*आमीरचे लग्न आणि माझे चित्रप्रदर्शन* 🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना !
असं एक वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण त्याचा जीवनात कधी प्रत्यक्ष अनुभव येईल असे मला कधीच वाटले नाही. पण एक दिवस असा आला की तो माझ्या कायम स्मरणात राहीला. चला तर मग आज खूप दिवसांनी निवांतपणे तुमच्याशी गप्पा मारत हा मजेशीर अनुभवच शेअर करतो.
28/12/2005 ही तारीख आजही माझ्या चांगलीच लक्षात आहे . ही तारीख आहे पाचगणीत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या लग्नाची. मला या लग्नाचे निमंत्रणही नव्हते, किंवा माझा दुरान्वये त्यांच्यापैकी कोणाचा संबधही नव्हता. पण तरीही हे लग्न माझ्या आयुष्यात एक महत्वाचा प्रसंग म्हणून लक्षात आहे . का ? कसे ? सांगतो तुम्हाला......
सन 2001 ते 2004 पर्यंत मी पाचगणीच्या सेंट पीटर्स या ब्रिटीशकालीन बोर्डींग स्कूलमध्ये आर्ट टिचर म्हणून काम करत होतो. त्रेपन्न एकराचा सुंदर परिसर, त्यामध्ये खेळाची मोठी मैदाने, सुंदर ब्रिटीश आर्कीटेक्चरच्या इमारती, नीटनेटकी फुलांची गार्डन्स, भरपूर वृक्षराई , शांतता,अशा फ्लोरा हाऊसच्या परिसरात शाळेने मला एक छोटे कॉटेज राहण्यासाठी दिले होते. सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेचे जेवण, लाईट, पाणी, घरभाडे नाही अशा खूप सुखसुविधा दिल्या होत्या.शिवाय रोज सकाळी टाय, बुट,कोट असा कडक ड्रेसकोड घालून दिवसभर शाळेत मिरवायचे असायचे. शिवाय माझ्याकडे चारचाकी गाडी होती. मोठा रुबाब असायचा त्याकाळात. शिवाय मी परमनंट झालो होतो. आयुष्यात रिटायर्ड होईपर्यंत मला चिंता नव्हती. पण अशा सगळ्या सुखसुविधा असूनही मी प्रचंड अस्वस्थ होतो, असमाधानी होतो, अतृप्त होतो. कारण की मी निसर्गचित्रकार होतो. आणि मला चित्र काढायला अजिबात वेळ नव्हता.
मी खुप संघर्ष करून घरादाराचा त्याग करून चित्रकलेच्या कॉलेजला गेलो होतो. अनेक प्रदर्शने केली होती. खूप पैसे मिळत नसले तरी चित्रकलेच्या रोज संपर्कात होतो. स्केचिंगचा रियाझ करायचो, आनंदी असायचो. सेंट पीटर्सची मात्र रोजची सकाळपासून मिनिट टू मिनिट वर्षभराची आखणी असायची. आठवड्यातून सुट्टी कधीतरीच आणि रविवारीही कधी M.O.D म्हणजे मास्टर ऑन ड्युटी किंवा चर्चची ड्युटी असायची. माझी स्वतःची चित्रकला सोडून शाळेमध्ये सतत रोजचा भरगच्च कार्यक्रम असायचा. मी रोज त्याच त्या मशीनसारख्या रूटीनला प्रचंड कंटाळलो होतो. मला स्वतःची चित्रकला करता येत नसल्याने मी मानसिकरित्या आतल्या आत घुसमटत होतो.आणि एक दिवस मी या सगळ्या चांगल्या रुटिनच्या सुखाच्या जगण्याचा राजीनामा देऊन अंत करायचा असा अंतिम निर्णय घेतला आणि काही दिवसानंतर मी रूटीन शाळेतून कायमचा मुक्त झालो.
माझे नवे घर झाले आणि मी परत निसर्गाच्या कुशीत भरपूर चित्र काढत सुटलो. एखाद्या डांबून ठेवलेल्या कैद्याला खूप दिवसानंतर जसे स्वतंत्र मिळाल्याचा भरघोस आनंद मिळतो तसेच मला वाटायचे. त्या संपूर्ण वर्षात मी परिसरातील भरपूर निसर्गचित्रे रेखाटली.
वाईवरून पाचगणीत प्रवेश करताना दांडेघर जकातनाक्या शेजारी (Ravine Hotel) रवाईन हॉटेलचा बोर्ड दिसतो. पाचगणीतील हे सर्वात मोठे व कृष्णा व्हॅलीचा सुंदर देखावा असणारे प्रसिद्ध स्टार हॉटेल आहे.पाचगणीच्या परिसरात ज्यावेळी शुटींग असतात ,त्यावेळी सगळे मोठे स्टार नायक, नायिका, नेते, मोठे उद्योगपती, श्रीमंत पालक येथेच मुक्कामी असतात. अतिशय भव्य व सुंदर लोकेशन, सर्व अत्याधुनिक सुविधा असल्याने तेथे नेहमीच मोठी गर्दी असते. या हॉटेलच्या मालकीणबाई
सौ.बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम या अतिशय कल्पक, कष्टाळू, आणि कलासक्त मनोवृत्तीच्या आहेत. त्या स्वतः हौशी कॉपी पेटींग करत असतात. त्यांची माझी ओळख होतीच. माझी वॉटरकलरमधील व स्वातीची ऑईल कलरमधील थोडीफार चित्रे त्यांच्याकडे हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवली होती.
एकदा बिस्मिल्ला मॅडमने सांगितले की प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचे लग्न पाचगणीत आहे. अनेक मोठी नेते मंडळी, अभिनेते, प्रसिद्ध लोक येणार आहेत, त्यांचे सर्व हॉटेल तीन चार दिवसांसाठी आमीरने बुक केले आहे. कदाचित आमीर येथेच मुक्कामी असेल तर तू एका मोठया चित्रप्रदर्शनाचे आयोजन कर म्हणजे त्याची सगळी पाहुणे मंडळी चित्रप्रदर्शन पाहायला येतील. ही खूप चांगली संधी होती. मलाही ही कल्पना खूप आवडली कारण मला हॉलचे भाडे दयायचे नव्हते. शिवाय तळघरातील एक मोठा जीमचा हॉल मला लाईटच्या सुविधेसह उपलब्ध होत होता. आठ दिवसांचा वेळ होता आणि आमच्याकडे चित्रकामही तयार होते.
माझ्याकडे चित्र डिस्प्ले करण्याचे स्टॅन्ड, आणि ईझल्स होते. त्या लोखंडी स्टॅन्डसला,ईझल्सना मी ऑईलपेंट मारुन चकाचक केले. चित्रानां नवीन फ्रेम्स , माऊंटींग तयार केले , काही आमंत्रण पत्रिका तयार केल्या.मी स्वतः सुंदर कॅलिग्राफी करून आमीरसाठी खास निमंत्रण पत्रिका तयार केली.रवाईन हॉटेलला रोषणाई केली गेली होती. आमीर खानच्या लग्नाची बातमी पाचगणीत पोहचली होती. शिवाय डिसेंबरचा शेवटचा आठवडा असल्याने पाचगणीत सिझन होता, पर्यटकांना उत्साहाने बहर आलेलाच होता. एकंदर प्रदर्शनाची जय्यत तयारी करून आम्ही लग्न दिवसाची वाट पहात होतो.
आमीर खान, लगानची पूर्ण टीम, अनेक हिरो, हिरॉईन्स, दिग्दर्शक, क्रिकेटर्स, संगीतकार, निर्माते पाचगणीत दाखल होवू लागले. सर्व हॉटेल्स भरली गेली, अनेक टि.व्ही वाहिन्यांच्या मोठया गाडया ,पत्रकार, र्इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी सर्वत्र बातम्यांसाठी फिरताना दिसू लागले. अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांची लगबग दिसू लागली, पाचगणी लोकल माणसांनी, पर्यटकांनी, उत्साहाने व स्टार व्हराडी मंडळीमुळे पूर्णपणे भरून गेली.
