📸📸📸📸📸📸📸📸
देवेन्द्र पोरे यांची फोटोग्राफी
📸📸📸📸📸📸📸📸
वाईला एक मोठी परंपरा आहे . 1 मे रोजी त्या परंपरेला एकशे दहा वर्ष पूर्ण होत आहेत . त्या परंपरेचे नाव आहे वसंत व्याख्यानमाला . या वसंत व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक , विचारवंत , नाट्यकलाकार , कवी , चित्रकार , गायक ,वादक , अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध नावाजलेल्या मंडळीनी येथे व्याख्याने दिली आहेत . अनेक अडचणींवर मात करत वेगवेगळ्या प्रायोजक कलाप्रेमी साहित्यप्रेमी लोकांच्या वर्गणीतून हा उत्सव 1 मे ते 21 मे दरम्यान आयोजित केला जातो . वाईतील स्थानिक मंडळी अगदी घरचे कार्य असल्यासारखे या उत्सवाला हजेरी लावत असतात . वाईच्या गणपती घाटावर संध्याकाळच्या मंदिर परिसरातील छोट्या स्टेज वर या व्याख्यानमालेची सुरुवात होते . दरवर्षी विनामोबदला नियमितपणे ही व्याख्यानमाला पूर्णत्वास नेणाऱ्या सर्व संयोजक मंडळ व कार्यकर्त्यांचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे .
लोकमान्य टिळक लायब्ररीच्या ग्राऊंड फ्लोअरला एका छोट्या जागेत चित्रकला प्रदर्शन भरविण्याचा संकल्प आम्ही सुरू केला आणि आता दरवर्षी त्यामध्ये अनेक कलाकारांची प्रदर्शने एकवीस दिवस भरवण्याची नवी परंपरा छानपैकी सुरु झाली .
कोल्हापूरला कलामहाविद्यालयात शिकत असताना भोसले मॅडमने एक सवय लावली होती . रोज नित्यनियमाने दहा स्केचेस करायची . कधी माणसांची , कधी महालक्ष्मीच्या देवळाची , तेथे बाहेर निवांत बसलेल्या माणसांची , कधी टाऊन हॉल म्युझियमच्या अंतर्गत भागात ठेवलेल्या शिल्पांची , तर कधी प्राणी पक्षी यांचीही रेखाटने करायचा आम्ही सराव करायचो .
स्थिर वस्तूंची चित्र रेखाटने छान व्हायची पण जिवंत हालणाऱ्या मुलांची , माणसांची व पक्ष्यांची चित्रे रेखाटताना मोठी कसरत करायला लागायची कारण माणसे त्यांच्या पोझिशन लगेच बदलायचे व रेखाटन अर्धवट सोडून द्यायला लागायचे . पक्ष्यांची , प्राण्यांची रेखाटने करताना तर ती कधीच पूर्ण करता आली नाहीत याचे मनात शल्य आहे .
वसंत व्याख्यानमालेत यावर्षी वाईचे प्रसिद्ध फोटोग्राफर देवेन्द्र पोरे यांचे परिसरातील वेगवेगळे पक्षी , प्राणी व वाईच्या प्रसिद्ध गणपतीघाट मेणवली घाटाची मंदिरांची अप्रतिम छायाचित्रांचे प्रदर्शन लावले आहे . वाईतील कलारसिकांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा .
वेगवेगळे पक्षी ,प्राणी हे कधीही एका जागेवर व एका विशिष्ठ पोझमध्ये बसत नाहीत ते सतत भटकत विहारत असतात . यांचे फोटो काढणे म्हणजे एक मोठे आव्हान असते . त्यांच्या चेहऱ्यावरचे भावभावना व ॲक्शन टिपण्यासाठी तासनतास संयमाने धीराने उन्हातान्हात जंगलभटकंती करावी लागते . अन्नपाणी सुखसुविधा यांचा वेळप्रसंगी त्याग करावा लागतो . मिलिटरी रंगाचे कपडे घालून काट्याकुट्यांतून अवघड प्रवास करून निसर्गात जावून निवांतपणे अवघड ओझी असलेली कॅमेऱ्याची बॅग घेऊन कसलीही आर्थिक मिळत नसताना हा छंद जोपासने एक अवघड साहस असते या अवघड साहसी प्रवास करणाऱ्या देवेन्द्र पोरे या तरूण छायाचित्रकाराचे करावे तितके कौतुक कमीच आहे .
वाघोबाजवळ जायचे म्हणजे छातीत धडधड सुरु होते . अशा वाघोबांच्या मुलांचे गोजीरवाणे , निरागस हावभाव कॅमेरात टिपणे एक कौशल्याचे काम आहे . वाघोबा व त्याचे छोटे बछडे देवेन्द्र पोरे यांनी भारीच टिपलेले आहेत . बाजरी , ज्वारीची कणसे खाणारी रंगीबेरंगी पक्षी , त्यांचे उत्सुकतेने जगाकडे पाहणारे कुतुहूल वाटणारे वेगवेगळे डोळे पहाणे या छायाचित्रकाराने भन्नाटपणे टिपलेले आहेत . दूर दिसणारे पक्षी अगदी जवळून पाहताना भान हरपून जाते .
त्रिपुरी पोर्णिमा असताना रोज दिसणारे गणपती घाट , गंगापूरी घाट , मेणवली घाट दिव्यांच्या रोशनाईमुळे अगदी वेगळेच व बहारदार दिसतात . पाण्यात सोडलेल्या छोट्या पणत्या त्या छायाचित्रानां जिवंतपणा आणतात . मंदिराची पाण्यातील प्रतिबिंबे दिव्यत्वाची प्रचिती आणणारी ठरतात . कॅमेरा एक निर्जीव उपकरण असते पण त्या उपकरणाला आपल्या दिव्यचक्षूंनी अचूक टिपून काळाचा तो एक अप्रतिम क्षण जपून ठेवणे एक मोठे महान कार्य असते . अशा क्षणानां पकडणे हे मोठे काम देवेन्द्र पोरे यांच्या कॅमेऱ्याने केलेले आहे .
आपला रॉयल एन्फिल्ड हा मोटरसायकल विक्रीचा सातारा येथील व्यावसाय सांभाळून रोज येण्याजाण्याचा सतरऐंशी किलोमीटरचा प्रवास करताना वेळ काढून छायाचित्रणाचा अखंड ध्यास घेऊन छंद जोपासणाऱ्या देवेन्द्र पोरे यानां पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
प्रदर्शन - लोकमान्य आर्ट गॅलरी वाई
वेळ - सकाळी 9 ते 12 , संध्याकाळी 5 ते 8
दिनांक -1 मे ते 21 मे 2026
सर्वांनी जमेल तसे या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा