ब्लॉग संग्रहण

रविवार, १ मार्च, २०२६

पानगळ

पानगळ ..................
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

      माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहतात याचा विधात्याला सुद्धा पत्ता लागत नाही . जीवन नेमके कशासाठी जगायचे ? जगताना आपण नेमकी दिनचर्या कशी ठरवायची ? आपण स्वतःला नेहमी उत्साहित , आनंदी कसे ठेवायचे याचा विचार मला रोज सकाळी उठल्यापासून पडतो. कारण सतत आनंदी व उत्सव साजरे करण्यासारखे दिवसभरात काय तरी घडले पाहीजे याची वाट पहावी लागते .
      माणसे स्वप्न पाहतात , त्या स्वप्नानां प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अहोरात्र झटतात . सतत अवघड यातना झेलत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना प्रत्येक वेळी झुंजावे लागते तरच यशप्राप्ती होते .
     पाचगणीमध्ये ब्रिटिशांनी निवासी शाळा बांधल्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लडवरून नामवंत शिक्षक आणले . या शिक्षणतज्ञानां राहण्यासाठी व उद्योगपती श्रीमंताना राहण्यासाठी अलिशान बंगले बांधले . सुदैवाने पूर्वी या सर्व बंगल्यामध्ये मला जाण्याचा योग आला . त्यावेळी राहणारे स्थानिक माळ्यांची मुले शाळेत शिकायला असायची . आमच्या घरासमोर एसटी स्टॅन्ड होते व त्यापाठीमागे ' दि आर्क पॅलेस ' नावाचा नबाब बिजलीखान यांचा बंगला होता . मी व माझा मित्र घन:श्याम रोज संध्याकाळी अभ्यास करायला जायचो . नबाबसाहेब मोठे प्रेमळ गृहस्थ होते . ते आमच्यासारख्या गरीब मुलानां अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचे. खडीसाखर , शिरा , वाटीभर दूध सर्व मुलानां देत असत . त्यांच्या बंगल्यामध्ये अलिशान कलाकुसर केलेले सागवानी सोफासेट , डेकोरेटीव्ह खुर्च्या , सागवानी ॲटींक शिसम लाकडाचे पलंग, उंची कपाटे व त्यांच्या पूर्वजांचे भव्य आकारातील तैलरंगातील चित्रे भिंतींना शोभा आणत असत . त्या घरात एक भव्यतेचा अहसास देणारी नीरव शांतता असे . पिवळसर रंगाचे बल्ब व अलिशान झुंबरे त्या ऐश्वर्याला शोभा देणारे होते . त्याच्या विरुद्ध वातावरण माझ्या घरी होते . पुढे दुकान असायचे तेथे नेहमी गिऱ्हाईकांची गर्दी असायची . आतमध्ये कामगार व त्यांची कामाची गडबड , आतमध्ये घरात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भरपूर माणसे असत . सेपरेट बेडरूम , हॉल , अभ्यासाची खोली अशी रचना किंवा भानगडच माहिती नव्हती . सगळीकडे सतत हल्लाकोळ , आवाज व बडबड सुरु असायची . नीरव शांतता हे त्यांनां माहीतच नव्हते .
        ब्रिटिशांनी जाताना हे एकरात पसरलेले बंगले पारशी , इराणी , गुजराथी , बोहरी , मुस्लीम , ख्रिश्चन  श्रीमंत व्यक्तींना विकले . त्यामुळे आता त्याठिकाणी हॉटेल्स , सॅनिटोरियम्स , शाळा आहेत. भव्य इमारत , उतरत्या छपरांची बांधणी सभोवताली असंख्य झाडे, फुलांचा बागबगीचा , गुलाब व स्थानिक फुलांची सजावट केलेल्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या सर्व बंगल्यात आजही आहेत .
      विरजी फॅमिलीचा ' मेडस्टोन ' , अदाजानिया फॅमिलीचा ' मेहेरबाय हाऊस ' 
बेबी पाईंट शेजारी फर्नांडीस यांचे 'एनफिल्ड ' पोलीस स्टेशन ग्राऊंडच्या मागचा सोहराब मोदींचा बंगला , टाटांच्या मालकीचा 'टाटा टेक्सटाईल ' जिमी पंथकीचा 'डलवीच हाऊस ' डॉ . मर्चंट यांचा ' चिस्तिया मंजील ' असे अनेक बंगले मी पाहिलेले आहेत . बिलिमोरीया स्कूल , इल पलाझो हॉटेल , प्रोस्पेक्ट हॉटेल, न्यू इरा स्कूल अशा ठिकाणच्या बागा मला आजही आवडतात . सिल्व्हर वृक्षांची उंचच उंच झाडे व त्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर मनाला फार मोहवून टाकत असे . मग गेली पन्नास वर्ष या परिसरात राहिल्यामुळे आपलाही एखादा असा बंगला असावा अशी स्वप्ने मला पडू लागली .
         एखाद्या उद्योगपतीला , व्यापाऱ्याला , कारखानदाराला बंगल्याचे स्वप्न पूर्ण करायला अवघड नसते कारण त्यानां आर्थिक पाठबळ व कुटूंबाची साथ असते. त्यासाठी मोठी आर्थिक गणिते असतात ती सोडवायला मित्रमंडळी असतात . पण मी पडलो चित्रकलेच्या प्रेमात . तेथे नियमित उत्पन्न नाही . कलाप्रेमींची साथ नाही . साताऱ्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही आर्ट गॅलरी नाही अशा विरुद्ध वातावरणात बंगला बांधण्याचे मुंगरीलालके हसीन स्वप्न होते . पण स्वाती व मी हार मानली नाही . आपले स्वप्न पाचगणीत होणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले . वाईजवळ कमी बजेटमध्ये मग मेणवली गावाबाहेर आम्ही जागा घेतली व ' निसर्ग ' बंगल्याचे स्वप्न दहा वर्षांपूर्वी पूर्ण केले .
         स्वप्न धडपड करून पूर्ण झाले पण त्या स्वप्नांना साकार झाल्यानंतर टिकवून ठेवणेही महत्वाचे असते. अठरा हजार स्क्वेअर फूट जागा पाच हजार स्क्वेअर फूटांचे घर व बागबगीचा तयार केला . उत्साहाने आंबा , रामफळ , नारळ , चिक्कू , लिंबू , पाम , केळी , डाळींब , फणस , सप्तपर्णी , तूती अशी अनेक प्रकारची झाडे लावली . झाडे लहान असताना त्यांनां योग्य खतपाणी व नीगा राखण्यासाठी मेहनत केल्याने झाडे भरपूर उंच झाली . पण आता त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे . जास्वंद, सदाफूली , झेंडू ,सुर्यफुले यांनी जवळपास 300 कुंड्या त्यांनां नियमित पाणी देणे , खुरपणे , खते टाकणे अशी असंख्य कामे वाढली . त्यासाठी स्थानिक माळी किंवा एखादे छोटे कुटूंब शोधायला सुरुवात केली पण यश मिळाले नाही . वाईला एम आय डी सी आहे . तेथे गरवारे , एचपी , मालाज जॅम ,अथर्व फौडेंशन यासारख्या असंख्य कंपन्या आहेत . आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी व तरुण मुले आता शेतीपेक्षा या कंपन्यामध्ये कामाला जातात तेथे त्यांनां चांगला रोज मिळतो . बायकानां नेण्या आणण्यासाठी बसची सोय केली आहे . त्यामुळे शेतात बेननी करण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा पंधरावीस हजार रुपये मिळत असल्याने सगळे अशा कंपनीत काम करण्याला प्राधान्य देत आहेत . मग तुमच्या घरकाम व माळीकामाला विचारतो कोण ? शेवटी त्यांचे पगारांचे आकडे ऐकून आम्ही माघार घेतली . आमची दोघांनी कामे वाटून घेतली . आता लढाई खरी सुरु झाली .
      सकाळी उठलो की बागेत फेरफटका मारतो आणि लगेच लक्षात येते की आज काय काय कामे करायची आहेत . कधी पाला पाचोळा पडलेला असतो ,कधी झाडाची फांदी तुटलेली असते ,कधी पाणी मारायचे कधी झाडू मारायचा असतो . अशावेळी लक्षात येते बंगल्याचे नुसते स्वप्न पाहणे हे सोपे काम आहे पण बंगला व त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे , मेंटेनन्स करणे हे कधीही न संपणारे काम आहे. पण कोणी मदतनीस नाही खंत वाटत असे . या मदतनीसाची वाट तरी किती दिवस पहाणार ? अस्वच्छता तर पाहवत नाही मग आता स्वतःला "आत्मनिर्भर "करणे गरजेचे ठरते .हातात झाडू घेऊन साफसफाई मेंटेनन्सची कामे करावीच लागतात .घरकामाला तर पर्यायच राहत नाही .
       माणसाला एकाच कामाचा लवकरच कंटाळा येतो तसाच मलाही कंटाळा येतो पण ब्रिटीशकालीन बंगला पाहण्याचे स्वप्न अंगाशी आल्याचे दुःखही होते. कारण मोकळ्या जागेत पालापाचोळा नेहमीच पडतो .
      एकदा सकाळीच लक्षात आले की कोणी शेतकऱ्याने ऊसाचे पाचट पेटवल्याने संपूर्ण परिसरात काळे भूसकट तण सगळीकडे पसरलेले होते . वाऱ्याने उडून सगळीकडे पालापाचोळा काडीकचरा पडलेला होता . मोठी पानगळ झाली होती .मग लगेच झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली. आणि तीन चार तासात पंचवीस तीस बादल्या झाडांची पाने गोळा केली. सर्व परिसर स्वच्छ केला होता . बंगल्याच्या बाहेर मोठ्ठा सुक्या पानांचा ढिग तयार झाला होता . त्या पानगळीच्या पानानां पेटवले व मी आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो .
         निसर्गाचा काय भरोसा नाही हे लवकरच माझ्या लक्षात आले . भयंकर मोठी वावटळ व वेगवान वाऱ्याचा झंझावात सुरु झाला होता . भर दुपारी एखादे सुनामी सारखे चक्रीवादळ सुरु झाले होते. जेवढा परिसर तीनचार तास खपून स्वच्छ केला होता तेथे पुन्हा मोठी पानगळ होत होती . पावसासारखी पाने टपाटप पडत होती . धुळीचा लोट चक्राकार फिरून फिरून या पानानां गरगर फिरवत आपटत होता . सगळीकडे अहःकार सुरु होता . डोळ्यांना फक्त धुळीचे लोट दिसत होते . मी तसाच स्तब्ध होऊन खुर्चीवर बसलो . माझी मती गुंग झाली होती विचार करण्याची बुद्धी संपली होती समोर पानांचा ढिग पडलेला दिसत होता . मी हतबल झालो होतो . डोक्याला हातच लावून बसलो कारण मी पूर्ण निराश झालो होतो .
सगळीकडे वाळलेली पिवळसर असंख्य पानेच पाने पडलेली होती . वाऱ्याचा झंझावात सुरूच होता पाने पुन्हा पुन्हा पडतच होती जणू भयंकर प्रलयकाळ आताच संपलेला होता . . .
       अशा या भर दुपारच्या चक्रीवादळात मी सुन्न बसलेलो असतानाच अचानक चारपाच पाने माझ्या अगांवर पडली . त्यातले एक आंब्यांचे पान होते . ते पान चक्क माझ्याशी बोलूच लागले. मी तर एकदम आश्चर्यचकीतच झालो . असे पान एकदम बोलू कसे शकते . नीट पाहतो तर खरेच पाने बोलत होती . .
    काय झाले मित्रा ? एवढा काय निराश होऊन डोक्याला हात लावून बसला आहेस ? अरे ही पानगळ होती . आता पानगळीचे दिवसच आहेत . निसर्गचक्र सतत सुरुच असते . नवी पालवी फुटणार असते . नवा चमत्कार घडणार असतो नवी धुमारी फुटणार असते . कालचक्र सतत सुरु असते . काळ कोणासाठी थांबत नसतो . 
कारण पानगळ ही होणारच असते . . . . . .
      तु ज्या बंगल्याची वर्णने केलीस तेथे आता पुन्हा जा . गावच्या  रजिस्टर मालमत्ता ऑफीसमध्ये जरूर जा . तेथे असणारे सातबारा पहा . या सातबाऱ्यात तुला आता बदल दिसतील . ज्या मालकानां तु ओळखत होतास ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत . तेथे नवे मालक आले आहेत. काही जणांनी त्यांच्या मालकीचे  बंगले विकले काही जणांची वारस रुपाने नवी पिढी आली . काळाचा महिमा अपरंपार आहे . जुने जाणार नवे येणार हे बदल सतत घडतच असतात . या बदलानां स्विकारावेच लागते . काही झाडे तशीच आहेत तर काही झाडे सरकारी माणसांनी काही झाडे नव्या मालकांनी तोडली . काही बंगले तसेच आहेत तर काही बंगल्यांना बुलडोझर लाऊन मालकांनी नवी हॉटेल्स बांधली आहेत . परिसर तोच असतो पण माणसे जिथे जिथे जातील तेथे तेथे नव्या गोष्टी करतील . सृष्टीचा हा नियमच आहे नव्याचा स्विकार करत जुने पाठीमागे सोडून द्यावेच लागते .
कारण पानगळ ही होणारच असते . . . . .
         त्या जीर्ण पानाने माझ्या डोळयात पाहिले आणि विचारले किती वर्ष झाली ही झाडे लावून ? दहा वर्षांपूर्वी छोट्या नर्सरीतून तू आम्हाला आणलेस , मोठ्या प्रेमाने जमीनीत लावण केलीस , खतपाणी टाकलेस , विटांचे जमीनीवर छोटे कुंपन केलेस , ऊनवाऱ्यात पडू नये म्हणून काठीचा आधार दिलास . बघता बघता आम्ही झाडमंडळी 10 ते 20 फूटापर्यंत उंच भरारी मारली .
लहानपणी हरितद्रव्ये भरूभरून मिळाली हिरव्या रंगात न्हाऊन निघालो . आता नीट बघ बरे ? मी पान हातात घेतले नीट पाहीले पानाचा रंग पिवळा झाला होतो . त्याच्या पर्णरेषा सुकल्या होत्या . मध्येच पूर्णपणे आरपार भोके पडलेली होती . शीरा उघड्या झाल्या होत्या . एकंदर पान म्हातारे झाले होते . त्याचा अवतार सुकल्यामुळे जीर्ण झाला होता . पान शांतपणे म्हणाले आता आकाशाशी गवसणी घालण्याचे दिवस गेले . आता या काळ्या मातीची ओढ लागली आहे . तु कसा आता सगळी पाने गोळा करतोस व आम्हाला बाहेर मुखाग्नी देतोस तेथे आमची राख होते . ही राख त्या काळ्या मातीत किंवा कृष्णेच्या पाण्यात वाहत जाते . तसेच तुमचे माणसाचे जीवन . तुम्हीही म्हातारे होता . केस पांढरे होतात . शीरा आकसतात . चेहऱ्याचे तेज कमी होत जाते . हातपाय थरथरतात . कितीही श्रीमंत असा कितीही पैसेवाले असा कितीही हुशार डॉक्टर कसलेही विज्ञान कसलेही औषधोपचार तुमचा जीव वाचवू शकणार नाहीत , कितीही सौंदर्यांचा अभिमान असो, कितीही ज्ञानाचा गर्व असो , कितीही मोठ्या घरातले वारसदार असो . निसर्गकालचक्र कोणालाच सोडत नाही . कधी सुनामीसारखे वादळ येईल , कधी करोनासारखी महामारी येईल , कधी गाडीचा , रेल्वेचा , विमानाचा अपघात होईल . कधी डॉक्टरांचे औषधोपचार चुकतील तर कधी स्वतःचेच दुर्लक्ष कडेकपाऱ्यातून किंवा साधे चालत असलात तरी किरकोळ अपघात झाल्यामुळे तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला हे जग सोडावेच लागते . सृष्टीचा कालचक्राचा नियम कधीच कोणाला चुकत नाही .
         आता मला पानगळीचा त्रास होत नाही , मला पानाने त्याची पूर्ण हकीकत ऐकवली त्याचा सारांश एवढाच कळाला की तुम्ही कोणीही महान व्यक्ती असा किंवा साधी माणसे असा , कोणत्याही धर्माचे असा , छोटे कर्म करणारे असा वा महान कर्म करणारे असा आपला सर्वांचा प्रवास या पानांसारखाच आहे . अलगद झाडापासून निघायचे दुरच्या प्रवासाला . कितीही अडचणी येवोत आनंदाने प्रवास करत राहायचे .

पानगळ ही होणारच असते . . . . . . 
पानगळ ही होणारच असते . . . . . . 
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃   
 ✍️ सुनील काळे 9423966486 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पानगळ

पानगळ .................. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃       माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू , त्याचे विचार ,त्याच्या अपेक्षा किती वेगाने वाढत राहत...