आमीरचे लग्न ' मेहेरभाई हाऊस ' या बंगल्यात होणार होते आणि काही कार्यक्रम इल पलाझो या हॉटेलमध्ये आयोजित केले गेले होते. मला आमीरला भेटून निमंत्रणपत्रिका दयायची होती पण मी त्याला कॉन्टॅक्ट कसा करणार याचे अगोदरपासून काहीच नियोजन नव्हते. लग्नाला आत फक्त एकच दिवसच उरला होता आणि मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्याच वेळी सकाळी मला बिस्मिल्ला मॅडमचा फोन आला की आज संध्याकाळी आमीर रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर लगानच्या सर्व मित्रांसोबत खेळायला येणार आहे. खेळ संपल्यानंतर तू भेट व प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका दे. हे ऐकल्यावर मलाही उत्साह आला आणि मी तेथे जाण्याचे निश्चित केले.
त्या संध्याकाळी टेनिस कोर्टवर प्रचंड बंदोबस्त होता. अनेक पोलीस व प्रायव्हेट बॉडीगार्डस सगळीकडे दिसत होते. अमीर एका इनोव्हा गाडीतून आल्याचे मी पाहीले. त्याच्या सोबत अनेक प्रसिद्ध मंडळी होती.टेनिसचा खेळ संपल्यानंतर आमीर याच गाडीने परत जाणार आहे याची खात्री मी करून घेतली.
आणि मी गाडीच्या जवळच थांबण्याचे ठरवले.
इकडे स्टार मंडळीचा टेनिस खेळ खूप रंगात आला होता. हॉटलमध्ये राहणारे सर्वजणच त्याच्या खेळात सामील झाले होते. खेळ संपताक्षणीच आमीरभोवती फोटो काढणाऱ्यांची गर्दी वाढू लागली, फोटो काढत सर्वानां हात हालवत, ओळखीच्या सर्वांना नमस्कार करत सहा मजबूत बॉडीगार्डसच्या पहाऱ्यात तो आपल्या गाडीकडे येत होता. आता एक दोन मिनिटात त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला गेला तो गाडीत बसण्यापूर्वीच मी अत्यंत वेगाने गाडीकडे धावलो. मी अचानक पुढे मुसंडी मारल्याने क्षणभर बॉडीगार्डस गांगरले व त्या सर्वांनी मला आडवले. आमीर नुकताच टेनिस खेळून आल्यामूळे कपाळावरील घामाच्या धारा पुसत होता. मी माझ्या हातातले मोठे निमंत्रण पत्रिकेचे पाकीट, माझे चित्रप्रदर्शनाचे जुने कॅटलॉग त्याच्या हातात दिले.आमीरने बॉडीगार्डसनां थांबण्याचा इशारा केला व मला शांतपणे विचारले,
"क्या काम है " ? क्या है इस पॅकटमें ?
मी हातातील पत्रिका पेस्ट केली नव्हतीच, ती पत्रिका त्याने उघडली तोपर्यंत मी बोलायला सुरुवात केली.
"तुम्हारे शादी के वास्ते हम लोगोने एक पंचगनीके पेटींगका एक बडा एक्झिबिशन रवाईन हॉटेलमें रखा है ! कृपया कल आप आके उसका ओपनिंग करो, ऐसा मै चाहता हूँ . असं एका दमात सगळे सांगितले.
'' कब है ये एक्झिबिशन " ? आमीरने विचारले .
" कल सुबह दस बजे " , मी उत्साहाने सांगितले .
कल तो मेरी शादी है I आमीरने हसतच सांगितले.
"अच्छा ये बताओ , तुम्हारी शादी हो गयी है " ? आमीरने पुन्हा विचारले .
हाँ , हो गयी है I मी सांगितले .
तो फिर ये बताओ की " तुम मेरी जगह होते तो शादी अॅटेन्ड करोगे की आर्ट एक्झिबिशनके ओपनिंग करोगे " ? आमीरने विचारले.
मै मेरी शादी अॅटेन्ड करुँगा I मी भोळसटपणे खाली मान घालून उत्तर दिले.
त्याबरोबर त्याच्या तोंडावर ते प्रसिध्द स्मितहास्य उमटले. आणि माझा हात हातात घेत शेकहँन्ड करून आमीरची स्वारी इनोव्हामध्ये बसली.
"कॅन आय टेक धिस इन्व्हीटेशन
कार्ड विथ मी " ? आमीरने विचारले.
मी Yes म्हणालो.
Thank you ,for your honest Answer.
बॉडीगार्डसनी लगेच सर्व गर्दी हटवली, व सर्वांना हात हलवत आमीरची गाडी दिसेनाशी झाली.
