इनायत व कोल्हापूरच्या आठवणी
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
वाईजवळ तीन किमी मेणवली गावाजवळ खेडेगावात निसर्ग आर्ट गॅलरी सारखा प्रोजेक्ट सुरु करताना एक जवळचा मित्र म्हणाला अरे , या आडबाजूला पाचगणी महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून इकडे गॅलरीला कोण येणार एकदम फ्लॉप आयडीया आहे . मी सुद्धा त्याचा निराशावादी सुर ऐकून मनातून कचरलो , प्रदर्शनाचा थोडा वेडा व वेगळा प्रयत्न आहे पण 7 मे ते 7जून पर्यंत एक महिना प्रयत्न करूया अन्यथा गॅलरी पुढे सुरु ठेवायची का नाही ते नंतर ठरवू असे ठरले.
पद्मश्री श्री .अच्युत पालव यांच्या शुभहस्ते उदघाटन केले .
पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा थोडी गर्दी कमी होती पण नंतर हळूहळू पावसाने मे महिन्यातच उच्छाद मांडला व आणखीनच नैराश्य वाढले . आणि अचानक सकाळी आठ वाजताच मोबाईलवर फोन आला . सुनिलभाई कैसे हो ? तुम्हारी आर्ट गॅलरी देखने के लिए मुंबईसे सोला लोगोंकी मिनी बस लेकर मुंबईसे वाईमें आया हूँ । गुगल मॅप भेजो , मै इनायत पित्तलवाला बोल रहा हूँ।
थोड्याच वेळात एक मिनी बस आमच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाली आणि त्या गाडीतून बोहरी जमातीच्या ड्रेसमधील काही महिला व पुरुष मंडळीची टिम गॅलरीत दाखल झाली .
1985 साली मी बारावी सायन्स पास झाल्यानंतर घरच्यांचा विरोध स्विकारून आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर कोल्हापूरला आलो होतो . कसलाही बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता . कोल्हापुरच्या आयटीआय कॉलेजसमोर मला कलानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता . त्यापूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट व पुण्याच्या अभिनवला प्रवेशासाठी प्रयत्न केला होता . ती दोन्ही गजबजलेली आर्ट स्कूल पहिल्यानंतर दूर आडरानात एकमजली फार भव्य बांधकाम नसलेले कलानिकेतन पाहून मी थोडा निराश झालो होतो .
प्राचार्य अरविंद मेस्त्रींनी पहिल्याच दिवशी विचारले कोल्हापुरात कुठे राहणार ? मी म्हणालो माहीत नाही , पहिल्यांदा आलोय येथे , माझ्या ओळखीचेही कोणी नाही व नातेवाईकसुद्धा नाहीत . त्यादिवशी एसटी स्टॅन्ड वर झोपलो . सकाळी झाडूवाल्याने उठवले तेथे तोडांवर पाणी मारले व तीन चार किमी चालत पुन्हा कॉलेजला दाखल झालो . दुसऱ्या दिवशी परत मेस्त्रीसरांनी विचारले कुठे राहीला रात्री ? मी एसटी स्टॅन्डवर राहीलो हे ऐकताच ते माझ्याकडे आश्चर्याने पाहून त्यांच्या शिपायाला म्हणाले बापू याची जरा सोय कर इतर मुलांबरोबर याला दुपारी जेवायला दे .
संध्याकाळी बापू केळुस्कर मला बाजुच्याच कॉलेजशेजारी असलेल्या मोरे कॉलनीतील एका बंगल्याच्या तळमजल्यावर घेऊन गेला . तेथे कॉलेजमध्ये शिकणारे संजय देसाई , इनायत पित्तलवाला , गंगाधर गोंधळी व रामदास जगताप ही एलेमेंटरी कमर्शियल व एटीडीला शिकणारी मुले माझ्याच वयाची होती . त्यांनी फौंडेशनला शिकणारा असून मला लगेच त्यांच्या ताफ्यात सामावून घेतले . बापू केळुस्करने आमच्या पाचही जणांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय त्याच्या घरी केली होती . बापू जवळच एका बंगल्याच्या आवारात औट हाऊसमध्ये रहात होता .
पहिल्या दिवशी मी त्या बंगल्यात गेलो तर चष्मा लावलेला , खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बागेत खूर्ची टाकून पुस्तक वाचत बसलेला होता . बापूने गेटवर ओळख करून दिली व पाया पडायला सांगितले आणि विचारले ओळखलेस का हे कोण आहेत ते ? मी नाही म्हणालो .
हे आहेत भालजी पेंढारकर . चंद्रकांत मांडरे असलेला महाराजांचा चित्रपट पाहीलास का ? यांनीच बनवला तो . मी तो चित्रपट पाहिलेला होता पण भालजींना प्रथमच पहात होतो . मग त्यांनी कोल्हापूरी टोनमध्ये विचारले व्यायाम करतोस का नाय ? मी नाही म्हणालो . मग त्यांनी बापूला सांगितले रोज दहा जोरबैठका मारल्याशिवाय याला खायला देऊ नको . बापू लगेच होय म्हणाला .दिवसा कलानिकेतन व रात्री जयप्रभा स्टुडीओत रात्रीचा वॉचमन म्हणून बापू केळूस्कर काम करायचा .
या काळात माझी या ग्रुपसोबत घट्ट मैत्री सुरु झाली . इनायत अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचा होता . मुंबईला गोरेगावला राहत होता . त्याचे वडील व काका कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांचा स्टुडीओ होता . त्यावर्षी जेजे स्कूल व बान्द्रा स्कूलमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळेच तो नाईलाजाने कोल्हापूरला आला होता . तो वेगळ्या धर्माचा असूनही कधीही त्याने कोणाशी वादविवाद केला नाही . आम्ही कोल्हापुरात सगळे नवखे व समान अडचणींना सामोरे जात होतो . एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकानां मदत करत होतो .
सकाळ संध्याकाळी दहा जोरबैठका मारायच्या , गंगावेशीवर जाऊन म्हशीचे धारोष्ण दूध प्यायचे , केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाटकांचे बोर्ड रंगवायचे , कधी जयप्रभा स्टुडीओत छोटे मोठे सेट रंगवायची कामे करायचो . कोल्हापूरकर खूपच हौशी मंडळी त्यावेळी छत्र्यांवर नावे टाकण्याची फॅशन होती. कधी गाड्यांच्या नंबर प्लेटा , साईन बोर्ड रंगवायचो . निसर्गचित्रणाचा नाद आणखी पक्का होण्याचे कारण म्हणजे स्वतः अरविंद मेस्त्री कधी कधी कॉलेजच्या आवारातच लँडस्केप करायचे . चंद्रकांत मांडरेचे संग्रहालय राजारामपूरीत त्यावर्षी तयार होत होते . पन्हाळा , रंकाळा , खाणीचा परिसर , कसबा बावडा , शालीनी पॅलेस , न्यू पॅलेस , भवानी मंडप याठिकाणी स्केचिंग व निसर्गचित्रणासाठी जायचो . त्याकाळात टाऊन हॉल म्युझियम , शिवाजी चौकातील डॉ. काटे यांच्या हॉस्पीटलमध्ये आबालाल रहिमान , अरुल राज , पॉल राज ,चंद्रकांत मांडरे , एस.एम . काझी , बाबुराव पेंटर ,रविंद्र मेस्त्री यांच्या कलाकृती पहायला मिळायच्या . एस.निंबाळकर यांच्यामूळे अनेक चित्रकारांच्या ओळखी होत होत्या . त्या सर्वांमध्ये कायम लक्षात राहील्या त्या प्रेमा भोसले मॅडम आमच्या सर्वांच्या फौडेंशनच्या कडक शिस्तीच्या आदर्शशिक्षिका . त्यांच्यामुळे चित्रकलेचा पाया खरोखर पक्का झाला . त्या फार जिव्हाळ्याने शिकवायच्या त्यांच्या असाईनमेंट पूर्ण करणे चॅलेंज असायचे .महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दहा स्केचिंग करणे त्याकाळातील सर्वात मोठी टास्क असायची . माझा नवा रूम पार्टनर कागलचा अमृतराव पाटील व मी रोज चालत जात स्केचेस करायचो . चित्रांचा पसारा वाढल्यामुळे मी बाजूच्याच प्रकाश कोठावळे यांच्या बंगल्यात शिफ्ट झालो पण जेवणासाठी आम्ही एकत्रच बापू केळूस्कर यांच्याकडे जायचो .
