माणसे दोन रंगाच्या कोटांनां खूप घाबरतात, एक पांढऱ्या रंगाच्या व दुसरा काळ्या रंगांच्या . पांढऱ्या रंगाच्या कोटांशी संपर्क आला की माणसे खाटेवर आडवी पडलेली असतात , तिथे गप्पगार पडून औषधपाणी घेत राहायचे असते कारण तेथे प्रश्न विचारले की गाठ प्राणाशी असते . दुसरा पर्याय नसतो आणि आपल्या शरीराविषयी आपण अज्ञानी असतो त्यामूळे जे समोर येईल त्या उपचारांना स्विकारायचे याला देखील पर्याय नसतो .
काळ्या कोटातील दुसऱ्या व्यावसायिकांचे नाव म्हणजे वकील . वकील ही जमात अतिशय हुशार, चतुर मंडळीमध्ये मोडते ( त्यानां काही लोक टगे असं म्हणतात, असं मी बाहेरुन ऐकलेले आहे ते माझे व्यक्तीगत मत नाही . ) परमेश्वराने या वकील मंडळीनां घडवताना थोडा असा काही बेमालूम फॉर्म्यूला बनावलेला असतो की
" शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये " असे का म्हणतात याचा वारंवांर प्रत्यय त्यांना भेटल्यावरच येतो .
पण कधी कधी असे काही प्रसंग इच्छा नसताना चुकून काही जणांच्या वाटयाला येतात की त्यांना कोर्टाची पायरी चढावीच लागते .नाईलाजाने मग काळ्या कोटातील काही टग्यांच्या टगेगिरीला , प्रतापाला सामोरे जावेच लागते .
आयुष्यातील गेली चाळीस वर्ष माझे चित्रकाराचे चित्रमय आयुष्य अडचणींचे असले तरी कोर्टात जायचा कधीच प्रसंग आला नव्हता . एक दिवस अशीच अचानक माझ्यावर वेळ आली की मला कोर्ट कामासाठी वकील करणे भाग पडले . मी चित्र निर्मितीमध्ये निरनिराळे प्रयोग करण्याची वृत्ती असल्याने मी वेगवेगळ्या काळ्या कोटातील वकील टग्यांना भेटत सुटलो .
प्रथम गेल्या गेल्या पाचशे रुपये टेबलावर ठेवायचो आणि माझी (रड ) कथा सांगायचो . माझी कथा सांगितली की मोठया आशेने,उत्साहाने त्यांच्या प्रतिसादाची वाट पहायचो .थोडया वेळातच मला समजून यायचे की माझे पाचशे रुपये डुबीत खात्यात जमा झालेत . त्यांच्यातला उसना उत्साह व पुढे कसलीही खात्री, उमेद मिळत नसल्याचे पाहून मी जड अंतःकरणाने निरोप घ्यायचो .
अनेक जणांना भेटल्यावर मला हे कळले की या वकीलांना तुमच्या व्यक्तीगत भाव भावनांशी, जाणीवांशी काही घेणेदेणे नसते त्यानां हवा असतो फक्त एक पैशांचा व्यवहार, व समोरची व्यक्ती या व्यवहारांच्या गणितात बसत असेल , त्यांच्यापासून भरपूर आर्थिक लाभ होणार असेल तरच त्यांची गाडी पुढे जाते .
पण मी आता सांगणार आहे तो माझा वेगळाच अनुभव .
मी अनुभवलेल्या काळ्या कोटातल्या एका वेगळ्याच माणसाची कथा. या वकीलाचे जीवनातील टगेगिरी सोडून त्याव्यतिरिक्त इतर व्यवहार , जीवनशैली, प्रतिभा पाहून मी आचंबित झालो आणि त्यांचे कौतुकही वाटले . काळ्या कोटाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला . आपण एखाद्या पेशाला सरसकट नकारात्मक नजरेतून पाहत असतो .. ......पण वस्तुस्थिती ,अंतरंग मात्र काही वेगळेच असते . प्रत्येक क्षेत्रात काही अपवाद असतात याची ही मनोमन खात्री पटली .
अॅड . उमेश सणस "तोरणा " १२१४ , रामडोह आळी, वाई . या पत्यावर मी पोहचलो त्यावेळी आजही पाचशेची नोट वाया जाणार या भुमिकेतूनच मी बोलायला सुरुवात केली . माझे आईवडील कित्येक वर्षे रहात असलेल्या भाड्याच्या घरातुन त्यांच्याच पुतण्याने एक दिवस कुमार्गाने , कपटाने त्यानां निराधार केले . संसार साहीत्य व इतर सर्व सामानाचा कसा कब्जा घेतला याची मी हकीकत त्यानां मी सांगत होतो .
