ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

टायगर सर - संजीवनचे न्यू देशपांडे सर

टायगर उर्फ संजीवनचे न्यू देशपांडे सर 
🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅

मित्र मैत्रिणींनो ,सप्रेम नमस्कार 💐🙏
      मी जिथे रहातो त्या गावातील गावकऱ्यांचा एक  ग्रूप आहे .  त्या ग्रूपमध्ये गावातील व आजूबाजूच्या परिसरातील छोट्या मोठया स्थानिक घटना ,कार्यक्रम कळविण्याची पध्दत आहे . त्यामुळे गावात काहीही कार्यक्रम असले की सर्वांना लगेच आमच्या गावकट्टयावर लिहिण्याची  सगळ्यानां खूपच घाई असते .
       आज मेणवली वेशीजवळ गंगापूरी नावाच्या भागात शेतात बिबटयाचा वावर आढळल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे . सगळेच गावकरी चिंतेत पडले आहेत . विशेषता ज्यांची घरे शेतात व गावाबाहेर आहेत त्यांना सावध व सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्यामुळे आम्ही गेट बंद करून भीतीने शांत गुपचूप राहण्याचा निर्णय घेतला .
       संध्याकाळी चारपाच वाजले असावेत अचानक गेटजवळ खूप मोठी हालचाल झाली . आणि एक पांढरी गाडी उभी राहीली . माझ्या जाधव नावाच्या मित्राने मला तातडीने फोन केला , ताबडतोब या ,लवकर या ,पळत या .मला वाटले आता आपले काही खरं नाही . मनात शंका आली की बिबट्या (टायगर ) आपल्या निसर्ग बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसरात आला की काय ? मग काय लगेच पळत धावत गेटजवळ गेलो .
      आणि जी शंका मनात होती तसेच झाले . समोर खरोखरच टायगर उभा होता. मी घाबरलो , तंतरलो , कासावीस झालो , क्षणभर माझा घसा कोरडा पडला . कारण प्रसंगच मोठा बाका होता .
पण करणार काय ?
आजूबाजूला पळून जाण्याची जराही सोयच नव्हती . शेवटी गेलो धावत आणि टायगरसरां समोर सरळ शरणागतीच पत्करली आणि पायाला स्पर्श करून मनःपूर्वक साष्टांग नमस्कार घातला .
       समोर अचानक सरप्राईज व्हिजिट देणारा टायगर हा साधासुधा नव्हता . ते माझे आठवी नववी व दहावीचे गणिताचे शिक्षक होते . गणित विषयात मी खूपच कच्चे मडके होतो . अंक बीजगणित नंबर्स दिसले की माझी तारे जमीन पर या चित्रपटातील ईशान सारखी अवस्था व्हायची . काही सुधारायचेच नाही . मनात सगळा गोंधळ व आत्मविश्वास शून्य व्हायचा . त्यात देशपांडे सर म्हणजे त्या काळातील चंगेझखान किंवा व्हिलन वाटायचे . त्यांचा तास आला की माझे हृदयाचे ठोके ठक ठक ठक वाढत जायचे व स्वतःला स्पष्टपणे ऐकू यायचे . लहानपणापासून आजही मला साधी साधी गणिते सोडवता येत नाहीत . आणि असे त्या काळात कर्दनकाळ वाटणारे सर मला भेटायला माझ्याच घरी आले होते . त्यानां पाहूनच क्षणार्धात प्रचंड घाबरगुंडी उडाली . मन आणि शरीर तात्काळ कंपित झाले . त्रेचाळीस वर्षांपूर्वीचे संजीवन शाळेतील सगळे प्रसंग आठवले . ती प्रसिद्ध कानपिळी आठवली . हदयाचे ठोके छातीत कंप पावून लंबकाप्रमाणे मोठमोठ्याने धकधक करू लागले . आता काय करू ? आणि काय नको ? अशी गंभीर परिस्थिती समोर उभी . मी पूर्ण बावचळून गेलो . कारण टायगर जिंदा था ! वह भी मेरे सामने .
      पांढऱ्या शूभ्र मिशा , तीच केशरचना , तेच दमदार हास्य , तीच करडी नजर . डोळ्यातील चमक धारधार पण त्या नजरेत आता कौतूक होते . प्रेम होते . आदर होता .
     टायगरने मला प्रेमाने मिठी मारली . मी क्षणभर थरारलो . वाघाने हात हातात घेतला . आणि माझी आर्ट गॅलरी , घराचा बागेतील परिसर , निसर्गरम्य टेरेस , घरातील सर्व चित्रे , स्केचेस डायऱ्या व स्टुडिओतील भिंतीवरची चित्रे पुन्हा पुन्हा पाहीली . त्या टायगरला आपला हा चेला आता खूप आवडू लागला होता . भले गणितात मी खूप मागे होतो पण कलेच्या क्षेत्रातील प्रगती खूप समाधान देणारी आहे असे टायगर सरांनी पाठीवर हात ठेऊन कौतुकाने सांगितले .
टायगरसरांनी नंतर कौतुकाने स्वातीची दोन व माझी दोन चित्रे विकत घेतली . डाईनिंग टेबलवर छान 'टायगर' चहाचा आस्वाद घेतला . खूप जुन्या आठवणी निघाल्या .
        संध्याकाळी टायगरसर म्हणाले निघतो आता , उशीर झाला . पुण्याला कोथरूड येथे पोहचायचे आहे . पण तुला भेटून खूप खूप समाधान वाटले . पुण्याला आलास की नक्की ये ! आम्ही शाळेतील , शिक्षणक्षेत्रातील प्रसंगाची पुन्हा देवाण घेवाण केली . जुन्या पाचगणीच्या आठवणींमध्ये रमलो .
      टायगरसरांच्या या भेटीमुळे संजीवनचे सगळे दिवस पुन्हा आठवले . आमच्या शाळेतील अनेक सर्व मित्रमैत्रिणींची आठवण झाली . 
       शाळेत असताना टायगरसरांची जी भिती होती ती आता पूर्ण संपली . टायगर खूपच 'प्रेमळ' झाला होता . इतक्या विपरीत परिस्थितीतही मी जी थोडीफार प्रगती केली त्याचे कौतूक टायगरसरांच्या डोळ्यात दिसले . भरपूर मनसोक्त गप्पा झाल्या व छान निरोप समारंभ झाला . फोटोसेशन झाले . टायगरच्या सोबत त्यांची पत्नी व मुलगा राहूल होता .
    एकमेकांचा हात सोबत घेऊन गाडीत बसेपर्यंत टायगर कृतात नजरेने माझ्याकडे पहात होता .
     आता मला बिबट्याची किंवा टायगरची भिती वाटत नाही .
मी आता म्हणतो हा जिंदादिल टायगर आता "दोस्त माझा मस्त " आहे .
       आपण संजीवन शाळेतील आपण मित्रमंडळी सर्वजण नक्की टायगरला भेटू या !
कारण आपण सगळे साठीत पोहचलो आपला टायगर जरी आता म्हातारा झाला पण तंदुरुस्त आहे . खूप वर्षानंतर पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटले . शाळेतील दिवस विसरता येत नाहीत . आपल्या स्मृतीपटलावर मेंदूच्या एका कोपऱ्यात या आठवणी कायमच्या एखादी लेण्या कोरल्यासारख्या जाग्या असतात .
       असे शिक्षक ,मार्गदर्शक आपले खरे हितचिंतक असतात . त्याच्यांमध्ये प्रेम जिव्हाळा माया ओसंडून वहात असते . त्यांनी आपल्या जीवनात माणूसकीचे रंग भरलेले असतात . जीवन समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान असते ते कधीच विसरता येत नाही .
अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वबळावर झेप घेण्यासाठी उतुंग भरारी मारण्यासाठी पंखात ताकद निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झिजलेल्या टायगर उर्फ एस .डी . देशपांडे सरांना खूप मोठे निरोगी दिर्घायुष्य मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना !
     आता आम्ही पुन्हा नक्की भेटायला येऊ शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी सोबत .

        एक जबरदस्त सरप्राईज व्हिजीट दिल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद सर ! 🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐
आपण पूर्वी व आता यापुढेही कायम सर्वांचे प्रेरणास्त्रोत्र राहणार आहात .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चित्रकार -सुनील काळे
1982 मराठी बॅच 
संजीवन विद्यालय पाचगणी .
[निसर्ग आर्ट गॅलरी -वाई ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टायगर सर - संजीवनचे न्यू देशपांडे सर

टायगर उर्फ संजीवनचे न्यू देशपांडे सर  🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐅 मित्र मैत्रिणींनो ,सप्रेम नमस्कार 💐🙏       मी जिथे रहातो त्या गावातील गावकऱ्यां...