कोल्हापूरची माणसे साधी व सतत मदतीचा हात पुढे करणारी मंडळी . भरपूर भांडणार , तांबडा पांढरा हाणणार , एकमेकानां शिव्या घालणार पण माणुसकी जपणार . चाळीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरकर मित्र व मैत्रिणी आजही संपर्कात आहेत काही वर्षांपूर्वी आम्ही छान गेट टू गेदर केले होते . कोल्हापूरला वेळ व संधी मिळाली की जाण्यास मी नेहमी तयार असतो . ते दिवस सोनेरी व कायम लक्षात राहणारे होते .
चाळीस वर्षांपासूनची ही मैत्री इनायतने व मी आजही टिकवून ठेवलेली आहे . इनायत एक वर्ष पूर्ण करून परत मुंबईला गेला व मी त्याचवर्षी पुण्याला आलो . पुढे बरीच वर्ष आमचा संपर्क नव्हता . तरुणपणातील दोघांचेही त्यावेळेचे काळेभोर केस आता पांढरेशुभ्र झाले आहेत . कोव्हीडच्या काळात त्याची मिसेस गेली . दोन्ही मुलींची लग्ने होऊन एक बँगलोर व एक मुंबईत स्थायिक आहे .इनायत आता एकटा मीरा रोड येथे राहतो .
निसर्ग आर्ट गॅलरी पाहण्यासाठी व मला भेटण्यासाठी चाळीस वर्षांनंतर उरामध्ये साठवलेल्या अनेक आठवणी घेऊन हा मित्र सर्व नातेवाईकानां घेऊन मुंबईवरून वाईला भेटायला आला . मित्रत्व जपण्याची ओढ असली व एकमेकांविषयी आदरपूर्वक खरे प्रेम असले की माणसे प्रत्यक्ष भेटतात नाहीतर फेसबुक व्हॉटसअपच्या आभासी जगात मित्र नातेवाईक शेजारून चालले तरी ओळख दाखवत नाहीत भेटणे तर फार फार दुरची गोष्ट असते . एक मित्र प्रत्यक्ष भेटणे म्हणजे एक आठवणींचा अध्याय असतो . त्याच्यासोबत घालवल्या क्षणांची मनाच्या करण्यामध्ये उजळणी असते . तो एक ठेवा असतो अविस्मरणीय गोष्टींचा .
आता वाटते बरे झाले गॅलरी सुरु केली नाहीतर अशा दूर माणसांच्या गर्दीत मुंबईसारख्या शहरामध्ये हरवलेल्या मित्राची प्रत्यक्ष भेट कशी झाली असती ? इनायतच्या भेटीमुळे कोल्हापूरातील दिवस आठवले .
त्यामुळे आता निसर्ग आर्ट गॅलरी पुढे सुरु ठेवायचा निश्चय केला आहे .
तुम्ही देखील या , जमेल तसे वेळ काढून या .
सर्वांना सप्रेम निमंत्रण आहेच .
सोबत कॉमेंटसमध्ये गूगल मॅपची लिंक दिलेली आहे .
फेसबुकवर इन्स्टाग्रामवर Nisarg Art Gallery या पेजला फॉलो करा. तेथे गॅलरीचे रोजचे अपडेट आहेत .
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
निसर्ग आर्ट गॅलरी
मेणवली धोम रोडवर नाना फडणीस वाड्यापासून अर्धा किमी मुख्य रस्त्यालगत .
मु.पो भोगाव , ता.वाई ,
जिल्हा . सातारा - 412803
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत .
सर्वांना मुक्त प्रवेश [No Entry fee]
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
चित्रकार सुनील काळे✍️ 9423966486