आपण किती मुर्ख आहोत, या विचाराने मी खजील झालो. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही याची मलाच लाज वाटली.आपल्या सारख्या एखाद्या साध्या माणसाचे लग्न असेल तरी तो लग्नाच्या दिवशी किती व्यस्त असेल, तो इतर गोष्टींकडे लक्ष न देता लग्न कार्यक्रमात व्यस्त असेल. आणि आमीर खान तर सेलेब्रिटी आहे. अशा अचानक ठरवलेल्या कार्यक्रमास त्याने नकार दिला तर त्याचे काय चुकले. अशी मनाचीच समजूत घालत मी माझ्या लग्नाच्या आठवणीत भूतकाळात रमत घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी आमीर खान किंवा कोणीच आपल्या प्रदर्शनाला येणार नाही असे मनाला ठामपणे वाटले, मी हॉटेलमध्ये त्या प्रदर्शनाच्या तळघरातील हॉलमध्ये एकटाच निवांतपणे पुस्तक वाचत बसलो होतो.
साधारणपणे दुपारी एकच्या सुमारास टाय घातलेला, शर्ट इन केलेला हातात एक ब्रीफकेस घेतलेला स्मार्ट तरुण माणूस प्रदर्शनाच्या हॉलमध्ये आला.
"माझे नाव आशिष थरथरे, मी आमीर खानचा पर्सनल मॅनेजर आहे. चित्रकार सुनील काळे आपणच का " ?
मी हो म्हणालो, आणि त्याला बसायला खुर्ची दिली.
आमीर खान यांनी प्रदर्शनाला येऊ शकणार नाही अशी दिलगीरी व्यक्त केली आहे आणि त्यांनी हा निरोप मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगितला आहे.
मी देखील आमीरचे बरोबर आहे..... मीच ह्या प्रदर्शनाचे आयोजन लग्नाच्या दिवशी करण्याची मोठी चुक केली असे त्यानां सांगितले.
नाही ,नाही असे काही नाही उलट तुम्ही खूप छान काम केले आहे. फक्त ते स्वतः येथे येऊ शकत नाही हे त्यांनी दुःखाने सांगितले आहे. त्यांनी तुमची ब्रोशर्स, आमंत्रण पत्रिका पाहीली त्यातील चित्रे त्यानां आवडली आहेत. उलट त्यांनीच एक विनंती केली आहे ती सांगण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुमच्या या प्रदर्शनात खूप गेस्ट येणार आहेत त्यानां चित्रे आवडली तर ते जरूर विकत घेतील, फक्त तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ नका. तुमची जी काही रक्कम होईल ती सर्व टोटल रक्कम आमीर खान यांच्याकडून दिली जाईल. कृपया ही विनंती मान्य करावी...... असे बोलून आशिष प्रदर्शन पाहून निघून गेला.
आता मात्र मी थक्क होण्याची वेळ माझी होती.एका अनोळख्या गावी ,लग्नाच्या दिवशी, अनोळखी कलाकाराने न सांगता चित्रप्रदर्शन भरवले होते आणि त्याची योग्य ती दखल आमीरने निरोप पाठवून स्वतः घेतली होती त्याच्या मनात आले असते तर त्याने माझे कार्ड फेकूनही दिले असते. उलट हा एका परफेकशनिस्टचा मला खरा अनुभव आला होता.
सकाळी लग्नाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम संपला होता. प्रसिध्द वऱ्हाडी मंडळीची धावपळ ये जा सुरु होती आणि संध्याकाळी रिकाम्या वेळी माझ्या प्रदर्शनाला अचानक गर्दी उसळली आणि ज्यानां मी पाहीले त्यानां पाहून मी मनाने फार फार भारावून गेलो. आजही हे सर्व लिहताना मी तोच अनुभव पुन्हा घेत आहे.
खरं सांगायचे तर त्यावेळी मी आमीर खानचा खूप मोठा फॅन नव्हतो, त्याचे सगळे चित्रपटही मी पाहीलेले नव्हते. मी त्याचा फक्त लगान आणि सत्यजित भटकळ यांची " मेकींग ऑफ लगान " ही फिल्म पाहीली होती. आणि आज या प्रदर्शनात ते सर्व देशी, परदेशी , सर्व छोटे,मोठे अभिनेते माझी चित्रे पाहत होते. लगानची क्रिकेट टिम आलेली होतीच पण क्रिकेट जगतात खेळणारी दिग्गज मंडळी मी प्रत्यक्ष पहात होतो. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक , नायक, नायिका, संगीतकार, वादक, चरित्र अभिनेते, विनोदी अभिनेते, खलनायक, गायक, ज्यानां मी फक्त टेलिव्हिजनवरच पहात होतो ती मी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पहात होतो. आणि माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. त्या सर्वांची नावे लिहीत बसलो तर सगळी चित्रपटसृष्टीचीच पुनरावृत्ती होईल. तो एक भारी, संवेदनामय, अविस्मरणीय सुखद लक्षात राहण्यासारखा अनुभव होता.
त्या गर्दीमध्येच एक बॉबकट केलेली मध्यम उंचीची अनोळखी स्त्री आली. मी आमीरला दिलेली निमंत्रणपत्रिका तिच्या हातात होती. तिने तिचे नाव नुझत खान असे सांगितले. तिच्या सोबत आणखी एक काळा शर्ट घातलेला गृहस्थ होता. त्याने त्याचे नाव मन्सुरअली खान असे सांगितले. अतिशय काळजीपूर्वक , मन:पूर्वक तो प्रत्येक चित्र बघत होता. सर्व प्रदर्शन पाहील्यानंतर काही चित्रे त्यानां आवडली होती ती सिलेक्ट केल्यावर त्याने एक मोठा गमतीशीर प्रश्न विचारला. सर्वात जुनी, कधीही प्रदर्शित केली नाहीत अशी काही चित्रे आहेत का ? मी म्हणालो खूप आहेत चित्रांचा गट्टाच आहे माझ्याकडे. त्याने त्याचे कार्ड दिले व दुसऱ्या दिवशी मला सर्वात जुनी चित्रे घेऊन
इल पलाझो हॉटेलमध्ये येण्यास सांगितले.
अशा अद्भूत वातावरणातील तो दिवस संपला.
दुसऱ्या दिवशी माझ्या स्टुडीओतला जुन्या चित्रांचा गट्टा घेऊन मी इल पलाझो हॉटेलवर पोहचलो. इकडे प्रदर्शनाच्या हॉलवर स्वाती थांबली. मन्सुरअली खानने त्याची बायको टिनाची ओळख करून दिली. तेवढ्यात नुझत खान आली व त्यांनी जुन्या चित्रांवर झडपच मारली. दोघेजण फारच भारावून गेले होते. त्यानां जे जुन्या पाचगणीची चित्रे आपेक्षित होती ती त्यानां मिळाली होती. मग त्यांनीच सांगितले की ते प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रपट निर्माते नासीर हुसेन यांची मुले आहेत व आमीर हा ताहीर हुसेन यांचा मुलगा असून त्यांचा सख्खा चुलत भाऊ आहे. नुझतचा मुलगा इम्रानखान हिरो आहे . यादों की बारात, कारवाँ , आणि बरेच चित्रपट पाचगणीत शुटींग करताना ते लहानपणापासून नेहमी येथे येत असत. सर्व खान बंधू पाचगणी परिसराचे खूप चाहते आहेत. माझी बरीच चित्रे त्यांनी घेतली. इकडे दुसऱ्या हॉलमध्ये आमीरच्या लग्नाचा मोठा केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. आणि येथे मी माझी जुनी चित्रे विकण्याच्या कार्यक्रमात मग्न होतो.
नंतर रवाईन हॉटेलच्या हॉलवर आल्यावर दोन खास कुटुंबाची ओळख झाली, एक होता अमीन हाजी ( लगान टिमचा मुका ढोलके पटटू ) आणि त्याची ब्रिटीश पत्नी शॅलोट. दुसरे शॅलोटचे ब्रिटीश आईवडील श्री .व सौ .कोलस
( Mr. & Mrs.Coles). त्यांनीही काही चित्रे घेतली.
अमीन हाजी आता पाचगणीतच स्थायिक झाला असून तो पाचगणीकरांचा गळ्यातील ताईत झाला आहे. अनेक स्थानिक उपक्रमांमध्ये तो सक्रीय असतो व तो आमचा चांगला मित्र झाला आहे .
नंतर मला लेखिका शर्मिला फडके यांच्या एका लोकमतच्या लेखातून मन्सुरअली खान हे व्यक्तिमत्व काय आहे हे कळाले.
आमीरचा कयामतसे कयामत तक, जो जिता वही सिकंदर इ. गाजलेल्या चित्रपटांचा तो दिग्दर्शक होता. आणि आता तो उटीजवळ कण्णूर येथे शेती करत आहे .
आमीरच्या लग्नानंतर सर्व धावपळ संपल्यानंतर मॅनेजर आशिष थरथरे यांनी सर्व घेतलेल्या चित्रांची रक्कम रोख दिली, आभार मानले व मला एक माझ्या आवडीचे चित्र आमीर खानसाठी मागितले. मीही टेबललॅन्ड, एम.आर.ए सेटंर, सिडने पॉईंटचे एकत्रित चित्रण असलेले एक माझ्या आवडत्या स्पॉटचे जलरंगातील चित्र दिले. दुसऱ्या दिवशी आमीरच्या सहीचा
एकोण चाळीस हजाराचा चेक व त्याची रंगीत झेरॉक्सप्रत आली. चेक बँकेत जमा केला आणि झेरॉक्स आठवण म्हणून आजही माझ्याकडे आहे .
तर असा हा भन्नाट अनुभव '
बेगानी शादीमें अब्दूल्ला दिवाना.............
या म्हणीचे प्रॅक्टीकल प्रत्यंतर देणारा ठरला.
या अनुभवाचे विश्लेषण ज्यावेळी मी करतो त्यावेळी मला आमीरच्या
दूरदृष्टीचा , कलावंताची जाण ठेवण्याच्या संवेदनाशील वृत्तीचा प्रॅक्टीकल अनुभव आला . म्हणूनच त्याला परफेक्शनीस्ट का म्हणतात हेही मला उदाहरणासह पटले. २००५ नंतरचे त्याचे सर्व चित्रपट मंगल पांडे, दंगल, गजनी,
तारे जमीन पर, सिक्रेट सुपरस्टार , पीके,
थ्री इडिएटस, धूम ३. इ. चित्रपट मी मुद्दाम पाहीले व त्याची भूमिका, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची त्याची वृत्ती, त्याचा अभिनय, त्याचे दिग्दर्शन कौशल्य, त्याच्या चित्रपटाचे मार्केटींग, त्याच्या चित्रपटांची गाणी, कथेचे सादरीकरण मला भावते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण करत असलेल्या सर्व कामावर मनापासून प्रेम करणे, त्या कामासाठी दिवस रात्र ध्यास घेऊन ते सर्व अंगाने परिपूर्ण होईल याचा जीवघेणा ध्यास घेणे, आंतरीक, मानसिक, शारिरीक सर्व उर्जा पूर्णपणे झोकून देऊन मनःपूर्वक काम करणे, प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त परफेक्ट करण्यावर त्याचा भर असतो, व ही गोष्ट आपल्या सर्वांना देखील प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक क्षेत्रात खरोखरच प्रेरणादायक आहे . त्याचे मराठी शिकणे, सामाजिक सत्यमेव जयतेसारखे टी व्हीवरचे कार्यक्रम, पाणी फौडेंशन सारखे सामाजिक भान असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत . दंगल सारख्या चित्रपटात बापाच्या भुमिकेसाठी स्वतःचे भरमसाठ वजन वाढवून परत ते शरीर व्यायामाने पूर्ववत आणणे मला तरी खूप आश्चर्यकारक वाटते.
आणखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महानपण बाजूला ठेवून कोणत्याही क्षेत्रातील छोट्या कलावंताचाही त्यानां लक्षात ठेवून मनापासून आदर करणे ,त्यानां मदत करणे त्यांचा सन्मान करणे हा मला मोठा गुण वाटतो. कारण काही कलाकार जरा मोठे झाले, प्रसिध्द झाले की की लहान कलाकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कधीकधी तर ओळखही दाखवत नाहीत
आणि आता तर तो "मेहरभाई हाऊस " या अप्रतिम ब्रिटीशकालीन बंगल्याचा मालक व पाचगणीकर झाला आहे.
या मेहरभाई हाऊसच्या माझ्या व्यक्तिगत खूपच आठवणी आहेत.
त्या लिहीन मी नंतर कधीतरी निवांतपणे...............
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
सुनील काळे
9423966486
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा