वाईतील लोकमान्य आर्ट गॅलरी
एक वेगळा अनुभव .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सोमवार म्हणजे वाईकरांसाठी एक महत्वाचा दिवस असतो . कारण त्यादिवशी आठवड्याचा बाजार भरतो . हा बाजार पुर्ण गणपतीआळी , दाणेबाजार , मुख्य किसनवीर चौक ते संपूर्ण आजूबाजूच्या सर्व रस्त्यावर खूप सर्वदूर पसरलेला असतो . पूर्वी मावळे शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यावरून बाजारहाट करत , तसे काही वाईकर दुचाकीवरूनच भाजीपाला खरेदी करत असतात . संपूर्ण रस्ता खचाखच गर्दीने व दुचाकी वाहनांनी ओसंडून वाहत असतो .
लालभडक,पिवळ्याधम्मक तर कधी शांत निळ्या रंगाच्या प्लॉस्टिकच्या छत्र्या व डोक्यावर ऊन लागू नये म्हणून याच रंगाची प्लास्टीक कापडांची बांधलेली छप्परे यांनी रस्ता गजबजून गेलेला दिसतो .
कलिंगडवाले , आंबेवाले , द्राक्षेवाले , भाजीवाले , फुलवाले यांनी सगळा फुटपाथ पूर्ण व्यापलेला असतो . छोट्यामोठ्या वस्तू , तेल , साबून पावडर , कुलूपवाले , भांडीवाले पासून ते नानाविध अनेक तयार कपड्यांच्या व सामानाच्या व्हरायटी घेऊन किरकोळ फिरस्ते व्यापारी बसलेले असतात .अनेक फळभाज्या घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी मंडळी ताजीतवानी भाजी घेऊन येत असल्याने व सोमवारी जरा कमी दरात मिळत असल्याने वाई परिसरातील माणसांची झुंबड उडालेली असते .
आमच्या लोकमान्य आर्ट गॅलरीच्या आजूबाजूला आरडाओरडा व माणसांची झुंबड पाहून मला खूप मजा वाटतेय . कारण मुंबईतील जहाँगीर व नेहरू सेंटरला फार गंभीर चेहरे घेऊन माणसे येत असतात .आपल्याला खूप खूप चित्र समजतात असे भासवणारी मंडळी पाहिली की शांत वातावरणात आणखी खूप गुढगंभीरता वाढत असते.
याउलट वाईतील हे लोकमान्य वाचनालय नेमके या प्रचंड गर्दीत हमरस्त्याला आहे , त्या पुर्ण रस्त्यावर गजबजलेल्या फुटपाथवर अनेक भाजीवाले विक्रीसाठी सोमवारी नियमित येत असतात
आज तर सोमवारची कमालच झाली .कारण आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार पूर्ण माणसांनी व वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या टोपल्यात भरलेल्या भाज्यांनी भरलेले होते . सोबत एक मावशी गावठी अंडी विकत झक्कास मांडी घालून बिनधास्त मोठयाने ओरडत होती . शंभरला बारा , शंभरला बारा ,
तिचा खणखणीत आवाज ऐकून सगळ्या नजरा तिच्याकडे वळायच्या .
एक व्यापारी लोणंदवरून ट्रक घेऊन आलेला होता . तो कलिंगडवाला प्रवेशद्वाराच्या शेजारीच बसला होता . मग आर्ट गॅलरी उघडल्यावर ही भाजी विकणारे मुद्दाम आत येऊन चित्रप्रदर्शन पहायला येऊ लागले . एक भाजीवाली मावशी गणपती मंदिराचे निसर्गचित्र पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार करू लागली . मग हळूच म्हणाली सकाळी बया लई गडबड झाली बघा , गंपतीचे दर्शनच घ्यायचे राहीले होते .आता तुमच्या चित्रात बाहेरचा कळस तरी दिसला , आता समदं मनासारखे झालं बघा. आता धंदा लई चांगला व्हईल .
मग एका कलिंगडवाल्याने हळूच कापलेले एक अर्धे लालभडक कलिंगड पाठवले , एकाने मस्त कापून चटणी मीठ घातलेली काकडी पाठवली , थोड्यावेळाने एक काळीटोपी घातलेला मुलगा उसाचा रस घेऊन आला . हळूहळू लोकमान्य आर्ट गॅलरीत लावलेल्या प्रदर्शनात सोमवारचा बाजार हजेरी लावून भरू लागला .
एक छोटा चुणचुणीत रुद्र चिपाडे नावाचा मुलगा आला . खूप वेळ चित्र बघत होता . मराठी महिलामंडळच्या शाळेत चौथी पूर्ण करून आता तो पाचवीला द्रविड हायस्कूलला जाणार आहे . त्याला आमचे प्रदर्शन खूप आवडले . आता रोज येईन म्हणाला . मग त्याला विचारले त्याचे आईबाबा काय करतात ? तर म्हणाला ते दोघे ताजी फुले आणून पाटी घेऊन बाजारात विकत बसतात . म्हणून त्याला स्वातीची फुलांची चित्रे खूप आवडली . गणपती घाटाचे सगळे अँगल त्याला पाठ आहेत कारण तो घाटाशेजारीच लहान मुलांच्या महिला मंडळाच्या शाळेत जात होता. चित्र कसे काढले ? कोठून काढले ? केव्हा काढले ? त्यावेळी वातावरण कसे होते ते तो नेमके सांगत होता . त्याचे प्रश्न संपतच नव्हते .
आता वाटते बरं झाले आपण असे छोट्या गावात प्रदर्शन भरवले . असे अनेक छोटे मित्र , भाजीवाले , व्यापारी मित्र , ऊसाचा रस पाठवून माणुसकी जपणारे रस्त्यावरचे दुकानदार ,छोटा रुद्र व अनेक वाईकर यांची भेट कशी झाली असती ?
मध्यमवर्गीय आईबाप भाज्यांची पिशव्या घेऊन व सोबत त्यांची छोटी मुले घेऊन चित्र पाहायला येत आहेत . हळूहळू चित्र काय असते ? प्रदर्शन म्हणजे काय ? पेपर कोणता ? फ्रेम कोठून आणली ? रंग कोणते वापरता ? असे नानाविध प्रश्न विचारत आहेत . त्याच्यां प्रश्नानां उत्तरे देताना मी देखील आता एन्जॉय करतोय .
आमच्या काळात चित्रप्रदर्शन पाहायला न मिळल्याचे खरोखर दुःख होत आहे . अशी छोटया तालुक्याच्या गावानां चित्रकारांनी प्रदर्शने भरवली पाहिजेत . कदाचित नव्या पिढीतील भावी कलाकार नक्की घडण्यास मदत होईल . अर्थात त्यासाठी चित्रातून फक्त अर्थप्राप्ती होईल हा विचार व अपेक्षा सोडून ग्राऊंड लेव्हलला यावे लागेल . निरपेक्ष भाव ठेऊन प्रदर्शने करावी लागतील .
अशा अनेक छोट्या व हौशी कलाकारांची भेट नवी उभारी देते . "गावरान तडका " ही अतिशय समर्पक उपमा आहे . इथे डोक्यावर टोपल्या घेऊन भाजीवाले , अंडीवाले , आंबेवाले नाना प्रकारची माणसे येतात . त्यानां काय विचारायच्या आत पाटी टेबलावर ठेवतात व मस्त निर्व्याज ,निरागस , उत्सुकतेने चित्रे पाहतात . स्वच्छ मनापासून हसतात , दाद देतात . निवांत बसतात .चित्रे आवडल्याचे सांगतात . आनंदाने नाव्हून जातात . मुंबईत लई टेन्शन 😀😀 लई धावत्यात 😀😀 सारखी घाईत असल्याने पळत असतात इकडून तिकडे😀😀 इथे मात्र खुर्चीवर बसून गप्पा मारत अर्धा ते एक तास बसतात . मुक्त टेन्शन फ्री चित्रविचारमंथन चालते . त्यांचा परिसर चित्रातून पाहताना ते आचंबित होतात भारावून जातात . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , काही तरी नवीन पाहील्याचे समाधान मिळते व खऱ्या अर्थाने चित्रप्रदर्शनाची आतुरता लक्षात येते .
वाईतील यावर्षी सुरु झालेली 2024 ची वसंत व्याखानमाला खूप सुंदर व नियोजनबद्द आहे . खूप भारी भारी वक्ते येतात . त्यांची भाषणे ऐकणे हा अवर्णनीय अनुभव असतो . त्यांच्या आवडत्या विषयावर ते बोलतात पण आपल्या ज्ञानात खूप भर पडते . त्यासाठी खूप मोठा लेख लिहावा लागणार आहे .
सर्वांनी भेट द्यायलाच पाहीजे अशी व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल लो . टिळक ग्रंथालय संयोजकाचे व संचालक मंडळाचे आभार मानावे तितके कमीच आहे .
व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स
वाई ,पाचगणी , महाबळेश्वर येथील स्वाती व सुनील काळे यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाला सर्व कलारसिकांनी नक्की भेट द्या .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लो .टिळक ग्रंथालय . गणपती आळी वाई .
1 ते 21 मे 2024
रोज सकाळी 10 ते 12 संध्याकाळी 5 ते 7
सर्वांना सस्नेह निमंत्रण 🙏🙏
सुनील काळे✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा