिवळी कोवळी उन्हे पसरल्यामूळे ऑर्थरसीटच्या दरीत त्या रंगात काळही क्षणभर हरपला आहे असे वाटत होते. डोळे व मन हे दृश्य पाहिल्यानंतर तृप्त, तृप्त झाले होते.
         इतक्यात उन्हाचा खेळ संपून अचानक वातावरणात पडदा बदलावा तसा नवाच दृश्यमय खेळ सुरु झाला. आता ही पाताळदरी धुक्याने, ढगांनी भरून गेली आणि हळूहळू पांढरेशुभ्र ढग दरीतून वेगाने उसळी मारु लागले . शांतपणे, तरंगत येणाऱ्या ढगांचे पुंजकेच पुंजके आता अलगदपणे धुक्याचे पदर सुटून वर येऊ लागले आणि ह्या सृष्टीनेच अनोखा नवा साज परिधान करण्यास सुरुवात केली. सगळे खोरे ,विविध उंचीचे डोंगर, डोंगराचे सुळके एका नव्या रुपात समोर येऊ लागले. 
               डोंगराच्या घळ्या मऊलोकरीसारख्या धुक्यांच्या लोळांनी घनदाट निळ्या छायेने भरून जात होते .नभपटलावर निसर्ग विविध रंगछटा व प्रकाशाची उधळण करीत होता. धुके वरवर सरकत येत होते, आणि झुळझुळणाऱ्या हवेत वारा सुखद गारवा आणत होता. धुक्यांचे सुंदर लोळ अलगद शिखरांजवळ फेकल्यांसारखे वरच्या दिशेने येत होते .
                या सुळक्यांच्या वायव्य दिशेस कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जोर नदीचे खोरे घनदाट अरण्याचे आहे. या पॉईन्टवरून पुणे जिल्ह्यातील राजगड व तोरणा आणि रायगड जिल्यातील कांगोरी हे किल्ले व विशाल रमणीय परिसर दिसत होता. भोर तालुक्यातील काही डोंगर स्पष्ट अस्पष्टपणे दिसत होते. डोंगराची भव्यता व निसर्गसौंदर्य पाहून मन खूपच प्रफुल्लित झाले होते.
                   अशा भारावलेल्या अवस्थेमध्ये मी ऑर्थरसीट पॉइंटचे निरीक्षण करत होतो ऑर्थरसीट पॉईंटची पाहिलेली ही सर्व रूपे माझ्या डोळ्यात, मनात खोलवर भरून हृदयात साठवत होतो. कारण त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता, डोळयांचाच कॅमेरा करून लक्षपूर्वक सर्व इमेजेस डोक्यात साठवत होतो.
               त्या भारावलेल्या अवस्थेमध्येच मी माझे चित्र कामाचे साहित्य काढले आणि हे  जादूमय वातावरण चित्रित करण्यास सुरुवात केली. ऑर्थरसीट पॉईंट त्या सर्व वातावरणासह माझ्यात आणि मी त्याच्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो. मला आता आजूबाजूला माझ्या कोणी आहे , किंवा नाही याचे भानही राहिले नाही. अशा धुंदीतच मी ऑर्थरसीट पाँईट बेभानपणे रंगवला......... 
            एक सुंदर कलाकृती माझ्या हातून झाली होती , चित्रकाम करताना तीन चार तास कसे स्वप्नवत संपून गेले होते.

               चित्रकाम संपवून मला अजून ऑर्थरसीटच्या आयताकृती व्हयू पॉईंटच्या कठडयावर जायचे होते. मी पटापट चित्र सामान आवरून त्या मुख्य कठडयावर पोहचलो. एक मोठा ग्रूप तेथे खूप दंगामस्ती करत होता. येथून तर खालची दरी अजूनच भीषण दिसत होती ,पोटात भीतीचा गोळा आणणारी ती दरी खूप खोल खोल होती. या दरीमध्ये कोणी, कोल्ड्रींक्सचे बिल्ले, कोणी नाणी, तर कोणी हातरुमाल टाकून वस्तू तरंगत वर येतात का ? असा वाऱ्याचा अंदाज घेत होते. कोणी जोरजोरात ओरडून स्वतःच्या प्रतिध्वनींचा एको येतोय का याचा अंदाज घेत होते. खाली एक अंगठयाच्या आकाराचा विंडो पॉईंट नावाचा खडक दिसत होता. दोन उत्साही तरुण तिकडे चालले होते मग त्या अवघड छोट्या पायऱ्या उतरून मी देखील ऑर्थरसीटच्या खाली उतरलो.
           तेथून जे अनोखे ,अफलातून दृश्य दिसत होते ते पाहून मी निशब्दच झालो. दोन डोळे ते अवर्णनीय दृश्य पाहायला ,मनात साठवायला कमीच पडत होते. किती पाहू आणि किती मनात साठवू असा प्रश्नच पडत होता. अशा वेळी मी पूर्णपणे शांत होतो, त्या निसर्गाच्या
अनामिक विश्वनिर्मात्याला मी आपोआपच हात जोडून वंदन केले आणि मग तेथे एका दगडावर शांतपणे बसून बराच वेळ अवलोकन करत, ब्लॅक अँन्ड व्हाईट शाई व पेन्सीलने स्केचिंग करीत बसलो.

            चित्र रेखाटत असतानाच ऑर्थरसीटची दरी माझ्या हृदयातच उतरत जाऊन खोल ,खोल खूप खोलवर हृदयातच घर करून बसत होती, जणू मनात पाझरत, पसरत चालली होती. मी भान हरपून चित्र रेखाटताना मंत्रमुग्ध झालो होतो.

              अचानक सांयकाळचे वातावरण निर्माण झाले, सुर्यदेव हळूहळू गायब झाला, अंधार पडू लागला व मी एकदम भानावर आलो. मी ताबडतोब ऑर्थरसीटच्या वरच्या २०० फूट उंच कठडा असलेल्या आयताकृती व्हयू पॉईंटकडे निघालो. वर पोहचलो तर तेथे कोणीच नव्हते, आजूबाजूला पाहीले तर सगळे पर्यटक कधीच निघून गेले होते, छोटेमोठे दुकानदार,फोटोग्राफर्स, सगळेच्या सगळे सामान आवरून घरी निघून गेले होते. 
           आणि त्या प्रचंड दरीमध्ये मी एकटाच असल्याची भयाण जाणीव माझ्या मनाला झाली. काळोखात एक थरारक , अदृश्य भितीची एकाकीपणाची जाणीव मनात तयार झाली व मी ताबडतोब पाय उचलून पटापट चालत मुख्य रस्त्याकडे निघालो. मी कित्येक तास अन्नपाणी घेतल्याचेही आठवत नव्हते. आता भीतीने घशाला कोरड पडली होती,मग टायगर स्प्रिंग पॉईंटचे पाणी पोटभर प्यायलो, थोडा सावरलो व स्वतःलाच धीर देत चालत चालत कार पार्कींग स्पॉटवर आलो . माझा वेळेचा अंदाज पूर्ण चुकला होता. सगळे पर्यटक, टॅक्सीवाले, दुकानदार कोणी कोणीच उरले नव्हते. क्षणभर मी प्रचंड निराश झालो, हतबल झालो, स्वतःवरच खूप रागावलो,चरफडलो. कारण परत १३ कि.मी परतीचा मार्ग भीषण कंटाळवाणे व एकट्याने चालत करण्याचा होता . दिवसभर थकल्यामूळे चालत प्रवासाचा मार्ग मला फार फार अवघड दिसत होता.........
                 पणआता मला दुसरा कोणताच पर्यायही नव्हता, जड अतःकरणाने निराश पावले टाकत मी रस्त्याने चालत सुटलो. त्याकाळात मोबाईल नव्हते आणि बॅगेत बॅटरी, खिशात छोटा टॉर्चही नव्हता. 
साथीला होता फक्त चंद्राचा थोडा अंधुकसा संध्याप्रकाश............. 
             चालत चालत एकट्याला सावरत मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. प्रचंड घनदाट जंगल, माणूस भेटण्याची शक्यता नाहीच, पण या जंगलात वाघ, बिबळे, रानगवे, जंगली डुक्कर, श्वापदे ,अजस्त्र साप आहेत हे मला वाचनात आलेले होते. दबकत दबकत सावध पावले टाकत माझा प्रवास सुरु होता........
        एक दोन तास चालल्यानंतर मी थकलो, चालण्याची सवय होती पण अंधारात बसण्याचीही इच्छा नव्हती आणि मला अंदाजाने जाणवले की रस्त्यात आता एलफिन्स्टन पॉईंटचे वळण आले होते. चालत असताना अचानक त्या वळणातून मोठा गाडीचा आवाज आला. त्या अम्बेसिटर टॅक्सीचा प्रकाशझोत तोंडावर आला. मी खूप उत्साहीत झालो व दोन्ही हात वेगाने हालवत मी टॅक्सीवाल्याला जोरजोराने लिफ्टसाठी हातवारे केले.............पण दुर्देव................ 
त्याने माझ्याकडे जराही लक्ष न देता वेगाने कार तशीच पुढे नेली कारण आतमध्ये टॅक्सीत माणसे होती . आता माझी उरलीसुरली आशाही पुर्णपणे संपुष्टात आली.घोर निराशेने, भीतीने, अंधारामूळे त्रासल्यामुळे मी टॅक्सीवाल्याला दोन चार शिव्या मनातच दिल्या, त्याच्या खानदानाचा उध्दार केला. पण हे करुन काय उपयोग......... आता पुढचा प्रवास तर मला एकाकी चालतच करावा लागणार होता.

         मनाला सावरत, धीर देत मी नव्या दमाने चालण्यास सुरुवात केली. आयुष्यात पहिल्यांदा मला अशी खूप खूप एकटेपणाची जाणीव तीव्रपणे जाणवली, असं वाटत होते की हा भितीदायक प्रवास कधी संपणार आहे की नाही ? का आजचा माझा दिवस शेवटचा ठरणार आहे की काय ? एखाद्या जंगली श्वापदाने माझ्यावर आता हल्ला केला तर मी काय करू शकतो ? मला येथे कोण वाचवणार ? आपण इतके बेफिकीर ,बावळट, मुर्ख कसे आहोत, आपण तेथे चित्र काढत इतका वेळ थांबवयास नको होते........

कशासाठी थांबलो ?.. .......... ऑर्थरसीटसाठी.....................

               मग मला ऑर्थरसीट पॉईंटचाच राग येऊ लागला. झक मारली आणि येथे आलो. आता यापुढे कधीही आयुष्यात स्वतःची गाडी असल्याशिवाय ,कधीही या ऑर्थरसीट पॉईंटला यायचे नाही, यापुढे कधीही ऑर्थरसीटचे चित्रही काढायचे नाही व आलो तर स्वतःची गाडी घेऊनच चित्र काढायला येईन, अशी भीष्मप्रतिज्ञा मी मनातल्या मनात केली व माझे मलाच हसायला येऊ लागले. त्या भीषण रस्त्यावर मी मोठयाने हसलो कारण माझ्या खिशात जगण्यापूरतेही उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नव्हते आणि मी स्वप्न मात्र गाडीची पहात होतो.............

           आपण ज्यावेळी फार फार एकटे असतो त्यावेळी मन, शरीर, आत्मा आणि बुद्धी आपल्याशी आपोआप संपर्क करतात........ या मनात किती अनंत विचार येतात ना ? एका क्षणात आपण मनाने हजारो कि.मी.चा प्रवास करू शकतो, वाऱ्याच्या वेगाने, पक्ष्याप्रमाणे गगनात विहार करू शकतो....... मन हे अमर्याद ताकद असलेले न दिसणारे न उलघडणारे कोडे आहे . अथांग आहे मनाची प्रक्रिया समजून घेणे अदभूत ताकदीची गोष्ट आहे. पण एक नक्की मनाची ताकद एखादया गोष्टीवर पूर्णपणे लावली, केंद्रीत केली तर अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य होऊ शकतात..... जसे एखादे भिंग उन्हात एकत्रित किरणे करून सगळा कागद जाळू शकते तसे माझे मन व शरीर स्वतः स्वतःलाच सावरत सावरत ताकदवान बनवत प्रवास करत चालले होते..........

               आणि अचानक उजव्या बाजूकडे जंगलात खूप मोठी हालचाल झाली............ क्षणार्धात एक पाच सहा तगडे , धिप्पाड अगडबंब रानगवे अचानक मुसंडी मारुन बाहेर रस्त्यावर आले, आणि त्याच वेगाने डावीकडच्या जंगलात रस्ता क्रॉस करून घुसले. मी क्षणभर काहीच न कळल्यामूळे तेथेच स्तब्ध झालो..........

                आता माझी पूर्ण तंतरली होती, त्यानां मी दिसलो नाही की , त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष केले काय माहीती........ पण माझा हा प्रवास मला आणखीनच थरकाप करणारा वाटू लागला.......... खूप घाबरलो, वैतागलो, चिडत, चरफडत, स्वतःला, ऑर्थरसीटला, जगाला, दैवाला ,नशीबाला शिव्या घालत घालत चारपाच तासानंतर एकदाचा मी अंतिमतः महाबळेश्वर एसटी स्टॅन्डवर पोहचलो .त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते व एसटी स्टॅन्डवर मी परत एकटा हताश होऊन बसलो होतो. कारण मला पाचगणीला पुढे जायचे होते व यानंतर कोणतीही एसटीची गाडी उपलब्ध नव्हती.........
रस्त्यात खूप वाट पाहील्यानंतर मला एक मालवाहतूक करणारा ट्रकवाला भेटला आणि रात्री खूप उशीरा माझ्या घरी पोहचलो. त्या रात्री मी नीट झोपूच शकलो नाही. रात्रभर ऑथरसीटचा थरार , तो चालत केलेला थरारक भयानक त्रासदायक प्रवासाचा अनुभव मला रात्रभर वारंवार आठवत होता........ झोपून देत नव्हता .

                दुसऱ्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राला मी ह्या प्रवासाची हकीकत सांगितली तर तो टरकलाच.एवढया भयाण रात्री मी एकटा १३ कि.मी चालत आलो हे ऐकून त्याने कपाळावरच हात मारून घेतला. व उत्साहाने एका नव्या माणसाची ओळख करून दिली. त्याचे नाव स्वामी. या मिलींद स्वामीची एक मिलिटरी कलरची अम्बॅसीटर गाडी अर्जंट विकायची होती. त्याची किमंत ३५,००० रुपये होती.गाडी पाहताच ती मला खूप आवडली होती पण खिशात पैसे नसल्याने मी गप्प बसलो. दोन महिने थांब माझे मुंबईला प्रदर्शन आहे त्यानंतर सांगतो असे सांगून मी तेथून पळ काढला.

                1 ते 7 ऑगस्टला जहाँगीर आर्ट गॅलरीचे प्रदर्शन नक्की ठरले होते. माझी छोटी जलरंगातील चित्रे तयार होती. एक मोठे चार फूट बाय बारा फुटाचे टेबललॅन्डचे भव्य चित्र मी काढले होते पण आता मला ऑर्थरसीटचे चार फूटबाय सहा फुटाचे एक चित्र करायचे होते. मी मुंबईला नालासोपारा येथे रहात होतो. मध्ये बराच काळ गेला होता. स्केचवरून चित्र काढताना माझ्याकडे रंगीत रेफरन्स नव्हता. त्याकाळात मोबाईल किंवा लॅपटॉप नव्हता गुगलवर चित्र शोधणे आजच्या सारखे सोपे काम नव्हते . सुरुवात केली आणि काही आठवेनाच , मनासारखे रंगकाम होत नव्हते ,
मी ब्लॅन्क झालो होतो........
काम थांबवून थोडा शांत झालो.
मनाची सगळी शक्ती भिंगाप्रमाणे एकत्र केली .  ऑर्थरसीटचा धावा मनातूनच केला. तो थरारक दिवस आठवला, आणि सर्व मन, शरीर केंद्रीत केले आणि मग अचानक भिंतीवर ऑर्थरसीटचेच दिव्यदर्शन झाले. सगळे दृश्य स्पष्ट दिसू लागले ,सगळे चित्र स्पष्ट दिसू लागले , धुके, वारे, कडा, सुळके, ब्रम्हारण्य, विंडो पॉईंट, सगळे सगळे स्पष्ट दिसू लागले. जशी तन्द्री त्या थरारनाट्यादिवशी होती तशीच तंद्री आज पुन्हा लागली आणि त्या भारावलेल्या अवस्थेत एक भव्य चित्र मी रंगवत पुर्ण केले.
                 जहाँगीर आर्ट गॅलरीचा प्रदर्शनाचा तो पहिलाच मंतरलेला दिवस मला आजही आठवतोय. सांस्कृतिक मंत्री श्री. प्रमोद नवलकर उदघाटनासाठी सरकारी लवाजमा घेऊन आले होते. केकू गांधी, पेसी वीरजीअंकल प्रमुख पाहुणे होते....... कार्यक्रम छान पार पडला होता.
              दुपारच्या वेळी एक तरुण पारशी गृहस्थ त्यांच्या सात आठ वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते आणि गॅलरीत प्रवेश करताना समोरचे चित्र पाहताच... खूप मोठयाने .....
"ओ माय गॉड, धिस इज ऑथरसीट पॉईंट, महाबळेश्वर
 माय फेव्हरेट पॉईंट , 
वन्डरफूल ,अमेजिंग पेंटींग....... 
आणि अतिभावनाविवश होऊन वेगाने आमच्या टेबलाजवळ आले. Who is Artist ? असे विचारून त्यांनी माझा हात प्रेमाने हातात घेतला , हाताचे चुंबन घेतले व मनापासून अभिनंदन केले. हे चित्र मला आताच्या आता ताबडतोब विकत पाहीजे काय किंमत आहे ? असे त्यांनी विचारताच मला स्वामीची मिलीटरी रंगाची अॅम्बेसीटर कारच डोळ्यासमोर दिसली व मी थोडे घाबरतच त्यानां ३५,००० रुपये किंमत सांगितली. आणि ते गृहस्थ पुन्हा मोठ्याने ओरडले..........

ओन्ली थर्टी फाईव्ह थांऊजंड रुपीज ? ............

             आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी माझी होती. त्यांनी माझा हात हातातून सोडवला व ते लगेच बाहेर गेले आणि पाच दहा मिनिटात परत आले. त्यांच्या गाडीतून पस्तीस हजार रुपये रोख घेऊन आले. सगळे पैसे टेबलावर ठेवले व म्हणाले...... 

माय नेम इज मिस्टर रेडीमनी, आय अलवेज किप रेडी मनी विथ मी.......

              माझ्या आयुष्यात एकाच चित्राला एवढी मोठी रक्कम प्रथमच मिळाली होती....... आणि ती देखील रोख नव्या कोऱ्या करकरीत नोटांमध्ये.

भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही या म्हणीची प्रचिती मला आली होती...... मी आकाशाकडे पाहीले व मनातून ऑर्थरसीट पॉईंटला नमस्कार केला .

            प्रदर्शन संपल्यानंतर मी तडक पांचगणीत आलो आणि प्रथम मिलीटरी कलरची अॅम्बॅसीटर कार स्वामीकडून विकत घेतली..... रोख पस्तीस हजाराच्या कडक नोटा रु रोख दिल्याचे पाहून तोही चक्रावला...........

         थोडे दिवस  पाचगणीत गाडी चालवायला शिकलो आणि 
पहीली भेट दिली ती महाबळेश्वरच्याऑथरसीट पाँईटला....... 

नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करायला........

         त्या दिवशी मी निवांतपणे परत ऑथरसीट पाह्यला, पुन्हा स्केचेस केली ,कारण मला आता परतीच्या चालत प्रवासाची काळजी नव्हती.आता मात्र हा ऑर्थरसीट माझ्याकडे मैत्रीपूर्ण हसतोय असा मला भास होत होता ,त्या दिवसापासून ऑर्थरसीट माझा खूप जवळचा जीवाभावाचा मित्र झाला, त्याने मला भरभरून यश दिले , दोन पायावर चालत १३ कि. मी चालवले पण मैत्रीच्या परिक्षेत पास झाल्यानंतर मला नंतर आजपर्यंत चित्र काढण्यासाठी कधीही पायपीट करायला लावली नाही.

         आजही मी वैतागलो, कंटाळलो, निराश झालो, त्रासलो, उदास झालो की पहील्यांदा सरळ गाडी घेऊन ,स्केचबुक घेऊन ऑथरसीट पॉईंटला जातो.निवांतपणे भटकतो, चित्रे काढतो व हा माझा मित्र मला परत चेहऱ्यावर हास्य आणून प्रसन्न व शांत , उत्साही करूनच परत पाठवतो.
येताना आणि हो.......जर कोणी प्रवासी एकटाच रस्त्याने चालत येत असेल तर मी स्वतः गाडी थांबवून त्याला माझ्या गाडीत घेतोच............ कारण ऑर्थरसीटने मला तशी शिकवणच दिली आहे............ कोणाला पायपीट करून दयायची नाही, सगळ्यानां भरभरून आनंद द्यायचा........

           ऑर्थरसीट पॉॅईंटची गेल्या पंचवीस वर्षांत मी एकाच ठिकाणची अनेक माध्यमात वेगवेगळी चित्रे काढली, स्केचेस केलेली आहेत.
      अजूनही प्रत्येक वर्षी मला ऑर्थरसीटला का जावेसे वाटते ? त्याच त्याच ठिकाणी बसून चित्र काढावेसे का वाटते. ?  का ? याचे माझे मलाच नवल वाटते .

       याचा ज्यावेळी मी शांतपणे विचार करतो त्यावेळी अनेक गोष्टींचा उलघडा होतो. काही जण ऑर्थरसीट पॉईंटची तुलना अमेरिकेच्या ग्रँन्ड कॅनियनशी करतात. मला पर्सनली ही तुलना चुकीची वाटते. कारण स्वतः ऑर्थरसीट कोणाशीच तुलना करायला जात नाही. कारण तुलना सुरु केली की मग भांडणे आली, तु मोठा ? की मी मोठा ? हे हेवेदावे सुरु झाले, आरोप प्रत्यारोप, जेलसी सुरु झाली. मला या सगळ्यांच्या पलीकडे राहायला आवडते आणि ऑर्थरसीट तसाच मला तुलना विरहीत मुक्त जीवन जगायला शिकवतो . 
त्याला भेट दया अथवा देऊ नका तो कोणावरही नाराज होत नाही. 
त्याचे कोणी कौतुक करा अथवा करू नका, त्याला काहीही फरक पडत नाही.
आणि सर्वात म्हणजे ऊन, प्रचंड पाऊस, धुके, वादळ, वारा, वीज यांचे कितीही नैसर्गिक आघात झाले तरी तो सगळे सोसतो, तो कधीही तक्रार करत नाही उलट प्रत्येक ऋतूंमध्ये त्या त्या महिन्यात ऋतूशी पूर्णपणे सामावून जाऊन, वेगवेगळी गोजिरी रुपे धारण करुन हजारो पर्यटकांना त्यांच्या अगणित रुपांची नव्याने ओळख करून देत असतो. रोज नवा अनोखा पोशाख परिधान करून सर्वानां प्रसन्नपणे रिझवत असतो. खंबीर रहा, येणाऱ्या सर्व संकटानां धीराने, कणखरपणे, न घाबरता सामोरे जा, माघार घेऊ नका , सतत प्रयत्न करत रहा असा संदेश देत असतो.

                ऑर्थरसीटचा शोध ब्रिटीश अधिकारी सर चार्लस मॅलेट यांचा मुलगा, ऑर्थर मॅलेट याने लावला. मॅलेट कुटूंबाचा मोठा दबदबा होता त्या काळात. 
                १८५३ साली एप्रिल महिन्यात ऑर्थर मॅलेटची २६ वर्षीय पत्नी अन् अवघ्या ३२ दिवसांची केट नावाची मुलगी या दोघींना व त्यांच्या नोकरानां सावित्री नदीतून प्रवास करताना बोट उलटून जलसमाधी मिळाली. त्यातील कोणीच वाचले नाही. स्वतःला झालेले आणि हृदयात न मावणारे हे मोठे दुःख विसरण्यासाठी ऑर्थर या उंच जागी येऊन एकटाच बसत असे. या दरीतून खाली पाहीले की सावित्री नदीच्या बाणकोट भागाचं अंधुकसे दर्शन होते पत्नी व कन्या ऐन उमेदीत अचानक गमावल्यामूळे विरह, दुःख, निराशेत होरपळणाऱ्या ऑर्थरला ही भरभक्कम दरी त्याला प्रचंड आधार देई. त्यामूळे ऑर्थर दुःख विसरून जात असे..........
आणि ही कथा ऐकल्यामूळे तर ऑर्थरसीट मला का भावतो हे लक्षात आले, कारण माझीही एकूलती एक मूलगी लहान असतानाच देवाघरी गेली . ऑर्थरचे व माझे दुःख सारखेच असल्याने हा पॉईंट आणखीनच आवडू लागला.......
 
सर्वानां दुःख विसरा आणि जीवन छान, स्वच्छन्दी, उमेदीने जगा, कितीही आघात झाले, अडचणी आल्या ,अचानक कोणतीही संकटे, परिस्थिती विपरीत आली तरी मनाने सशक्त रहा खंबीरपणे तोंड दया , लढा दया असा संदेश हा ऑर्थरसीट पॉईंट आपल्या सर्वांना देत रहातो..........

महाबळेश्वरला जाऊन जर तुम्हीऑर्थरसीट पॉईंट पाहीला नाही..... तर खरे महाबळेश्वर, 
खरा सह्याद्रीच तुम्ही पाहीला नाही.......... 
निसर्गाचा खरा थरारच तुम्ही अनुभवला नाही असेच म्हणावे लागेल.............. 

मी तर हा थरार अनुभवलाच आहे .
एकदा तरी तुम्ही देखील महाबळेश्वरच्या ऑर्थरसीटला भेट  द्या . त्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! 💐
तुम्हाला प्रवासात एका नव्या थराराचा नक्की अनुभव मिळेल .


✍️सुनील काळे ( चित्रकार )
३२ निसर्ग  बंगला
मेणवली रोड, मु .पो भोगाव
ता. वाई. ,जि. सातारा ४१२८०३
मो.नं.9423966486
Sunilkaleartist@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...