माझी सर्व गोष्ट ऐकल्यानंतर मोबाईल मध्ये पहात असतानाच मला त्यांनी शांतपणे मोठा धक्का दिला . " तुमचा चुलत भाऊ माझ्याकडे एकदा आला होता . त्यामूळे मी तुमची केस घेऊ शकत नाही . " तुमचा चुलत भाऊ नालायक व दूष्ट आहे . माझी सल्ल्याची फी त्याने दिली नाहीच , नंतर साधा कसला संपर्कही केला नाही . एक लक्षात घ्या फक्त वकीलच टगे आणि फसवे नसतात , तर काही पक्षकार देखील चालू आणि डबल टगे असतात . आता मी तुम्हाला एक सल्ला देतो तुमचे वडील आयुष्यभर भाडयाने राहीले, आणि त्या भाड्याच्या घरासाठी तुम्ही न्याय मागायला निघाला आहे . घर दुसऱ्याचे, सातबारा, आठ अ चा उतारा दुसऱ्याचा आणि त्यासाठी स्वतःला त्रास कशाला करून घ्यायचा ? त्यापेक्षा हिम्मत असेल तर वाईत स्वतः जागा घ्या , स्वतःचा सातबारा करा, त्यात घर बांधा आणि मग तेथे कोणी आडवे आले, बाहेर काढू लागले , त्रास देऊ लागले तर निकराने लढतो बघा तुमच्यासाठी !
" सुनिल काळे, तुम्ही चित्रकार आहात तुमचे काम चित्रनिर्मिती करायचे . भरपूर चित्रे काढा , आनंदी रहा . मजेत रहा . "
"तुमचे पाचशे रुपये नकोत मला .
आणि निघा आता ! ''
एवढं रोखठोक बोलल्यानंतर , मी सर्दच झालो, क्षणभर काही सुचलेच नाही . मग जाण्यापूर्वी त्यांनी आत मध्ये जावून दोन पुस्तके दिली .
पुस्तकांवर लेखकाचे नाव होते 'उमेश सणस ' .
ती पुस्तके वाचताना मला जाणवत होते ते काळ्या कोटाच्या आड असं दडलेले अदभूत व्यक्तिमत्व .आज माझ्या 'निसर्ग ' बंगल्याची निर्मिती का झाली याचा विचार करतो त्यावेळी मला त्यांची वाक्ये आठवत असतात . स्वतः चा सातबारा तयार करा, जे आपले स्वतःचे , हक्काचे आहे त्यासाठीच भांडावे . तेथे माघार घ्यायची नाही . शेवटपर्यंत लढायचे .
कायद्यातील अनेक जटील कलमांचा , नियमांचा ऊहापोह न करता समोरच्या गरीब,अडाणी असो वा शिकलेल्या सज्ञान पक्षकाराला त्याच्या त्याच्या भाषेत समजेल असे मार्गदर्शन व तोडगा देऊन जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल, याचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे .
मराठा क्रांती मोर्चाची भाषणे असो, कोर्टात न्यायाधीशांसमोर डायस वर असो, कोणत्याही छोटया, मोठया कार्यक्रमात माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, हिरिरीने, कौशल्याने, खणखणीत आवाजात आपले विचार सुस्पष्ट मांडणे ही त्यांची खासियत आहे . त्यांच्या मुखातून शिवचरित्राचे व्याख्यान असो वा सभासमारंभ असो उमेश सणसांचे आशयपूर्ण भाषण सुरू झाले की जनसमुदाय मंत्रमुग्ध होत जातो, स्वतःला विसरत जातो हे मी स्वतःही अनुभवले आहे .त्यांच्या भाषणाची एक विशिष्ट ओघवती शैली आहे व त्यांनी ती स्वप्रयत्नाने विकसित केलेली आहे . कोणत्याही विषयावर व्याख्यान देताना आपल्या या शैलीने हजारो हृदयांचा ठाव घेण्याची कला त्यानां आत्मसात झाली आहे .
उमेश सणस यांचे वडील शासकीय सेवेत होते, आई शिक्षिका व नंतर मुख्याधिपिका, त्यामूळे उत्तम संस्कार व अलौकीक बुध्दीमत्ता यांचा त्यांना वारसा आहेच . आणि तो वारसा त्यांच्या सई व सायुरी या मुलींमध्ये आलेला दिसून येतो . त्यांची पत्नी रोहिणी या सुशिक्षित असून त्या या सर्व कुटूंबाची जबाबदारी प्रेमाने व यशस्वीपणे पार पाडत आहेत .
मध्यंतरी त्यांनी "शब्दपूजा " नावाचे साप्ताहीक सुरू केले होते त्याचा लोगो करण्याची त्यांनी मला विनंती केली त्यावेळी मी त्यानां विचारले वकील साहेब "हा फूकटचा उद्योग कशासाठी सुरू केला आहे ? " त्यावेळी त्यांनी छान उत्तर दिले . "सगळेच उद्योग पैशांसाठी करायचे नसतात . हा शब्दपूजेचा अंक मला परवडत नसला तरी ती माझी आवड आहे, ती माझी हौस मौज आहे . ते माझे चांगले व्यसन आहे .आपल्या परिसरातील माणसांची त्यांच्या कलेची, कार्याची, ओळख, नवी माहिती करून देणे, सुंदर कविता, माहीतीपूर्ण लेख, नवे विचार गडकिल्ल्यांची , पर्यटनस्थळांची ओळख करून देणे , नव्या माणसांची त्यांच्या वेगवेगळ्या कार्याची ओळख करुन देणे हे माझ्या आवडीचे काम आहे " आणि यामध्ये ते आर्थिक अडचणीला सामोरे जात असूनही खूप व्यस्त झाले होते . सर्वात महत्वाचे म्हणजे हा सर्व खटाटोप आपले सर्व कामे सांभाळत आनंदाने करत होते .त्यांचे इंग्रजी, मराठी साहित्यावर अफाट प्रेम आहे व प्रभुत्व ही आहे . अनेक लेखकांची , कवींची माहीती , त्यांच्या रचना, त्यांच्या साहित्यातील काही कोटेशन्स, इतिहासातील सनावळी, शेरोशायरी त्यानां तोंडपाठ आहेत .असे तोंडपाठ , असणं हे तुमचं पुस्तकावर निस्सिम प्रेम असल्याशिवाय शक्यच नाही .
काही दिवसांपूर्वी त्यांनी 'सांगावा ' नावाचा त्यांचा चारोळी , कवितांचा संग्रह प्रकाशित केला होता . त्या कार्यक्रमानंतर मी त्यानां गंभीरपणे विचारले की तुमच्यातील साहित्यिकाला , कवीला तुम्ही पुर्णपणे न्याय देत नाही . त्यावेळी त्यांचे दिलेले उत्तर आजही माझ्या लक्षात आहे .
"वकीलांचा व्यावसाय मी करतो तो फक्त आवड किंवा पैसे मिळतात म्हणून करत नाही . तिथं माझा वेगळा स्वार्थ आहे . माणसाचे आयुष्य पूर्वीसारखे सरळ राहिलेले नाही, मानवी स्वभाव, मानवी नात्यांमध्ये प्रचंड गुंतागुंत आहे . अनेक प्रकारच्या केसेस माझ्याकडे रोज येत असतात . मनाच्या असंख्य रुपांची मला रोज पाहणी करता येते . रोजचे भेटणारे पक्षकार माझ्या दृष्टीने हे वेगवेगळे कॅरेक्टर , वेगवेगळी नाटकाची पात्रे असतात . त्यांच्या वेशभूषा, बोलण्याच्या ,चालण्याच्या नानाविध पध्दती, त्यांच्या सांगण्याची ढब ,लकेर,मला रोज नवे विषय सुचवत असतात . त्यांच्या आयुष्यातील घडणारे प्रसंग कधी कधी मला लेखनासाठी प्रेरीत करतात . त्यांच्या दुःखावर मी कायदयाचा अभ्यास करून रिलीफ देण्याचा प्रयत्न करत असतो . " यापेक्षा आणखी समाजसेवा वेगळी असते का ? कायदयाची रचना स्वरुप व मांडणी खूप वर्षांपासून बदललेली नाही . त्यामूळे न्याय मिळण्यासाठी खूप वेळ लागतो . या सिस्टीमला समजून घेऊन काम करावे लागते . बरेच लोक यावर नाराज होतात . माझ्यावर , इतर वकीलांच्या कामाच्या पद्धतीवर टिका देखील करतात .मी प्रत्येकाला समाधानी करू शकत नाही " . पण एखादी सिस्टीम मी कशी बदलणार ?ती बदलणे माझ्या हातात नाही . असे सांगितल्यानंतर मग माझाही त्यांच्यावरील राग हळूहळू कमी होवू लागला .
अशा या अवलिया, लेखक, साहित्यिक, मनस्वी कवी, संपादक, उत्तम वक्ता, इतिहासकार , मार्गदर्शक, अभ्यासक, प्रतिभावंत , तल्लख बुध्दी व मनाचा तितकाच मोठेपणा असणारा मित्र मिळणे म्हणजे खूप मोठी भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल .
देव आपल्याला नातेवाईक देतो, ते बदलता येत नाहीत. पण देवाने मित्र निवडण्याची मुभा दिली आहे .
आपण मित्र निवडले तरी त्यांची मैत्री होईलच अशी खात्री नसते . आपण मित्र निवडायचे नसतात तर खरे मित्र आपोआप मिळतात . उमेश सणस असे आपोआपच मित्र झाले .
मी तोरणा बंगल्याच्या बाहेर बऱ्याच वेळा जातो ,त्यावेळी बाहेर अनेक पक्षकारांचे चप्पल बुटांचे जोड दारातच दिसतात .मी गर्दीचा अंदाज घेतो व बाहेरूनच माघारी फिरतो कारण आमच्या या मित्राकडे अनेक मित्र जोडण्याची अलौकीक कला आहे त्यामूळे प्रत्येकाला थोडाथोडा तरी हा आमचा मित्र वाटयाला यायला नको का ? ही गर्दी पाहीली की आमचा मित्र किती श्रीमंत आहे याची खात्री पटते .
न धरील शस्त्र करी मी , पण गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ! असे बोलून गेलेल्या कृष्णाचाच हा आधुनिक अवतार असावा अशी माझी दाट शंका आहे .
माझ्याकडे जर गुप्तचर खाते एक दिवसासाठी मिळाले तर मला एक प्रचंड उत्सुकता आहे, की सकाळपासून रात्री दहा... अकरा.... बारा ....वाजेपर्यंत असंख्य पक्षकारांसोबत बोलायला यानां इतकी एनर्जी मिळते कशी ? आणि हे लेखन , कविता,कधी करतात ? याचा शोध घेतलाच पाहीजे .
मी मागील आठवड्यात , महीन्यापूर्वी भेटलेल्या माणसाला पुर्णपणे विसरून जातो . नाव गाव आठवत नाही पण उमेश सणस यांच्याकडे मात्र पक्षकार कधीही आला की त्याची सर्व केस माहीत असते . हे त्यानां कसं जमतं हे कोडे मला अजून उलघडले नाही . किंवा परमेश्वराने एखादा छूपा कॉम्प्यूटर त्यांच्या शरीरात बसवला असावा असाही मला दाट संशय आहे . अफाट मिळालेली स्मरणशक्ती ही एक त्यानां मिळालेली किंवा त्यांनी मिळवलेली देणगी आहे . आणि त्याचा ते वेळोवेळी पुरेपूर वापर करतात .
उमेश सणस या मित्राच्या वकीली पेशाच्या कारकिर्दीला सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत .
चित्रकार असल्याने मला एक गोष्ट नक्की माहीती आहे . रंगपेटीतील अनेक रंग तुम्ही हळूहळू मिश्रण करु लागलात की ती शेड काळ्या करडया रंगासारखी दिसते . रंग जरी काळा असला तरी त्यामध्ये अनेक रंग असतात .
वकील जमातीचे कोट जरी काळे असले तरी कोट घातलेल्या शरीरामध्ये खूप काही वेगवेगळे रंग असतात आणि ते रंग बाहेरच्याने मनाच्या स्वच्छ अंतरंगातून पाहायचे असतात हे देखील मी नव्याने शिकलो आणि शिकतोय . त्यामूळे वकीलांची आता जराही भिती वाटत नाही .
उमेश सणस यांच्या व्यक्तिमत्वात हे वेगवेगळे रंग किती बेमालूमपणे मिसळलेले आहेत याचा मी अनुभव घेतला आहे . म्हणून मला हा मित्र सदाबहार व मनाने रंगीत वाटतो .
यापुढेही त्यांच्या कायदयाच्या ज्ञानाचा पक्षकारानां भरपूर लाभ होवो आणि त्यांच्या साहित्यातून, चारोळ्या, कथा, कवितांमधून, भाषणांमधून, रसिकानां उत्तमोत्तम गोष्टींची मेजवानी सातत्याने मिळत राहो, त्यांच्या या अतिशय व्यस्त , व मस्त दिनचर्येतून उत्तम साहीत्यकलाकृतींची सातत्याने निर्मिती होवो, त्यांची प्रकृती उत्तम राहो व त्यानां दिर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
उमेश सणस यांनी खूप कथा, कविता , चारोळ्या लिहलेल्या आहेत पण त्यांची खाली लिहलेली एक चारोळी माझी खूप आवडती आहे . ती माझ्या मनाला भिडते .माणसं आयुष्यभर एकमेकांशी भांडतात, आपले तेच खरे म्हणत राहतात . अनेक गोष्टीसाठी आपला हट्ट सोडत नाहीत शेवटी आयुष्याच्या अखेरीस कळते आपण काहीच घेऊन आलो नव्हतो .आलो रिकामेच आणि चाललोही रिकामेच .
यश अपयश मान अपमान
सगळ्याच्या पलिकडे जायचं आहे .
सोडून जाण्यापूर्वी हे जग
अधिक देखणं करायचं आहे .
सुनिल काळे
9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा